'अमरुशतकातून अष्टनायिकादर्शन'

Primary tabs

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 am'अमरुशतकातून अष्टनायिकादर्शन'

भरतमुनिविरचित नाट्यशास्त्रामध्ये विशेषतः शृंगाररसाचे सम्यग्दर्शन साधण्यासाठी स्त्री-पुरुषांतील भावसंबंधातून निर्माण होणाऱ्या विविध अवस्थांची रसिकतेने चर्चा केलेली असून तीमधूनच नायक-नायिकांच्या कल्पना रुजल्या व विकसित झाल्या. नाट्यगुणवैशिष्ट्ये सांगत असताना अभिनयदृष्ट्या भावदर्शनाची सीमा गाठता यावी, या हेतूने स्त्रीपुरुष-स्वभावांचे सूक्ष्म परिशीलन नाट्यशास्त्रात केलेले आहे. ते करीत असताना मुख्य अष्टनायिकांचे स्वरूपवर्णन भरताने दिले आहे. त्या अष्टनायिका अशा - अभिसारिका, खंडिता, कलहान्तरिता, प्रोषितभर्तृका, स्वाधीनपतिका, उत्कंठिका, वासकसज्जा आणि विप्रलब्धा.

ह्या अष्टनायिकांचे दर्शन ’अमरुशतक’ ह्या काव्यातील श्लोकांमधून घडविण्याचा हा प्रयत्न आहे. हे काव्य म्हणजे कमीअधिक १०० श्लोकांचा एक संग्रह आहे. ज्याचे नाव परंपरेने ह्या संग्रहाशी जोडले गेले आहे तो अमरु नावाचा कवि कोण, कोठला, केव्हाचा अशी काहीच माहिती उपलब्ध नाही. हे श्लोक त्यानेच मुळात निर्माण केले की त्याला उपलब्ध श्लोकांचा त्याने केवळ संग्रह केला आहे हेहि माहीत नाही.

नायक-नायिका ह्यांच्या शृंगारिक संबधातील निरनिराळ्या धाग्यांवर हे श्लोक बेतलेले आहेत. ह्यापैकी प्रत्येक श्लोक स्वतन्त्र असून नायक-नायिका संबधातील एका अंगावर तो श्लोक भर देतो

अमरु कवि कोण होता ह्याविषयी माधवाचार्यलिखित शांकरदिग्विजय ग्रंथामध्ये पुढील कथा सांगितली आहे. प्रख्यात मीमांसक मंडनमिश्र ह्यांच्याशी वाद करण्यासाठी शंकराचार्य वाराणसीमध्ये पोहोचले आणि ते आणि मंडनमिश्र ह्यांच्या मध्ये शास्त्रार्थ बरेच दिवस चालला. अखेर शंकराचार्यांचा विजय दिसू लागला असता मंडनमिश्रांची विदुषी पत्नी सरस्वती हिने वादामध्ये हस्तक्षेप करून शंकराचार्यांना आह्वान दिले. शंकराचार्यांकडून त्या आह्वानाचा स्वीकार झाल्यावर तिने शंकराचार्यांपुढे कामशास्त्राविषयी काही प्रश्न टाकला. शंकराचार्य संन्यासी असल्याने त्यांना प्रश्नाचे उत्तर माहीत नव्हते. त्यांनी उत्तर देण्यासाठी काही मुदत मागून घेतली. त्याच वेळी अमरु नवाचा एक राजा नुकताच मृत झाला होता. आपल्या शिष्यांना आपले शरीर सांभाळण्याची कामगिरी सोपवून शंकराचार्यांनी योगसामर्थ्याने अमरु राजाच्या शरीरात प्रवेश केला. त्या शरीरात वास करून त्यांनी शृंगाराचा अनुभव घेतला आणि परत आपल्या देहात परतून त्या ज्ञानाच्या उपयोगाने सरस्वतीच्या प्रश्नाचे समर्पक उत्तर दिले आणि शास्त्रार्थ जिंकला. अमरु राजाच्या शरीरामध्ये वास्तव्य केले असतांना त्यांनी कमीअधिक १०० श्लोकांचा हा संग्रह निर्मिला.

सध्याच्या काळत ह्या गोष्टीवर कोणाचा विश्वास बसेल असे नाही पण आहे ती पारंपारिक गोष्ट अशी आहे.

