खजुराहो.. शृंगाररसाचे मुक्त प्रदर्शन की एक अनमोल संदेश

Primary tabs

विजयश्री अभ्यंकर's picture
विजयश्री अभ्यंकर in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amखजुराहो.. शृंगाररसाचे मुक्त प्रदर्शन की एक अनमोल संदेश ??

डिसेंबर महिन्यातील एक गारठलेली सकाळ. सगळीकडे दाट धुक्याचे राज्य आणि त्यातून डोकावणारी मंदिर शिखरांची रांग.. आभाळाला भिडणारी. त्यावरील मोहक स्त्री शिल्पे - जशा काही ढगातून पृथ्वीवर अवतरलेल्या लावण्यवती अप्सराच! एखाद्या जादूनगरीत आल्यासारखे, पाहणार्‍याला संमोहित करणारे, खिळवून ठेवणारे. खजुराहोतील ‘western group of temples’ बघायला आज आम्ही आलो होतो. दहाव्या ते बाराव्या शतकाच्या काळात ‘चंदेला’ राजवंशातील राजांनी ही मंदिरे बांधली आहेत. तेराव्या शतकात दिल्ली सल्तनतच्या आक्रमणात चंदेला साम्राज्याचा नाश झाला, त्यानंतर ही मंदिरे विस्मरणात गेली. त्याभोवती मोठे जंगल वाढले. पुढे १८३०मध्ये ब्रिटिश सर्व्हेयर T.S. BURT याला त्यांचा शोध लागला.
असे म्हणतात की एकूण ८५ मंदिरे होती, परंतु त्यातील २४ मंदिरे सापडली आहेत. बरीचशी भग्न आहे आणि उत्खननाचे काम अजूनही सुरू आहे. यात western, eastern आणि southern असे गट आहेत . western group ऑफ temples येथे सर्वात जास्त आणि अतिशय सुंदर erotic शिल्पे असल्याने UNESCOने world heritage site म्हणून ही जागा जाहीर केली आहे.

k1
खजुराहोची बहुतेक मंदिरे नागर शैलीत बांधलेली आहेत. त्यातही काही मंदिरांतून (उदा., कंदरिया महादेव, लक्ष्मण, विश्वनाथ इ.) ‘पंचायतन’ ही उपशैली आढळते. या पद्धतीमध्ये मुख्य मंदिराच्या चारही बाजूंच्या कोपऱ्यांत चार उपमंदिरे असतात. ही मंदिरे एका प्लॅटफॉर्मवर बांधलेली आहेत. हा पूर्ण प्लॅटफॉर्म ग्रॅनाइट दगडाने बांधला गेला आहे. त्यावरील बांधकाम पांढर्‍या धुरकट बलुआ दगडामध्ये - म्हणजेच सँडस्टोनमध्ये केले आहे. ज्या भव्यतेची निर्मिती आपल्याला करायची आहे, त्यासाठी लागणारा बेससुद्धा तितकाच मजबूत आणि काळाच्या कसोटीवर हजारो वर्षे टिकून राहणारा हवा, ह्यासाठी या दगडाचा वापर हा त्या काळातील लोकांचे दगडांच्या गुणधर्मांचे ज्ञान व दूरदृष्टी दाखवून देतो. हे संपूर्ण बांधकाम कोणत्याही मोर्टार म्हणजेच सिमेंट किंवा इतर कोणत्याही वेगळ्या मटेरिअलने जोडण्यात आलेले नाही, तर Tennon-mortise या interlocking पद्धतीने केले आहे. यामुळेच कितीतरी भग्न मंदिरांची पुनर्बांधणी करणे सोपे होत आहे.

मंदिरांच्या बाह्य भागावर वैविध्यपूर्ण शिल्पांची रेलचेल आहे, तरीसुद्धा या सर्व शिल्पांमध्ये स्त्री शिल्पे विलक्षण आकर्षक आहेत. अप्सरा, यक्षिणी, नर्तिका, माता, प्रेमिका, पोपटाचा पिंजरा दाखवून सूचित केलेकी अनुभवी गणिका अशा विविध स्वरूपांत ती दिसतात. त्या प्रत्येकीचे अलंकार , वेशभूषा, केशभूषा यातही वैविध्य दिसते. त्या त्रिभंग - म्हणजे तीन ठिकाणी वाकलेल्या अशा पोझमध्ये कोरल्यामुळे त्रिमित (३ dimensional) effect आला आहे. या शिल्पांचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे चेहऱ्यावरील वात्सल्य ,माया, प्रेम, खट्याळपणा, लज्जा, तल्लीनता अशा अनेक भावमुद्रांचे प्रदर्शन. निर्जीव दगडामधून इतकी जिवंत कलाकृती निर्माण केलेली पाहून मन थक्क होते.

