शृंगारिक चित्रकला, चुंबनपे चर्चा, ‘दिल’च्या फिल्लमी उचापती वगैरे वगैरे

Primary tabs

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amशृंगारिक चित्रकला, चुंबनपे चर्चा, ‘दिल’च्या फिल्लमी उचापती वगैरे वगैरे

फार पूर्वीपासून जगभरातील कवी-लेखक-कलावंतांना प्रेम, शृंगार, रोमान्स वगैरेत रस वाटत आलेला आहे. राधा-कृष्ण, दुष्यंत-शकुंतला, अर्जुन-सुभद्रा, नल-दमयंती, क्यूपिड-सायकी, ऑर्फियस-युरिडसी, व्हीनस-अदोनीस, रोमियो-ज्युलिएट, लैला-मजनू वगैरे युगुलांवर अनेक काव्ये, चित्रे रचली गेलेली आहेत. तसेच यशोदा-कृष्ण, मॅडोना-बाल येशू, वगैरेंमधील प्रेम दर्शवणारी चित्रेही खूप आहेत. खजुराहोची अद्भुत शिल्पे तर जगप्रसिद्धच आहेत.

जुनी पोस्टकार्डे, सिनेमा पोस्टर्स, पुस्तका-मासिकांची वेष्टणे, कॅलेंडर्स, बिड्यांची बंडले, काडेपेट्या वगैरेंवरही विविध प्रणयी युग्मे आढळतात.

अशी विविध प्रकारची चित्रे एकत्रितपणे बघायला मिळावीत, हा या लेखाचा मुख्य हेतू आहे.

श्रीकृष्णविषयक काव्यरचना आणि चित्रे

भगवान श्रीकृष्णाचे अवघे जीवन अध्यात्म, पराक्रम, चातुर्य, याबरोबरच प्रेम, शृंगार, सौंदर्य, रसिकता, माधुर्य यांनी ओतप्रोत आहे.
वल्लभाचार्य (१४७९–१५३१) रचित ‘मधुराष्टकम्’ या अजरामर काव्यात श्रीकृष्णाच्या माधुर्याचे नितांतसुंदर वर्णन केलेले आहे. गेल्या शेकडो वर्षांत अनेकांनीं गायलेले हे काव्य आजही रसिकांना मोहित करते. पंडित जसराज यांनी गायलेले मधुराष्टकम अवर्णनीय आहे. (इथे ऐका)

श्री मधुराष्टकम्
अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम् ।
हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥१॥

वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरम् ।
चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥२॥

वेणुर्मधुरो रेणुर्मधुरः पाणिर्मधुरः पादौ मधुरौ ।
नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥३॥

गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरम् ।
रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥४॥

करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरम् ।
वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥५॥

गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा ।
सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥६॥

गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरम् ।
दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥७॥

गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा ।
दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥८॥

कवी जयदेव (जन्म इ.स. ११७०)रचित ‘गीतगोविंद’ या काव्यावर आधारित, अठराव्या शतकातील कांगडा, गुलेर, बसौली शैलीतील चित्रे

चित्र १. दे रे कान्हा चोळी अन लुगडी             चित्र २. राधेचा शृंगार खिडकीतून बघणारा कन्हैय्या.

.         .


चित्र ३. गोपींसवे कृष्णलीला.     1


चित्र ४. यमुना जळी खेळू खेळ कन्हैया..                     चित्र ५. निशा-मीलन.

.         .

(ऐका : यमुना जळी खेळू खेळ कन्हैया - १९३८ सालच्या ‘ब्रह्मचारी’ चित्रपटातील गाणे)


चित्र ६. जमुना किनारे ...सावरे ऐ जैयो..     .

(ऐका : सावरे ऐ जैयो.. - पं. मुकुल शिवपुत्र)


.     चित्र ७. राधा-कृष्णाची वस्त्रपालट लीला


चित्र ८-९. विसाव्या शतकातील राधा-कृष्ण चित्रे.
.         .


चित्र १०-११. अठराव्या शतकातील कृष्ण-यशोदा चित्रे.
.         .


चित्र १२-१३-१४. विसाव्या शतकातील बालकृष्णाची चित्रे. (यापैकी चित्र १३ - दीनानाथ दलाल)
.         .

.


.     चित्र १५. नारायण श्रीधर बेंद्रे (१९१०-१९९२) यांचे एक चित्र.


शंकर-पार्वती, दुष्यंत-शकुंतला, नल-दमयंती, विश्वामित्र-मेनका आणि अन्य काही चित्रे
(चित्रकार : रविवर्मा, मुळगावकर, दीनानाथ दलाल, बी.के. मित्रा वगैरे)

चित्र १६-१७. शंकर-पार्वती (कांगडा / गुलेर)
.         .


चित्र १८: नल-दमयंती         चित्र १९. अर्जुन- सुभद्रा : राजा रविवर्मा.
.         .


चित्र २०-२१ दुष्यंत-शकुंतला. चित्रकार (बहुतेक -) बी.के. मित्रा, रघुवीर मुळगावकर
...


.
चित्र २२. गीता प्रेसच्या कल्याण मासिकातील १९४०-५०च्या दशकातले एक शॄंगारिक चित्र.


चित्र २३. प्रेमाची अशीही एक छटा..
महाभारत युद्धानंतर रणभूमीवर विलाप करणाऱ्या स्त्रिया (पोथी-चित्र)
.


किस्सा लैला मजनू

मजनू चे खरे नाव ‘कयास’ असे होते, परंतु लैलाच्या प्रेमात तो ‘मजनू’ (वेडा) झाला, म्हणून त्याचे तसे नाव पडले. पर्शियन भाषेतील विविध हस्तलिखित ग्रंथांमध्ये असणार्‍या चित्रांपैकी १५५७-५८ सालची दोन चित्रे -

चित्र २४. मजनूला भेटायला लैलाचे आगमन.         चित्र २५. लैलाच्या कबरीवर विलाप करणारा मजनू.
.        .

भारतात अलीकडल्या काळात लैला-मजनूवर फारशी चांगली चित्रे काढलेली सहसा आढळत नाहीत, मात्र सिनेमा-पोस्टर आणि काड्यापेटी, विडीचे बंडल वगैरेवर त्यांना स्थान मिळालेले दिसते.
चित्र २६. काड्यापेटीवरील लैला-मजनू.         .


चित्र २७. १९५३चे सिनेमा पोस्टर (नूतन-शम्मी कपूर). चित्र २८. मकबूल फिदा हुसेन यांनी चितारलेले लैला-मजनू (१९८९)
.         .


पाश्चात्त्य चित्रकलेतील प्रेमी युगुले

चित्र २९. ख्रिस्ती मान्यतेप्रमाणे आदम आणि ईव्ह हे आद्य मानवी युगुल. देवाची आज्ञा मोडल्यामुळे त्यांची नंदनवनातून हाकालपट्टी होणे वगैरे प्रसंगावरील मिशेलँजेलोचे 'सिस्टीन चॅपेल'मधील चित्र. (इ.स. १५०८-१५१२)

.


