गंधासक्ती

Primary tabs

मित्रहो's picture
मित्रहो in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amगंधासक्ती

समुद्र उधाणला होता. तसाही तो आषाढात उधाणलेला असतो. लाटांवर लाटा घेऊन किनाऱ्यावर धडकत होता. हेही काही नवीन नव्हते. पावसाळा म्हटला की हे सारे आले. नवीन घरात येऊनही तिला सारे तेच तेच वाटत होते, म्हणून ती समुद्राचा खेळ बघत होती. ती कालच दाबोळीला नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली होती. नवीन फ्लॅटच्या गॅलरीत हातात चहाचा कप हातात घेऊन ती दूर चाललेला समुद्राचा खेळ बघत होती. ते लाटांचे आवाज कानावर घेत होती. त्या समुद्राला जणू संपूर्ण नदीला कवेत घ्यायचे होते या जोशात लाटा धडकत होत्या. नदीही कमी नव्हती. तिलाही पूर आला होता. आषाढचाच पाऊस तो, त्यात संपूर्ण सृष्टीला उधाण न आले तरच नवल होते. निसर्गाचा हा खेळ ती बराच गॅलरीत उभी राहून बघत होती.

तिने घरात आत नजर वळविली आणि घरात सर्वत्र झालेला पसारा बघून तिला स्वतःचीच चीड आली. ती काल रात्रीच या नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली होती. घरात सामान अस्ताव्यस्त पडले होते. सकाळी उठून सामानाचे बंद खोके उघडून कपाट लावायचा तिला कंटाळा आला होता. तिला स्टुडिओत जायचे होते. आज एक पार्सल पाठवायचे होते. शनिवार असल्याने फेडेक्सची डिलिव्हरी १२पर्यंत द्यावी लागते, नाहीतर मग सरळ सोमवारी पिकअप होता. तिने घाईतच आंघोळ केली. कितीही घाई असली तरी बाहेर जाताना साडी हाच तिचा आवडता पेहराव होता. साडी शोधायची म्हटले तर दोन-तीन खोकी उघडावी लागली, तेव्हा कुठे तिला हवी ती हरव्या रंगाची, लाल काठ असलेली साडी सापडली. मग ते लाल रंगाचे ब्लाउज शोधण्यात वेळ गेला. मोकळे केस, कपाळावर मोठे गंध, कानात मोठी कुंडले घालून ती निघाली. ती दरवाजा बंद करीतच होती, तर तिला कुठेतरी मासे शिजत असल्याचा सुगंध आला. त्या सुंगधाने तिला अस्वस्थ केले. बहुतेकांना माशांचे वास आवडत नाहीत, पण तिची तऱ्हाच निराळी होती. तिला माशांचे गंध प्रेमात पडलेल्या किशोरवयीन मुलीसारखे अस्वस्थ करीत असत. त्या गंधाने तिच्या मनात चलबिचल निर्माण झाली. तिने एक लांब श्वास घेतला आणि चालायला लागली. काही पावले पुढे गेली, तरी तो गंध तिचा पिच्छा सोडत नव्हता. तिने गंध तिच्या श्वासात सामावून घेतला. त्याने तिची अस्वस्थता कमी होण्याएवजी अधिक वाढली. तिची पावले माघारी वळली. ती तिच्या नकळत चालत एका दरवाजासमोर येऊन उभी राहिली. तिने दरवाजावरची बेल वाजविली. सव्वीस-सत्तावीस एक वर्षांचा तरुण बाहेर आला. तो स्वयंपाकघरातून धावत आला आहे असे वाटत होते. त्याने दाराच्या सेफ्टी होलमधून कोण आहे ते बघितले. अडतीस-चाळीस वर्षांची एक स्त्री, लाल काठाची हिरवी साडी, कपाळावर मोठे गंध लावून उभी होती. त्याने या स्त्रीला कधी बघितले नव्हते. त्याने दार उघडले. तिचे लक्ष त्या तरुणाकडे गेले. अगदीच किरकोळ बांधा, गोरा चेहरा, डोळ्याला चश्मा, चपटा भांग, पायात पायजमा आणि अंगावर स्वयंपाकाचा अ‍ॅप्रन अशा अवतारातला एक तरुण तिच्याकडे 'ही कोण बया?' या नजरेने बघत होता. ती भानावर आली.

