बहुतेक पर्यटक गोव्याला गेले कि आग्वादला भेट देतात, मात्र याच परिसरातील नितांत सुंदर रिस मागोला मात्र क्वचितच भेट दिली जाते. रीस मागोस किंवा रेईस मागोस हा कलंगुट ते पणजी रोड वरील एक देखणा गिरीदुर्ग आहे. एखादा किल्ला कसा ठेवावा किंवा एखादा किल्ला कसा जतन करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोव्यातील हा रेइश मागुश किल्ला. गोवा सरकारने याची पुनर्बांधणी करून इतिहासाचं फाटलेले सुवर्णपान पुन्हा पुस्तकात चिकटवलं आहे.
मांडवी नदीकाठचा हा किल्ला पाहण्यास अर्धा पाऊण तास पुरे. रीस मागोस आणि गास्पर डायस हे किल्ले आदिलशाही राजवटीखाली होते. पोर्तुगीजानी ते ताब्यात घेऊन त्यावर आपला छाप उमटवला. इंग्रजी ‘व्ही’ अक्षरा सारखे बांधलेले चौरस बूरुज हे पोर्तुगीज दुर्गबांधणीचे एक वैशिष्ट्य, गडाची बांधणीही चौरस. पोर्तुगीज दुर्ग स्थापत्याची आणखीही उदाहरणे आहेत. अलिबाग जवळील रेवदंडाचा सातखणी महाल, रेल्वेच्या डब्यासासारख्या बांधलेल्या तटबंदीचा कोर्लई किल्ला. याशिवाय मोटी दमन-नानी दमन हे किल्ले, मुंबईजवळ केळवेचा पाचूच्या वनात दडलेला भूईकोट किल्ला आणि वसई किल्ला’ हे पोर्तुगीज बांधणीची छाप असलेले आणखी काही किल्ले. रेईस मागो हा आग्वाद किल्ला, मिरामार बीच, काबो किल्ला आणि मांडवी नदीतील जहाजांवर करडी नजर ठेवणारा आणि आकाराने लहान असला तरी दक्ष व सर्व सोयींनी परिपूर्ण असलेला गोव्यातील हा एक पुरातन किल्ला आहे.
पणजी शहर, मांडवी नदी आणि खाडी रक्षण करण्यासाठी उभारलेले तीन किल्ले
या किल्ल्याच्या इतिहासात डोकावल्यास, रेइश मागुश हे किल्ल्याला पोर्तुगीजांनी दिलेले नाव असले तरी गोव्यात पोर्तुगीजांचे आगमन होण्यापूर्वी याच ठिकाणी मांडवी नदीच्या किनारी एक गढी होती. पोर्तुगीजांच्याही आधी गोमंतकावर इ. स. १४७२ साली बहामनी राज्याचा प्रधान महमुद गवाण याने आक्रमण करून गोवा जिंकून घेतल. तेव्हा त्याच्याबरोबर युसुफ आदिलशहा होता, पण तेव्हा तो एक साधा सरदार होता. इ. स. १४८२ साली बहामनी सुलतान महमद शहा मरण पावल्यावर बहामनी राज्याचे तुकडे होण्यास सुरुवात झाली. त्यातच युसुफ आदिलशहाने विजापुरात स्वातंत्र्य घोषित केले. इ. स. १४८९ साली त्याने गोमंतक जिंकून घेतले व जुने गोवे येथे राजधानी करण्याच्या दिशेने पावले टाकली. त्याने येथे अनेक राजवाडे, मशिदी व इमारती गोव्याच्या भूमीत बांधल्या. याच काळात राजधानीच्या रक्षणार्थ मांडवी नदीच्या उत्तर तीरावरील टेकडीवर छोटासा टेहळणी किल्ला बांधून मांडवी नदी आणि संपूर्ण बारदेश आपल्या हुकमतीखाली आणला.
