कुणाच्या खांद्यावर…

Primary tabs

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amकुणाच्या खांद्यावर…

…बहुधा कोण्या बड्या राजकीय नेत्याची सभा संपली असेल. रस्त्यावर सभा संपवून परतणार्‍या जनतेची ही गर्दी होती. गाड्या गोगलगाईसारख्या पुढे सरकत होत्या. ना थांबल्या होत्या, ना धावत होत्या. दोन गाड्यांमधून वाट थोडी मोकळी होताच लोक रस्ता ओलांडायचा प्रयत्न करत होते. पुण्याला पोहोचायची घाई होती, त्यामुळे 'कार्यकर्ता' या सुरुवातीच्याच गोगलगाय गतीला वैतागला होता. ब्रेक, क्लच आणि अ‍ॅक्सिलरेटरवर चवडे दाबून दाबून वैतागला होता. वैतागाचे रूपांतर हळूहळू संतापात होत होते. पोलीस होते, पण तेही बहुधा सभेच्या बंदोबस्ताची जबाबदारी संपली म्हणून परतीच्या मागावर होते. रेडिओ मिर्ची कुठली तरी रटाळ गाणी लावत होते. त्यामुळे तीही करमणूक काही उपयोगी नव्हती. दुसरे आणि तिसरेही स्टेशन लावायचा प्रयत्न तो करत होता. आडव्या जाणार्‍या जनतेकडेही अधूनमधून लक्ष देत होता. कुणी गाडीला ठोकायचा याची धास्ती होती. आणि काच्चकन अचानक ब्रेक दाबला गेला. …आडव्या जाणार्‍या जनतेमध्ये त्याला 'पोलीस' गाडी समोरून गेल्याचा भास झाला. सोबत आणखी दोन महिला पोलीस होत्या. खाकी साडीमधल्या. झपकन रस्ता ओलांडून गाडी समोरून गेली. पोलीस! हो, ती पोलीसच होती. छातीची धडधड वाढली होती. पटकन गाडीतून उतरून तिच्यासमोर जाऊन खातरी करून घ्यावी, म्हणून गाडी थांबवली. पण अशक्य होते. मागे पुढे गाड्या भो भो करत होत्या. गाड्यांच्या बाजूने जनता ओसंडून वाहात होती. शिट शिट शिट म्हणत स्टियरिंगवर दोनचार गुद्दे मारण्याव्यतिरिक्त त्या क्षणी करण्यासारखे काही नव्हते. पुन्हा पुन्हा डाव्या बाजूला वळून पाठमोर्‍या अंगाकडून ओळख पटवायचा प्रयत्न केला, पण वाहती गर्दी आणि पुढे सरकण्याच्या फंदात अशक्य होते ते. पोलीस इथे कशी काय इकडे तिची बदली झाली असेल? की इथेच असेल? हो, पण ती नक्की पोलीसच होती. शंभर टक्के. बराच काळ लोटला म्हणून काय झाले? विसरण्यासारखी ती नाहीच. पुढे जाऊन पुन्हा मागे वळून बघू दिसली तर… नाही, नाही, शोधूच तिला. दीड-दोनशे मीटरवर दुभाजकाला कट मिळाला. पटकन गाडी वळवून घेतली, पण गर्दी होतीच त्याही बाजूला. सुदैवाने काही अंतरावर गाडी लावायला जागा मिळाली. गाडी लावून कार्यकर्ता धावत सुटला. तिने रस्ता ओलांडला, तिथेच भर्रकन रस्ता ओलांडून समोरच्या गल्लीत शिरून बघितलं. नाही दिसली.

"रमा पवार नावाच्या महिला पोलीस गेल्या का हो इकडून?"
त्या पोलिसाने नुसतेच वैतागून बघितले. त्याला माहीत नसेल.
"…काहो, महिला पोलिसांची इथे काही छावणी किंवा निवास आहे का जवळपास?"
पोलीस थांबला. "काय प्रॉब्लेम काय हाय तुमचा?"
"नाही, त्यांना शोधत होतो. त्यांना त्यांच्या नातेवाइकांचा महत्त्वाचा निरोप द्यायचाय." दिली थाप ठोकून.
"कुटे असतात त्या? ग्रामीणला की शहरात?" पोलीस थोडा नरमला होता.
"म्हणजे मला माहीत नाही, मला फक्त नाव सांगितलंय."
"आज बंदोबस्ताला बरेच पोलीस बलिवलेत. तसं नुस्तं नावावरनं नाई सांगता येनार. बक्कल नंबर हाय का? तो विचारून घ्या अन मंग शोधा."
कार्यकर्ता हताश. "…. शिट" आता डाव्या हातावर उजव्या हाताने गुद्दा.
आल्या पावली गाडीकडे निघाला. जमेल तिकडे नजर फिरवत होता. कुठेतरी दिसेल अशी जाम खातरी वाटत होती. पण गाडीत बसेपर्यंत पोलीस दिसली नाही. यू टर्न घेऊन गाडी पुण्याकडे दौडवली. छातीची धडधड कमी नव्हती झाली. अगदी अचानक समोर आली, बेसावध असताना. थोडी थकल्यासारखी वाटली. बंदोबस्ताच्या ताणामुळे असेल. पण इथेच तिचे पोस्टिंग असेल तर कधीतरी कुठेतरी दिसली असती. इथे नसेल. अर्थात तिला संपर्कात ठेवणे अशक्यच होते. तशी तिची अटच होती. अगदी बजावून सांगितले होते. शपथ वगैरे. त्याही वेळी अचानक समोर आली होती. पण आतासारखी बारा-पंधरा वर्षांनी नाही. दोनेक वर्षांनी असेल.……