या शिल्पांमधील काही स्त्रियांच्या पायावर, मांडीवर विंचू कोरलेले दिसतात. त्या तरुणी कामविव्हल झाल्या आहेत असेच शिल्पकाराला सुचवायचे आहे. तेव्हाच मला आठवण झाली ती, ‘दैय्या रे दैय्या रे चढ गयो पापी बिछुवा’ किंवा ‘मला इष्काची इंगळी डसली’ या सुप्रसिद्ध गाण्यांची. विंचवाला प्रत्यक्ष संग नसल्याने तो कायम अतृप्त असतो, म्हणून विंचू हे कामेच्छेचे प्रतीक मानले जाते. विंचवाला संस्कृतमध्ये ‘खर्जूर’ म्हटले जाते, कदाचित यामुळेच या शहराला 'खर्जूर वाहक' म्हणजेच ‘खजुराहो’ हे नाव पडले असावे.

ही मंदिरे पाहण्यासाठी, त्यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून लाखो प्रवासी येथे येतात, त्याला कारणही तसेच रोचक आहे - ते म्हणजे इथली मिथुनशिल्पे. तसे पाहता मंदिरावरील एकूण शिल्पांमध्ये मिथुनशिल्पे फक्त १०% आहेत, तरीसुद्धा खजुराहो म्हटले की चर्चा होते ती याच शिल्पांची. कामसूत्रातील प्रत्येक विषय- उदा., साजशृंगार, विरह, पत्रलेखन, प्रियाराधन, याशिवाय आलिंगन, चुंबन आणि प्रत्यक्ष समागमातील विविध स्थितीतील शिल्पेही दिसतात. मानवी मनातील, संभोगची प्रत्येक कल्पना शिल्पकाराने कुठल्याही संकोचाशिवाय अगदी उन्मुक्तपणे साकारली आहे. त्यात समूह कामक्रीडा, प्राणिसंभोग हे विषयही आहेत. परंतु ती अतिशय रसपूर्ण आहेत, त्यात कुठेही अश्लीलता नाही.
k2
हिंदू धर्मात कायमच अध्यात्म, वैराग्य यासारख्या गोष्टींना महत्त्व दिले आहे. असे असताना शिव किंवा विष्णू मंदिराच्या बाह्य भागावर ही प्रणयधुंद शिल्पे का कोरली असावीत, याबाबत कोणत्याही शिलालेखात किंवा ग्रंथात काही स्पष्ट असा उल्लेख नाही. वास्तुस्थापत्याच्या संदर्भातील बृहत संहिता, अग्निपुराण अशा काही ग्रंथांतून, स्त्री शिल्पे किंवा मिथुनशिल्पे ही मंदिराच्या बाह्य भागावर असणे मंगल असते, असा उल्लेख मात्र सापडतो. परंतु तरीही एवढ्या प्रचंड प्रमाणात आणि इतक्या बारकाव्यांसह ही शिल्पे असण्याचे कारण काय असावे, याविषयी अनेक मते आहेत. कोणाच्या मते, हिंदू धर्मात सांगितले गेलेले चार पुरुषार्थ - धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे या शिल्पातून दाखवले आहे, तर काहींच्या मते वात्सायनाच्या कामशास्त्र या ग्रंथाची, कलारूपातील ही अभिव्यक्ती आहे. भारतात नवव्या-दहाव्या शतकात बौद्ध धर्माचा प्रभाव खूप होता, त्यामुळे अनेक लोकांचा तिकडे ओढा होता, तरुणांना सन्यासापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने ही निर्मिती झाली असावी, असाही काही लोकांचा अंदाज आहे. या शिल्पांचा संबंध शाक्त संप्रदायांच्या गूढ तांत्रिक विधींशी असावा, असे काही विद्वान मानतात.

