लाक्कुंदी आणि दांडेली - भाग २

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
4 Jan 2021 - 11:30 am

दिवस दुसरा:
आजचा दिवस आमच्या सहलीतला एकूणच आराम दिवस होता. डंबलचे डोड्डाबसप्पा मंदिर आणि इटगीचे महादेव मंदिर पहाणे एवढेच आजचे आमचे काम होते. मला सहलीत हे असले दिवस जाम आवडतात. जर धावपळच करायची असेल तर मग सहलीला येण्यात काय हशील?
आरामात उठून अगदी सावकाश आम्ही आमचा नाश्ता उरकला आणि बाहेर पडलो. गदगपासून साधारण २२ किमी अंतरावर गदग-मुंदरगी रस्त्यापासून थोडे आत डंबलचे डोड्डाबसप्पा मंदिर आहे. वाटेत काही पवनचक्क्या दिसल्या, तेव्हा तिथे थांबून थोडी छायाचित्रे काढली आणि निघालो.

मंदिराशेजारीच गाडी लावली आणि आत शिरलो. आत शिरलो आणि क्षणभर श्वास थबकला. एका छोट्या गावातले हे मंदिर एवढे सुंदर असेल अशी मी कल्पनाच केली नव्हती. छोटेसे सुरेख मंदिर, त्यासमोरचा भला मोठा नंदी आणि सभोवताली नेत्रसुखद रंगीबेरंगी फुलझाडे - कुणीही भान हरपून नुसते पाहत राहील असे दृश्य होते ते.
मंदिराचे प्रथमदर्शन









मंदिराच्या जवळच्या एका झाडावर बसलेला भारतीय नीलपंख (Indian Roller)

सकाळची वेळ असल्याने मंदिरात अजिबात गर्दी नव्हती. तानसेन मेघमल्हार गाऊ लागला की निरभ्र आकाशात बघताबघता काळे ढग दाटून येत आणि पाऊस पडत असे; अगदी तसंच निराश झालेल्या आणि जीवनाला कंटाळलेल्या कुठल्याही माणसाला इथं आणावं - हे मंदिर पाहिल्यावर त्याच्या मनात आनंदाची कारंजी थुईथुई नाचायला लागतील हे नक्की.
डोड्डाबसप्पा मंदिर पाहून आम्ही रस्त्यापलीकडच्या सोमेश्वर मंदिरात गेलो. हे बिचारे मंदिर समोरच्या दादा मंदिराच्या तुलनेत सौंदर्य आणि आकार दोन्ही दृष्टीने डावे आहे. पुण्यात असते तर ते भलतेच लोकप्रिय ठरले असते, पण ते बिचारे आहे डोड्डाबसप्पाच्या अगदी समोर; अर्थातच ते झाकोळले गेले आहे.


समोर दिसणा-या डोड्डाबसप्पा मंदिराकडे पहात आम्ही इथे थोडा वेळ रेंगाळलो आणि निघालो. इटगी इथून साधारण ३६ किमी लांब आहे. साधारण एका तासात आम्ही इटगीच्या महादेव मंदिरात पोचलो.
लाक्कुंदी आणि आजूबाजूच्या परिसरात आम्ही पाहिलेल्या मंदिरांपैकी इटगीचे महादेव मंदिर आजही पूजाअर्चा चालू असलेले एकमेव मंदिर होते. गावाचे ग्रामदैवत, गावातले मुख्य देऊळ असते तसे. आम्ही गेलो तेव्हा मंदिरात कसलातरी उत्सव चालू होता. मंदिरावर विजेच्या माळा सोडलेल्या दिसत होत्या, गर्दीही पुष्कळ होती. असे असले तरी मंदिर उत्तम स्थितीत दिसत होते. देवादिकांच्या तसबीरी लटकवलेल्या, लाईटचे बोर्ड, पट्ट्या, दिवे कुठेही कसेही लावलेले, मंदिराला चित्रविचित्र रंग फासलेला असा कुठलाही प्रकार तिथे नव्हता. एकूणच व्यवस्था उत्तम होती.


मंदिराच्या आवारात एका बाजूस एका नविन मंदिराचे बांधकाम चालू होते. बांधकाम दगडी असले आणि जुन्या शैलीनुसारच होत असले तरी बांधकामाचे दगड फारच उजळ म्हणजे फिकट पिवळे दिसत होते. हा दगड नविन असल्यामुळे असा दिसत होता की त्याचा प्रकारच वेगळा होता हे कळायला काही मार्ग नव्हता.
नविन बांधकाम

मंदिरात एखादा तास घालवून आम्ही निघालो. बाहेर लाकडापासून बनवलेला आणि दगडी चाके असलेला एक रथ दिसत होता. रथ पाहून मला जगन्नाथ पुरीच्या त्या प्रसिद्ध रथाची आठवण झाली.


