प्रेम

Primary tabs

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amप्रेम

"प्रेम कुणावर करावं ? कुणावरही करावं"

कविवर्य कुसुमाग्रजांची ही अत्यंत आशयघन, लोकप्रिय आणि गाजलेली कविता .... आम्हालाही ती शाळेत अभ्यासक्रमात शिकायला होती. अर्थात त्या पौगंडावस्थेत प्रेम ही अशी निर्मल भावना किंवा ह्या भावनेची इतकी गहन खोली आम्हाला कुठली कळायला ? (अजूनही कळली आहे की नाही शंकाच आहे पण आता त्याची फिकीरही नाहीये म्हणा..... ) आम्ही आपले "परीक्षेत ह्यावर काय प्रश्न येऊ शकतात" म्हणून यांत्रिकपणे कविता घोटून पोपटासारखी पाठ करणारे विद्यार्थी होतो ! त्यामुळे कवीला नक्की काय म्हणायचं आहे ते आता कुठे थोडं थोडं उमगायला लागलंय .... कवी म्हणतो की प्रेम कुणावरही करावं .... पण खरंच होतं किंवा असतं का हो असं निस्सीम प्रेम? बरं एखाद्या वेळी आपण करूही तसं प्रेम...... पण आपल्यासमोर दुसरी एखादी सजीव व्यक्ती असेल तर तितकाच उत्कट प्रतिसाद मिळण्याची हमी देऊ शकतं का कोणी ? तर ह्याचं उत्तर आहे " अजिबात नाही " ! म्हणजे ह्यात होतं काय की आपण एकटंच वेड्यासारखा ऊर फुटेस्तोवर एखाद्यावर भयानक प्रेम करायचं आणि समोरच्या व्यक्तीने अत्यंत थंड डोक्याने आपल्या त्याच पवित्र भावनेचा शस्त्रासारखा वापर करून आपल्यालाच ऐनवेळी तोंडघशी पाडायचं ह्याचे आयुष्याच्या चाळीशीच्या आत इतके प्रयोग झालेत की, आता कोणी खरंच "मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो / करते" म्हटलं तरी हसू येतं.......
ह्याची सुरुवात होते लहानपणापासूनच ....लहान म्हणून सगळे कौतुक करतात, प्रेम करतात, लाड करतात पण तेव्हा आपल्यालाच त्याला योग्य प्रतिसाद देता येत नाही, कारण आपल्याला ते माहितीच नसतं. आपण कोणासाठी तरी विशेष आहोत ही भावना मात्र पक्की डोक्यात बसते. जसजसं वय वाढत जातं तशी त्या प्रेमाची जागा कधी कधी धाकदपटशा किंवा हलकासा (किंवा भरपूरही ) मार कधी घेतो हे आपलं आपल्यालाच कळत नाही पण कुठेतरी आपला नाजूक आणि तरल भावविश्वाला हादरे बसायला सुरुवात होते. आतापर्यंत आपले लाड करणारी घरची मंडळी आणि विशेषतः आईवडील असे विचित्र का वागायला लागलेत ते कळेनासे होते आणि सगळ्याचाच प्रचंड राग यायला लागतो. हा आपल्या प्रेमाच्या भावनेला बसलेला पहिला धक्का असतो. आपण आहोत तसेच वागत असूनही समोरच्याची वागायची पद्धत बदलली की ते काही दिवस प्रचंड मानसिक तणावाखाली जातात..... बरं ह्यालाच मानसिक ताण म्हणतात एवढंही आपल्याला कळत नाही पण काहीतरी वेगळं घडतंय हे लक्षात येतं .... पुढे त्याची हळूहळू सवय होते आणि शाळेत जाऊन सगळीकडे हाच प्रकार होतो एवढं समजायला लागतं.

थोडंसं मोठं झालो की मग आयुष्यात येते शाळा (मिलिंद बोकिलांची कादंबरी आठवली !) ......आयुष्याचं एक नाजूक आणि अवघड वळण आणि आयुष्याचा पाय मजबूत करणारी एक अविस्मरणीय घटनांची साखळी .....को-एड शाळा असल्यामुळे मुली तर शाळेत असणारच. आमच्या वर्गातली बहुतेक मुलं नको त्या विषयांमध्ये इतकी पुढारलेली होती की कधी कधी मी स्वतःला आदिमानव समजायचो. अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळे विविक्षित शब्द,अर्वाच्य शिव्या आणि इतर अवांतर माहितीचा चालता बोलता खजिना आमच्या आजूबाजूला सतत वावरत असायचा. ऑफ पिरियड असेल तर मग धमाल विचारायलाच नको. पण माझी कधीही त्या मुलांमध्ये जाऊन असली अवांतर माहिती मिळवायची कधीच इच्छा नाही झाली, कारण ते विश्व नवीन असलं तरी कुठलीही माहिती मिळवायची ही पद्धत नव्हे ही एक सुप्त जाणीव तेव्हापासूनच होती कदाचित. वर्गातल्या मुलींमागे फिरणं , त्याच्या नावांनी एकमेकांना चिडवणं असले प्रकार यथेच्छ चालायचे. ह्या सगळ्या प्रकारात आपला नाव कधीही येऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले जातात पण चुकून माकून एखादा सापडला तर त्याला "नको जीव" करून सोडतात बाकीचे. आमच्या शाळेत तर शाळेतल्या मुलींवरून बाहेरून आलेली मुलं आणि शाळेतली मुलं ह्यांच्यातल्या तुफान हाणामाऱ्या देखील पाहिल्या. आगीत तेल ओतायला नव्वदच्या दशकातले भडक सिनेमे तर होतेच त्यामुळे सगळेच अमिताभ, शाहरुख आणि सलमान समजायचे स्वतःला आणि हिरोगिरी करत मुलींच्या डोळ्यात आपण कसे भरू ह्याची चढाओढ चालायची. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मुलगा म्हणून भिन्नलिंगी व्यक्तीविषयी नुकतंच निर्माण होऊ पाहत असलेलं नैसर्गिक आकर्षण (ज्याला शाळेतल्या सगळ्या मुलांनी प्रेम हे नाव ठेवलं होतं) ह्या सगळ्या गदारोळात कुठेतरी दबून गेलं होतं. कधी कधी क्वचित एकाद्या डोळ्यात ते जाणवायचं पण ते क्षणिक होतं, ज्यावेळी मी वार्षिक स्नेहसंमेलनात भाग घायचो आणि बक्षीस मिळायचं वगैरे वगैरे. लोकांना (म्हणजे माझ्या काही मित्रांनाही) ह्याच कालखंडात दहावीपर्यंत त्याच्या आयुष्याचा जोडीदारही लाभले ! मला ह्या गोष्टीचा प्रचंड आश्चर्य अजूनही वाटतं. ज्या वयात परीक्षेत कुठले प्रश्न येणार आहेत हेही माहिती नसतं तेव्हा माणूस त्याच्याही नकळत आयुष्यभराचे इतके मोठे निर्णय कसे काय घेऊ शकतो हे त्यांचे तेच जाणोत. मग वाटायचं की चुकून कुणाच्या फंदात पडलो असतो तर शाळेनंतर पुढे कसं होणार होतं ? घरच्यांनी तर केव्हाच उत्तरपूजा बांधली असती हे नक्की !