१६ व्या शतकाच्या सुरवातीला म्हणजे १५१० मधे अल्फासो दि अल्बुकर्क याचे मांडवी नदी मार्गे गोव्याच्या भूमीत आगमन झाले. त्यावेळी गोव्याचा बराचसा प्रदेश विजापूरच्या युसुफ आदिलशहा याच्या ताब्यात होता. पण अल्फान्सो द अल्बुकर्क याने विजयनगरच्या सम्राटाच्या मदतीने गोव्यावर स्वारी करून गोव्याचा बराचसा प्रदेश जिंकला. बार्देशचा प्रदेश ताब्यात येताच पोर्तुगीज गव्हर्नर डॉन अल्फान्सो डी नोरोन्हा ह्याने १५५१ मधे गोव्याच्या तत्कालीन राजधानीला संरक्षण देण्यासाठी व मांडवी नदीच्या खाडीच्या तोंडावरील अरुंद रस्ता रोखण्यासाठी १५५१ मध्ये येथे किल्ला बांधला. पुढे डॉन फ्रान्सिस्को द गामा याने या किल्ल्याच्या बांधकामात वेगवेगळ्या काळात बरेच बदल आणि विस्तार केला. किल्ल्यात एकूण सात तळघरे असून ती किल्ल्याच्या तटबंदीतून एकमेकांशी जोडली आहेत. इ. स. १५८८-८९ साली गव्हर्नर जनरल मॅन्युअल डिसुझा कुटिन्हो याने ही तळघरे खास बांधून घेतली.
दक्षिणेकडे म्हणजे मांडवी नदीकिनारी गलबतांसाठी धक्का (बंदर), उंच तटबंदी, बुरूज, भक्कम सागरद्वार अशी पोलादी संरक्षण व्यवस्था किल्ल्यासाठी करण्यात आली. बुरूज आणि तटबंदीवर त्याकाळी एकूण ३३ तोफा होत्या, त्यापैकी नऊ तोफा अद्यापही किल्ल्यात पाहता येतात. इ. स. १७०४ साली केटेनो दे मेलो इ-कॅस्ट्रो हा व्हाईसरॉय असताना त्याच जागी जवळपास नवा किल्ला बांधला व तसा शिलालेख तेथील दारावर बसवला . त्याकाळी ह्या किल्ल्यात लिस्बनहून आलेल्या किंवा लिस्बनला जाणाऱ्या व्हायसरॉय व इतर महत्वाच्या व्यक्तींना राहाण्याची सोय केली जात असे. सुरवातीला या किल्ल्याचा उपयोग व्हायसऱॉयचे निवासस्थान म्हणून केला जात होता पण नंतर त्याचे किल्ल्यात रुपांतर झाले. पुढे नाव घ्यावा असा समरप्रसंग इ.स. १६८३- ८४ साली गोव्यातील फिरंगाणाचे उच्चाटन करण्यासाठी संभाजी राजे गोव्यात शिरले. साष्टी व बारदेश तालुके जिंकून पोर्तुगीज व्हॉइसरॉयशी बोलणी करण्यासाठी आपला वकील पाठवला. त्याने २५ नोव्हेंबर १६८३ रोजी व्हॉईसरायची भेट घेतली. खंडणी देउन शांतता विकत घेण्याची पोर्तुगीजांची तयारी नव्हती. यावेळी निकोलाय मनुची हा ईटालियन प्रवासी हजर होता. शंभुराजांनी चार हजार सैन्य पाठ्वून कुंभारजुव्याचा किल्ला उर्फ सेंट एस्टोव्हचा किल्ला ताब्यात घेतला. पण नेमके त्याचवेळी मोगल सरदार शाह आलम ४० हजाराचे सैन्य घेउन गोव्याच्या सीमेवर दाखल झाला. त्याने मराठ्यांनी पादाक्रांत केलेला प्रदेश व किल्ले जिंकले. नाईलाजाने शंभुराजांना कुंभारजुव्याचा ताबा सोडावा लागला. अर्थात हाव वाढलेल्या शाह आलमला आता गोवा ताब्यात घेण्याचे वेध लागले, त्याने पणजीसमोरच्या मांडवी खाडीतुन मोगली जहाजे आत आणण्याची परवानगी पोर्तुगीज व्हॉईसरॉयकडे मागितली. मात्र भविष्यातील धोका ओळखून व्हॉईसरॉयने ती नाकारली, आणि मांडवी खाडी एवजी बारदेशच्या खाडीतुन जहाजे आत आणण्याची परवानगी दिली. पण शहा आलमने लष्करी बळावर जहाजे मांडवीच्या खाडीत घुसवलीच, त्यात अग्वादच्या किल्लेदाराने वेळीच प्रतिकार न केल्याने मोगली जहाजे रेईस मागोजवळ पोहचली. रेईस मागोवर पोर्तुगीज नौदलाचा अधिकारी डिकास्टा याने रेईस मागोवरील तीन तोफांनी हल्ला करायचा आदेश दिला. त्याचवेळी मागून अग्वादच्या किल्ल्यावरुन तोफांचा मारा झाल्याने, शाह आलमने आपली जहाजे रेईस मागोच्या मागील बाजुला असणार्या नदीत म्हणजे नेरूळ खाडीत नेली आणि जहाजे तिथेच अडकून बसली. शेवटी पोर्तुगीजांच्या सर्व अटी मान्य करुन आपली जहाजे सोडवून घेतली.
