सिग्नल्स

Primary tabs

भृशुंडी's picture
भृशुंडी in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amसिग्नल्स

तो माणूस एका काळ्या खुर्चीत बसलेला होता. त्याच्या शरीराची वरची बाजू पूर्ण उघडी होती आणि त्यावर तऱ्हेतऱ्हेचे इलेक्ट्रोड लावले होते. एक हेल्मेटसदृश उपकरण त्याच्या डोक्यावर लावलेलं होतं आणि त्यातून त्याचे तांबारलेले डोळे दिसत होते. त्याचे हात खुर्चीच्या हातांना अडकवलेले होते -पण बांधलेले नव्हते. खुर्चीच्या मागे एक भलाथोरला वायरींचा जत्था सरपटत मागे गेला होता. त्याच जत्थ्याच्या दुसऱ्या टोकाला एक छोटासा काळसर बॉक्स होता आणि त्याला त्या असंख्य वायर्स भक्ष्याला मुंग्या लागाव्या तशा चिकटल्या होत्या. बॉक्सच्या पलीकडे एक लॅपटॉप ठेवला होता आणि त्यावर एक कमांड टर्मिनल पुढल्या आज्ञेची वाट बघत होतं.
कर्नल एका कोपऱ्यात उभं राहून हा सगळा सेटअप पाहात होते. त्यांच्या कल्पनेपेक्षा हे सगळं फारच बाळबोध होतं- त्यांना काहीतरी भव्य अपेक्षित होतं – अवाढव्य उपकरणं, मोठ्या स्क्रीन्स वगैरे. पण इथला पसारा तर एखाद्या मेकॅनिकच्या दुकानासारखा दिसत होता.
कर्नलच्या चेहेऱ्यावरचे भाव बघितल्यावर मागून आलेले डॉक्टर हलकेच म्हणाले -“तुमच्या अपेक्षेपेक्षा हे सगळं खूपच बाळबोध आहे. पण खऱ्या प्रयोगशाळा अशाच असतात कर्नल. या, आपण इतरांसोबत कंट्रोल युनिटकडे जाऊ.”
डॉक्टरांची टीम आता चाचण्या पूर्ण करून अहवाल देत होती-
“१ – Subject Ready.”
“२- System check complete.”
“३- Signal injector ready.”
“४- Quantum phase detector on.”
“५ -Test validations completed.”

डॉक्टर कर्नलकडे वळून म्हणाले – “करायची का सुरुवात?”