लाइफ केअर हॉस्पिटलच्या आवारात झाडाखाली स्वत:च्या सायकलला पाठ टेकून उभा होता. रात्रभर हॉस्पिटलमध्ये जागरण झाल्यामुळे आणि जे घडलं ते इतकं भयानक होतं की त्याच्या ताणामुळे चेहरा ओढला गेला होता. डोळे तांबरले होते. कुणाशी बोलायचे नव्हते. इच्छाच नव्हती. कंपनीत जायचे नव्हते. इच्छाच नव्हती. अकरा वाजले असतील. मागून बाईची काळजी आणि आश्चर्यमिश्रित हाक ऐकू आली.
"कार्यकर्ता, अरे इथे काय करतोय?"
दचकून मागे वळून बघितले. पोलीस होती. हातात कसली तरी फाइल. त्याला पेन खोचलेले. काही बोलला नाही. नुसताच मंद हसला.
"कामावर नाई गेला?" पोलिसी खाक्यात तिचा प्रश्न.
"अन हे काय थोबाड? नाश्ता नाई केला का?"
"तू काय करती आहेस इथे?"
"आमचे काय! रुटीन पोलिसाची डुटी. सांग ना. काय काम काडलं हॉस्पिटलात?"
त्याची काळजी करणारा तो टिपिकल ओळखीचा तिचा स्वर लागल्यावर कार्यकर्ता बोलायला लागणार, एवढ्यात
"थांब, आधी काहीतरी खाऊन घे. मग च्या पिता पिता सांग. तू नीघ समोरच्या कॅन्टीनकडे, मी जरा डॉक्टरची सही राहलीय ती घेऊन येते. तो बाबा पुन्हा कुटे बाहेर पडला तर मला त्याच्या मागे दिवसभर फिरायला लागेल. पन तु खायला सुरुवात कर हा. माझी न्ह्यारी झालीय. मी च्या घ्याला येईन. पन तु थांब हं. खाल्ल्याशिवाय आणि माझ्याशी बोल्ल्याशिवाय नको जाऊ. बरं का. मला उशीर झाला तरी थांबच. मी येऊ का सोडायला… ?"
"नको गं. मी जातो. थांबतो कॅन्टीनमध्ये."
"तू खायला सुरुवात कर, बरं का. थांबू नको माझ्यासाटी. पैसे आहेत का?"
किंचितसा हसला, तशी पोलीसला खातरी वाटली. नेहमीप्रमाणे टप्पा नाही देणार. खाऊन घेईल.
सायकलला कुलूप लावून ती तिथेच ठेवून कार्यकर्ता कॅन्टीनकडे वळला. जरा बरे वाटले. ती भेटली. थोडा भार हलका झाला असे वाटले.

दोनेक वर्षांनी भेटली असेल पुन्हा. शेवटची भेट मानसमध्येच झाली होती. तिथली कॉफी तिला आवडायची. पहिल्यांदा भेटायला तिथेच बोलावले होते तिने. पोस्टकार्ड पाठवून. पंधरा पैशाला की पंचवीस पैशाला मिळायचे तेव्हा. मोबाइल नव्हते. पेजरही नंतर तीन-चार वर्षांनी आले असतील, त्यामुळे एसेमेस वगैरे पाठवण्याची मुभा नव्हती. पोस्टकार्ड पाठवून बोलावले. पत्ता अगदी हुशारीने जपून ठेवला होता. रविवार चौकात आंदोलन केले होते. बस रोको आंदोलन. वीस-पंचवीस पोरे होती आणि आठ-दहा पोरी. अर्जविनंत्या करूनही कॉलेजच्या वेळात बस सोडत नव्हते. बसवाल्यांचे रिक्षावाल्यांशी साटेलोटे होते. पोरे आली होती कार्यालयात. आंदोलन ठरले. जोरदार झाला रास्तारोको. कार्यकर्त्याने दणदणीत भाषण केले. पोलीस सुरुवातीपासून होतेच. कार्यकर्त्याचे भाषण झाल्यावर पोरांना जास्तच चेव चढला. परिसर दणाणून गेला. पोलीस आंदोलन थांबवायला सांगत होते. कुणी ऐकायला तयार नव्हते. सगळ्यांना अटक झाली. सगळ्यांची रवानगी पोलीस स्टेशनात. तिथेही अधूनमधून घोषणा चालू होत्या. गोंधळाने पोलीस इन्स्पेक्टर वैतागला. त्याने पोलीसला पोरांना धमकवायला पाठवले.
कोठडीत आल्या आल्या ती जोरात ओरडली,
"तुमचा लीडर कोन हाय रे?"
दमदार आवाजाने सगळे शांत झाले. साधारणपणे पोरांच्याच वयाची असेल. नुकतीच भरती झाली असेल. पण एकदम धडाकेबाज होती. बिल्ल्यावर नाव होते रमा पवार. एका आरोळीत पोरांना गप्प केले.
"तुमचा लीडर कोन हाय?"
कार्यकर्ता पुढे झाला.
"काय नाव काय तुजं?"
"पत्ता पन सांग. या सगळ्यांची नावाची आणि पत्त्याची यादी करून दे."
"आनी लक्षात ठेव. हे पोलीस स्टेशन आहे. इथं आरडाओरडा नाई चालत. आन झाला तर तुला पैले टायरीत टाकून बुकलून काडतील आन नंतर बाकीच्यांना. ह्यांना शांत ठेव."
"आमच्या जेवणाचे काय?" कार्यकर्त्याने तिचे आधीचे बोलणे फारसे मनावर न घेता शांतपणे विचारले.
"आदी यादी करून ठेव. जेवनाचे बगू नंतर." पोलीस तणतणत निघून गेली. दिवसभर पोलीसला आंदोलनकर्त्यांवर वचक ठेवायला त्यांच्यासोबतच राहायचा आदेश होता. गाणी-घोषणा तिला थांबवता नाही आल्या. काही वेळाने तर ती आंदोलनकर्त्यांपैकीच एक असावी आणि त्यांच्या दिमातीलाच तिला ठेवलेय असे झाले वातावरण. कार्यकर्त्याशी तिची खास ओळख झाली. तो लीडर होता ना, त्यामुळे संवादाला निमित्त होते. संध्याकाळी उशिरा समज देऊन आंदोलनकर्त्यांना सोडून दिले. कार्यकर्त्याने पोलीसला इन्स्पेक्टरसाहेबांची भेट घडवून द्यायला सांगितले. साहेबाची परवानगी तिने आणली. कार्यकर्ता इन्स्पेक्टरसाहेबाला भेटायला गेला. सोबत पोलीस होतीच. त्यांना झालेल्या तसदीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
"या बाईंचेही खास आभार. दिवसभर त्यांनाही आमच्याच बरोबर अटक झाली आहे वाटत होते. त्यांना सुरुवातीला माझ्या पोरांनी थोडा मुद्दाम त्रास दिला. पण या त्यांना पुरून उरल्या. तसदीबद्दल माफ करा." पोलीस साहेबाकडे बघून आणि साहेब कार्यकर्त्याकडे बघून हसला.

