बहुतेक जण गोव्याला भेट देतात, ते बीच, मंदिर आणि चर्चसारखी ठिकाण पहायला. ईथे काही एतिहासिक ठिकाणे आहेत, याचा सहसा गंध नसतो, पण याला अपवाद म्हणजे "फोर्ट अग्वाद". गोव्याच्या पर्यटन स्थळामधील एक नक्कीच भेट देण्याचे ठिकाण म्हणजे अग्वादचा किल्ला.
पणजीपासून फक्त १७ कि.मी. वर असलेला हा किल्ला कांदोळी जिल्ह्यात असून ,एक दुपार सार्थकी लावण्यासाठी उत्तम आहे. ह्या जुन्या किल्ल्यावरुन समुद्राचे उत्तम दर्शन होते आणि एक आठवणीतील सूर्यास्त पहायलाही मिळतो. कलंगुट या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यापासून फक्त सहा कि.मी. अंतरावर आहे. हा किल्ला गोवा राज्य पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्यामुळे पर्यटकांसाठी दररोज सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुला असतो.
या किल्ल्याच खरं नाव मात्र सांता कातारीन. १७ व्या शतकाच्या सुरवातीला पोर्तुगीज गोव्यात चांगलेच स्थिरावले असताना अचानक एके दिवशी सात डच जहाजे मांडवी नदीच्या मुखाशी जुन्या गोव्यासमोर असणाऱ्या समुद्रकिनाऱ्यावर उभी ठाकली. सशस्त्र अश्या या डच जहाजांनी मनात आणले असते तर तेव्हाच गोवे जिंकून घेतले असते. पण त्यांनी फक्त पोर्तुगीजांच्या ताब्यात असणाऱ्या गोव्याची प्रचंड लुट केली व ते निघून गेले. त्यावेळी मांडवी किनारी असणाऱ्या रेईश मागुश व गाश्पार दियश या पोर्तुगीजांच्या दोन किल्ल्यांनी कसेबसे या आक्रमणाला उत्तर दिले पण ते कमकुवत ठरले. या प्रकरणानंतर मात्र पोर्तुगीजांचे डोळे खाडकन उघडले आणि मांडवीच्या मुखाशी सांता कातारीन उर्फ आग्वाद किल्ल्याचा जन्म झाला. १६०९ ते १६१२ अशी पाच वर्ष या किल्ल्याचे बांधकाम सुरु होते. अग्वादच्या दरवाज्यात पोर्तुगीज भाषेतील शिलालेख आहे, त्याचे वाचन याप्रमाणे:-" परम धार्मिक राजा फिलीप दुसरा, पोर्तुगालमध्ये राज्य करत असताना, त्याच्या आदेशावरुन हा किल्ला उभारला गेला, त्यावेळी रुब द ताव्होरा गोव्याचे व्हाईसराय होते". मात्र पोर्तुगीजांच्या ४०० वर्षांच्या राजवटीत हा एकच किल्ला कुठल्याच आक्रमणकर्त्याला जिंकता आला नाही. सलग शेकडो वर्ष हा किल्ला पोर्तुगीज अधिपत्याखालीच राहिला. जेंव्हा पोर्तुगीज गेले, तेंव्हा १९६२ च्या सुमारास हा किल्ला आपल्या ताब्यात आला.