********
काही वर्षांपूर्वी डॉक्टर आणि कर्नलची पहिली भेट प्रयोगशाळेच्या कॅफेटेरिअमध्ये झाली होती. सकाळी १० च्या सुमारास डॉक्टर केफेटेरियामध्ये आले तेव्हा प्रयोगशाळेच्या प्रमुखांनी त्यांना दुरूनच हाक दिली –
“डॉक्टर, Will you join us for breakfast?”
हे निव्वळ न्याहारीचं आमंत्रण नाही हे कळण्याइतपत डॉक्टर दुधखुळे नव्हते. त्यांनी मानेनेच होकारदर्शक संमती दिली. सकाळच्या न्याहारीची वेळ जवळपास संपली होती. तिथले उरलेसुरले काही पदार्थ आणि एक कप फिल्टर कॉफी उचलून डॉक्टरांनी प्रमुखांच्या दिशेने पाहिलं. प्रयोगशाळेच्या प्रमुखांनी एका कोपऱ्यातली जागा राखीव ठेवली होती. डॉक्टरांनी आपला मोर्चा तिथे वळवला.
“Please join us..” डॉक्टरांनी रिकामी खुर्ची पुढे ओढली आणि ते आपला ट्रे सांभाळत बसले. त्यांची नजर आता समोर इतका वेळ नजरेआड असलेल्या तिसऱ्या गृहस्थाकडे गेली.
टिपटॉप पोशाख केलेला तो माणूस डॉक्टरांकडे बघत होता. त्याने हलक्या स्मितहास्याने प्रतिसाद दिला आणि हस्तांदोलनासाठी हात पुढे करत तो आपल्या बसक्या आवाजात म्हणाला – “हॅलो.”
डॉक्टरांनी निर्विकार चेहेऱ्याने त्याच्याकडे पाहिलं. आणखी एक जाहिरात. आणखी एक प्रयत्न. आणखी एक खाजगी कंपनी. डॉक्टरांना त्यांचं नेहेमीचं प्रेसेंटेशन आठवलं आणि ते मनातल्या मनातच त्याची उजळणी करू लागले. पण बहुतेक प्रमुखांना डॉक्टरांच्या मनातले हे विचार त्यांच्या चेहेऱ्यावर दिसले असावेत, कारण ते डॉक्टरांना म्हणाले- “He’s with the army.”.
हे ऐकून डॉक्टर नाही म्हटलं तरी संभ्रमात पडले. आर्मी? शस्त्रास्त्रांशी संबंधित काही संशोधन ते करत नव्हते. त्यांचा विषय सैन्याशी दूरवर संबंधित नव्हता, मग हे आर्मीचं मधेच काय उपटलं ? प्रयत्न करूनही त्यांना ह्या माणसाच्या भेटीचं प्रयोजन कळेना.
प्रमुखांना त्यांचा हा संभ्रम समजला असावा, ते खुर्चीवरून उठत म्हणाले – “why don’t you two discuss it? I shall see you gentlemen later this evening.”
प्रमुख निघून गेल्यानंतर एक अवघडलेली शांतता थोडा वेळ टिकून राहिली. डॉक्टरांनी कॉफीचे दोन घोट घेतले. त्यांची नजर समोरच्या माणसावरच होती. तो आता शांतपणे डॉक्टरांची कॉफी संपायची वाट बघत होता. त्याला अजिबात घाई नव्हती. सौम्य पण स्थिर नजरेने तो डॉक्टरांकडे पाहत होता. शेवटी डॉक्टरांना हे असह्य झालं आणि त्यांनी विषयाला हात घातला –
“मी काय मदत करू शकतो आपल्याला?”
“नमस्ते डॉक्टर. मगाशी प्रमुख म्हणाले तसा मी आर्मीतर्फे आलो आहे. तुम्ही मला नुसतं कर्नल म्हटलं तरी चालेल. त्यापलीकडे तुम्हाला काही सांगायची मला मुभा नाही. तुमच्या प्रयोगशाळेत चालू असलेल्या संशोधनाबद्दल मला काही माहिती हवी आहे. त्यासाठी तुम्ही सर्वात योग्य आहात असं प्रमुख म्हणाले.”
“बोला.” डॉक्टरांनी कॉफी संपवली आणि ते कर्नल काय सांगतात त्याची वाट बघू लागले.
“तुमचं संशोधन क्वांटम मानसशास्त्रात चालू आहे, बरोबर?”
“बरोबर-” कर्नलना क्वांटम मानसशास्त्र हा विषय माहिती आहे ह्याचं डॉक्टरांना आश्चर्य वाटलं.
“मला तुम्ही थोडक्यात तुमच्या संशोधनाचा विषय आणि त्याची व्याप्ती ह्याबद्दल सांगू शकाल का? म्हणजे मला माझ्या काही शंकांची उत्तरं सापडतील. आणि त्यातूनच पुढे आपण कामाबद्दल बोलू.” कर्नलनी नेमक्या शब्दात प्रश्न केला.
“चालेल, पण थोडक्यात म्हटलं तरी काही बेसिक गोष्टी आधी सांगाव्या लागतील.” डॉक्टरांनी सवयीने घसा खाकरला. “क्वांटम हा शब्द बरेचदा वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. आमच्या क्षेत्रात त्याचा अर्थ आहे अणूच्या आतल्या घडामोडी. अणूच्या आत इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स असतात हे तुम्हाला माहितीच असेल. पण निव्वळ तितकंच नाही, त्यांच्याही आता क्वार्क्सस असतात. त्यांचेही पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या मूलकणांच्या स्थितीचा अभ्यास करणं हे क्वांटम वैज्ञानिकांचं काम आहे.”
“पण ह्यात मानसशास्त्र कसं आलं? मानवी मेंदू हा न्यूरॉन्सपासून बनलेला असतो- त्यांच्यामधले इलेक्ट्रिक सिग्नल्स म्हणजे आपले विचार. मी हे सगळं अतिशय ढोबळ- ज्याला 10000 ft view म्हणतो तसं सांगतो आहे, तेव्हा तपशीलात आपण नंतर जाऊच. मानसशास्त्रात आपण लोकांच्या भावना, त्यांचे विचार आणि एकूणच व्यक्तिमत्त्व ह्याचा विचार करत असतो. क्वांटम अभ्यासाचे नियम –“
“थांबा डॉक्टर”, कर्नलनी डॉक्टरांचा प्रवाह तोडला. “मला हे सगळं समजत नाही. मी विषयाकडे वळतो, त्या अनुषंगाने तुम्ही मला जमेल तशी माहिती द्या. ते जास्त सोपं जाईल.”
“बरं.”
“तुम्ही प्रेम ह्या विषयावर विशेष संशोधन करत आहात, हे खरं आहे का?” कर्नलनी पुन्हा थेट मुद्द्याला हात घातला.
“हो, पण हे तुम्हाला कसं कळलं? ह्याबद्दल कुणालाच माहिती नाही. हा विषय टॉप सिक्रेट आहे.” डॉक्टर उत्तेजित होत म्हणाले.
“डॉक्टर, मी जिथे काम करतो तिथे टॉप सिक्रेट फार कमी गोष्टी असतात” कर्नल संपूर्ण गांभीर्याने म्हणाले. ” तेव्हा काळजी करू नका, तुमचं संशोधन अजूनही लौकिकार्थाने गुप्तच आहे. पण मला सांगा, प्रेम ही तर निव्वळ भावना आहे. त्याचा तुमच्या विषयाशी काय संबंध?”
डॉक्टर आता थोडे शांत झाले होते, त्यांनी काही वेळ मौन बाळगून उत्तर द्यायला सुरुवात केली.
“प्रेम हे एक फार मोठं गूढ आहे कर्नल. इतर मानवी भावना आणि प्रेम -ह्यात फार फार अंतर आहे. आपल्याला राग येतो, वाईट वाटतं, त्रास होतो, चिडचिड होते- हे सगळं काही आपल्याशी वैयक्तिक असतं. त्यात बराचसा स्व असतो. इतर लोकांचा किंवा घटकांचा त्यावर प्रभाव असतो.
पण प्रेम – ही भावना बरीचशी दुसऱ्या व्यक्तीशी संलग्न आहे. त्यात स्व कमी असतो आणि एक निराळीं व्यक्ती ह्या भावनेच्या केंद्रस्थानी असते. त्यामुळे प्रेम ह्या भावनेचं मूळ हे एका माणसाच्या मेंदूत कधीही असू शकत नाही. त्यासाठी आणखी एक व्यक्ती गरजेची आहे.”