चित्र ३०. Diana and Actaeon. चित्रकार - Giuseppe Cecari (१५६८–१६४०)
.


चित्र ३१. Paris and Helen. चित्रकार - Jacques Louis David (१७८८)
.


चित्र ३२. David and Bathsheba. चित्रकार Artemisia Gentileschi c. १६२५. चित्र ३३. डेव्हिड आणि बाथशेबा - सिनेमा पोस्टर (१९५१)
.         .
(चित्र क्र.२मधील कृष्णाप्रमाणेच चित्र ३२मध्ये डेव्हिड स्नानमग्न बाथशेबेस दूरच्या खिडकीतून न्याहाळतो आहे.)


चित्र ३४. Orpheus and Eurydice (१८६२) (जीएंच्या 'ऑर्फियस' कथेतील पात्रे.). चित्रकार Edward Poynter.
.


चित्र ३५. Venus and Adonis. चित्रकार - Peter Paul Rubens (Flemish, १५७७–१६४०)
.


चित्र ३६ : रोमियो-जुलिएटचे एक Silhotte चित्र. चित्र ३७. रोमियो-जुलिएट. चित्रकार - John H F Bacon १८५८ (wood print)
.                 .


चित्र ३८. Cupid and Psyche. चित्रकार - Francois-Edouard Picot (१७८६-१८६८). (Neoclassicism)
.


चित्र ३९. Telemachus and Eucharis. चित्रकार - Jacques Louis David (१८१८.)
.


बाल येशू आणि मेरीमाता, तसेच अन्य माय-लेकरांची चित्रे

.                 .
चित्र ४०. Madonna of the Lilies. चित्रकार - William-Adolphe-Bouguereau (१८२५-१९०५)
(Bouguereauची ५३६ चित्रे इथे बघा)
चित्र ४१. The Small Cowper Madonna, c. १५०५. चित्रकार - Raphael.


चित्र ४२. Mother and child (self portrait).चित्रकार - Vegee Lebrun   .
.   चित्र ४३. Woman of Cervara and her child. चित्रकार - William-Bouguereau


पाश्चात्त्य लोकांना चुंबनाचे भारीच कवतिक. पॅरिसमध्ये रस्त्यावर, बस-मेट्रो वगैरेत केव्हाही, कुठेही, कोणत्याही वयाचे एकादे युगुल एकाएकी चुंबनमग्न होईल, हे सांगता येत नाही. अर्थातच त्यांना हा विषय कलानिर्मितीसाठीसुद्धा आकर्षक वाटल्यास नवल नाही.

.        .
चित्र ४४.The kiss. चित्रकार - Gustav Klimt (१८६२-१९१८). चित्र ४५. रोमियो-जुलिएट. चित्रकार - Julius Kronberg (१८५०-१९२१)


शंभर वर्षांपूर्वी युरोपात विविध चित्रे छापलेल्या पोस्टकार्डांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होत असे. चित्रांचे विषय खूप वेगवेगळे असून त्यात शृंगारिक चित्रांचे प्रमाण बरेच असायचे. त्यापैकी काही चित्रे ४६, ४७, ४८, ४९.

.             .

.             .

तिकडे चीन, जपान, कोरिया वगैरेमधेही चित्रकलेची खूप समृद्ध परंपरा विकसित झाली, आणि तिचा आधुनिक युरोपियन कलेच्या विकासावरही बराच प्रभाव पडला. त्यातली शृंगारिक 'ओवळी' चित्रे तर लई म्हणजे लईच भारी म्हणावीत अशी असली, तरी इथे मात्र फक्त एकच 'सोवळे' चित्र देतो आहे -

.
चित्र ५०. Koi no michikusa १८२५. चित्रकार - Keisa Eisen


हे झाले 'अवघे ग्रामज्याचे मैदावे' अशा चित्रकलेविषयी. आता थोडेसे विषयांतर करून चुंबनपे चर्चा, ‘दिल’ या फिल्लमी उचापती वगैरेकडे वळू या.

अगदी लहान असताना माझे मोठे भाऊ आमच्या काकांबरोबर ‘दुवन्नी’त (‘दुवन्नी म्हणजे दोन आणे, एका रुपयाचा आठवा भाग) इंग्लिश सिनेमे बघायला जायचे, तेव्हा मलासुद्धा न्यायचे. त्या सिनेमातले मला ओ की ठो कळत नसे, पण मधल्या सुट्टीत मिळणाऱ्या क्रीम-रोलसाठी मी बसून राहायचो आणि तो मिळाल्यावर “घरी चला”चा धोशा लावायचो. त्या सिनेमातले बुवा आणि बाया उठसूट एकमेकांच्या पप्प्या का घेत असतात, हे माझ्यासाठी एक कोडेच असायचे.

आपल्याइकडल्या सिनेमात मात्र पूर्वी नायक-नायिका जवळ आले की दोन फुले जवळ येणे, दोन पक्ष्यांनी चोचीत चोच घालणे वगैरे दाखवले जायचे. तो जमाना ऊठसूठ ‘आय लव्ह यू’ म्हणण्याच्या पुष्कळ आधीचा, “मोहोब्बत जो करते है वो, मोहोब्बत जताते नही …. मजा क्या रहा जब के खुद कर दिया हो, मोहोब्बत का इजहार अपनी जुबां से”चा होता. मात्र सुरुवातीपासूनच फिल्मी गाण्यांमध्ये असलेला ‘दिल’चा धुमाकूळ आजतागायत कायम आहे.

हृदय, हार्ट, दिल हे सर्व एकच खरे, पण हार्ट म्हटले की ‘हार्ट अटॅक - कोलेस्टरॉल' इत्यादी आठवावे, हृदय म्हटले की 'रोहिणी-नीला, डावा कप्पा-उजवा कप्पा-झडपा' वगैरे आठवाव्यात, असले दळभद्री नशीब 'दिल'चे मात्र नाही.

‘दिल’ की तो बातईच कुछ और है भिडू, समझा क्या? और मराठी भाषा मे साला 'दिल' वर्ड क्यों नै है, ये बडा वंडर का बात है.

‘दिल’ म्हणताक्षणी सटासट ‘दिल एक मंदिर - दिल देके देखो - दिल तेरा दिवाना - दिल ने फिर याद किया - दिल दिया दर्द लिया - दिल अपना प्रीत परायी - दिल और मोहोब्बत - दिल से - दिल तो पागल है' असे डझनावारी हिंदी पिच्चर आठवतात. अशा या पिच्चरांच्या गाण्यांमधले दिल हे अनेक उचापतीत गर्क असते. तडपना, धडकना, टूटना, बिखरना, बिछडना, मचलना, पुकारना, प्यार करना, याद करना, पैगाम भेजना वगैरे भानगडींखेरीज ते कधी बेकरार, कधी बेचैन, कधी बेइमान, कधी बेताब, कधी बेनकाब, कधी बेकाबू, कधी बेगाना, कधी मुरझाया, कधी भरमाया, कधी प्यार भरा, कधी उमंग भरा, कधी मदहोश, कधी मतवाला, तर कधी दिवाना-मस्ताना-अलबेला-पागल वगैरे असते.