"सॉरी, मी इथे बाजूच्या फ्लॅटमध्ये कालच शिफ्ट झाले.” तो अजूनही तसाच तिच्याकडे बघत होता.
"कौस्तुभ शिंगोटे नाव मराठी वाटले, म्हणून मी मराठीतच सुरू झाले.” तिने दारावरील पाटीकडे बोट दाखवीत सांगितले.
"मी मराठीच आहे. काय काम होते?” त्याने तुसड्या कोरडेपणाने विचारले. दुपारच्या वेळेला तो स्वयंपाक करण्यात व्यग्र असताना कोण्या आगंतुक स्त्रीने असे मध्येच बेल वाजविणे त्याला अजिबात आवडले नाही, हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
"चार्जर आहे का? माझा चार्जर सापडत नाही आहे. घरात सामान तसेच अस्ताव्यस्त पडले आहे.” एक शब्दही न बोलता दरवाजा तसाच उघडा ठेवून तो तरुण आत गेला आणि दोन मिनिटांत चार्जर घेऊन आला.
"हा घ्या चार्जर.”
"अं.. हा नको, टाइप सी हवा होता.”
"टाइप सी.." त्याने डोळे बारीक करीत परत तुसड्या कोरडेपणाने विचारले.
"नसेल तर असू द्या. “
"असेल, पण शोधावा लागेल. शोधतो मी.” तो काही पावले चालत आत गेला आपण काहीतरी विसरलो याची त्याला जाणीव झाली आणि तो माघारी वळला.
"तुम्ही आत या ना. बसा.”
"नाही, नको.”
"अहो, टाइप सी चार्जर शोधायला थोडा वेळ लागेल. या आत, बसा.”
"तुमचे नाव?” त्याने आतल्या खोलीतूनच विचारले.
"मोहिनी सेन.”
"सेन म्हणजे बंगाली. तरीही तुम्हाला मराठी येतं?”
"हो, माझी आई मराठी होती.”
"अच्छा, म्हणजे काजोलसारखे."
ती आत आली. हॉलमध्ये नवरा-बायकोंचे खूप सारे फोटो लावले होते. त्यांच्या लग्नाआधीचा फोटो, लग्नातला फोटो, हनिमूनचा फोटो, गोव्यातल्या समुद्रावरचा फोटो, गोवा फोर्टचा फोटो.. असे कितीतरी फोटो होते. त्याची बायको थोडी सावळी, लठ्ठ होती. तिच्यासमोर हा अगदीच शिडशिडीत काडी दिसत होता. विजोड जोडा वाटत होता. तिने लगेच विचारले.
"अरेंज्ड मॅरेज?"
"नाही, लव्ह मॅरेज. आम्ही शाळेपासून एकमेकांना ओळखत होतो.”
"ओह, इंटरस्टिंग."
"म्हणजे?" असे म्हणत तो परत हॉलमध्ये आला.
"नाही, शाळेपासून तुमचे प्रेम टिकले.”
"चहा घेणार?” त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत विचारले.
"नको, कशालाच उगाच फॉरमॅलिटी.”
"तसे नाही, चहा तयार आहे. मी घेणार होतोच आता, तुम्हीही शेअर करा.” तो लगेच किचनमध्ये गेला आणि एखाद्या आदर्श गृहिणीसारखा एका ट्रेमध्ये चहाचे दोन कप घेऊन आला. चहाचा एक थेंबसुद्धा ट्रेमध्ये सांडला नव्हता. त्या मघाच्या गंधाचा स्रोत शोधण्यासाठी तिने सहजच किचनमध्ये नजर फिरविली, तर संपूर्ण किचन स्वच्छ वाटत होते. त्याच्या कामातली टापटीप दिसत होती. हा गंध कुठून येत होता, ते तिला कळत नव्हते.
त्याने चहाचा एक कप तिच्या हातात देत सांगितले,
"माफ करा, चार्जर सापडत नाही आहे.”
ती हळूच हसली आणि तिने विचारले,
"बांगडा शिजतोय का? सुगंध येतोय.”
"नाही.”
"मघाशी मी माझे दार बंद करीत असताना मला मासे शिजण्याचा गंध आला. खूप अस्वस्थ केले त्या गंधाने. मला त्या गंधानेच इकडे खेचत आणले अगदी फरफटत. मी तुमच्या दारावरची बेल वाजविली. अचानक काय सांगायचे, म्हणून चार्जर हवा असे सांगितले.”
"म्हणजे तुम्हाला चार्जर नको होता? मी उगाचच कपाटात हिच्या साड्यांची उलथापालथ केली.”
"ओळख समजा. निदान त्या निमित्ताने आपली ओळख झाली.”
तिच्या या बोलण्यावर तो हसला. तीदेखील हसली. तिने उठून समोरील बॅडमिंटनची रॅकेट हातात घेतली.
"ते बायकोचे वेड आहे. वजन कमी करण्यासाठी ती बॅडमिंटन खेळते.”
"तुम्ही सांगितले वजन कमी करायला?”
"नाही, डॉक्टरने.” थोड लाजतच तो बोलला. “कन्सीव्ह करायच्या आधी वजन कमी करा म्हणाले. पुढे त्रास होणार नाही.”
"इंटरेस्टिंग!"