"अरे, पत्र आलंय तुझ्यासाठी. काकांनी घरी आणून ठेवलंय." खोलीच्या मालकीणबाईनी त्यांच्या बाल्कनीतून घरी परतणार्‍या कार्यकर्त्याला वर्दी दिली. कार्यकर्त्याची खोली तो असला नसला तरी बंद नसायचीच. दिवसभर त्याच्या मित्रमैत्रिणीची वावर त्याच्या खोलीत असायचा. कुणी डबा खायला, कधी बैठकीसाठी, कुणी विश्रांतीसाठी सतत असायचे. कार्यकर्त्याला नोकरी लागली होती. त्यामुळे कामांच्या दिवसाला तो नऊ तास बाहेर असायचा. पण त्याची खोली कधी बंद नसायची. घरमालक काका-काकू येणार्‍याजाणार्‍यावर नजर ठेवुन असायचे. त्यातले काही त्यांच्या परिचयाचे झाले होते. पण काका कार्यकर्त्याची पत्रे कुणीतरी ढापतील, वाचतील म्हणून घरी आणून ठेवायचे.

..काकूंनी पत्र हातात ठेवले. पोस्ट कार्ड होते.
तीन-चार ओळींचे पत्र होते. 'रविवारी तेरा तारखेला साडेतीन वाजता कोर्ट रस्त्यावरच्या मानसमध्ये ये. बोलायचे आहे. - पोलीस. ( रमा पवार.)'
रविवारच्या दैनंदिनीत कार्यकर्त्याने भेटीची नोंद केली.

जनरल गप्पा झाल्या - तू कुठला, मी कुठली. पिक्चर. हिरो. हिरॉइन. गाणी. कॉफी. राममंदिर. अयोध्या. चळवळ. आंदोलन. शाकाहार मांसाहार. दोन तास झाले. दोन दोन कॉफी झाल्या. पंधरा दिवसांनी पुन्हा भेटू. तेच ठिकाण. दोन दोन कॉफी. मग पुन्हा भेट. डब्यात पोलीसने केलेले अंडा ऑम्लेट. गप्पा. पुन्हा भेट. चर्चा. गप्पा. बंदोबस्ताचा ताण. बदली झाली. दुसरे पोलीस स्टेशन. समाजव्यवस्था. जाती विषयाची चीड. विषमता. चिडचिड. एक तास उशिरा आला.
पोलीस लहानपणापासून अनाथ. मामामामीने वाढवले. जिल्ह्यातच गाव. कथा-कादंबरी-पिक्चरमधलीच तिची स्टोरी. नोकरीनिमित्ताने गाव सुटले आणि मामीचा भयंकर जाच संपला. आता या शहरात गावाच्या गल्लीतली तिची ताई तिची पालक. ताईला ही माहेरची म्हणून फक्त पोलीसचा आधार. चहाची गाडी चालवणार्‍या अण्णाशी ताईचा प्रेमविवाह. त्यामुळे ताई बहिष्कृत. कार्यकर्त्याला अण्णा भेटला. ताई भेटली. एकत्रित जेवणे झाली.
दीड वर्ष उलटले. एकदा पोलीस कार्यकर्त्याला म्हणाली, "माझे तुझ्यावर प्रेम आहे."
कार्यकर्त्याने दीर्घ श्वास घेतला. "मला माहीत होते. आपल्या मैत्रीमध्ये हा दिवस येणार. तू मला हे सांगणार. आणखी एक कॉफी घेशील ना?"
म्हणाली, "हो."
"पोलीस, मी तुझ्याकडे फक्त मैत्रीण म्हणून बघितलंय. मला मैत्रीच्या पलीकडे तुझ्याकडे कधीच बघता आलं नाही. मुख्य म्हणजे मला त्या पलीकडे जायचं नव्हतं. माझ्या आयुष्याची प्रेमात पडणं वगैरे ही प्रायॉरिटी नाहि, सध्यातरी."
पोलीसच्या आवाजात किंवा बोलण्याच्या गतीत फरक नव्हता. "मला माहित आहे हे सगळं. तुझ्याकडून असं कधीच ना बोललं गेलंय, ना कधी वर्तन झालंय. मैत्रीची साधी थाप माझ्या पाठीवर मारण्यासाठीसुद्धा तू माझ्या अंगाला कधी हात लावला नाहीस गेल्या दीड-दोन वर्षात. म्हणून तू वेगळा आहेस. आईबाप लहानपणीच गेले, कारण मीच तेव्हढी पापी आहे, त्यामुळे देवानं मला आईबापाचं सुख नाई दिलं असं मी स्वत:ला समजावत आले. पण तुझ्याशी मैत्री झाली आणि माझ्यात थोडंतरी पुण्य शिल्लक आहे असं वाटायला लागलं. तू मला मैत्रीण म्हणतोस हेच माझ्यावर प्रचंड उपकार आहेत तुझे. मला तू मोठं केलंस. तुझ्यासमोर रडले तर मनसोक्त रडू दिलंस. हसले तर हसू दिलंस. कित्येक वर्षं मी माझ्यात दाबून ठेवलेलं हसू आणि रडू तुझ्यामुळे माझ्यातून मला मोकळं करता आलं. याच्या पलीकडे तुझ्याकडून काही अपेक्षा करणं म्हंजे माझा पापाचा घडा पुन्हा काटोकाट भरायला घेण्यावानी आहे. तुझी पातळी उंचावरली आहे. हे सगळं ओळखून मला माझं प्रेम तुझ्याकडे सांगायचं नव्हतं. ताईने खूप लकडा लावला होता. एकदा बोलून बघ. हो म्हणेल किंवा नाई म्हणेल. म्हणून आज सांगितलं. माझ्यावर रागावू नको."
"ए खाकी! मी रागवेन कशाला? तुला जे वाटलं, ते तू सांगितलं. यात गैर काही नाही. फक्त जे मिळणार नाही त्याचं वाईट नको वाटून घेऊ. मला तसं वाटत नाही म्हणजे माझी तुझ्या लेखी काही किंमत कमी आहे किंवा पातळी कमी आहे वा योग्यता कमी आहे असा त्याचा काही अर्थ आहे, असाही विचार करू नको. मला माझ्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षांप्रत पोहोचण्याच्या माझ्या प्रवासात मला कुणाची ससेहोलपट होऊ नये असं वाटतं. त्यामुळे मैत्रीपलीकडे जाण्याचा विचार सहज माझ्या वागण्याबोलण्यात नैसर्गिकपणे येत नाहीत. इतकंच."
.पोलीसच्या अनावर हुंदक्यांनी दोघांमधला सवांद खंडित झाला. निघताना ती नॉर्मल वाटली.

