ये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना...

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना..

वृषभ : शुक्र मकरेत, गुरू मिथुनेत, आणि गुरू कुंभ राशीत. प्रेमात पडायचा जबरदस्त योग. आर्थिक चणचण भासेल, पण मित्रांकडून योग्य वेळी मदत मिळेल.
हॅ साला! कायपण भविष्य लिहिलेय. प्रेमात पडायचा जबरदस्त योग - म्हणजे जगातले वृषभ राशीचे सगळे लोक या आठवड्यात प्रेमात पडणार.
गम्मतच आहे ना! ज्यांचे लग्न झाले आहे, त्यांनी कोणाच्या प्रेमात पडायचे? आणि समजा ते पडले प्रेमात, तर? सगळीकडे बोंबाबोंब. बायकोने विचारले तर काय या संपादकांनी आठवड्याचे भविष्य लिहिलेय त्याकडे बोट दाखवायचे? आणि जे काही होईल ते या संपादकांनी लिहिलेल्या साप्ताहिक भविष्य या कॉलममुळे झाले असा ‘ब्लेम इट ऑन रिओ’ पावित्रा घेऊन टाकायचा. हा हा हा! मजा येईल. प्रेमात पडायला मिळणार ही कल्पनाच एकदम कायापालट करून टाकते. माणसाचे विचार बदलून टाकते. एकदम चिरतरुण बनवून टाकते. उगाच नाही देव आनंद इतका उत्साही असायचा. ‘प्रेमात पडायचा जबरदस्त योग!’ हे वाक्यच मनाला गुदगुल्या करतेय. ते भविष्य पुन्हा पुन्हा वाचत राहिलो. मीनेटवर मराठी ई पेपर वाचतोय. मराठी वर्तमानपत्र वाचले की स्वीडनमध्ये बसूनही आपल्या शहरात फेरफटका मारल्याचा आनंद मिळतो.
‘आयुष्यात पुन्हा म्हणून प्रेमात पडायचे नाही. एकदा पडलो होतो ते खूप झाले’ ही आपली प्रतिज्ञा. या आठवड्यात ती कशी काय मोडणार, कोण जाणे. गम्मत आहे. खरे तर साप्ताहिक भविष्य ही करमणुकीची गोष्ट. जवळजवळ प्रत्येक जण ते उत्सुकतेने वाचतो. रेल्वे स्टेशनवरच्या वजन करायच्या मशीनमधून बाहेर आलेल्या तिकीटामागेसुद्धा भविष्य दिलेले असते. एका मिनिटानंतर पुन्हा वजन केले तर वजन तेवढेच राहते, पण मागे लिहिलेले भविष्य बदललेले असते.
लहान असताना एकदा कोणालातरी सोडायला म्हणून स्टेशनवर गेलो होतो. गाडीला यायला अवकाश होता. गम्मत म्हणून वजन केले. काय २५ सत्तावीस किलो असेल. त्या वजनाच्या तिकिटामागचे आलेले भविष्य अजून आठवते – ‘आपकी जीवन सहचरी बडी मजेदार होगी. यद्यपि आपके जीवन मे उसे आने मे बहुत अवधी है|’ वयाच्या दहाव्या वर्षी हे असले भविष्य! बरेच दिवस मी तिकीट लपवून ठेवले. तरीही तायडीला सापडलेच. तिने वजन वाचायच्या अगोदर भविष्य वाचले आणि थेट आईला सांगितले. कायलाजलो होतो ना. घरातून बाहेर पळून गेलो होतो. आई काहीतरी बोलेल याची भीतीही वाटत होती. आत्ता आठवले की गम्मत वाटते, पण तेव्हा टरकलो होतो.
ती आठवण माझ्या चेहर्‍यावर प्रत्येक वेळेस एक स्मितरेषा उमटवायची.
वर्षा.. आपले पहिले क्रश. छान बॉयकट उभट चेहरा. नाजूक. शिडशिडीत. रॅकेट घेऊन बॅडमिंटन कोर्टवर उभी राहिली की एकदम स्टेफी ग्राफच वाटायची. शाळेची बॅडमिंटन चँपियन. तिला एकसारखे बघत राहावेसे वाटायचे. ती आपल्यापुढे एक वर्ष आहे हे समजल्यावर फार वाईट वाटले होते. ‘क्रश’चा एकदम ‘क्रॅश’च झाला होता. त्यानंतर पुन्हा क्रश झाले नाही.
मेकॅनिकल इंजीनिअरिंगचा वर्ग म्हणजे तसाही मुलींचा दुष्काळ. शेफाली मादमशेट्टीवार नामक एकमेव खजुरीच्या झाडाला सगळा वर्ग पाहायचा. अर्थात तीही तितकीच बिंधास्त. कदाचित आमच्याबरोबर राहून तिच्यातही मुलींपेक्षा मुलांचेच गुण जास्त आले होते. तिच्या त्या नागपुरी टर्रेबाज हिंदी-मराठी मिक्स भाषेला सगळेच वचकून असायचे. कधी कुणाची विकेट काढेल हे सांगता यायचे नाही. श्रीनिवास गुंटापल्ली हैदराबादकडचा. एकदा बोलताना म्हणाला होता, "क्या रे शेफाली, हमे जब चाय पिते ना, तब कप सर कु लगाते या सर कप कु लगाते?"
“क्यों, क्या हुवा??”
“वो देख ना, तुम चाय पिते है ना, तब एक बार सर कपकु लगाते, तो एक बार कप सर कु लगाते.”
श्रीनिवास विचारत होता की आपण चहा पिताना तोंड कपाकडेनेतो की कप तोंडाकडेनेतो. पण त्याच्या त्या हैदराबादी टोनमुळे तो काय म्हणतोय ते पटकन कुणाच्याच लक्षात आले नाही. तो काय म्हणतोय ते शेफालीला चटकन समजले.
" श्रीनी, पेन्सिल शार्पन करते है तो शार्पनर पेन्सिल के पास गया या पेन्सिल शार्पनर के पास गयी, क्या फर्क पडता है? छुरी टरबूज पर गिरे या टरबूज छुरी पर, कटेगा तो टरबूज ही| सर कप कु लगाया या कप सर कु लगाया, हमे चाय पिने से मतलब." शेफालीने श्रीनीला त्याच्याच टोनमध्ये उत्तर दिले.
ते दोघेही काय काय बोलले ते समजले, तेव्हा अख्खे कँटीन हसण्यात बुडून गेले. श्रीनीला आपले काय चुकले तेच समजले नाही. सेकंड इयरचा राम गढवाल सर्वात शेवटी हसायलालागला, तेव्हा शेफालीने त्याला झापला. “ए ट्यूबलाइट.. हसने जैसा क्या है बे? आज सुबह तूने दाढी बनाया है तो रेझर एकही गाल पर घुमाया है. पता है तुम्हे?” राम गढवालने अभवितपणे गालावर हात फिरवला. ज्याला समजले तो पुन्हा हसत सुटला. पब्लिकमध्ये रामचा कचरा झाला होता.
शेफालीच्या वागण्यामुळे ती एक मुलगी आहे हेच आम्ही विसरून जायचो. प्रॅक्टिकल्सला तीच आम्हाला मशीन सेटिंगमध्ये मदत करायची. तिच्या त्या वेळच्या वागण्यामुळे कोणी तिच्या प्रेमात पडू शकेल असे कधी वाटलेच नाही.
कॉलेजचे फूलपाखरी दिवस वगैरे काही कधी जाणवलेच नाहीत. नाही म्हणायला होस्टेलवर भिंतीवर बो डेरेक, श्रीदेवी, जयाप्रदा, माधुरीची इंग्लिश पेपरमध्ये आलेली चित्रेलावलेली असायची. श्रीनीच्या वहीवर कधीतरी कोणी भानुप्रिया की शांतीप्रिया अशा नावाच्या तेलगू नट्यांचे फोटो असायचे. चित्र पाहताना प्रथम डोळ्यात भरायचे ते तिचे काजळाची किनार असलेले डोळे.
काय छान डोळे आहेत नाही हिचे! आपण लग्न करू तर असे डोळे असलेल्या मुलीशीच. बहुधा आमच्यापैकी प्रत्येकानेच ते ठरवले असावे. श्रीनीच्या वहीवर कोणी कधीच गिरगोटे केले नाहीत. एक बरे की मराठी नट्यांचे फोटोलावायची टूम कुणी काढली नाही ते. नाहीतर अलका कुबलचे नाहीतर आशा काळेचे फोटोलावावेलागले असते वहीवर.
शेफाली नंतर कॅनडा की जर्मनीला गेली. कॉलेजनंतर पुन्हा कधी दिसलीच नाही. तीच काय, सध्या कोणीच काँटॅक्टमध्ये नाहीये. नाही म्हणायला दिप्या देशमुख आणि अन्सारी फेसबुक फ्रेंड लिस्टमध्ये आहेत, इतकेच.
कॉलेज संपले. कँपसमधून प्लेसमेंट मिळाल्या. सगळे पांगले. पोटापाण्याच्या उद्योगालालागले.
आपला अल्फालाव्हलमधला जॉब, बाबांची रिटायरमेंट, तायडीचे लग्न सगळे एकामागोमाग एक आले. किरकोळ आजाराचे निमित्त होऊन बाबा गेले. कंपनीत नवनव्या डेव्हलपमेंट यायलालागल्या. कॉलेजमध्ये डिझाइन करणे, मटेरियल स्ट्रेंग्थ, स्ट्रेस वगैरे कॅल्क्युलेट करणे वेगळे आणि प्रत्यक्षात वेगळे असते. कामाचीच मजा इतकी यायची की प्रेमात पडायचे असते वगैरे विसरुनच गेलो. सिनेमा पहाताना प्रेमात पडून शेवटी दणादणा मारामारी करणारा व्हिलनचे गोडाऊन उद्ध्वस्त करणारा हीरो पाहून वाटायचे की एका मुलीसाठी इतक्या मारामार्‍या करायची काय गरज होती? आणि दुसरा प्रश्न पडायचा की प्रत्येक व्हिलनकडे स्वतःचे गोडावून कसे काय असते?
"शंतनू, अरे पुढे काय करणार आहेस? काही विचार केला आहेस का?" आईनेच एकदा विषय काढला.
"काय म्हणजे? हीट ट्रीटमेंट दिल्यावर मटेरियल हार्ड होतं. ते सॉफ्टही होतं. आपण क्वेंचिंग कसं करतोय त्यावर ठरतं. आरामकोने सगळं ठरवून दिलंय त्याप्रमाणेच करायचंय."
"अरे, मी काय विचारतेय, तू काय उत्तर देतो आहेस.."
"काय म्हणजे? आमच्या आत्ताच्या असाइनमेंटबद्दल म्हणालो. पण तुला कसं कळलं ते?"
“अरे, मी त्याबद्दल नाही विचारत. तुझ्या लग्नाबद्दल म्हणतेय.”
“काय?”
“तेच, तू काही विचार केला आहेस का?”
“त्यात काय विचार करायचा?”
“अरे, पुष्पामावशी विचारत होती. लोक विचारतात, शंतनूच्या लग्नाचं काय करताय म्हणून.”
“सध्या विचार नाही म्हणून सांग त्यांना.”
“का?”
“का म्हणजे मला येत्या वर्ष-सहा महिन्यात कदाचित स्वीडनला पाठवतील.”
“लग्न झालेले स्वीडनला जात नाहीत का?” आईच्या या प्रश्नावर मी निरुत्तर.
आईचे माझ्या लग्नाबद्दल बोलणे रोजचेच. खासकरून रात्री जेवताना. तेवढी एकच वेळ काय मिळायची आम्हा दोघांना बोलायला. बाकी मी दिसभर कंपनीत, आई एकटीच घरात.
