प्रेमाची किमया

Primary tabs

स्मिताके's picture
स्मिताके in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amप्रेमाची किमया

ऑक्टोबर १९९८. सर्व वर्तमानपत्रांतून एकच बातमी. "पाच बँका लुटण्याच्या आरोपाखाली दोन तरुणांना मुद्देमालासहित अटक. त्यांच्या गाडीत एक लाखावर डॉलर्सची रक्कम आणि लुटीची हत्यारे सापडली. बारा वर्षे तुरुंगवासाची सजा. "

या दोन तरुणांपैकी एक, शॉन हॉपवूड, आज एक निष्णात वकील आणि कायद्याचे प्राध्यापक आहेत. कैद्यांच्या पुनर्वसनाविषयीच्या कार्यातही ते मग्न आहेत. कैद्यांना मानसोपचार, व्यसनमुक्तीसाठी समुपदेशन आणि सुटकेनंतर आपल्या पायावर उभं राहण्यासाठी शिक्षण मिळालं पाहिजे, अशा दिशेने त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रीय पातळीवर त्यांचं कौतुक झालं आहे.

या वाल्याचा वाल्मिकी झाला, तो केवळ काही प्रेमळ शब्दांमुळे. विश्वास बसणार नाही अशी ही शॉनची खरीखुरी कहाणी.

अमेरिकेतल्या एका छोट्याशा गावातल्या शेतकरी कुटुंबातला हा मुलगा. अभ्यासात ठीकठाक, आणि दंगामस्तीतही तितकाच पुढे.
शाळेतल्या बास्केटबॉलमधल्या प्राविण्याच्या जोरावर शॉनला विद्यापीठात प्रवेश मिळाला. पण उज्ज्वल भविष्याची त्याची स्वप्नं मात्र फसवी ठरली. विद्यापीठातल्या मुरलेल्या खेळाडूंपुढे तो लिंबूटिंबू ठरला. शाळकरी पातळीवरचा खेळ आपल्याला पुढे नेणार नाही, हे कळून चुकलं. दुसरं ध्येय डोळ्यासमोर नसल्यामुळे नैराश्य आलं, आणि सुरु झालं अधोगतीचं सत्र. "हूं. काय करायचंय शिकून?" म्हणत वर्गाला बुट्ट्या, पार्ट्या, मित्र, दारू.. आणि पहिल्याच सत्रात विद्यापीठातून हकालपट्टी.

1

मग "जाने दो! गेलं उडत ते विद्यापीठ. माझ्यासारख्या साहसी तरुणाची खरी जागा सैन्यात." म्हणत शॉनने आपला मोहरा नौदलाकडे वळवला. तिथल्या दोन वर्षांच्या काळातही दारूचा पिच्छा न सुटल्यामुळे त्याला स्वादुपिंडाचा आजार जडला. कसाबसा मरणाच्या दारातून परत आल्यावर त्याला नौदलातूनही डच्चू मिळाला.

निरुपायाने घरी परतून शॉन शेतावर, गोठ्यात काम करू लागला. पण दारू काही सुटेना, शिवाय इतर अंमली पदार्थही खुणावू लागले. हाती पैसे टिकेनासे झाले. अशावेळी एका मित्राने म्हटलं, "चल, बँक लुटूया." मग आला पुढचा टप्पा, तुरुंगवास.

तुरुंगात त्याला भटारखान्यात काम नेमून दिलं गेलं. पण काही काळानंतर त्या कामाला कंटाळून शॉनने तुरुंगातल्या लायब्ररीत बदली मागितली. कादंबऱ्या तरी वाचायला मिळतील, अशा विचाराने. लायब्ररीत त्याला दिसले कायद्याचे जाडजूड ग्रंथ. कैद्यांना आपल्या खटल्यासंबंधी माहिती समजावी, फेरअर्ज करण्याची संधी मिळावी या हेतूने ती पुस्तकं तिथे ठेवलेली असत. "हूं. कशाला ही असली पुस्तकं छापतात?" म्हणत तो जरा रागानेच त्यांच्यावरची धूळ झटकू लागला.