“आम्ही प्रेमात पडलेल्या निरनिराळ्या व्यक्तींचा अभ्यास केला. नवजात बाळ आणि त्याची आई, नवविवाहित तरुण तरुणी, समलिंगी जोडपी, मध्यमवयीन पती-पत्नी, अफेअर करणारी जोडपी, पाळीव प्राणी आणि त्यांचे मालक, टीनएज पोरं-पोरी, घनिष्ट मित्र आणि मैत्रिणी, जुळी भावंडं, सख्खी भावंडं आणि अशी अनेक प्रकारची नाती आम्ही अभ्यासली. त्यातून आम्ही एक गणिती मॉडेल तयार केलंय.”
“इंटरेस्टींग! मग तुमचे निष्कर्ष काय?”
“तुम्हाला quantum entanglement माहिती आहे का कर्नल?” डॉक्टरांनी पृच्छा केली. कर्नलनी मानेनेच नाही म्हटल्यावर डॉक्टरांनी स्पष्टीकरण दिलं -” दोन मूलकण हे संपूर्णपणे एकमेकांवर अवलंबून असतात. एका मूलकणाची दिशा दुसऱ्यावर अवलंबून असते. दुसऱ्या मूलकणाची गती ही पाहिल्याशी संबंधित असते. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हे मूलकण एकमेकांपासून लाखो प्रकाशवर्ष दूर गेले तरीही त्यांचं हे अवलंबित्व कायम राहतं. म्हणजे एक मूलकण समजा उजवीकडे फिरला तर दुसरा आपोआप डावीकडे फिरतो.”
” आमच्या मते दोन माणसातलं प्रेम हे एक प्रकारचं quantum entanglement आहे. ज्यात एका माणसाची स्थिती ही संपूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून असते.”
कर्नल थोड्या अविश्वासाने डॉक्टरांकडे बघू लागले. डॉक्टरांना ह्याची सवय असावी, त्यांनी हलकेच हसून मान हलवली. “मी काहीतरी अगडबंब थाप मारतोय असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे, पण आमचे गणिती निष्कर्ष हे ह्याची पुष्टी देतात.”
“पण प्रेमाचे असंख्य प्रकार असतात. छोट्या बाळावर आई करते तेही प्रेम आणि एखादा माणूस आपल्या बायकोवर करतो तेही प्रेम- मग ह्या सगळ्या छटा तुम्ही गणिताने कशा अभ्यासणार? “
“ही सगळी प्रेमाची दृश्य अंग आहेत कर्नल, त्यातली मूळ निखळ भावना प्रेमच आहे. असं बघा – आपण जे जग बघतो ते आपल्याला दृश्य प्रकाशाच्या स्वरूपात दिसतं. काही प्राण्यांना ते केवळ काळं -पांढरं दिसतं. मधमाशांना इन्फ्रारेड किरणंही दिसतात. काही प्राण्यांना दृश्य प्रकाश दिसत नाही – पण मग जगाचा मूळ रंग कुठला?
ह्या प्रश्नाचं काय उत्तर देणार तुम्ही? आता समजा मंगळावरून कुणी माणूस आला तर तो म्हणेल की त्याला सात नाही तर सातशे रंग दिसतात. मग तो खोटा आहे का? आणि आपण खरे आहोत का? ह्या सगळ्या आपल्या मर्यादा आहेत. जग मुळात कसं आहे ते आपण फक्त गणिताच्या रूपाने “बघू” शकतो- आणि ते आपल्याला, मंगळावरच्या माणसाला, मधमाशीला किंवा कुणालाही -सारखंच दिसेल.
प्रेम- ह्या भावनेचंही तसंच आहे.
दोन व्यक्तींमधलं प्रेम हे निरनिराळ्या स्वरूपात दृश्य असतं. शिवाय माणसाचे हॉर्मोन्सही त्यात थोडीफार भेसळ करतातच. वयाच्या विशीत प्रेमाला शारिरीक ओढ लागते. वय वाढतं तशी प्रेमाची रूपं बदलतात.”
कर्नल आता विचारात पडले . -” पण मग डॉक्टर, तुम्ही म्हणालात तसं जगाचे नियम गणिताने समजून घेता येतात.
तशी प्रेमाची गणिती व्याख्या कशी करणार? कारण ती तर एक भावना आहे. “
एखाद्या विद्यार्थ्याने उत्तम प्रश्न विचारल्यागत डॉक्टरांच्या चेहेऱ्यावर समाधानाची छटा उमटली.
“काय नेमका प्रश्न विचारलात कर्नल! प्रेमाची गणिती व्याख्या – उत्तम!. प्रेमाच्या वेगवेगळ्या आविष्काराच्या मागे जे निखळ, निराकार प्रेम असतं, त्याचं गणित मांडता येतं. त्याला आपण सर्वोच्च प्रेम म्हणू – जे आपल्याला शब्दात पकडता येणार नाही. सर्वोच्च प्रेमाला काही बाह्य आविष्कारच नाही, ते पूर्णपणे मानसिक असतं- आणि अशा प्रेमाचं रूप तुम्हाला फक्त गणिती मॉडेलमध्येच अनुभवता येतं. फार प्रयत्नपूर्वक आम्ही सर्वोच्च दर्जाच्या प्रेमाचं गणिती मॉडेल विकसित केलं आहे.”
“पण सर्वोच्च प्रेम म्हणजे काय? मी माझ्या देशासाठी जीव देऊ शकतो, माझ्या मुलांकरता वाटेल ते करू शकतो – ह्यापलीकडे आणखी काय सर्वोच्च आहे?” कर्नलनी प्रश्न केला.
“त्याचं उत्तर मी नाही देऊ शकत. -१ चं वर्गमूळ कसं असू शकतं? विश्वाचा अंत कुठे होतो? सर्वात छोटा मूलकण कुठला? चौथी मिती नक्की कशी असते? ह्या आणि अशा प्रश्नांची उत्तरं आपण माणसं अनुभवू शकत नाही. त्यासाठी एकाच गोष्टीची मदत होते- गणित. आपण गणितातर्फे ह्या प्रश्नांची संभावित उत्तरं बघू शकतो. पण त्याचा लौकिकार्थाने अर्थ नाही लावू शकत.”
कर्नलच्या चेहेऱ्यावर थोडी निराशा डोकावत असलेली पाहून डॉक्टर लगेच म्हणाले – “पण इथेच आमचं संशोधन कामाला येतं. मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही प्रेमाचं गणिती मॉडेल विकसित केलं आहे. त्यावरून निश्चित केलेल्या प्रारूपाचे सिग्नल्स आम्ही मेंदूला देऊ शकतो. हे सिग्नल्स मेंदूमध्ये प्रेमात पडल्याची भावना निर्माण करू शकतात. अर्थात ह्यामुळे माणूस एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडत नाही, तर त्याला अव्यक्त अशा सर्वोच्च प्रेमाची अनुभूती घेता येते. त्या अनुभूतीला आपण पुन्हा गणिताच्या रूपाने बघू शकतो.”
“पण – डॉक्टर, कुठलाही अनुभव घेताना आपल्याला त्याचं थोडंफार वर्णन करता येतंच – मग हे प्रेम असं काय खास आहे ?”
“काही अनुभवांचं नीट वर्णन नाही करता येत कर्नल” डॉक्टर मिश्कीलपणे म्हणाले -” समागमाच्या उत्कट क्षणाचं – ज्याला इंग्रजीत Orgasm म्हणतात – त्याचं नेमकं कसं वर्णन करणार? आणि ती तर शारीरिक क्रिया आहे. मग संपूर्ण मानसिक सिग्नल्सचं वर्णन करून सांगणं फार कठीण आहे.”
“तुम्ही हे सिग्नल्स एखाद्या माणसाच्या मेंदूला देऊन पाहिले आहेत का? “
“अनेकदा. आम्ही ह्याचा थेरपीसाठी वापर करायचा विचार करतो आहोत. अनेक रुग्ण ह्या सिग्नल्समुळे शांत झाले आहेत, आणि त्यांच्या मानसिक स्थितीत खूप फरक पडला आहे.
कर्नलनी उठायची तयारी केली आणि ते म्हणाले – “डॉक्टर, मला ह्या प्रकाराचं प्रात्यक्षिक बघायला आवडेल. मी तुम्हाला फोन करीन आणि पुढल्या चाचणीबद्दल सांगेन. पण माझी अट एकच आहे – ह्या प्रात्यक्षिकासाठी निवडलेला स्वयंसेवक मी घेऊन येईन. थँक यू – तुमचा पुष्कळ वेळ घेतला .”