आता मूळ विषयाकडे वळू. ह्यापुढे क्रमश: नायिकेच्या प्रत्येक प्रकाराचे एक चित्र दाखवून त्यापुढे अमरुकाव्यातील त्या प्रकाराचे दर्शक असे दोन श्लोक त्यांच्या भाषान्तरासह दाखवीत आहे. भाषान्तर बहुश: मुळाला धरून आहे पण कोठेकोठे ते आवश्यकतेनुसार स्वैरहि केले आहे.


अभिसारिका
क्व प्रस्थितासि करभोरु घने निशीथे
प्राणाधिको वसति यत्र जन: प्रियो मे ।
एकाकिनी बत कथं न बिभेषि बाले
नन्वस्ति पुङ्खितशरो मदन: सहाय: ॥
"अग सुंदरि, इतक्या काळोख्या रात्री कोठे निघाली आहेस?" " प्राणांपेक्षा अधिक प्रिय असा माझा प्रियकर जेथे राहतो तिकडे." "मुली, तू एकटी आहेस, तुल भीति कशी वाटत नाही?" "बाण घेतलेला कामदेव मला सोबतीला आहे की!"
उरसि निहितस्तारो हार: कृता जघने घने
कलकलवती काञ्ची पादौ रणन्मणिनूपुरौ ।
प्रियमभिसरस्येवं मुग्धे त्वमाहतडिण्डिमा
यदि किमधिकत्रासोत्कम्पं दिश: समुदीक्षसे ॥
किणकिणाट करणारा हार तुझ्या वक्षावर आहे आणि पृथुनितम्बांवर मेखला. तुझ्या पायांमध्ये आवाज करणारे रत्नजडित नूपुर आहेत. मुली, अशी डिण्डिम वाजवत तू प्रियकराकडे निघाली आहेस तर मग भीतीने घाबरल्यासारखी चहूबाजूस का पाहात आहेस?

खण्डिता
एकस्मिञ्शयने विपक्षरमणीनामग्रहे मुग्धया
सद्य: कोपपराङ्मुखं ग्लपितया चाटूनि कुर्वन्नपि ।
आवेगादवधीरित: प्रियतमस्तूष्णीं स्थिततत्क्षणा-
न्मा भून्म्लान इवेत्यमन्दवलितग्रीवं पुनर्वीक्षित:॥
दोघे एकशय्येवर असतांना प्रियकराने दुसर्‍या कोणा स्त्रीचे नाव उच्चारले. त्यामुळे रागावलेल्या मुग्धेने तोंड फिरवले आणि समजुतीचे गोड शब्द बोलणार्‍या प्रियकराकडे दुर्लक्ष केल्यासारखे केले. त्यामुळे प्रियकर बोलेनासा झाला. तो आता विरक्त होऊ नये ह्यासाठी मुग्धेने मान वळवून पुन: त्याच्याकडे दृष्टि टाकली
सुतनु जहिहि मौनं पश्य पादानतं मां
न खलु तव कदाचित्कोप एवंविधोऽभूत् ।
इति निगदति नाथे तिर्यगामीलिताक्ष्या
नयनजलमनल्पं मुक्तमुक्तं न किंचित् ॥
"सुन्दरि, आता अबोला सोड आणि पाया पडणार्‍या मजकडे पाहा, इतका राग तू पूर्वी कधीच धरला नव्हतास. " प्रियकराने असे म्हटल्यावर त्याच्या डोळ्याला डोळा भिडवून तिने भरपूर अश्रुपात केला पण ती काहीच बोलली नाही

कलहान्तरिता
चरणपतनप्रत्याख्यानप्रसादपराङ्मुखे
निभृतकितवाचारेत्युक्ते रुषा परुषीकृते।
व्रजति रमणे नि:श्वस्योच्चै: स्तनार्पितहस्तया
नयनसलिलच्छन्ना दृष्टि: सखीषु निपातिता ॥
पाया पडायला प्रतिबन्ध केल्यामुळे तो रुष्ट झाला. रागाने त्याला खोटारडा म्हटल्यामुळे तो संतापला. प्रियकर निघून गेल्यावर तिने छातीवर हात ठेऊन दीर्घ श्वास सोडला आणि अश्रूंनी भरलेली दृष्टि सख्यांवर टाकली.
प्राणेशप्रथमापराधसमये सख्योपदेशं विना
नो जानाति सविभ्रमाङ्गवलनावक्रोक्तिसंसूचनम् ।
स्वच्छैरच्छकपोलमूलगलितै: पर्यस्तनेत्रोत्पला
बाला केवलमेव रोदिति लुठल्लोलोदकैरश्रुभि:॥
प्रियकराने पहिल्या वेळी अपराध केला तेव्हा देहबोली आणि सूचक तिरकस बोलणे कसे करायचे हे तिला सख्यांनी शिकविले नव्हते. त्यामुळे अश्रूंनी नेत्र भरलेली ती बाला केवळ रुदन करत आहे.