बारदेश तालुक्यातील हा किल्ला गोव्याचे राजधानीचे शहर पणजीपासून फक्त ८ किमी अंतरावर आहे. प्रत्येक सोमवारी हा किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवला जातो तर इतर दिवशी किल्ला पाहण्याची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ अशी मर्यादित आहे. या वेळातील बदल तसेच किल्ल्याच्या अधिक माहितीसाठी www.reismagosfort.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. पणजीवरून मांडवी नदीवरचा पुल ओलांडून मुंबई हायवेला लागले कि उजवीकडे नवीन विधानसभेची इमारत दिसते, तर डावीकडे एक रस्ता पुलावरुन खाली उतरुन बेतीम बीचकडे जाणारा रस्ता पकडावा. डाव्या हाताला मांडवी नदीचे पात्र आणि त्यात बोटींची वर्दळ पहात, बघता बघता आपण बेतीम बीच मागे टाकून रेइस मागोच्या पुढ्यात येतो.
पूर्वी उत्तरेकडून किल्ल्याच्या शिखर माथ्यावर जाण्यासाठी उंच पायऱ्या बांधल्या होत्या पण आता तेथे रस्ता केला आहे. प्रत्येकी ५० रुपयांचे तिकीट काढून किल्ल्यात प्रवेश घ्यावा असला तरी एकुण राखलेला हा किल्ला बघताना ते सार्थकी लागतात.
वास्तविक आधी लष्करी ठाणे, मग तुरुंग आणि शेवटी हॉस्पिटल असा प्रवास केल्यानंतर हा किल्ला १९९३ साली पार मोडकळीला आला होता. मात्र या किल्ल्याचे एतिहासिक महत्व जाणून "द हेलेन हॅम्लीन ट्रस्ट" यांनी पुर्नबांधणी केली आणि ५ जुन २०१२ साली पर्यटकांसाठी हा गड खुला झाला.
गडाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक वटवृक्ष आहे.. हा महाकाय वटवृक्ष एका नारळाच्या झाडावर परावलंबी (Parasite) होवून वाढला.. पुढे हे मूळ नारळाचे झाड कोसळले आणि हा वृक्ष उन्मळण्याच्या बेतात होता, पण याची २००८ सालामध्ये दुरुस्त करण्यात आली.. झाडाच्या खोडात सिमेंट कॉन्क्रीट (Concrete) चा कॉलम भरून त्याला स्थैर्य देण्यात आले.. झाडाच्या फांद्या स्टीलच्या तारांनी ओढून धरल्या आणि अखेर हा वृक्ष तगला.. इकडे गोव्यात एका झाडाला वाचवण्यासाठीही ही वणवण तर तिकडे महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘कॉन्क्रीट (Concrete) जोडो टेकडी फोडो’ अभियान केवढा हा विरोधाभास.
कोकणात सहज उपलब्ध होणाऱ्या पण अत्यंत टिकाऊ अश्या जांभ्या दगडात या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले आहे.
किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरील कोट ऑफ आर्म
माहितीफलक
किल्ल्याच्या भिंती, उंच व भव्य तर आहेतच पण त्याचबरोबर किल्ल्याला असणारे पोर्तुगिजांच्या खास शैलीतील चौकोनी बुरूज देखील बघण्यासारखे आहेत.
किल्ल्याच्या तटबंदीमधे लाईट लावलेले आहेत.
