रागदारी ते भावगीत व्हाया गझल आणि नाट्यगीत

Primary tabs

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amरागदारी ते भावगीत व्हाया गझल आणि नाट्यगीत

सरत्या बालपणात ‘इथेच आणि या बांधावर अशीच श्यामल वेळ सख्या रे किती रंगला खेळ हे माणिकताईंचे गाणे ऐकले होते. अर्थ कळला नव्हता पण स्वरावलीच्या प्रेमात पडलो होतो. या गाण्यात कुठला तरी स्वर हृदयाची तार छेडून जायचा. शैलीदार, सुंदर उच्चार स्वरभावनेला द्विगुणित करून हृदयाला भिडणारे. आपली इच्छा असो वा नसो, मन उचंबळून येणारच.

जसजसे कानावर संगीत पडत गेले तसतसे ध्यानात आले की हृदयाचा वेध घेणारी ही स्वरकट्यार आहे तीव्र मध्यमाची. मग ती यमनातली असो, मारुबिहागातली असो वा हमीरातली. हमीर म्हटले की ‘मधुबन मे राधिका नाचे रे’ हे गाणे आठवतेच. यमन, यमन कल्याण, अशा कल्याण थाटातल्या अनेक रागातल्या रचनात तीव्र मध्यम आपल्याला प्रणयोत्सुक आतुरतेची सुखसंवेदना देतात.

तेव्हा मामाकडे दर गोकुळ अष्टमीला मैफिली होत. तिथे रागदारी ऐकली होती. नंतर किशोरवयात संगीत समारोह आणि इतर मैफिलींना ऐकणे झाले होते. विविध उत्सवात कर्ण्यांवरून गाणी कानावर येत. परंतु अभ्यास, खेळ आणि वाचन यामुळे रागदारी अणि नाट्यगीते याव्यतिरिक्त इतर संगीत अणि गाणी तशी ऐकलीच नव्हती. कानावर पडणे वेगळे आणि ऐकणे वेगळे. त्यात रशिया आणि अमेरिका यांच्या अंतराळमोहिमांचे हाती लागतील ते अफवावजा अतित्रोटक अहवालांबद्दलचे कुतूहल. त्यातही बराच वेळ जाई.

तेव्हाच कधीतरी असाच एकदा मामाकडे गेलो होतो. संगीताच्या गप्पा चालू होत्या. मामेभाऊ म्हणाला अरे रागदारी कसली ऐकतोस, जरा गझला ऐक. तेव्हा त्याने नुकताच एक तबकडी रेकॉर्ड प्लेअर घेतला होता. आणि त्याने मेहदी हसनची ‘रंजिश ही सही’ लावली. मला उर्दू कळत नव्हतेच. मग त्याने अर्थ उलगडून सांगितला. पण नंतर त्यातला तो तीव्र मध्यम मनात निनादू लागला. गझल हे स्वरूप मला अनोखे होते. स्वरप्रधान ख्यालात स्वरांना महत्त्व होते. यमनातल्या ख्यालातले बापुडे शब्द आता स्वरांच्या हातात हात घालून उच्चारांची मिजास दाखवत, लयतालाची खडी ताजीम घेत सरदारी रुबाबात अवतीर्ण झाले. अमूर्त स्वरचित्रांना आता गझलेचे मूर्त स्वरूप लाभले होते.

तोपर्यंत मनांत संगीतावर विचारमंथन कधी झाले नव्हते. आता त्याला चालना मिळाली. रंजिश ही सही वरून आठवले माणिकताईंचे ‘नाथ हा माझा’. अरे! हा तर यमनच! यमन रागातला हा तीव्र मध्यम कधी तात्पुरत्या विरहाची हवीहवीशी वाटणारी सुखसंवेदना घेऊन येतो तर कधी प्रणयातला उत्फुल्ल आवेग. बडा ख्याल जे ठाय लयीत जे ४०-५० मिनिटात धीमेपणाने मांडतो ते छोटा ख्याल जलद गतीने १० – १५ मिनिटात मांडतो. दोन्ही ख्याल मिळून तास सव्वा तास होतो.

ख्याल करतो तेच गारुड आता चपलतेने गझलांतून, नाट्यगीतांतून ८-१० मिनिटात होऊं लागले. एखाद्या भव्य, अलीशान राजमहालातली देखणी सजावट एखाद्या प्रतिभावान वास्तुरचनाकाराने एखाद्या छोट्याशा पण सुंदर, सुबक, नीटस हवेली तितक्याच देखणेपणाने, आकर्षकपणे मांडावी आणि आपण चकित होऊन, भान विसरून, हे सारे डोळे विस्फारून पाहात राहावे असे काहीतरी घडले होते. अर्थगर्भ, आकर्षक, सौंदर्यपूर्ण शब्दरचना याच कुशल वास्तुकाराची भूमिका निभावत होती.

यमनावरून आठवले. कोणाही भारतीय संगीतकाराला जर आपण विचारले की जास्तीत जास्त प्रणयगीतांच्या स्वररचना कोणत्या रागात असतील तर एकमुखाने उत्तर मिळेल की राग यमन असे मी कुठेसे वाचले होते.

