दिल चाहता है / शापोरा किल्ला/चापोरा किल्ला/Chapora fort

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
25 Dec 2020 - 6:10 pm

गोव्याच्या दक्षीण आणि उत्तर बाजुला अनेक देखणे किनारे आहेत. बहुतेक किनार्‍यांना पार्श्वभुमी लाभली आहे ती निळ्या अथांग सागराची, मउशार सोनेरी वाळू, किनार्‍यावरच्या नारळी, पोफळीची गर्द झाडी यांची.

पण यासगळ्यात एका किनार्‍याला खास पार्श्वभुमी मिळाली आहे, तो बीच म्हणजे "व्हॅगॅतोर बीच ( Vagator Beach )".

थोडा खडकाळ असलेला आणि हेच वेगळेपण जपणार्‍या या बीचच्या मागे छोट्या टेकडीवर लवलवणारे सोनसळी गवत पांघरुन मस्तकावर जांभ्या दगडाची तटबंदीचा शिरपेच असणारा "शापोरा किल्ला". ईतक्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या जागी किल्ला बांधण्याची ईच्छा झालेला तो सरदार नुसता कोरडा लष्करी अधिकारी नसून, जणू ईथला निसर्गपट पुर्ण करणारा चित्रकार असला पाहिजे.

पेर्णे तालुक्यात मोर्जी येथे उगम पावणारी शापोरा नदी बारदेश तालुक्यात, या किल्ल्याजवळ समुद्राजवळ मिळते. म्हापसा शहरापासून केवळ १० कि.मी. वर हा किल्ला आहे.

शापोरा नदी ते मांडवी नदी यांच्या दुआबात बारदेश प्रांत (तालुका) पसरला आहे. बारदेशच्या पूर्वेला आहे डिचोली, तर पश्चिमेला आहे अरबी समुद्र. बारदेश हा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात जाण्यापूर्वी येथे विजापूरच्या अली आदिलशाहची सत्ता होती व त्याच्या अधिकाऱ्याने येथे किल्ला बांधला. ह्या भागाचे मुल नाव शाहपुरा. पोर्तुगीजांनी त्या नावाचा अपभ्रंश शापोरा करून टाकलं. याच गडाचे "कायसुव" हे दुसरे कागदोपत्री नाव सापडते.

पुढे १३ डिसेंबर १५७१ रोजी आदिलशहा आणि पोर्तुगीज व्हाइसरॉय ‘दों आंतोनियु द नोरोन्य’ यांच्यामध्ये तह झाला. या तहान्वये सासष्टी व बारदेश या प्रदेशांवरील आपला हक्क आदिलशहाने सोडला व हे प्रदेश कायमचे पोर्तुगीजांना मिळाले. पण या प्रदेशात उपटसुंभ असणार्‍या पोर्तुगीजांच्या बारदेश प्रांताला उत्तरेकडून मुस्लीम सत्ता, पूर्वेकडून मराठे तसेच त्या भागातील देसाई व सावंत अशा स्थानिक शत्रूंकडून धोका होता. त्यामुळे पोर्तुगिजांनी १६१७ मधे शापोरा किल्ल्याचे बांधकाम केले. हा किल्ला आग्वाद किल्ल्यानंतर पाच वर्षांनी बांधण्यात आला. पोर्तुगीजांनी १५० हुन अधिक वर्षे या किल्ल्यावर राज्य केले खरे पण गोव्यातील पोर्तुगीज सत्तेचा अंत होण्यापूर्वी हा किल्ला बऱ्याच वेळा वेगवेगळ्या सत्तांच्या ताब्यात गेला. १६८४ मधे संभाजी महाराज गोव्याच्या स्वारीवर असताना शापोर्‍याला मराठ्यांनी वेढा दिला,आतील पाद्रयाला गोळी घालून ठार केले व मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. त्यावेळी आतील चाळीस लोकांना कैद केले. इ.स. १७१७ च्या सुमारास मराठा सैन्याने या किल्ल्यातून माघार घेताच पोर्तुगिजांनी किल्ला पुन्हा ताब्यात घेतला व त्यावेळी गोव्याचा गव्हर्नर काउंट ऑफ ईरिसिएरा याने किल्ल्याची युद्धशास्त्राच्या दृष्टीने बळकट करण्यासाठी पुर्नबांधणी केली. किल्ल्याची बळकटीकरण करतानाच जमीनीखाली भुयारांची बांधणी केली. आणीबाणीच्या काळात बचाव करण्यासाठी व पळून जाण्यासाठी पोर्तुगीजानी बांधलेल्या या भूयारांचा उपयोग होत असे. पुढे १७३९ मध्ये हा किल्ला सावंतवाडीकरांच्या ताब्यात आला. पण पुढे दोनच वर्षांनंतर म्हणजे १७४१ मधे पोर्तुगिजांना उत्तरेकडील पेडणे तालुका दिल्यानंतर किल्ला त्यांना सुपूर्त करण्यात आला. पुढे मात्र १८९२ मध्ये पोर्तुगिजांनी या किल्ल्याचा वापर कायमचा बंद केला व तेव्हापासून या किल्ल्याने आपले पूर्वी असलेले वैभव गमावले.