बुरूजावर लाकडी चाकांवर रोखलेल्या तोफा कल्पकतेने मांडून ठेवलेल्या दिसतात.
गडाच्या दक्षिण बुरुजावरून दिसणारा जुन्या गोव्याचा नजारा तर केवळ अफलातून असाच आहे. किल्ला अत्यंत स्वच्छ ठेवलेला असून किल्ल्यातील जुन्या निवासस्थानांचा अत्यंत खूबीने चित्रप्रदर्शन मांडण्यासाठी उपयोग केलेला आहे.
किल्ल्यातील वेगवेगळ्या दालनात गोव्याचा इतिहास तसेच गोवा मुक्तीसंग्रामात सहभाग घेतलेल्या वीरांची चित्रे हिरिरीने मांडून ठेवलेली दिसतात. या सर्व चित्रात एक चित्र खूप खास आहे. शिवाजी महाराज घोड्यावर बसले असून त्यांच्या आजूबाजूला त्यावेळची गोमंतकीय जनता आपली पोर्तुगीजांच्या अन्यायापासून सुटका करण्याची विनवणी करत आहेत असे दाखवले आहे.
येथील एका दालनामध्ये मध्यभागी किल्ल्याची लाकडी प्रतिकृती ठेवलेली आहे व सभोवतालच्या भिंतींवर किल्ल्याचे जुने व नवीन फोटो लावलेले दिसतात.
चित्रप्रदर्शन पहात वेगवेगळ्या दालनातून फिरत असताना एका दालनात जमिनीत एक मोठे भोक दिसते व त्यासमोर डेथ होल (Death Hole) असे लिहलेले आहे.हे म्हणजे साक्षात झरोक्यातून डोकावणारा मृत्यूच. पूर्वी या भोकातून खालच्या मजल्यावर (तळघरात) ठेवलेल्या कैद्यांच्या अंगावर उकळते तेल अथवा गरम पाणी वगैरे टाकण्याची भयंकर शिक्षा दिली जात असावी.
किल्ल्याच्या आवारात एक जिवंत पाण्याचा झरा असून त्याकाळी किल्ल्यातील शिबंदीला लागणाऱ्या पाण्याची संपूर्ण व्यवस्था या झऱ्याच्या पाण्यातूनच होत असे.
गोव्यातील एक प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचा असा हा देखणा किल्ला गोव्यात जाऊन न पाहणे म्हणजे दुर्भाग्यच म्हणायला हवे. त्यामुळे पुढच्या गोवा भेटीत जेव्हा जवळच असणाऱ्या प्रसिद्ध अश्या कलंगुट बीचला भेट द्याल तेव्हा थोडी वाट वाकडी करून हा रेइश मागुश किल्ला आवर्जून पहावा.
गॅस्पर दियश ( gaspar dias )
गोव्यात जाउन पणजीला मुक्काम असेल तर एक संध्याकाळ घालवायचे ठिकाण म्हणजे, "मीरामार बीच".पणजीपासून अगदी चालायच्या अंतरावर असलेला आणि समोर उत्तरेला अग्वादचे दीपगृह, एका बाजुला मांडवीचा प्रवाह, त्यातील बोटींची ये-जा, खाद्य स्टॉल्स, पाम वृक्ष , वाळूच्या मस्त पुळण आणि गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचे स्मारक अशी अनेक आकर्षण असणारा ह्या बीचला बहुतेक जण भेट देतातच. मात्र या किनार्याचे मुळ नाव मीरामार बीच" नव्हते, हे किती जणांना माहिती असते ? ह्या बीचचे मुळचे नाव "गॅस्पर डायस बीच" म्हणून ओळखले जात असे. एक पोर्तुगीज किल्ला एकदा 16 व्या शतकाच्या शेवटी, समुद्रकिनार्याजवळ उभा होता. या ठिकाणाचे हे नाव पडण्याचे कारण म्हणजे या परिसरात गॅस्पर डायस या जमीनदाराच्या नावावर बराचसा भुप्रदेश होता. इ.