एकदा घरी आलो, तर छोट्या समीरने दार उघडले. अरे, तायडी! अचानक!
"शंतूमामा..." ओरडत समीरने मी वाकून बूट काढेपर्यंत माझ्या पाठीवर उडी घेतली होती. समीर आला की घरात मजा येते. त्याला वाटते की मामा हे त्याला मिळालेले मोठ्ठे खेळणे आहे.
“अरे, अरे, मामाला नीट बसू तर दे जरा. तायडीने समीरला आवरले.
तायडी काही कल्पना न देता आली आहे.
“काय तायडे, आज अचानक...”
"मी माझ्या आईकडे आलेय. त्यात अचानक काय? हडपसरहून कोथरूडला तर यायचंय."
तायडी कशाला आली आहे हे असे सहजासहजी कळू देणार नाही मला.
"उद्या काय करतो आहेस तू?"
“काय करणार. उद्या एक तर सुट्टीचा दिवस मिळतो. जरा मस्त कुठेतरी बाइकवर भटकून यायचा विचार होता. अगदी ताम्हिणी नाही, पण पानशेतपर्यंत.”
“कोणकोण आहे सोबत?”
“एकटाच. कोण कोण कशाला? कोणी बरोबर असलं की त्यांच्या कलाने जावं लागतं.”
"मला औंधला जायचंय. माझ्याबरोबर येशील?" तायडीने जरी मला विचारलेय असे दिसत असले, तरी ती ऑर्डरच समजायची. काय कुठे कधी हे प्रश्न विचारायचे नाहीत.
सकाळी अगदी नऊ वाजताच तायडीने बाहेर काढले.
“स्पायसर कॉलेजकडे घे.”
“हो ताईसाहेब.”
युनिव्हर्सिटीकडून उजवीकडे वळत मी औंधकडे. ब्रेमन चौकाच्या अगोदर ‘रविशंकर’पाशी तायडीने मला थांबवले.
"जरा इथे थांबून जाऊ या." नशीब, इथे नो पार्किंगचा बोर्ड नव्हता.
"बैस." मी बाइक पार्क करेपर्यंत तायडीने टेबल पकडले होते. तशी फारशी गर्दी नव्हती. पण पुण्यात हॉटेलात गेल्या गेल्या जागा मिळायला नशीब लागते.
“इथे काय?”
“अपॉइंटमेंट आहे.”
“इथे?”
“हो, इथे. तुला काही प्रॉब्लेम?”
“मला कशाला असेल.. पण..”
“नाही ना? मग ऑर्डर दे. मी रवा इडली घेणार आहे. तू बघ काय घ्यायचंय ते.”
मी चुपचाप मेन्यू कार्ड पाहून एक रवा इडली आणि एक मैसूर डोसा ऑर्डर केला.
ऑर्डर यायला दहा मिनिटे. तोपर्यंत स्वभाविक काम म्हणजे इकडे तिकडे पाहणे. हॉटेलची सजावट टिपिकल उडपी हॉटेलची असते तशीच. ग्रॅनाइट टॉपची टेबले. अरेंजमेंट जरा वेगळी म्हणजे पाठीला पाठ न लावता एकमेकांना मोकळेपणाने बसता येईल अशी. भिंतीवर वाघनखीची वेल छान आहे. ती खरी आहे की आर्टिफिशयल, ते हात लावूनही समजत नाही. पलीकडच्या टेबलावर एक मुलगा-मुलगी बसलेत. मुलगी त्या समोर बसलेल्या मुलाचा हात हातात घेऊन काहीतरी बोलतेय. तिच्या चेहर्‍यावरचे हावभाव बरेच बोलके आहेत. कसल्यातरी वेगळ्याच जगात पोहोचलेत ते दोघेही. मासिकातल्या चित्रात दाखवतात ना, तसे डोक्यातून चांदण्या आणि फुले बाहेर येत नाहीयेत, इतकेच. मला गम्मत वाटली. माणसे प्रेमात पडली की आजूबाजूचे सगळे विसरतात, हे ऐकून होतो. आज समोर पाहात होतो.
“काय बघतो आहेस?” मला न बोलता त्यांच्याकडे पाहताना तायडीने बरोब्बर पकडले.
“काही नाही.” मी डोळा चुकवत बोललो.
“मस्त आहेत नाही दोघे? एकमेकांच्या किती प्रेमात पडले आहेत. कुणीही ओळखेल, त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून सगळं कसं रिफ्लेक्ट होतंय.”
“हो ना!”
“ए, तुला हेवा वाटत असेल नाही त्यांचा?”
“थोडासा वाटतोय. किती मजेत एकमेकांच्या सोबतचे क्षण जगताहेत ना?”
“तुला आवडेल असे क्षण जगायला?”
“कुणाला नाही आवडणार?” अभवितपणे मी उत्तर दिले.
"पाहिली आहेस कोणी मैत्रीण मग?" तायडीने टाकलेल्या जाळ्यात मी अडकत चाललोय, हे समजायच्या अगोदरच तिचा पुढचा प्रश्न.
“कामातून वेळ मिळाला, तर पाहीन ना!”
“आणि समजा, मिळाला वेळ, तर?” या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. वेटरने आमची ऑर्डर आणली म्हणून वाचलो.
“काय म्हणतेय मी.. पाहिली आहेस का मैत्रीण एखादी?” तायडीने इडलीचा तुकडा चटणीत बुडवताना विचारले.
“नाही अजून.”
“कधी पाहणार आहेस?”
“कशाला?”
“कशाला म्हणजे? अरे, कोणी मैत्रीण कशाला पाहतो? नंतर लग्न करायलाच ना?”
“तायडे, अजून मैत्रीण मिळाली नाही, लग्न वगैरे बर्‍याच लांबच्या गोष्टी.”
“तू आत्ताच सव्वीसचा आहेस. वर्ष-दोन वर्षांत घोडनवरा होशील. मग कधी वयाची तिशी उलटल्यावर करणार आहेस?”
“तू ह्यासाठी आणलं आहेस इथे मला?”
“हो, तसं समज. घरी आईसमोर हे बोलताना तुला संकोच वाटेल, म्हणून इथे आणलं. आईने तुझ्या लग्नाचा विषय काढला की तू टाळतोस.”
“पण मला अजून इतक्यात लग्न करायचं नाहीये.”
“का?”
“काही खास कारण नाही. लग्न म्हणजे जबाबदार्‍या.. लग्न म्हणजे उगाच उगाच अडकून पडणं.. आणि आईचं म्हणशील ना, तर ती म्हणते तसं हे अमुक स्थळ आलंय, ते तमुक त्यांच्या भाचीसाठी विचारत होते वगैरे... मला नाही आवडत हे असं मुलगी पहाणं वगैरे. ज्या मुलीशी आपली साधी ओळखही नाही, त्या मुलीला एक अर्ध्या तासाच्या ओळखीवर जन्माची साथीदार म्हणून निवडायची. ही कसली विचित्र पद्धत..”
:”अरे, पण आई तुझ्यासाठी अनोळखी मुलगी कशाला निवडेल? ती मुलीच्या घरातले कसे आहेत ही माहिती घेऊनच सुचवेल ना?”
“पण मला नाही आवडत ते मुलगी बघणं वगैरे. मुली बघा.. दोन-चार मुलींना कापड दुकानात शर्ट पाहावा तसं पाहा.. बरी वाटली तर घ्या.. मला नाही जमणार. कापड दुकानात निदान तो शर्ट तुम्हाला नीट बसतोय का ते पाहायला ट्रायल तरी करता येते.”
“गुड जोक. पण हे बघ - सुकेन माहीत आहे ना तुला, माझा चुलत दीर? वय वर्षे सध्या चाळीस. वयाच्या पंचविशीत आपल्या होणार्‍या बायकोबद्दल फार अपेक्षा. म्हणजे सुंदर शिडशिडीत असावी, शिकलेली असावी, मॉडर्न असावी वगैरे वगैरे. अपेक्षा असायला हरकत नाही. पण त्या अपेक्षेत बसणारी मुलगी कधीतरी सुंदर असायची, पण कशीबशी बी.ई.पर्यंतच शिकलेली. पोस्ट ग्रॅज्युएट शिकलेली मुलगी असली तर ती शिडशिडीत नसायची. मॉडर्न मुलीचे केसच आखूड आहेत. अशा एक एक कारणांमुळे त्याने अनेक मुली नाकारल्या. वयाच्या तिशीतही तो बिनलग्नाचाच होता. अपेक्षेत बसणारी मुलगी मिळत नाही म्हणताना मुलीबद्दलच्या अपेक्षा थोड्या कमी झाल्या होत्या. फारशी सुंदर नसेल तरी चालेल, पण शिकलेली हवी, म्हणत आणखी काही मुली नाकारल्या.
पस्तिशी उलटली, डोक्यावरचे केस मागे जायला लागले तरी बिनलग्नाचा. त्याने मुलीबद्दलच्या अपेक्षा आणखी कमी केल्या. कमी शिकलेली असेल तरी चालेल, पण किमान बारावीतरी पास झालेली असावी. यातच आणखी तीन-चार वर्षं गेली. आता चाळीशी आली. आता अपेक्षा आणखी कमी झाल्या आहेत. सुंदर नसेल, शिकलेली नसेल तरी चालेल. पण आता येणारी स्थळे येताहेत ती म्हणजे विधवा, घटस्फोटित अशीच. तुझी अशी अवस्था करून घ्यायची आहे का?”
तायडीच्या या प्रश्नामुळे माझ्या डोळ्यासमोर अंतर्पाटापलीकडे एक जाडजूड, जरठ काकू मुंडावळ्या बांधून उभी आहे असेच आले. अंगावर शहारा आला.
“तुझ्या होणार्‍या बायकोबद्दल काही अपेक्षा आहेत का? तसे असेल तर सांग मला.”
“तशा अपेक्षा नाहीत. पण मला अनोळखी मुलीला एकदम लग्नासाठी होकार देणं जमणार नाही. थोडी ओळख असेल, स्वभाव कसा आहे ते समजल्यावर पुढे जाता येईल.”
“अशा किती मुलींचे स्वभाव समजून घेणार आहेस?” तायडी बोलायला लागली की तिच्या लॉजिकल प्रश्नांपुढे मीच काय, बाबाही हात टेकायचे.
“आणि लक्षात घे. आपल्या राजकुमारी मिळेलही. पण त्यासाठी आपण राजकुमार बनायची तयारी ठेवायची. राजकुमार हा सर्व खेळात, व्यवहारात, बोलण्यात, वागण्यात सर्वच बाबतीत आदर्श सुंदर असतो तसा. ओ, हाय! काय, इकडे कुठे?” तायडीला कुणीतरी ओळखीचे दिसले, हे बरे झाले. तिची नेपोलियन प्रश्नावली तरी थांबली.
"ओ हाय! अगं, कित्ती दिवसांनी दिसतेस." एक उत्साही स्त्री आवाज. माझी पाठ होती, त्यामुळे नक्की कोण आहे ते दिसत नव्हते. आवाजही ओळखीचा वाटत नव्हता.
"इथेच ये ना. या टेबलवर जागा आहे. दोन लोक येऊ शकतात सहज. इफ यू डोन्ट माइंड.." तायडीने त्या आवाजाच्या मालकिणीला आमच्याच टेबलवर निमंत्रण दिले. इतके करून ती थांबली नाही, तर ती समोरची खुर्ची रिकामी करत माझ्या बाजूला येऊन बसली.
