प्रेम म्हणजे नक्की काय असते?

Primary tabs

Jayant Naik's picture
Jayant Naik in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amप्रेम म्हणजे नक्की काय असते?

आपल आयुष्य म्हणजे एक कादंबरीच असते. अनेक प्रकरणांची. पुढच्या प्रकरणात काय लिहिले आहे ह्याचा काही अंदाज येत नाही. आपल्या वयाचे प्रत्येक वर्षं म्हणजे या कादंबरीतील एक नवे प्रकरणच असते जणू काही! केव्हा केव्हा प्रत्येक दिवस किंवा प्रत्येक क्षणसुद्धा. प्रत्येक माणूस म्हणजे एक नवी कादंबरी. या सगळ्या कादंबऱ्यांचा शेवट जरी एकच असला, तरी तिथपर्यंत पोहोचायचे मार्ग किती वेगवेगळे असतात. बहुतेक सगळ्या कादंबऱ्यांची शेवटची प्रकरणे रटाळ आणि बेचव असतात.

सुरुवातीची काही प्रकरणे मात्र खूप मजेशीर असतात. शिवाय एखाद्या प्रकरणात इतक्या घडामोडी घडतात की नंतर ते प्रकरण वाचताना आपले आपल्यालाच आश्चर्य वाटत राहते की हे इतके सगळे त्या एका वर्षात, एका प्रकरणात घडले? पुढच्या अनेक प्रकरणांत मात्र बऱ्याच वेळा फारसे काही घडत नाही. आपण टीव्हीवर एखादी मालिका बघताना, एखाद्या एपिसोडचा लेखक एकदम बदलावा आणि मग ती मालिका कुठेतरी भलतीकडेच भरकटत जावी, तसे काही तरी वाटायला लागते.

आता माझेच बघा ना! साधारण २००४च्या सुरुवातीचा काळ होता. मी नुकतेच पंचविसाव्या वर्षात पदार्पण केले होते. त्याच वर्षी “आता नोकरीला लागा. शिक्षण पुरे आता.” असे सांगून आमचे तीर्थरूप वैकुंठी प्रयाण करते झाले. घरी आई आणि कॉलेजला जाणारी बहीण. त्यामुळे नोकरीसाठी वणवण सुरू झाली. बऱ्याच प्रयत्नांनी मला रत्नाकर बँकेत नोकरी मिळाली. तीन महिन्याचे ट्रेनिंग झाले आणि भवानी नगर नावाच्या कराडजवळील एका छोट्या गावातील एका लहान शाखेत माझे पहिले पोस्टिंग झाले. त्या वेळी आम्ही कराडला राहत होतो. मी दररोज सकाळी ट्रेनने भवानी नगरला जात असे आणि संध्याकाळी परत येत असे. स्टेशनपासून आमची ब्रँच दहा-पंधरा मिनिटाच्या अंतरावर होती. पहिल्या दिवशी मी चालत चालत ब्रँचकडे निघालो. तेवढ्यात एक टांगेवाला माझ्या मागे आला.
“साहेब, कुठे जायचे आहे? मै छोड दूंगा ना!” मी वळून बघितलं.एक सलवार आणि खमीस असा पठाणी पोशाख घातलेला तरुण मुलगा त्याच्या टांग्यातून माझ्याशी बोलत होता.
“अरे नको. इथे जवळच रत्नाकर बँकेत जायचे आहे”
“मी सोडतो ना साहेब. फक्त २ रुपये घेईन. अगदी राजेसाहेबांची सवारी आहे असे वाटेल तुम्हाला.”
मला हसू आले. पण विचार केला, आज बँकेत जाण्याचा माझा पहिला दिवस! अगदी राजेसाहेबांच्या थाटात जाऊ. नोकरी मिळाल्याचा आनंद २ रुपयात साजरा करू. मी टांग्यात बसलो. मोठा छान सजवला होता त्याने टांगा. डाव्या आणि उजव्या बाजूला आरसे. टांग्यात बसायला सोपे जावे म्हणून दोन्ही बाजूला गोंडे जोडलेली दोरी. मागच्या आणि पुढच्या सीट्स सुरेख होत्या, कुठेही भोक नसलेल्या! घोडा तर खूपच उमदा होता. फुर फुर असा काहीसा आवाज करत तो पुढे जायला उत्सुक होता. त्या टांगेवाल्याने हलकेच लगाम ओढून त्याला शांत उभा केला होता. मी टांग्यात बसताना टांगा थोडा मागे झुकला.
“आरामात बसा साहेब! हे आत्ता सोडतो तुम्हाला.चलो सुलतान!” त्या टांगेवाल्याने घोड्याला हुकूम केला.
“ह्या घोड्याचे नाव काय सुलतान आहे?” मी विचारले.
“होय साहेब. आणि माझे अब्दुल.” तो हसून म्हणाला. माझ्या वयाचाच असावा तो. गोरापान रंग, पण आता उन्हातानात भटकत असल्यामुळे थोडा रापल्यासारखा झाला होता. गळ्यात कसलातरी तावीज. डोळ्यात सुरमा घातल्यामुळे त्याचे काळेभोर डोळे मोठे उठून दिसत होते. त्याने घरातून निघताना केस व्यवस्थित विंचरले होते, पण आता मात्र अगदी अस्ताव्यस्त झाले होते. आपल्या केसांवरून मधूनच हात फिरवायची त्याला सवय दिसली.
मुलगा मोठा बोलका दिसला.
“गावात नवीन आलात काय साहेब?”
“हो ,रत्नाकर बँकेत आजपासून नोकरीला लागलो आहे. कराडला राहतो. सकाळच्या गाडीने येणार आणि संध्याकाळी जाणार.”
“मी इथलाच आहे साहेब. माझेपण ७वीपर्यंत शिक्षण झाले आहे. मला ३ लहान भाऊ आहेत. अब्बू आता म्हातारे झाले, म्हणून शाळा सोडली आणि टांगा चालवतो आता.”
“बरा चालतो का व्यवसाय?“ मी काहीतरी बोलयचे म्हणून विचारले.
“कुठला बरा साहेब? गाव लहान आहे. एक-दोन रिक्षावालेपण नवीन आलेत. आजकाल टांग्यात बसण्यापेक्षा रिक्षा आवडते लोकांना. अजून ४-५ टांगेवालेपण आहेत. धंदा नरम आहे साहेब.” अब्दुलने माहिती पुरवली.
मी त्याच्याशी बोलत आजूबाजूला पाहात होतो. छोटेखानी पण टुमदार गाव होते. स्टेशनवरून गावात जाणारा एक सरळ रस्ता होता. ओबडधोबड रस्ता होता, पण दोन्ही बाजूंना बरीच झाडी आणि बंगलेवजा घरे दिसत होती. एक दोन ठिकाणी ४-५ मजली घरेही दिसत होती. या मुख्य रस्त्यावरून गावात जाणारे रस्ते दोन्ही बाजूंना दिसत
होते.
“थोडे समोर गेले की कराड रोड लागतो साहेब. त्या रस्त्यावरच आहे रत्नाकर बँक.” अब्दुल म्हणाला.