स. १५९८ मध्ये पोर्तुगीज व्हॉईसरॉय डोम फ्रान्सिस्को दे गामा, काउंट ऑफ विदिगुएर (हा वास्को दा गामाचा नातू म्हणूनही ओळखला जातो) च्या कारकीर्दीत सध्या अस्तित्त्वात नसलेल्या या किल्ल्याची उभारणी झाली. नदीच्या उत्तर बाजुला रेईस मागो तर दक्षीण तीरावर गास्पर दियश अशी रचना झाली. अर्थात मांडवी नदीच्या प्रवाहात झालेले बदल विचारात घेता, हा किल्ला नदीच्या किनार्यावर असावा. अर्थातच अग्वादप्रमाणेच या किल्ल्याच्या उभारणीचे कारण डचांनी गोव्यावर केलेला हल्ला हेच होते. सुरवातीला या किल्ल्याचे नाव या परिसरावरुनच ठेवले गेले, "फोर्ते दा पोंटे दी गास्पर दियश" ( Forte da ponte de Gaspar Dias ). पुढे ब्रिटीशांनी इ.स. १७९७ -९८ व १८०२-१४ असा दोन वेळा या परिसरावर ताबा मिळवला होता. अर्थात पुढे राजकीय परिस्थिती बदलली, फक्त किनारपट्टीचा आश्रय घेणार्या पोर्तुगीजांनी आजुबाजुच्या प्रदेशावर कब्जा केला. त्यात संभाजी महाराजांनी आक्रमण केल्यानंतर ते अधिक सावध झाले व पोर्तुगीजांनीच हा गॅस्पर दियश पाडण्याचा हुकुम केला, मात्र त्यावेळी त्याची अंमलबजावणी होउ शकली नाही.
नंतर १८३५ साली पणजीमध्ये तैनात असलेल्या सैन्याच्या रेजिमेंटने गोव्यात पोर्तुगीज अधिकार्यांविरूद्ध बंड केले. बंडखोरी लवकरच चिरडली गेली. मात्र यामध्ये किल्ल्याला पेटविले गेले. पण यामुळे गॅस्पर डियश किल्ल्याचे बरेच नुकसान झाले व पुढे जवळजवळ सात वर्षे त्याकडे दुर्लक्ष केले गेले. पुढे १८४२ मध्ये किल्ल्याचा जीर्णोद्धार झाला. इ.स. १८६९ मध्ये एका समितीने केलेल्या पहाणीनंतर असे सुचविण्यात आले होते की जखमी झालेल्या सैनिकांच्या उपचारासाठी हा किल्ला वापरला जाऊ शकतो. या समितीने गॅस्पर डियश किल्ला आता कोणत्याही युद्धासाठी उपयोगी नसल्याचे सुचविले. नंतर 1878 मध्ये सुचविलेल्या उद्देशाने याचा वापर जखमी सैनिकांसाठी हॉस्पिटल म्हणून केला जाउ लागला. पुढे ईतिहासाबरोबरच या परिसराचा भुगोलदेखील बदलला. पणजी हे केवळ बेटांचा समुह न रहाता, त्यात भर टाकली गेली, शिवाय मांडवी नदीचे खाडीकिनारी असलेले मुख विस्तारले, सहाजिकच बदलत्या परिस्थितीत या किल्ल्याचे महत्व उणावले आणि केवळ दोन शतकापुर्वी अस्तित्वात असणारा हा किल्ला कायमचा पुसला गेला.
आज या किल्ल्याच्या कोणत्याही स्मृती या परिसरात राहिलेल्या नाहीत. मीरामार जंक्शन येथील ट्रॅफिक बेटावर दाखविण्यात आलेली तोफ म्हणजे आज किल्ल्याचे अवशेष आहेत.असे मानले जाते की मिरामार येथील किल्ला सध्याच्या क्लब कंपाऊंडच्या उत्तरेकडील भिंतीपासून सध्याच्या मारुती मंदिरापर्यंत पसरलेला होता आणि साळगावकर लॉ कॉलेजच्या मागील टोंका येथे राज्य कृषी विभागाच्या कार्यालयाशेजारील रोड जंक्शनपर्यंत विस्तार असावा.
मीरामार बीचला भेट देताना एक आठवण म्हणून पर्यटक येथील तोफेजवळ फोटो काढतात, पण ईथे असा काही किल्ला होता हे कोणालाही माहिती असणे शक्यच नाही.