पिच्चरातल्या तिचे वा त्याचे दिल यातल्या कोणत्या उचापतीत गुंतलेय, हे ओळखणे अवघड असले, तरी ‘प्यार’ करणाऱ्या दिलाची ‘पहचान’ मात्र अजिबात मुश्कील वा नामुमकिन नाही. “हर दिल जो प्यार करेगा, वो गाना गायेगा - दिवाना सैकडो मे पहचाना जायेगा” हा षोडशाक्षरी मंत्र लक्षात ठेवला की झाले.

कधी हे दिल लुटले किंवा चोरीला जात असते ("दिल लूटने वाले जादूगर अब मैने तुझे पहचाना है" ... "चुराके दिल मेरा, गुडिया चली...), कधी तडपत असते (दिल तडप तडप के कह रहा है आ भी जा...), कधी 'मचलत' असतं ("मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कुसूर है"... "देखो मेरा दिल मचल गया”...), कधी जळत असते (दिल जलता है तो जलने दे, आसूं ना बहा फरयाद ना कर"...) तर एखादे 'बेकरार' झालेले दिल "बेकरार दिल तू गाए जा - खुशियों से भरे वो तराने, जिन्हे सुनके दुनिया झूम उठे... असे गात फिरते.

या दिल प्रकरणात 'दिलबर' आणि 'दिलरुबा' नामक प्राणीही असतात. एखादी बया तिच्या 'दिलबर'ला नुस्ती भेटली, तरी "दिलबर दिलबर दिलबर हाँ .. दिलबर दिलबर दिलबर... होश ना खबर है, ये कैसा असर है" असे बरळू लागते, तर कुण्या "दिलबर दिल से प्यारे" म्हणणारीचा दिलबर तिला स्वतःच्या दिलाहूनही जास्त प्यारा असतो. कुणी “ये दिल ले कर नजराना, आ गया तेरा दिवाना दिलबर जानी” अशी आपण आल्याची खबर देतो, तर कुणी "तुझे क्या सुनाऊं मै दिलरुबा तेरे सामने मेरा हाल है…” असे आळवत बसतो.

एखादा आशिक “दिल तो पहलेही से मदहोश है मतवाला है” असे सांगतो, तर कुणीएक भग्नहृदयिका "ओ बेकरार दिल, हो चुका है मुझको आसूओं से प्यार” असे गाते. कुणाचे "दिल के आरमां आंसुओं मे बह गये" अशी स्थिती झालेली असते, तर एखादी दिल, प्यार, इष्क, उल्फत, मोहोब्बत वगैरेतले काही न समजणारी छोकरी "दिल विल प्यार व्यार मै क्या जानू रे" अशी कबूली देते. कधी "दिल जो न कह सका वही राज-ए दिल, कहने की रात" आलेली असल्याचा इशारा, तर कधी “इशारो इशारो मे दिल लेने’वाल्या 'बलमा'ला हा ’हुनर’ त्याने ‘“सीखा कहांसे?” अशी पृच्छा.

तसेच "रोका कई वार मैने दिलकी उमंग को"पासून "दिल को हजर बार रोका रोका रोका"पर्यंत अनेकांनी प्रयत्न करूनही "दिल है के मानता नही" असाच समस्त लैला-मजनूंचा अनुभव असतो.

दिल का भंवर, दिलकी तडप, दिलकी धडकन, दिलके अरमान, दिलका खिलौना, दिलकी आरजू, दिलकी बेताबियाँ, दिलके सपने, दिलका झरोका, दिलकी तमन्ना, वगैरे वगैरेंखेरीज फिल्लमी दिलात अनेक चित्रविचित्र गोष्टींचा साठा असतो. उदाहरणार्थ, "तेरे दिल मे है मोहोब्बत के भडकते शोले..", "मेरे दिल मे हल्कीसी जो 'खलिश' है..", “दिल मे छुपाके 'प्यार का तुफान.." वगैरे.

आधीच "तडप ये दिन रातकी, कसक ये बिन बातकी" असा रोग असणारीची "जो दिलकी तडप ना जाने, उसीसे मेरा प्यार हो गया" अशी अवस्था होते, तेव्हा त्याची परिणती "दिलका खैलौना हाये टूट गया" अशीच होणार.

अशा या फिल्लमी दिलाने कितीही खटपटी-लटपटी केल्या, तरी सरतेशेवटी मात्र 'टूटना' हीच त्याची नियती. "शीशा हो या दिल हो आखिर --- टूट जाता है ... टूट जाता है .. टूट जाता है..." हे त्रिवार सांगितलेले सत्य त्रिकालबाधित असल्याची साक्ष "मेरे टूटे हुवे दिलसे कोई तो आज ये पूछे", "दिल तोडने वाले तुझे दिल ढूंढ रहा है", "दिल के टुकडे टुकडे कर के मुस्कुरा कर चल दिये" अशा अनेक गाण्यांतून मिळते. मात्र हे दिल कधीच काचेसारखे 'खळ्ळ-खट्याक' करून तुटत नसते, तर त्याआधी त्याला ‘दर्द’ नामक दिव्यातून जावे लागते. "तुमसे मिले, दिल मे उठा दर्द करारा…", "दिल दिया दर्द लिया..", "तुम्हीने दर्द दिया है तुम्ही दवा देना..", "दर्दे दिल दर्दे जिगर" हे सगळे त्या ‘दर्द-ऐ-दिल’चेच ‘तराने’ आहेत.

असो. आता हे गुऱ्हाळ लैच झाले. तर आता विविध चित्रे हुडकताना अनपेक्षितपणे हाती लागलेला एक मनोरंजक प्रकार देऊन हे गुऱ्हाळ आटोपते घेतो.

.


स्वतःजवळ मदहोश, मतवाला, दीवाना, मस्ताना, अलबेला वगैरे 'दिल' असूनही 'कोई हमदम ना रहा, कोई सहारा न रहा... कोई हमारा ना रहा' अशी स्थिती असणार्‍यांसाठी वरील मंत्र हा आशेचा एक किरण आहे. असो.

.


(इथे चित्रे प्रसिद्ध करताना काही मर्यादा सांभाळली जाणे अपेक्षित असल्याने अनेक उत्तमोत्तम ओवळी चित्रे देणे शक्य झालेले नाही, जिज्ञासूंनी गूगल शोध घ्यावा)


प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

14 Nov 2020 - 2:02 pm | तुषार काळभोर

काय आवडलं, काय खूप आवडलं, का आवडलं, एखाद्या चित्रविषयी मत, लिहायला घेतलं तर प्रतिसाद मोठा होईल. म्हणून तूर्तास लेख प्रचंड आवडला आहे, एवढंच सांगतो.

अधून मधून वेगवेगळ्या चित्रांचे स्वतंत्र प्रतिसाद देऊ किंवा कसे...

