मोह मोह के ' धागे..' (संपादकीय)

Primary tabs

गवि's picture
गवि in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amमोह मोह के ' धागे..'

२०१२ साली हे सुरू झालं. हे म्हणजे मिपा दिवाळी अंकाचं वार्षिक प्रकाशन. एरवी वर्षभर धाग्याधाग्यातून चालणारी दिवाळी वर्षातून एकदा अर्करूपात सर्वांसमोर आणावी, हा मूळ उद्देश.

मग त्यासाठी संपादक मंडळातले लोक दोनेक महिने आधीपासून गडबड सुरू करतात आणि अगदी ऐन दिवाळीत स्वत:चं स्नान चुकवून, नरकाची भीती न बाळगता, प्रसंगी पारोश्याने अंक पुरा करतात.

यंदा 'संपादक मंडळातील' निवडक खलपुरुष पहिल्या राउंडला बसले आणि नेहमीप्रमाणे खालीलनुसार खल सुरू केला.

"अंकाची थीम काय असावी?"
"थीम असावी का?"
"थीम का असावी?"
"कशाला थीम वैग्रे?"

शेवटी 'थीम असावी' यावर आठवड्याभराने एकमत झालं. एकमत याचा अर्थ किमान एकाचं मत तसं बनणं. तर ते असो.

शेवटी एका ज्येष्ठ वयस्क अनुभवी सदस्याने 'प्रेम, शृंगार, रोमान्स टिंब टिंब टिंब' अशी थीम घोषित करून टाकली. अंहं. कोणी ते नाही सांगणार.

मुळात प्रेम हा विषय फारच धूसर आहे. अतिशय कन्फ्यूजिंग. बटाट्याच्या चाळीतला 'बटाटे', शा. चापशी मुळशीतला 'चापशी' आणि मिसळपाववरील 'नीलकांत' यांप्रमाणेच प्रेम ही एक अध्याहृत संज्ञा आहे. तिचं फक्त अस्तित्व जाणवतं. ती प्रत्यक्ष दिसत नाही.

शिवाय 'प्रेमाला उपमा नाही'.. आणि प्रेमाला 'कांदेपोहे'ही नाहीत. (ना समझे वो अनाडी है..)

त्यामुळे प्रेमाला किमान मिसळपाव तरी पोटभर लाभावी, या उद्देशाने ही थीम यंदा दिवाळी अंकाला 'लावली'.

शृंगार या शब्दामुळे लेखकांकडून नेमका काय कंटेंट येईल, याची पाकपूक होती. पण मिपाकर लेखक संयमशील आहेत. त्यांनी शृंगार आणि बीभत्सता यातली सीमारेषा अचूक जाणून ती उत्कृष्टरित्या पाळली. सर्वात आधी या लेखकमंडळींचे आभार.

त्यानंतर आभार वाचकमंडळींचे. तुम्ही आहात, म्हणून मिपा आहे, म्हणून दिवाळी अंक आहे. देखो मगर प्यारसे..

'असा मी असामी' धोंडो भिकाजी जोशी यांना जसा 'फ्रेंडस ओन बॅडमिंटन क्लब'च्या चेअरमनपदाचा बसल्याजागी आपसूक लाभ झाला, तसाच मला या अंकाच्या संपादकपदाचा. ("अंकल, तुम्हीच व्हा नं चेअरमन. शिवाय तुम्ही किती वयोवृद्ध आहात.".. वगैरे.) बाकी प्रत्यक्ष काम साहित्य संपादक टीमनेच पूर्ण केलं. नव्या-जुन्या सदस्यांनी अगदी सुरुवातीपासून श्रम केले. साहित्य मिळवणं, फॉलोअप, साहित्यनिवड, संपर्क, डिझाईन, तांत्रिक बाजू या प्रत्येक बाबतीत आपापला वाटा या लोकांनी उचलला. अगदी पुष्पगुच्छाचीही अपेक्षा न ठेवता काम करत असलेल्या लोकांची अकारविल्हे नावं खालीलप्रमाणे..

(टीप: 'अ'कारविल्हे नावं, बरं का.. 'आकार'विल्हे नव्हेत. नाहीतर सर्वात वर सदैव मुख्य संपादकांचंच नाव चिकटून राहायचं.)