प्रोषितभर्तृका
मुग्धे मुग्धतयैव नेतुमखिल: काल: किमारभ्यते
मानं धत्स्व धृतिं बधान ऋजुतां दूरे कुरु प्रेयसि ।
सख्यैवं प्रतिबोधिता प्रतिवचस्तामाह भीतानना
नीचै: शंस हृदि स्थितो हि ननु मे प्राणेश्वर: श्रोष्यति ॥
"अग मुग्धे, इतक्या दीनपणाने सगळा विरहाचा काळ घालवायला का प्रारम्भ करतेस? अभिमान धर, धिटाई शीक, प्रियकराशी मवाळपणे वागणे सोडून दे." सखीने असा उपदेश केल्यावर त्या भीरु स्त्रीने तिला उत्तर दिले " जरा हळू बोल, माझा प्राणांचा स्वामी माझ्या हृदयात आहे आणि तो ऐकेल."
विरहविषम: कामो वामस्तनूकुरुते तनुं
दिवसगणनादक्षश्चायं व्यपेतघृणो यम: ।
त्वमपि वशगो मानव्याधेर्विचिन्तय नाथ हे
किसलयमृदुर्जीवेदेवं कथं प्रमदाजन:॥
विरहामुळे असह्य झालेला काम शरीर क्षीण करत आहे. निर्दय यम दिवस मोजण्यामध्ये तत्पर आहे. प्रियकरा, तूहि अभिमानाच्या अधीन झाला आहेस. विचार कर की कमलवेलीच्या पालवीप्रमाणे मृदु अशी प्रेयसी कशी जीव धरून असेल?

स्वाधीनपतिका
लग्ना नांशुकपल्लवे भुजलता न द्वारदेशेऽर्पिता
नो वा पादयुगे स्वयं निपतितं तिष्ठेति नोक्तं वच: ।
काले केवलमम्बुदालिमलिने गन्तुं प्रवृत्त: शठ-
स्तन्व्या बाष्पजलौघकल्पितनदीपूरेण रुद्ध: प्रिय:॥
मेघांच्या मालिकांनी अंधार केलेला असतांना जायला निघालेल्या प्रियकराचे वस्त्र तिने ओढून धरले नाही, दारावर हात आडवे ठेवले नाहीत, त्याच्या पायांवर लोळण घेतली नाही, येथेच थांब असेहि ती म्हणाली नाही. त्या सुन्दरीने अश्रूंच्या ओघाची नदी करून तिच्या पुराने प्रियकराला अडविले.

श्रुत्वा नामापि यस्य स्फुटघनपुलकं जायतेऽङ्गं समन्ता-
द्दृष्ट्वा यस्याननेन्दुं भवति वपुरिदं चन्द्रकान्तानुकारि ।
तस्मिन्नागत्य कण्ठग्रहनिकटपदस्थायिनि प्राणनाथे
भग्ना मानस्य चिन्ता भवति मयि पुनर्वज्रमय्यां कदाचित् ॥

ज्याचे नाव कानावर पडले की सर्वांगावर रोमांच उभे राहतात. ज्याचा मुखचन्द्र दृष्टीस पडला की शरीर चंद्रकान्त मण्याप्रमाणे होते. तो प्राणनाथ कण्ठालिंगनाइतका जवळ आल्यावर वज्राप्रमाणे कठिण असलेल्या माझ्यामध्ये माझा मान भंग पावतो.
(चन्द्रकान्तमणि चन्द्राचे किरण त्याच्यावर पडले की द्रवतो अशी कविकल्पना आहे.)