चित्रगुप्त's picture

15 Nov 2020 - 3:33 pm | चित्रगुप्त

@पैलवानः

अधून मधून वेगवेगळ्या चित्रांचे स्वतंत्र प्रतिसाद देऊ किंवा कसे...

अगदी अगदी अगदी... तुमच्या सोयीनुसार अगदी अवश्य लिहा. वाट बघतो आहे. अनेक आभार.

तुषार काळभोर's picture

21 Nov 2020 - 9:42 am | तुषार काळभोर

मला चित्र (स्केच, रेखाटन, पेंटिंग, ड्रॉइंग असे सगळे प्रकार), वादन, या कलांविषयी प्रचंड आकर्षण आहे. येत काहीच नाही. पण ज्यांना जमतं त्यांच्याविषयी मनात एकाचवेळी आदर, असूया, भिती असे भाव असतात. लेखातील चित्रे तर महान, लेजंडरी कलाकरांची आहेत. त्यावर मत व्यक्त करण्याचीही माझी लायकी नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. आपल्याला चित्रांमधलं खरंच काही कळत नाही. फक्त एखादं चित्र आवडतं किंवा नाही. बर्‍याचदा का तेपण नाही सांगता येत. त्यामुळे खालील मते केवळ चित्रे पाहून निर्माण झालेले विचार आहेत. त्यात टीकेची छ्टा दिसल्यास माफ करून फाट्यावर मारावे, ही णम्र विनंती.

चित्र क्र २. दोघी गोपीका अन कृष्ण यांचे चेहरे समोरून रेखाटले आहेत. म्हणजे अठराव्या शतकात तशी पद्धत होती बर्‍यापैकी. तरी ऐतिहासिक व्यक्तींची चित्रे नेहमीच एका बाजूला चेहरा असलेली असतात. समोर एकही नाही. अगदी शिवाजी महाराजांपासून सवाई माधवरावांपर्यंत अन औरंगजेबापासून ते सिद्दी पर्यंत सर्वांचे चेहरे डावीकडून किंवा उजवीकडून रेखाटलेले.
३ आणि ५ छान आहेत. कृष्ण अतिशय सुंदर दिसतो त्यात.
४ : कृष्ण अन गोपिका सगळ्यांच्या केशरचना प्रचंड गंडल्यात. शारिरीक रचना सुद्धा. म्हणजे प्रथमदर्शनी, पन्नाशीच्या जवळ आलेला अर्धचंद्र झालेला कृष्ण तशाच उघड्याबंब पुरुषांच्या मागे का पोहतोय, असा प्रश्न पडला.

** सांवरे अइ जइय्यो ** अतिशय छान आहे. पहिल्यांदा यशवंत मध्येच ऐकले होते आणि लक्षात राहिलंय.
७ : राधा-कृष्णाची वस्त्रपालट लीला - या चित्राला रोल प्ले म्हणावं का? :) कृष्ण परत एकदा अतिशय गोड आहे. मला राधेच्या चेहर्‍यावर मस्तानीचा प्रभाव जाणवतोय.

८ : विसाव्या शतकातील हे चित्र खूपच सुंदर आहे. राधेच्या केशसंभारात तन्मयतेने फुले माळणारा कृष्ण अन त्यात रममाण झालेली राधा - किती सुंदर!

१२-१३-१४ (दीनानाथ दलाल) : १२ मध्ये छान डिटेल्स आहेत. कृष्णाच्या चेहर्‍यावर पकडले गेल्याने आलेले भाव एकदम क्यूट! १३-१४ मधील चेहरे, वेश व शरीररचना जास्त सुबक वाटतात. (परत एकदा) बालकृष्ण खूपच मोहक आहे यात.

तुषार काळभोर's picture

21 Nov 2020 - 9:48 am | तुषार काळभोर

चित्र १५. नारायण श्रीधर बेंद्रे यांचे चित्र किमान रंगात , साधेपणात खूप छान आहे.

१८ : रवि वर्माची दमयंती अतिशय सुंदर आहे. किती शांत झोपलीये! नल राजा न वाटता भिल्ल वाटतो :)
१९ - टिपीकल राजा रविवर्मा चित्र!

२० - दुष्यंत शकुंतला चित्रातील पार्श्वभूमी एकदम सुंदर आहे. रंगातून शकुंतलेची ओलेती वस्त्रे एकदम छान रंगवलीत. हे मला खूप कौशल्याचं काम वाटतं. (तरी पाय थोडे बेढब वाटताहेत, पण तो माझा दृष्टीदोष असू शकतो)

२१- शकुंतला एकदम सुंदर, मोहक (आणि मादक!). याही चित्राची पार्श्वभूमी अतिशय सुंदर.
दोन्ही चित्रात दुष्यंत काही आकर्षक नाही वाटला.

२२ - एखाद्या लखनवी किंवा दिल्लीच्या हवेलीतलं चित्रण वाटतं. याला शृंगारिक म्हणणं म्हणजे आजकालच्या जगात नुतनला मादक म्हणण्यासारखं आहे! :)

तुषार काळभोर's picture

21 Nov 2020 - 1:42 pm | तुषार काळभोर

पहिली दोन चित्रे २४-२५, त्यातील सौंदर्यापेक्षा कथेला मदत म्हणून जास्त आहेत, असं मला वाटतं. त्यादृष्टिने ती अतिशय चांगली आहेत.
मजनूचं खपाटीला गेलेलं पोट पाहून प्रेम का करू नये, याचा उत्कृष्ट वस्तूपाठ मिळावा ;)
पोष्टर मध्ये - लैला = नूतन ??!! अन् मिशीवाला शम्मी कपुर मजनू ??!!
म्हणजे शम्मी कपूर वेड्यासारख्या उड्या वगैरे मारायचा, पण त्यात चार्म वेगळा होता, मजनूगिरी नव्हती. हा चित्रपट कितप यशस्वी झाला असेल, शंका आहे.
(अवांतर : नंतर ऋषी पकूरचा मजनू जरा उजवा वाटतो.)
असो..

२८ - एम एफ हुसैन यांच्या चित्रातील मजनू मागे, एका उंटावर लैला आहे. बहुधा अलिकडील उंटावर. पलिकडील उंटावर कोण असेल?

तुषार काळभोर's picture

21 Nov 2020 - 2:45 pm | तुषार काळभोर

जशी सोळाव्या ते अठराव्या शतकातील सर्व भारतीय चित्रे एकाच चित्रकाराने काढल्यासारखी वाटतात, (जाणकारांना बारकावे कळत असतील, मला सगळी सारखी वाटतात!) तशी युरोपियन नवनिर्मिती कालातील चित्रे एकाच प्रकारची वाटतात. मला जाणवलेली वैशिष्ट्ये म्हणजे स्त्रियांच्या चित्रांतील गोलाई. स्लीम ट्रिम स्त्री औषधालाही सापडत नाही. कदाचित तेव्हाची आदर्श किंवा सरासरी किंवा Desired शरीरयष्टी तशी असावी. स्तन, पोट, कटीभाग, पार्श्वभाग सर्वत्र एकदम छान, सुबक, सुंदर गोलाई.
स्त्रियांच्या पोटावर चरबी अगदी ठासून दिसते. पुरूष मात्र अगदी चार-सहा-आठ पॅक्स वाले.