अशा रितीने माझे कारकुनी जीवन सुरू झाले. बँकेत जाऊन मी व्यवस्थापकांना माझे नेमणूक पत्र दाखवले आणि त्यांनी माझी स्टाफशी ओळख करून दिली. फक्त मी धरून ४ जणांचा स्टाफ. आठल्ये आणि देसाई दररोज सांगलीवरून बस ने येत. आमचे बॉस तळपदे साहेब गावातच रहात असत. त्यांचे कुटुंबही इथेच होते.
आणि मिस रोहिणी सावंत. ती या गावचीच होती. तिचे वडील इथे डॉक्टर होते आणि गावचे पुढारीसुद्धा होते. आमच्या बॉसने तिच्याशी ओळख करून दिली आणि माझ्या मनात एकदम वीज चमकावी असे काही तरी झाले. प्रथमदर्शनी प्रेम का काय असते ते! काळीसावळी आणि थोडीशी बुटकीशी होती ती. केसांचा बॉब कट. खांद्यापर्यंत रुळणारे मखमली केस. गुलाबी ओठ आणि गालावर दोन्ही बाजूंना खळ्या. तिने तिच्या काळ्याभोर डोळ्यांनी माझ्याकडे पाहात आपला हात पुढे केला. मी तिचा हात हातात घेतला आणि क्षणभर काळ एकदम थांबल्यासारखा झाला. सर्व जग एकदम नि:शब्द झाले. माझे सर्वांग जणू विजेचा झटका लागावा तसे थरारले.
“मी आशुतोष काळे” मी कसाबसा म्हणालो.
“ग्लॅड टू मीट यू!” ती म्हणाली.
तो दिवस मग जणू अधांतरी तरंगत असल्यासारखा गेला. माझे टेबल तिच्या टेबलाच्या शेजारीच होते. माझे जरी ३ महिन्याचे ट्रेनिंग झाले होते, तरी प्रत्यक्ष कामाची आजच सुरुवात होती. रोहिणीने मला खूप मदत केली. आठल्ये आणि सावंत लोन्स बघत होते, तरीही त्यांनी वेळोवेळी मदत केली. त्या दिवशीची कॅश जुळली आणि मी सुटकेचा नि:श्वास सोडला.