असो .....तर कुठलेही तथाकथित प्रेमाचे प्रयोग न रंगवता सहीसलामत शाळेतून बाहेर पडलं की पुढे येतं ते कॉलेज ! दिवसा दोन तीन तास जायला लागणारं असेल तर एकवेळ ठीक आहे पण जर हॉस्टेल एकदा आयुष्यात आलं की मनुष्य अथांग ज्ञानसागरात डुंबून थेट आत्मज्ञानीच होतो. माझ्या बाबतीत हॉस्टेल हा प्रकार परिकथेसारखाच राहिला कारण घरच्यांनी बाहेर राहायचे सगळे डाव हाणून पडले (जणू काही मी अगदी रणजीत किंवा शक्ती कपूरच होणार होतो ! ). तर कॉलेज ..... इथे शाळेसारखी कसलीही बंधनं नव्हती त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मिळालेल्या स्वातंत्र्याच्या प्रेमात पडलो. तारुण्याची जाणीव, आजूबाजूला रंगीबेरंगी आयुष्य, सायकल सुटून माझ्या मित्रांच्या हातात आलेली दुचाकी आणि बरोबरचे मित्र तर होतेच ! ..... "विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटी" हे नंतर आपलं आपणच उमगलं कारण सांगणार कोण आणि ऐकायच होतं कुणाला ? शाळेत कधीतरी अनुभवलेलं मुक्त वातावरण इथे भरभरून अनुभवायला मिळतं. प्रेम ही जाणीव इथे मात्र नाईलाजाने बरेचदा फक्त मुलींच्या बाबतीत जोडलेली असते कारण हे म्हणजे खरा पुरुषार्थ असा गोड गैरसमज तेव्हा तरी असतो.इथे खरं प्रेम म्हणजे फक्त "कपल लव्ह" ..... बाकी सगळं खोटं ! शिक्षकांवर प्रेम करणारे घासू आणि चष्मिष्ट लोक "चम्या" समजले जातात त्यामुळे एखाद्या शिक्षकाविषयी ओढ वाटली तरी ती बरेचदा व्यक्त करता येत नाही. असे ढीगभर लव्हबर्ड्स आजूबाजूला घोळक्याने फिरत असतात ( फक्त मुलांचे इंजिनिअरिंग कॉलेज असेल तर मुलांचे हाल कुत्रा खात नाही ) त्यामुळे हे गुलाबी आयुष्य आपणही अनुभवावं अशी इच्छा कधीतरी स्पर्श करून जायची (नैसर्गिकच होतं म्हणा ते ) पण पुढे ह्या नादाला लागून वर्ष वाया गेलेली मुलंही पाहिली आणि हा आपला प्रांत नव्हे हे लगेच लक्षात आलं. अस्मादिक तसेही दिसायला लौकिकार्थाने अजिबात आकर्षक वगैरे नसल्यामुळे कोणी आकर्षित वगैरे व्हायची शक्यता नगण्य होती, आर्थिक परिस्थितीही यथातथाच, त्यामुळे ती भीती कधीच नव्हती. आजूबाजूला घडणाऱ्या सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथांचा साक्षीदार होता होता कॉलेजही केव्हाच सरलं, पण प्रेमसागरात डुंबणं तर लांबच पण कधी पायही भिजवले नाहीत. आपण आपलं करिअर आणि अभ्यास हेच विचार सतत डोक्यात असल्याने हा विषय तास मागेच पडला.