सध्या नाही म्हणायला "गास्पर दियश"ची एकमेव आठवण म्हणजे त्याच जागी उभारलेला, "क्लब टेनिस डी गास्पर डायस". नाही म्हणायला मुळ किल्ल्याचे १८७६ मधील एक चित्र उपलब्ध आहे.
गास्पर दियशचे मुळ चित्र
हँड्स-ऑन हिस्टोरियन्स या ग्रुपचे श्री. संजीव सरदेसाई गोवाभरातील संस्थांमधील व्याख्यानांच्या माध्यमातून मीरामारच्या या अल्प-ज्ञात इतिहासाबद्दल जागरूकता वाढवतात. गास्पर डायस कसा दुर्लक्षित होउन बेवसाउ झाला आणि नंतर हा भाग दफनभूमी आणि स्मशानभूमी म्हणून वापरला गेला याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आता एकच प्रश्न उरतो, 'या परिसराला "मीरामार" हे नाव कसे पडले?'. जेव्हा या भागात बसेस धावू लागल्या तेव्हा बस कंडक्टरने हॉटेल मिरामारचा उपयोग प्रवाशांना स्टॉप समजावा म्हणून केला. अखेरीस ते ‘हॉटेल’ मिटले आणि फक्त ‘मीरामार’ हा शब्द उरला. आणि म्हणूनच या परिसराला मीरामार हे नाव पडले.
मीरामारचा अर्थ आहे "Mirage of the Sea", समुद्रातील दृष्टीभ्रम !
(मह्त्वाची तळटीपः- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )
माझे सर्व लिखाण तुम्ही येथे एकत्र वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची
रेइस मागो किल्ल्याची व्हिडीओतून सफारी
संदर्भः-
१) जलदुर्गांच्या सहवासात- प्र.के.घाणेकर
२ ) माझ्या या गोव्यात- मिलींद गुणाजी
३) हा श्री. विनीत दाते यांचा ब्लॉग
४) ईंटरनेटवरील माहिती
प्रतिक्रिया
11 Dec 2020 - 9:12 pm | चौथा कोनाडा
वाह, रीस मागोस किल्ल्याचे फोटो पाहताना आणि वर्णन वाचताना भान हरपायला झाले !
प्रत्यक्ष किल्ला भटकंती करताना कसली मज्जा आली असेल !
👌
दुर्गविहारीजी _/\_ सुंदर वर्णन आणि अप्रतिम प्रचि !
तुमच्या मुळे अश्या अनवट ठिकाणांची सफर अनुभवायला मिळतेय !
12 Dec 2020 - 8:34 am | गोरगावलेकर
खूप सुंदर वर्णन. फोटोही अप्रतिम. पुढच्या गोवा भटकंतीच्या यादीत या ठिकाणाची नोंद केली आहे.
12 Dec 2020 - 9:02 am | सौंदाळा
किल्ल्याइतकाच सुंदर लेख आणि फोटो.
लहानपणी काकांबरोबर बेतीच्या जेटीवर मासे आणायला गेलो आहे पण या किल्ल्याबद्दल कधीच ऐकले नाही.
पुढच्या गोवावारीत नक्की बघेन.
12 Dec 2020 - 9:26 am | प्रचेतस
एकदम सुरेख असे तपशीलवार वर्णन
खूप छान. लिहिते रहा.
13 Dec 2020 - 11:57 am | रंगीला रतन
लेख आवडला, फोटो आवडले.
गोव्यातला आग्वाद किल्ला फक्त पाहिला आहे.
13 Dec 2020 - 9:20 pm | अनिंद्य
फर्मास सफर जलमग्न गिरिदुर्गाची !
माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राण्यांनी घेतलेल्या पुढाकारानंतर गोव्यातील अनेक ऐतिहासिक महत्वाची वारसास्थळे योग्यप्रकारे जतन करायला सुरुवात झाली. त्याचे उत्तम परिणाम तुमच्या गोवा-किल्ले मालिकेतून दिसत आहेत. खूप आनंद झाला.
महाराष्ट्रातील शेकडो दुर्लक्षित वारसास्थळांना बरे दिवस येवोत अशी यानिमित्ताने प्रार्थना _/\_