जुने जाऊद्या मरणालागुनी...

विसुनाना's picture
विसुनाना in काथ्याकूट
24 Dec 2007 - 1:05 pm
गाभा: 

'जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळून किंवा पुसून टाका...' नाविन्याची एक तुतारी फुंकायला मागताना केशवसुतांनी ही ओळ लिहिली.
आज ती ओळ आठवली याचं कारण म्हणजे ही बातमी. मुंबापुरीचं एक सांस्कृतिक ठिकाण म्हणता येईल अशी ही म. ज्योतिबा फुले मंडई पाडून तिथे आता एक चकचकित मॉल बांधणार!अशा बातम्या आपण नेहमी वाचतो.
पुण्यात, सांगलीत, कोल्हापुरात, सोलापुरात आणि झालंच तर तासगावातसुद्धा वाडे पाडून अपार्टमेंट उभी राहतात. एखाद्या दहामजली 'मेफ्लॉवर हाईटस' वर"सुप्रसिद्ध(?) लेखक श्री. क्षयज्ञ यांचा जन्म १८९५ साली या ठिकाणी झाला" अशी पाटी पहायला मिळते.
बर्‍याच दिवसात देवाचं तोंड न पाहिलेला मी एखाद्या जुन्या देवळात जातो. जुन्या कलाकुसर केलेल्या आणि युगायुगांचा तेलकट राप बसलेल्या खांबांवर आता ग्रॅनाईटचा थर चढलेला असतो. काळ्या, टाकीच्या फरसबंदीवर शूभ्र संगमरवराच्या पायघड्या घातलेल्या असतात.
जांभूळ, पेरू, तुती, जास्वंद, मोगरा, जाईजुई, रातराणी, बोगनवेली, कोरंटी, अबोली असल्या झाडांनी भरलेल्या अंगणाचे घर भुईसपाट झालेले असते. झाडे गायब झालेली असतात आणि एखाद्या आर्केडचा पायाभरणी समारंभ तिथे थाटात साजरा होतो.
कुणी रेडिओवर मराठी कार्यक्रम करते आणि तरीही म्हणते की तिचं मराठी हरवलं आहे. हे वाचून क्षणभर थक्क व्हायला होतं.
मग हॅरी पॉटर वाचणारा मुलगा पुस्तकातून डोळे न काढताच "हाय डॅड" म्हणतो. आपणही हसतहसत "हाय बेटा, सो व्हॉट हॅप्पन्स टू यू'र मेलनी ?" वगैरे उगीचच म्हणतो आणि जाणवतं की आपलंही मराठी आता हरवतंय.

पण तात्याबांनी खूप काही हरवलं आहे असं म्हटलं की डोळे भरून येतात. पुन्हापुन्हा जाणवतं की कदाचित आपणच जुने झालो असावे. गेल्या दहा-बारा वर्षात तर फारच जुने.

एकीकडे लक्ष्मी आणि सरस्वती, समृद्धी आणि संस्कृती यांचं जन्मजात वाकडं आहे असं म्हणतात.
दुसरीकडे ज्याला एक वेळ अन्नाची ददात आहे तो संस्कृती कशाशी खाणार? हे बुद्धवाक्य आठवतं.
दोन्हीही आपआपल्या जागी योग्यच.

या दोन्हींचा सुवर्णमध्य साधणारा मध्यमवर्ग भारतात मोठ्या प्रमाणावर होता. काहीसा कनिष्ठ मध्यमवर्ग! आता मोठ्या प्रमाणात तो उच्च/ उच्च मध्यमवर्गाकडे झुकलाय. आमदनी वाढली आहे - अजून वाढते आहे. भरभराटीच्या या पर्वामुळे या उच्चमध्यमवर्गाने केशवसुतांची तुतारी फारच उमेदीने फुंकायला सुरुवात केली आहे काय? असा प्रश्न पडतो.

जागतिक सपाटीकरणाच्या रेट्यात दहा रुपयाला डॉलर मिळेल.'दिवाली ईज अ फेस्टिव्हल ऑफ लाईटस' असं म्हणत 'बाथ टब'मध्ये अभ्यंगस्नान होईल. तात्यांची साधना कोळीणही 'क्रॉफर्ड मॉल' किंवा 'म. ज्योतिराव फुले विक्रीसंकुला'त शूभ्र पांढरा 'ऍप्रन' घालून, बांधलेल्या केसांवर वेणीऐवजी 'कॅप' लेऊन 'ग्लोव्ज' चढवलेल्या हातांनी 'फ्रेश फिश'ची 'पॅकेटस' 'चिलर रॅक'वर रचू लागेल.