चित्र ३१. Paris and Helen.
हेलनच्या मागे पॅरिस का वेडा झाला असेल, ते दिसून येतं. दोघेही अगदी सुंदर चित्रित केले आहेत. हेलनचा चेहरा, शरीर, पारदर्शक कापडाने झाकलेले स्तन, पॅरीसचा पाय - अगदी आदर्श शरीर व सौंदर्याचा नमुना!

३२-३३ David and Bathsheba
चित्रात डेवीड कुठे दिसत नाही. (की मी पाहण्यात चुकलो?). पण Bathsheba एकदम सुंदर.
आणि पोष्टर मध्ये हॉलीवूडचा देवानंद अन मधूबाला (किंवा कल्पना अय्यर फॉर दॅट मॅटर!) - कपडे घालूनही ती एकदम मादक दिसतेय! एकदम सुंदर!!
ताजा कलम - खालची नोट नंतर वाचली की डेविड खिडकीतून न्याहळतोय, पण तो अगदीच झूम करून बघावा लागला.

चित्र ३४. Orpheus and Eurydice
ही कथा ९५-९६ च्या आधी वाचली होती. मोठ्या भावाच्या इंग्रजी पुस्तकात होती. तेव्हा ऑर्फियसचं खूप वाईट वाटलं होतं.
चित्रात Eurydice चा चेहरा अगदीच मलूल आहे. कदाचित ती यमलोकातून परतत असल्याने असेल. पण ती सुंदर आहे हे नक्की!
अवांतर : या यमलोकाचा देव आहे हेडीस Hades आणि त्याची बायको आहे Persephone. मॅट्रिक्स मध्ये मोनिका बेलुचीचं नाव पण तेच होतं. साम्य म्हणजे दोघी मनाविरुद्ध पतीसोबत राहत होत्या.
अवांतर समाप्त!

चित्र ३८. Cupid and Psyche
अतिशय उत्कट चित्र. Psyche च्या चेहर्‍यावरील संपूर्ण समाधानाचे भाव एकदम सुंदर! Cupid देखील अगदी मदनाचा पुतळा..

चित्र ३९. Telemachus and Eucharis - यातला तो आणि ती कोण ते माहिती नाही. पण ती खूप सुंदर आहे! त्याचे गाल गुलाबी का रंगवलेत कळेना. इथेही त्याचं पोट एकदम टोन्ड आहे. तिच्या मागे (बहुतेक) जो भाता आहे, त्यावर डेविड का लिहिलंय? सर्च करायला हवं. या युरोपियन पौराणिक कथा लै इंटरेष्टिंग असतात.

४०- या चित्रातील मेरी आणि येशू दोघेही अतिशय छान रेखाटलेत. बालयेशू तर अगदी त्या वयातही मसिहा पोज मध्ये आहे.
दुसर्‍या चित्रातील जास्त नैसर्गिक वाटताहेत. शिवाय पार्श्वभूमीचं डिटेलिंग अतिशय सुंदर आहे. अगदी अंगावरील गोधडीचे बारकावे सुद्धा छान रंगवलेत.

चित्र ४२. Mother and child (self portrait).चित्रकार - Vegee Lebrun
स्व-चित्र आहे, म्हणजे ती स्वतः कित्ती सुंदर होती! अप्रतिम!
Élisabeth Vigée Le Brun आवर्जून हिचा शोध घेतला, अनेक सुंदर चित्रे सापडली. तिची चित्रे तिनेच काढली आहेत. पण तिची इतर चित्रेसुद्धा फक्त स्त्रियांची दिसली. खूप सुंदर!

४३- आईच्या चेहर्‍यावरील ममता किती छान उतरवली आहे चित्रात.

४५- रोमियो ज्युलिएटचं चुंबन इतकं भावलं नाही. तिच्या चेहर्‍यावर तर कसलेच भाव नाहीयेत! त्यामानाने नवनिर्मिती कालातील चित्रातील स्त्रियांचे चेहरे किती बोलके वाटतात.

असो..
सर्व महान चित्रकारांनी काढलेली चित्रे आहेत. मी अतिसामान्य अरसिक असून लहानतोंडी मोठा घास घेत इतकं लिहिलं.
काही चुकलं असेल तर मनावर घेऊ नका...

संकेतस्थळानं बहाल केलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्या मर्यादेत राहून केलेला शृंगारचा कलात्मक आविष्कार दोन्हीही विलोभनीय !

"संकेतस्थळानं बहाल केलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्या मर्यादेत राहून केलेला शृंगारचा कलात्मक आविष्कार" .... लिहीताना नेमके हेच अभिप्रेत होते. अनेक आभार.

कंजूस's picture

14 Nov 2020 - 5:16 pm | कंजूस

खूप आवडला लेख. चित्रांबद्दल आभार.

चित्रगुप्त's picture

15 Nov 2020 - 7:11 pm | चित्रगुप्त

@कंजूस, लेख आवडला हे वाचून आनंद वाटला. अनेक आभार.

प्रचेतस's picture

14 Nov 2020 - 6:31 pm | प्रचेतस

व्वा...!
एकापेक्षा एक सरस चित्र आणि त्यांना तुमच्या लेखनाची सुरेख जोड.
वाचकाला अजून काय पाहिजे?

@प्रचेतस: चित्रे आणि लेखास तुमच्यासारख्या साक्षेपी रसिकाकडून मिळणारी दाद महत्वाची असते. अनेक आभार.

आंबट चिंच's picture

14 Nov 2020 - 8:36 pm | आंबट चिंच

मर्यादित स्वरूपात घेतलेला पप्पीरसाचा आढावा आवडला.
दिल वरून केलेल्या अनेक गाण्यांची गुंफण तर लाजवाब.

@आंबट चिंचः 'पप्पीरसाचा आढावा' हे थोरच. लहानपणापासून ऐकत आलेली जुनी गाणी मनात नेहमीच गुंजत असतात. लिहायला बसले की ती या ना त्या स्वरूपात अवतरित होतात. अनेक आभार.

शशिकांत ओक's picture

15 Nov 2020 - 9:11 am | शशिकांत ओक

चित्रगुप्त,
आशिक दीवाने यांच्या रंगीत चित्रमय जगाची सफर घडवून हा सांस्कृतिक, शृंगारिक सोहळा म्हणजे दिवाळीचा चमचमीत फराळ आहे...

@शशिकांत ओकः 'सांस्कृतिक, शृंगारिक सोहळा म्हणजे दिवाळीचा चमचमीत फराळ' हे विशेषण खूपच भावले.
जगभरातील 'आशिक-दिवाने' हे अनेक कवी, लेखक, चित्रकार, सिनेमावाले वगैरेंसाठी नेहमीच प्रेरणास्त्रोत बनत आलेले आहेत. अनेक आभार.

सोत्रि's picture

15 Nov 2020 - 10:12 am | सोत्रि

झक्कास लेख!