आणि डॉक्टरांना काही बोलण्याची संधी न देता कर्नल कॅफेटेरियातून निघूनही गेले.

********

डॉक्टर कर्नलकडे वळून म्हणाले – “करायची का सुरुवात?”
कर्नलनी मानेनेच दुजोरा दिला.
“आपण आधी सगळ्या चाचण्या केल्या आहेत- तुम्ही निवडलेला सब्जेक्ट शरीराने धडधाकट, कुठलाही मानसिक आजार नसलेला आहे. वयाच्या विशीत असल्याने त्याला संभाव्य धोकाही कमी आहे. तेव्हा त्याच्या मेंदूने सिग्नल्सला दिलेला रिस्पॉन्स आपल्याला साधारणपणे अंदाजाने सांगता येईल.
तुम्हाला हा आलेख दिसतोय का? ” डॉक्टर एका स्क्रीनकडे बोट दाखवत म्हणाले- ” ह्यावर आपण मेंदूची प्रतिक्रिया बघू शकतो.”
कर्नलनी स्क्रीनकडे पाहिलं तिथे वेड्यावाकड्या रेघा आणि काही आकडे दिसत होते.
“तुम्हाला सवय नसल्याने इथे काही खास दिसणार नाही. पण आम्हाला मॅट्रिक्स बघायची सवय आहे- त्यामुळे आम्ही हे आलेख वाचू शकतो.”
“ओके डॉक्टर, Lets proceed.”
डॉक्टरांनी आता कमांड टर्मिनलवर काहीतरी टाईप केलं आणि माउसच्या क्लिकेनंतर ते समोरच्या खुर्चीकडे पाहू लागले.
स्क्रीनवर अक्षरं उमटली – “Signal strength : 10%”
खुर्चीवरचा माणूस आता सतर्क झाला. त्याचे तांबारलेले डोळे उघडून तो ह्या सगळ्यांकडे पाहात होता, त्याच्या चेहेऱ्यावरचा निर्विकार तरीही उग्र भाव तसाच होता. काही सेकंद गेले.
तरीही खुर्चीवरच्या माणसाच्या चेहेऱ्यावर काहीही भाव उमटले नाहीत.
“सिग्नल्स वाढवून पाहू.” डॉक्टरांनी आणखी काही बटणं दाबली आणि स्क्रीनवर अक्षरं उमटली –
Signal strength : 20%
कर्नल आणि डॉक्टर उत्सुकतेने पाहू लागले.
दहा सेकंदास खुर्चीवरचा माणूस चमकला आणि त्याने आपल्या पापण्यांची जलद उघडझाप केली. त्याने डोळे बारीक केले आणि त्याचा चेहेरा जरा निवळला.
आता स्क्रीनवरच्या रेषा पुष्कळच वेगळ्या दिसायला लागल्या होत्या.
“त्याला आता सिग्नल्सचा थोडा परिणाम जाणवतो आहे. त्याचा मेंदू आता अपेक्षित प्रतिक्रिया देतो आहे”
कर्नल ह्यावर काहीच म्हणाले नाहीत, त्यांनी एकाग्रतेने खुर्चीकडे लक्ष केंद्रित केलं.
खुर्चीवरच्या माणसाच्या नजरेत आता पुष्कळच मवाळ भाव उमटले होते. त्याचा चेहेराही शांत झाला होता आणि त्यावर एक हलकी स्मिताची लकेर उमटली होती.
काही सेकंद असेच गेले आणि स्क्रीनवर पुन्हा अक्षरं उमटली –
Signal strength : 30%
खुर्चीवरचा माणूस आता उत्तेजित झाला होता. त्याच्या कानांच्या पाळ्या लालबुंद झाल्या, आणि त्याच्या तोंडातून पहिल्यांदाच शब्द उमटले – “आअह्….”
हात अडकवलेले असूनही त्याने एक निष्फळ हालचाल केली आणि आपल्या पँटची झिप उघडण्याचा प्रयत्न केला.
कर्नलनी डॉक्टरांकडे चमकून पाहिलं- डॉक्टरांना ह्याची कल्पना असावी, त्यानी कर्नलना दिलासा दिला -“कर्नल, हे अतिशय नॉर्मल आहे- इट इज ओके.”
खुर्चीवरचा माणूस आता आणखीच उत्तेजित झाला होता. त्याच्या पॅन्टमधून त्याचं लिंग ताठ झालेलं दिसत होतं.
वयाच्या २०तल्या पुरुषी मेंदूची स्वाभाविक प्रतिक्रिया डॉक्टर शांतपणे तर कर्नल किळसवाण्या नजरेने पाहात होते.
आलेखात आता रेषांची गती वाढली होती.