फर्स्ट क्लासमध्ये ग्रॅजुएशन झालं आणि यथावकाश कॉलेजलाही रामराम ठोकला. पुढे काय करायचं ह्यावर घरी व्यवस्थित गदारोळ वर्षभर आधीच माजला होता. मला कायद्याची पदवी घ्यायची आहे आणि फौजदारी वकिली करायची आहे हे मी केव्हाच घरी जाहीर केलेलं होतं आणि त्यावरून घरी रोज घमासान व्हायचं. मुळात दहावीनंतर मी इंजिनीरिंग करावं असा धोशा आईवडिलांनी लावला होता पण मला माझी कुवत माहिती असल्यामुळे त्या वाटेला मी कधी गेलो नाही. आता बी कॉम नंतर मी सीए करावं अशी नवीन टूम काढली होती पण मला त्यातही रस नव्हता. मी त्यांचा प्लॅन हाणून पडतोय म्हटल्यावर त्यांनीही वकिलीचे वाभाडे काढायला सुरुवात केली. हे गुन्हेगारीचे पैसे असतात ते आयुष्यात लाभत नाहीत, पोट भरण्याएवढेही पैसे मिळणार नाहीत, झाडाखाली पानमसाला खात उभं राहावं लागेल, कोणी लग्नासाठी मुलगीही देणार नाही वगैरे मनापासून आशीर्वाद दिले. अर्थात मी माझ्या निश्चयापासून कधीच ढळलो नाही पण घरी प्रचंड गरम वातावरण असायचं त्यामुळे घरी बसणं पण नको वाटायला लागलं होतं. मी सगळी माहिती काढून शेवटी एलएलबीला प्रवेश घेतलाच ! मोठं आश्चर्य म्हणजे आमच्या तीर्थरूपांनी दुसऱ्याच दिवशी "मलाही आता कायद्याची पदवी घ्यायची आहे" असा बॉम्ब फोडला. असा डोकं सटकलं होतं माझं की बास. जी माणसं कालपर्यंत मला माझ्या निर्णयापासून परावृत्त करायचा प्रयत्न करत होती तीच आज वकिलीच्या मागे कशी काय लागू शकतात ? पण म्हटलं जाऊदे ...... काय हवं ते करा ... मला माझा मार्ग स्पष्ट दिसत होता तो म्हणजे कायद्याच्या विषयातच आपलं काम करायचा. त्यानंतर प्रत्येक सेमिस्टरला घरी वेगळीच कटकट सुरु झाली .... मला शांतपणे अभ्यास करायची सवय आणि तीर्थरूपांना मोठमोठ्याने संसदेत ओरडून बोलतात तसं वाचायची सवय.... मग डोकं उठायचं आणि त्यांना शांत करण्यात अभ्यासाचा मूड निघून जायचा (असं असूनही त्यांना प्रत्येक सेमिस्टरला केटी आणि मला कधीच लागली नाही !). ह्या कॉलेजमध्ये तर आधीच्या कॉलेजपेक्षाही मुक्त वातावरण होतं कारण सगळेच पुढे कायदा पदवीधारक किंवा वकील होणार होते. असं मुक्त वातावरण असून सुद्धा मी इथेही कोणाच्याच तसा प्रेमाबिमात पडलो नाही. माझे माझ्यासारखेच असलेले दोन तीन मित्र मिळून आम्ही क्लास संपल्यावर कॅम्पस मध्ये फिरत राहायचो. इथे पुन्हा मला कुठल्या तरी एक्सट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये काहीतरी करावं असं वाटायला लागलं आणि म्हणून मी आणि मित्राने वार्षिक स्नेहसंमेलनात भाग घ्यायचा असं ठरवलं. त्यानिमित्ताने मी बऱ्याच वर्षांनी बाथरूममध्ये एकटा गाण्याव्यतिरिक्त सगळ्यांसमोर लाईव्ह गाण्याचा काहीतरी विलक्षण प्रकार अनुभवला. त्याची तयारी वगैरे करण्यासाठी आम्हाला वर्गानंतर थांबावं लागायचं. माझ्याकडे तोपर्यंत मोबाईल नसल्यामुळे सगळ्यांना विचित्र वाटायचं कारण कुठलाही निरोप देण्यासाठी मी घरचा टेलिफोन नंबर २-३ जणांना देऊन ठेवला होता. एके दिवशी अचानक माझ्या वर्गातील एका मुलीने मला कार्यक्रमासंदर्भात कसला तरी निरोप देण्यासाठी म्हणून फोन केला आणि नेमका तो फोन माझ्या आईने घेतला. निरोप ऐकायचं सोडून आई फोनवर तिचीच कुंडली काढायच्या मागे लागली. ती कोण, कुठे राहते घरी कोण कोण असतं वगैरे तपशील विचारायला लागल्यावर त्या मुलीलाही कसतरीच वाटायला लागलं. काहीतरी बोलून तिने फोन ठेवून दिला आणि दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये माझा सगळ्यांसमोर जाहीर सत्कार झाला आणि कुठल्याही मुलीने माझ्या घरी फोन करू नये असा फतवा निघाला. झालं ...... घरीही सीआयडी चौकशी झाली की ह्या मुलीविषयी तू आम्हाला कसलीही माहिती का दिली नाहीस ? माझं तर डोकंच गरगरायला लागलं. अशी प्रत्येक मुलीची कुंडली घेऊन मी फिरायला लागलो तर कसा निभाव लागणार आणि मुळात आमच्यात काहीच नव्हतं तर घरी काय सांगायला हवं होतं ? कार्यक्रमानिमित्ताने दोन तीन मुलींशी झालेली ओळख आणि जुजबी बोलणं हे आयुष्यात पहिल्यांदाच झालं होतं आणि तेही तेवढ्यापुरतेच !

गम्मत म्हणजे आमच्या ब्रह्मचारी ग्रुपमधील एका मित्रावर एका मुलीची नजर गेली आणि ती त्याच्या प्रेमात पडली आणि त्याला प्रपोज केलं तसा तो "त त प प" करायला लागला कारण ह्या सगळयाची सवय होती कोणाला ? तो आम्हाला विचारायला लागला की मी काय करू सांगा. आमच्याकडे ह्या विषयावर अधिकारवाणीने सांगण्यासारखं काहीही नसल्याने त्याला आम्ही " तुला हवे ते कर " असा प्रेमळ सल्ला दिला. पण तो कसला ऐकतोय, तिने एकदा त्याला तिच्या घरी गणपतीसाठी बोलावलं होतं तर हा पठ्ठया मलाही उगाचच बरोबर घेऊन गेला. माझी अवस्था म्हणजे "गाढव मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं हेलपाट्यानं" अशी झाली होती. तिचे वडील दोन मुलांना एकदम घरात पाहून स्पष्टपणे आश्चर्यचकित झाले होते हे मला दिसलं. त्यांचे घारे डोळे आजतागायत विसरलेलो नाही. कधी दर्शन घेऊन बाहेर पडतो अशातली गत झाली होती. पुढे त्यांनी एकमेकांबरोबर वेळ घालवण्यासाठी शिवाजी पार्कात भेटायचं ठरवलं तर हा पुन्हा मला आणि अजून दुसऱ्या मित्राला तिथे घेऊन गेला. ते दोघे हातात हात घालून मस्त फिरत असताना आम्ही मात्र एकमेकांचं तोंड बघत तिथे बसलो होतो म्हणून त्या दिवशी स्वतःची थोडीशी दया आली होती. पुढे त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि तो आमच्या ग्रुपमधून तसा बाहेर पडला. मग उरलो आम्ही दोघेच. हा मित्र मला त्या दिवशी म्हणाला .... आपलं काहीही होणं शक्य नाही, आपला फोटो सगळ्या वेबसाईटवर घराघरात फिरणार ! मग आम्ही दोघेच फिरत राहायचो इकडे तिकडे....प्रेमाचे काही अनुभव प्रेमात न पडताही असेच मिळालेले आहेत.