चित्र क्र. ११ एकदम हटके चित्र आहे, त्याची शैली. त्यातल्या माणसाच्या डोक्यावर असलेलं मुंडासं इस्लामी पद्धतीचं आहे आणि घरावरदेखील मिनार आहे. एकंदरीत चित्रावर १८व्या शतकापेक्षा १५-१६व्या शतकाची झाक वाटतेय.

- (शृंगारिक) सोकाजी

अवांतरः वशीकरण मंत्राबद्दल धन्यावाद. आता मिपापरंपरेनुसार, एक स्त्री शोधणे आले ;)

@सोत्रि: चित्र क्र. ११ बद्दलः या चित्रात यशोदा मैय्या कृष्ण-बलरामास आंघोळ घालत असून 'नंदबाबा' कौतुकाने बघत आहे. नंद हा गवळ्यांचा 'राजा' असल्याचे त्याच्या पगडीतून तसेच मागील इमारतीच्या घुमटीतून सूचित केले असावे.
माझ्या आकलनाप्रमाणे १७३९ साली 'असहिष्णु' नादिराशाहने आक्रमण करून दिल्ली काबीज केल्यावर दिल्लीतले काही काश्मिरी पंडित चित्रकार 'पुरस्कार वापसी' वगैरे भानगडीत न पडता 'यःपलाय सजीवते' या न्यायाने १९९१ च्या काश्मिरी पंडितांप्रमाणेच आपला जीव वाचवण्यासाठी पलायन करून गुलेरचा राजा दलीप सिंह (1695-1741) याच्या आश्रयाला गेले. तिथे त्यांची कला बहरत जाऊन पुढे अनेक उत्तमोतम चित्रकारांनी शेकडो चित्रे निर्माण केली. श्रीकृष्णाचे जीवन हा त्यांचा आवडता विषय. पहाडी शैली ही मुगल शैलीचे आणखी परिष्कृत, बहरलेले, निसर्ग आणि सुंदर मानवाकृतींनी सजलेले रूप म्हणता येईल.
या मडळींबरोबर तात्कालीन मुगल पगड्या वगैरेंच्या फ्याशनींचे लोण पहाडी चित्रांमधे आले असण्याची शक्यता आहे. अर्थात हा एक अंदाज आहे. जाणकारांनी प्रकाश टाकावा. आणि ती मीनारासारखी दिसणारी घुमटी राजपूत शैलीच्या सगळ्या जुन्या इमारतींवर असते.
एवढा प्रचंड ताजमहाल हाच 'तेजोमहालय' म्हटल्यावर त्या इवल्याश्या मिनाराची काय मातब्बरी ? पुढे कधी कांगडा, गुलेर, मंडी वगैरेला जाणे झाल्यास तिथल्या जुन्या प्रासादांचे या दृष्टीने अवलोकन करायला हवे.

भाषा शिकण्यासाठी बाई ठेवणे + वशीकरण मंत्र .... असा समसमा योग घडून आला तर काय होईल, यावर कुणी लिहा रे एक शृंगारिक कथा.

Bhakti's picture

15 Nov 2020 - 2:28 pm | Bhakti

चित्र ३६ : रोमियो-जुलिएटचे एक Silhotte चित्र. चित्र ३७. रोमियो-जुलिएट ..चित्रे छान! प्रत्येक रस वेगवेगळ्या चित्रांतून दिसला..गाण्यांची दिलाला जोड भारीच!!मला दिलाच गाणं आठवल.."मेरा दिल भी कितना पागल है!"

कुमार१'s picture

15 Nov 2020 - 3:36 pm | कुमार१

सुंदर कलात्मक आविष्कार !

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 4:23 pm | टर्मीनेटर

@चित्रगुप्त

'शृंगारिक चित्रकला, चुंबनपे...'

हा लेख खूप आवडला  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

सुधीर कांदळकर's picture

15 Nov 2020 - 4:57 pm | सुधीर कांदळकर

सुरुवातीची कांगडा वगैरे शैलीतली चित्रे छान.
चित्र क्र. ९ मुळगांवकरांचे आहे का?
१२ आणि १३: पातळ ओढण्या कशा रंगवल्या असतील कोण जाणे. हॅट्स ऑफ्फ.
१८, १९ अनेक ठिकाणी पाहिल्यासारखी वाटतात. बहुधा मासिकांची मुखपृष्ठे वा कॅलेन्डर्सवर.
मजनू - कपास : हा हा हा हा!!
३६, ३७ सुंदर.
४३: चेहर्‍यावरचे भाव - ज्याचे नाव ते.
४४: बोध झाला नाही.
४५: मला सर्वात आवडलेले चित्र.

लेख निखळ आनंद देणारा. दिवाळीचा उत्कृष्ट फराळच. धन्यवाद.

चौकटराजा's picture

16 Nov 2020 - 7:03 pm | चौकटराजा

कदाचित ९ क्र. चे चित्र एस एम पन्डित यान्चे असावे ! खरे उत्तर चित्रगुप्ताच्या डायरीत मिळेल ! )))

विजुभाऊ's picture

16 Nov 2020 - 7:44 am | विजुभाऊ

चित्रगुप्त काका तुमचे नाव बदलून चित्रप्रगट असे करावेसे वाटतेय

चौकटराजा's picture

16 Nov 2020 - 8:47 am | चौकटराजा

लेखन शैली माहितीपूर्ण तरीही मिस्किल ,रंजक अशी हे आपल्या लेखनाचे वैशिष्टय नेहमीच असते , ते अर्थात इथे देखील प्रत्ययास येते. पैकी सर्वच चित्रे -चरित्रे उत्तम आहेत .मला व्यक्तीश: बेंद्रे यांचे चित्र शैलीसकट ( क्र .१५ ) सर्वात जास्त आवडले ! ( रवी परांजपे यामी ही शैली पुढे नेली असे म्हणता येईल का ? )दुसरे आवडलेले चित्र मी स्वत: पॅरिस मध्ये पाहिले आहे ते " मदर अँड चाइल्ड ( क्र .४२ ) .तिसरे ( क्र .३८ )" क्युपिड अँड साइक मधील प्रकाश दर्शनाचा भाग फार भावला !

यात काही सांगीतिक अनुभव यावा म्हणून दिलेल्या लिंका भारी आहेत. त्यातील " सावरे ऐजईयो " ही कुमार गंधर्व ,प्रभा अत्रे तसेच मुकुल कोमकली या तिघांचीही व्हर्शन ऐकलेली आहेत. पैकी मुळात कुमार गंधर्व हे लाडके गायक असूनही मुकुल यांनी सादर केलेले अधिक मस्त आहे असा आपला माझया कानाचा फैसला आहे ! असो !

दिल बिल ,दिलवर ,दिलकशी ई विषयी आठवणी देताना व्हेंन्ट्रीकल . कप्पे ,कोलेस्टरोल वगैरे संदर्भ आणून जास्त रंजक असा खोचक पणा आलाय तो हसविणारा आहे !