एके दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा एक नवा निर्णय प्रसिद्ध झाला. ते ऐकताच शॉनच्या मनात आलं, "काय नवीन असेल या कायद्यात? माझ्या केसमध्ये लागू पडेल का ते? माझी शिक्षा कमी होईल का?" कुतूहलापोटी चक्क एक जाडजूड ग्रंथराज उघडून तो कायदा दिसतो तरी कसा, ते पाहू लागला. अर्थ लावण्याचा प्रयत्न करू लागला. हळूहळू कादंबरीसारखंच त्या पुस्तकांच्यात त्याचं लक्ष गुंतू लागलं. कायदा म्हणजे जणु एखादं कोडं असावं, अशा भावनेने तो ते सोडवत जाऊ लागला. आपली शिक्षा काही कमी होणार नाही, हे त्याला शेवटी कळून चुकलं.

4

पण हा चार बुकं वाचतोय हे पाहून तिथला दुसरा कैदी जॉन त्याला विनवणी करू लागला. "माझी शिक्षा कमी होईल का? बघ की रे!"
त्याला मदत करता येईल का पहावं, म्हणून शॉनने प्रयत्न करायचं ठरवलं. कित्येक महिने तो नुसता त्या पुस्तकांत बुडून गेला. मग तुरुंगातल्या टाईपरायटरवर लिहिलेला एक काटेकोर अर्ज सर्वोच्च न्यायालयात रवाना झाला. त्या वर्षी, म्हणजे २००३ मध्ये सुमारे आठ हजार अर्ज आले होते, त्यापैकी फक्त चौऱ्याहत्तर अर्ज सुनावणीसाठी निवडले गेले. त्यातला एक जॉनचा होता! संगणकाच्या युगातला हा टंकलिखित अर्ज पाहून, हा तुरुंगातून आला असावा, हे सॉलिसिटर जनरलनी ओळखलं. तो वाचून ते म्हणाले, "एखादा निष्णात वकीलसुद्धा क्वचितच असा अर्ज लिहू शकतो." पुढे तो अर्ज मान्य झाला. जॉनची शिक्षा चार वर्षांनी कमी झाली. त्यानंतर आणखी काही कैद्यांना शॉनने अशीच मदत केली, आणि त्यापैकी दुसराही एक अर्ज मान्य झाला. शॉनने स्वतःहून कोणत्याही शिक्षणाशिवाय, चिकाटीने आणि परिश्रमाने केलेला अभ्यास अजोड ठरला. इतकी वर्षं आयुष्य बेजबाबदारपणे उधळून लावल्यानंतर आता त्याच्या बुद्धिमत्तेचा कस लागला होता.

आणि नेमक्या याच सुमारास एक सुखद चमत्कार घडला.

शॉनच्या शाळेतल्या मैत्रिणीचं, ऍनचं त्याला पत्र आलं. त्या पत्रातल्या मैत्रीच्या, विश्वासाच्या शब्दांनी त्याच्या मनात आशा पालवली. आपण गुन्हेगार ठरलो, तरीही ऍन आपुलकीने आपली चौकशी करतेय, याचा फार मोठा परिणाम झाला. आपणही पुन्हा चांगलं आयुष्य जगू शकतो, नव्हे, जगायला हवं, असा विचार प्रथमच त्याच्या मनात आला. त्यांचा पत्रव्यव्हार नियमित सुरु झाला. इथे शॉनला तुरुंगवास होता, तसा तिथे ऍनला आरोग्याचा त्रास होता. भूक मंदावण्याचा तिचा विकार विकोपाला गेला होता. वजन अतिशय कमी झालं होतं. दोघांनी आपली कहाणी पत्रांतून विश्वासाने एकमेकांना सांगितली. एकमेकांना आधार दिला. ऍन तीन वेळा तुरुंगात येऊन जॉनला भेटून गेली.