अश्या गोंधळात माझं एलएलबी एकदाचं पूर्ण झालं.... इथेही कुठले अडथळे नसल्यामुळे चक्क फर्स्ट क्लास मिळाला आणि जीव भांड्यात पडला. इथून पुढे खरी कसोटी म्हणजे आपली स्वतःची प्रॅक्टिस सेट करणं होतं पण माझं लहानपणापासूनच हे स्वप्न असल्यामुळे एकीकडे भयानक उत्साह सुद्धा होता. काळा कोट ज्यादिवशी अंगावर आला तेव्हा खूप भारी वाटलं कारण "याचसाठी केला होता अट्टाहास !" अर्थात नुसते एलएलबी करून भागणार नव्हतंच म्हणून पुढे एलएलएमला ऍडमिशन घेतली. तीर्थरुपांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही आता माझ्याबरोबर तिथेही येऊ नका कारण ते तुम्हाला झेपणारं नाही. थेट मुंबई विद्यापीठात रोज लेक्चर असल्यामुळे नोकरी सांभाळून तुम्हाला जमायचं नाही. मी माझी नव्याने सुरु झालेली वकिली सांभाळत (म्हणजे दुपारी तीनलाच ऑफिस मधून सटकून )थेट रोज युनिव्हर्सिटी मध्ये जायला लागलो. अशातच पहिल्या सेमिस्टरला नेमकं तीर्थरूपांना मधुमेह वाढल्यामुळे हास्पिटलात ऍडमिट करावं लागलं त्यामुळे आई त्याच्या बरोबर तिथेच राहत होती. मी घरी दीड महिना एकटाच राहत होतो. परीक्षा द्यावी की नाही ते कळेना पण तरी म्हटलं की देऊन बघूया जे होईल ते होईल .... माझे क्लास, परीक्षेची तयारी आणि हास्पिटलची रोजची वारी ह्यातून जेमतेम अभ्यास होत होता आणि पेपर संपूर्ण लिखित स्वरूपाचा असल्यामुळे मोठाच कस लागत होता ... मी परीक्षेत काय लिहिलं ते माझं मलासुद्धा आठवत नाही. निकाल आला तेव्हा बरीच धाकधूक होती. बोर्डावर जाऊन लिस्ट पहिली तर पहिल्या सेमिस्टरला बसलेल्या २०० विद्यार्थ्यांमध्ये फक्त १३ जण पास झाले होते आणि माझं नाव शेवटचं होतं... नाव पाहिल्यावर जीव एकदम भांड्यात पडला आणि खरंच आपणही काहीतरी करू शकतो असा कुठेतरी विश्वास पुन्हा एकदा वाटला. मग मागे वळून पाहिलंच नाही. एलएलएमची दोन वर्षं बघता बघता सरली. बरोबरचे सगळे मित्र मैत्रिणी मिळून कधी क्लासच्या आधी किंवा नंतर खूप धमाल करायचो गप्पा टप्पा व्हायच्या आणि अभ्यास तर होताच. ही पदवी हातात पडली आणि घरीही आनंद झाला. आईवडिलांनी बरंच कौतुकही केलं (एकदाचं !) आणि आमचं ऐकलं नाहीस तेच चांगलं केलंस अशी पावतीही दिली.

आता मात्र पुढे आपलं आपल्यालाच आयुष्य उभं करायचंय ह्याची जाणीव झाली आणि अधिक जोमाने मी कामाला लागलो. सुरुवातीच्या काळात सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणा मी फौजदारी केसेस बरोबर कौटुंबिक केसेसही खूप हाताळल्या. सगळ्या प्रकारची जोडपी पहिली, प्रेमविवाह केलेले, ठरवून लग्न केलेले, पळून जाऊन लग्न केलेले आणि इतरही बरेच लोक होते. वकिलीमुळे ह्या सगळ्या लोकांच्या वास्तविक आयुष्याची खूप माहिती मिळायची. प्रेम/शृंगार/रोमान्सने झालेली सुरुवात माणसाला नंतर कुठे घेऊन जाते आणि कायद्याच्या कचाट्यात ह्या भावभावना कुठे निघून जातात ह्याची प्रत्यक्ष अगणित उदाहरणे पाहायला मिळाली. त्यामुळे आतली प्रेमाची भावना किंवा नैसर्गिक उर्मी कुठेतरी दाबली गेली किंवा तिला धक्का बसला कारण इतका विचित्र आणि भयानक मानवी स्वभाव आणि घटना ऐकून आयुष्य संपूर्ण रुक्ष झालं होतं आणि नको ते प्रेम आणि नको ते लग्न अशी विचारसरणी एक दोन वर्षात तयार झाली होती. व्यावसायिक बंधनांमुळे मला फार खोलात जाता येणार नाही पण कमालीचे भयानक अनुभव कौटुंबिक केसेस मुळे वाचनात आले होते. पती पत्नीची भांडणं त्यांची कारणं , एकाच किंवा दोघांचाही बाहेरख्यालीपणा, सेक्ससारख्या नाजूक आणि अविभाज्य क्रियेच्या दृष्टीने दोघांपैकी एकाचे अति वेड किंवा कमालीची उदासीनता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अशिलासमोर बसून समजावून घेताना तटस्थपणे ऐकून घेतलं तरी पुढचा प्रवास किती कठीण आहे हे कुठेतरी एक माणूस म्हणून आपणही ऐकत असतो. ह्या अनुषंगाने डॉक्टर आणि वकील ह्यांचा मानसिक संतुलन कमालीच्या तयारीचं लागतं हेही तितकाच खरंय. ह्यावर एक वेगळी लेखमालाच होईल पण तूर्तास हा विषय इथेच थांबवतो. तर असं सगळं असताना आपणही आता तारुण्याच्या भरात आहोत किंवा आपलंही पुढे काय होणार ह्याची एक वेगळीच धास्ती वाटायची. आपल्याला जे वाटतं ते तसंच होणार होणं म्हणजे आयुष्य थोडीच आहे. त्यासाठी तो अनुभव मुळात घ्यायला लागतो ना. अशातच घरातून माझं शिक्षण पूर्ण झालेलं असल्यामुळे आता पुढे लग्नाचं काय ? असा प्रश्न आडून आडून विचारला जात होताच. तरी मी त्यांना सांगितलंच की असं एकामागून एक गिरणीत धान्य ओतल्यासारखं नका मागे लागू.. मलाही माझ्या आयुष्याचा अनुभव घेऊ दे, कडू गोड घटना आहेत त्या बघू देत आणि मी तुमच्या मनाप्रमाणे नाचणार नाही. त्यावर 'तुझ्या आयुष्यात कुणी खास मुलगी वगैरे आहे का' ह्याचीही चौकशी झाली पण कोणी नव्हतंच तर काय सांगणार ?