चित्रातील एका चित्रकाराला ( मुळगावकर ) मी प्रत्यक्ष भेटलो आहे हे माझे भाग्य ! बाकी चार पाच शैलीचे दर्शन या संग्रहात होते ही एक जमेची बाजू आहेच !
" दिलकी महफिल सजी है, चले आईये , आपकी बस कमी है चले आईये " असे आवाहन मी इतर मिपाकरांना इथे करीत आहे ! कष्टपूर्वक संकलन करून तयार केलेल्या या लेखाला प्लस १००१ !!!! धन्यवाद !

@चौरा: रसिक, विस्तृत प्रतिसादाबद्दल अनेक आभार.
बेन्द्रे यांनी चित्रकलेची जी एक विशिष्ट वाट चोखाळली, तिचे उत्तुंग शिखर त्यांनी गाठले, त्यामुळे त्याच वाटेवरून जाणार्‍याला त्या शिखराच्या आणखी वर कसे जाता येणार?तसा प्रयत्न केला तर उतरणीवरच यावे लागेल असे मला वाटते.
यूट्यूबीवर 'सावरे ऐजैय्यो' ही चीज कुमार, वसंतराव आणि राहुल देशपांडे, कुमारांचा नातू भुवनेश कोमकली, मुलगी कलापिनी, याशिवाय ब्रजभूमितील अन्य गायक, नाना पाटेकरांच्या 'यशवंत' सिनेमात रविंद्र साठे अश्या अनेकांनी गायलेले उपलब्ध आहे, परंतु मलासुद्धा या सर्वात उजवे पं. मुकुल शिवपुत्र यांचेच वाटते. गंमत म्हणजे माझी अडीच वर्षांची नात माझ्या स्टुडिओत आली की "आबा, जमुना किनाले लाव" अशी, आणि आज्जीकडून वेणी घालून घेताना पं. जसराज यांचे "मधुलाधिपते अखिलम मधुलम लाव" अशी फर्माईश करते.

तुमच्या "दिलकी महफिल सजी है, चले आईये , आपकी बस कमी है चले आईये " या आवाहनाला किती रसिक प्रतिसाद देतील कुणास ठाऊक, कारण मिपाचा हा दिवाळी अंक म्हणजे "हुस्न के लाखो रंग, कौनसा अंग देsssssखोsssssगे" ... असा प्रकार असल्याने -
"हुस्न वालों का कोई भरोसा नहीं,
क्या पता आप आते भी है या नहीं ....
दिल दुखाने लगी दिल्लगी आपकी
मार डालेगी ये बेरूख़ी आप की
जान पर बन गई है चले आईए ... असेही म्हणावे लागू शकते. तरिही "कोई दूर से आवाज दे चले आओ" हे जाणून "तुमने पुकारा और, हम चले आये" म्हणत काही रसिक बलमा येतीलही.

तुषार काळभोर's picture

16 Nov 2020 - 10:53 pm | तुषार काळभोर

चित्रगुप्त जी,
तुम्हाला v तुमच्या नातीला शतशः धन्यवाद.
ज्या घरातील अडीच वर्षांची मुलगी पंडित जसराज आणि कुमार गंधर्व आवडीने ऐकते, त्या घराची सांस्कृतिक संपदा कल्पनातीत आहे.

चित्रगुप्त's picture

16 Nov 2020 - 11:54 pm | चित्रगुप्त

@पैलवान: आमची मुले अगदी लहान असताना पासून मला चित्रे रंगवताना बघत, आणि कुमार गंधर्व, मोझार्ट, रविंद्र संगीत, ओपी नय्यर, मुकेश, हेमंतकुमार वगैरे ऐकत आलेली असल्यामुळे आता नातवंडांनाही तशी आवड लावणे शक्य होत आहे. लहानपणी जे कानावर पडते त्याची कळत नकळत आपोआपच गोडी लागते, तेंव्हा आपले काम फक्त चांगले संगीत त्यांच्या कानावर पडत राहील हे बघणे, एवढेच असते. बाकी शास्त्रीय संगीतातले मला काहीही कळत नाही, फक्त ऐकून ऐकून श्रेष्ठ संगीत ओळखता, आणि त्यात रमता येते.
प्रतिसादाबद्दल अनेक आभार.

श्रीगुरुजी's picture

16 Nov 2020 - 3:23 pm | श्रीगुरुजी

खुसखुशीत लेख! आम्हास चित्रकलेतील फारसे काही समजत नाही (खरं तर काहीच समजत नाही). नेत्रांना सुखद, आकर्षक वाटेल ते चांगले चित्र असे अशी आमची समजूत. चित्रामधील गूढ अर्थ, संदेश वगैरे समजणे आमच्या आवाक्यात नाही. परंतु या लेखातील चित्रे नक्कीच सुखद व आकर्षक आहेत. विशेषतः बाल येशू-मेरीमाता व कृष्णाची चित्रे छान आहेत.

मित्रहो's picture

16 Nov 2020 - 6:57 pm | मित्रहो

खूप सुंदर चित्रे आणि अप्रतिम रंजक शैलीत दिलेली माहिती मस्त आहे. अशा सुंदर विषयावर तुम्हीच उत्तम चित्राविष्कार देऊ शकत होता तो तितकाच सुंदर पद्धतीचा लेख आला.
खूप धन्यवाद

बबन ताम्बे's picture

17 Nov 2020 - 12:11 pm | बबन ताम्बे

वेगवेगळ्या शैलीतील एकाहून एक उत्तम चित्रे, सोबत काव्यमय बहारदार वर्णन , अतिशय समृद्ध अनुभव दिलायत आपण !
मुळगावकर आणि दलाल यांची चित्रे तर मला मनापासून आवडतात.
परत परत बघावासा आणि वाचावासा वाटतो इतका सुंदर लेख.
भाऊसाहेब पाटणकरांचा एक शेर आहे , " शायरी माझी ऐकताना, जो म्हणेल की आता पुरे, तो रतीचे ओठ चुंबीताही, म्हणेल की आता पुरे".
तुमचा लेख वाचून असेच म्हणावेसे वाटते.