1

शाळकरी वयातलं शारीरिक आकर्षण ओसरून आता मैत्रीचं एक गहिरं नातं आकाराला येत होतं. या नात्याच्या नव्याने गवसलेल्या उबेमुळे दोघे आपापल्या परिस्थितीवर मात करू लागले. मैत्रीला मिळालेल्या प्रतिसादामुळे ऍनच्या मनाला उभारी मिळाली. तिची तब्येत सुधारू लागली. जॉनचेही विचार पक्के होत गेले. भेलकांडत गेलेल्या आयुष्याला दिशा मिळाली. जगायचं कशासाठी? या प्रश्नाचं उत्तर मिळालं. पुन्हा नव्याने सुरु झालेलं हे नातं आता त्याला पुढची स्वप्नं दाखवू लागलं. कैदेतून सुटका झाल्यावर ऍनशी लग्न करून एक चांगलं स्थिर आयुष्य जगावं, असं त्याला वाटू लागलं. मग त्यासाठी सुटकेनंतर आपल्या पायावर उभं राहता यायला हवं, प्रतिष्ठित व्यवसाय हवा, असा त्याने ध्यास घेतला. कायद्यात रस निर्माण झाला होताच. आता आपण वकील व्हावं, असं त्याच्या मनाने घेतलं.

पण तुरुंगातल्या अर्जांच्या निमित्ताने ज्या वकिलांशी त्याचा संपर्क आला होता , त्या सर्वांनी त्याला सांगितलं, "तुझा भूतकाळ तुला पुसून टाकता येणार नाही. तुला कोणत्याच विद्यापीठात प्रवेश मिळणार नाही. आणि समजा मिळालाच, तरी शिकून झाल्यावर तुला वकिली करायला परवानगी मिळणार नाही. कारण तू स्वतःच एक गुन्हेगार आहेस. " तरीसुद्धा त्याचा निश्चय आणि कायद्याच्या अभ्यासातली गती पाहून सॉलिसिटर जनरलनी शिफारसपत्रं दिली, आणि शॉनचं सुटलेलं शिक्षण तुरुंगातूनच पुढे सुरु झालं. अर्धवट सोडलेली पहिली पदवी आधी पूर्ण केल्यानंतरच त्याला कायद्याचं पदव्युत्तर शिक्षण घेता आलं असतं.

मग आला सुटकेचा क्षण! २००८ मध्ये शॉनची तुरुंगातून सुटका झाली. त्याला एका सुधारगृहात सोडण्यात आलं. आता तो स्वतंत्र होता. पण टाइपराईटरच्या पुढचं तंत्रज्ञान त्याने पाहिलं नव्हतं. बाहेरचं जग झपाट्याने बदललं होतं. संगणक, आंतरजाल, आय फोन यातलं काहीही ठाऊक नसणाऱ्याला नोकरी मिळणं ही अशक्य कोटीतली गोष्ट होऊन बसली होती.

पुन्हा एकदा चमत्कार घडला!

"कागदपत्रं हाताळण्यासाठी मदतनीस पाहिजे." अशी जाहिरात शॉनच्या नजरेस पडली. कोणी दिली होती ही जाहिरात? सर्वोच्च न्यायालयासाठी छपाईचं काम करणाऱ्या एका कंपनीने. गबाळ्या अवतारात मुलाखतीला आलेला हा उमेदवार, आपण गेली बारा वर्षं तुरुंगात होतो असं सांगू लागला, तेव्हा कंपनीचे मालक घाबरलेच. पण त्याने लिहिलेले शिक्षामाफीचे दोन अर्ज मान्य झालेत हे ऐकल्यावर ते थक्क झाले. वकिलांशी रोजचा राबता असल्याने त्यांच्या लक्षात आलं, की हे असामान्य बुद्धिमत्तेचं काम आहे. मोठमोठ्या वकिलांना जे जमत नाही, ते याने एकदा नव्हे तर दोनदा केलं! तेही तुरुंगातून, कायद्याच्या शिक्षणाशिवाय. जोडीला सॉलिसिटर जनरलची शिफारसपत्रं पाहिल्यावर शॉनची नोकरी पक्की झाली.

पुढच्या तीन वर्षांत प्रचंड परिश्रम करून शॉनने नोकरी आणि शिक्षण दोन्ही पार पाडलं. कंपनीच्या कामानिमित्त ज्या ज्या वकिलांशी त्याचा संपर्क आला, त्यांचं मत त्याच्याविषयी अनुकूल बनलं. त्या वकिलांच्या शिफारशींमुळे त्याला वकिलीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश मिळाला. आर्थिक मदतीचीही सोय झाली, आणि शॉन वकील झाला! इतक्या उत्तम श्रेणीचा वकील, की त्याला देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या कोर्टात काम करायची संधी मिळाली. वकिली करण्याचा परवानाही मिळाला. त्यानंतर वर्षभरात एका विद्यापीठाची फेलोशिप मिळवून शॉनने इतकी सुरेख कामगिरी करून दाखवली, की तिथे प्राध्यापक पदावर त्याची नेमणूक झाली. ही अत्युच्च पदं मिळवणं महाकर्मकठीण मानलं जातं. शॉनच्या गुणवत्तेमुळे आणि निश्चयामुळे ते सहजसाध्य झालं. पाठोपाठ शॉनचं दुसरं स्वप्नही साकार झालं. ऍनशी लग्न झालं.. दोन मुलंही झाली आणि सुखाचा संसार सुरु झाला.