त्या उत्साही आवाजाची मालकीण - तायडीची मैत्रीण तायडीच्याच वयाची असेल किंवा कदाचित एखाद-दोन वर्षाने मोठीही असेल. साडी वगैरे असती, तर वयाच्या अंदाज करता आला असता, पण ड्रेसमध्ये असलेल्या स्त्रीच्या वयाचा अंदाज करता येत नाही. तिच्याबरोबर तिच्यापेक्षा वयाने लहान असावी अशी तरुणी.
"ये, ये, बैस बैस." तायडीने त्या बाईला अक्षरशः हात धरून बसवले. “अगं, संकोच करू नका. हा माझा भाऊ नूतनु. आणि शंतनू, ही माझी मैत्रीण सुखदा. यांचा मित्र आहे ना, कौस्तुभ.. त्यांची पत्नी. आमची फॅमिली फ्रेंड. आणि सोबत आहे ती तिची बहीण. वृषाली.” तायडीची ही ओळख करुन देण्याची पद्धत अचाटच. ही अशी काय ओळख करून द्यायची असते का? अचानक कुणाशी भेट झाली, तर काय असे बोलायचे असते का? माणूस विचारपूस करतो. अचानक इकडे कुठे वगैरे विचारतो. पण नाही! तायडी म्हणजे तायडीच.
अचानक एकदम कुणाशी नवीन ओळख झाली की जरा अवघडल्यासारखेच होते. काय बोलायचे तेच समजत नाही. मित्रांच्या ग्रूपमध्ये नवा कोणी आला की तो स्वतःच त्याची ओळख करून देतो आणि आपण जे बोलत असतो त्यात सहभागी होतो. मग नंतर कधीतरी बोलताना तो काय करतो, कुठे असतो हे समजत जाते. कंपनीतलाच असला तर गप्पांचा विषय नवा नसतोच. त्यामुळे ओळखही नवी झालीये असे वाटत नाही. मग अगदी ती एखादी मुलगी असेल तरीही. तशाही आमच्या हीट ट्रीटमेंटच्या शॉप फ्लोअरवर मुली कमीच. असलीच एखादी तर ट्रेनी म्हणून आलेली. महिनाभरात गायब होणारी.
मुलीशी ओळख करून घ्यायचा प्रसंगच कधी आला नाही.
"नमस्कार." मी हात जोडले. हे एक बरे आहे.. आपण हात जोडले की समोरचाही हात जोडून नमस्कार करतोच. आणि त्याने हात नाही जोडले, तरी फरक पडत नाही. आपण शेकहँडसाठी हात पुढे केला आणि समोरच्याने त्याचा हात नाही पुढे केला, तर आपला पचका होतो. आणि समोरच्याने शेकहँडसाठी हात पुढे केला, तर त्या हाताचा स्पर्श कसा असेल, हासुद्धा एक अंदाजाचाच भाग असतो. एखादा अगदी रखरखीत. एखादा अगदीच ओलसर, ओशट.
एकदा चुलत बहिणीकडे गिरगावला गेलो होतो. ती चाळीत राहणारी. चाळीच्या कॉरिडॉरमध्ये उभे राहून बोलताना समोरून एक जण आला. तो शेजारीच राहत होता. बहिणीने त्याची ओळख करून दिली. मी अभवितपणे शेकहँडसाठी हात पुढे केला. त्या माणसानेही हात पुढे करत शेकहँड केला. एकदम ओलाचिक्क हात. दोन वाक्य बोलल्यानंतर तो म्हणाला, “चला, जरा घाईत आहे.” जाताना त्याच्या डाव्या हातात प्लॅस्टिकची लहान बादली दिसली. तो शेजारी बहुतेक टॉयलेटला जाऊन परत येत होता. आम्ही मध्येच थांबवून त्याला शेकहँड केले होते. त्यानंतर मी साबणाने चार चार वेळा हात धुतला असेल. ती ओशट गिळगिळीत आठवण झाली की अजूनही अंगावर शहारा येतो. त्यानंतर पुन्हा स्वतःहोऊन कोणाशी शेकहँडसाठी हात पुढे केला नाही.
"नमस्कार." देघरातली घंटा किणकिणावी इतका नाजूक आवाज आला. मी चमकून पाहिले. वृषालीने माझ्या नमस्काराला उत्तर दिले होते. लता मंगेशकर, आशा भोसले सोडल्या, तर इतका नाजूक आवाज आयुष्यात प्रथमच ऐकत असेन, तेही थेट समोरासमोर. बाकी शॉप फ्लोअरच्या दणदणात सगळेच आवाज एकतर मुकेश, नाहीतर सैगल झालेले असतात. हॉट एअर ब्लोअरही उषा उथपच्या आवाजात चालू असतो. त्या तसल्या आवाजाची सवय झालेल्या माझ्या कानांना इतका छान आवाज म्हणजे रोज भाजी-भाकरी खाणार्‍याला स्वीट डिशच की!
मी चमकलो. इतका सुंदर आवाज! या आवाजाला दाद द्यायलाच हवी. पण कशी देणार! थेट सांगितले, तर तायडी आपल्याला आगाऊ म्हणायची आणि तिची ती मोठी बहीण आपण फ्लर्ट करतोय असे समजायची. पण काहीही म्हणा, वृषालीचा आवाज पुन्हा ऐकावा इतका छान.
मी चमकून समोर पाहिले. थेट वृषालीकडे. निमगोरा रंग असेल, पण बॉटल ग्रीन टी-शर्टमुळे उठून दिसतोय. कानातले मोत्याचे होते. त्यामुळे की काय, किंचित चॉकलेटी वाटणारे डोळे अधिकच चमकदार वाटत होते. सर्वात नजरेत भरत होते ते तिचे हसताना दिसणारे रेखीव दात. कदाचित तिने लावलेल्या डार्क लिपस्टिकमुळे असेल ते. केस कुरळे, पण बांधल्यामुळे जागेवर बसलेले. मानेमागे कोथिंबिरीची जुडी असावी तशी पोनी टेल.
एकूणच आकर्षक आणि कॉन्फिडन्ट.
‘ती छान दिसतेय हे मान्य कर ना! उगाच कशामुळे चांगली दिसते याचे अ‍ॅनालिसीस कशाला?’ मी स्वतःलाच समजावले. रूट कॉज अ‍ॅनालिसीसची काय जरुरी आहे इथे?
"अरे, काय झाले?" तायडीचा आवाज आला, तसा मी भानावर आलो. भानावर अशासाठी की मी वृषालीकडे पाहत बसलो असेन, म्हणून तायडीने मला जागे केले.
“ओ हॅलो, काय झाले रे?”
“ऑँ.. कुठे काय? आणि कशाचं?”
“अरे, तू नमस्कार म्हणालास आणि पुढे काहीच बोलत नाहीयेस. वृषालीने तुला काहीतरी विचारलं.”
“ओह, सॉरी हां, माझं लक्ष नव्हतं. आमच्या प्लॅंटमधलं एक सोल्यूशन द्यायचं आहे. डोक्यात तेच विचार आहेत. बाय द वे, काय विचारत होतात तुम्ही?”
“काही विषेश नाही. इकडे कसे काय आलात?”
“तायडीचं काहितरी काम होतं. म्हणून आलो होतो.”
“हो ना! दीदीचंही इकडे काम होतं. आम्ही पत्रकार नगरमध्ये राहतो. आणि ऑफिस आपटे रोडवर. त्यामुळे इकडे येणं होतच नाही.”
“ऑफिस आपटे रोडवर? कशाचं ऑफिस आहे.?”
“अ‍ॅड एजन्सीचं. ‘मॅजिक मंत्रा’. कॉपी रायटर आहे मी.”
“अरे वा, छान. कॉपी रायटर म्हणजे मस्तच जॉब आहे.”
“आणि तुम्ही?”
“मी अल्फा लाव्हलमध्ये. प्रोजेक्ट इंजीनियर आहे.”
“म्हणजे?”
“आम्ही काही प्रोजेक्ट घेतो. प्रॉडक्ट डेव्हलप करायचे. खासकरून हीट ट्रीटमेंट आणि प्रॉडक्टवर हीटचा काय परिणाम होतो हे पाहण्याचे.”
"हं, हं." मी काय बोललो ते बहुतेक वृषालीच्या डोक्यावरुन गेले. त्यामुळे तिने नुसतेच डोके हलवले. डोके हलवताना ती कोथिंबिरीची जुडी स्टाइल पोनी टेल लयीत हलली.
वेटर आला, त्याने वृषाली आणि सुखदाने दिलेली ऑर्डर आणली. इतका वेळ झाला? की ऑर्डर रेडीच होती?
मनात एक विचार आला - हिच्या बहिणीचे नाव सुखदा आहे. यांच्या आईने हिचे नाव वरदा ठेवले असते तर.. हे वंदे मातरमपण मी बोलून दाखवले नाही.
तायडी आणि तिची मैत्रीण काहीतरी बोलत होत्या. सध्या किती उकडतंय.. भाज्या किती महागल्या आहेत.. सोसायटीतल्या भारांबे काकू कशा पुढे पुढे करतात किंवा इडीअप्पम करताना तांदळाच्या पिठाची उपड किती घट्ट असावी असे वगैरे वगैरे.
मलाच काय, वृषालीलाही त्या तसल्या स्वैपाकघरातल्या चर्चेत रस नसावा.
“ही तायडी ना, कुठेही गेली तरी स्वैपाकघर सोडत नाही. गप्पाही त्याच.”
“अहो, काय आहे, जो-तो आपल्या विश्वातलं विषय बोलणार ना? चालायचंच. तुम्ही नाही आत्ता सुट्टीच्या दिवशीही प्लॅंटमधल्या एका प्रोसेसवर विचार करताय, हो की नाही?”
“खरंच की. मी असा विचार कधी केलाच नव्हता.”
“अहो, या दोघींचे काय घेऊन बसला आहात.. एकदा इंदिरा गांधी आणि ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर भेटल्या होत्या, त्यांनीही एक-दोन किचन रेसीपीज शेअर केल्या होत्या.”
“हे.. हे म्हणजे फारच होतंय.”
“अहो, खरंच. त्यांनी काय फक्त जागतिक अर्थव्यवस्थेवर किंवा आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरच बोलायचं, असा कुठे नियम आहे का? आणि त्यामुळेच की काय, त्या दोघींची घट्ट मैत्री होती.”
“असेलही. पण दोन देशांचे पंतप्रधान बटाटा उकडावा की काचर्‍या करून परतावा, यावर बोलताहेत हे ऐकायलाही मजेशीर वाटतंय.”
‘आय जस्ट कॉल्ड टू से आय लव्ह यू..’ स्टीवी वंडरच्या गाण्याच्या ट्यूनवर फोनचा रिंगटोन वाजला. वृषालीने फोन उचलला.
“हॅलो. काय रे, काय झालं? काय, टॅग लाईन बदलायची म्हणताहेत? का? तो शब्द मोठा होतोय? ठीक आहे. मी आत्ता बाहेर आहे. दुपारी चार वाजता फोन करते आणि नवी टॅग लाईन सांगते." वृषाली फोनवर बोलताना तिचे डोळे चमकत होते. बोलताना मान किंचित तिरपी करून बोलते. प्रत्येक शब्द सुस्पष्ट आणि समोरच्याला नक्की काय ते सांगणारा. कॉन्फिडन्ट. फोनवर बोलताना वृषालीचा आवाज वेगळाच वाटतो. किंचित खर्जात. स्वतःशीच गाणे गुणगुणताना असतो ना, तसा.