स्क्रीनवरची अक्षरं आता Signal strength : 40% दाखवत होती.
खुर्चीवरच्या माणसाला आता आवेग असह्य झाला आणि त्याने हुंकारदर्शक आवाज काढून आपल्या भावनांना वाट दिली. त्याचं वीर्यस्खलन झालं होतं . तारुण्यातल्या हॉर्मोन्सनी प्रेमाची पावती दिली होती, आणि प्रयोगाचा पहिला भाग पार पडला होता.
प्रयोगाला सुरुवात होऊन १० मिनिटं झाली होती.
“इथवरची प्रतिक्रिया शारीरिक असतेच कर्नल. कुठल्याही मेंदूला अचानक निखळ प्रेमाचे सिग्नल्स देता येत नाहीत, त्यासाठी आधी शारीरिक पातळीवरूनच सुरुवात करावी लागते. सिग्नलसचा पहिला टप्पा हाच असतो – त्यातून मेंदूला प्रेम ह्या भावनेचे अतिशय सरधोपट – खरं तर भेसळयुक्त सिग्नल्स दिले जातात. आता आपण पुढल्या टप्प्याकडे जाऊ – इथून पुढला प्रवास हा जास्त महत्त्वाचा असणार आहे कारण त्यात सब्जेक्टच्या मेंदूला आपण निखळ-अव्यक्त-आणि अतिशय तरल असे गुंतागुंतीचे प्रेमाचे सिग्नल्स देणार आहोत.”
असं म्हणून डॉक्टरानी काही बटन्स दाबली आणि स्क्रीनचा रंग आता काळसर निळा झाला.

Signal strength : 50%

कर्नलनी समोर पाहिलं.
खुर्चीवरचा माणूस काहीशा समाधानाने पहुडला होता – त्याच्या चेहेऱ्यावर आता एक समाधानाचं स्मित उमटलं होतं.
“जगी सर्व सुखी असा कोण आहे?” ह्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या पुष्कळ जवळ गेलं असतं.
त्याची नजर कुठेतरी दूर लागली होती- पार भिंतीपलीकडे.
आलेखातल्या रेषा आता एक पॅटर्न दाखवत होत्या. त्या कधी एकत्र येत तर कधी दूर जात – पण बहुतांश वेळा त्यांच्या हालचालीतून एक लय तयार होताना दिसत होती.
“आता तो निव्वळ लैंगिक सुख, शारिरीक जवळीक – ह्याच्या पलीकडे बघतोय कर्नल. त्याला कुणाबद्दल तरी अपार प्रेम वाटतंय- त्याच्या मेंदूला अशी व्यक्ती जवळ असल्याचा अनुभव येतो आहे.”
आपण ७५% ला पोचेपर्यंतचा त्याचा प्रवास बघणार आहोत- ह्या आलेखावर नजर ठेवा.”
डॉक्टरांनी पुढली काही मिनिटं खुर्चीवरच्या माणसाचं निरीक्षण केलं, काही नोंदी केल्या आणि मग त्यांनी पुन्हा स्क्रीनला आदेश दिला असावा, कारण आकडे उमटले –

Signal strength : 60%

खुर्चीवरच्या माणसाच्या डोळ्यात आता एक हलकासा अश्रू आलेला कर्नलना दिसला. त्यांनी बारकाईने पाहिलं.
खुर्चीवरच्या माणसाच्या चेहेऱ्यावर स्मित तसंच होतं पण त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते. त्याला आता आसपासचं काहीच जाणवत नसावं -कारण उघड्या डोळ्यांनी अश्रुपात करता करता तो भिंतीपलीकडे पाहात होता- जणू त्याला कुणीतरी बोलावत होतं.
डॉक्टरांनी आलेखाकडे बोट दाखवलं – “कर्नल, ह्या पातळीचे सिग्नलस त्याच्या मेंदूने बहुतेक आधी कधीही अनुभवले नसावेत. त्याचा मेंदू निरपेक्ष प्रेमात आकंठ बुडालेल्या व्यक्तीसारखी प्रतिक्रिया देतो आहे- ह्या दर्जाचं प्रेम खऱ्या आयुष्यात फारच कमी लोकांना अनुभवता येतं. हा त्याच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा प्रसंग म्हटलं तर त्यात काहीच अतिशयोक्ती असणार नाही.”
आलेखावरच्या रेषा आता अंतर्वक्र, बहिर्वक्र गणिती पॅटर्न्स दाखवत होत्या. त्याकडे फार वेळ टक लावून पाहिलं तर एखाद्या गरब्याला आल्याचा भास होत होता.

Signal strength : 70%

स्क्रीनवर जेव्हा हे आकडे उमटले, तेव्हा खुर्चीवरचा माणूस अक्षरशः ओक्सबोक्शी रडायला लागला. त्याच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं, घळाघळा अश्रू वाहात होते आणि चेहेऱ्यावर कृतकृत्यतेचे भाव दिसत होते. परमेश्वराचं दर्शन झाल्यागत त्याने हात जोडले आणि तो काहीतरी हळू आवाजात पुटपुटू लागला.
कर्नल आता खांदे पुढे झुकवून पाहात होते- त्यांनी नकळत खिशातून सिगारेट बाहेर काढली आणि ते आपल्या बोटांनी सिगारेटशी चा:ळा करू लागले.
आलेखात आता mandelbrot set दिसत होते. कितीही लहान किंवा मोठं केलं तरीही न बदलणारा पण कधीच न संपणारा पॅटर्न.
डॉक्टरांनी स्क्रीनला पुढला आदेश दिला आणि कर्नलना ते म्हणाले – “ही पुढली स्टेज झाली की आपल्याला थांबावं लागेल. कुणाच्याही मेंदूला ७५% पेक्षा जास्त पातळीचे सिग्नल्स झेपू शकत नाहीत कर्नल. पण तुम्हाला साधारण अंदाज आलाच असेल.”
खुर्चीवरून आता हमसाहमशी रडल्याचे आवाज येत होते आणि त्यासोबत एकच शब्द ऐकू येत होता –
“सुंदर! सुंदर! सुंदर!”
प्रयोग थांबवायच्या तयारीने डॉक्टर खुर्चीकडे निघाले पण अनपेक्षितरित्या कर्नलनी त्यांचा हात धरला आणि डॉक्टरकडे रोखून पाहात ते – म्हणाले “डॉक्टर, आपण आज १००% पर्यंत जाणार आहोत. ह्या प्रयोगाची पूर्वसूचना मी प्रमुखांना दिली आहे, आणि त्यांची मान्यताही मिळवली आहे. तेव्हा मी सांगेन तोपर्यंत प्रयोग थांबवू नका.”