मग माझे रुटीन सुरू झाले. कराड ते भवानी नगर आणि परत. पण त्या बँकेच्या विश्वात जणू माझे आणि रोहिणीचे एक वेगळेच विश्व होते. आमच्या निरर्थक विषयांवर होणाऱ्या गप्पा, डोळ्यांच्या कोपऱ्यातून एकमेकांकडे पाहणे आणि काही वेळा सहज आणि काही वेळा मुद्दाम केलेला हातांचा स्पर्श! बँकेच्या सुट्टीचा दिवस मला खायला उठे. केव्हा एकदा सुट्टी संपते आणि मी बँकेत जातो, असे मला होत असे.
अब्दुल दररोज सकाळी स्टेशनवर मला घ्यायला येत असे आणि संध्याकाळी परत मला बँकेतून स्टेशनवर सोडत असे. आमची आता चांगली मैत्री झाली होती. तो आता मला सरजी म्हणायला लागला होता. मी त्याला किती वेळा सांगितले की मला सरळ आशुतोष म्हण. पण त्याचे सरजी काही सुटत नव्हते.

एके दिवशी टांग्यातून जाताना मी बघितले की रस्त्यावरून जाणाऱ्या एका पाठमोऱ्या मुलीकडे अब्दुल बघत होता. निळसर पंजाबी ड्रेस घातलेली ती मुलगी आपली ओढणी सावरत आणि रुमालाने डोके झाकून घेऊन रस्त्याच्या कडेने निघाली होती. तिच्या हातात काही पुस्तके होती. आम्ही तिच्याजवळून जाताना अब्दुल तिच्याकडे बघून हसला. त्या मुलीनेसुद्धा अब्दुल कडे बघून स्मित केले.
आम्ही पुढे आल्यावर मी विचारले, “कोण मुलगी रे ही अब्दुल?”
अब्दुल थोडा लाजला. त्याने परत मागे वळून तिच्याकडे पाहिले आणि मला म्हणाला, “रुखसाना तिचे नाव. आमच्या मोहल्ल्यातच राहते. बडी पढी लिखी है वो. तुमच्या बँकेजवळ एक वाचनालय आहे ना, तिथे ती काम करते. मुझे बहुत पसंद है वो!”अब्दुलने माहिती पुरवली.
मी हसलो. चला, आणखी एक प्रेमकहाणी! आमची बँकेत एक चालू आहेच आणि आता ही टांगेवाल्याची.
दुसऱ्या दिवशीसुद्धा ती मुलगी आम्हाला रस्त्यात दिसली. परत तेच. नजरानजर आणि हास्य.
“अरे अब्दुल, तिला पण टांग्यात येऊ दे ना! आमच्या बँकेच्या जवळच आहे ते वाचनालय.”
अब्दुल एकदम गडबडला.
“ना जी ना! वो पराये मर्द के साथ नही आयेगी!”
“अरे, मग मी पुढे बसतो, तिला मागे बसू दे!” मी मार्ग काढला.
अब्दुलने टांगा कडेला घेतला.आणि रुखसानाला माझा प्रस्ताव सांगितला. रुखसाना माझ्याकडे पाहात म्हणाली, “अब्दुल, इनको तकलीफ होगी. मी येईन चालत. दररोजच जाते नाही का?”
मी मग टांग्यातून उतरलोच आणि तिला मागे बसायची विनंती केली. तिने एक-दोन मिनिटे विचार केला आणि जरा नाखुशीनेच ती टांग्यात बसली. मी मग अब्दुलशेजारी जाऊन बसलो. अब्दुल एकदम खूश झाला. तिच्या घरच्या लोकांबद्दल तो मोठ्या आस्थेने चौकशी करू लागला. ते दोघे एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. मी टांग्यात पुढे बसून त्याच्या गप्पा ऐकत होतो. काळी-सावळी पण तरतरीत दिसणारी रुखसाना मोठी शालीन होती. त्यांच्या समाजात मुले आणि मुली फारशा मिसळत नसल्याने अब्दुलबरोबर ती फारशी बोलत नव्हती, पण मी पण टांग्यात असल्याने ती माझ्या काही प्रश्नांना हळूच उत्तरे देत होती. मला हळूहळू तिची माहिती समजली. ती कोल्हापुरात शिकलेली होती. आर्ट्समध्ये पदवीधर होती आणि बीएड करून पुढे शिक्षिका होण्याची तिची मनीषा होती.
मग हे असे मधूनमधून होत असे. मी पुढे आणि रुखसाना मागे, अशी आमची सवारी आमच्या बँकेपर्यंत जाई. मग मी तिथे उतरत असे आणि रुखसाना टांग्यातून पुढे जाई.
इकडे आमचे बँकेतले प्रेमप्रकरण हळूहळू रंगत होते. मी एकदा बँक संपल्यावर रोहिणीच्या घरी सुद्धा जाऊन आलो. डॉक्टर सावंत आणि तिची आई खूप मनमिळाऊ आणि बोलके निघाले. आमच्या खूप गप्पा झाल्या. डॉक्टरांनी एक एक प्रश्न विचारत माझी सगळी माहिती काढून घेतली. ते माझ्याकडे भावी जावई म्हणून बघत आहेत असे मला वाटले.. आपण डॉक्टरांचे जावई होणार ह्या विचाराने मला खूप खूप बरे वाटले.