पुढे भेटी झाल्या. पण वारंवारता कमी झाली. सहा महिन्यांनी तिची बदली जवळच्या ग्रामीण भागात झाली, त्यामुळे भेट क्वचितच व्हायची. कधीकधी तिच्याकडून कार्यकर्त्याला डबा यायचा आणि डब्यात चिठ्ठी - 'वेळेत जेवेत जा. आंदोलनं वगैरे आता बस झालं. दिवाळीला गावाकडे जा..' असे काही सल्ले असायचे.

"……अरे हे काय, अजुनी काही खाल्लं नाही?" खेकसतच तिच्या विचारण्याने कॅन्टीनमध्ये बसलेल्या कार्यकर्त्याची तंद्री भंगली.
"तुला सांगितलं होतं ना, तू सुरू कर म्हणून? माझी न्ह्यारी झालीय रे बाबा."
"अगं, तसं काही नाही. म्हटलं थांबु तू येईपर्यंत. दीड-दोन वर्षांत गप्पा झाल्या नाहीत. गप्पा मारत खाऊ."
"काय सांगू तुझ्यासाठी? आम्लेट खाशील का वडा सांबर?" पोलिसालाच ऑर्डर द्यायची घाई झाली.
"तू काय घेशील?"
"अरे, सांगितलं ना, माझे पोट भरलंय. आमी काय रिकाम्यापोटी डूटी करतो व्हय?"
"वडा सांबार आणि दोन चहा."
"आणि हे काय, तू खूपच बारीक झालीयस. चेहरा खप्पड झालाय."
"मला काय झालंय बारीक व्हायला? चांगली खाऊन पिऊन सुखी हाय."
"काय झालंय पोलीस? कशी आहेस तू?"
"सगळं बरं आहे रे, फक्त माझा साहेब हलकट आहे. मला उगाच त्रास देत बसतो."
"त्रास देतो म्हणजे?"
"मेल्याची बाई गेलीय सोडून गेलीय त्याला. जानारच ना! हा रानटी ढोला हाय. डूटी संपली की रोज दारू पीऊन घरी जायचा अन रातसारी बायकोला हानायाचा. नवराच पोलीस, मग ती तक्रार कुनाकडे करनार? ती गेली याला सोडून. पोरबाळ नव्हतंच. हा रिकामा. बगीन तर बगीन, न्हाईतर दीन सोडून नोकरी एक दिवस. अरे, माझं जाऊ दे. आपन हितं तुजं बोलायला बसलोय. काय झालं? तू हितं कसा काय? हास्पिटलात? का पटवली एकादी नर्शीन?"
मंद हसला.
"एक भीषण प्रॉब्लेम झालाय."
"अरे, काय सांगशील, का जीव घेशील माझा आता?"
"अगं, माझ्या मित्राची बायको स्टोव्हचा भडका उडून भाजलीय काल. खूप भाजलीय. लग्न होऊन वर्ष होतंय नुकतंच आणि हे असं झालंय. दोनेक महिन्याचं बाळ आहे त्याचं. तिची बिचारीची अवस्था बघून तर मी पार खचलोय. किती भयंकर वेदना होत असतील तिला! माझ्यासमोर तिला पाहणं, पसंत करणं, लग्न होणं, बाळाचा जन्म हे सगळं झालंय. या अपघाताने मी खूप भेदरून गेलोय. काय करायचं सुचत नाहीय."
"अरे, देवा! ती शिक्षिका का? देवपूरची पोरगी? काल सकाळी अकरा वाजता दाखल झाली ना?"
"हो, पण तुला कसे डीटेल्स माहिती…?"
"ओ, राजे! पोलीस हाय मी. ध्यानात हाय ना? का ते ही विसरलात?"
"तसं नाही गं, पण …"
"तुजा मित्र डुबला म्हनून समज! लौकरच तो सरकारचा जावई होनार! जेलची चक्की पिसनार!"
"काय??? कसं काय? तुला कुणी सांगितलं?"
"अरे, त्याचा तपास माज्या ठाण्याकडेच हाय. ही काय त्याचीच कागदं घेऊन फिरतीय मी कालपासून. तपासात मी पन हाय. तो अपघात नाहीय, तो … "
"शक्यच नाही." कार्यकर्त्याने तिला अडवलं.
"अपघाता व्यतिरिक्त काही इतर संशय घेणं धादांत खोटारडं आहे. मी ओळखतो माझ्या मित्राला चांगला. त्याच्या बायकोलाही."
"हो, पण राजे, तुमाला कोन विचारतो? पुरावा गोळा झालाय. आणि केस प्रथमदर्शनी पुराव्यावर उभी राहाते. खरं-खोटं कोर्ट ठरवतं. पोलीस न्हाई. मुख्य म्हंजे पोरीच्या नातेवाइकांच्या जबान्या पन झाल्यात ना. ३०२ न्हाईतर ३०६ काही पन लागू शकतो."
"म्हणजे? ३०२, ३०६ हे काय आहे?"
"डायरेक्ट मर्डर किंवा आत्महत्या करायला भाग पाडल्याची केस आहे ही."
"अगं, मी सांगतोय ना असं काही नाहीय."
"पन पोलिसांना तू कसं सांगनार? अन पोलिसांनी तुजं का ऐकावं? पोरीच्या नातेवाइकांना कोन समाजावनार?"
"आई ग्गं!" कार्यकर्ता हातातला कप ठेवून डोक्याला हात लावुन बसला.
"पोलीस, अगं, काहीतरी कर ना, प्लीज. आयुष्यभर तुझे उपकार मी विसरणार नाही."
"गप रे, उपकाराची भाषा माझ्याबरोबर कशाला करतोस? तुझ्याकडे बघून मलाच आता कालवायला लागलंय. तुला मी असा कधी एवडा उदास न्हाई बघितला. हे बघ, मी प्रयत्न करते. पन मी अधिकारी न्हाई. माज्या परीने तुज्यासाठी मी सगळं करीन. पन तपासात बाकी पन लोक असतात ना. अन तपास अधिकारी नेमका माजा साहेबच आहे, तो डुक्कर मेला. पन तू धीर नको सोडू गड्या. माज्यावर विश्वास ठेवशील ना?"
"अगं, काय बोलतेस हे? तुझ्यावर अविश्वास दाखवण्याचा प्रश्नच येत नाही."
"चल, मी निघू का? उद्या मला इथेच भेट अकरा वाजता. मी बघते तोवर काय करता येतं का. उद्या अकरा वाजेपर्यंत तुज्या मित्राचं भविष्य ठरेल. तु काळजी नको करू, हा. आपन होईल तितकं करू तुझ्या मित्रासाठी. निघते मी." पोलीस घाईघाईत निघून गेली.
ती गेल्यावर कार्यकर्ता कोसळलाच. बराच वेळ बसून राहिला कॅन्टीनमध्ये. मित्राकडे चक्कर टाकली. त्याच्या बायकोला बघायचे धाडस नाही झाले. नातेवाईक मंडळी बाकावर सुन्न होऊन बसली होती. त्या वातावरणात पोलिसांची बाजू या विषयात कुणाशी बोलणे शक्यच नव्हते. मित्राला असे काही सांगितले असते, तर त्यालाच हॉस्पिटलात दाखल करावे लागले असते. पोलिसांच्या कारवाईविषयी कुणाशी न बोलण्याचा कार्यकर्त्याने निर्धार केला. अगदीच वेळ पडली तर काय करायचे ते प्रसंग बघून ठरवू. सध्यातरी प्रत्येकाने आपापली काळजी करावी आणि मित्राच्या बायकोची चिंता करावी, असे वाटले. दिवस पुढे कसाबसा सरकत होता.