डॉक्टरांना क्षणभर काय बोलावं ते सुचलंच नाही. त्यांने निषेध करण्याचा एक प्रयत्न केला, पण आतून ते स्वतः जाणून होते की कर्नल उगाच बोलणाऱ्यातले नाहीत- आपला शब्द खरा करण्यासाठी हा माणूस काहीही करू शकतो. त्यांनी थिजलेल्या नजरेने कर्नलकडे पाहिलं आणि ते एवढंच म्हणू शकले –
“कर्नल, ठीक आहे. पण मी तुम्हाला आताच ताकीद देतो – ह्यापुढे जाण्यात धोका आहे. सब्जेक्टचा मेंदू हे सिग्नल्स पचवू शकणार नाही.”
ह्याच वेळी डॉक्टरांना एक जणीव झाली -की आतून त्यांना स्वतःलाही पुढे जायचं होतं! माणसाच्या मेंदूला १००% निखळ, अव्यक्त, संपूर्ण अशा प्रेमाची अनुभूती दिल्यावर काय होतं- ह्याचं त्यांना स्वतःलाही कुतूहल होतं!
डॉक्टरांना स्वतःची लाज वाटली, पण त्यांनी तरीही आपल्या बोटांनी स्क्रीनला आदेश दिले.

Signal strength : 80%

खुर्चीवरचा माणूस अचानक रडायचा थांबला. त्याच्या डोळ्यांत आश्चर्य उमटलं – जणू त्याने पाण्यात हत्ती पाहिला होता किंवा देवमाशाला जमिनीवरून चालताना पाहिलं होतं. त्याचे डोळे विस्फारले आणि आणि तोंडाचा आ वासून तो आता समोर पाहू लागला. त्याच्या गालावर अजूनही मागासचे अश्रू ओघळत होते, पण आता ते त्याच्या चेहेऱ्यावर चिकटवल्यासारखे विचित्र दिसत होते. त्याने तोंडातून काहीतरी आवाज काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याला शब्दच फुटेना.
“हे काय आहे डॉक्टर?” कर्नलचा प्रश्न त्या शांततेला छेदत गेला.
“मला नक्की नाही सांगता येणार. त्याच्या मेंदूला हे सिग्नल्स प्रेमाचे वाटताहेत, पण त्यांना कसं समजून घ्यायचं ते त्याच्या मेंदूला कळत नाहीये. अतिशय शुभ्र प्रकाशात आपले डोळे दिपल्यावर आपण स्तिमित होतो- तसाच काही प्रकार झालाय. कर्नल, आता पुरे करूया- आधीच आपण मर्यादेपलीकडे गेलो आहोत.” डॉक्टरांनी पुन्हा विनवणी केली.
खुर्चीवरचा माणूस आता मूकपटातल्या कलाकाराप्रमाणे काहीतरी बोलत होता, पण त्याच्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता.
आलेखातले सुंदर mandelbrot set दिसेनासे होऊन तिथे आता एककेंद्रित वर्तुळं येत होती. कधी त्यांचे लंबगोल होत होते तर कधी त्यांची इंग्रजी 8 मध्ये रचना होत होती.

“Lets go to 90%” कर्नल समोरून नजर न हटवता म्हणाले.
डॉक्टरांनी यांत्रिक हालचाल केली.

Signal strength : 90%

पुढल्याच क्षणी एका कर्कश्श किंकाळीने खोली भरून गेली. खुर्चीवरचा माणूस आता भयानक आवाजात किंचाळत होता. त्या अनपेक्षित प्रतिक्रियेने डॉक्टर हादरले. कर्नल अजूनही निर्विकारपणे समोरच्या किंचाळ्या ऐकत होते.
खुर्चीतला माणूस आता गुरासारखा ओरडत होता. त्याच्या चेहेऱ्यावरचे स्नायू ताणले होते, नजरेत भीती आणि किळस ह्यांचं मिश्रण होतं – जे एवढा वेळ दिसलेल्या समाधान आणि आनंदाशी अगदीच विपरीत होतं.
एकही सेकंद न थांबता तो किंचाळत होता.
डॉक्टरांना आणि कर्नलना त्याच्या किंचाळीतही एक शब्द असल्याचं फार नंतर जाणवलं. तो शब्द होता –
“थांबा.”
आलेखात आता रेषांचा किंवा भूमितीय आकारांचा काहीच मागमूस लागत नव्हता – पण काहीतरी पुन्हा पुन्हा येत जात होतं . त्याचा आकार निश्चित बिलकुलच नव्हता.
डॉक्टरांनी कर्नलकडे वळून पाहिलं आणि ते म्लानपणे म्हणाले – “अजूनही विचार करा कर्नल. हे एवढं होऊनही तुम्ही हा प्रयोग पुढे नेणार आहात का?”
कर्नलनी काल्पनिक धुराच्या पडद्याआड डॉक्टरांना पाहिलं न पाहिलं आणि ते स्वतःशीच पुटपुटले – “द शो मस्ट गो ऑन डॉक्टर. lets go to 100%”
” ते शक्य नाही- सिग्नल्स १००% झाले तर सब्जेक्ट जगू शकणार नाही. मी फार तर ९५% पर्यंत जाऊ शकतो कर्नल- सॉरी.” डॉक्टरांनी निकाराने बजावलं.
“ओके. ९५% मग”
डॉक्टरांनी एक बटन दाबलं – स्क्रीनचा रंग लाल झाला, आणि त्यावर आकडे उमटले-
Signal strength : 95% [ Overload]
स्क्रीनवर हे आकडे येताच जादूची कांडी फिरवल्यासारखा परिणाम झाला आणि शांतता पसरली.
खुर्चीवरचा माणूस मान खाली घालून बसून होता. त्याने एकदाही मान वर केली नाही. त्याच्या शरीराची काहीच हालचाल झाली नाही. त्याने स्वतःला कोंडून घेतलं होतं. गेल्या काही सेकंदात त्याने जे काही अनुभवलं ते आजवर कुठल्याही माणसाने अनुभवलं नव्हतं.
डॉक्टरांनी आलेखाकडे पाहिलं.
तिथे फक्त एक टिम्ब दिसत होतं.
डॉक्टरांनी प्रयोग थांबवला आणि ते तीरासारखे खुर्चीकडे धावले.
********