राग ऐमन असेही काही ठिकाणी बोलले जाते. मला हे कळल्यावर आश्चर्य वाटले होते की ऐमन हेच या रागाचे मूळ नाव आहे अणि हा राग अमीर खुस्रोच्या काळात इराणी संगीतातील लोकप्रिय स्वरावलीवरून बांधला गेला आहे. अमीर खुस्रो आणि रहिमतुल्ला या संगीतकारांनी हा राग तत्कालीन हिंदुस्तानात लोकप्रिय केला. स्वराच्या भाषेला मर्यादा नसतात हे खरेच. आपली भाषा कोणतीही असो, मनातल्या भावना अतिशय ताकदीने पोहोचविण्याचे काम स्वर लीलया करतात. परंतु बहुतेक भारतीय संगीतकार हा राग मुळात भारतीयच आहे असेच मानतात. सत्य काहीही असो, यमन हिंदुस्थानी संगीतात गेली काही शतके आहे आणि हमखास मैफल संस्मरणीय करून जातो आहे हेच खरे आहे.

मराठी भावसंगीतात, चित्रपटसंगीतात एकापाठोपाठ एक रसदार गाणी आली आणि माझ्या पिढीतल्या तरुणाईची चंगळच झाली. त्या सर्वच संगीतकारांचे, गायकवादकांचे आपण ऋणी आहोतच. हिंदी चित्रसृष्टीही मागे राहिली नाही. तिनेही तोडीस तोड अशी एकामागोमाग एक गीते दिली.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात औद्योगिकीकरण अणि इतर सामाजिक कारणांमुळे जीवनशैली वेगवान झाली. कमीत कमी वेळात जास्त सुंदर, भिडणारे, श्रवणीय संगीत ऐकण्याकडे कल वाढला. भावगीतांत आणि सिनेगीतात कविता अणि गीतांच्या अर्थगर्भ, भावरम्य, चित्रदर्शी शब्दांना जोड मिळाली वाद्यवृंदाची. हे सारे खरेच घडले होते आणि यात प्रमुख भूमिका होती प्रणयातला शृंगार संयतपणे पण सौंदर्यपूर्णतेने, देखणी मांडणी करून दाखवणार्या जादुगार संगीतकारांची, संगीत नियोजकांची आणि गायकवादकांची. तासादीडतासाच्या राजमहालातली देखणी सजावट आता सर्व सौंदर्यप्रसाधने लेऊन एकाच दालनात देखण्या लघुरूपात अवतीर्ण झाली. ख्यालातला स्वरविचार केवळ तीन-पाच मिनिटांच्या भावगीतात, सिनेगीतात प्रकट होऊन रसिकांवर गारूड करू लागला होती. जनसामान्यांना काहीसे बोजड वाटणारे संगीत आता सोपे, सुगम वाटू लागले होते.

तरुणाईवर तीव्र मध्यम असा मंत्रजाल पसरत असतांना बाकीचे राग, बाकीचे स्वर बरें मागे राहतील! मारवा-पूरिया-सोहनीने मावळतीचे गहिरे रंग आपापल्या सुरावटीतून दाखवले तर रागेश्री-बागेश्री, मालकंस-चंद्रकंसांनी मंत्रमुग्ध करणारे, रातराणीच्या सुगंधाने धुंद करणारे स्वप्नलोकातले चांदणे. मधुवंती, धानी, भीमपलास, मुलतानी हेही मग मागे राहिले नाहीत. रेंगाळणार्या, दुपारचे चमकदार सोनेरी रंग दाखवीत प्रेयसीला ’नको विसरू संकेत मीलनाचा’ असे विनवून ‘दोपहर के धूप में नंगे पांव’ यायला लावले.

बंदिशींच्या तरुणाईला अगम्य वाटणार्या जवळजवळ शतकापूर्वींच्या शब्दांची जागा आता नेहमींच्या प्रचारातल्या साध्यासोप्या पण सुंदर अणि मनाला भिडणार्या शब्दांनी घेतली आणि अभिजात रागदारी संगीतातून सुगम संगीत कधी अवतीर्ण झाले कळलेही नाही. जांनिसार अख्तर, शकील बदायुनी, कैफी आझमी, सुरेश भट आदि गझलकारांना आणि कुसुमाग्रज, मंगेश पाडगांवकर आणि इथे उल्लेख न केलेल्या सर्वच शायर, कवी आणि संगीतकार, गायकवादकांना धन्यवाद देतो आणि लेख आवरता घेतो.

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

14 Nov 2020 - 12:59 pm | संजय क्षीरसागर

लेख आवडला.

सीने संगीत ही तीन मिनीटांची मैफिल असते असं एका प्रख्यात शास्त्रीय गायिकेनं म्हटलंय !

कुमार१'s picture

14 Nov 2020 - 4:31 pm | कुमार१

सुरेख आढावा.
आवडला.

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 2:22 pm | टर्मीनेटर

@सुधीर कांदळकर

'रागदारी ते भावगीत...'