अकराला दहा मिनिटे असताना कार्यकर्ता आधीच कॅन्टीनमध्ये जाऊन बसला. टेबलवर असलेले पाणी घटाघटा प्याला आणि दरवाजाकडे एकटक पहात बसला. इतक्या भेटी झाल्या, पण आजवर पोलीसची इतक्या अधिरतेने कधी वाट बघितली नव्हती. गल्ल्यावर टांगलेले मोठे चौकोनी घड्याळ संथ गतीने काटे पुढे सरकवत होते. खूप वेळ वाट बघितली. अकरा वाजून वीस मिनिटे झाली. पोलीस अजूनही पोहोचली नाही. ती नक्की येणार याची मात्र खातरी होती. होतो कधी कधी उशीर. तिचे कामच तसे आहे. बारा वाजले. तिचा पत्ता नाही. कार्यकर्त्याला मळमळू लागले. ओठ कोरडे पडायला लागले. डोके ठणकायला लागले. पण पोलीसवर विश्वास आहे. 'पण तिला कुणी मदत केली नसेल का? याचा अर्थ मित्र खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात जाणार का? पण पोलीस आहे ना! पण ती तरी काय करणार बिचारी? त्यातच तिचा साहेब तिला त्रास देतोय. नेमके तिच्याच परिचिताचे प्रकरण म्हणून त्याने खुन्नस काढायचे ठरवले, तर?' हातपाय थरथरायला लागले होते. साडेबारा वाजत आले. इतका उशीर तिला कधी होत नाही. एकदा झाला होता. इलेक्शनचे कसले ट्रेनिंग होते. पण आज काही होणार नाही हे सांगायला तरी नक्की येईल? आजारी पडली असेल का? तेवढ्यात ती दारात दिसली. कार्यकर्ता एकदम उभा राहिला. हात उंचावून बसलेल्याची जागा दाखवली. पोलीस आली. घामाघूम झाली होती. आधी दोन ग्लास गटागटा पाणी प्यायली. खाकी पदराने कपाळावरला घाम पुसला.
"खूप वेळ वाट बघायला लावली, सॉरी."
तिचा आवाज कमालीचा खाली गेला होता. खूप थकल्याचे जाणवत होते. केस बहुधा नीट विंचरले नव्हते. कार्यकर्त्याकडे नजरेला नजर देऊन बघत नव्हती. तिच्या टेबलावर ठेवलेल्या हाताला किंचितसा होणारा कंप जाणवत होता.
"मला सांग, तुझा मित्र या केसमध्ये अडकला तर काय होईल?"
"पोलीस, मित्र वाचला तर मी वाचलो असे समज. माझा खूप जवळचा मित्र आहे तो. बाकी काही नाही. पण तो अडकला तर त्याचा माझ्यावर काय परिणाम होईल हे आता सांगता येणार नाही."
ती थांबली. पदराने पुन्हा एकदा कपाळ पुसले. मग म्हणाली,
"ठीक आहे. अजुनी तपासाचं काम पुढं सरकलं नाही. काही कागदपत्रं अजुनी माझ्याचकड आहेत. घरी ठेवलेत. मिळाली नाही असं सायबाला सांगितलंय."
"तुझा त्या डुक्कर साहेबाकडेच सगळा निर्णय आहे का गं?"
होकारार्थी मान हलवली. कार्यकर्त्याकडे बघितलं नाही. थोडा वेळ कुणीच बोललं नाही. अचानक आपण हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये बसलोय याचं भान विसरून टेबलवर तिने कार्यकर्त्याचे दोन्ही हात आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये घट्ट पकडले. तिचा परिचय झाल्यापासूनचा हा पहिलाच स्पर्श.
"चिंता नको करू. मी काढीन तुज्या मित्राला या केसमधून बाहेर. तुझ्यासाठी. माझे तुझ्यावरचं प्रेम एकतर्फी असलं, तरी ते मी मरेपर्यंत राहील. माझी तुझ्याकडून कधीच काहीच अपेक्षा नव्हती आणि नसनार. तुझी असली अवस्था मला नाई बगवत, गड्या. आज चार वाजेपर्यंत मला वेळ दे. मी तुला सांगीन काय करायचं ते. इथेच भेटू. माज्यावर विश्वास ठेव. निघते मी. चार वाजता इथेच भेटू." कार्यकर्त्याला फारसं बोलू न देता निघून गेली. एका बाजूला थोडा धीर आला होता. पण हातात निर्णय नव्हता. कार्यकर्त्याने चहा मागवला. चहा प्यायल्यावर त्याला जरा तरतरी आली. उठून तडक खोलीवर गेला. आंघोळ केली. डबा आला होता. जेवण केले आणि बिछान्यावर अंग टेकवले. दोन रात्री हॉस्पिटलात झोपेचे खोबरे झाले होते. जाग आली, तेव्हा पावणेचार वाजले होते. उशीर झाला होता. कॅन्टीनजवळ पोहोचला, तेव्हा चार वीस झाले होते. सायकल तशीच टाकली आणि पळाला. पोलीस येऊन थांबली होती. दारात उभी होती.
"कधी आलीस?"
"चार वाजता."
"चल, बसू. चहा घेणार?"
"नको."
"बोल, काय झालं "
"होईल तुजं काम."
"एवढी शांत का आहेस? थकली आहेस का? चहा सांगतो दोन."
"मी ठीक आहे" पोलीस सलग कार्यकर्त्याकडे बघत होती. त्याच्या लक्षात आले.