त्या दिवसा नंतर माझे सारे जीवनच रंगीबेरंगी झाले आहे असे मला वाटायला लागले. मला एकदम कुणीतरी गुदगुल्या करतेय असे वाटून उगीचच खुदकन हसू येत असे. केव्हाही, कुठेही. उगीचच केव्हाही तोंडातून शीळ निघून जाई. माझी आई मला म्हणालीसुद्धा, “काय, स्वारी खूप खूष दिसतेय! काय प्रेमात वगैरे पडलास की काय?”
“तसेच काही तरी. तुला कसे कळते कुणास ठाऊक?”
“अरे, आई आहे मी तुझी! मला नाही, तर कुणाला कळणार?” आई म्हणाली.
“आमचे अजून काही ठरले नाही, पण ठरले म्हणजे तुला भेटायला तिला घेऊन येतो.” असे सांगून मी आईकडून थोडा वेळ मागून घेतला.
इकडे आमची टांगा सवारी चालूच होती. काही वेळा मला जुन्या हिंदी सिनेमातल्या टांगा गाण्याची आठवण होई. वाटे की मी आणि रोहिणी टांग्यातून दूर कुठेतरी निघलो आहोत आणि मी गाणे म्हणतोय..
“मांग के साथ तुम्हारा ,मांग लिया संसार ......”
अगदी तद्दन फिल्मी वेडेपणा. माणूस प्रेमात पडला की तो असेच वेड्यासारखा वागायला लागतो की काय, कुणास ठाऊक?
मी अगदी ठरवून टाकले होते... माझी बँकेतील नोकरी पक्की झाली रे झाली की रोहिणीला स्पष्ट विचारायचे लग्न केव्हा करायचे म्हणून. आणखी फक्त २ महिन्यांचा प्रश्न होता.

एकदा बँक सुटल्यावर परत जाताना अब्दुल मला म्हणाला, “सरजी, अब मुझे क्या करना चाहिये? रुखसानाके दिल में क्या है ये कैसे मालूम करू? काही
समजत नाही. वो इतनी पढी लिखी है और मै ऐंसा टांगेवाला! वो मुझे पसंद करेगी या नही ये समझ नही आ रहा मुझे!” खरे तर मीसुद्धा जरा साशंकच होतो. रुखसानाला अब्दुल आवडत होता हे नक्की. मी तिला मधून मधून अब्दुलकडे चोरून बघताना पाहिले होते. पण हे प्रेम होते का? नक्की सांगता येत नव्हते.
“अब्दुल, तू तिला तिच्या वाचनालयात जाऊन मधून मधून भेटत जा. तिला एखादी सुंदर भेटवस्तू दे. हळूहळू कळेल तुला. अजून थोडे दिवस जाऊ दे.” मी अब्दुलची थोडी समजूत काढली.
(मी नुकतीच एक किमती विदेशी परफ्यूमची बाटली रोहिणीला भेट दिली होती. तो परफ्यूम शिंपडून ती दुसऱ्या दिवशी बँकेत आली, तेव्हा मला उगीचच आम्ही दोघे चाफ्याच्या झाडाखाली बसलोय आणि आमच्यावर चाफ्याच्या फुलांचा वर्षाव होतोय असे वाटायला लागले होते.)

काही दिवसानंतर मला काही कामासाठी कोल्हापूरला, बँकेच्या हेड ऑफिसमध्ये जायचे होते. मी संध्याकाळच्या बसने निघालो होतो. बसला खूप गर्दी होती. माझे आरक्षण होते. बस सुरू झाली आणि मी बघितले की रुखसानासुद्धा त्याच बसमध्ये होती. तिचे आरक्षण नव्हते. मी तिला माझ्या जागेवर बसायला सांगितले. ती अजिबात तयार नव्हती. शेवटी थोडा वेळ तिने बसावे आणि थोडा वेळ मी, असे आम्ही ठरवले, मगच ती बसायला तयार झाली. कोल्हापुरात तिच्या बऱ्याच मैत्रिणी होत्या, त्यांना भेटायला ती चालली होती.
“मित्र नाहीत का?” मी हसून विचारले. ती एकदम लाजली.
“आहेत थोडेबहुत!“ तिने हसून सांगितले.
मग अनेक विषयांवर आमच्या गप्पा झाल्या. तिने मराठी घेऊन पदवी मिळवली होती. तिचे वाचन खूप होते. स्वामी आणि श्रीमान योगी तिच्या आवडत्या कादंबऱ्या होत्या, असे ती म्हणाली. तिचे वडील भवानी नगरलाच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. घरात शिक्षणाबद्दल आस्था होती. त्यामुळे तिचे वडील तिला आणखी शिकायला सांगत होते. तिला एक मोठा भाऊ होता, पण तो काही न करता गावात उनाडक्या करत असतो, असे तिने मोठ्या नाराजीने सांगितले.
“अब्दुल टांगेवाला तुमच्या घराजवळ राहतो का?” मी मुद्दामच अब्दुलचा विषय काढला.
“हो. अगदी दोन घरे पलीकडे. तो अगदी चांगला मुलगा आहे. त्याचे आब्बू आता म्हातारे झालेत. हाच सगळ्या कुटुंबाची काळजी घेतो. तो हुशार आहे, पण त्याला शिकता आले नाही.” रुखसाना म्हणाली. चला, म्हणजे तिचे त्याच्याबद्दल मत तरी चांगले आहे!
कोल्हापूर आल्यावर आम्ही वेगवेगळ्या वाटेने निघून गेलो. मला तिचे अब्दुलबद्दलचे मत ऐकून बरे वाटले.