मला अचानकच काहीतरी जाणवले. माझी नजर वृषालीच्या गळ्याकडे गेली. सोन्याची एक नाजूक चेन. मध्ये कसलेसे पेंडंटही असावे. पण ते टी-शर्टच्या आड गेलेय. त्यामुळे आहे की नाही हे नक्की सांगता येत नाहीये. त्यात काळे मणी नसावेत. फोनवर बोलत असतानाच वृषालीने अचानक गळ्यावरून हात फिरवला. तिच्या गळ्याकडे मी पाहतोय हे तिच्या लक्षात तर आले नाही ना? स्त्रीयांना आपल्याकडे कोणी पहातय हे जाणवते म्हणे. मी चपापलो. नजर वर घेतली - वृषाली माझ्याकडेच पाहातेय. डोळे किंचित बारीक करुन. आमची नजरभेट झाली. मी नजर टाळली. ती किंचित हसली. इतरांना नाही, पण मला जाणवण्याइतपत. मीही हसलो. अगोदर थोडासा ओशाळवाणा. नंतर एकदम ब्रॉड स्माईल. आपली चोरी पकडली गेली. वृषालीच्या चेहर्‍यावरही हसू फुटलेय. एकदम ब्रॉड स्माईल.
काहीतरी झाल्यासारखे आम्ही स्वतःशीच हसत होतो. हसताना नेहमीच्या सवयीने मी टाळीसाठी हात पुढे केला. तिने एक क्षण हात पुढे केला, नंतर अचानाक मागे घेतला.
टाळीसाठी पुढे केलेला माझा हात रिकामाच मागे फिरला. माझा पचका झालाय हे इतर कोणाला समजू नये, म्हणून मीच डाव्या हाताने उजव्या हातावर लहानशी टाळी देऊन दोन्ही हातांची मुरड केली. वृषाली हे नीट पाहत असावी. तिला हसू आवरले नाही. फिस्सकन ती हसली आणि थांबली. काय झालेय ते माझ्या लक्षात आले आणि मीच माझ्या फजितीवर हसलो. वृषाली आता मोकळेपणाने हसायला लागली. आम्ही दोघेही हसतोय.. हिस्टेरिया झाल्यासारखे.
तायडी आणि तिच्या मैत्रिणीचे बोलणे आमच्या हसण्याने ब्रेक लागावा तसे अचानक थांबले. आम्ही का हसतोय तेच त्यांना समजत नव्हते. त्या दोघी आमच्याकडे ;हे आत्ता तर बरे होते’ अशा नजरेने पाहायला लागल्या. हे बघून आम्हाला आणखीनच हसू आले.
हिंदी चित्रपटात कोणतेही रहस्य लवकर उघड करायचे नसेल, तर दिग्दर्शक काहीतरी वेगळी घटना घडवून लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधतो, तसा आमच्या या पिक्चरमध्ये वेटरची एंट्री झाली. टेबलवर वाफाळत्या कॉफीचे चार कप आले..
“वा! मला अश्शीच कॉफी आवडते. फिल्टर कॉफी प्यावी तर उडप्याकडेच. घरी कितीही प्रयत्न केला, तरी अशी कॉफी जमत नाही.” कॉफीचा सिप घेत वृषाली बोलायला लागली. ती नक्की कोणाशी बोलतेय हे समजत नव्हते. आणि दुसरे म्हणजे ही उडप्याची कॉफी येते ती वाटीत उपड्या घातलेल्या पेल्यातून. पेलावर उचलताना हमखास चटका बसतो ते वेगळेच आणि ती कॉफी वाटीने प्यायची की त्या छोट्या पेल्याने, हा संभ्रम असतोच. ही बिंधास्त वाटीने पीत होती.
“हो, मलाही आवडते फिल्टर कॉफी. पण रूपाली-वैशालीची कॉफी नाही हां. त्यापेक्षा मार्झोरीनची कॉफी चांगली असते.”
पुण्यात एक बरे आहे. रूपाली वैशाली किंवा मार्झोरीन / कयानी हे विषय काढले की लोक एकदम बोलके होतात. मुंबईत हीच गोष्ट ‘या एरियात जागेचे भाव सध्या बरेच जास्त आहेत’ हे वाक्य विरारपासून अगदी कळंबोली-पनवेलपर्यंत कुठेही उच्चारता येते. या एका वाक्याने मुंबईच्या लोकलमध्ये ऐसपैस बसायला चौथी सीट सहज मिळून जाते.
“मार्झोरीन माझे फेवरिट. तिथे वरच्या मजल्यावर खिडकीजवळचे टेबल पकडायचे, एक मस्त सँडविच आणि कॉफी मागवायची.. रस्त्यावरची रहदारी पाहत वेळ कसा जातो, ते समजतही नाही. मोबाइल मात्र बंद ठेवायचा.”
वृषाली हे बोलतेय, तितक्यात तिचा मोबाइल वाजला. टेबलवर ठेवलेला मोबाइल तिने उचलला. कोणाचा फोन आहे ते पाहिले. कपाळावर त्रासिक आठ्या आल्या आणि तिने फोन रिसीव्ह केला. पुन्हा तोच गुणगुणल्यासारखा खर्ज. देवळात कोणी पाठ करताना येतो ना, तसा. गुंगी आणणारा आवाज.
“नमस्कार. हां, बोला.. हो, बरोबर आहे. पण तुमचं प्रॉडक्ट वेगळं आहे, त्यांचं प्रॉडक्ट वेगळं आहे. कॅटॅगरीच वेगळी आहे ना. मार्केट सेक्टर वेगळा येतो. त्यानुसार टॅग लाइन ठरणार ना? .....हो... ठीक आहे. मी थोडा विचार करते.... नको. उद्या सकाळी नको. दुपारनंतर मीच फोन करेन. थँक्स. सेम टू यू.”
वृषाली बोलताना माझी नजर तिच्या चेहर्‍यावर. फोनवर बोलतानाही ती समोर बसलेल्या कोणाशीतरी बोलतेय असे भाव तिच्या चेहर्‍यावर येत होते. विशेषतः डोळे आणि भुवया. बोलताना मध्ये मध्ये तिचे आखीव दात दिसत होते. ओठाला लावलेल्या लिपस्टिकमुळे तिचे दात फ्रेम केल्यासारखे दिसत होते. शाळेत चित्रकलेच्या तासाला स्टिल लाइफ काढताना दिसते तसे. स्टिल लाइफ चित्राच्या त्या विचारामुळे माझ्या चेहेर्‍यावर हसू आले.
“का, काय झाले हसायला? काही चुकीचे बोलले का?”
“अहो, नाही. तसं नाही. पण गम्मत वाटली. तुम्ही ज्या पद्धतीने क्लायंटशी बोलता ना, ते छान वाटलं.”
तायडीची आणि सुखदाची काहीतरी नजरानजर झाली. आमचे दोघांचे त्याकडे लक्षच नव्हते.
“अहो, काय करणार! क्लायंट आहे ना? आमचा पोषणकर्ता! आता बघा ना, क्लायंटचे प्रॉडक्ट आहे सिगरेट आणि त्यांना त्याकरता टॅग लाइन हवी आहे ती ‘घराला घरपण देणारी माणसं’ यासारखी. कसं शक्य आहे?”
“मग काय सांगणार तुम्ही त्यांना?”
“तोच विचार करतेय..”
“घराला घरपण देणारी माणसं..... सिगरेटला सिगरेटपण देणारी माणसं.”
“हा हा हा! सिगरेटला सिगरेटपण देणारी माणसं. हा हा हा!” वृषाली जोरात हसू लागली. अगदी पोटावर हात ठेवून, आजूबाजूला कोण आहे याची पर्वा न करता. आपण काय जोक केला हेच मला समजळे नाहीये. तायडी आणि सुखदासुद्धा ‘सिगरेटला सिगरेटपण देणारी माणसं’ या वाक्यावर हसायला लागल्या.
मी त्या तिघींकडे पाहिले - ऑड मॅन आउट.
त्या तिघींचे हसणे संपल्यावर आपला काय मोरू झालाय ते विचारावे की विषय बदलावा, या विचारात असतानाच वृषाली म्हणाली, “अहो, काय भन्नाट शब्द वापरलाय! सिगरेटचं सिगरेटपण म्हणजे नक्की काय हो?” हसून हसून वृषालीच्या डोळ्यात पाणी आले होते.
“मी असेच बोललो. घराला घरपण तसं सिगरेटला सिगरेटपण. घर शब्द काढून तिथे सिगरेट शब्द टाकला, इतकंच.”
“काहीही म्हणा, तो ‘सिगरेटपण’ शब्द मस्त आहे. अगदी बोलायचंच झालं तर लय भारी.” तर्जनी आणि अंगठा जोडत वृषालीने विनोदाला दाद दिली.
मी विनोद केला होता हे आता मीही मान्य करतो. खरे तर मी जे वाटले ते बोललो होतो. मुद्दाम विनोद वगैरे करायचा नव्हता, हे न सांगितलेलेच बरे.
“हो ना!”
तायडी आणि सुखदा एकमेकांकडे पाहून काहीतरी नेत्रपल्लवी करत होत्या. पण आमचे तिकडे लक्षच नव्हते.
सुखदाचा फोन वाजला. “अं.. हो, हो. हो, हो. पोहोचलोय आम्ही इकडे. मघाशीच. ठीक आहे. येतोच तिकडे पंधरा मिनिटात.....” चला, आम्हाला निघायला हवं. ज्यांना भेटायचंय तेही पोहोचताहेत.” सुखदाने फोन बंद करत सांगितले.
“हो ना. आम्हालाही निघायचंय.”
आम्ही सगळेच बाहेर आलो. बिल अर्थातच मलाच द्यावे लागले. तीन महिला आणि एकटा बिच्चारा पुरुष. काय करणार! तायडी एरवी ब्रिटिश लोकांसारखी ‘लेडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट’चा घोष करत असते. बिल द्यायची वेळ आली की अमेरिकन होत ‘आफ्टर यू’ म्हणायला लागते.
दोघींना बाणेरकडे जायचे होते. ताईला कोण भेटणार होते वगैरे असे काही नसावेच. आलोच आहोत तर समीरसाठी परिहार चौकातून सामोसे-फरसाण घेऊन परत फिरलो. तायडीला माझ्या लग्नाचा विषय काढायचा होता, इतकाच काय तो उद्देश असावा. अर्थात हे मला समजलेच नाही. मी पुढे काही विषय काढेन ही शक्यता नव्हतीच.
येताना माझ्या डोक्यात वृषालीचे ते पोट धरून हसणे, तिचे ते मान तिरकी करून बोलणे, तिची ती कोथिंबिरीची जुडी बांधावी तसे दिसणारी कुरळ्या केसांची पोनी (पोनीच म्हणायचे ना त्याला?) जिवणीची फ्रेम करावी तसे दिसणारे एका ओळीतले सरळ दात आणि तिच्या बोलण्यातला ठामपणा हेच होते. बाइकवर तसेही फारसे बोलणे होत नाही. एक तर डोक्यावर हेल्मेट असते. त्यातून बोलायला गेलो की आपलाच आवाज आपल्याला मोठ्याने ऐकू येतो. हळू बोललो की मागे बसलेल्याला काहीच ऐकू येत नाही. रहदारी असेल तर आजूबाजूला हॉर्नचे आवाज असतात, रहदारी नसेल तर चालवणारा वेगात असतो. एकूण काय, तर बोलणे झाले नाही. लग्नाचा विषय घरी काढला असता, तर मातोश्री मध्ये पडल्याशिवाय बोलणे झाले नसते. आणि आई बोलायला लागली की नक्की कोणत्या विषयावर बोलतेय हे समजेपर्यंत दुसरा विषय सुरू झालेला असतो.