ती भिंतीवरचे सारे फोटो बघत होती आणि तो तिचा सावळा पाठमोरा देह निरखून बघत होता. ती उंच होती. कदाचित तिची उंची त्याच्याइतकीच असेल, पण साडी आणि मध्यम बांध्यामुळे ती अधिक उंच वाटत होती. तिचे काळे कुरळे केस खाली कंबरेपर्यंत आले होते. तो एकटक तिच्याकडे बघत होता. तो आपल्याकडे बघतोय हे लक्षात येताच तिने पाठीवर रुळणारे केस पुढे घेतले. तिची अर्ध्याहून उघडी पाठ आता त्याला दिसत होती. ती अधिक पाठमोरी होऊन भिंतीवर लावलेले इतरही फोटो बघत होती. काही वेळ त्याची नजर तिच्यावर खिळली होती. घरी आलेल्या स्त्रीकडे, आपल्या शेजारणीकडे असे एकटक बघणे योग्य दिसत नाही हे त्याच्या लक्षात येताच त्याने नजर दुसरीकडे वळविली.
"तुमची पत्नी कुठे आहे?”
"ती गेली माहेरी. मुंबईला.”
"अच्छा, म्हणजे सध्या तुम्ही फोर्स्ड बॅचलर आहात तर. मजा आहे.”
"छे हो मजा कसली? कंटाळा येतो एकट्याने राहायचा. तसेही काय आहे गोव्यात?”
"गोव्यात काय आहे? सारे जग गोवा बघायला येते, तुम्ही विचारता गोव्यात काय आहे?”
"टूरिस्ट म्हणून दोन दिवस ठीक आहे. इथेच राहायचे म्हणजे रोज रोज तेच वैताग आहे. असा चिकचिक पाऊस, तो समुद्र, ते मासे आणि ती फेनी.. साऱ्यांचा वास येतो. डोके भणभणायला लागते. वरून टूरिस्ट स्पॉट म्हणून उगाचच किंमती वाढलेल्या.”
"तुम्हाला खरेच गोवा आवडत नाही? तो उधाणलेला पांढरा स्वच्छ समुद्र, दूरवर पसरलेला तो किनारा, आजूबाजूने दिसणाऱ्या डोंगरांच्या रांगा, त्यावरील हिरवळ, असारिमझिम पाऊस... तुम्हाला आवडत नाही? सूर्यास्ताच्या वेळेला समुद्राकडे बघताना कसे रोमँटिक वाटते.."
"रोज काय बघायचे आहे त्या समुद्रात? तेच पाणी, तीच घाण आणि तेच मासे.”
"आज जाऊन बघा, तो समुद्र कसा उधाणलेला आहे. कधी या उधाणलेल्या समुद्रात त्याच्यासारखेच वाहवत जायचा प्रयत्न करा. कधी या सततधार पावसात चिंब भिजा. तुम्हाला सांगते, तुम्हाला गोवा आवडेल.”
"कोण भिजणार? उगाच सरदी होईल.” त्याच्या या उत्तराने ती जोरजोरात हसली. अशी हसताना ती आणखीच सुंदर दिसत होती. त्याची नजर हसताना उठून दिसणाऱ्या तिच्या ओठांवर फिरत होती. ते ओठ, त्यावरचे लिपस्टिक आणि खळखळून हसणारे दात सारे तो बघत होता. तो तिच्या पाणीदार डोळ्याकडे बघत होता, तिच्या हलणाऱ्या कुंडलांकडे बघत होता, तिच्या केसांच्या बटांकडे बघत होता आणि ती फक्त मुक्त हसत होती. हसताना तिचा पदर थोडा सरकला, पण तिने तो नीट केला नाही. त्याला मात्र अवघडल्यासारखे झाले होते. का हिला घरात बोलावले, असे त्याला झाले होते.
"खरेच तुम्हाला गोवा आवडत नाही?”
"अजिबात नाही. चीड येते मला गोवा गोवा करणाऱ्यांची.” तिने चहाचा कप टी टेबलवर ठेवला. हलकेच त्याच्या हातावर हात ठेवला. तिच्या हातातल्या बांगड्यांच्या गुंजनांचा एक वेगळाच आवाज झाला. तो मात्र खूप अस्वस्थ झाला होता. ती बोलत होती.
"कधीतरी या समुद्राच्या लाटांवर बेफाम होऊन बघा. अनुभवा तो समुद्र कसा त्याच्याकडे धावत येणाऱ्या नदीला आपल्यात सामावून घेतो. आयुष्यातला तोचतोचपणा काढायचा असेल, तर आयुष्यात कधीतरी बेफाम व्हायलाच हवे ना?”
तो बावरला. काय बोलावे त्याला सुचत नव्हते. त्याने लगेच हात काढून घेतला. स्वतःचा चहाचा कप उचलून आत गेला. ती त्याला हसतेय असे त्याला मनात वाटत होते, त्यामुळे तो तिच्याकडे बघायचे टाळत होता. बाहेर विजा कडकडत होत्या. तो वारा, तो पाऊस, ते ढगाचे गडगडणे याने सृष्टीत एक वेगळेच संगीत निर्माण केले होते. वेली, झाडे त्या संगीताच्या तालावर फेर धरीत आहेत असेच वाटत होते. त्याने बाहेर बघितले. समोरच्या हॉटेलातील स्वीमिंग पूलमध्ये एक कपल एवढ्या पावसातसुद्धा पोहत होते. अशा लोकांचा त्याला नेहमीच तिटकारा होता.