उत्कण्ठिता
धीरं वारिधरस्य वारि किरत: श्रुत्वा निशीथे ध्वनिं
दीर्घोच्छासमुदश्रुणा विरहिणीं बालां चिरं ध्यायता ।
अध्वन्येन विमुक्तकण्ठमखिलां रात्रिं तथा क्रन्दितं
ग्रामीणै: पुनरध्वगस्य वसतिर्ग्रामे निषिद्धा यथा॥
रात्री रिपरिप पडणार्‍या पावसाचा आवाज ऐकून आपल्या विरहिणी प्रेयसीची सुस्कारे टाकत आठवण काढणार्‍या त्या प्रवाशाने मोकळ्य़ा गळ्याने रात्रभर असा विलाप केला की गावकर्‍यांनी ह्यापुढे प्रवाशांनी गावात राहण्यावर निर्बन्ध घातला.
अलसवलितै: प्रेमार्द्रार्दैर्मुहुर्मुकुलीकृतै:
क्षणमभिमुखैर्लज्जालोलैर्निमेषपराङ्मुखै: ।
हृदयनिहितं भावाकूतं वमद्भिरिवेक्षणै:
कथय सुकृती कोऽयं मुग्धे त्वयाद्य विलोक्यते ॥
मुग्धे, तो हवा का नको अशा विचारामध्ये ज्याच्याकडे एका क्षणी प्रेमाने आणि दुसर्‍या क्षणी निवृत्तीने तू बघत आहेस, ज्याच्याविषयी तुझ्या हृदयामध्ये जे आहे ते दृष्टीतून बाहेर पडत आहे, असा कोण सुदैवी ह्या क्षणी तुझ्या दृष्टीसमोर आहे?

वासकसज्जा
भ्रूभङ्गे रचितेऽपि दृष्टिरधिकं सोत्कण्ठमुद्वीक्ष्यते
रुद्धायामपि वाचि सस्मितमिदं दग्धाननं जायते ।
कार्कश्यं गमितेऽपि चेतसि तनू रोमाञ्चमालम्बते
दृष्टे निर्वहणं भविष्यति कथं मानस्य तस्मिञ्जने ॥
भुवया आकुंचित झाल्या तरी अधिक उत्कण्ठेने दृष्टि परिसर न्याहाळते, बोलणे थांबले तरी चेहर्‍यावरचे स्मित उजळून निघते, हृदय कठोर झाले तरी शरीरावर रोमांच येतात. तो प्रियकर दृष्टीस आल्यावर मान कसा टिकून राहाणार?
मलयमरुतां व्राता याता विकासितमल्लिका-
परिमलभरो भग्नो ग्रीष्मस्त्वमुत्सहसे यदि ।
घन घटयितुं तं नि:स्नेहं य एव निवर्तने
प्रभवति गवां किं नश्छिन्नं स एव धनंजय:॥
मलयगिरीहून चन्दनाचा सुगन्ध आणणारे अनेक वारे आले आणि गेले. उत्फुल्ल जाईजुईंचा परिमल आणणारे ग्रीष्म आले आणि गेले. हे मेघा, त्या निष्ठुराला परत आणण्यासाठी तुला यश आले तर आमचे काहीहि बिघडत नाही. गाई जिंकून परत आणणे ज्याला जमले तोच आमचा धनंजय!

विप्रलब्धा
अज्ञानेन पराङ्मुखीं परिभवादाश्लिष्य मां दु:खितां
किं लब्धं शठ दुर्नयेन नयतां सौभाग्यमेतां दशाम् ।
पश्यैतद्दयिताकुचव्यतिकरासक्ताङ्गरागारुणं
वक्षस्ते मलतैलपङ्कशबलैर्वेणीपदैरङ्कितम् ॥
शोकाकुल असलेल्या मला मागून येऊन आलिंगन देऊन, अरे शठा, तू स्वत:चेच भाग्य ह्या अवस्थेला आणून सोडले आहेस. हे पहा की कोणा दुसरीच्या स्तनांवरील लेपामुळे रंगलेल्या तुझ्या वक्षस्थलावर माझ्या वेणीच्या तेलाचा डाग आता उमटला आहे.
लिखन्नास्ते भूमिं बहिरवनत: प्राणदयितो
निराहारा: सख्य: सततरुदितोच्छूननयना: ।
परित्यक्तं सर्वं हसितपठितं पञ्जरशुकै-
स्तवावस्था चेयं विसृज कठिने मानमधुना॥
बाहेर तुझा प्रियकर खाली मान घालून जमिनीवर रेघोट्या काढत आहे, उपाशी अवस्थेमध्ये असलेल्या तुझ्या सख्यांचे नेत्र संतत रुदनाने कोरडे पडले आहेत, पिंजर्‍यातल्या राघूमैनांनी शिकविलेले सर्व हसणेबोलणे टाकले आहे. कठोर मुली, तुझी अशी अवस्था झाली आहे. आतातरी अभिमान सोड.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

14 Nov 2020 - 5:00 pm | कंजूस

साध्या सोप्या शब्दांनी भरलेले काव्य.

प्रचेतस's picture

14 Nov 2020 - 7:25 pm | प्रचेतस

एकदम सुरेख.
लेख वाचताना गाथासप्तशतीमधल्या पण काही गाथा आठवत होत्या.