“डॉक्टर- तुम्ही मला सांगू शकता की इथे नक्की काय घडलं?” कर्नलचा प्रश्न आपल्याला आहे हे कळायला डॉक्टरांना थोडा वेळ लागला.
त्यांनी बराच वेळ काहीच उत्तर दिलं नाही. ते म्लानपणे बसून राहिले.
कर्नलनी पुन्हा एकदा प्रश्न केला आणि हयावेळी त्यांनी डॉक्टरांना खांद्यावर थोपटलं.
डॉक्टर भूत बघितल्यासारखे दचकले. घसा खाकरून त्यांनी बोलायला सुरुवात केली-
“कर्नल, मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे सिग्नल्स ७५% पेक्षा जास्त प्रमाणात मेंदूपर्यंत पोचले तर पुढे काय होईल त्याचं अचूक गणिती मॉडेल आमच्याकडे नाही. माणसाचा मेंदू अशावेळी काय करील हे सांगणं कठीण आहे. पण आपण आलेख पाहिले तर तुम्हाला अंदाज येईल की सिग्नल ४०% ते ७०% तीव्रतेचे होते, तेव्हा आलेखांमध्ये एक लय होती. भूमितीय रचना होत्या- ज्याची परिणीती शेवटी ७०% ला mandelbrot setमध्ये झाली. हा एक अनोखा भौमितीय आकार आहे. निसर्गात आढळणाऱ्या सर्वात गुंतागुंतीच्या आणि तरीही सुंदर अशा रचनांमध्ये ह्याची गणना होते.”
“पण ह्याचा अर्थ काय?”
“ह्याचा अर्थ असा की सिग्नल्सचं प्रमाण ७०%च्या आसपास असतं तेव्हा माणसाच्या मेंदूला प्रेमाची सर्वात सुंदर अनुभूती येते. आपल्या दृष्टीने जे संपूर्ण प्रेम, निरपेक्ष प्रेम वगैरे वगैरे म्हणतो ते हेच. “

“पण मग त्यापुढे? तुम्ही सिग्नलस १००% तीव्रतेने दिले तर ते प्रेम तितकं उत्कट का होत नाही? पुढल्या सिग्नल्सचे परिणाम हे असे का होतात?”
“कारण मानवी मेंदूला सर्वच गोष्टी समजू शकत नाहीत. एका मर्यादेपलीकडे प्रेमाची अनुभूती आली तर त्यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हे आधी मेंदूला कळत नाही. त्यामुळे सुरुवातीला तो गोंधळतो- म्हणूनच मेंदूत आश्चर्याची भावना निर्माण होते.”
“आणि पुढे?”
“पुढे त्याहीपेक्षा वाईट काहीतरी घडतं कर्नल. मेंदूला जर ह्यापलीकडे प्रेमाची अनुभूती दिली तर त्याला ते दुःखदायक – प्रसंगी वेदनादायक होतं. मी मगाशी म्हणालो तसा डोळ्यावर प्रखर सूर्यप्रकाश पडला तर आपण आपसूक डोळे बंद करतो. पण जर डोळे बंद करता आले नाहीत तर? तर प्रकाश – जो एरवी आपण दृष्टीशी जोडतो तो आपल्याला अंधत्त्व देतो. अतिशय जास्त प्रेम हे वेदनायायी आहे. आणि आपण तर त्यातले शारिरीक अंश काढून टाकून प्रेमाचे सिग्नल्स मेंदूला दिलेत- ज्यामुळे ती अनुभूती कितीतरी जास्त तीव्र होते.”
“म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की जेव्हा तुम्ही ९०% तीव्रतेचे सिग्नल्स दिलेत – तेव्हा त्याला वेदना झाल्या?”
“निव्वळ वेदना नाही कर्नल, कल्पना करता येणार नाही इतक्या तीव्र वेदना. एरवी तुम्ही एखाद्याला मारझोड करता तेव्हा शरीर हा एक अडसर असतो. पण इथे आपण मेंदूलाच वेदना दिल्या आहेत.”
“आणि शेवटी-? जेव्हा सब्जेक्ट शांत झाला तेव्हा?”
“तीच सर्वात भयानक अवस्था होती. शून्याने भागल्यावर काय उत्तर येतं? त्याप्रमाणेच मेंदूला इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रेमाची अनुभूती दिल्यावर मेंदूला काय वाटतं? माझ्या मते ह्या स्टेजला मेंदू स्वतःला एका कोशात गुंतवून घेतो. आणि “प्रेम” ह्या भावनेला ह्यापुढे कधीही स्वतःपर्यंत पोचू देत नाही. मेंदूला आलेल्या अनुभवांवरून प्रेम त्याला वेदनादायी वाटतं. सब्जेक्ट आता कधीही प्रेम अनुभवू शकणार नाही.”
ह्यावर कर्नलच्या चेहेऱ्यावर आलेलं हलकं स्मित डॉक्टरांच्या नजरेतून सुटलं नाही. – “तुम्ही.. हीच अपॆक्षा ठेवून आला होता?”
मान डोलावत कर्नल म्हणाले -“हो डॉक्टर. म्हणूनच तुमच्या संशोधनात आम्हाला रस होता. आमच्या अपेक्षेप्रमाणेच सिग्नल्स एका मर्यादेपलीकडे मानवी मेंदूला झेपत नाहीत. अर्थात हे तुम्हालाही ठाऊक होतं, पण तुम्ही संशोधक असल्याने तुम्ही माणसांवर अशा चाचण्या करणार नाही हेही मला माहिती होतं.”
“सैन्याची गोष्ट वेगळी असते. आम्हाला काही दशकांनंतरचा विचार करावा लागतो. कल्पना करा डॉक्टर- गुन्हेगारांना जर सिग्नल्स वापरून शिक्षा देता आली, तर मग फाशी, बंदूक, इंजेक्शन असल्या गोष्टींची काय गरज? आणि शिक्षा कसली? तर एकाच वेळी प्रेम आणि वेदना ह्यांची. ह्यापेक्षा उत्तम काय असू शकतं ?
It is a perfect weapon!”

