ज्ञात अज्ञात पंढरपूर ३ रोकडोबा वेस/ हरिदास वेस

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in भटकंती
19 Dec 2020 - 11:38 am

ज्ञात अज्ञात पंढरपूर ३
रोकडोबा वेस/ हरिदास वेस
मनुष्याने जमाव करून राहताना चोर, दरवडेखोरांच्या पासून आणि वन्य श्वापदांपासून संरक्षणासाठी गांव वसवून राहणे मानवाला आवश्यक वाटले म्हणून गांवे निर्मीली गेली. पण तिथेही वन्य श्वापदांचा अन् दरवडेखोरांच्यां त्रासाची भिती होतीच. ग्राम संरक्षणासाठी गाव म्हटले की गावकुस आलेच. गावकुस असले की वेस हवीच.
पंढरपूराला अशा तीन वेशी अस्तित्वात होत्या. पैकी सर्वात मोठी होती ती महाद्वार रस्त्यावर कवठेकरांचे दुकान आणि अकरा रूद्र मारूती जवळची महाद्वार वेस. तिला दोन्ही बाजूला प्रशस्त देवड्या ज्यात बसून रक्षक ग्रामाच येणाऱ्या जाणारेवर देखरेख ठेवू शकतील अशा. शिवाय पांथस्थांला तिथे बसून पाणी पिता येईल वा दोन घडी विसावता येईल अशा दो बाजू देवड्या. जी पाहताच रायगडावरिल भव्य नगारखान्याची वा कोल्हापूरातील भवानी मंडपाजवळील प्रवेशद्वाराची आठवण व्हावी. अशी दगडी बांधणीची आणि देखणीही होती. १९८० च्या रस्ता रूंदीकरणात विकासाच्या नावाखाली ती भुईसपाट करण्यात आली. खरे तर ती पुरातन वारसा म्हणून जतन करायला हवी होती. जसे अंबिकानगर, संभाजीनगर आदी गावी अनेक वेशी शिल्लक ठेवल्या आहेत तसे.
दुसरी छोटेखानी पण देखणी अशी कुंभार घाटावरची वीटांची वेस. तीही मोडखळीस आल्याने लोकांना धोका नको म्हणून नुकतीच गतवर्षी पाडण्यात आली. सांस्कृतिकदृष्ट्या आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाची असणारी तिसरी वेस म्हणजे रोकडोबाची वेस अथवा हरिदास वेस.
गावाच्या उत्तर भागात विठ्ठल मंदिराकडून भजनदास चौकाकडे जाण्याचे रस्त्यावर हिचे स्थान आहे. वेशीच्या आत पंचाळी आणि हरिदास मंडळींची घरे आणि वेशी बाहेर पिंपळाचे पारावरचे रोकडोबा मारूतीचे मंदिर अशा जागी हि वेस उभी आहे. हिची बांधणी इसवी सन १६६३ मधे झाल्याचे उल्लेख आहेत. जुन्या कागदपत्रांत शेजारी रोकडोबा मारूती म्हणून हिचा उल्लेख रोकडोबा वेस असा आहे. तर हरिदासांची घरे जवळपास असल्याने तिला हरिदास वेस म्हणूनही ओळखतात. आजची हिची जागा पाहिली म्हणजे जुन्या काळी गावाचा विस्तार केवढा होता हे लक्षात येते. कारण रोकडोबा मारूती म्हणजे वेशीवरचा मारूती. सोबतच्या प्रकाशचित्रांत रोकडोबा मारूतीचा पार, पिंपळ एका बाजूला दिसतो आहे. आजही नगर परिक्रमा करताना या वेशी बाहेरूनच भजनदास चौकातून जावे लागते.
सुमारे १५ फूटाची कमान असलेली ज्यातून आजही ट्रॅक्टरसारखी वाहने जावू शकतील अशा आकाराची सुमारे २० फूट उंचीची ५ फूट लांबीची दगडी बांधणीची हि वेस आजहि भरभक्कमपणे उभी आहे. पूर्वी हा रस्ता काळ्या दगडांच्या फरश्यानी बांधलेला होता. अन् वेशीतून आत जादा रहदारीचा त्रास्त होवू नये म्हणून मोठी छावणी रस्त्यात उभी रोवली होती. जी आता काढून टाकलीय.
बडोद्याचे गायकवाड सरकारांचा वकिल गंगाधर शास्त्री राजकारणातील वाटाघाटीसाठी दुसरे बाजीरावाचे भेटीस पंढरपूरी आल्यावर त्यांचा १५ जुलै १८१५ ला खून पाडण्यात आला. आणि हे गायकवाडी वकिलाच्या खूनाचे प्रकरण तत्कालिन हिंदुस्थानातील सर्व संस्थानात गाजले. केवळ हिंदुस्थानभरच नव्हे तर युरोपातही गाजले. परिणामी पेशव्यांचा सरदार त्र्यंबकजी डेंगळ्यांवर त्याचे खापर फोडून त्याला इंग्रजांंनी शिक्षा केली. तो गंगाधर शास्त्रीचा गाजलेला खून गंगाधर शास्त्री देवदर्शन आणि कीर्तन श्रवण करून पालखीतून आपल्या मुक्कामी जाण्यास या वेशीतून बाहेर पडल्यावरच वेशी जवळच झाला.
आषाढी, कार्तिकी च्या यात्रेनंतर महाद्वार काल्या चे समयी हरिदासां कडिल प्रासादिक पादूका दिंडीसह त्याचे घरातून बाहेर पडून पांडुरंगरायाचे रावळातून महाव्दार, खाजगीवाले वाडा या मार्गे मिरवून या वेशीतून आत जातात. त्यावेळी पादुकांवर या वेशीतून लाह्यांची, गुलाल बुक्क्याची उधळण केली जाते. सर्वांना काल्याचा प्रसाद दिला जातो.
सांप्रत नव्याने पंढरी विकासाच्या गोष्टि घडू लागल्यात त्यातूनच जसे नगर, संभाजीनगरच्या (औरंगाबाद) वेशी टिकविल्या त्याप्रमाणे पंढरीचा सांस्कृतिक वारसा, एेतिहासिक महत्व असणारी हि वेस टिकवावी. तीची मोडतोड न होता रस्ता करावा. ग्रामसंस्कृती जपावी. ही अपेक्षा.
© आशुतोष अनिलराव बडवे पाटिल, पंढरपूरवेस
वेस
महाद्वार वेस
कुंभार घाट