पडतेय फुले मंडई तर पडूदे बापडी - एस्केलेटर्स सुरू झाले की जाईन नव्या मॉलमध्ये! असं आता म्हणायचं का?
टीव्हीवरचे 'मराठी' कार्यक्रम खरोखर मराठीच आहेत का? मराठी पुस्तकांची विक्री सध्या भरमसाठ वाढते आहे. पण जीएंची मराठी आताच भल्याभल्यांना समजत नाही.मग 'बटाट्याची चाळ' या दोन शब्दांचा खरा अर्थ तरी पुढच्या मराठी पिढीला समजेल काय? येत्या दहा-वीस वर्षात मराठी रद्दीही वाढणार काय?
हे सगळं कुठं जात आहे? मराठीपणा, मराठी बाणा, मराठी संस्कृती लयाला जात आहे काय? हे योग्य आहे की अयोग्य?
हे थांबलं पाहिजे का? थांबावं असं वाटत असेल तर काय प्रयत्न केले पाहिजेत? मराठी संकेतस्थळांमुळे काही फरक पडेल काय?
आपली मुले मराठी राहिली आहेत काय? आपण काही प्रयत्न केल्याने ती मराठी बनणार-रहाणार आहेत का? मुलांसाठी मराठी संकेतस्थळे काढली तर मुले ती वाचणार का?

की आपल्या संस्कृतीचंच क्रॉफर्ड मार्केट झालेय? 'कालाय तस्मै नमः' म्हणून हे सारे मोडून टाकायचे आणि आपणच स्वप्राणाने तुतारी फुंकायला लागायचे?

विस्कळीत विचार आहेत हे मान्य. मराठीपणा अणि संस्कृती यांची गल्लतही मान्य. पण असं काही जाणवलं म्हणून चर्चा करावीशी वाटली.
तुम्हाला काय वाटतं?

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

24 Dec 2007 - 3:45 pm | आजानुकर्ण

सभोवताली सध्या होत असलेले बदल आणि त्यांचा वेग भल्याभल्यांना भ्रमित करून टाकणारा आहे. संस्कृतीचा अर्थही कडवेपणा, कर्मठपणा असा घेतला जातो. दहाबारा वर्षांपूर्वी दिसत नव्हती इतकी गर्दी मंदिरांच्या रांगांमध्ये आज दिसते. प्रत्येक दिवशी टीव्हीवर दिसणारी दृष्ये, वर्तमानपत्रातल्या बातम्या, रस्त्यावर ऐकलेले काही यामुळे अचंबित व्हायला होते.
या सर्वापासून दूर पळून जावे आणि तिथे काही चांगली पुस्तके घेऊन बसावे असे खरेच वाटते.

(संभ्रमित) आजानुकर्ण

या विषयावरील चर्चा मात्र वाचायला आवडेल.
(उत्सुक) आजानुकर्ण.

विसुनाना's picture

24 Dec 2007 - 3:59 pm | विसुनाना

काही मार्ग आहेत असे आपल्याला वाटते का? वाटत असेल तर सुचवावे.

आजानुकर्ण's picture

24 Dec 2007 - 4:05 pm | आजानुकर्ण

हे थोपवायचे मार्ग शोधण्याआधी हे थोपवणे आवश्यक आहे का आणि थोपवायचे कशासाठी या प्रश्नांची उत्तरे मला शोधावी लागतील. :)

जर ९० टक्क्यांहून अधिक लोकांना हेच हवे असेल तर उरलेल्यांनी निमूटपणे पाहणे हेच योग्य ठरते. (आठवा विदूषक मधील कावळे आणि राजहंसाची कथा. :))

(निरुत्तर) आजानुकर्ण

विसोबा खेचर's picture

24 Dec 2007 - 4:54 pm | विसोबा खेचर

तात्यांची साधना कोळीणही 'क्रॉफर्ड मॉल' किंवा 'म. ज्योतिराव फुले विक्रीसंकुला'त शूभ्र पांढरा 'ऍप्रन' घालून, बांधलेल्या केसांवर वेणीऐवजी 'कॅप' लेऊन 'ग्लोव्ज' चढवलेल्या हातांनी 'फ्रेश फिश'ची 'पॅकेटस' 'चिलर रॅक'वर रचू लागेल.

नानासाहेब, खरं आहे तुमचं!

तुमची तळमळ आम्हाला समजते आहे, कारण तीच आमचीही तळमळ आहे. पण सध्या तरी कालाय तस्मै: नम: म्हणण्यावाचून गत्यंतर नाही असं वाटतं!

आपला,
(किंचित उदास) तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Dec 2007 - 7:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसूनाना,
आपले स्वगत आवडले. पण, वरील मंड्ळी म्हणतात तसे काळाला सामोरे जावेच लागेल आणि त्याच्या परिणामांनाही !!!
हो, त्यासाठी काय प्रयत्न करावेत याचे उत्तर म्हणाल तर आहे तितके आपण सांभाळावे आणि नाहीच जमले तर आपणही त्या संस्कृतीचा एक भाग व्हावे, इतकेच आपल्या हातात असावे.
बाकी,आपल्या स्वगतवजा चिंतनातील वेगवेगळ्या संदर्भांबरोबर केलेली मांडणी तितकीच आवडली.

पण जीएंची मराठी आताच भल्याभल्यांना समजत नाही.
हाहाहा:))))
इतकी ओळ कॉपी करुन टाका रे कोणीतरी त्या तिकडे, एकदम पलिकडे ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश's picture

24 Dec 2007 - 7:53 pm | ऋषिकेश

स्वगत खूप आवडले!