दुपारी समीरला घेऊन सिटी प्राईडमध्ये हॅरी पॉटर झाला. संध्याकाळी तायडी आणि मातोश्री डेक्कनवर हाँगकाँग लेनवर. प्रत्येक वेळा तायडी आली की तिची हाँगकाँग लेन फेरी ठरलेलीच असते. काय घेते एवढे, कोण जाणे. बरेच वेळा तर तेथे जाऊन येणे इतकेच करते.
दिवस संपला. झोपताना नेहमीप्रमाणे हिशेब केला. अख्ख्या दिवसात काय केले? तर काही नाही... एरवी असा दिवस वाया गेला की झोपताना दमल्यासारखे वाटते. दिवस वाया घालवला याचे वाईट वाटते. आज तसे काहीच फीलिंग नव्हते. उलट झोपताना जरा उत्साहातच होतो. टीव्हीवर एक जुनी मॅच चालू होती. दुसर्‍या चॅनलवर ‘छोटीसी बात’ चालला होता, सोनी मराठीवर ‘अगंबाई अरेच्चा’ आणि कलर्सवर बनवाबनवी. रिमोटवर अर्धा-एक तास बोटांचा नाच करत चारही गोष्टी पाहिल्या. म्हणजे अमोल पालेकर तिकडून येतो. टेबल टेनिसची रॅकेट नाचवत सर्व्हिस करतो. तेंडुलकर पुढे येऊन कव्हर्समधून गॅप काढत चौकार मारतो. बॉल बाउंडरी लाईनवर अडवायला फील्डर पळतो. बगाडावर बसलेला संजय नार्वेकर उंच जातो. लक्ष्या बेर्डे दरवाजावर हात मारत “धनंजय माने इथेच रहातात का?” विचारतो.
झोप कधीलागली ते समजलेच नाही.
बहुतेक स्वप्न असावे - मी कसल्याशा ढगावर बसलोय. ढगात पाण्यावर हीट ट्रीटमेंटच्या काही टेस्ट्स चालल्यात. तापवून लाल लाल झालेले पाणी गार करायला ठेवलेय. पाण्यातून क्वेंचिंग केल्यावर वाफ निघते. वाफ वर जायला लागते. सभोवताली धुके जमा व्हायला लागले. धुक्यातून बाहेर आल्यावर समोर एक मस्त हिरवेगार माळरान आहे. माळरानावर एकच झाड आहे. प्राजक्ताचे. झाडाखाली वृषाली. तिचे कुरळे केस मला मॅगीसारखे वाटताहेत. मला पाहून हसायला लागली. इतकी की तिला हसू आवरेना. ती हसतेय हे पाहून मला ठसका लागला.
"का रे, काय झालं? का ठसकतो आहेस? हे घे पाणी.” आईचा आवाज आला. मला थोडे थोडे भान आले. मी टीव्ही बघता बघता हॉलमध्येच सोफ्यावर झोपलो होतो. माझा ठसका ऐकून आईला जाग आली, ती पाणी घेऊन आली. समोरचे हिरवेगार माळरान जाऊन बंद टीव्हीचा स्क्रीन दिसायला लागला, तेव्हा आपण पाहिले ते स्वप्न होते हे समजले. मला काय झाले, ते आईला समजले नाही.
“झोपेत कसा काय ठसका लागतो, देव जाणे.. याचे एक एक म्हणजे नवीनच असते.” असे पुटपुटत आई मला पाणी देऊन निघून गेली.
मी विचार करत बराच वेळ जागा. झोपच आली नाही. डोळे मिटले की डोळ्यासमोर वृषालीचा तो प्रसन्न चेहरा दिसायचा. तिची बोलताना दातांना फ्रेम केल्यासारखी दिसणारी जिवणी, पिंगट तपकिरी डोळे आणि मस्त झुपकेदार फुलांचा गुच्छ असावा तसे दिसणारे केस. अशा केसावर ऊन पडले की कसे मस्त दिसतात - ढगातून सूर्यकिरण बाहेर पडत असल्यासारखे वाटते.
अरे व्वा! काय गम्मत आहे ना? जन्मात कधी कविताबिवितेच्या वाटेला गेलो नाही. उपमा म्हणजे फक्त खाण्याचा पदार्थ आहे हे ठाम मत असलेला मी, वृषालीच्या केसांना ढग, सूर्यकिरण असल्या उपमा देत होतो.
चुकलेच. आपण तिचा फोन नंबर घ्यायला हवा होता. निदान तिच्या ऑफिसचे नाव समजले असते तरी शोधता येईल. फेसबुकवर शोधता येईल. लिंक्ड इनवर समजेल, पण नंबर सापडणार नाही. पण आपण तिचे प्रोफाइल शोधत होतो, हे तिला समजेल.
काय करावे बरे.. विचारातच सकाळ झाली. सकाळ झाली की दिवस सुरू होतो. सोमवारी सकाळी जितके काम असते ना, तितके काम इतर वारी कधीच नसते. प्रेझेंटेशन. रिपोर्टिंग, आठवडाभराचे शेड्यूल यात अर्धा दिवस निघून जातो. या आठवड्यात क्लायंटची टेक्निकल टीम येणार आहे. काही टेस्ट रन करणार आहे. त्याचे डिटेल्स शुक्रवारीच शेअर केले होते क्लायंटने, ते ओके केले आहेत म्हणून बरे, नाहीतर त्यात अख्खा दिवस गेला असता.
तायडीला फोन लावून वृषालीचा नंबर विचारू या का? नकळत माझी बोटे मोबाइलवर चालू लागली. तायडीचा नंबर डायल झाला. ‘ये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना..’ तायडीने कॉलर ट्यून छान निवडली आहे. कदाचित माझा फोन येणार हे माहीत आहे म्हणून ठेवली असेल. आपली चोरी पकडली गेली. मी फोन कट केला.
नसेल रे तसे. उगाच आपल्याला वाटतेय. कावीळ झालेल्याला सगळे जग पिवळे दिसते म्हणे. एरवी कधी न हसणारा, थोबाड कायम कडू काढा प्यायल्यासारखे ठेवणारा फोरमन पांडेजी आज हात वर करत हसतोय, तोच कशाला, शॉप फ्लोअरवरचे सगळे जण उगाचच माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसताहेत असे वाटतेय.
माझा फोन वाजला.
"का रे, आज एकदम मिस कॉल? बरा आहेस ना?" तायडीचा कॉल.
“अगं, दुसरा नंबर डायल करत होतो, तर चुकून तुझा नंबर लागला. बाकी काही नाही.”
“बाकी नक्की काही नाही ना?”
“हो. का गं?”
“काही नाही, असंच. नक्की चुकून लागला ना फोन, की काही काम होतं?”
"नाही, तसं काम नव्हतं.”
“तसं काम नव्हतं ना? नक्की ना?” ही तायडी ना, आपल्याला पुरेपूर ओळखून आहे. आपल्याला काही लपवताच येत नाही तिच्यापासून.
“अगं, आमच्या इथे काही कंटेंट डेव्हलपमेंटची कामं आहेत. एखादी अ‍ॅड एजन्सी शोधतोय.”
“अ‍ॅड एजन्सी? मग त्यासाठी मला फोन केलास?”
“हो, अगं, काल नाही का तुझी मैत्रीण भेटली होती?”
“कोण? सुखदा! तिचं काय?”
“त्यांची बहीण होती ना सोबत. काय नाव ते - वृश्चिक की कायसंसं होतं बघ. त्या म्हणत होत्या की त्या अ‍ॅड एजन्सीमध्ये आहेत म्हणून.”
“वृषाली. तिचं काय?”
“त्यांचा नंबर मिळवता येईल का? म्हणजे बोलून बघतो जरा..?
“कंटेंट रायटिंगबद्दलच बोल हो!”
“म्हणजे?”
“काही नाही. पाठवते तुला नंबर व्हॉट्सअ‍ॅपवर. कंटेंट रायटिंगबद्दलच बोल.” तायडीने फोन कट केला.
पण असे का म्हणाली असेल तायडी? जाऊ दे ना, तो विचार नंतर करू.
तायडीने नंबर पाठवला. फोन करू या का? की वृषालीला उगाच हा फ्लर्टिंग करतोय असे काहीतरी वाटेल.
फ्लर्टिंग करतोय असे तिला वाटेल की नाही, हे आपण का ठरवतोय? ती ठरवेल ना! फोन तर करून बघू या.
मी नंबर डायल केला. “थॅंक्यू फॉर कॉलिंग वृषाली. वृषाली अभी व्यस्त है. वृषाली को फोन करने के लिये धन्यवाद.” तीन वेळा ही कॉलर ट्यून ऐकून मी वैतागलोय.
माझ्या फोनवर कॉल वेटिंग आहे. कोण कॉल करतेय? अरेच्चा, आपण जिला कॉल करतोय, ती आपल्यालाच कॉल करतेय. गुड साईन. खरे तर योगायोग, शुभशकुन मानायचे नसतात. पण हा अपवाद.
अर्रर्र.. तिलाही आपला मिस कॉल गेला असेल.
पुन्हा कॉल करू या. “थॅंक्यू फॉर कॉलिंग वृषाली. वृषाली अभी व्यस्त है. वृषाली को फोन करने के लिये धन्यवाद.” मायला, परत तेच.