मध्ययुगात भारतात तंत्रमार्गाला आणि त्याच्या योगाचार पद्धतींना महत्त्व प्राप्त झाले होते, त्याचे प्रतिबिब मंदिरस्थापत्यातही आढळते. ही कामशिल्पे म्हणजे तंत्रसाधनेतील संधा भाषा (जे दिसते ते नसून वेगळा अर्थ सांगणारी) आहेत, असे म्हटले आहे. या मताप्रमाणे, शिल्पामध्ये दाखवलेला पुरुष हा साधना करणाऱ्या तांत्रिकाचे आणि त्याच्याबरोबरची स्त्री ही कुंडलिनी शक्तीचे प्रतीक आहे. कुंडलिनी जागृत झाली की अनेक सिद्धी अवगत होतात आणि मोक्षाचा मार्ग खुला होतो, ही यामागची संकल्पना आहे.

हिंदू धर्मात मंदिरांचा उपयोग नेहमी एखादी संकल्पना लोकांसमोर मांडण्यासाठी केलेला आढळतो. मंदिर ही तत्कालीन समाजाचे एक श्रद्धेचे स्थान होते. त्याभोवती सर्व समाज एकत्र येत असे. कलाप्रदर्शन करण्याचे, सामाजिक शिक्षणाचे ते एक केंद्र होते. अशा वेळी ती कल्पना किंवा विचार अनेक प्रतीकांच्या आधारे मांडला जात असे. ही मंदिरे म्हणजे विश्व आणि मानवी जीवन यांची प्रतिकृती आहे. त्यावरील शिल्पांची मांडणी शरीरातील सात चक्रे आणि त्याचा शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक प्रगती यांचा परस्पर संबंध दर्शवतात. अतिसूक्ष्म आणि अतिभव्य या दोहोंतील समानता त्यात प्रतीत झाली आहे. मंदिरांचे स्थान, नकाशा, त्यांचे बाह्य रूप, त्यावरील शिल्पे, चिन्हे, कळस असा प्रत्येक element त्यामागच्या संकल्पनेचाच भाग आहे.

वास्तुकाराने हिर्‍याच्या खाणी असलेल्या पन्नाच्या जवळील विंध्य पर्वतरांगानी वेढलेली ही सुंदर जागा मंदिरांसाठी निवडली आहे. हिर्‍याइतकेच अमूल्य अशा मानवी जीवनाचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न इथूनच तर सुरू होतो. याचा नकाशासुद्धा मानवी जीवनाचेच रूप समोर मांडतो.

या मंदिराचे जगती (प्लिंथ), अर्धमंडप, मंडप, महामंडप, अंतराळ, गर्भगृह आणि त्यावर स्थापित सर्वोच्च असा कळस असे भाग पडतात. मानवाच्या जीवनाची बैठक मंदिराच्या जगतीप्रमाणे आई-वडिलांच्या आधाराने सुरू होते. अर्धमंडप आणि मंडप याप्रमाणे आयुष्यात येणार्‍या अनेक व्यक्ती, अनुभव आणि त्यामुळे येणारी प्रगल्भता शारीरिक पातळीवरून भावनिक पातळीवर पोहोचते.

पुढे महामंडप आणि गर्भगृह यांना जोडणारा ‘अंतराळ’ हा मंदिरातील भाग विशेष महत्त्वाचा. मनुष्याच्या मनातील भीती, शंका, आसक्ती यांचेच जणू तो प्रतीक आहे. मंदिराच्या बाह्य भिंतीवरील शिल्पांची रचना, त्यांची मांडणी हीसुद्धा याच संकल्पनेला प्रतीत करते. बाह्य भागावरील शिल्पे तीन स्तरांत विभागली आहेत.
k3
सर्वात खालचा, प्लिंथ (जगती)पर्यंतचा स्तर - यावर, पाने-फुले, विविध सुंदर आकार रेखाटले आहेत. हे शारीरिक, नैसर्गिक गरजांचे द्योतक आहे. दुसरा स्तर म्हणजे प्लिंथ आणि शिखर याच्यामधील भाग. यावर अप्सरा, यक्ष, कामदेव, विविध उत्सव, मिरवणुका, युद्धप्रसंग यांचे चित्रण आहे. यात ऐहिक सुखे, इच्छा, मोह यांनी युक्त अशा मानवी जीवनाचा उत्सवच रेखांकित केला आहे. याच स्तरात ही विविध मिथुनशिल्पे आढळतात. कामवासना, इच्छा यात रममाण झालेला माणूस जीवनानंद तर घेत असतो, पण याच मोहमायेचा, म्हणजेच त्याच्या भावनांचा तो गुलाम होतो. मग जन्माला येते ती भीती.. भीती आपल्या प्रियजनांना गमावण्याची, आपल्या अहंकाराला सोडण्याची, वेदनेची, वार्धक्याची. हे अनुभव म्हणजेच आशा-निराशा यांचा खेळ. जीवनातील याच अवस्थेचे चित्रण मंदिरातील ‘अंतराळ’ या भागात दिसते. इथे व्याल शिल्पेही मोठ्या प्रमाणावर कोरली आहेत. व्याल म्हणजे ‘माणसाचे शरीर आणि प्राण्याचे मुख’ असलेले काल्पनिक संधी शिल्प. बर्‍याच वेळा ते यक्षाच्या किंवा अप्सरेच्या पायाशी कोरलेले आहेत, तर कधी डोक्यावर कोरले आहेत. ही शिल्पे मानवी मनातील इच्छांची द्योतक वाटतात. या इच्छांवर जो विजय मिळवतो, तोच आत्मिक आनंद अनुभवू शकतो, असेच काहीतरी यातून शिल्पकाराला सुचवायचे असावे.

