'करोना' प्यार है!!

Primary tabs

aschinch's picture
aschinch in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 am'करोना' प्यार है!!

खरंतर लॉकडाऊनच्या काळात माझा जीव हैराण झाला होता ! घराच्या भिंती अंगावर व्हायरस सारख्या अंगावर यायच्या. अशा या वातावरणात प्रेम वगैरे जमण्याचे काहीच कारण नव्हते ! पण म्हणतात ना प्रेमाला काही स्थळ काळाचे बंधन नसते. शिंक जशी आल्यावर थांबवता येत नाही, तसेच प्रेम आले की थांबवता येत नाही !

तसेच काहीसे माझ्या बाबतीत झाले. करोनाच्या काळात मी सकाळी सकाळीच भाजी घ्यायला जातो काय, तिथे कुणी भेटणार नाही अशी अपेक्षा असताना ती भेटते काय, ते सगळे नवलच होतं. तिचा मास्कच्या मागे दडलेला अर्धा चेहरा सुध्दा मला खूप आकर्षून गेला. ते सुंदर, बोलके डोळे, नाजुकसे कान, नितळ कपाळ,काळेभोर केस सगळेच मला भावून गेले. त्यावेळी तुझा तो मुखचंद्रमा मला सॅनीटायझर सारखा स्वच्छ आणि निर्मळ वाटला. पहिल्याच भेटीत इन्फेक्शन व्हावे तसा मी तिच्या प्रेमात पडलो. योगायोगाची गोष्ट म्हणजे ती पण त्यावेळी माझ्याकडेच बघत होती. मास्कच्या आडून ती माझ्याकडे बघून हसल्याचा मला भास झाला.

मग हा नेहमीचाच नित्यक्रम झाला. एरवी घरातील कामे करण्याचा कंटाळा करणारा मी, अगदी न चुकता रोज भाजी आणायला जाऊ लागलो. ती पण नेमकी त्याच वेळेला तेथे यायची. आमची नजरानजर व्हायची आणि ती लाजून हसायची. लॉकडाऊनच्या काळात आमचे हे प्रेम असे फुलत गेले. सगळ्या जगाला करोनाची लागण झाली असताना आम्हाला मात्र प्रेमाची लागण झाली. आणि एक दिवस मी तिला हिंमत करून एक गुलाबाचे फूल आणि मास्क दिला. आश्चर्य म्हणजे तिने त्याचा स्वीकार तर केलाच पण तो मास्कही दुसऱ्या दिवशी ती घालून आली. ही म्हणजे एक प्रकारे तिच्या प्रेमाची कबुलीच होती. मला त्या दिवशीपासून करोनामुक्त रुग्णाप्रमाणे हलके आणि मुक्त वाटू लागले.

ज्याप्रमाणे सरकारी वैद्यकीय कर्मचारी रोज न चुकता क्वारनटाईन केलेल्या व्यक्तींची चौकशी करतात, तसेच मी तिला रोज भेटू लागलो. हळूहळू मग आम्ही एकमेकांकडे बघून हसू लागलो आणि बोलूही लागलो.
मग हळूहळू फोन नंबर्सचीही देवाणघेवाण झाली आणि एकमेकांना व्हॉट्सअँप मेसेज पाठवणे पण सुरू झाले. मी तिला “गुड मॉर्निंग” चे मेसेज पाठवू लागलो. ती पण उशिरा का होईना पण प्रतिसाद देऊ लागली. सगळे कसे करोनापूर्व दिवसांप्रमाणे व्यवस्थित सुरू होते. पण मग काही दिवस ती सकाळी भाजी घ्यायला आली नाही.
मी जरा चिंतेत पडलो.