संगीतमय प्रवास आवडला  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

सुधीर कांदळकर's picture

15 Nov 2020 - 4:23 pm | सुधीर कांदळकर

संक्षी, डॉ. कुमार धन्यवाद.
@टर्मिनेटर स्क्रॅच कार्डची कल्पना सुरेख. धन्यवाद.

श्रीगुरुजी's picture

16 Nov 2020 - 5:24 pm | श्रीगुरुजी

सुंदर माहितीपूर्ण लेख!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Nov 2020 - 7:02 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

भिडलाय लेख..

चौकटराजा's picture

16 Nov 2020 - 7:34 pm | चौकटराजा

सात सुरान्चे ते सप्तक असे आपण म्हणतो पण ते खरे १२ सुरांचे व २३ श्रुतींचे ( पूर्वी २२ चे म्हणत ) असते. त्यातील तीव्र मध्यम हा अत्यन्त खास असा स्वर आहे ! यमन हा सर्व समावेशक रस असणारा राग आहे. तीव्र मध्यम हा सायंकालचे व सकाळचे अशा दोन्ही रागात सापडतो हे विशेष ! आपल्या शास्त्रीय सन्गीताचे विशेष असे आहे की एखादा स्वर जरी स्वयम्भू असला तरी तो कुणाशेजारी उभा आहे त्यावर त्याचे तो पति आहे की पिता हे कळत जाते.
आम्हाला सन्गीत सरिता या विविध भारतीच्या कार्यक्रमामुळे "आपले ५० च्या ६० च्या दशकातील फिल्म व भाव सन्गीत सन्गीत इतके श्रवणीय ,स्मरणीय का याचा मागोवा घेता आला. आपल्या या लेखामुळे खूप सान्गितिक आठवणी जाग्या झाल्यात. पण तूर्तास लेखनसीमा ! धन्यवाद !

सुधीर कांदळकर's picture

17 Nov 2020 - 4:33 pm | सुधीर कांदळकर

धन्यवाद श्रीगुरुजी आणि मिका.

@चौरा

एखादा स्वर जरी स्वयम्भू असला तरी तो कुणाशेजारी उभा आहे त्यावर त्याचे तो पति आहे की पिता हे कळत जाते.

अगदी खरे.

संगीत सरिता बहुतेक अजूनही सुरू आहे.

दुर्गविहारी's picture

17 Nov 2020 - 4:39 pm | दुर्गविहारी

खूपच छान आढावा घेतला आहे. आणखी रागदारी वरचे लिखाण वाचायला आवडेल.

चौथा कोनाडा's picture

22 Nov 2020 - 5:50 pm | चौथा कोनाडा

+१

सुंदर लेख !

प्राची अश्विनी's picture

22 Nov 2020 - 9:22 pm | प्राची अश्विनी

वाह!

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Nov 2020 - 10:19 am | ज्ञानोबाचे पैजार

या रागसंगितातले फारसे काही कळत नाही, पण कानाला गोड वाटेल ते आपले मानतो,

ख्यालातला स्वरविचार केवळ तीन-पाच मिनिटांच्या भावगीतात, सिनेगीतात प्रकट होऊन रसिकांवर गारूड करू लागला होती. जनसामान्यांना काहीसे बोजड वाटणारे संगीत आता सोपे, सुगम वाटू लागले होते.

आणि खरेतर या मूळेच संगिताशी नाळ जोडली गेली. आजही कधी गुलाम अली यांचे "चुपके चुपके रात दिन" किंवा सुरेश वाडकरांचे "सीने मे जलन" ऐकले तरी कान टवकारले जातात आणि मन आपोआप तिकडे ओढले जाते.

पैजारबुवा,

केदार पाटणकर's picture

23 Nov 2020 - 12:11 pm | केदार पाटणकर

छान. वाचायला आवडले.

स्मिताके's picture

23 Nov 2020 - 10:16 pm | स्मिताके

सुरेख माहिती.

सुधीर कांदळकर's picture

25 Nov 2020 - 6:48 am | सुधीर कांदळकर

दुर्गविहारी, प्राची अश्विनी, चौथा कोनाडा, ज्ञापै, केदार पाटणकर आणि स्मिताके

अनेक अनेक धन्यवाद.

मित्रहो's picture

25 Nov 2020 - 7:29 pm | मित्रहो

तुमचा लेख आवडला, वाचायला छान वाटले.

ख्यालातला स्वरविचार केवळ तीन-पाच मिनिटांच्या भावगीतात, सिनेगीतात प्रकट होऊन रसिकांवर गारूड करू लागला होती. जनसामान्यांना काहीसे बोजड वाटणारे संगीत आता सोपे, सुगम वाटू लागले होते

हे पटले. उदाहरणासकट सांगितले असते तर आणखीन मजा आली असती.

सुधीर जी,

संगीत आणि वास्तुकलेचा परस्पर संबंध लावणारा तुमचा मेटाफोर अनोखा आहे. तुम्ही रागदारी आणि गझलेचा भावबंध अलगद उलगडला आहे.

फार सुंदर आटोपशीर आलेख, खूप आवडला.