ही कॉलर ट्यून ऐकताना कॉल वेटिंगचा बीप ऐकू येत होता. बहुधा तीसुद्धा फोन करत असणार. आपण जरा वेळ वाट पाहू या. ती फोन करतेय आणि आपणही त्याच वेळेस फोन करतोय.
पुढची पाच मिनिटे मी फोन हातात धरून होतो. बहुतेक वृषालीनेही हाच विचार केला असावा. जाऊ दे. आणखी तीन मिनिटे तिचा फोन नाही आला, तर आपण करू या. पण त्या वेळेस तिनेही हाच विचार केला असेल तर?
मी नंबर डायल केला. या वेळेस कॉलर ट्यून ऐकू येत होती – ‘भवरा बडा नादान है...’ काय मस्त कॉलर ट्यून ठेवतात ना लोक एकेक.
“हॅलो.. नमस्कार. मी वृषाली." फोनवर काय छान वाटतो तिचा आवाज. हळू आवाजात बोलल्यामुळे असेल, पण किंचित खर्जातला. अगदी राणी मुखर्जी नाही, पण तरीही थोडासा त्यासारखा. समोर बोलताना हे नाही जाणवले. आत्ता फोनवर जाणवतेय.
“हॅलो, नमस्कार. मी शंतनू. काल आपली भेट झाली होती.”
“हो, ओळखले ना मी. मी तुम्हालाच फोन लावत होते.”
“आणि मी तुम्हाला.”
फोनवर वृषालीच्या हसण्याचा आवाज ऐकून कानात गुदगुल्या झाल्या.
"येस. काय मदत करू शकतो? काय आज्ञा आहे>" बाजूच्या डेस्कवरचा अभय झारापकर पाहत होता. मी इतका सॉफ्ट बोलू शकतो, याचे त्याला आश्चर्य वाटतेय.
“अगोदर तुम्ही सांगा, तुम्ही का फोन करत होतात.”
“मला कंटेंट रायटिंगबद्दल माहिती हवी आहे जरा.”
“आम्ही कॉपी रायटिंग करतो. कंटेंट रायटिंग नाही.”
“ओह...”
“पण माझा एक कलीग आहे, तो तुम्हाला गाइड करू शकेल.”
“मग ठीक आहे. आता तुम्ही सांगा तुम्ही का फोन करत होता.”
“आमच्याकडे एक कंटेंट आलंय, त्यावरून कॉपी लिहायची आहे. काही टेक्निकल टर्म्स समजत नाहीयेत.”
“कशाबद्दल आहे?”
“काहीतरी हीट ट्रीटमेंट, मटेरियल हार्डनिंग असले शब्द आहेत.”
“मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात.”
“म्हणजे?”
“आम्ही तेच काम करतो.”
“कंटेंट रायटिंगचं?”
“नाही हो. हीट ट्रीटमेंटचं. मटेरियल हार्डनिंगचं.”
मला कधी सांगू शकाल?”
“आज संध्याकाळी मी डेक्कनला येणार आहे.”
“ओके. डन. आपण वाडेश्वरला भेटू शकू. सात वाजता. मला ते ऑफिसपासून जवळ पडेल.”
“ओके. डन.”
फोन डायल केल्यावर वाजते तशी कॉलर ट्यून फोन बंद केल्यावर वाजवायची सोय असती, तर नक्की सांगतो, या फोननंतर ‘ये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना..’ हीच ट्यून वाजली असती.
दुपारी तीन वाजल्यापासून घड्याळ पाहत होतो. दर दहा मिनिटांनी. मिनिट काट्याला कसलीच घाई दिसत नव्हती. हाताने सूर्य पुढे ढलकता आला असता किंवा गेला बाजार अक्षांश-रेखांश मागे-पुढे करता आले असते, तर वेळ तरी लवकर पुढे करता आला असता.
वाडेश्वरच्या पुढे पार्किंग कधीच रिकामे मिळत नाही. कोणीतरी बाइक काढली, ती जागा पटकन मिळाली म्हणून बरे. बाइक असली की हेल्मेट कुठे ठेवायचे? हा प्रश्न असतोच. फुल हेल्मेट असले तर लॉक करता येते, अर्धे असले की तेही शक्य नसते. दोनच शक्यता उरतात - एक तर रामभरोसे बाइकला हेल्मेट तसेच लटकवायचे किंवा दुसरे म्हणजे ऋषिमुनी कमंडलू घेऊन भिक्षांदेही करत फिरायचे, तसे हेल्मेट हातात घेऊन फिरायचे. बाइकला लटकवलेले हेल्मेट चोरीला जायची शक्यता तशी कमी, पण काही सांगता येत नाही. पुण्यात बाइक पुसायचे फडकेही चोरीला जाऊ शकते. हेल्मेट ही तर त्याहीपेक्षा जास्त कामाची वस्तू. फार विचार न करता हेल्मेट लटकावून टाकले. वाडेश्वरच्या कमानीतून आत जरा नजर फिरवली. थोड्या पलीकडल्या टेबलवर वृषाली मलाच हात करत होती. मी पाहातच राहिलो. काल फुलांच्या गड्डीसारखे दिसणारे तिचे केस आज पूर्ण फुलले होते. पाकळ्यांची महिरप असलेले जरबेराचे फूल दिसते ना, तसे तिच्या चेहर्‍याभोवती तांबूस कुरळ्या केसांची महिरप दिसत होती. व्हॉट अ ब्यूटी! मायला, आपली तर शिट्टीच वाजली. नक्की हीच होती का ती? मी थोडा साशंक. हो, उगाच दुसर्‍या कोणालातरी हात करायचा आणि तेवढ्यात वृषाली इथे यायची. मधल्यामध्ये आपला पोपट.
“हॅलो, इकडे या, इथे.” वृषालीने कदाचित माझी साशंक अवस्था ओळखली असावी.
सुटका झाल्याचा आनंद माझ्या चेहर्‍यावर दिसत असावा. दोन्ही अर्थांनी. व्याडेश्वरला गेल्या गेल्या लगेच टेबल मिळणे ही दुरापास्त गोष्टही जमली होती आणि ती वृषालीच होती हे कन्फर्म झाल्यामुळे.
“कॉफी की आणखी काही?”
“कॉफीबरोबर इडली फ्राय चालेल?”
“चालेल. माझी फेवरेट डिश.”
“बोला, काय म्हणताय?”
“खरे तर हे तुम्हाला मेल करणर होते. पण ऑफिसच्या नेटवर्कमधून जीमेलला मेल पाठवता येत नाही.” वृषालीने कसालासा प्रिंट आउट आणला होता.
“हरकत नाही.” मी तो कागद नीट चला.
“खरे तर अगदी प्रायमरी माहिती आहे. सहज समजेल अशी. मी एक एक टर्म सोपी करत सांगतो.” वृषाली ऐकतेय अगदी भक्तिभावाने. किंवा मला तसे वाटतेय.
घरी येताना कर्वे रोडवरून उगाच रेंगाळत आलो. रस्ता संपूच नये असे वाटत होते.
...............................................
आज पुन्हा रविवार. आईला हडपसरला तायडीकडे जायचेय. मी उबेर कॅबने तिला बसवून दिले. आज वृषालीला कँपमध्ये मार्झोरीनला भेटायचे ठरळेय.
एफ एमवर गाणे लागळेय – ‘सोमवार को हम मिले, मंगलवार को नैन. बुध को मेरी नींद गयी, जुमे रात को चैन. शुकर शनी कटे मुश्कील से, आज है ऐतवार. सात दिनो मे हो गया जैसे सात जनम का प्यार.’
मी प्रेमात पडतोय का? गेले सात दिवस आपण फक्त वृषालीचाच विचार करतोय. तिच्या बारीकसारीक लकबी, एखादी गोष्ट सांगून झाल्यावर पर्सचा पट्टा बोटाला गुंडाळत खालचा ओठ दाताखाली दाबून आपल्याकडे पाहायची सवय. आपण तिच्या केसांकडे पहातोय हे समजल्यावर कुरळ्या केसातून मधूनच बोटे फिरवत केस जागेवर बसवते.. तिला एकदा सांगायला हवे की ते तसे जॉन मॅकेन्रोसारखे कुरळे केस खरेच कित्ती छान दिसतात. उभट चेहर्‍याला परफेक्ट फ्रेम दिसते.
..........................
आ़ज टीम प्रेझेंटेशनमध्ये आपण अभय झारापकरला वृंषाली म्हणून संबोधले.. हे फारच झाले.
आज तिला विचारायचेच. आणि नाही म्हणाली तर?
आयडिया! तायडीला मध्ये घालू या. पण तायडीला मध्ये ठेवणे म्हणजे ती लगेच आईला सांगणार. काहीतरी पटवावे लागेल.
---------------------
तायडीला पटवले. त्यासाठी दोन मस्तानी समीर आणि तिच्यासाठी. समीरसाठी क्रिकेटची बॅट आणि तायडीला ड्रेस. ही इन्व्हेस्टमेम्ट की एक्स्पेनसेस, ते दोन दिवसांत ठरेल. पॉझिटिव्ह साईन मिळाली तर इन्व्हेस्टमेंट.
कॉमर्सच्या पोरांना ही व्याख्या शिकवावी लागेल इन्व्हेस्टमेम्ट आणि एक्सपेन्सेस यातला फरक समजावून द्यायला.
---------------------------