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 2:42 pm | टर्मीनेटर

@अरविंद कोल्हटकर

'अमरुशतकातून अष्टनायिकादर्शन'

हा लेख आवडला  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

प्रचेतस's picture

15 Nov 2020 - 2:45 pm | प्रचेतस

हे भारी केलंय. लैच आवडलं

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 3:07 pm | टर्मीनेटर

🙏
पण मोबाईलवर वाचणाऱ्यांना त्यातली गंमत नाही दिसणार 😔

कंजूस's picture

15 Nov 2020 - 6:52 pm | कंजूस
कंजूस's picture

15 Nov 2020 - 6:53 pm | कंजूस

मोबाईल पेज व्ह्यू केल्यास
//
@अरविंद कोल्हटकर
'अमरुशतकातून अष्टनायिकादर्शन'
हा लेख आवडला

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

शुभ दीपावली //

हे दिसतं.
-----------
डेस्कटॉप साइटवर
// प्रतिसाद वाचण्यासाठी कार्ड स्क्राच करा हे //
दिसतं. पण scratch होत नाही.

आणखी काय gif आहे का?

गामा पैलवान's picture

16 Nov 2020 - 7:32 pm | गामा पैलवान

अरविंद कोल्हटकर,

एका हृदाकर्षक काव्याची ओळख करवून दिल्याबद्दल कौतुक व आभार! :-)

माझ्यासारख्या छिद्रान्वेषी माणसाला एक बारकीशी शंका आली. सततरुदितोच्छूननयना: या शब्दाचा समास व संधि यांचे विग्रह कसे होतील? सततरुदित: अश्रून् नयना: असा असेल काय? पण मग अखंड शब्द सततरुदितोच्छ्रून्नयना: असा होईल. मला आजिबात जमलं नाय. कृपया शंकानिरसन करणे. धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.

अरविंद कोल्हटकर's picture

17 Nov 2020 - 5:27 am | अरविंद कोल्हटकर

सततरुदितोच्छूननयना: - सतत रुदित उच्छून नयना: = सततेन रुदितेन उच्छूने नयने यासां ता: तथोक्ता: = सतत रडण्याने ज्यांचे डोळे सुजले आहेत अशा. हा बहुव्रीहि समास आहे. उच्छून हा शब्द उत् + श्वि ह्या धातूपासून निर्माण होतो.

गामा पैलवान's picture

17 Nov 2020 - 2:28 pm | गामा पैलवान

अरविंद कोल्हटकर,

तातडीने शंकानिरसन केल्याबद्दल आभार! :-)

उच्छून म्हणजे सुजलेले हा नवा अर्थ कळला. संस्कृत धातु अतिशय अर्थगर्भी आहेत. शीण आल्यावर होतात ते शूण, असा काहीसा अर्थ लावता यावा. त्याला उत् हा उपसर्ग लावून उच्छूण असा शब्द होऊन वापरतांना उच्छून हे सामान्यरूप होत असावं.

आ.न.,
-गा.पै.

श्री असविंद जी,
ऐतिहासिक घटनांच्या मालिकेतून अशा काव्य निर्मितीने भारतीय साहित्य, काव्य, नायिका, सख्या, नायकाच्या अन्य मैत्रिणी, आसपासचे पक्षी, पशू, ऋृतु बदल, यातून त्या काळातील तरूणींच्या मानसिकतेचे दर्शन घडवले आहेत. असे प्राचीन काव्य कलेतील बारकावे आपण मिपाकरांसमोर दिवाळी निमित्ताने सादर करून आम्हा वाचकांना ऋणी केले आहेत...

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Nov 2020 - 3:48 pm | ज्ञानोबाचे पैजार

भाषांतर दिल्याने वाचायला जास्त मजा आली,
आपल्या संस्कृत वाङ्मयात असली कितीतरी रत्ने भरुन पडली आहेत.
तुम्ही तो खजिना आमच्यासाठी उघडत रहा.
पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

19 Nov 2020 - 6:19 pm | प्राची अश्विनी

अतिशय आवडला लेख. आणि चित्रेदेखील आगदी समर्पक आहेत

सुखी's picture

24 Nov 2020 - 10:56 pm | सुखी

छान लेख आहे

चौथा कोनाडा's picture

25 Nov 2020 - 12:53 pm | चौथा कोनाडा

खुपच सुंदर.

लेखनशैली सुंदर आहे आणि सोबतची समर्पक चित्रे म्हणजे आयसिंग ऑन द केक !
👍