हा किल्ला बांधत असताना पोर्तुगीजांना या किल्ल्याच्या एन किल्ल्याच्या दरवाज्याजवळच एक विहीर व खडकात एके ठिकाणी गोड्या पाण्याच्या जिवंत झऱ्याचा शोध लागला. उत्कृष्ट आणि मुबलक पाणी मिळाल्यानंतर किल्लेदाराने तेथे हौद बांधला व रहाट आणि पन्हाळीची सोय करुन किल्ल्यावरुन पाणी खाली जहाजांना देण्याची व्यवस्था केली. गोड्या व थंड पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे मग हळू हळू या किनाऱ्यावर पोर्तुगीजांची जहाजे थांबू लागली. त्यामुळे मग पुढे या किल्ल्याचा जहाजांतून येणाऱ्या प्रवाशांना पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी उपयोग केला जाऊ लागला.पोर्तुगीज भाषेत “आग्व” म्हणजे पाणी त्यामुळे भरपुर पाणी मिळणार्या झर्याला नाव पडले "माय द आग्वा" म्हणजे "पाण्याची आई". पुढे शब्दाची उलटपालट होउन झाले, "अग्वाद". हेच नाव पुढे रुळले. साहजिकच मग सांता कातारीन हे जुने नाव विस्मृतीत जाऊन हा किल्ला आग्वाद या नावाने ओळखला जाऊ लागला. जहाजामधे पाणी भरण्यासाठी या किल्ल्यातील एका भूमिगत टाकीत जवळपास २४ लाख गॅलन पाणी साठवले जात असे. १७ खांबावर उभी असलेली ही भुमिगत टाकी हे या किल्ल्याचे एक खास वैशिष्ठ्य आहे. पोर्तुगालमधून येणाऱ्या जहाजांचा हा भारतातला हा पहिला थांबा असायचा.
अग्वादच्या पायथ्याशी असलेला जहाजांचा धक्का
या किल्ल्यावरून चारही बाजूला व्यवस्थित नजर ठेवता येते त्यामुळे साहजिकच किनाऱ्यावर येणाऱ्या पोर्तुगीज जहाजांना या किल्ल्याद्वारे पुर्ण संरक्षण पुरवता यायचे.
किल्ल्यावरून खोल समुद्रात दुरवर व चारही बाजूला व्यवस्थित नजर ठेवता येत असल्याने किनाऱ्यावर येणाऱ्या पोर्तुगीज जहाजांना संरक्षण मिळत असे. तांबड्या चिऱ्याने बांधलेला हा किल्ला आजही वारा पावसाशी टक्कर देत दिमाखात उभा आहे. सलग ४०० वर्ष हा किल्ला पोर्तुगीज अधिपत्याखाली होता. पोर्तुगीज काळात ह्या किल्ल्यावर कोणाचा हल्ला वगैरे झालेला नाही. गोवा मुक्ती संग्रामानंतर पोर्तुगीज गेल्यावर १९६२च्या सुमारास हा किल्ला भारतीय राज्यात सामील झाला.
या किल्ल्याच्या बांधकामाची तुलना सह्याद्रीतील दगडी किल्ल्यांशी करता हा किल्ला एकदम तकलादू वाटतो. तोफेचा भडीमार केल्यास तटबंदी सहज कोसळून पडेल असे वाटत असले तरी याच किल्ल्याच्या भरवशावर गोव्याच्या किनाऱ्यावर येणाऱ्या जहाजावर नजर ठेवण्याचे काम पोर्तुगीज करत हो्ते. अग्वाद किल्ला मांडवी नदीच्या मुखावर असुन इथून पुढे मांडवी नदी अरबी समुद्राला मिळते.
किल्ल्याच्या दरवाजापर्यंत गाडीरस्ता असल्याने आपण सहजपणे तटबंदी जवळ पोहोचतो.
जेव्हा आपण सिक्वेरी बीचवरुन टेकडी चढून आग्वादकडे येत असतो, तेव्हा रस्त्याचा एक फाटा रस्ता सोडून डावीकडे सेंट्रल जेल कडे गेल्यास, जेलच्या दरवाजासमोर डावीकडील पायवाटेने खाली उतरताच आग्वाद किल्ल्याचा विस्तीर्ण असा दक्षिण तट पहायला मिळतो.
दक्षिण तटावरील किल्ल्याचा काही भाग हा गोव्यातील सर्वात मोठ्या व अजूनही वापरात असणाऱ्या सेंट्रल जेलसाठी वापरला जातो.
