प्रामाणिक प्रेमाची आर्त संवेदना...

Primary tabs

आशिष निनगुरकर's picture
आशिष निनगुरकर in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amप्रामाणिक प्रेमाची आर्त संवेदना...

प्रेम हा अडीच अक्षरी शब्द. पण,या शब्दाच्या आत दडलेली भावना मात्र लाखमोलाची असते.खरं तर प्रेम कुणावर करावं,कुठं करावं याला काही ठराविक साचा नाही.खरं तर प्रेम ही अंतर्मनाची प्रक्रिया असते. त्यामुळे स्थळ,काळ आणि वेळ या बाबी गौण ठरतात.एक मात्र खरे कि, ही प्रेमभावना जोपर्यंत टिकून राहते; तोपर्यंत मन हिंदोळे खात राहत.पण एकदा त्यात व्यत्यय आला कि प्रेमाची जागा विरह घेतो. आजचा जमाना खूप फास्ट आहे.सगळ्यांना सगळचं पटकन हवं असतं.मोबाईल आणि इंटरनेटच्या काळात घरा-घरातील संवाद कमी झाला आहे.घरे दुभंगली जात आहेत.माणुसकी हरवत चालली आहे.हे आजच्या काळात दिसणारे भयानक वास्तव आहे.त्यात आजची तरुणाई फार 'स्मार्ट' झाली आहे.स्मार्टफोनच्या जगात फार बिझी झाली आहे.या फास्ट लाईफ मध्ये कुणाचीतरी सोबत हवी असते.त्यातच प्रेम होते.

प्रेम हे चिरकाल टिकणारे असते.प्रेम ही विश्वजाणीव असणारी जीवनाच्या उत्सवातील महत्वाची घटना असून,ज्ञानाशिवाय प्रेम नाही अन प्रेमावाचून कविता नाही.हवे ते मिळाले नाही म्हणून रडत-कुढत बसण्यापेक्षा
किंवा प्रेमात जशी माणसे पडतात असं वागण्यापेक्षा नव्या उमेदीने उभे राहून लढण्याची जिद्द दाखवून यशस्वी होणाऱ्या नायकाची तरल संवेदना मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.आशा- निराशेत हेलकावणाऱ्या तरुणाची दशा-दिशा यातून दिसेल.प्रेम लढाईत जिंकण्याची उमेद असलेले अनेक या लढाईत मुक्तछंदाने लढा
देतात.'प्रेमात सगळं माफ माफ असतं' असं म्हणतात.प्रेम कुणावर करावं तर तुमच्या मनात जे असेल त्याच्यावर करावं.या प्रेमासाठी धाडस करावं लागतं.कदाचित समोरचाही तुमच्यावर प्रेम करीत नसेल कशावरून?

विचार कर मना,विचार कर मना
एकदा वेळ गेली कि येत नाही पुन्हा
असेल मनात कुणी,तर व्यक्त करा प्रेम
थांबेल ती तुमच्यासाठी याचा नाही काही नेम...

कदाचित तुम्हाला कल्पनाही नसेल कि,समोरची व्यक्ती तुमच्यावर जीवापाड प्रेम करतेय.पण,हे जेव्हा व्यक्त होतं तेव्हा स्वतःचाच स्वतःवर विश्वास राहत नाही आणि आपण स्वप्न तर बघत नाही ना,अशी अवस्था होते.

खरंच ना...
हे स्वप्न तर नाही ना?
माझ्या जिवनात तुझे येणे,
हा भास तर नाही ना?

एकदा या प्रेमावर शिक्कामोर्तब होऊन जिवात जीव गुंतला कि मग सुरु होतात प्रेमाच्या आणाभाका.आठवणींचं तर मनात काहूरच उठतं. जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी हे प्रेम आपल्याला दिसत राहतं. आणि मग...

मन झुरत जातं
हृदय फाटत जातं
आठवण आली तुझी कि
नकळत डोळ्यात पाणी येतं....

प्रेम-प्रेम आणि फक्त प्रेम या जाळ्यात गुरफटल्यांनंतर मनाची जी घालमेल होते ती तर शब्दांच्या पलिकडे असते.प्रेम कशाला म्हणायचं हे समजत नाही पण मनाची जी तडफड होते ती तर विचारूच नका.