आज किल्ला अवशेष रुपात शिल्लक असला तरी या किल्ल्याला असणारे पोर्तुगीज धाटणीचे कॅप्सुल बुरुज ( याना बार्टीझन असे म्हणतात ), एक सुस्थितीत असलेला दरवाजा आणि किल्ल्याला सर्वबाजूने असणारी भक्कम तटबंदी असे अवशेष आवर्जून पाहण्यासारखे आहेत.या किल्ल्याला चार प्रवेशद्वारे आहेत. एकेकाळी या किल्ल्यात सेंट अंथोनी चर्च होती असे म्हणतात.पण पर्यटक मात्र या किल्ल्याला भेट देतात ते या किल्ल्यावरून दिसणाऱ्या समुद्राच्या पॅनोरमिक व्ह्यूसाठी. हे सुंदर विहंगम दृश्य पाहण्यासाठी एकदा तरी या किल्ल्याला भेट दयायला हवी.

एक पायवाट अगदी वॅगॅतोर बीचवरुन थेट किल्ल्यावर जाते आपण त्याने रमतगमत जाउ शकतो किंवा एक डांबरी रस्ता थेट किल्ल्याच्या जवळ जातो.
शापोरा किल्ला म्हापसापासून अंदाजे १० किमी तर प्रसिद्ध कलंगुट बीचपासून फक्त १५ किमी अंतरावर आहे. तसेच व्हॅगेटर/वागातोर व अंजुना हे गोव्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे किल्ल्यापासून अगदीच जवळ आहेत. सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५,३० पर्यंत किल्ला पर्यटकांसाठी खुला असतो.

बॉलिवुडमधील एक गाजलेला चित्रपट म्हणजे "दिल चाहता है". या चित्रपटातील एका दृश्यामध्ये समुद्रकिनारी असलेल्या एका किल्ल्याच्या तटबंदीवर बसलेले तिघे मित्र दाखविले आहेत. हाच तो गोव्यातला शापोरा किल्ला होय. "दिल चाहता है" चित्रपटात येथील दृश्य दाखवण्यापूर्वी या किल्ल्यावर इतिहासप्रेमी लोकांशिवाय इतर कोणी भटकत नसे पण "दिल चाहता है" चित्रपटात या किल्ल्याचे व परिसरातील निसर्गाचे सौंदर्य दाखवल्यापासून हा किल्ला गोव्यातील एक must visit डेस्टिनेशन बनला आहे. तांबूस पिवळ्या रंगाची आभा पश्चिम समुद्रावर पसरत असताना, पाण्यात बुडत जाणारा दिनकर इथल्या तटबंदीवरून निरखणे आणि भुतकाळात हरवणे म्हणजे एक विलक्षण योग आहे.
( महत्वाची तळटीपः- काही प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )

माझे सर्व लिखाण आपण एकत्रितपणे ईथे वाचु शकता.
भटकंती सह्याद्रीची

शापोरा किल्ल्याची व्हिडीओतून सैर

संदर्भः-
१) जलदुर्गांच्या सहवासातः- प्र.के. घाणेकर
२) https://itsgoa.com/forts-in-goa-know-more-about-them/ हे संकेतस्थळ
३) पोर्तुगीज-मराठा संबंध- श्री. स.शं. देसाई
४) चला माझ्या गोव्यात- मिलींद गुणाजी
५) शिवपुत्र संभाजी- कमल गोखले
६) www.durgwedh.blogspot.in हा विनीत दाते यांचा ब्लॉग
७) ईंटरनेटवरुन मिळालेले संदर्भ

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

26 Dec 2020 - 8:39 am | सौंदाळा

मस्तच झालाय हा पण भाग.
इकडे जाणं झाले आहे. पण तटबंदी आणि आतमधे विस्तीर्ण पठार सोडून विशेष काही नाही. निसर्गसौंदर्य मात्र खूपच सुंदर
पुभाप्र

गोरगावलेकर's picture

26 Dec 2020 - 2:11 pm | गोरगावलेकर

मी स्वतः किल्ला पहिला नाही. पण मुलीने येथे भेट दिली आहे.

हाच तो संगम असावा जेथे शापोरा नदी सुमुद्राला मिळते.

बेकार तरुण's picture

27 Dec 2020 - 2:06 pm | बेकार तरुण

नेहमीप्रमाणे लेख आवडला....