पण एक दिवस माझा जिगरी दोस्त गौरव भेटला आणि मला म्हणाला, " अरे तुझे ते प्रेम प्रकरण कुठपर्यंत आले आहे?"
"होय, पण तुला कुणी सांगितले?" मी आश्चर्याने विचारले.
"अरे, या गोष्टी कधी लपतात का? जसे बिल्डिंगमधे कुणाला करोना झाला की सगळ्यांना कळते तसेच आहे ते!" तो डोळे मिचकावत म्हणाला. मग तो पुढे म्हणाला," अरे, पण सावध रहा बाबा! तिच्या घरात कोणीतरी पॉझीटीव्ह आहे म्हणे!"
"पॉझीटीव्ह आहे ना? मग चांगलेच आहे. मलाही पॉझीटीव्ह लोकच आवडतात. उगीच नकारार्थी बोलणारे लोक नकोतच!" मी म्हणालो.
"अरे, पॉझीटीव्ह म्हणजे तसे नाहीत, करोना पॉझीटीव्ह आहेत ते!" तो म्हणाला.
"बापरे" मी उडालोच.
"थोडा सांभाळून रहा" गौऱ्या म्हणाला.
"म्हणूनच दिसली नाही ती दोन तीन दिवसांत" मी म्हणालो.
"तेच तर, क्वारनटाईन असेल ती." तो म्हणाला," लेका, तूही क्वारनटाईन असता तर दोघांनी मिळून गाणे तरी म्हटले असते की हम तुम एक कमरेमे क्वारनटाईन हो" तो मोठ्याने हसत म्हणाला.
का कुणास ठाउक, पण त्याच्या जोकवर मला हसू आले नाही. कुणी घरात पॉझीटीव्ह असेल तर त्यात विनोदी काय आहे? मी विचारात पडलो.
घरी आल्यावर तिला मेसेज पाठवला." सगळे ठीक आहे ना?"
थोड्या वेळाने तिचे उत्तर आले," हो, ठीकच आहे" मग पुन्हा थोड्या वेळाने तिचा मेसेज आला. त्यात तिच्या कुटुंबावर आलेल्या संकटाची पूर्ण हकीकत होती. शेजारी कसे कोणीच मदत करीत नाहीत आणि बाहेर न जाता आल्यामुळे सामानही आणता येत नाही, याचे हृदयद्रावक वर्णन होते.

ते वाचून मला मात्र एखाद्या हिरोसारखा चेव आला. नायिका संकटात सापडल्यावर नायक काहीही अग्निदिव्य करायला तयार होतो, तसाच मीही तयार झालो. मग त्या दिवसापासून ती मला रोज व्हॉट्सअँप वर सामानाची यादी पाठवायची. मी ते सगळे सामान विकत घेऊन त्यांच्या घराच्या दारासमोर नेऊन ठेवायचो. कधीतरी एखादी खिडकी उघडून ती मला दिसेल अशी मला आशा वाटायची, पण कसचे काय? दार, खिडक्या एकदम बंद ! एकदा मी पिशवी ठेवून काहीतरी विसरलो म्हणून पुन्हा वर गेलो, तर पिशवी गायब! काही क्षणातच पिशवी आतमध्ये ओढल्या गेली होती. तिच्या या बिकट परिस्थितीत सामानाचे पैसे मागणे शक्यच नव्हते. एकदा लग्न झाले की व्याजासह वसूल करू, असा गोड विचार करून मी सुखावायचो!

पाहता पाहता असे दहा दिवस होऊन गेलेत. माझ्या क्रेडिट कार्डवरील बिल वाढतच गेले. तिच्या सामानाच्या यादीत महागाच्याही वस्तू असत, पण म्हणतात ना प्रेमात आणि युध्दात सगळे क्षम्य असते. मी रोज न चुकता सामानाची पिशवी ठेवतच होतो. पण दार किंवा खिडकी उघडायचे काही लक्षण दिसत नव्हते." छुपनें वाले सामने आ", "उघड दार देवा आता" सारखी गाणी मला म्हणाविशी वाटू लागली, पण दार काही उघडेना.