"अशा पावसात काय पोहतात हे लोक..”
"अहो, पावसातच पोहण्यात खरी मजा आहे. उन्हात तर सारेच पोहतात.”
त्याला अजिबात आवडले नव्हते. या बयेला कसे कटवायचे, त्याला समजत नव्हते. तिला बडीशेप द्यायची म्हणून तो बडीशेप घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर आला, तसा त्याचा पाय टेबलला लागला आणि टेबलवरचा ग्लास खाली पडला. त्या आवाजाने घाबरून ती वळली. तिने वळताच लांब केसांना एक मोहक झटका दिला. परत पूर्वीसारखे केस समोर ओढून घेतले. त्याला तिच्याकडे बघायची आता भीती वाटायला लागली, पण चोरटी नजर मात्र धोका देत होती. नजरेला धोका देण्यासाठी त्याने विचारले.
"तुम्ही गोव्यात नवीन वाटत.”
"नाही, तेरा वर्षे झाली.”
"तरी तुम्हाला गोव्याचे इतके कौतुक.."
"का असू नये?”
"काय करता तुम्ही?”
"माझा स्टुडिओ आहे.”
"फोटो स्टुडिओ?”
"नाही. मी शिल्पकार आहे. दगड कोरून त्यातून शिल्प साकारते.”
"अच्छा, म्हणजे मूर्त्या बनवता तुम्ही.”
"मूर्ती घडवावी लागते, शिल्प साकारावे लागतात.”
"माझ्यासाठी दोन्ही एकच. कोणते शिल्प बनवता तुम्ही?”
"नग्न पुरुषांचे.” तिच्या उत्तराने तो गोंधळला. हिच्या मनात काय असावे याविषयी अनेक शंका त्याच्या मनात काही वेळ तरळून गेल्या.
ती पुढेही बोलत होती. "ते बाहेरच्या देशात असतात ना. घरात हॉलमध्ये ठेवतात.”
त्याचे लक्षच नव्हते. विषय बदलायचा म्हणून त्याने विचारले,
"तुमचे मिस्टर काय करतात?”
"मी घटस्फोटिता आहे. लग्नानंतर दोन वर्षांतच घटस्फोट झाला. I left him.”
त्याला प्रचंड धक्का बसला. काय बोलावे काहीच सुचत नव्हते. त्याने तिच्याकडे बघितले. तिच्या ओठावरचे लिपस्टिक त्याला आता दिसत होते. ते तिच्या साडीच्या पदराला मॅच होत आहे, हे त्याच्या आता लक्षात आले. तिने डोळ्यांना लावलेले आयलाइनरसुद्धा लिपस्टिकला मॅच होत होते. ती उठली, त्याच्यासमोर ठेवलेला कप उचलला आणि आत गेली. तिने मारलेल्या अत्तराचा वास त्याच्या नाकात गेला. तो स्वतःच्याच घरात लाजिरवाणा होऊन खाली बघत होता. तिच्या पायातील चाळांचा आवाज झाला, त्यावरून ती बाहेर आली आहे हे त्याच्या लक्षात आले.
"तुम्ही मासे बनवीत होता, सांगितले नाही.”
त्याला आता अधिकच लाजिरवाणे झाले होते. तो खाली मान घालून बसला होता. ती मात्र त्याच्या घरात मुक्त फिरत होती.
"तुम्ही शेफ आहात का?” तिने एका फोटोकडे बघत विचारले.
"हो. मी ताज हॉटेलमध्ये शेफ आहे.”
"तुमच्या हातचे जेवण खायला यावे लागेल.”
"नक्की या."
"तुमची स्पेशालिटी काय आहे?”
"मासे. मघाशी तुम्ही बांगड्याचा उल्लेख केला म्हणून सांगतो - मी बांगड्याचेच पंचवीस प्रकार बनवू शकतो. माझे आवडते रावसचे कालवण.”