चित्राखाली सही नसल्याने चित्र क्र. ९ बद्दल मलाही प्रश्न पडला होता. रघुवीर मुळगावकर की संबानंद मोनाप्पा पंडित, दोघांपैकी कुणाचे असावे ? आज अचानक मुळगावकरांच्या फेसबुकावर हे चित्र दिसल्याने खुलासा झाला.
माझे बालपण हे बहुतांशी बोहरा/मुस्लिमबहुल भागात गेल्याने मराठी गाणी ऐकायला मिळणे वा मराठी मासिके बघायला मिळणे हे घडले नाही. त्यामुळे या दोघांची फारच कमी चित्रे मी बघितली असतील. मात्र ५०-६० च्या दशकातील हिंदी चित्रपट संगीत, कव्वाल्या वगैरे महामूर ऐकायला मिळाले. (त्याकाळी 'बॉलिवुड' हा आचरट शब्द जन्माला आलेला नव्हता, आणि टीन-कनस्तर .. गला फाडके चिल्लाना... असले 'मुजिक' पण नव्हते)
पुढे १९६८ साली इंदौरच्या आर्टस्कुलात जाऊ लागल्यावर हे चित्रकारच काय पण अतिशय उत्कृष्ट चित्रकार असलेल्या आमच्या किरकिरे इत्यादि शिक्षकांची सुद्धा बाहेरच्या जगात हेटाळणी होत असे, कारण तो जमाना तथाकथित 'मॉडर्न आर्ट' चा होता. आम्हा नवशिक्या पोरांना त्यातले काहीच कळत नसे. पुढे हळू हळू युरोपियन चित्रकारांची चित्रे पुस्तकातून बघायला मिळू लागल्यावर मुळगावकर, पंडित, रविवर्मा वगैरे रेंब्रां, वरमीर, मोने,सेझान वगैरेंपुढे खुजे वाटू लागले. (अर्थात स्वतःला यांपैकी कुणाहीसारखे करणे जमत नव्हते) मूळच्या इंदौरच्याच असलेल्या नारायण श्रीधर बेंद्रे यांची चित्रे बघून मात्र अगदी भारून जायला व्हायचे. (त्यांना भेटायला, आपली चित्रे दाखवायला मुद्दाम मुंबईला गेलो, तो एक किस्साच आहे)
आता उतारवयात एक प्रकारची उदार सर्वसमावेशकता निर्माण झाल्याने, किंबहुना रियलिस्टिक चित्रे काढणे किती कष्टाचे असते याची स्वानुभवातून प्रचिती आल्याने या लेखात या तिघांची चित्रे समाविष्ट केली गेली. तरिही माझ्यामते पाश्चात्य पद्धतीच्या छाया-प्रकाश दर्शवणार्‍या चित्रांपेक्षा कांगडा/गुलेर वगैरे पहाडी चित्रे अतिशय उच्च दर्जाची आहेत)

मराठी_माणूस's picture

21 Nov 2020 - 1:35 pm | मराठी_माणूस

युरोपियन चित्रकारांची चित्रे पुस्तकातून बघायला मिळू लागल्यावर मुळगावकर, पंडित, रविवर्मा वगैरे रेंब्रां, वरमीर, मोने,सेझान वगैरेंपुढे खुजे वाटू लागले.

काय कारण असावे ?

अभिजीत अवलिया's picture

18 Nov 2020 - 2:43 pm | अभिजीत अवलिया

लेखमालेच्या मुख्य थीमला पुरेपूर न्याय देणारा उत्कृष्ट लेख.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Nov 2020 - 11:28 am | ज्ञानोबाचे पैजार

जबरदस्त चित्रे आणि त्यांचे तेवढेच वेधक रसग्रहण.

पण काका तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती. आतापर्यंत आठ डझन गुलाब, पाव किलो मोगरा, पाच वाटे चाफा आणि दोनचार धोतर्‍याची फुले (ऐनवेळी हीच मिळाली म्हणून) वाया गेली आहेत. तिनदा मार खाताखाता वाचलो, बायको संशयाने बघायला लागली आहे ते वेगळेच. आता फुलवाल्या ऐवजी फुलवाली कडून फुले विकत घेउन बघणार आहे.

पैजारबुवा,

आवडाबाई's picture

19 Nov 2020 - 11:55 am | आवडाबाई

"विषया"ला "चिकटून" असणारा लेख ;-)
आणि चित्रे असल्यामुळे व्हिज्युअल इफेक्ट आहेच.

टेलरमेड फॉर चित्रगुप्त साहेब.

कांगडा/गुलेर वगैरे पहाडी चित्रे अतिशय उच्च दर्जाची आहेत)

क्र १६, १७ वरील चित्रे पाहिली.
पैकी हे जास्त भावले...

1

शंकरराव कैलासवासी असूनही त्या छोट्या व टाचक्याजागेत आपले वैभव राखून आहेत! गळ्यातील सर्प तूर्तास जमिनीवरून कौतुकाने पहात आहे. चित्ता चर्म बर्म्युडा, व्याघ्राजिना वरील भक्कम मांड, गंगा मैय्याने आपली उपस्थिती आहे इतपत प्रवाह रोधला आहे. त्रिशूळाची बोचरी टोके मधे मधे लुडबूड नको म्हणून लांबच लांब होऊन दूर गेली आहेत. शशिने मंद प्रकाश योजना लागू केली आहे. नटखट पारो 'जो भी चाहे करिये' अशा पोझमध्ये असताना, मोरनी इऽऽश्श्य म्हणून रोमांचित होत आहे. या घटनेचे चित्रण मनाचा वेध घेत राहते बुवा.

@शशिकांत ओक, शंकररावांच्या चित्राचे थोडक्यात पण अफाट, कमाल रसग्रहण आपण केलेले आहे. असले काही आम्हास सुचले नसते. (चित्रांकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोण काहीसा तांत्रिक पद्धतीचा असतो असे वाटते) या लेखातील आणखीही काही चित्रांचे आपल्या खुमासदार शैलीत रसग्रहण कराल तर धमाल होईल.

शशिकांत ओक's picture

29 Nov 2020 - 11:33 pm | शशिकांत ओक

"रसग्रहण" शब्द वाचून घोंघावणाऱ्या माशांच्या समावेत घुंगरांच्या तालावर गाळीव अर्क ताज्या पाण्यात विसळलेल्या ग्लासातून उसाचा रस ग्रहण करता करता ओठांवर पांढर्‍या फेसाच्या मिशा बाळगल्याचा भास होतो.

खरच की.. कमाल विश्लेषण!!

प्राची अश्विनी's picture

21 Nov 2020 - 12:00 pm | प्राची अश्विनी

लेख आवडला. त्यावरचे प्रतिसाद सुद्धा वाचनीय आहेत.

मुक्त विहारि's picture

24 Nov 2020 - 9:44 pm | मुक्त विहारि

आवडला..

चौथा कोनाडा's picture

28 Nov 2020 - 5:20 pm | चौथा कोनाडा

हा लेख म्हणजे निष्णात व्यासंगी चित्रकाराकडून भन्नाट मेजवानी !
मेजवानी अतिशय आवडली आहे हेवेसांनलगे !
🙏
खुप सुंदर, चित्रगुप्त साहेब !

अनिंद्य's picture

28 Nov 2020 - 6:26 pm | अनिंद्य

लेख अगदी 'हुस्न-ओ-अदा से भरा पैमाना' आहे. तारांकित प्रसिद्ध चित्रे, त्यामागचे धावते विवेचन, सिनेमा, गीते, आठवणी...... आणि कळस म्हणजे वशीकरण रेसिपी :-) .... ठासून भरलाय बार !

जसराजांचं मधुराष्टक माझ्याही फार आवडीचे.

बहुत उमदा जनाब !

खिलजि's picture

12 Dec 2020 - 3:55 pm | खिलजि

काका दंडवत स्वीकारावे ... आपल्या या अदाकारीला खिलजीचा मानाचा मुजरा .... आज जमेल तेव्हढे लेख गटकावणार आहे .. बघू कस जमतंय ते ..