अनिंद्य's picture

27 Dec 2020 - 9:05 pm | अनिंद्य

लोकेशन लोकेशन लोकेशन !

कुठलेही स्थळ प्रसिद्ध करायचे असेल तर बॉलीवूडला पाचारण करावे :-)

शापोरा एकदम सुंदर जागी वसलाय, मला इथला किल्लेदार व्हायला आवडेल.

बाप्पू's picture

28 Dec 2020 - 1:12 pm | बाप्पू

मस्त photo..

किल्ल्याची तोंड ओळख आवडली. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

अथांग आकाश's picture

28 Dec 2020 - 2:05 pm | अथांग आकाश

झकास लेख! दिल चाहता है हा माझा आवडता पिक्चर आज पुन्हा बघावा लागणार!!
.

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Dec 2020 - 2:24 pm | ज्ञानोबाचे पैजार

नेहमी प्रमाणेच छान ओळख एका नव्या किल्ल्याची.
पैजारबुवा,

सुंदर आहे हा अवशेषरुपी किल्ला आणि त्याचा परिसर 👍
दगड वापरून केलेली सगळीच बांधकामे मला फार आवडतात, त्याला हा अवशेषरुपी जांभ्या दगडाचा किल्लाही अपवाद नाही.
नेहमीप्रमाणेच छान लेख, पुढील लेखनास शुभेच्छा!

माहिती थोडी कमी वाटली पण फोटो सुपरक्लास.
ले आ हे वे सां न ल.

मस्त वर्णन. शापोरा पाहिलेला आहेच, अत्यंत सुंदर दृश्य दिसतात वरुन.

ह्या फोटोतील मार्गावर प्रचंड घसरडी माती आहे. तिथून चढता उतरताना पोरीबाळींची होणारी तारांबळ बघायला खूप मजा येते.

दुर्गविहारी's picture

1 Jan 2021 - 7:57 pm | दुर्गविहारी

सौंदाळा, गोरगावलेकर,बेकार तरुण, अनिंद्,, बाप्पू,अथांग आकाश, ज्ञानोबाचे पैजार, टर्मीनेटर,रंगीला रतन आणि प्रचेतस या स्रव प्रतिसादकांचे आणि असंख्य वाचकांचे मनापासून आभार.

माहिती थोडी कमी वाटली पण फोटो सुपरक्लास.

या किल्ल्याची तशी फार माहिती उपलब्ध नाही.जितकी मिळाली तितकी धाग्यात लिहीली आहे.

प्रीत-मोहर's picture

5 Jan 2021 - 4:54 pm | प्रीत-मोहर

ह्या भागाचे मुल नाव शाहपुरा. पोर्तुगीजांनी त्या नावाचा अपभ्रंश शापोरा करून टाकलं. याच गडाचे "कायसुव" हे दुसरे कागदोपत्री नाव सापडते.

शापोरा हे शिवोली गावाचे नाव आहे. शिवोली नदीला देखील रिवर शापोरा म्हणतात. आणि काय्सूव हे वेगळं गाव आहे शिवोलीनजिक

प्रीत-मोहर's picture

5 Jan 2021 - 5:02 pm | प्रीत-मोहर

उप्स चुकीचा प्रतिसाद दिलाय एडिट करता येईना आता

https://timesofindia.indiatimes.com/city/goa/the-village-that-drew-the-w... हे बघा

या प्रतिसादाबध्दल आणि माहितीबध्दल धन्यवाद्.
या माहितीचा समावेश माझ्या लिखाणात करीन.गोव्यांतील किल्ल्यांच्या मालिकेत आपल्या प्रतिसादाची उत्सुकता राहील.

चौथा कोनाडा's picture

8 Jan 2021 - 5:30 pm | चौथा कोनाडा

सुंदर किल्ला, उत्कृष्ट माहिती, झकास फोटो !

विकास...'s picture

3 Apr 2021 - 12:27 am | विकास...

आज पाहावा लागेल .. संपूर्ण दिल चाहता है आज पाहावाच लागेल

सुबोध खरे's picture

3 Apr 2021 - 10:28 am | सुबोध खरे

आपले एक कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचे अतिशय सुंदर रसभरीत वर्णन करता.

अन्यथा या चापोरा किल्ल्यात गेल्यावर मला स्वतःला जाणवलेली एक गोष्ट. किल्ला तितका काही खास नाही पण त्याचे विपणन खूप छान केलेले आहे.

आपल्या महाराष्ट्रात गोव्यातील बहुसंख्य किल्ल्यांपेक्षा जास्त सुंदर किल्ले( बांधकाम दृष्टीने)आहेत. यात रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग आणि जंजिरा नक्कीच बरंच वरचे स्थान पटकावतील. पण महाराष्ट्र्रातील या वारशाचे विपणन( मार्केटिंग) तितके चांगले झालेले नाही.