एका घटनेने माझं आयुष्य तेव्हा पार बदललं. झालं असं की त्या वेळीही स्मार्टफोन वगैरे गोष्टी म्हणजे मोठीच चैन होती. फक्त इंटरनेट हा एकच पर्याय होता. त्यात ऑर्कुट नावाची वेबसाईट चलतीत होती. सगळ्या मित्रांनी अकाउंट काढलं म्हणून मीही काढून ठेवलं होतं. फेसबुक तेव्हा फक्त चाचपडत होतं. कधीतरी सर्फिंग करता करता असाच एक मराठी वकिलांचा ग्रुप सापडला. नवीन कायद्यांच्या दृष्टीने आपण सतत अपडेटेड असावं आणि इतर वकिलांशीही पुढे मागे कामाच्या दृष्टीने ओळख असावी म्हणून माहितीसाठी मीही तो ग्रुप जॉईन केला आणि कधीतरी त्यातली माहिती वाचायचो. एकदा कुठल्या तरी गहन विषयावर बराच कायद्याचा कीस पडत होता म्हणून मीही त्यात उडी मारली आणि मला जेवढी माहिती होती ती नोंदवली. एके दिवशी एक स्क्रॅप माझ्या अकाउंटला आला तो एका मुलीचा होता आणि ती कायद्याची विद्यार्थिनी होती. तिला तिच्या विषयांमध्ये काहीतरी मार्गदर्शन हवं होतं आणि ते मी देऊ शकेन का असं तिने मला विचारलं. मला आधी नवल वाटलं की ह्या ग्रुपवर फक्त वकील असताना विद्यार्थी काय करत आहेत पण तरीही मी 'हो' म्हटलं आणि मग स्क्रॅपच्याच माध्यमातून आमची जुजबी ओळख झाली. तिचे बरेचसे प्रश्न अभ्यासासंदर्भात असल्यामुळे आमचं बोलणं त्यावरच असायचं. माझ्याकडे तेव्हा कोर्टाच्या कामामुळे नवीन मोबाईल घेतला असल्यामुळे मी माझा नंबर तिला देऊन ठेवला होता पण प्रत्यक्ष बोलणं व्हायला बरेच दिवस गेले. बोलता बोलता सहज तिने एकदा "आपण भेटूया का?" असा प्रश्न विचारला. नाही म्हणण्यासारखं माझ्याकडे काही कारण नव्हतं म्हणून मी हो म्हटलं. तशी एकदा वेळ ठरवून आम्ही प्रत्यक्ष भेटलो . माझ्या अपेक्षेपेक्षा ती फारच वेगळी आणि बिनधास्त होती. पहिल्याच भेटीत आम्ही वेगवेगळ्या विषयांवर भरपूर गप्पा मारल्या अर्थात मुख्य मुद्दा कायद्याचा अभ्यास हाच होता.

आमची ही पहिली भेट मला माझ्या आलेल्या अनुभवातून निराशावादी होत चाललेल्या आयुष्यात कुठेतरी अचानक एखादं मृगजळ दिसावं तशी ती वाटली पण म्हणून मी लगेच वाहवत गेलो नाही. म्हटलं ठीक आहे , हा एक नवीन अनुभव आहे तोही घेऊन बघूया. त्या भेटीनंतर बरेच दिवस कुठलेही बोलणे किंवा फोन झाला नाही. मला ते अपेक्षितच होतं कारण माझं एकंदरीत रंगरूप आणि दिसणं ह्यावरून एकदा माझ्याशी बोललेली कुठलीही मुलगी तोपर्यंत पुन्हा सहसा परत कधीच बोलत नव्हती आणि असं का ते मला माहिती नाही. पण तिचा पुन्हा काहीतरी विचारण्यासाठी बऱ्याच दिवसांनी फोन आला तेव्हा मला जाणवलं की हे काहीतरी वेगळं घडतंय, त्यावेळी तिने मागे आपण भेटलो होतो ते फार छान वाटलं हेही आवर्जून सांगितलं मग जरा कुठे थोडंसं हायसं वाटलं. आमच्या त्यानंतर ह्या ना त्या निमित्ताने बऱ्याचदा भेटी व्हायला लागल्या. तिने तिच्या काही मित्रमैत्रिणींशीही माझी भेट घडवून दिली त्यांच्याही बऱ्याचश्या शंकांचं निरसन मी करून दिलं होतं. एकदा तिने घरी बोलावून आईवडिलांशीही ओळख करून दिली होती. त्यांनीही चांगलं स्वागत केलं आणि थोडीफार माझी माहिती घेतली . घराबाहेर कारणपरत्वे जाणारा मी तेव्हा संध्याकाळी बराच वेळ घराबाहेर असायचो त्यामुळे घरीही परत एकदा चौकशी झालीच. ह्यावेळी मात्र माझ्याकडे सांगायला काहीतरी होतं ती माहिती मी त्यांना दिली. तेही चकित झालेले दिसले कारण मी असं काहीतरी करू शकेन असं त्यांना कधीच वाटलं नाही त्यांनी मला तिला आणि तिच्या आईवडिलांना एकदा घरी बोलवायला सांगितलं. त्याप्रमाणे ते आले देखील आणि भरपूर गप्पा झाल्या. मुलाची पहिली आणि एकमेव मैत्रीण म्हणून तिला पाहून तर ते एकदमच थंड झाले होते. ते घरी गेल्यानंतर आमचं घरी बोलणं झालं त्यात आमच्या घरच्यांनी पसंत आहे मुलगी टाईप प्रकार सुरु केला. मी एकदम दचकलोच. आमच्यात तसं काहीही बोलणं झालं नव्हतं आणि इथे तर भलताच प्रकार... त्यातून वकिलीही नुकतीच सुरु केलेली असल्यामुळे आर्थिक बाजूही बघायची होतीच. मीच त्यांना सांगितलं की जरा थांबा फारच घाई होते आहे. मला जरा पुढचा अंदाज घेऊ दे त्याआधी मी काहीही करणार नाही. मग त्या दृष्टीने मी चाचपणी करायचा सुरुवात केली. तिच्याशी बोलून तिच्या एकंदरीत मनाचा अंदाज घेणं किंवा विचारसरणी जाणून घेणं हे नाही म्हंटलं तरी जिकिरीचं काम होतं. बरं तशी माझी मित्रमंडळी ही माझ्यासारखीच. कोणालाच कसलाच अनुभव नाही त्यामुळे सल्ले देणार कोण ? मग ठरवलं आपलं आपणच शोधून काढायचं. पुढचे काही महिने आम्ही भेटलो कि मुद्दाम मी घरगुती विषय काढायचो किंवा कोणाचंबोलणं झालं तेव्हा ती खूप कसं लग्न ठरलंय वगैरे गोष्टी व्हायच्या. लग्नाबद्दलचे आणि पुढच्या आयुष्याबद्दलचे तिचे विचार मला फार उदासीन वाटले आणि तिला विशेष रस आहे असं काही दिसलं नाही. मी म्हटलं की असेल काहीतरी.