त्यामुळे या किल्ल्याचे सध्या अप्पर अग्वाद (टेकडीवरील किल्ला) व लोअर आग्वाद (खालच्या भागातील किल्ला) असे दोन भाग झालेले आहेत. आता या किल्ल्याचा बराचसा भाग हा टाटा ग्रुपच्या ताज विवांता (ताज फोर्ट आग्वादा रिज़ॉर्ट एन्ड स्पा) या पंचतारांकित हॉटेलला दिलेला आहे. त्यामुळे ताज विवांता हॉटेलचा परिसर व कारागृह ही दोन ठिकाणे सोडल्यास इतर ठिकाणी मात्र पर्यटकांना किल्ल्यात मुक्त प्रवेश आहे.
अग्वादकडे जाताना टेकडी चढणार आहोत, यासाठी घाट चढायचा आहे, तोपर्यंत अग्वादच्या ईतिहासातील काही घटना पाहुया. इ.स. १६१२ मध्ये अग्वादचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर आदिलशहाचा सरदार अब्दुल हकीम याने गोव्यावर आक्रमण करुन अग्वाद ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला, मात्र या पराक्रमी सरदारचा प्रयत्न अपुरा ठरला. पुढे गोव्यातील पोर्तुगीज छळवाद संपवायला इ.स. १६६६ मध्ये शिवाजी महाराजांनी तर पुढे संभाजी महाराजांनी मोहीम उघडली. मात्र या अग्वाद रुपी बलदंड लष्करी ठाण्यामुळे कदाचित त्यांना समुद्रमार्गाने हल्ला करुन हे फिरंगाण संपवता आले नाही. पुढे भारत ईंग्रजांच्या ताब्यातून मुक्त होण्याचा दिवस जवळ आला, तरी गोवा काही पोर्तुगीजांच्या तावडीतुन स्वतंत्र होण्याची शक्यता दिसेना. १८ जुन १९४६ या दिवशी डॉ. राम मनोहर लोहीया यांनी गोमांतक मुक्ततेचे रणशिंग फुंकले. त्यांना याच अग्वादच्या किल्ल्यात बंदी बनवले होते. हा दिवस आजही क्रांतिदिन म्हणून साजरा केला जातो. नुकतेच १९९६ या घटनेला पन्नास वर्षे पुर्ण झाली.
स्वातंत्रसैनिक संघटना आणि शासनाने संयुक्त प्रेरणेने या घटनेचे शिल्प या अग्वाद परिसरात उभारलेले आहे. या शिल्पात गोव्याची स्वातंत्र्य देवता पारतंत्र्याच्या बेड्या तुटलेल्या आणि हात उंचावून मुक्त झालेली दाखविली आहे. मागे अशोकस्तंभ आणि पायथ्याशी मुक्तीसैनिकाचे शव खांद्यावर घेउन दुसरा योध्दा, असे हे शिल्प श्री. विष्णू कुकळ्येकरांनी निर्माण केले आहे. अग्वाद भेटीत हे ठिकाण आवर्जुन पहावे असेच आहे.
आधी आपण वरचा बालेकिल्ला पाहुया.यालाच "फोर्तालेज रियाल" किंवा "रियल फोर्ट" म्हणतात.
किल्ल्याच्या सभोवती खंदक खोदलेला आहे.
हा खंदक ओलांडून एका दरवाजातून आपला किल्ल्यात प्रवेश होतो.
दारातच किल्ल्याची माहिती देणारा फलक लावला आहे.
किल्ल्याच्या भोवती खंदक खणून तिथला दगड तटबंदीला वापरला आहे.
दरवाज्यातून चिंचोळ्या मार्गाने किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर समोरच मोकळे मैदान, त्यामधे एक दीपगृह, मध्यभागी पाण्याची टाकी आणि चारही बाजूला तटबंदी असे अवशेष दिसतात.
किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी जमा करण्यासाठी किल्ल्याच्या आतील भागातील जमीन जांभा दगडाने बांधुन काढलेली असुन या जमिनीला टाकीच्या दिशेने उतार दिलेला आहे. या पाण्याची टाकीची क्षमता 2,376,000 गॅलन आहे.जमिनीवर चिरे बसवलेले असल्याने कुठेही उघडी जमीन दिसत नाही आणि किल्ला एकदम स्वच्छ वाटतो. ह्या किल्ल्याचा उपयोग पाणी व दारूगोळा साठविण्यासाठी केला जायचा. किल्ल्याच्या आत असणारी दारूगोळ्याची कोठारं मोठया प्रमाणात तुटलेली आहेत असुन त्यांचे अवशेष पहायला मिळतात.
किल्ल्याची तटबंदी आजही सुस्थितित असुन पाण्याची टाकी व खंदक खोदताना निघालेला दगड किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला गेला. तटबंदीच्या फांजीवर जाण्यासाठी उतार दिलेला आहे, त्यावरुन गाड्यावर तोफा ठेउन नेणे सोपे जात असे. तसेच थेट घोड्यावर बसून पहारा देणेही शक्य होइ.
किल्ल्याला मुख्य आक्रमणाचा धोका समुद्राच्या बाजूने असल्याने पोर्तुगीजांनी या बाजुला दोन बुरुज उभारलेत, एकाचे नाव "गालव्हांव बुरुज" तर दुसर्याचे नाव "लिआरिंश बुरुज", दोन्ही बुरुजावर अनुक्रमे सात व दहा तोफा खाडीच्या दिशेने आ वासून मारा करायला सज्ज असत.
किल्ल्यामधे १८६४ साली बांधलेला आणि आशिया खंडातील सर्वात जुना दीपगृह पाहता येते. सुरवातीला या दीपगृहातून साधारण दर सात मिनीटांनी प्रकाश बाहेर पडायचा, ज्याची वेळ १८३४ मध्ये कमी करुन दर ३० सेंकदाला प्रकाश पडेल अशी व्यवस्था केली गेली.
पुढे इ.स. १८४१ मध्ये लोपीश दलीम याच्या कारकीर्दीत या दीपगृहाजवळ दीडशे मण वजनाची प्रचंड मोठी घंटा उभारली गेली.दर तासाला हि घंटा यांत्रिक मार्गाने वाजवली जाईल अशी सोय केली होती. सध्या हि घंटा पणजीच्या "चर्च ऑफ ईम्याक्युलेट कॉन्सेप्शन" मध्ये आहे असे समजते. मात्र प्रदीर्घ सेवा बजावलेल्या या दीपगृहाला १९७६ साली कायमचे बंद करण्यात आले. सध्या या दीपगृहावर जाण्यास परवानगी नाही. किल्ल्याच्या परिसरात सध्या नवीन दीपगृह उभारलेले आहे, त्याला "अग्वाद लाईट हाउस" म्हणतात. दरवाजातून आत आल्यावर समोरच तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्या आहेत. तटबंदीवरून संपुर्ण गडाला फेरी मारता येते. किल्ल्याची लांबीरुंदी ४५० x ३५० फुट असुन एकुण क्षेत्रफळ अडीच एकर आहे. किल्ल्याची तटबंदी काही ठिकाणी चार फुट रुंद तर काही ठिकाणी सहा फूटापेक्षा जास्त रुंद आहे. किल्ल्याला एकुण पाच बुरुज असुन, इथे एकेकाळी दोनशे तोफा होत्या असे सांगितले जात असले तरी किल्ल्यात एकही तोफ दिसुन येत नाही.
अग्वादच्या तटावरुन फिरताना पुर्ण पणजी शहर तर दिसतेच, पण काबो राजप्रसाद कांदोलीचा काही भाग, समोरच मीरामार बीच आणि पश्चिमेला अथांग समुद्र दिसतो.
किल्ल्याला अतीरीक्त सरंक्षण मिळावे यासाठी किल्ल्याच्या चारही बाजूंनी खंदक खणलेला आहे. किल्ला सुरक्षित करण्यासाठी किल्ल्याच्या तटबंदीला समांतर असलेल्या खंदकावर दुसरी तटबंदी बांधलेली आहे.