इटगीहून गदगला जाताना लाक्कुंडीमार्गेच जावे लागते, तेव्हा ASIच्या ताब्यात नसलेले एखादे मंदिर पाहूयात असा विचार करून गावात शिरलो. तीन मंदिरे सापडली. त्यातली दोन मंदिरे तर आजूबाजूच्या घरांच्या गर्दीत पार हरवून गेली होती. एका मंदिराच्या तर भिंतीला लागून शेजारचे घर बांधले होते. तिसरे मंदिर जरा बरे दिसत होते. गावकरी दुपारच्या वेळी विश्रांतीस्थान म्हणून या मंदिराचा वापर करीत असावेत.

काही वेळातच आम्ही गदगला परतलो आणि तिथे एका छोट्या कर्नाटकी खानावळीत एक अस्सल कर्नाटकी शाकाहारी थाळी हाणली. गदगला एक वस्तुसंग्रहालय आहे अशी माहिती आम्हाला होती, तेव्हा तिकडे निघालो. बहुतेक सरकारी वस्तुसंग्रहालये असून अडचण आणि नसून खोळंबा अशी असतात, गदगचे वस्तुसंग्रहालय अर्थातच याला अपवाद नव्हते. या वस्तुसंग्रहालयाला तिकीट नव्हते; त्याचे कारण आम्हाला लागलीच मिळाले. तिकीट देणा-या माणसाला द्यायच्या पगाराइतकेही पैसे जर तिकीटे विकून मिळत नसतील तर माणूस ठेवणार कसा?
फोटो काढू नका अशी प्रेमळ सूचना देऊन रखवालदार नाहीसा झाला. एकून चार एक दालने असावीत. मला वस्तुसंग्रहालये आवडतात; माझ्या बरोबरचे इतर लोक मात्र कंटाळले. संग्रहालयात ठेवता येणार नाहीत अशा काही मोठ्या मूर्त्या इमारतीच्या आवारात उघड्यावर ठेवल्या होत्या, त्यांवर एक नजर टाकून आम्ही निघालो.
या मुर्त्यांमधल्या दोन सुंदर मुर्त्या :P


त्यानंतर? खोलीवर जाणे, खाणे, पिणे (पाणी!) आणि झोपणे. उद्या? दांडेली.

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

4 Jan 2021 - 11:52 am | तुषार काळभोर

अप्रतिम मंदीरांच्या छायाचित्रांनी नटला आहे!
फोटो एकसे एक आहेत.

Nitin Palkar's picture

4 Jan 2021 - 1:12 pm | Nitin Palkar

'....पुण्यात असते तर ते भलतेच लोकप्रिय ठरले असते,' किती ती पुण्याची स्तुती (?). बाकी लेख उत्तम.

गोरगावलेकर's picture

4 Jan 2021 - 1:31 pm | गोरगावलेकर

पहिल्या भागाइतकाच हाही भाग सुंदर

सौंदाळा's picture

4 Jan 2021 - 2:23 pm | सौंदाळा

हा भाग आणि फोटो पण सुंदर
फक्त देऊळच नाही तर आजूबाजूचा परिसर पण सुंदर दिसतोय.
तुम्ही दाखवलेल्या रथासारखाच पण त्याहून साधारण दुप्पट मोठा (उंच) रथ गोव्यात मंगेशीच्या देवळात आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला भल्या पहाटे रथातून देवाची मिरवणूक निघते. कोकणातील अजून काही देवळांमध्ये असे रथ पाहिले आहेत.
आता दांडेलीच्या प्रतीक्षेत.

कंजूस's picture

4 Jan 2021 - 8:51 pm | कंजूस

एकूण लेख फारच सुंदर आहेत.

कंजूस's picture

4 Jan 2021 - 8:57 pm | कंजूस

बांधकामाचे दगड फारच उजळ म्हणजे फिकट पिवळे दिसत होते. हा दगड नविन असल्यामुळे असा दिसत होता

मऊ सँडस्टोन असतो. पिवळसर दिसतो खाणीतून कापून काढल्यावर. कोरीवकामास सोपा. नंतर हवा लागल्यावर रंग गडद होतो. टणक होतो.

प्रचेतस's picture

5 Jan 2021 - 9:07 am | प्रचेतस

+१
हंपीतील सर्व बांधकाम याच दगडात आहेत.

बाकी हा लेखही आवडला.
एकदम अपरिचित मंदिरे आवडली.

डोड्डाबसप्पा मंदिर बघून अंबरनाथच्या शिव मंदिराची आठवण आली. सगळी मंदेरे मस्त आहेत. रथ, नंदी, कोरीवकाम, स्थापत्य, मुर्त्या आणि सगळे फोटो एक नंबर 👍 अशाच हटके ठिकाणांची ओळख करून देत रहा!

चौथा कोनाडा's picture

8 Jan 2021 - 5:41 pm | चौथा कोनाडा

वाह, किती सुंदर मंदिरे !
कोरिवकाम पाहून डोळ्यांचे पारणे फिटले !
-अ -प्र -ति -म !