"खोलीवर जाऊन झोपलो होतो तासभर."
"मी काय सांगते ते नीट ध्यानात ठेव. तुजं काम झालंय. दोन गोष्टी तुला कराव्या लागतील."
"कोणत्या?"
"एकतर दहा हजार रुपये द्यावे लागतील … "
"काय?" कार्यकर्ता ताडकन उठलाच.
"ऐक रे, बैस तू पैले."
"अगं पण कशासाठी? लाच? एवढी मोठी रक्कम?"
"ही केस साधी सोपी नाई रे गड्या. माझे मलाच माहिती त्यात काय काय आहे ते."
"काय आहे त्यात? माझा मित्र निर्दोष आहे आणि त्याला निर्दोष साबित करण्यासाठी लाच द्यायची? आणि दहा हजार?"
पोलीसचा चेहरा मलूल झालेला. ती कळवळून म्हणाली,
"त्याशिवाय दुसरा पर्याय नाई तुज्यापुडे. तपासात माज्याशिवाय आनखी तीन पोलीस आहेत, सायबाला सोडून."
"म्हंजे प्रत्येकाला अडीच हजार, असंच ना?"
"तोड माजे लचके अन घाल कुत्र्याला" ती रडकुंडीला आली.
"अरे, तुज्याकडून मी पैशे काडेल असं तुला वाटते? तुज्याकडूनच काय, अट्टल चोराकडून पन मी कधी हरामची दिमडी नाई घेतली. तुज्यासारख्याशी दोस्ती केल्यावर मी असं कधी करेन का?"
"आणि तुझ्या त्या डुक्कर सायबाचे काय?"
काही बोलली नाही.
"सांग ना, तुझ्या सायबाचं काय? का तीच दुसरी गोष्ट आहे?"
"नाई, ती नाई दुसरी गोष्ट, सायबाचं मी बघून घेईन. तू त्याची काळजी करू नको."
"मग दुसरी गोष्ट काय?"
"सांगते. पन उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत पैसे लागतील. कॅन्टीनच्या गल्ल्यावर ठेवून दे. ते आमच्या पोलिसापर्यंत पोचतील. पैसे पोचले की लगेच एका तासात तुज्या मित्राचे केसचे पेपर फाडून टाकतील ते. त्याच्यापर्यंत कुटलाच विषय कदीच नाई येनार. मी ग्यारंटी हाय."
कार्यकर्ता चक्रावला होता.
"भयानक आहे हे सगळं."
"तुला जे समजत नाई ते भयानक आहे रे गड्या.."
"म्हणजे?"
"म्हंजे काय नाई. तू तुजं काम कर."
"आणि दुसरी गोष्ट काय सांग ना!"
"सांगते ना, घाई नको करूस. मला च्या तर पिऊ दे. बरं, हे सगळं बरोबर करशील ना? यात काही शंका आहे का? आत्ताच विचार."
कार्यकर्त्याला आज ती काहीतरी वेगळी वाटत होती. पण तिच्यावर विश्वास ठेवून ती म्हणते ते करणे भाग होते. कारण दुसरा पर्याय नव्हता. अन्यथा मित्र अडकला असता.
"शंका काही नाही. दहा हजार रुपये ही रक्कम प्रचंड मोठी आहे."
पुन्हा तिने तिच्या ओंजळीत त्याचे हात घेतले. डोळे फाडून कार्यकर्त्याकडे बघत होती. कार्यकर्त्याने तिच्याकडे बघितले, पण फार काळ तिच्या डोळ्यात बघू शकला नाही. अवघडल्यामुळे इकडे तिकडे पाहात हात सोडवून घेत त्याने विचारले,
"दुसरे काय करायचे ते सांग ना."
"करशील ना नक्की?"
"करावेच लागेल. परिस्थिती अशी आहे की तू जे म्हणशील ते करण्यावाचून पर्याय नाही."
"आजपासून मी तुला मेले. मला कधी भेटू नको अन मी पन तुला कधी भेटनार नाई. आपन कदी भेटलोच नाई."
"काय, हे काय विचित्र?" कार्यकर्ता किंचाळलाच!
"काळजी घे स्वत:ची. वेळेवर जेवत खात जा." भर्रकन निघून गेली.
कार्यकर्त्याला काही समजलेच नाही. दोन्ही गोष्टींनी तो ठार वेडा झाला होता. पहिली गोष्ट कठीण होती आणि दुसऱ्या गोष्टीचा अर्थ समजायला महाकठीण होता. साडेपाच वाजले होते. पंधरा-सोळा तासांच्या कालावधीत दहा हजार रुपये मिळवायचे होते. कार्यकर्त्याच्या बँकेत खच्चुन सात-आठशे रुपये असतील. अर्थात त्याचा काही उपयोग नव्हता. कारण आता बँक बंद झाली असेल आणि उद्या दहा वाजल्याशिवाय उघडणार नाही. मित्राला सांगून रिस्क घ्यायची नव्हती, कारण त्याला हे सगळे प्रकरण समजले तर तो आणखी खचेल. शिवाय ज्या त्याच्या नातेवाइकांनी उलटसुलट जबानी देऊन त्याला गोत्यात आणलेय, ते जागे होतील. कुणालाच - अगदी कुणालाच पैसे कशासाठी हवेत आणि एकूण काय प्रकरण आहे हे समजता कामा नये. नेमकी या तपासाच्या प्रकरणात पोलीस नसती, तर आज काय झाले असते.. कुणास ठाऊक. तिच्यामुळे आज वाचलो. रात्रभर पाचशे-आठशे उधार मागत दहा हजार एकट्याने जमवले आणि दुसऱ्या दिवशी गल्ल्यावर ठेवले. ते दहा हजार पुढले काही महिने आणि वर्षे फेडत राहिला.