तायडीने काहितरी केलेले दिसतेय. या रविवारी समजेल म्हणाली आहे. इतर कोणाशी बोलण्यापेक्षा थेट तुझ्याशीच बोलायचे म्हणतेय. गुगली बॉल आहे. इन्व्हेस्टमेंट की एक्सपेन्सेस तेच क्लियर होत नाहीये. चला, रविवारची वाट पाहण्याशिवाय दुसरा मार्गच नाहीये. मला गाणे म्हणावेसे वाटतेय – ‘भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा. आठवड्यातून रविवार येतील का रे तीनदा.’
.................................
शनिवारला जर नकर्त्याचा वार म्हणत असतील, तर रविवारला सगळं कर्त्याचा वार म्हणायला हवे. किंबहुना कर्ता कर्म क्रियापद सगळ्याचाच वार.
वार म्हणजे तलवारीचा वार या अर्थाने.. सकाळपासून आपला चेहरा कसा ठेवायचा, तेच समजत नाहीये. चिंतातुर ठेवला की आई विचारते, “काय झालं? पोट बिघडलंय का?” चेहरा हसरा ठेवणे शक्य नाहीये. टीव्हीवर आस्था चॅनेलवरची प्रवचने ऐकणारे ठेवतात तसा ठेवू या. नाहीतर तो त्या साउथच्या पिक्चरमध्ये असतो ना, त्या रामी रेड्डी की शेट्टीसारखा निर्विकार. किंवा मग रजत शर्मासारखा कायम प्रश्नार्थक. नाहीतरी वृंषाली भेटून आल्यावर आपला चेहरा बदलणारच आहे. एकतर अर्णव गोस्वामीसारखा कडू काढा प्यायल्यासारखा होणार, नाहीतर त्या ‘घाला पिठामध्ये तेल..’च्या जहिरातीतल्या बाईसारखा प्रफुल्लित.
आपल्याला पहिल्या जॉब इंटर्व्ह्यूला जातानाही इतके टेन्शन आले नव्हते. पाणी प्याले की टेन्शन कमी होते म्हणे. मी सकाळपासून पंधरा ग्लास पाणी प्यालोय.
जाऊ दे, जे व्हायचे ते होऊ दे. काय होईल? फार तर एखादे लेक्चर देईल – “मला वाटले नव्हते की तू असा आहेस” म्हणेल. आणि....
आणि... आणि काय? आमची मैत्री... छे, नको, तो विचारही करायला नको. इतकी छान मैत्री अशी तुटणार नाही.
विचार करून करून डोके इतके तापलेय की क्वेंचिंग करायला म्हणून पाण्यात बुडवून बसावेसे वाटतेय.
-------------------------------------------
ती संध्याकाळ मी कधीच विसरणार नाही. युनिव्हर्सिटी गार्डन. बाकड्याच्या एका टोकावर वृषाली. एका टोकावर मी. वृषाली माझ्याकडे पाहतेय. मी तिचा अंदाज घेतोय. चेहर्‍यावरून काहीच थांगपत्ता लागत नाहीये.
“शंतनू,” ती बहुतेक कशी सुरुवात करावी याचा विचार करतेय. मी पुढचा नक्की कसला बाँब फुटणार आहे, याचा विचार करणेही सोडून दिलेय.
“शंतनू, मला थेट विचारायचं होतं ना. का नाही विचारलं.?”
मी.. मी.. मला.. मला.. हा प्रश्न येईल असा कधी विचारच केला नव्हता. मला वाटलं की तुझा गैरसमज होईल.”
“कसला?”
“मी फ्लर्ट करतो असा. पण मी तसा नाहीये.”
“बाईच्या जातीला एक शाप आहे. असे लोक अंतर्ज्ञानाने कळतात. तसं असतं, तर तू तसा आहेस हे आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हाच ओळखलं असतं. नंतर तुला भेटलेही नसते.”
“मग?”
“मला उत्तर हवंय. थेट मला का नाही विचारलं? तायडीला मध्ये का आणलंत?”
“खरं सांगू, मला तुला दुखवायचं नव्हतं.”
“नक्की हेच कारण?”
“हो. इतकी छान मैत्रीण मला गमवायची नाहीये. शिवाय तायडीच्या मैत्रिणीची तू बहीण, मला ते रिलेशनही बिघडवायचं नाहीये.”
“त्यांना तू मला मला काय विचारायला सांगितलं होतंस?”
“तसं अगदी काही नाही. पण तू मला आवडतेस हे सांगितलं होतं.”
“आणि पुढे?”
“पुढे काय!... तुझी तयारी असेल तर लग्न करायचंय.”
“हे मला थेट विचारलं असतं, तर आवडलं असतं.”
“मला संकोच वाटला.”
“कसला संकोच? कदाचित नकार मिळेल असा?”
“तसं नाही. पण मला तुला दुखवायचं नाहीये. खरंच.”
“ठीक आहे. मलाही तू आवडतोस... माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून तुझी स्वप्नंही पाहायला लागलेय. तुझ्याशी लग्न करायला आवडेलच. पण..”
“पण काय! एकदा मी तुला आवडतो हे समजलं की पुढे कसला पण कशाला?”
“तू मला विचारलंस की माझी तयारी असेल तर तुला माझ्याशी लग्न करायला आवडेल. माझी तयारी आहे. पण स्पष्ट बोलते, राग मानू नकोस. माझ्याबद्दल किती महिती आहे तुला? कितीही स्वप्नं पाहिली, तरी आयुष्य हे व्यवहारी जगात जगायचं असतं.”
“म्हणजे?”
“ऐकायचं आहे? ऐक. आणि त्यानंतर ठरव की ते ऐकल्यानंतर तुझी माझ्याशी लग्न करायची तयारी आहे का ते.”
"सांग." माझ्या आवाजतला कातरपणा लपला नाही.
“पहिली गोष्ट ही की तुझी माझी ओळख करून द्यायची, हा सुखदाताई आणि तायडीचा प्लॅन होता.
घरी माझ्या लग्नाचा विषय निघाला होता. तायडी आणि सुखदाताई बोलत होत्या. शंतनू मुलगी पाहायलाच नाही म्हणतोय, त्याला मुलगी दाखवायला नेणं वगैरे गोष्टी पसंतच नाहीत. तायडीने तिच्या मोबाइलमधले तुझे फोटो आम्हाला दाखवले. सुखदाताईने तुझ्यासाठी माझं स्थळ कसं वाटतं, ते विचारलं.
त्या दोघींनी ठरवलं आणि दाखवण्या-पहाण्याच्या कार्यक्रमाला फाटा देत आपली गाठ घालून दिली. शंतनू, तू मला आवडला आहेस. न आवडण्यासारखं काहीच नाही. चांगला शिकलेला आहेस. चांगली नोकरी आहे. दिसायला हँडसम आहेस. पण मला तुला अंधारात नाही ठेवायचं. ते पाप होईल. स्वार्थीपणा होईल.
ही गोष्ट फक्त मला आणि माझ्या आईलाच माहीत आहे. सुखदाताईलासुद्धा नाही. लहान असताना मी पप्पांबरोबर स्कूटरवर शाळेला निघाले होते. स्कूटरचं चाक खड्ड्यात गेलं आणि पप्पांचा तोल गेला. आम्ही दोघेही खाली पडलो. पडताना पप्पांनी माझं डोकं रस्त्यावर आपटू नये म्हणून त्याखाली हात दिला. माझं डोकं वाचलं, पण पोटावर स्कूटरच्या हँडलचा जबरदस्त आघात झाला. गर्भाशयाला इजा झाली. शस्त्रक्रिया झाली. मी पूर्ण नॉर्मल आहे, पण डॉक्टरांनी सांगितलं की मी आई होऊ शकणार नाही म्हणून. आईने हे पप्पांनासुद्धा कधी कळू दिलं नाही.”
वृषाली बोलत होती. ऐकताना मनात विचारांचे काहूर माजले होते.
“माझी तयारी आहे. तुझ्याशी लग्न हे माझं स्वप्न आहे. पण तू ठरव. तुझी तयारी आहे? पूर्ण विचारांअंती सांग. हवं तर एक-दोन दिवस घे. काहीही उत्तर असेल तरी चालेल. फक्त एक कर - आपण जे काही बोललो, ते आपल्या दोघांतच ठेव. सुखदाताई किंवा तायडी कोणालाच समजणार नाही. माझी शपथ.”
वृषालीच्या बोलण्यानंतर मी निशःब्द. आम्ही दोघेही. काय बोलायचं तेच समजत नव्हतं.
तीन-चार दिवस मी कोणाशीच बोलू शकलो नाही. तायडीने फोन करून विचारले. आईला आडून विचारले.
मी घरात बोलतच नव्हतो. डोक्यात नक्की काय होतेय ते सांगता येत नव्हते. बधिरासारखा वावरत होतो. उत्तरेच काय, पण प्रश्नसुद्धा संपले होते.
वृषालीला फोन करायला म्हणून फोन बाहेर काढायचो. डायल केलेला फोन कट करायचो. तिच्याशी बोलायची माझ्यात हिम्मत नव्हती. जे सत्य तिने धाडसाने पचवले होते, त्या सत्याच्या जवळपास जायलाही मी घाबरत होतो. स्वतःतला पोकळपणा मी अनुभवत होतो. प्रेमात जिवाला जीव देण्याची भाषा सिनेमात ऐकायला आवडते. प्रत्यक्षात आणायला धाडस लागते.
लग्न म्हणजे दोन जिवांचे मीलन वगैरे वाक्यांमागे दडलेला सोयीस्कर व्यवहार किती डंख मारू शकतो, हे अनुभवत होतो. पती-पत्नी ही संसाराच्या रथाची दोन चाके आहेत वगैरे किती फोलपटे आहेत, हे वजाबाकी करून पाहत होतो.
धर्मग्रंथात लग्न कशासाठी करायचे याचे पहिले उत्तर संततिनिर्मितीसाठी, वंशसातत्यासाठी हेच येत होते. वंशसातत्य कशासाठी? तर आपल्याला आणि आपल्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून.
सावित्री सत्यवानासाठी यमासोबत सात पावले चालली. सत्यवानावर ती वेळ आली असती, तर सत्यवान चालला असता का तसा?
हे प्रश्न विचारायचे नसतात. त्यांची खरी उत्तरे आपल्याला पचत नाहीत.
आपण लग्न कशासाठी करतो, हे सप्तपदीत सांगतात. पण ही होमाजवळची सप्तपदी. यमाजवळची नाही.
पटत असणारी उत्तरे अवघड वाटत होती. आणि नकोशी उत्तरे सोप्पी वाटत होती.
जबाबदारी ही अशी गोष्ट असते की ती झटकली तर कोणीच जाब विचारत नाही. जो घेतो, त्यालाच उत्तरे द्यावी लागतात.
.......................
माझ्या डोक्याचा भुगा झाला.
प्रत्येक नवरा-बायकोला मुले व्हायला हवीतच का? आणि दुसरे म्हणजे मुले हीच संसाराची इतिकर्तव्यता असते का? मी स्वतःचे समर्थन करतोय की स्वतःला समजावतोय, तेच समजत नव्हते.
विचारांचा भुंगा दिवसरात्र पोखरत होता. वृषालीला फोन करायचे धाडस माझ्यात नाही. काय झाले हे कोणाला सांगणार नाही अशी शपथ घातलीये.
तायडी फोन करुन कंटाळली. माझा फोन आल्याशिवाय बोलणारही नाही, असा आईकडे निरोप ठेवलाय.
मी अधांतरी. वटवाघळासारखा लटकतोय. हो, वटवाघळासारखा. दिवसाच्या उजेडाला घाबरून डोळे झाकणारा.
-----------------------
फ्लाईटने टेक ऑफ केलाय. मी स्वीडनला निघालोय. वर्क परमिट असतानाही स्वीडनची असाइनमेंट टाळत होतो. मुद्दाम मागून घेतली. वर्क परमिटचा प्रश्न नव्हताच. ते तयारच होते. प्रश्नांना थेट भिडण्यापेक्षा मी पळपुटेपणा करणे स्वीकारलेय.
------------------
टोचणारे काटे गवताने झाकले की डोळ्यांना दिसत नाहीत. पण पावलांना जखमा देतच राहतात.
स्वीडनमध्ये येऊन सहा महिने झाले. एक दिवसही असा गेला नाही की वृषालीची आठवण झाली नाही. तिचे हसणे, तिचे बोलणे, तिचे मला समजून घेणे, लहान लहान गोष्टींत आनंद घेणे, तिचे वार्‍यावर भुरभुरणारे ते कुरळे केस, फोनवर बोलताना मान तिरकी करून बोलायची सवय आणि शेवटच्या भेटीत भरून आलेले तिचे ते पिंगट डोळे. दिवंसभर कामात वेळ जातो. पण रात्री झोपायला म्हणून डोळे मिटले की डोळ्यासमोर तो सगळा चित्रपट पुन्हा पुन्हा चालू होतो, इन्फायनिट लूपमध्ये.
कधीतरी एकाने ओशोंची गाठ घालून दिली. यू ट्यूबवर ओशोंची प्रवचने ऐकायचा नादच लागला. गुंगून जायला होटे ट्रांक्विलायझर घेतल्यासारखे किंवा मी मुद्दामच ते ट्रांक्विलायझर घ्यायचो. मन गुंतवायला. जखमेची वेदना जाणवू नये, म्हणून तात्पुरती भूल घेतात ना, तसे. भूल उतरली की जखम पुन्हा ठसठसायला लागते. माझ्या जखमेसाठी मला वेदनाशामक औषध नको होते, ऑपरेशन हवे होते. जखम बरी होत नसेल, तर थेट अवयव कापून टाकणारे.
मग कधीतरी एकदा ओशोंचे एक वाक्य ऐकले – ‘मुले होणे हा तुमच्या सहजीवनाचा उद्देश नाहीये. मुळात सहजीवन महत्त्वाचे, मुले ही बायप्रॉडक्ट आहेत.’
माझा ज्योतिषावर विश्वास नाही. वर्तमानपत्रातल्या साप्ताहिक भविष्यावर तर त्याहून नाही. करमणुकीसाठी छान असते. एरवी साप्ताहिक भविष्यातले भविष्य किती खोटे ठरले, यावर हिरिरीने सांगावेसे वाटते. आज मात्र ते या आठवड्यात प्रेमात पडण्याचा जबरदस्त योग आहे सांगणारे राशिभविष्य खरे ठरावे, असे वाटायला लागलेय.
सहा महिन्यात मी वृषालीला एकदाही फोन केला नाही. तेवढी हिम्मतच असायला हवी ना! तायडीलाही तिच्याबद्दल विचारचा प्रयत्न केला नाही. ती कशी आहे हे माहीत नाही. इकडे येताना साधा मेसेजही पाठवला नव्हता. ती कशी असेल, माहीत नाही.
‘मुळात सहजीवन महत्त्वाचे..’ ओशोंचे ते वाक्य खूप काही शिकवून गेलेय. मला पार उलथापालथा करून गेलेय. खूप खोलवर रुतलेला काटा निघालाय.
मी धाडस करायचे ठरवले. फोनवर वृषालीचा नंबर डायल केला.
मला कॉलर ट्यून ऐकायला येऊ लागली – ‘ये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना,..’