अमोल गवळी - व्यंगचित्रे
चिनार
टर्मीनेटर - अंक सजावट
तुषार काळभोर
पियुशा
पैजारबुवा
प्रशांत
महासंग्राम
वाग बोंद्रे - मुखपृष्ठ
संदीप चांदणे
सुधांशुनूलकर - मुद्रितशोधन

अंकात प्रेम शृंगार रोमान्स आहेच. शिवाय इतरही बरंच काही आहे. तेव्हा हे 'मोह मोह के धागे' तुमच्या बोटांत गुंतवून मी मोकळा होतो.

सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कोंडून पडलेल्या आशाआकांक्षांना आणि स्वप्नांना नवी पालवी फुटो..

दिवाळी..!!!

संपादकीय

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

14 Nov 2020 - 11:47 am | कुमार१

सर्वांगसुंदर अंकाबद्दल संपादक मंडळाचे अभिनंदन !
दिवाळी शुभेच्छा !

मदनबाण's picture

14 Nov 2020 - 11:51 am | मदनबाण

संपादकांचे आणि अंकात लेखन करणार्‍यांचे अभिनंदन ! सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- J&K: Indian Army Retaliates Against Pakistan Over Ceasefire Violation At LoC
[ नापाकिस्तान दरवर्षी आपली दिवाळी खराब करतो आणि आपल्या काही सैनिकांना वीरगती प्राप्त होते. :( ]

संजय क्षीरसागर's picture

14 Nov 2020 - 12:01 pm | संजय क्षीरसागर

अंक बघतो.
गविनी अगदी शीर्षकापासून एकसोएक टाकलेत त्यामुळे अंकाची सुरुवात एकदम खुमासदार झाली आहे.
या स्वागतार्ह उपक्रमाबद्दल सर्व टीमचे आभार्स !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2020 - 12:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुसखुशीत संपादकीय आवडलं. गविसेठचे आपण उगाच फॅन नाहीत.

मुळात प्रेम हा विषय फारच धूसर आहे. अतिशय कन्फ्यूजिंग. बटाट्याच्या चाळीतला 'बटाटे', शा. चापशी मुळशीतला 'चापशी' आणि मिसळपाववरील 'नीलकांत' यांप्रमाणेच प्रेम ही एक अध्याहृत संज्ञा आहे. तिचं फक्त अस्तित्व जाणवतं. ती प्रत्यक्ष दिसत नाही.

इथे मी खपलो. =))

-दिलीप बिरुटे

नावातकायआहे's picture

14 Nov 2020 - 12:53 pm | नावातकायआहे

सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!! निवांत वाचतो!!

महासंग्राम's picture

14 Nov 2020 - 1:10 pm | महासंग्राम

एकदम शॉल्लेट संपादकीय झालंय, अंकातला मजकूर पण तसाच असणार

संपादक आणि साहित्य संपादक टीमचे आभार आणि सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

- (मिपाकर) सोकाजी

अभिजीत अवलिया's picture

14 Nov 2020 - 6:45 pm | अभिजीत अवलिया

'शाॅर्ट & स्वीट' संपादकीय. आवडले.

टर्मीनेटर's picture

14 Nov 2020 - 8:38 pm | टर्मीनेटर

नर्मविनोदी संपादकीय आवडले 👍
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

चित्रगुप्त's picture

14 Nov 2020 - 11:35 pm | चित्रगुप्त

सुटसुटीत तरी व्यापक
नेमस्त आणि नेमक
गविरचित संपाद्कीय
आवडले ll

सौंदाळा's picture

15 Nov 2020 - 8:30 am | सौंदाळा

सर्व टीमचे आभार
संपादकीय छानच झालंय.
काल संध्याकाळ पासून वाचायला चालू केला. १० दिवसाची सुट्टी आहे. वाचायला बैठक मारली तर दोन तीन तासात संपेल पण मग पुढे काय म्हणून पुरवून पुरवून वाचणार आहे.
म्हणजे कोकणात कसं साग्रसंगीत जेवण असलं तरी माशाचा तळलेला छोटा तुकडा पाहिजे आणि जेवण संपेपर्यंत तो पुरवून पुरवून खायचा तसंच.
माशावरून आठवलं आज रविवार आहे आणि दिवाळीतला लोंढा दिवस, त्यामुळे खरच मासे मिळतायत का ते बघायला निघतो आणि दुपारी अजून एक दोन लेख वाचतो.
बाकी नंतर.