आमच्या प्रदीर्घ भेटींनंतर मी एकदा थेट तिला विचारूनच टाकायचं ठरवलं आणि तसं विचारलं देखील पण ती एकदम दचकली. मी अजून असा काहीच विचार नाही केलेला त्यामुळे मला थोडा वेळ दे मी विचार करेन असं म्हणाली मी म्हटलं हेही ठीकच आहे. घरी मी सांगितल्यावर घरचे तर थेट तिच्या घरीच जाणून धडकले आणि पुढे काय करणार ह्याची माहिती घ्यायला लागले. तिने माझ्याबद्दल घरी सांगितलेलं होतंच पण तरीही "मुलांचा निर्णय आहे तो त्यांनाच घेऊ दे" अश्या प्रकारचं काहीतरी बोलणं झालं असावं. परंतु माझ्या पालकांच्या तिच्या घरी झालेल्या भेटीनंतर मात्र तिची माझ्याबरोबरचे वागणूक बरीच बदलली आणि ती हा लग्नाचा विषय निघाला तरी काहीतरी कारण काढून बोलणे टाळायची पण त्यानंतरही आमचं भेटणं सुरू होतं, गप्पाही सुरु होत्या. अश्या भेटीतच एकदा कशावरून तरी आमचं छोटंसं भांडण झालं आणि त्याचं पर्यवसान बरेच दिवस न बोलण्यात झालं. तसं तिचं डोकं भरपूर गरम होतं. एकदा भांडण झालं की बरेच दिवस ती विसरायची नाही हे तिनेच मला आधी कधीतरी सांगितलं होतं. पुढच्या आयुष्यात जर दोघांकडे थोडासाही समजूतदारपणा नसेल तर कसं चालेल ? तसं आमचं भांडणही बरेच दिवस चाललं. फोन केला तरी तुटक वागणं, बोलणं ह्याचा अर्थच मला कळेना. मग मात्र लक्षात आलं की हे असंच चालू राहिलं तर लग्न झाल्यावर आपल्याही नावाने बहुतेक एखादा असाच अर्ज कोर्टात जाणार. हे लक्षात आल्यावर मी ह्या सगळ्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करू लागलो. आमचं शेवटचं एकदा बोलणं झालं तेव्हा ती खूप भावनाविवश झाली होती आणि तिने मला सांगितलं की "तू माझ्याबरोबर आयुष्य नाही काढू शकणार कारण माझाच मला कधी कधी अंदाज लागत नाही आणि त्यामुळे मला दुसऱ्या व्यक्तीचं नुकसान नाही करायचं. तू इतका चांगला आहेस आणि माझ्याबरोबर इतका चांगला वागतोस की मलाच तुझ्याबरोबर असल्यावर गिल्टी वाटतं ". त्यानंतर आमचे परत कधीच बोलणे झाले नाही आणि मला त्याची गरजही वाटली नाही. अश्या प्रकारे आयुष्यातला हा एक अनुभव गाठीशी लागला. पण ह्यातून अनेक गोष्टी मला समजल्या. एक म्हणजे समोरच्या भिन्नलिंगी व्यक्तीशी नक्की कसं बोलावं, आपली आयुष्यात आर्थिक बाजू आणि इतरही बाजू तसेच मानसिक विचार भक्कम असणं किती गरजेचं आहे आणि साधारण लग्नाचा विचार करताना काय काय गोष्टींची कल्पना असायला हवी वगैरे वगैरे आणि एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली ती म्हणजे आपण समोरच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढंच त्यानेही करावं अशी कुठलीही हमी किंवा खात्री नसते आणि आपण त्याला तसं वागायला मुळीच भाग पडू शकत नाही.

असो ..... हा प्रसंग झाल्यानंतर नाही म्हटलं तरी पुढचे काही दिवस तरी हे सगळं डोक्यात घोळत राहिलंच..... मी जास्तीत जास्त वेळ माझ्या कामात घालवायला लागलो. दरम्यानच्या काळात मी माझी वैयक्तिक प्रॅक्टिस बंद करून कंपनीमध्ये कायदा सल्लागार म्हणून काम करू लागलो होतो त्यामुळे माझ्या अर्थार्जनातही बराच फरक पडला होता. हे सगळं प्रकरण झाल्यावर घरच्यांनी पुन्हा मला आडून आडून लग्नाविषयी विचारायला सुरुवात केली. नुकताच हा अनुभव येऊन गेल्यामुळे हो म्हणायलाही मन धजावेना कारण जर ओळखीत असलेली मुलगी नंतर अशी अकल्पित वागू शकते तर मग संपूर्णपणे अनोळखी मुलीविषयी माहिती कुठून काढणार आणि त्यातही काही भयानक अनुभव आले तर कसं होईल ? पण नाही म्हणून तरी मी एकटा राहून काय करणार होतो आणि तसेही आधीच्या सगळ्या घटनेत मुळात माझा काहीच दोष नव्हता त्यामुळे त्या गोष्टीचा त्रास मी तरी कुठवर करून घेणार ? त्यामुळे मी ठरवलं की आपण आता जसे पाणी वाहील तसं वाहत जायचं मात्र डोकं, कान आणि डोळे शाबूत ठेवायचे. हो ना करता करता एक दिवस माझ्या नावानेही विवाहसंस्थेत नावनोंदणी झाली आणि तशीच एक जाहिरात पेपरातही छापून आणली गेली. घरच्यांना मी म्हटलं सुद्धा की 'तुम्ही मला विकायला जाहिरात दिलीत' असं सारखं वाटतंय. बरीचशी स्थळं आली पण त्यातल्या मुलींच्या मागण्या बघून डोळे पांढरे व्हायची वेळ आली. कुणाला फक्त डॉक्टर आणि इंजिनिअर हवा,कुणाला एक लाखाच्या खाली पगार असलेला मुलगा नको, कुणाला घर गाडी बंगला सगळंच तयार हवं. आणि गम्मत म्हणजे ह्या सगळ्या अपेक्षा असणाऱ्या मुलींचा पगार दहा हजाराची पातळीही ओलांडणारा नव्हता ! लग्न म्हणजे बाजार होऊन बसलाय हे लगेच लक्षात आलं आणि आपलं ह्यात काही खरं नाही हेही समजून चुकलं. आलेल्या काहीकाही स्थळांना तर फक्त टाटा बिर्ला अंबानीच हवे होते.