मी परत आल्यावर अब्दुलला माझे रुखसानाशी झालेले बोलणे सांगितले. अब्दुल खूश झाला. पण मी त्याला सांगितले की आता पुढचे पाउल घ्यायची वेळ आली आहे. अब्दुल विचारात पडला. मग थोड्या वेळाने म्हणाला. “आता मिरजेचा उरूस जवळ आला आहे. तेव्हा रुखसाना मिरजेला जाणार आहे. तेव्हा मीपण जाणार आहे. तेव्हा नक्की विचारतो.”
काही दिवस गेले. मिरजेचा उरूस संपला. पण अब्दुलचा काही पत्ता नव्हता. मी कधी रिक्षा किवा कधी दुसरा टांगा करून बँकेत जात होतो आणि परत जात होतो. एके दिवशी सकाळी मी गाडीतून उतरलो आणि अब्दुल टांगा घेऊन हजर होता.
“अरे अब्दुल, कुठे गायब झाला होतास? काय झाले? रुखसानाला भेटलास का? काय म्हणाली ती?” मी प्रश्नांचा भडिमार केला. मी टांग्यात बसलो. अब्दुलने टांगा सुरू केला. काही क्षण तो काहीच बोलला नाही. मग एक मोठा सुस्कारा टाकून म्हणाला, “काय म्हणणार सरजी? मला शिकलेला मुलगा शोहर म्हणून पाहिजे म्हणाली. मिरजेचा एक डॉक्टर मुलगा आहे. तिच्या मैत्रिणीचा भाऊ आहे म्हणे. पुढच्या महिन्यात त्यांचा निकाह होणार आहे असे सांगत होती.”
मी थोडा वेळ गप्प बसलो. मी तरी काय बोलणार? पण मला खूप वाईट वाटले.
“अरेरे ! ये अच्छा नही हुआ.” मी शेवटी एक सुस्कारा टाकत म्हणालो.
“अच्छाही हुआ सरजी! ये टांगेवालेसे शादी करती, तो क्या खूश रहती?” असे म्हणून तो गप्प बसला. मग आम्ही दोघेही बँक येईपर्यंत काहीच बोललो नाही.

मग मी बँकेत गेलो तेव्हा समजले.. दोन दिवसांनी बँकेचे ऑडिट होणार होते. आम्हाला खूप स्टेटमेंट्स तयार करावी लागणार होती. सगळेच मग कामाला लागले. मला एक-दोन दिवस गावातच राहायला लागणार होते. मी फोन करून गावच्या हॉटेलात एक रूम बुक केली आणि आम्ही सर्व कामाला लागलो. रात्री खूप उशिरापर्यंत काम करत होतो. आमचे बॉस तळपदे साहेब, आठल्ये, देसाई आणि मी. आमचे अजून खूप काम बाकी होते. पण दुसर्‍या दिवशी रविवार होता, त्यामुळे आम्हाला सलग खूप वेळ काम करता येणार होते.
दुसर्‍य दिवशी संध्याकाळी आमचे काम संपत आले असताना रोहिणी आम्हा सर्वांसाठी चहा घेऊन आली.
“आशुतोष, तुझे काम झाले की मला घरापर्यंत सोडायला येशील? मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे.” रोहिणी म्हणाली. थोडीसी हुरहुर आणि खूप अपेक्षा अशा भावना मनात घोळवत मी माझे काम संपवले.