विजुभाऊ

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

14 Nov 2020 - 1:53 pm | महासंग्राम

विजूभाऊ दंडवत घ्या काय जबरदस्त कथा लिहिलीये, माझ्या ऑफिसच्या रूटवर वर घडणारी असल्याने एकदम रिलेट झाली. जसं शंतनू सोबत प्रवास करतोय असं वाटतं वाचतांना

आंबट चिंच's picture

14 Nov 2020 - 3:01 pm | आंबट चिंच

मस्त आवडली. ५० फक्त यांच्या या विषयावरच लिहलेल्या आणि मी पारायणे केलेल्या कथेची आठवण झाली.

सोत्रि's picture

14 Nov 2020 - 3:30 pm | सोत्रि

ज ब र द स्त!

क ड क!!

- (दिवाना) सोकाजी

संजय क्षीरसागर's picture

15 Nov 2020 - 12:20 am | संजय क्षीरसागर

ओशोंचं लेखन सोडता इतर कोणतीही गोष्ट मी इतक्या तन्मयतेनं कित्येक दशकांनंतर वाचली. एक साधासा विषय इतका सुंदर खुलवण्याचं कौशल्य हेवा वाटावा असं आहे. लगे रहो !

तुमच्या लेखनाचा हा बाज इतर वेळी का दिसत नाही हा प्रश्न मात्र मनात रुंजी घालत राहिला.

अभिजीत अवलिया's picture

15 Nov 2020 - 5:59 am | अभिजीत अवलिया

फार आवडली कथा.

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 7:26 pm | टर्मीनेटर

@विजुभाऊ

'ये लडका हाये अल्ला...'

ही तुमची कथा खूप आवडली  👍

विजुभाऊ रॉक्स  🤘

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

गामा पैलवान's picture

16 Nov 2020 - 7:23 pm | गामा पैलवान

विजुभाऊ,

कथा विचारमग्न करणारी आहे. आवडली.

कथानायकाच्या मते भारतीय पारंपरिक विचारांनुसार विवाह वंशसातत्य टिकावं म्हणून करतात, तर ओशोंनी विवाहातला प्रमुख मुद्दा सहजीवन असल्याचं म्हंटलंय. पाश्चात्य देशांत बरेचसे लोकं ओशोंच्या दृष्टीकोनातनं लग्नाकडे बघतात. इतकंच निरीक्षण नोंदवतो. धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.

MipaPremiYogesh's picture

17 Nov 2020 - 10:46 pm | MipaPremiYogesh

वाह किती सुंदर , नाजूक कथा. खूप मस्त

स्मिताके's picture

21 Nov 2020 - 12:09 am | स्मिताके

+१

सरिता बांदेकर's picture

18 Nov 2020 - 2:40 pm | सरिता बांदेकर

खूपच छान

सरिता बांदेकर's picture

18 Nov 2020 - 2:41 pm | सरिता बांदेकर

खूपच छान

तुषार काळभोर's picture

18 Nov 2020 - 4:55 pm | तुषार काळभोर

आज निवांत वाचली. मस्त मस्त मस्त!
तक्रारः तुम्ही नेहमीच असं का नाही लिहित?

असा मी असामी's picture

18 Nov 2020 - 5:30 pm | असा मी असामी

खूपच छान

प्राची अश्विनी's picture

18 Nov 2020 - 7:23 pm | प्राची अश्विनी

कथा छान रंगली. पण आता सहा महिन्यांत तिच्या मनात काही बदल झाला का? ती काय उत्तर देईल याची उत्सुकता लागलीय.

विजुभाऊ's picture

22 Nov 2020 - 12:39 pm | विजुभाऊ

आयडिया चांगली आहे. प्रयत्न करतो.
नव्या कथेसाठी विषय मिळाला

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Nov 2020 - 10:33 am | ज्ञानोबाचे पैजार

मस्त लिहीली आहे
नेहमीप्रमाणेच
पैजारबुवा,

मित्रहो's picture

23 Nov 2020 - 6:00 pm | मित्रहो

मस्त , खूप मजा आली कथा वाचताना.
७५ टक्के कथा हलकीफुलकी साधी सरळ वाटत असताना शेवटी ज्या प्रकारे विचार करायला लावते ते मस्त.

सुखी's picture

23 Nov 2020 - 11:42 pm | सुखी

विजुभाऊ, फर्स्ट half एकदम खुसखुशीत.... तेवढंच पुढचा भाग विचार करायला लावणारा.... आवडली कथा

मुक्त विहारि's picture

24 Nov 2020 - 10:14 pm | मुक्त विहारि

मस्तच

चौथा कोनाडा's picture

26 Nov 2020 - 6:05 pm | चौथा कोनाडा

वाह विजूभाऊ, क्या बात हैं !

ये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना...
‘ब्लेम इट ऑन रिओ’
‘आय जस्ट कॉल्ड टू से आय लव्ह यू..’
‘छोटीसी बात’
‘भवरा बडा नादान है...’
‘सोमवार को हम मिले, मंगलवार को नैन. बुध को मेरी नींद गयी, जुमे रात को चैन. शुकर शनी कटे मुश्कील से, आज है ऐतवार. सात दिनो मे हो गया जैसे सात जनम का प्यार.’


असं रोमॅण्टिसिझम मध्ये घोळवत घोळवत सिरियस करुन टाकलं ना राव !
👌
– ‘ये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना,..’ ची कॉलर ट्यून पुन्हा पाहुन कसलं भारी वाटलं राव !
बा़की, लिखाणातील स्पेशल स्टाईल (उदा: विचार करून करून डोके इतके तापलेय की क्वेंचिंग करायला म्हणून पाण्यात बुडवून बसावेसे वाटतेय) या बद्दल पेशल सॅल्युट !

मजा आ गया विजुभाऊ !

विजुभाऊ's picture

3 Dec 2020 - 11:13 am | विजुभाऊ

_/\_ धन्यवाद.

@ विजूभाऊ, दाद देणेबल 'जागां' नी ठासून भरलेली मस्त कथा लिहीली आहात. मजा आली वाचायला. मोठ्ठी कथा, त्यातून विजुभाऊची, तेंव्हा सावकाशीनं वाचू म्हणून ठेवलेली राहून गेली होती ती आज वाचली. अनेक आभार. तुम युहीं मस्त कथाएं लुटाते रहो.