या शिवाय अग्वादमध्ये गुप्त भुयार असून आणीबाणीच्या प्रसंगी त्याचा वापार होत असे.
आग्वादमधील कैदखाना आणि तळघराकडे जायची वाट
अग्वादमध्ये दारुगोळा ठेवायची जागा, कैदखाना आणि अग्वादपासून सुमारे १ कि.मी. वर "सेंट लॉरेन्स चर्च" आहे. अग्वादचे परकीय आक्रमणापासून संरक्षण व्हावे यासाठी हे चर्च उभारले गेले. दर वर्षी १० ऑगस्ट या संताचा स्मृतीदिन. यादिवशी येथे मोठी जत्रा भरते. त्यात भाविकांना सहभागी होता यावे यासाठी मांडवी नदीतील वाळुचा पट्टा त्यादिवशीपुरता सरकतो आणि जहाजांना तिथे येण्यास मोकळीक मिळते, अशी येथील भाविकांची श्रध्दा आहे.
किल्ल्याच्या तटबंदीची एक भिंत खाली समुद्रापर्यंत गेली आहे पण या भागात कारागृह असल्याने तेथे जाण्यास परवानगी नाही. किल्ल्याच्या उजव्या बाजूला समुद्राच्या पाण्याने झिजलेला खडकाळ किनारा आणि सिक्वेरीम बिच दिसतो.
आग्वाद किल्ला बालेकिल्ला पाहिल्यानंतर खाली ताज हॉटेल जवळील लोअर आग्वाद पाहायलाच हवा. सिक्वेरीम (साकेरी) बिच परिसरात असणारा लोअर आग्वाद किल्ला म्हणजे समुद्राच्या पाण्यात घुसलेला व अनेक वर्षे समुद्राच्या धडाकणाऱ्या लाटांना छेदत उभां ठाकलेला विशाल बुरुज, इथे कुण्या एके काळी जहाज उभी करत असं म्हणतात. या बुरुजावर उभारून फेसाळणाऱ्या समुद्रात अस्ताला जाणारा सूर्य बघण्यात एक वेगळीच मजा आहे. या परिसरात या भव्य बुरूजाव्यतिरिक्त एक सलग बांधलेल्या दुहेरी तटबंदीचे अवशेष व या तटबंदीमधे समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने असणारे आणखी दोन बुरुज देखील पाहता येतात.
एकंदरीत पोर्तुगीज सत्तेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणारा आणि एकेकाळी ईथलया कैदखान्यामुळे दहशत असणारा आणि निसर्गाचे वेगळे रुप दाखविणारा हा किल्ला गोव्याला गेल्यावर एकदा तरी भेट देण्यासारखा आहे.
( महत्वाची तळटीपः- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )
अग्वादच्या किल्ल्याची व्हिडीओतून सफर
माझे सर्व लिखाण तुम्ही एकत्रित येथे वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची
संदर्भः-
१) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के. घाणेकर
२) जलदुर्गांच्या सहवासातः- प्र.के. घाणेकर
३) https://itsgoa.com/forts-in-goa-know-more-about-them/ हे संकेतस्थळ
४) पोर्तुगीज-मराठा संबंध- श्री. स.शं. देसाई
५) चला माझ्या गोव्यात- मिलींद गुणाजी
६) ईंटरनेटवरुन मिळालेले संदर्भ
प्रतिक्रिया
19 Dec 2020 - 11:18 am | गोरगावलेकर
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख. फोटोही छानच.
19 Dec 2020 - 6:45 pm | सौंदाळा
हा भागही अप्रतिम
20 Dec 2020 - 10:51 am | रंगीला रतन
लेख आवडला. मी हा किल्ला बघितलाय पण तो सेन्ट्रल जेल बघितला नाही. नवीन माहिती समजली.
पुलेशु.
20 Dec 2020 - 12:22 pm | बाप्पू
अप्रतिम फोटो.. आणि माहिती.
खूप धन्यवाद. !!!
21 Dec 2020 - 11:17 am | अनिंद्य
लेख, फोटो उत्तम.