हो, त्यासाठी काय प्रयत्न करावेत याचे उत्तर म्हणाल तर आहे तितके आपण सांभाळावे आणि नाहीच जमले तर आपणही त्या संस्कृतीचा एक भाग व्हावे, इतकेच आपल्या हातात असावे.
मनातलं बोललात डॉ.साहेब. पु.ल. म्हणायचे तसं.. "समोरचा रेडियो कितीही ठणाणा करत असला तरी ती गाणी आपल्यासाठीच लागली आहेत असं समजावं निदान त्रास तरी कमी होतो :)"

-ऋषिकेश

आपला लेख वाचला, अतिशय उत्तम मांडणी आहे.
पण मला अजून एका आयामाचा उल्लेख करू वाटतो तो म्हणजे आपापसातील संबंध. असे पाहिले तर नव्या युगाबरोबरच अनेक प्रकारची प्रगत दळणवळण व संवादाची साधने आली. पण प्रश्न असा आहे की आपण त्याचा खरच योग्य वापर केला का? आपल्यामधिल संमंध व संवाद तेवेढे खरच समॄध्ध झाले का ? का आपण कुठल्या आभासी अशा "मायाजाला" त वावरत आहे , की जेथे आपणाला जे काही चांगले व प्रगत वाटत आहे तो प्रत्येक्षात एक भ्रम आहे

यानिमित्ताने नेटवर एक मस्त उतारा मिळाला..... या विषयाला समर्पकच आहे .....

आपल्या काळात इमारतींची उंची वाढली
पण माणूसकीची कमी झाली का ?
रस्ते रूंद झाले पण दृष्टी अरूंद झाली का ?
खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली
घरं मोठी पण कुटुंब छोटी..
सुखसोयी पुष्कळ , पण वेळ दुर्मिळ झाला
पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग
माहितीचे डोंगर जमले पण नेमकेपणाचे झरे आटले
तज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या
औषधं भरपूर पण आरोग्य कमी झालं
मालकीची भाषा वाढली ,मूल्यांची कमी झाली
आपण बोलतो फार...प्रेम क्वचित करतो.. आणि तिरस्कार सहज करतो
राहणीमान उंचावलं पण जगणं दळभद्री झालं
आपल्या जगण्यात वर्षांची भर पडली , पण आपल्या वर्षांमध्ये जगण्याची नाही
आपण भले चंद्रावर आलो गेलो
पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होत नाही
बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत
पण आतल्या हरण्याचं काय ?
हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा
पण आत्म्याच्या गुदमरण्याचं काय ?

प्रमोद देव's picture

24 Dec 2007 - 10:42 pm | प्रमोद देव

बदल हा जगाचा स्थायीभाव आहे. त्याप्रमाणे बरेच काही बदलले आहे आणिअसेच बदलत राहील. जे चांगले आहे ते नक्कीच टिकून राहील बाकीचे नामशेष होईल. उदा. विजेचे दिवे आले तरी अजूनही वेळप्रसंगी मेणबत्या,कंदिल लागतातच. हाताने वारा घालायचे पंखे लागतातच. त्यांचे महत्व कमी झाले असले तरी ते नामशेष झालेले नाही. असेच भाषेचे अथवा इतर अनेक गोष्टींचे आहे.
तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बदलत्या रुपात स्वीकारून आपण त्या प्रमाणे आपल्यात बदल केल्यास हे जास्त जड जाणार नाही असे वाटते.

चतुरंग's picture

27 Dec 2007 - 1:13 pm | चतुरंग

"बदल ही एकमेव न बदलणारी गोष्ट आहे". बर्‍याच गोष्टींची सुरुवात घरातूनच होते. अगदी मराठी माध्यमात जावे की इंग्लिश, इथून सुरुवात होते.
आपण आपल्या तत्वांशी ठाम असणे अतिशय गरजेचे आहे. आपण जर मराठीला योग्य महत्व दिले तर आपल्यापुरती सुरुवात झाली.
असाच विचार जेवढे लोक करतील तेवढी भाषा टिकेल. शेवटी भाषा म्हणजे विचार आणी संवाद.
मी गेली ६ वर्षे अमेरिकेत आहे. मी व माझी पत्नी दोघेही आमच्या मुलाशी मराठीतून बोलतो. तो उत्तम मराठी बोलतो - चतकोर, करंगळी सारखे शब्द व्यवस्थित वापरतो.
मराठी गाणी, पुस्तके, सिनेमे इत्यादींचा चांगला संग्रह जवळ बाळगून आहोत. त्याच्याही नजरेला ते पडत असते व त्याचा परिणाम होतोच.
समोरचा माणूस मराठी आहे असे कळले की मी मराठीतूनच संवाद साधतो. आपला न्यूनगंडच भाषेला मारायला कारणीभूत होतो. आपण तसे होऊ दिले नाही म्हणजे झाले.

चतुरंग