4
आज आयुष्यातल्या कटू अनुभवांविषयी बोलणं टाळून प्राध्यापक शॉन हॉपवूड इतकंच म्हणतात, "तो जुना दरोडेखोर शॉन मेला.. नाहीसा झाला. आता त्याची आठवणसुद्धा मला येत नाही. इतक्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला, आणि मला मदत केली त्यामुळेच हे सगळं घडून आलं." आपल्या अनुभवांबद्दल त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव आहे, लॉ मॅन.

ऍनने लिहिलेलं ते पहिलं पत्र, आणि त्यातून फुलत गेलेलं हळुवार नातं दोघांची आयुष्यं उजळून गेलं. त्यांचं दोघांचं भविष्य तर घडलंच, पण आता त्यांच्या कार्यामधून इतर अनेक कैद्यांना आयुष्याची दिशा सापडेल. खऱ्या अर्थाने त्यांचं पुनर्वसन व्हायला मदत होईल. त्यांच्या चरित्रातूनही अनेकांना प्रेरणा मिळेल. प्रेमाच्या किमयेचा हा अनोखा स्पर्श!

(सत्यघटनेवर आधारित, आंतरजालावरील संदर्भ साभार.)

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

14 Nov 2020 - 4:08 pm | सिरुसेरि

माहितीपुर्ण लेख .

विजुभाऊ's picture

14 Nov 2020 - 9:03 pm | विजुभाऊ

खूपच छान माहिती.
प्रेमाचे बोल चमत्कार करतात

गोंधळी's picture

14 Nov 2020 - 10:10 pm | गोंधळी

सकारात्मक ल्व्हस्टोरीची.
धन्यवाद.

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 2:59 pm | टर्मीनेटर

@स्मिताके

'प्रेमाची किमया'

हा लेख खूप आवडला  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

माहितीपूर्ण लेख, खुप आवडला!!

-(किमयागार) सोकाजी

सुधीर कांदळकर's picture

16 Nov 2020 - 9:04 am | सुधीर कांदळकर

मनाचा ठाव घेणारी शीर्षक सार्थ ठरवणारी कथा आहे ही. वेगवान ओघवती भाषा. छान आवडली. धन्यवाद.

निनाद's picture

16 Nov 2020 - 10:53 am | निनाद

छान आवडली.

अभिजीत अवलिया's picture

16 Nov 2020 - 1:00 pm | अभिजीत अवलिया

सकारात्मक माहीती. फार आवडली.

स्मिताके's picture

17 Nov 2020 - 9:07 pm | स्मिताके

सिरुसेरि, विजुभाऊ, गोंधळी, सोत्रि, सुधीर कांदळकर, निनाद, अभिजित अवलिया
प्रतिसादांबद्द्ल आभारी आहे.
टर्मीनेटर यांचे कार्ड अभिनव आहे. धन्यवाद.

तुषार काळभोर's picture

17 Nov 2020 - 9:29 pm | तुषार काळभोर

जबरदस्त प्रेरणादायक लेख.

कुमार१'s picture

18 Nov 2020 - 10:47 am | कुमार१

खूपच छान माहिती.

चौथा कोनाडा's picture

18 Nov 2020 - 1:26 pm | चौथा कोनाडा

थरारक प्रेरक कहाणी !

विश्वासाच्या शब्दांनी त्याच्या मनात आशा पालवली. आपण गुन्हेगार ठरलो, तरीही ऍन आपुलकीने आपली चौकशी करतेय, याचा फार मोठा परिणाम झाला.

दोघांनी आपली कहाणी पत्रांतून विश्वासाने एकमेकांना सांगितली. एकमेकांना आधार दिला.