आम्ही तिच्या घराकडे निघालो. पण रोहिणी जरा गंभीरच दिसली.
“काय गं! अशी चेहरा पाडून का आहेस? anything wrong?” मी जरा घाबरतच विचारले.
“सांगते. जाता जाता सांगते.” ती म्हणाली.
“आपण कुठेतरी बसू या का?” मी जरा कोड्यातच पडलो होतो. आपण लग्न केव्हा करायचे असे ती विचारेल, असे मला वाटत होते. पण मग ही इतकी गंभीर का झाली आहे?
“नको. मला एका महत्त्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचे आहे. पण तू माझ्यावर रागावणार नाहीस असे मला वचन दे!” रोहिणी आज अशी कोड्यात काय बोलत होती, कुणास ठाऊक?
आज तिने पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. त्याच्यावर हिरव्या आणि गुलाबी रंगाचा कशिदा केला होता. किती सुंदर दिसत होती ती! तिने लावलेल्या मंद परफ्यूमचा सुघंध खूप मादक वाटत होता.
“आपण लग्न कधी करायचे हाच विषय ना? अगं माझी नोकरी पक्की झाली की लगेच!” मी थोडे मजेने आणि थोडे गंभीरपणे सांगितले.
“होय, विषय तोच आहे, पण मला जरा तुला वेगळे सांगायचे आहे.”
“पटकन बोल. आता मला टेन्शन यायला लागले आहे.”
“माझ्या बाबानी माझे लग्न ठरवले आहे!” रोहिणीने मला सांगितले.
“अगं, पण तू बाबांना सांग आपण लग्न करणार आहोत ते! ते ओळखतात मला. मी आत्ता येऊन तुझ्या बाबांना तसे सांगू का?”
“सोपे नाही ते! माझ्या बाबांना मी विरोध करू शकत नाही. हा मुलगा त्यांच्या मित्राचा मुलगा आहे. तो अमेरिकेत इंजीनिअर आहे. त्याला तिथले नागरिकत्वपण आहे. खूप मोठा बंगला आहे त्यांचा. मी त्याला पूर्वी तीन-चारदा भेटले आहे. त्याच्या वडिलांनी फोनवरून काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांना हा प्रस्ताव दिला. मग मीसुद्धा फोन वरून त्याच्याशी बोलले. खूप स्मार्ट मुलगा आहे तो. त्याला मी नाही म्हणू शकत नाही!” रोहिणी मान खाली घालून म्हणाली.
मी झोपेत असताना कुणीतरी अंगावर बर्फाचे पाणी टाकावे असे मला झाले.
हे काय घडते आहे?
“Please रोहिणी, माझी अशी क्रूर थट्टा करू नकोस! कृपा करून सांग... हा विनोद आहे! तू माझी परीक्षा बघत आहेस का?” मी कसाबसा म्हणालो. पण एखादी सुरी माझ्या अंगात भोसकावी, तसा एक विचार माझ्या मनात शिरला. हे सत्य होते. रोहिणीला माझ्यापेक्षा श्रीमंत आणि स्मार्ट मुलाने मागणी घातली होती. आता माझी तिला गरज नव्हती.
“आशुतोष, मलाही हा निर्णय घेताना आनंद होत नाहीये. पण आपण फक्त प्रेमावर तर जगू शकत नाही ना? या लग्नामुळे माझे आयुष्यच एकदम बदलून जाणार आहे. I will be rolling in money! आपली मैत्री, आपले प्रेम मी कधी विसरू शकत नाही, पण मला practical व्हायला हवे. पुढच्या महिन्यात माझे पुण्यात लग्न आहे. शक्य झाले तर मला माफ कर!”
“म्हणजे पैशासाठी.. तू आपल्या प्रेमाचा बळी देणार तर?” मी काही तरी बोलायला हवे म्हणून म्हणालो.
रोहिणी काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यात क्षणभर संताप चमकून गेला. पण तिने स्वतःला सावरले. “प्रेम आणि लग्न या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आशुतोष. ज्याच्यावर आपण प्रेम करतो, त्याच्याशी लग्न होण्यासारखे भाग्य नाही. माझ्या नशिबात ते नाही. आणि तुझ्यासुद्धा नाही. मला विसरून जा असे म्हणणार नाही, पण तसा प्रयत्न कर.” रोहिणी म्हणाली.
“प्रेम म्हणजे नक्की काय असते रोहिणी? ज्याच्याशी तू लग्न करणार, त्याच्यावर तुझे प्रेम नाही, तरीही आपले शरीर तू त्याच्या स्वाधीन करणार आणि माझ्यावर प्रेम असून मला ठोकर मारणार? तुझ्या मते प्रेम म्हणजे नक्की काय असते?”
आम्ही आता थांबलो होतो. रस्त्यावर अगदी तुरळक रहदारी होती. मी रोहिणीचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन तिला आवेगाने विचारले. रोहिणी शांत होती. आपले हात माझ्या हातात तसेच ठेवून ती म्हणाली, “प्रेम म्हणजे.. आपण दोन वेगवेगळ्या शरीरात असलो, तरी खूप आतून आपण एक आहोत ही भावना आणि श्रद्धा. आपले एकमेकावर तसे प्रेम आहे अशी माझी श्रद्धा आहे. माझ्या होणाऱ्या नवऱ्यावर मी तसे करू शकेन की नाही, याची मला खातरी नाही…”
“आणि तरीही तू त्याच्याशी लग्न करणार? मग लग्न म्हणजे काय?” मी जरा चिडून म्हणालो.
“लग्न म्हणजे एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय. सारासार विचार करून घेतलेला. प्रेम हे आपोआप एखाद्या वेलीवर उमललेल्या सुंदर फुलासारखे सहज उमलते. लग्न हा वंशवृद्धीसाठी आणि तुम्हाला ज्या पद्धतीचे आयुष्य जगायचे आहे त्या वाटेकडे घेऊन जाणारा निर्णय. तो फक्त एक निर्णय असतो, त्यात प्रेम असेलच असे नाही. त्या मार्गावर प्रेमाचे फूल उमलेलच अशी खातरी मी आत्ता तरी देऊ शकत नाही. प्रेम हे हृदयातून उमलते, तर लग्नाचा निर्णय हा विचार करून डोक्याने घ्यायचा निर्णय असतो.” रोहिणी म्हणाली. आपले हात सोडवून घेत रोहिणी पुढे निघाली .
माझ्यावर प्रेम करणारी रोहिणी आणि हा लग्नाचा निर्णय अत्यंत कठोरपणे घेणारी रोहिणी एकच होती का? हे सगळे माझ्या समजुतीच्या बाहेरचे होते. पण एक गोष्ट मला हळूहळू जाणवत होती, ती म्हणजे हे सत्य मला स्वीकारायला हवे आहे.
आम्ही बराच वेळ काहीही न बोलता एकमेकांबरोबर चालत होतो. बोलण्यासारखे आता काहीच उरले नव्हते. मध्येच केव्हातरी रोहिणीने माझा हात हातात घेतला, हळूच आपल्या गालावर ठेवला. तिच्या डोळ्यात क्षणभर अश्रू दिसल्याचा मला भास झाला. पण बहुतेक तो माझ्या मनाचा खेळ असणार!