अशातच दोन एक महिने गेल्यावर घरी एक फोन आला आणि मुलीची आई पलीकडून बोलत होती. तिने मुलीची माहिती तीर्थरुपांना दिली आणि त्यांनी ती मला सांगितली, फोटोही पहिला आणि मुलगी खरंच मनापासून आवडली. मुख्य म्हणजे त्यांच्याही फार अपेक्षा नव्हत्या आणि ज्या होत्या त्यात नशिबाने मी बसत होतो. ज्या दिवशी फोन आला त्याच दिवशी संध्याकाळी आमचा कार्यक्रम ठरला. (मुलीला ह्या कार्यक्रमात विशेष रस नव्हता हे मला नंतर कळलं. काहीश्या अनिच्छेनेच तिने हो म्हटलं होतं आणि आमची वरात त्यांच्या घरी पोचली). गेल्यावर माहितीची देवाणघेवाण झाली पण घरात सगळेच असल्यामुळे मला तिच्याविषयी काहीच माहिती तिच्याकडून मिळेना. शेवटी कोणाचं तरी डोकं चाललं आणि त्यांनी आम्हाला दोघांना बाहेर जवळपास जाऊन यायची परवानगी दिली. तिने मला घराजवळच्याच एका तलावावर नेलं. नेतानाही तिचं लक्ष इकडेतिकडेच होतं. मला जाणवलं की तिला ह्या कार्यक्रमात विशेष रस नाही. पण म्हटलं आलोच आहोत तर थोडंसं तरी काहीतरी बोलूया. मग आम्ही त्या तलावाकाठी जाऊन बसलो. हळूहळू गप्पांना सुरुवात केली आणि तिचे आणि माझे विचार बऱ्यापैकी जुळत होते असे जाणवले मग हो ना करता करता आमच्या गप्पा संपूर्ण २ तासभर झाल्या. पुन्हा त्यांच्या घरी परत आल्यावर खूप वेळ झाल्यामुळे दोघांच्याही घरचे भयानक काळजीत पडलेले होते पण नंतर सगळं व्यवस्थित झालं. आम्ही घरी निघून आलो आणि रात्रीच मी आपण त्यांना आपल्याकडून होकार कळवूया म्हणून जाहीर केलं तसं आईचा चेहरा भूत पहिल्यासारखा झाला. तिने लगेच " अरे हे पहिलंच स्थळ पाहिलंय आपण अजून मुली बघूया की" वगैरे बोलायला सुरुवात केली, पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. त्यांनी लगेच मला "त्यांच्याकडूनही काय ते कळू दे मग पाहू" असं सांगून गप्प केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्याच दिवशी त्यांचाही होकार आला आणि माझा जीव भांड्यात पडला. आता तर मी मागे हटणार नव्हतोच ! तीर्थरूपांनी लगेच पुढची बोलणी त्याच फोनवर करायला सुरुवात केली आणि आठवड्यात चक्क आमचा साखरपुडाही पार पडला. ज्या ज्या नातेवाईकांना आमंत्रण दिलं ते फारच चकित झालेले दिसले कारण एका आठवड्यापूर्वीच आमचे घरगुती कार्यक्रम पार पडले होते तेव्हा अशी काहीच बातमी नव्हती (आम्हालाच नव्हती तर त्यांना कुठून असायला ?).

साखरपुडा दणक्यात झाल्यावर आमचे गुलाबी दिवस सुरु झाले. खाणं पिणं हिंडणं फिरणं ह्यात दिवस भराभर सरत होते. साखरपुडा आणि लग्न ह्याच्यामध्ये मुहूर्ताच्या नादात आम्हाला चांगले सहा महिने मिळाले त्याचा आम्ही व्यवस्थित सदुपयोग केला. शेवटी शेवटी तर कधी एकदा लग्न होतंय असं वाटायला लागलं. लग्नही थाटामाटात पार पडलं आणि आता तर लग्नाला चांगली दहा वर्षें झाली आहेत. एक गोड मुलगाही आहे. लग्नानंतर अनेक कडू गोड अनुभव आले. मध्यंतरीच्या काळात एक भयंकर अपघाताचीही घटना घडली ज्याची तपशीलवार माहिती मी आधीही मिपावर गणेशोत्सव लेखमालेच्या निमित्ताने पूर्वी दिली आहेच. मला आमच्या लग्नानंतर कधीही "मी लग्न का केलं आणि केलं ते बरोबर केलंय का " असा प्रश्न कधीही पडला नाही आणि उलट माझी बायको माझ्या आयुष्यात माझ्याबरोबर खंबीरपणे प्रत्येक प्रसंगात उभी आहे ह्याचा सार्थ अभिमान वाटलाय आणि वाटत राहील. घर म्हटलं की कधीतरी भांड्याला भांडं लागतंच कारण तो मनुष्य स्वभाव आहे, पण एकंदरीत कधीही पश्चात्ताप झाला नाही.

