ज्ञात अज्ञात पंढरपूर ६ कृष्णाचा हौद

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in भटकंती
5 Jan 2021 - 6:03 pm

कृष्णाचा हौद
जुन्या काळी पंढरपूरात संत महात्मे वा भक्त रहिवास करित असलेली संत पेठ आणि जुनी पेठ या वसाहती अस्तित्वात होत्या. कालौघात गावाचा वाढता विस्तार आणि ग्राम गरजा लक्षात घेता नगरपरिषदेने नव्या पेठेची उभारणी केली. सरदार खाजगीवाले नगरपरिषदेचे मुख्य असताना नगरपरिषदेने इथल्या जागा लोकांना दुकाने कशी बांधावी आणि त्यात कशाची विक्री करावी याबाबत करार करून खरेदी दिल्या. ते खरेदीपत्र खरोखर वाचण्यासारखे आहे. त्याप्रमाणे पेठेची वाढ होवू लागली. तिलाच नवेपणा असल्याने नवी पेठ म्हणू लागले.
या पेठेत व्यापाऱ्यांची लगबग सूरू झाली. दुकाने उभारली गेली. धान्याच्या गोण्या आणल्या जावू लागल्या. मोठ्या तागड्या धान्याच्या भाराने खाली वर होवू लागल्या. लहान तराजूत काजू बदामासारखा सुका मेवा अन् लवंग वेलदोड्यासारखे मस्ल्याचे पदार्थ तोलला जावू लागला. बाजार वाढला तशी आवक जावक वाढली. सभोवतालच्या लहान लहान खेड्यातून शेतकरी आपण पिकविलेला शेतमाल घेवून इथे येवू लागले. इथले व्यापारी तो खरेदून विक्रि करू लागले. बाहेरगावाचे व्यापारीही खरेदी विक्रीच्या लोभाने पंढरीत येवू लागले. हमालांची वर्दळ वाढली.
या साऱ्या बाजार माल वाहतूक कामी काळाप्रमाणे वाहतूकी साधन म्हणून बैलगाडी आणि छकड्याचा वापर होई. क्वचित कोणी टांगा जोडून येणारी वा घोड्यावर येणारी व्यक्तिही येई. तर परगांवासाठी क्वचित लमाणांचे बैलतांडे वा खेचर तांडेही माल वाहतूक करत. त्यामुळे या पेठेत म्हणजे नव्या पेठेत बैल, घोडे, खेचरं या प्राण्याची वर्दळ सदैव राहिली. प्राणी आले की त्यांचे खाण्यासाठी वैरण अन् पाण्याचीही गरज भासू लागली. येणाऱ्या बाजारकरींनाही पाणी आवश्यक होते.
या अव्याहत काम करणाऱ्या मुक्या जनावरांना आणि लोकांनाही पिण्यासाठी पाणी आवश्यक असल्याने "दया तिचे नाव भूतांचे पालन" या भूतदयेने मुंबईचे धनिक वैद्यराज गणपतराव भाऊ कुलकर्णी यांनी पशुदया विचाराने सन १९३२ मधे या हौदाचे बांधकाम केले आहे. ठिकठिकाणी लोकांच्या सोईसाठी पाणी व्यवस्था करणे हे आपले कडे कित्येक शतकांपासून चालू आहे. जये शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांनी शिखर शिंगणापूरी येणाऱ्या भक्तजनांचे साठी शिखर तळी तलाव बांधला,
देवी अहिल्याबाईंनी हिंदुस्थानभर पांथस्थासाठी जागोजागो पाण्यासाठी मोठ्या विहिरी बांधलेल्या आहेत. तसाच वारसा पंढरीतही चालला.
गावाचे उत्तर भागात ऐन व्यापारी पेठेत मध्यावर तेही रस्ता सोडून सुमारे १० फूट व्यासाचे दगडाचे नक्षीदार कुंड. त्याबाहेर सांडलेले पाणी नीटसे वाहून जाण्यासाठी आणि बाहेर दलदल होवू नये म्हणून केलेली उतरती दगडी फरसबंदी योजना. सांडपाणी वाहून जाण्यासाठीचे गटार अशी याची बांधणी. सतत पाण्यासाठी येणाऱ्या गाई आणि बैलांचा विचार करता त्यांच्यात रमणारा त्यांची सेवा करणारा आणि त्या पशूनांही प्रिय असणारा गोपालकृष्ण हाच देव योग्य वाटल्याने बहुधा येथे मध्यवर्ती स्थानी दगडी खांबावर भगवान श्रीकृष्णाची सुमारे २.५ ते ३ फूटाची पितळी वेणुवादन करणारी आकर्षक अशी मुर्ती बसविण्यात आली असावी. त्यामुळेच या हौदाला कृष्णाचा हौद म्हणतात. पूर्वी याला पाण्यासाठी नगरपरिषदेच्या नळाची कायमची व्यवस्था होती. पशूं प्रमाणे या हौदावर पाण्यासाठी परगांवचे खरेदीदारी, बाजारकरी, हमाल मंडळीही दुुपारच्या भोजनाला जमत इथल्या गोड, थंडगार, स्वच्छ पाण्याने हात पाय तोंड धुवून भोजन करून रूचकर पाणी पिऊन तृप्त होत.