त्यावरून आठवले, अग्वादला जाऊन ११ वर्षे झाली !!! आता मिशन गोवा केलेच पाहिजे.
21 Dec 2020 - 6:08 pm | पॉइंट ब्लँक
गोव्याच्या इतिहासाशी जुळलेल्या एका महत्वाच्या ठिकाणाची माहिती मिळाली. धन्यवाद :)
22 Dec 2020 - 9:48 am | प्रचेतस
जबरदस्त किल्ला आहे हा. टेकडी, समुद्र, खंदकाने वेष्टित. प्रचंड नैसर्गिक संरक्षण, मोठा विस्तार.
खूप सुरेख लिहिलय दुर्गविहारी.
22 Dec 2020 - 10:43 am | ज्ञानोबाचे पैजार
गोवा दर्शनच्या बस मधुन संध्याकाळी ४.३० ते ५.०० च्या दरम्यान आम्ही ह्या किल्ल्यावर पोचलो होतो. सहा वाजता बंद होत असल्याने अक्षरशः पळत पळत किल्ला बघावा लागला. आणि गाईड ने ही अत्यंत त्रोटक माहिती दिली होती.
वरील माहिती वरुन इथे संपूर्ण दिवस घालवायला हवा असे वाटले.
पुढच्या गोवा सहलीच्या वेळी इथे वेळ काढून गेले पाहिजे.
पैजारबुवा,
22 Dec 2020 - 2:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अग्वाद किल्ला सफर आवडली. व्हीडीयोही भारी. गोड पाण्याची टाकी असलेली चित्र स्पष्ट होत नाही. जरा त्यावर अधिक माहिती असेल तर आवडेल. पाणी काढणे आणि जहाजात भरणे या अर्थाने. बाकी, कधी गोव्यास गेलो तर अग्वाद किल्ला पाहणे आले. मनःपूर्वक आभार.
व्हीड्योत असलेले व्यक्ती म्हणेज दुर्गविहारी काय ?
-दिलीप बिरुटे
22 Dec 2020 - 7:59 pm | दुर्गविहारी
प्रतिसादाबध्दल धन्यवाद सर !
किल्ल्याच्या दारात हा झरा होता,त्याचे पाणी खालच्या बुरुजापर्यंत नेउन तिथे पखालीने भरले जात असे.कालौघात ते सर्व नाहीसे झाले आहे.आता फक्त माहिती उरली आहे.
अग्वाद हे प्रसिध्द पर्यटन स्थळ असल्याने गोव्यात येणारे पर्यटक इथे भेट देतातच.आपणही जरुर बघून या.
बहुतेक सर्व धाग्यात वाचकांच्या सोयीसाठी यु ट्युबवरचे व्हिडीओ डकवत असतो.मात्र हे व्हिडीओ माझे नव्हेत.यु ट्युबवर माझा एकही व्हिडीओ नाही.यु ट्युब चॅनेल सुरु करा,गड किल्ल्यांची माहिती देणारे अॅप तयार करा, पुस्तक लिहा असे अनेक सल्ले ग्रुपमधून मिळत आहेत.जितके शक्य होइल ते नक्कीच करेन.आपला हा प्राचीन वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचायला हवा.
24 Dec 2020 - 12:30 pm | दुर्गविहारी
गोरगावलेकर,सौंदाळा,रंगीला रतन,बाप्पू,अनिंद्य, पॉइंट ब्लँक,प्रचेतस,ज्ञानोबाचे पैजार आणि प्रा.डॉ.दिलीप बिरुटे तसेच जगभर पसरलेले मि.पा.चे असंख्य वाचक यांचा मनापासून आभारी आहे.
उद्या "दिल चाहता है"--------
24 Dec 2020 - 12:45 pm | प्रचेतस
शापोरा :)
24 Dec 2020 - 2:20 pm | अथांग आकाश
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख! अग्वाद किल्ला पाहिला आहे. फोटों व व्हिडीओ बघून त्या वेळच्या आठवणी जाग्या झाल्या!!