ह्या सगळ्याचं सार म्हणजे आजवरच्या आयुष्यात मानवी प्रेमाचा जेवढा आणि जसा कडू-गोड अनुभव घेतला त्यापेक्षाही जास्त प्रेमळ आणि दैवी अनुभव मला अनेक मुक्या जीवांकडून मिळालेत. त्यात लहानपणी घरी असलेला आमचा विठू पोपट आहे , मी पाळलेलं कबुतर आहे चिमणी आहे, ससे आहेत, एक लॅब्रेडोर (चब्बी )आणि आमची तीन मांजरं (बबू,करडू, पांढरु) आणि इतरही आजूबाजूचे नेहमी कारणपरत्वे भेटत राहणारे पक्षी प्राणी आहेत. आता ह्यातलं जरी कोणी आयुष्यात नसलं तरी त्यांच्या अनेक गमतीशीर आठवणी आयुष्यभर आम्हाला पुरतील इतका खजिना साठला आहे. माझं एक ठाम आणि स्पष्ट मत आहे की हे मुके प्राणी पक्षी जितकं प्रेम आपल्यावर करतात त्याच्या एक दशांशही परतफेड आपण करू शकत नाही. मुळात माणूस हाच इतका स्वार्थी प्राणी आहे की तो ह्या सगळ्या जीवांना आपल्या तालावर हवं तसं नाचवतो आणि कंटाळा आला की सोडून देतो पण तोपर्यंत ते आपल्यात खूप गुंतलेले असतात आणि जे निर्व्याज प्रेम ते देतात ते केवळ दैवी आहे आणि ही सांगण्याची नाही तर मनापासून अनुभवण्याची गोष्ट आहे. ह्या प्राण्यांना आपल्यापेक्षाही जास्त भावभावना असतात पण फक्त त्याच्याकडे व्यक्त करायला भाषा नसते पण त्यांच्या कृतीतून ते वेळोवेळी हे दाखवून देतात आणि त्याची नजर हीच त्यांची भाषा असते फक्त आपल्याला ती वाचायची दृष्टी हवी. कधी कधी त्याच्या प्रेमाला आपणच पात्र नसतो हे प्रामुख्याने जाणवतं. प्रेमाचा खरा गहन आणि उत्कट अनुभव फक्त त्याच्याकडूनच मिळू शकतो कारण त्यांच्याकडे "धोका देणं किंवा फसवणं" हे औषधालाही नसतं. फक्त प्रेम, प्रेम आणि प्रेमच देत राहतात ते .....सध्या आमच्या अस्थिर आणि प्रवाही आयुष्यामुळे कुठलाही पक्षी किंवा प्राणी बरोबर नाही पण मुलगा मात्र लवकरच आमच्या पावलावर पाऊल टाकून एक ना एक दिवस कुठले तरी "माऊ" किंवा "भूभू" घरी घेऊन येईल आणि एक वर्तुळ सुफळ संपूर्ण होईल !

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

14 Nov 2020 - 2:13 pm | कपिलमुनी

खूप छान लिहला आहे.
साधं सरळ आणि एकदम मनाला भिडणारे!
संवादासारखी लेखन शैली आवडली

सिरुसेरि's picture

14 Nov 2020 - 4:01 pm | सिरुसेरि

सुरेख अनुभव कथन .

मंदार कात्रे's picture

14 Nov 2020 - 4:03 pm | मंदार कात्रे

छान लिहिलंय

संन्यस्त खड्ग's picture

14 Nov 2020 - 4:06 pm | संन्यस्त खड्ग

खूब भालो वकील बाबू

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

14 Nov 2020 - 4:20 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

लय भारी

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 1:35 pm | टर्मीनेटर

@माम्लेदारचा पन्खा

'प्रेम'

हा लेख आवडला  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

सुधीर कांदळकर's picture

17 Nov 2020 - 9:04 am | सुधीर कांदळकर

बरीच मनोरंजक आहे. मजा आली वाचायला. धन्यवाद.

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

17 Nov 2020 - 5:20 pm | सौ मृदुला धनंजय...

खुपच छान अनुभव

नूतन's picture

17 Nov 2020 - 6:05 pm | नूतन

छान

प्रचेतस's picture

23 Nov 2020 - 2:52 pm | प्रचेतस

क्या बात है मापं...!
तुस्सी छा गये...सुरेख लेखन

सौंदाळा's picture

23 Nov 2020 - 3:57 pm | सौंदाळा

कोणताही अभिनिवेश न बाळगता केलेलं लिखाण.
एकदम सोप्प, सुटसुटीत पण वाचताना गुंतवून ठेवणारं.
तुम्हाला शुभेच्छा

चौथा कोनाडा's picture

23 Nov 2020 - 5:53 pm | चौथा कोनाडा

व्वा, सुरेख लिहिली आहे "एका लग्नाची गोष्ट"
प्रेम : शाळा ते लग्न सुंदर आढावा !
आमचेही "हे दिवस" आठवले !
साधं सोपं सरळ प्रांजळ. मनाला भिडणारे लेखन !

निरोप ऐकायचं सोडून आई फोनवर तिचीच कुंडली काढायच्या मागे लागली. ती कोण, कुठे राहते घरी कोण कोण असतं वगैरे तपशील विचारायला लागल्यावर त्या मुलीलाही कसतरीच वाटायला लागलं. काहीतरी बोलून तिने फोन ठेवून दिला आणि दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये माझा सगळ्यांसमोर जाहीर सत्कार झाला
मस्त धमाल किस्सा, वाचून प्रसंग डोळ्यापुढे उभा राहिला.

साखरपुडा आणि लग्न ह्याच्यामध्ये मुहूर्ताच्या नादात आम्हाला चांगले सहा महिने मिळाले त्याचा आम्ही व्यवस्थित सदुपयोग केला. शेवटी शेवटी तर कधी एकदा लग्न होतंय असं वाटायला लागलं.
व्वा, मिसळपाव दिवाळी अंक शृंगार रोमान्स विशेषांक काढल्याचं सार्थक झालं

सविता००१'s picture

26 Nov 2020 - 2:51 pm | सविता००१

छान लिहिलय

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Nov 2020 - 4:30 pm | ज्ञानोबाचे पैजार

बर्‍याच गॅप ने लिहिले पण फारच सुरेख लिहिले आहे,
पैजारबुवा,