मी कसाबसा तिच्या घरापर्यंत तिच्याबरोबर चालत होतो. कदाचित आम्हा दोघांचे असे शेवटचे एकत्र चालणे असावे. तिच्या घरापाशी एकमेकांशी काहीही न बोलता आम्ही कितीतरी वेळ उभे होतो. मी नंतर रोहिणीची समजूत घालायचा खूप प्रयत्न केला, पण .तिचा निर्णय झाला होता.
“आपण एकमेकांचे चांगले मित्र राहायचा प्रयत्न करू. जाते मी ..” असे मला सांगून रोहिणी निघून गेली आणि मी किती वेळ तसाच सुन्न बाहेरच उभा होतो. मग जड पावलांनी कसाबसा माझ्या हॉटेलकडे निघालो.
मला एकदम अब्दुलचे वाक्य आठवले - "अच्छा ही हुआ सरजी! ये टांगेवालेसे शादी करती तो क्या खूश रहती?”
या वाक्यात फक्त 'टांगेवाला' याऐवजी 'बँकेतला कारकून' असे घातले म्हणजे झाले. त्याने जेवढ्या सहजपणे हे वाक्य मला सांगितले, तेवढ्या सहजपणे मला हे वाक्य म्हणता आले नाही. खरे तर रोहिणीचा निर्णय बरोबर होता. माझी आणि त्या अमेरिकेतील श्रीमंत मुलाची तुलना कशी व्हावी?

माझ्या जीवनात अचानक आली तशी रोहिणी अचानक निघून गेली. पण जाता जाता मला लग्न आणि प्रेम यातील फरक सांगून गेली. जीवनातील केवढा मोठा धडा मला शिकवून गेली. जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेताना भावनेचा गुंता बाजूला सारला पाहिजे. प्रेयस असणारे सगळेच श्रेयस असते असे नाही...

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

14 Nov 2020 - 12:11 pm | माम्लेदारचा पन्खा

विश्लेषण आवडलं !

Jayant Naik's picture

15 Nov 2020 - 10:28 am | Jayant Naik

आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

संजय क्षीरसागर's picture

14 Nov 2020 - 12:32 pm | संजय क्षीरसागर

मांडणीत नेहेमीप्रमाणे सराईतपणा आहेच.

अर्थात, कथा काय की आयुष्य काय प्रेम हा एक जुगार आहे. जिथे रॅशनॅनिलिटी संपते तिथून प्रेम चालू होतं. एखादी वर तुम्ही प्रेम का करता ? हे ज्या क्षणी तुम्हाला अचूकपणे सांगता येईल तेंव्हा तुमचं प्रेम संपलं म्हणून समजा ! इतकं बेतहाशा जगून अजूनही, प्रेम म्हणजे काय ते मला सांगता येत नाही, फक्त एकच गोष्ट सांगता येईल....... ती बरोबर असतांना आपल्याबरोबर कुणीही नाही असं वाटतं.

Jayant Naik's picture

15 Nov 2020 - 10:47 am | Jayant Naik

कबीर म्हणतो तसे ढाई अक्षर प्रेम के .. एक अक्षर प्रेम करणारा ..दुसरे ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती आणि अर्धे म्हणजे असे काही अनाम ..अनाकलनीय जे या दोघांमध्ये निर्माण होते ते. हे अनाम नेहमीच अनाकलनीय राहिलेले आहे. आजकालचे प्रेम हे नुसते शारीरिक ..काही सन्माननीय अपवाद असणार आणि ते कायम राहतील पण बऱ्याच जणांना २ अक्षरे ..म्हणजे दोन शरीरे मिळतात पण ते अर्धे अक्षर असाध्य राहते. काही दिवसा पूर्वी मी एक तिसरी मिती नावाची कथा लिहिली होती . ती याच विषयावर होती. तो प्रसिद्ध शेर आठवतो ...." ये बात नही है कि इस जहा मे प्यार नही ... वो वहासे नही मिलता जहासे उम्मीद होती है.."