डॉक्टरांच्या चेहेऱ्यावरची घृणा कर्नलना अपेक्षित असली तरीही त्यांचा स्वर चढा होता – “प्लीज. आम्ही करतो ते काहीतरी भयानक आहे अशी स्वतःची गॉड समजूत करून घेऊ नका. मी जेव्हा प्रयोग चालू ठेवूया अशी सूचना केली आणि सर्व जबाबदारी घेतली, तेव्हा एका संशोधकाच्या कुतूहलाने तुम्हीच पुढले टप्पे पार पाडले आहेत.”

कर्नलचे शब्द ऐकून डॉक्टरांनी जेव्हा नजर दूरवर हटवली तेव्हा त्यांना समोरची रिकामी खुर्ची बघवेना. पण आता फार उशीर झाला होता.

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 7:39 pm | टर्मीनेटर

@भृशुंडी

'सिग्नल्स'

ही तुमची कथा खूप आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

पहिल्यांदा काही कळलेच नाही..

मस्त आहे कथा!! कुठून कुठून असल्या कल्पना सुचतात देव जाणे!!

स्मिताके's picture

21 Nov 2020 - 12:05 am | स्मिताके

+१

अतिशय भन्नाट लेखन आहे ह्या कथेचे.

क्वांटम मेकॅनिक्स हे अफाट क्षेत्र आहे. त्यातल्या संकलप्नांवर आधारित लिखाण मराठीत करायाचे म्हणजे सोपे काम नाही. क्वांटम एन्टॅंगल्डमेंट ह्या संकल्पनेचा वापर करून केलेली प्रेमाची व्याख्या हा भन्नाट प्रयोग आहे.

एका जबरदस्त सायन्स फिक्शन कथेबद्दल अभिनंदन आणि आभार!

-(क्वांटा असलेला) सोकाजी

चौथा कोनाडा's picture

19 Nov 2020 - 1:30 pm | चौथा कोनाडा

काय जबरदस्त रंगवलीय कथा !
वाचता वाचता आमचेही परसेन्टेज वाढत होते !
एकंदरीत

__ज__ब__र__द__स्त__

Olectra1234

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Nov 2020 - 3:35 pm | ज्ञानोबाचे पैजार

वाचताना आमचा मेंदुपण १००%ची पातळी गाठतो आहे का इतक्या मुंग्या आल्या होत्या डोक्याला, तीन वेळा वाचली तेव्हा समजली, असला विचार कोणी करत असेल अशी कल्पना देखिल केली नह्वती,
बेहद्द आवडली गोष्ट,
पैजारबुवा,

श्वेता२४'s picture

19 Nov 2020 - 4:50 pm | श्वेता२४

ही कथा या दिवाळी अंकातील मास्टरपीस आहे! प्रचंड आवडली!

बबन ताम्बे's picture

19 Nov 2020 - 5:37 pm | बबन ताम्बे

भन्नाट सायन्स फिक्शन. जबरदस्त रंगवलीय कथा.

प्राची अश्विनी's picture

19 Nov 2020 - 6:01 pm | प्राची अश्विनी

वाह!

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

19 Nov 2020 - 10:59 pm | सौ मृदुला धनंजय...

अप्रतिम कथा

अथांग आकाश's picture

20 Nov 2020 - 9:16 am | अथांग आकाश

Sci-Fi कथा आवडली!!!
.

सौंदाळा's picture

20 Nov 2020 - 11:32 pm | सौंदाळा

एकदम जबरदस्त कथा.
खूप दिवसांनी सशक्त साय फाय कथा वाचली.
अशा कथांमध्ये सायन्सचे तत्व वाचकांना समजेल अशा प्रकारे सांगणे फार महत्वाचे असते. तुम्ही ते नुसतं सांगितलं नाही तर अत्यंत सोप्पं करून आम्हालाही त्यात गुंतवुन ठेवलं.
अजून भरपूर सायफाय कथा येऊ द्यात.

भृशुंडी's picture

21 Nov 2020 - 7:10 am | भृशुंडी

अभिप्रायाबद्दल मनापासून आभारी आहे मंडळी.
पुढेमागे आणखी काही विज्ञानकथा लिहायचा विचार आहे.
ज्यांना विज्ञानकथा मराठीतून वाचायला आवडतात त्यांच्यासाठी -
https://sites.google.com/site/vishwavidnyan/home/vidnyankatha/
आयझॅक अ‍ॅसिमोव्हच्या प्रसिद्ध कथांचं भाषांतर काही वर्षांपूर्वी सुनिल प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालं होतं त्यातल्या काही कथा.
"होते कुरूप वेडे" नक्की वाचा.

तुषार काळभोर's picture

21 Nov 2020 - 7:35 am | तुषार काळभोर

खिळवून ठेवणारी कथा!

विजुभाऊ's picture

22 Nov 2020 - 12:09 am | विजुभाऊ

400% सहमत

मला थोड कळलं नाही, खुर्ची रिकामी होती म्हणजे त्या माणसाला काय झाल?

सुचिता१'s picture

28 Nov 2020 - 9:43 am | सुचिता१

शेवटी त्या माणसाचे काय झाले?