पण पुढचे काही दिवस रोज घरामध्ये काही चमत्कारिक बदल दिसू लागले. एकदा दारावर काहीतरी सजावट केलेली दिसली. कधी घरावर रोषणाई केलेली दिसे. एकदा तर दारासमोर रांगोळी काढलेली दिसली. मला अनेकदा दाराची बेल वाजवून विचारपूस करायचा मोह होई, पण क्वारनटाईन भंग होईल, म्हणून मी तो मोह आवरला.

आणि एक दिवस तर कमालच झाली. सामानाची पिशवी ठेवून मी परत यायला निघालो तर मला दारात चक्क एक पत्रिका दिसली. मी कुतूहल म्हणून बघितले तर त्यावर माझेच नाव होते. मी उत्सुकतेने पत्रिका उघडली तर डावीकडे मुलीच्या नावाच्या जागी तिचेच नाव होते. च्यायला ! असा गोड डाव आहे तर! चक्क लग्नाचीच पत्रिका? माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. धडधडत्या हृदयाने मी उजवीकडे मुलाचे नाव बघितले ! पण तिथे माझ्या नावाच्या ऐवजी दुसऱ्याच कुणाचे तरी नाव होते. काही प्रिंटिंग मिस्टेक तर नाही ना, म्हणून मी परत डोळे चोळून पाहिले, पण ते दुसऱ्याच कुणाचे तरी नाव होते! आणि लग्नाची तारीख पण पुढच्याच आठवड्यातच होती ! मी पत्रिका पाहण्यात गुंग होतो, तेवढ्या वेळात दार हळूच उघडले आणि एका नाजूक हाताने सामानाची पिशवी पटकन आत ओढून घेतली! त्या नाजुक हातावरची मेहंदी सुध्दा मला स्पष्ट दिसली. मी जिने उतरून खाली उतरलो तेव्हा मला समोरचे काहीच दिसत नव्हते. डोळ्या समोर अंधारी आल्यासारखे वाटत होते! त्या दिवसापासून मी पूर्णपणे लॉकडाऊन मध्ये गेलो. घरातून बाहेर पडण्याची इच्छाच उरली नाही!

एकदा रात्री फटाके फुटण्याचे आवाज आले, म्हणून मी खिडकी उघडली तर खिडकीतून तिच्या बिल्डिंग वरील रोषणाई दिसली. मी रागाने खिडकी बंद करून टाकली! करोनाने जशी सगळ्या जगाची वाट वाटली तशी माझ्या प्रेमप्रकरणाची पण वाट लावली ! सध्या मी बँकेत क्रेडिट कार्डचे बिल हफ्त्यावर फेडता येईल का? या बद्दल चौकशी करतो आहे!
****************"
अविनाश चिंचवडकर
बंगलोर
avinashsc@yahoo.com
9986196940

प्रतिक्रिया

खुसखुशीत जमून आलेल्या चिरोट्यासारखी कथा. मजा आली.

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 8:12 pm | टर्मीनेटर

@aschinch

'करोना' प्यार है!

ही तुमची कथा आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

मित्रहो's picture

17 Nov 2020 - 8:01 pm | मित्रहो

करोना प्यार आवडला. मस्त

MipaPremiYogesh's picture

17 Nov 2020 - 10:00 pm | MipaPremiYogesh

वाह एकदम खुसखुशीत आणि मस्त विनोदी लेख

सुखी's picture

24 Nov 2020 - 12:05 am | सुखी

हेहे मस्त खुसखुशीत

रंगीला रतन's picture

24 Nov 2020 - 12:12 pm | रंगीला रतन

चांगली आहे विनोदी कथा.

या अंकातील मी हि पहिलीच कथा वाचली..
मस्त जमली आहे..

करोना प्यार है.. शिर्षक भारी..

चौथा कोनाडा's picture

25 Nov 2020 - 1:03 pm | चौथा कोनाडा

करोनाच्या पार्श्वभुमीवरील धमाल फसवणूक कथा जाम आवडली !

😍

भारी +१ असचिंच !

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Nov 2020 - 5:18 pm | ज्ञानोबाचे पैजार

भारी लिहिली आहे गोष्ट
मजा आली वाचताना
पैजारबुवा,