प्रतिक्रिया

कंजूस's picture

19 Dec 2020 - 12:02 pm | कंजूस

विटांच्या वेसेचा फोटो फारच भारी आला आहे.

तुषार काळभोर's picture

19 Dec 2020 - 3:08 pm | तुषार काळभोर

शेवटचा फोटो एक नंबर!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Dec 2020 - 3:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहिती नंबर वन...! धन्यवाद. पंढरपूर बद्दल अजून अशीच माहिती येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

दुर्गविहारी's picture

19 Dec 2020 - 8:58 pm | दुर्गविहारी

खुपच छान ! आणखी लिखाण येउ देत.

चौथा कोनाडा's picture

19 Dec 2020 - 9:04 pm | चौथा कोनाडा

खुप सुंदर माहिती !
धन्यवाद, आशुतोष अनिलराव बडवे पाटिल.

फारएन्ड's picture

20 Dec 2020 - 6:52 am | फारएन्ड

त्या फोटोंबद्दलही अजून माहिती द्या जमले तर.

फारएन्ड's picture

20 Dec 2020 - 6:54 am | फारएन्ड

आणि आता समजले.

रंगीला रतन's picture

20 Dec 2020 - 10:35 am | रंगीला रतन

चांगली माहिती आणि फोटो. मालिका आवडली.

MipaPremiYogesh's picture

21 Dec 2020 - 9:29 pm | MipaPremiYogesh

वाह मस्तच ..माहिती देत आहेत. फोटो अप्रतिम
मी आळंदीचा आणि आमच्या सासूबाई पंढरपूरच्या :).