प्रत्यक्ष भाजल्याची बातमी समजल्यावर दहा हजार रुपये गल्ल्यावर ठेवेपर्यंतचा तीन-चार दिवसांचा काळ अत्यंत भीषण होता. पण तो सरकला. मित्र वाचला. ना त्याला ना आणखी कुणाला या एकूण प्रकरणाचा थांगपत्ताही लागला नाही, आजतागायत. ते गुपितच राहिले.

"हा साहेब, रिटर्न देऊ की सिंगल …. "
बापरे, त्या इतिहासाची फिल्म डोळ्यांसमोर सरकत असताना पुण्याचा टोल नाकाही आला! कार्यकर्ता पूर्ण हरवून गेला होता. गाडी तंद्रीतच चालवत होता. आज अचानक पोलीस दिसली आणि आठवणी ताज्या झाल्या खूप वर्षांनी. पण आता पुन्हा एकदा पोलीसला शोधले पाहिजे. तिने अट घातलीय. पण त्या वेळी त्या अटीकडे फारसे लक्ष द्यायला वेळ नव्हता आणि तसाही त्याआधी दोन वर्षे प्रत्यक्ष संपर्क नव्हताच.
आता खूप काळ निघून गेलाय. तिचे लग्न झाले असेल. लग्न संसाराच्या चक्रात माणसाला नवे संदर्भ प्राप्त होतात आणि आपल्या भूतकाळाकडे वेगळ्या नजरेने बघता येते. अशा वेळी तरुणपणातल्या घटना गमतीदार वाटतात. आज त्या घटनांची संवेदना तेवढी तीव्र नसते. किंबहुना अशा घटनांसादर्भात संवेदना नाहीशी झालेली असते. त्यामुळे हरकत नाही. पोलीसला आता भेटायला हरकत नाही.

पुण्यातले काम संपवून कार्यकर्ता परतल्यावर पहिल्यांदा त्याने परिचयाच्या पोलीस अधिकार्‍याला फोन केला. पण रमा पवार नावाचे त्याला कुणी माहीत नव्हते. तो शोधून सांगतो म्हणाला, पण तो ते करेल याची खातरी नव्हती. लग्न झाले असेल, तर आता इतक्या वर्षांनी तिने नसले तरी बाकीच्या फौजफाट्याने तिचे आधीचे नाव लक्षात ठेवण्याची शक्यता फारशी नव्हती. आठेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर त्याला अण्णाची आठवण झाली. टपरीच्या ठिकाणी गेला. पण तिथे चहाची टपरी नव्हती. तिथे आता उंच इमारती उभ्या होत्या आणि इतका बदल झाला होता की तिथे टपरी होती हे कुणाला सांगताही येईना. अण्णा हा तिच्यापर्यंत पोहोचण्याचा शेवटचा दुवा होता.

कार्यकर्ता आता खचला. पण पोलीसला शोधण्याचा त्याने ध्यासच घेतला. त्याआधी अण्णाला शोधणे गरजेचे होते. अण्णाची बायको मराठी होती आणि ती जवळपासच्या गावातली होती, एवढीच त्याची खूण कार्यकर्त्याकडे होती. शहरातल्या एकेक चहावाल्या आणि पानवाल्या अण्णांना त्याने विचारायला सुरुवात केली. महिना उलटला तरी काही मागमूस लागला नाही. पण एक बातमी मिळाली. अण्णाची टपरी होती त्याच्या शेजारी वडापावची एक गाडी होती, त्याचा पत्ता आणि मोबाइल नंबर मिळाला. त्याच्याकडून अण्णाचा मोबाइल नंबर मिळाला. ओळख पटवून दिल्यावर अण्णाने फोन कट केला. गूढ वाढले होते. पुन्हा एकदा वडापाववाल्याचे पाय धरावे लागले. त्याने अण्णाच्या टपरीचा पत्ता दिला. भेटल्यावर अण्णा बोलायला अजिबात तयार नव्हता. सलग तीन दिवस कार्यकर्ता त्याच्याकडे जायचा.
"अरे जाव ना बाबा, क्यो धंदे की खोटी कर रा है. हमको कुछ मालूम नही. खाली पिली त्रास मत दो हमको." असले काही बोलून कार्यकर्त्याला पिटाळून लावायचा. शेवटी एक दिवस कार्यकर्ता सहा तास थांबला त्याच्या टपरीवर. बंद करून तो घरी जायला निघाला, तेव्हा त्याच्या मागे मागे जायला लागला. तेव्हा कुठे थांबून अण्णा सरळ बोलायला तयार झाला.
"कल सुबह घर आ जाव. उसकी ताई रहेगी, उसको सब पूछना." घरचा पत्ता दिला. घराजवळची खुण सांगितली आणि अण्णा निघून गेला. रात्रभर कार्यकर्ता अण्णाच्या विचित्र वागणुकीचा विचार करत होता. असा का वागला अण्णा? नेमके काय झाले असेल? पोलीस तर दिसली हे निश्चित, म्हणजे ती व्यवस्थित असेल, म्हणजे आहेच.

सकाळी आकाराच्या सुमारास कार्यकर्ता अण्णाच्या घरी पोहोचला. ताई होती. केस पांढरे झाले होते. चेहर्‍यावर चश्मा चढला होता.
"ये की. किती दिवसांनी रे. काय ताईची आटवन झाली नाई का? आता मोटा झालास तू. स्वत:च्या गाडीनं फिरतुस."
"हो, ताई खूप दिवसांनी आलो हे खरंय. आता येत जाईन. तुम्ही कशा आहात?"
"आमचं काय रे. मला अण्णा आणि त्याला मी. चालू हाय आमचा संसार सुकानं. लगीन केलंयस काय? पोरं किती?"
"हो ताई, लग्न झालं आठ वर्षांपूर्वी. एक मुलगी आहे. एकच. बायको इंदूरची आहे. ती बँकेत नोकरी करते."
"छान झालं बघ. बायकोला घेऊन यायचं ना रे."
"हो, घेऊन येईन एकदा. ताई, पोलीसचं कसं चाललंय?"
"रमी? हममम!!! कुनाला तरी सोडवन्यासाठी, कोंची तरी केस मागं घेन्याच्या बदल्यात पोरीनं तिच्या सायबाशी लगीन केलं…."