याप्रमाणे पंढरपूरात भादुले चौकातला भादुले हौद जो पंढरपूरतील माजी नगरसेवक अॅड. वसंतराव तथा बापू भादुले यांचे वडिल नगराध्यक्ष वै. वा भगवानराव भादुले यांनी बांधला, तसेच पश्चिमद्वार, मेंढे गल्ली, मंडई बाहेर गजानन महाराज मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आदि ठिकाणी लहान मोठाले अनेक हौद होते. शिवाय गौसेवा म्हणून अनेकांचे घराबाहेर मुक्त विहारणाऱ्या गाईंसाठी पाण्याच्या दगडी डोण्याही हौसेने ठेवलेल्या असायच्या. अशीच चौरस डोणी शिवतीर्थ रायगडावर नगाराखान्याचे जवळ आहे. मुक्त चतुष्पाद जनावरांना पाणी पिण्यासाठी अशीच एक दगडी पाण्याची डोणी माझे दारात आम्ही सांभाळून ठेवली आहे. आमचे मातामह वै. नारायण सिताराम पुजारी ( वस्ताद, कवडे तालिम) याचे एकनाथ भवन समोरिल घराबाहेर त्यांनीही हि एक दगडी डोणी सांभाळली होती. पण काय करावे, येणारे लोक त्यात तंबाखू, गुटका थुंकतात, वारकरी बांधव तर पत्रावळी, केर, खरकटे टाकतात अगदी द्विपाद असून विचारहिन पशूवत वागातात. अशी गहाण केल्यावर त्यांना समजावत प्रसंगी शिव्या देत डोणी धुवावी लागते. मगच पाणी भरावे लागते. पण गौ आणि अन्य पशुप्रेमापुढे ते कष्ट कष्ट वाटत नाहीत. उलट त्यात आनंद होतो. दु: ख वाटते ते द्विपाद जनावारांचे अविचारी वागण्याचे.
काळाच्या महिम्याने स्वयंचलित वाहने वाढली. बैल बारदाना कमी झाला. घोड्याची वाहतूक कमी झाली लमाणांची वर्दळ थांबली. व्यापारी वाहतूक ट्रक, ट्रॅक्टर, छोटा हत्ती, माल वाहतूकीच्या रिक्षा ने सुरू झाली त्यातच पशुवाहतूक संपली. त्यामुळे या हौदाचे महत्व संपले. आता तर लोकांना त्याच्या स्मृतीही राहिल्या नाहित. पंढरपूरात आता केवळ स्थळ निश्चिती म्हणून कृष्णाचा हौद सांगितले जाते. नव्या तरूणाईला तर हा हौद आणि त्याचे महत्व माहितही नाही. त्यांनी तो कधी पाहिलाही नाहि. बाकीचे हौद तर पाडून टाकले गेले. पण हा हौद अजून शिल्लक आहे.
आता त्याचे सभोवताली जाळी घातली असून वर पत्र्याचे छत आहे. मात्र अतिक्रमीत टपऱ्यामुळे ना दगडी सुंदर बांधणीचा हौद दिसतो ना पितळेचा भगवात कृष्ण. दिसतो तो केवळ पत्रा अन् त्यावरचा झेंडा. तरीही काही हमाल आणि व्यापारी, गावकरी याची नित्यनेमाने स्वच्छता करून या ठिकाणी मोठ्या उत्साहाने भगवान कृष्णाचा जन्माचा उत्सव श्रावणात गोकुळअष्टमीला साजरा करतात. पाडव्या कृष्णाला साखरेची गाठी घालतात.
आजचे घडीला हे ठिकाण म्हणजे केवळ स्थल निश्चितीचे स्थान झाले आहे. खरे तर तो एखादा सामान्य चौक नसून तो पशुपालक जीवनमान असणाऱ्या अापल्या पुर्वसुरींच्या संस्कृतीदर्शक सांस्कृतिक, ऐतिहासिक अशा पाऊलखुणा आहेत. त्या वेळीच जपल्या पाहिजेत. नाही काळाचे आघातात पंढरीतील इतर हौद नष्ट झाले ससा हा ही हौद पडून जाईल, नष्ट होईल. पण हे काम केवळ राजकीय पुढाऱ्यांचे वा नगरपरिषदेचे नसून सर्वसामान्य पंढरपूरकारांचेही आहे. समाजसेवी संस्थांचे आहे त्यासाठी लोकसहभाग हवा. कोणाही करो पण हे जपायला हवे.
©आशुतोष अनिलराव बडवे पाटील, पंढरपूर.