विजुभाऊ's picture

16 Nov 2020 - 7:52 am | विजुभाऊ

दिवाळी अंक झकास झाला आसे.
थीम वर आधारीत असल्यामुळे एकदम खुमासदार

मित्रहो's picture

16 Nov 2020 - 11:04 am | मित्रहो

किती सुंदर संपादकीय छान वाचकाशी गप्पा मारीत असल्यासारेखे संपादकीय लिहिले आहे. खूप मोहात पाडणारे संपादकीय.
'आर्थिक उदारीकरणामुळे आर्थिक सुबत्ततेबरोबर सांस्कृतीक कंगालपणा आला आहे.' असली काहीतरी घासून गुळगुळीत झालेली वाक्ये दिवाळी अंकाच्या संपादकीयात वाचायची सवय झालेल्या माझ्यासारख्या वाचकाला मिपाचे संपादकीय नेहमीच सुखावणारे असते. मिपाच्या त्याच परंपरेतील हे जेष्ठ मिपाकराने लिहिलेले तितकेच सुंदर संपादकीय. अस सहज लिहिणे नेहमीच फार कठीण असते.
खूप 'नेट'क्या दिवाळी अंकासाठी धन्यवाद गावि आणि मिपा दिवाळी अंक टिम.

अथांग आकाश's picture

16 Nov 2020 - 11:15 am | अथांग आकाश

झक्कास संपादकीय!
आता सावकाशीने 'प्रेम, शृंगार, रोमान्स टिंब टिंब टिंब' थीम वर आधारीत दिवाळी अंक वाचणार!!
1

सांगतो की हे शंभरात दोघांच्या अनुभवाला, वाट्याला येतं. आणखी एक टक्का कड्यापर्यंत जाऊन परत येतो. बाकीचे सिनेमा,गाणी,लेखांतून परभारे अजमावतात. तसं आता फलाटावर थीम लावलीच आहे एक्सप्रेस तर चंबूगबाळे आवरून चढायच्या तयारीत.
प्रतिसादाच्या शिट्ट्या मारूच बोगदा आणि धबधबे आल्यावर.

अनिंद्य's picture

16 Nov 2020 - 5:50 pm | अनिंद्य

सुटसुटीत अंकरचना आवडली - वाचकसोय नीट बघितली आहे, ब्रावो.

मुखपृष्ठाचे मोटिफ आणि सुलेखन फार सुंदर आहे, गडद जांभळा रंग आणि विशेषतः अनुक्रमणिकेला वापरलेला त्याचाच शेड मात्र थोडा विजोड वाटला.

मोह मोह के धागे - संपादकीय खुसखुशीत, सहजसुंदर आहे. लेख वाचायला घेतो आता.

सर्वांना सणाच्या शुभेच्छा. दिवाळी विशेषांकावर मेहनत घेणाऱ्या मिपाकरांचे खूप कौतुक आणि आभार.

साबु's picture

16 Nov 2020 - 8:28 pm | साबु

सुरेख आणि नेमके सम्पादकिय आवडले. शुभेछा!!

स्मिताके's picture

17 Nov 2020 - 12:05 am | स्मिताके

सुरेख आहे संपादकीय. देखण्या अंकासाठी टीमला धन्यवाद. पुरवून पुरवून वाचत आहे.

सरिता बांदेकर's picture

17 Nov 2020 - 5:57 pm | सरिता बांदेकर

खरंच संपादकीय काय मस्त भट्टी जमलीय.दिवाळीच्या चकली सारखी.
खूसखूशीत आणि जीभेवर रेंगाळणारी असते तसंच शब्दच्छल मस्त जमलाय.
परत परत वाचावा असा
मी अंक अजून वाचला नाहीय. सावकाश रवंथ करत वाचायचा आहे. बाकी वाचून झालं की मग

चौथा कोनाडा's picture

22 Nov 2020 - 5:57 pm | चौथा कोनाडा

व्वा, मस्तच !

एकंदरीत चमचमीत डीश सर्व्ह केलेली आहे वाचकांना !

दिवाळी अंकासाठी कुटाणा करणार्‍या वरील सर्व खलस्त्रीपुरुषांचे हार्दिक अभिनंदन !
संपादकांचे विशेष कॉन्ग्रॅच्युलेशन्स !

प्राची अश्विनी's picture

22 Nov 2020 - 9:20 pm | प्राची अश्विनी

अंक देखणा झालाय. संपादक मंडळ, लेखक सर्वांचे कौतुक.