"अरे वाह! मला मासे फार आवडतात. मी वेडी आहे माशांसाठी.” तिने उत्साहात उत्तर दिले.
"या एकदा हॉटेलमध्ये.” काहीतरी बोलायचे म्हणून तो बोलला.
"हॉटेल नको. ते खूप फॉर्मल होईल. तुम्हीच माझ्या घरी या.”
"तुमच्या घरी?” तो अडखळला.
"का? भीती वाटते?”
"नाही, भीती कशाची?”
"मग या माझ्या घरी. फक्त चार पावलेच ओलांडायची आहेत.”
"या फाइव्ह स्टार हॉटलच्या शेफच्या हातचे जेवण अगदीच प्लेन, ब्लँड, कंटाळवाणे असते. अगदीच निरस.”
"मला चालेल.”
"ते मासे आणा, मसाले शोधा.”
"मी आणते मासे, तुम्ही सांगाल ते सारे मसाले आणते.”
"मला कुणाच्या घरी जाऊन मासे बनवायची सवय नाही.”
"प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असते.”
आता पाऊस वाढला होता. मधेच एक वीज चमकली. तो आता ढगांच्या आवाजाकडे कान लावून बसला. ढगांचा जोरात गडगडाट झाला. त्याने बाहेर नजर फिरविली, एक लांब श्वास घेतला आणि कसला तरी निर्धार करून तो तिला म्हणाला,
"ठीक आहे. मी येतो तुमच्याकडे डिनरला आजच."
"अरे वाह, छान!”
"हो पण तुम्हाला मला मदत करावी लागेल.”
"तुम्ही सांगाल त्या मार्केटमधून तुम्ही म्हणाल तसा रावस मी घेउन येते. तुम्ही म्हणाल ते मसाले आणते. आणखीन काय मदत हवी ते बोला.”
"त्याची गरज नाही. मी आणतो रावस आणि सारे मसाले.”
"मग मी काय मदत करायची?”
"मी सांगणार. जेवण तुम्ही बनविणार. रावसचे कालवण.”
"अहो मला जेवण बनविता येत नाही. मला तर रावस आणि पापलेट यातला फरक कळत नाही.”
"मी सांगतो ना. रावस कसा धुवायचा, तो कसा कापायचा, त्याला मॅरिनेट कसे करायचे. मी पाटा-वरवंटा घेऊन येतो.”
"पाटा-वरवंटा? तो कशाला?”
"त्या मिक्सरमधल्या मसाल्याला चव नसते. माझ्याकडे सुंदर पाटा-वरवंटा आहे - तो दिसतो बघा. सर्व मसाले एकत्र करायचे, त्यात कांदे, टमाटे अणि मुख्य म्हणजे खोबरे घालायचे. हळूहळू पाणी घालायचे. ते सारे मिश्रण पाट्यावर वाटायचे, वर हलकासा आले-लसणाचा मारा. वाह! काय चव.. बनवा तुम्ही."
"अहो, ते कस शक्य आहे?”
"का शक्य नाही? तुमच्या घरी लाइव्ह यूट्यूब कार्यक्रम होईल.”
"नाही, असे नाही होऊ शकणार. मला साधे कांदे धड चिरता येत नाहीत. मी दगड कोरून माणूस बनवू शकते, पण असा मासा कापून जेवण बनवू शकत नाही.”
"प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असते. येईल तुम्हाला.”
ती त्याच्याकडे एकटक बघत होती. तो मंद हसला. तिने समोर घेतलेले केस परत पाठीवर मोकळे सोडले. मग ते केस व्यवस्थित बांधले. साडीचा पदर ठीक केला. पदराने पोट व्यवस्थित झाकले. पाठ सोफ्याला टेकविली. आता त्याला तिच्याकडे बघायची भीती वाटत नव्हती. तो मंद हसत सहज बघत होता. मघाची भीती, तो अपराधीपणा सारा दूर पळाला होता. त्याचे असे बघणे तिला अस्वस्थ करीत होते.