मंदिराच्या बाह्य भागावरील शिल्पांचा तिसरा स्तर म्हणजे शिखरांचा भाग. इथे शिव, विष्णू, इंद्र, अशा देवतांची, तसेच अनेक abstract आकार यांची शिल्पे आहेत. या श्रेष्ठ देवता, इच्छाशक्ती, ज्ञान, नि:स्वार्थी प्रेम यांचे द्योतक आहेत. हा स्तर मानवी जीवनाच्या आध्यात्मिक पातळीचे प्रतीक आहे. मंदिराच्या अंतर्भागातील ‘अंतराळ’ हा भाग पार करून, म्हणजेच जीवनातील आसक्ती ला सोडून पुढे जातो आणि गर्भगृहात पोहोचतो. गर्भगृह म्हणजेच मुख्य देवतेची जागा, ज्यावर अत्युच्च शिखराचे छत आहे. हे स्थान, जिथे अनुभवास येते एकरूपता गर्भगृहातील देवतेशी.. हेच प्रतीक आहे आसक्ती आणि भीती यांना पार केल्यानंतरचा, आध्यात्मिक उन्नतिचा निखळ अनुभव, शिखररांगांवरील abstract शिल्पाकृतीप्रमाणे.. आभाळाला भिडणाऱ्या कळसाप्रमाणे.. अद्वैत, अनाकलनीय, अव्यक्त..

मानवी मन मोठे विचित्र आहे, अथांग आहे. त्यात अनेक इच्छा, भावना निर्माण होतात. जो या इच्छांना मारतो, तो कधीच आध्यात्मिक प्रगती करू शकणार नाही, तर अनेक विकृतींना जन्म देईल. म्हणून याच मनाला आपला मित्र बनवून सर्व ऐहिक सुख-समाधानाची प्राप्ती करून, परंतु त्यात न गुंतता, त्यांची आसक्ती न ठेवता आध्यात्मिक प्रगती साधणे, मोक्ष प्राप्त करणे शक्य आहे.

आज हजारो वर्षांपासून ही संपूर्ण वास्तू, त्यातले विज्ञान, गणित आणि कला यांच्या माध्यमातून येणाऱ्या अनेक पिढ्यांना संस्कृतींना हा अनमोल संदेश देत आहे.. देत राहणार. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला हा या अप्रतिम, अद्वितीय आणि अनमोल वारसा.. ही कलाकृती पाहणार्‍याला स्तिमित करते, भारावून टाकते हे खरे!

आर्किटेक्ट विजयश्री अभ्यंकर
बाणेर, पुणे

प्रतिक्रिया

"मानवी मन मोठे विचित्र आहे, अथांग आहे. त्यात अनेक इच्छा, भावना निर्माण होतात. जो या इच्छांना मारतो, तो कधीच आध्यात्मिक प्रगती करू शकणार नाही, तर अनेक विकृतींना जन्म देईल. म्हणून याच मनाला आपला मित्र बनवून सर्व ऐहिक सुख-समाधानाची प्राप्ती करून, परंतु त्यात न गुंतता, त्यांची आसक्ती न ठेवता आध्यात्मिक प्रगती साधणे, मोक्ष प्राप्त करणे शक्य आहे."

क्या बात है ! आपल्या अध्यात्मात साक्षी राहून कर्म करा असा जो बहु चर्चित संदेश आहे त्याचे अगदी थोडक्यात सार तुम्ही इथे सांगितले आहे. आवडले.

डिट्टो, हेच कोट करणार होतो!