खूपच सुंदर !

यावरून स्कॅम १९९२ वेबसिरीज आठवली. यातला एक आरोपी अश्विन मेहता याने देखील खटले, जामीन यांच्या दरम्यान कायद्याची पदवी संपादन केली आणि नंतर आणि मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. देशव्यापी वादग्रस्त प्रकरणात डोके थंड ठेऊन हे शिक्षण घेणे सोपे खचितच नसणार !
( वेबसिरीजमध्ये अश्विन मेहताची भुमिका हेमंत खेर याने केली आहे, आपल्या सयंत अभिनयाने प्रेक्षकांना जिंकून घेतले)

स्मिताके, हा सुंदर लेख आवडला हेवेसांनले !

एका जिद्दी व्यक्तिमत्वाची कहाणी खूप आवडली. वाल्याचा वाल्मिकी झाला ह्याचे प्रत्यक्ष उदाहरण. खूप छान लेख.

स्मिताके's picture

18 Nov 2020 - 9:14 pm | स्मिताके

पैलवान, कुमार१, चौथा कोनाडा, बबन ताम्बे
प्रतिसादांबद्द्ल आभारी आहे.

चौथा कोनाडा - स्कॅम १९९२ हेही रंजक.

अथांग आकाश's picture

18 Nov 2020 - 10:06 pm | अथांग आकाश

छान माहितीपूर्ण लेख!!!
.

सरिता बांदेकर's picture

21 Nov 2020 - 1:58 pm | सरिता बांदेकर

नमस्कार,
खूप आवडली जेलमध्ये खूप वेळा वाईट संगतीमुळे आणखीन जास्त बिघडलेलंच वाचनात आलं होतं पण हे सकारात्मक परिणाम झालेल्या व्यक्तीबद्द्ल वाचून छान वाटले.

सुंदर कथा! प्रेरणादायी!

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Nov 2020 - 2:43 pm | ज्ञानोबाचे पैजार

गोष्ट सांगण्याची शैली ही आवडली
पैजारबुवा,

खोटे वाटण्याइतकी खरी कहाणी.
तुम्ही मस्तच सांगितली आहे.
एखादा चित्रपट बनवावा असं शॉनचे आयुष्य वाटतयं

स्मिताके's picture

23 Nov 2020 - 10:10 pm | स्मिताके

अथांग आकाश - जजसाहेब एकदम कडक!
सरिता बांदेकर - हो, खरंय. म्हणूनच लिहावंसं वाटलं.
भक्ति, ज्ञानोबाचे पैजार - प्रतिसादाबद्द्ल आभार.
सौंदाळा - हो, यावर चित्रपट येणार आहे असं कुठेतरी वाचल्याचं आठवतं.
आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्द्ल सर्वांचे आभार.

मुक्त विहारि's picture

23 Nov 2020 - 11:23 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद...

सुखी's picture

24 Nov 2020 - 11:03 pm | सुखी

अनोखी ओळख ... धन्यवाद

सुधीर कांदळकर's picture

25 Nov 2020 - 6:56 am | सुधीर कांदळकर

हे खरेच. मस्त कथा, छान ओघवते लिखाण. आवडले. धन्यवाद.

प्राची अश्विनी's picture

25 Nov 2020 - 2:24 pm | प्राची अश्विनी

कथा आवडली.

मित्रहो's picture

26 Nov 2020 - 10:48 am | मित्रहो

एका सत्यकथेची खूप छान माहिती दिली. तुमची माहिती वाचून शॉन हॉपवूडचे आयुष्य हे हॉलीवूडच्या सिनेमाचे मटेरियल आहे असे वाटते.

नूतन's picture

6 Dec 2020 - 11:30 pm | नूतन

नवीन माहिती .

सुमो's picture

7 Dec 2020 - 4:35 am | सुमो

करून दिली आहे या अनोख्या पुस्तकाची.
तुमच्या लेखामुळे पुस्तक डा.लो. केलेय. वाचतोय.

स्मिताके's picture

7 Dec 2020 - 10:18 pm | स्मिताके

मुक्त विहारि, सुखी, सुधीर कांदळकर, प्राची अश्विनी, मित्रहो, नूतन, सुमो

प्रतिसादांबद्द्ल आभारी आहे.