"मी निघते आता.”
"मी येतो साडेसहा वाजता.” ती काही उत्तर देणार तर तिचा फोन वाजला. तिने लगेच फोन घेतला.
"सोहम, तुमी कोथाय?”
"आमी तुमार कॉल वेट कोरेची हाफ अ‍ॅन अवर. तुमी कोथाय?”
"आमी आसची. वेट, वेट. आमी आसची.”
असे म्हणत तिने फोन ठेवला. लांब श्वास घेतला. इकडे तिकडे बघितले, परत लांब श्वास घेतला आणि त्याला म्हणाली,
"माय हजबंड.”
"तुमचा नवरा?” तो आश्चर्याने बघत होता.
"माझा घटस्फोट झाला नाही. I am happily married for last 13 years.”
तो मंद हसत तिच्याकडे बघत होता.
"तुम्हाला सांगते, थोडी गंमतच आहे. आमचा बंगाली ग्रूप आहे. आम्ही गुरुदेव टागोरांच्या चोखेर बाली कादंबरीवर आधारित नाटक करतोय. मी बिनोदिनी करतेय. ते कॅरेक्टर मला सापडत नव्हते. त्या काळातली, सुंदर, शिकलेली, दुर्दैवाने विधवा झालेली, एक आत्मविश्वासी स्त्री कशी असेल? प्रेम, रोमान्स व्यक्त करण्याची तिची पद्धत कशी असेल.. काहीच सापडत नव्हते. ज्या महेंद्रशी तिचे लग्न होणार होते, त्या महेंद्रला इम्प्रेस करायला ती कशी वागत असेल? ती बिनोदिनी चालत कशी असेल, बोलत कशी असेल? काही अंदाज येत नव्हता.”
"मग आता सापडले कॅरॅक्टर?”
"संपूर्ण कॅरॅक्टर नाही सापडले, पण अंदाज आला. मी काही ठरवून केले नाही. माशांचा सुगंध आला, मी तुमच्या घरात शिरले आणि हळूहळू कॅरॅक्टरमध्ये शिरत गेले.”
"छान!! अभिनय छान होता.”
"सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. तुम्ही किती चिडला होता. पत्नी चक्क गेली माहेरी असे सागितले. मी तुमच्या पत्नीला ऑफिसला जाताना बघितले.”
"मला बांगडा शिजवताना डिस्टर्ब केलेले आवडत नाही. तेव्हा चीड तर नक्कीच आली होती. अशा पावसाळी दिवशी कुणी अनोळखी स्त्री चक्क तुमच्या घरात शिरते, तर तुम्हाला राग येणारच. तुमच्या त्या नग्न पुरुषांच्या मूर्त्यावरून मला आठवले - आमच्या इथला एक हेल्पर अशाच मूर्त्या बनविणाऱ्या स्त्रीकडे स्वयंपाकाचे काम करीत होता. त्याने सांगितले होते, त्या बाईला अजिबात स्वयंपाक करता येत नाही. तिला जेवण बनवायची प्रचंड चीड आहे. बाई भिंतीवर पाल बघतिली तरी घाबरत नाही, पण कांद्याची पाल बघितली की प्रचंड घाबरते. मग मीही रिस्क घ्यायची ठरविले.”
त्याचे बोलणे ऐकून तिही हसली. तोही हसला. ते दोघेही मनमुराद हसत होते.
तिचा फोन तसाच वाजत होता. तो आषाढातला पाऊस अजूनही तसाच बरसत होता. तो समुद्र आताही उधाणलेला होता.