- (अध्यात्मात साक्षी राहून कर्म करणारा) सोकाजी

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Nov 2020 - 10:44 am | ज्ञानोबाचे पैजार

लेख आवडलाच,
पण त्यातही हा परिच्छेद अतिशय भावला
धन्यवाद,
पैजारबुवा,

संजय क्षीरसागर's picture

14 Nov 2020 - 2:17 pm | संजय क्षीरसागर

मध्ययुगात भारतात तंत्रमार्गाला आणि त्याच्या योगाचार पद्धतींना महत्त्व प्राप्त झाले होते, त्याचे प्रतिबिब मंदिरस्थापत्यातही आढळते. ही कामशिल्पे म्हणजे तंत्रसाधनेतील संधा भाषा (जे दिसते ते नसून वेगळा अर्थ सांगणारी) आहेत, असे म्हटले आहे. या मताप्रमाणे, शिल्पामध्ये दाखवलेला पुरुष हा साधना करणाऱ्या तांत्रिकाचे आणि त्याच्याबरोबरची स्त्री ही कुंडलिनी शक्तीचे प्रतीक आहे. कुंडलिनी जागृत झाली की अनेक सिद्धी अवगत होतात आणि मोक्षाचा मार्ग खुला होतो, ही यामागची संकल्पना आहे.

तंत्रमार्ग हा प्रचलित आणि प्रस्थापित अध्यात्माच्या नेमका विरुद्ध मार्ग आहे. षड्रीपूत काम हा प्रथमस्थानी आहे आणि त्याच्यावर विजय मिळवल्याशिवाय स्वरुपोलब्धी असंभव आहे अशी पूर्वापार अध्यात्मिक धारणा आहे. तंत्रमार्गात, संगातूनच समाधी प्राप्त होईल अशी संकल्पना आहे.

थोडक्यात, अध्यात्मात काम हा स्वतःप्रत येण्यात प्रमुख विक्षेप मानला गेला आहे, तर तंत्रात रतीसंगातून दोघांनाही स्वतःप्रत येता येईल असा दावा आहे कारण कामेच्छा हा विक्षेप नसून निसर्गनिर्मित आकर्षण आणि उर्जा आहे.

खजुराहोतली सर्व कामशिल्पं त्या मोहक आणि मग्न अवस्थेची प्रतिकं आहेत.

विंचवाला संस्कृतमध्ये ‘खर्जूर’ म्हटले जाते, कदाचित यामुळेच या शहराला 'खर्जूर वाहक' म्हणजेच ‘खजुराहो’ हे नाव पडले असावे.

हे रोचक आहे!

- (अभ्यासू) सोकाजी

कंजूस's picture

14 Nov 2020 - 2:57 pm | कंजूस

शृंगारशिल्पे कसली प्रतिके आहेत किंवा त्या काळी होती माहिती नाही. किंवा गाईड लोकं त्यामागचं तत्त्वज्ञान जीव तोडून सांगत असतात पर्यटकांना. आता मात्र "आप खजुराहो देखने जा रहे हो?/ देख कर आये? आरारा।" असं ऐकावं लागतं.

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 3:50 pm | टर्मीनेटर

@विजयश्री अभ्यंकर

'खजुराहो..'

हा लेख आवडला  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

सुधीर कांदळकर's picture

15 Nov 2020 - 5:03 pm | सुधीर कांदळकर

शिल्पकला शिल्पांची मांडणी आणि त्यामागील तत्वज्ञान छान उलगडून दाखवले आहे.मुख्य म्हणजे लेख बोजड वा रटाळ न करतां. लेखनाची छान शैली आहे. यानंतर शिल्पे पाण्यासाठी नवा विचार मिळाला. धन्यवाद.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Nov 2020 - 11:13 pm | अमरेंद्र बाहुबली

छान

चौथा कोनाडा's picture

21 Nov 2020 - 1:26 pm | चौथा कोनाडा

रोचक विषयावरील माहितीपुर्ण लेख
हे दोन लेख आठवले:
https://www.misalpav.com/node/46214
https://www.misalpav.com/node/46214

प्रचेतस's picture

22 Nov 2020 - 8:05 am | प्रचेतस

लेखन आवडले. खजुराहो मस्ट व्हिजिट यादीत आहेच. बघू कधी जमते ते.

मुक्त विहारि's picture

24 Nov 2020 - 9:39 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद...

मित्रहो's picture

25 Nov 2020 - 10:10 pm | मित्रहो

माहिती बद्दल धन्यवाद