प्रेम काय आहे हे मला माहित नाही
प्रेम झाले तेव्हा कळलेच नाही
प्रेम म्हटल्यावर तुझाच भास होतो
तू नसते तेव्हा,हृदयाच्या प्रत्येक
ठोक्याबरोबर... थोडासा त्रास होतो

प्रेमाशी एकरूप झाल्यानंतर जीव कसा वेडापीसा होतो वरील काव्यपंक्तीतून नेमकेपणाने अधोरेखीत केले आहे.बऱ्याचदा हे प्रेम एकतर्फीही असते.आपल्यावर कुणी प्रेम करतंय याची पुसटशीही कल्पना समोरच्या व्यक्तीला नसते.मात्र,त्या व्यक्तिवर प्रेम करणारा इकडे बेधुंद झालेला असतो. त्याच्यासाठी हे प्रेम अनमोल ठेवा होऊन बसतो.

प्रेम काय असतं
एकासाठी फक्त आठवण तर
एकासाठी काहीच नसतं
प्रेम हे काय असतं
एकासाठी वेड लावणारं तर
एकाला कोण हा वेडा हेच माहित नसतं.

अशा प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमविराची प्रेमासाठी काहीही करण्याची तयारी असते.कारण त्याच्या प्रेमापुढे त्याला सगळ्या गोष्टी क्षुल्लक वाटायला लागतात. प्रेम हेच त्याचे सर्वस्व होऊन बसते. आणि मग तो नाना कल्पना करू लागतो.या कल्पना कल्पनेच्याही पलिकडे असतात.

आवडेल मला पाऊस व्हायला
न सांगता तुझ्या भेटीला यायला
धुंद होऊन तुझ्यावर बरसायला
केसांमधून पाठीवर हळुवार ओघळायला
अंगावरच्या काट्यांची वाट तुडवायला...

प्रेमात इतकं एकरूप झाल्यानंतर अचानक आघात व्हावा तसा प्रेमभंग होतो आणि सारं काही सुनंसुनं वाटायला लागतं. तरीही आपण जिच्यावर मनापासून प्रेम केलं 'ती' दुसऱ्याच्या प्रेमात तरी सुखरूप राहावी ही भावना मात्र मनात वास करून राहते.

मी होतो वेडा,म्हणून तुझ्यात अडकलो
रात्रंदिवस फक्त तुझा जप करू लागलो
देवासमोरही आता रोज हात जोडायला लागलो
ठार वेडा झालो होतो मी,हरवून गेलो तुझ्यात
तुला मात्र काळजी नाही,तू दुसऱ्याच्या प्रेमात
माझं जसं झालं तसं तुझं होऊ नये
माझा हात सोडून गेलीस,तुझा हात कुणी सोडू नये

प्रेमात आकंठ बुडालेल्या,प्रेमासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या,प्रेमासाठी झुरणाऱ्या आणि प्रेम विरहाने व्याकुळ होणाऱ्या अशा कितीतरी छटा रेखाटल्या आहेत.हे करतांना त्यांनी प्रेमविराच्या मनाचे विविध कंगोरे बेमालुमपणे उलगडून दाखवले आहेत.खरं तर पारंपारिक आणि वर्तमान प्रेमभावनेची उत्तम सरमिसळ प्रेमाचा
उलगडलेला अर्थ,आयुष्याच्या अनेक एकाकी अनवाणी वाटेवरील सोबतीचा श्वास
हरवल्याची जाणीव करून देतो.असा एकाकी प्रेमाचा गावं व त्यातून डोळ्यातील
तरलतेचा भाव ही प्रत्येकाच्या हृदयातील स्पंदनाची गाथा सांगणारी आहे.प्रेमानेच
जगायला,वागायला,बोलायला तसेच लिहायला शिकवले. अंतःकरणातील प्रेमाची प्रामाणिक संवेदना सांगणारा आहे.
..... ...... ....
आशिष अशोक निनगुरकर
द्वारा-राजेंद्र बने,सी-१०४,दत्तदिगंबर सोसायटी,
गौरीशंकरवाडी नं.१,पंतनगर,घाटकोपर [पूर्व],
मुंबई- ४०००७५. मो. नं- ९०२२८७९९०४

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 4:06 pm | टर्मीनेटर

@आशिष निनगुरकर

'प्रामाणिक प्रेमाची आर्त संवेदना...'

हा लेख आवडला  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

गोंधळी's picture

21 Nov 2020 - 3:07 pm | गोंधळी

अंतःकरणातील प्रेमाची प्रामाणिक संवेदना सांगणारा लेख आवडला.

rushikapse165's picture

28 Nov 2020 - 12:42 pm | rushikapse165

खरंच प्रेम म्हणजे शब्दांपलिकडचे.ती नाही भेटणार नाही ठाऊक असतानाही तिचा विचार करणं,सतत तिलाच तिची आठवण येणं .कधी त्रासदायक तर कधी आनंदाच असतं.शेवटी प्रेम हे प्रेम असतं.