मित्रहो
https://mitraho.wordpress.com

प्रतिक्रिया

गवि's picture

15 Nov 2020 - 3:54 pm | गवि

मस्त...

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 5:27 pm | टर्मीनेटर

@मित्रहो

'गंधासक्ती'

ही तुमची कथा आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

सोत्रि's picture

15 Nov 2020 - 5:51 pm | सोत्रि

अतिशय भन्नाट! माशाच्या गंधाइतकीच मन मोहवून टाकणारी कथा.

- (मत्स्य गंधासक्त) सोकाजी

मित्रहो's picture

16 Nov 2020 - 11:14 am | मित्रहो

धन्यवाद गावि, टर्मीनेटर, सोत्री. प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यावाद

योगी९००'s picture

16 Nov 2020 - 2:18 pm | योगी९००

छान कथा... आवडली.

श्रीगुरुजी's picture

16 Nov 2020 - 5:38 pm | श्रीगुरुजी

फारच सुंदर कथा! मस्त जमलीये.

मित्रहो's picture

17 Nov 2020 - 10:13 am | मित्रहो

धन्यवाद योगी९०० आणि श्रीगुरुजी

सुखी's picture

17 Nov 2020 - 11:05 pm | सुखी

दंडवत घ्या

मित्रहो's picture

18 Nov 2020 - 10:21 am | मित्रहो

धन्यवाद सुखी !!

सरिता बांदेकर's picture

19 Nov 2020 - 10:02 pm | सरिता बांदेकर

तुमची कथा वाचताना शरदचंन्द्र चॅटर्जींच्या कथेतली नायिका आठवली.
छान लिहीले आहे.

मित्रहो's picture

20 Nov 2020 - 5:01 pm | मित्रहो

प्रतिसादाबद्दल धन्यवाद सरिता बांदेकर
शरदचंद्र चॅटर्जी हे फार मोठे नांव.
त्यांचे नांव काढले देवदास किंवा परीणिता आठवतात.
मी मात्र त्यांचे साहित्य वाचले नाही

Shrinidhi's picture

20 Nov 2020 - 5:48 pm | Shrinidhi

मस्त

मित्रहो's picture

20 Nov 2020 - 10:09 pm | मित्रहो

धन्यवाद Shrinidhi

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Nov 2020 - 3:16 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडली
पैजारबुवा,

सौंदाळा's picture

24 Nov 2020 - 9:06 am | सौंदाळा

कथा आवडली.
शेवटी थोडी फिल्मी वाटली. पण एकंदरीत माहौल मस्त जमला.

मित्रहो's picture

24 Nov 2020 - 11:18 am | मित्रहो

प्रतिसादाबद्दल धन्यवाद पैजारबुवा आणि सौंदाळा

सुधीर कांदळकर's picture

25 Nov 2020 - 7:17 am | सुधीर कांदळकर

मस्त कथानक, रेखाटन त्याहून सुरेख, मऊरेशमी. झकास मस्त कथा. धन्यवाद.

मित्रहो's picture

25 Nov 2020 - 10:46 am | मित्रहो

खूप छान प्रोत्साहनपर प्रतिसादासाठी धन्यवाद सुधीर कांदळकर

प्राची अश्विनी's picture

25 Nov 2020 - 10:58 am | प्राची अश्विनी

एकदम fresh कथा! ताज्या फडफडीत चकाकत्या बांगड्यासारखी.

चौथा कोनाडा's picture

25 Nov 2020 - 12:33 pm | चौथा कोनाडा

व्वा, भारी !
100px 👌

Jayagandha Bhatkhande's picture

25 Nov 2020 - 5:48 pm | Jayagandha Bhat...

कथा आवडली...

मित्रहो's picture

25 Nov 2020 - 6:54 pm | मित्रहो

धन्यवाद प्राची अश्विनी, चौथा कोनाडा, Jayagandha Bhatkhande