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

14 Nov 2020 - 4:30 pm | विजुभाऊ

खूप ओघवती भाषा
एका दमात वाचून काढलं
शेवट एकदम रुखरूख लावणारा
भाषेसाठी 400% गुण

भाषेबद्दल विजुभाऊ बरोबर सहमत....

गवि's picture

15 Nov 2020 - 9:08 am | गवि

कथा अतिशय उत्कृष्ट. कथानायकाबाबत मनात अतिशय तीव्र तिरस्कार निर्माण होतो. हेही कथेचे मोठे यश.

संजय क्षीरसागर's picture

15 Nov 2020 - 10:08 am | संजय क्षीरसागर

एका मित्राला, जो सकृतदर्शनी अपराधी आहे, ३०२ किंवा ३०६ सारख्या गंभीर कलमांमधून मधून वाचवण्यासाठी, आपल्यावर जीवापाड प्रेम करणार्‍या युवतीचं आयुष्य बरबाद करणं आणि तिनंही ते करुन घेणं, कुठेच काही लॉजिक बसत नाही. प्रेम कितीही उदात्त असलं तरी या असल्या फालतू प्लॉटमधे ते ओढूनताणून बसवता येत नाही.

तसे तर, पोलीस तपासात आपल्या मित्राकडे संशयाची सुई वळली आहे, किंबहुना त्यानेच पत्नीस जाळल्याचे जवळपास सिद्ध झालं आहे हे आपल्या विश्वासू पोलीस मैत्रिणीकडून फर्स्ट हँड कळल्यावरही आपला मित्र असं करणं शक्यच नाही असा ठाम हटवाद (आणि त्या जळित मित्रपत्नीबद्दलच्या सर्व सहानुभूतिचा अचानक लोप होऊन मित्राला वाचवण्यासाठी वाट्टेल ते)... या पठडीतली मैत्री हीदेखील कार्यकर्त्याच्या बाकी अलिप्त करेक्टरशी न जुळणारी आणि अवास्तव आहे.

पण लोक विसंगत असू शकतात आणि सर्व पात्रे तर्कशुद्ध, शंभर टक्के नैतिक असतीलच असे नाही. म्हणूनच कथा नाट्यमय आणि मनोरंजक ठरते.

सोत्रि's picture

15 Nov 2020 - 12:57 pm | सोत्रि

संक्षींशी सहमत!

लेखन छान आहे पण कथेचा प्लॅाट जरा कमकुवत आहे.

- (संक्षींच्या खांद्यावर...) सोकाजी

सतिश गावडे's picture

15 Nov 2020 - 3:08 pm | सतिश गावडे

कथा पूर्वार्धात रोचक आहे, उत्तरार्ध फिल्मी वाटला.

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 4:51 pm | टर्मीनेटर

@सुधीर मुतालीक

'कुणाच्या खांद्यावर…'

ही कथा आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

कानडाऊ योगेशु's picture

16 Nov 2020 - 12:03 am | कानडाऊ योगेशु

कथेच्या शेवटचा अंदाज आला होता त्यामुळे धक्का बसला नाही.पण ती पोलिस आणि तो कार्यकर्ता हे पोटेंशियल असलेली पात्रे आहेत.कथेच्या शेवटी क्रमश: लिहिले तर कथा पूर्ण होईल असे वाटते.

बाप्पू's picture

16 Nov 2020 - 6:34 am | बाप्पू

अवास्तव वाटली..
पण ठीक आहे.

सूक्ष्मजीव's picture

16 Nov 2020 - 3:22 pm | सूक्ष्मजीव

भाषेच्या ग्रामीण बाजा बद्दल +१००
लहेजा उत्तम आणि वाचतानाही गतीमान वाटली.
पण थोडी अवास्तव वाटली.
कार्यकत्याच्या मित्राऐवजी तिने कार्यकर्त्यांसाठी त्याग केला असता तर जास्त वास्तवादी वाटले असते.
त्याच्या मित्रासाठी एवढे बलिदान थोडे अतार्किक वाटले.

नूतन's picture

18 Nov 2020 - 8:27 pm | नूतन

कथा आवडली.वर्णनशैलीही छान.
सूक्ष्मजीव यांच्या मताशी सहमत.

प्राची अश्विनी's picture

18 Nov 2020 - 10:03 pm | प्राची अश्विनी

कथा आवडली.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Nov 2020 - 4:06 pm | ज्ञानोबाचे पैजार

कथा आवडली,
पात्रांची नावे आणि भाषा दोन्हीमधल्या वेगळेपणामूळे जास्त आवडली
पैजारबुवा,

चौथा कोनाडा's picture

24 Nov 2020 - 5:42 pm | चौथा कोनाडा


जबरदस्त !

👌

प्रचंड ओघवत्या भाषेमुळे कथा जबरी आवडली.
पोलिस आणि कार्यकर्ता या नावामुळे त्यांचे तंतोतंत चित्र डोळ्यापुढे उभे राहिले !
त्या वातावरणात ओढत खेचत न्यायला खुपच यशस्वी झालीय कथा !
शेवटि एवढंच म्हणेन प्रेम ते असतं जे अविश्वसनीय गोष्टी करायला लावतं !


हॅटस ऑफ सुधीर मुतालीक !

मुक्त विहारि's picture

24 Nov 2020 - 9:56 pm | मुक्त विहारि

कथा आवडली...

Jayant Naik's picture

6 Dec 2020 - 9:30 am | Jayant Naik

अतिशय सुंदर कथा . प्रेमात माणूस इतका वेडा होऊ शकतो ? साहेबाबरोबर लग्न ? का त्यात हि काही हिशोब मांडले होते? म्हणजे आपली नोकरी टिकवणे ..नोकरीत प्रगती करणे...

तुषार काळभोर's picture

7 Dec 2020 - 7:11 am | तुषार काळभोर

सुधीर मुतालिक साहेब... एकदम मस्त कथा!

(खऱ्या आयुष्यात जे घडू शकतं तेच कथेत आलं तर कथा कशाला वाचायची?)

- (खऱ्या आयुष्यात माणसाच्या मनगटातून धागे निघू शकत नाहीत, हे माहिती असून पण स्पायडर मॅन आवडणारा) पैलवान