प्रेयस असणारे सगळेच श्रेयस असते असे नाही...

. मस्त वाक्य

Jayant Naik's picture

15 Nov 2020 - 10:52 am | Jayant Naik

एक कवियत्री माझ्या या कथेबद्दल म्हणाली. " लग्न आणि प्रेम हे एकच आहे असे बरेच जण गृहीत धरतात. बऱ्याच वेळेला ते तसे नसते हा विचार तू इथे फार प्रभावी पणे मांडला आहेस. " आजच्या या प्रत्येक बाबतीत देवाण घेवाण असे समजणाऱ्या जगात" प्रेयस असणारे सगळेच श्रेयस असते असे नाही..." हे ब्रीद वाक्यच झाले आहे.

Jayant Naik's picture

17 Nov 2020 - 3:35 pm | Jayant Naik

धन्यवाद आपले

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 5:00 pm | टर्मीनेटर

@Jayant Naik

'प्रेम म्हणजे नक्की काय असते?'

ही कथा आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

Jayant Naik's picture

17 Nov 2020 - 3:35 pm | Jayant Naik

अती उत्तम प्रतिसादाबद्दल आभार

सूक्ष्मजीव's picture

16 Nov 2020 - 3:40 pm | सूक्ष्मजीव

छान छोटेखानी कथा.
आवडली.
संजयजी आणि कवयित्री यांच्या मताशी सहमत.

लग्नात प्रेमाचा अट्टाहासच ते बिघडवायला कारणीभूत ठरतो की काय असेही एक निरीक्षण व्यवसायामुळे (समुपदेशक) निर्माण होत आहे.

Jayant Naik's picture

17 Nov 2020 - 3:34 pm | Jayant Naik

आपल्या प्रतिसादाबद्दल आभार .

केदार पाटणकर's picture

19 Nov 2020 - 1:11 pm | केदार पाटणकर

माहीत असलेल्या कथेची व शेवटाची नव्याने उत्तम मांडणी.

Jayant Naik's picture

20 Nov 2020 - 3:33 pm | Jayant Naik

माहित असलेल्या कथेची म्हणजे ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Nov 2020 - 4:26 pm | ज्ञानोबाचे पैजार

कथेचा शेवट टिपिकल न झाल्याने जास्त आवडली,

जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेताना भावनेचा गुंता बाजूला सारला पाहिजे.

खरेतर त्या आधी भावनेचा गुंता तयार करुच नये हे बर्‍याच वेळा समजत नाही. अर्थात दोनचार लाथाखाल्ल्याशिवाय असले शहाणपण येत नाही हे देखिल तितकेच खरे.

पैजारबुवा,

Jayant Naik's picture

20 Nov 2020 - 3:36 pm | Jayant Naik

आधी गुंतू नये मग कुंथत बसू नये ..अशी एक म्हण मराठीत आहे ...

चौथा कोनाडा's picture

19 Nov 2020 - 5:43 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुप सुंदर ! साधीसहज पण सुंदर लेखनशैली !
जबरद्स्त ओघ आहे. वाचायला सुरुवात केली ते शेवटालाच येऊन थांबलो !

👌
जयंत नाईक

Jayant Naik's picture

20 Nov 2020 - 3:36 pm | Jayant Naik

खूप बरे वाटले आपला प्रतिसाद वाचून

बबन ताम्बे's picture

19 Nov 2020 - 5:47 pm | बबन ताम्बे

भावना आणि वास्तव सुरेख समजावून सांगितलेय तुमच्या कथेत.

Jayant Naik's picture

20 Nov 2020 - 3:38 pm | Jayant Naik

भावना आणि वास्तव यांचा लढा नेहमीच असतो. तेच दाखवायचा प्रयत्न आहे.

प्राची अश्विनी's picture

19 Nov 2020 - 5:53 pm | प्राची अश्विनी

कथा आवडली. श्रेयस आणि प्रेयसचा विचार चांगला आहे.

Jayant Naik's picture

20 Nov 2020 - 3:40 pm | Jayant Naik

या कथेला एक थोडीशी वेगळी कलाटणी अगदी शेवटी मिळाली ..माझ्या हि नकळत ..पण मग वाटले जे त्या टांगेवाल्याला समजले ते कथा नायकाला सुद्धा कळायला हरकत नाही.

गामा पैलवान's picture

20 Nov 2020 - 9:09 pm | गामा पैलवान

Jayant Naik,

सुंदर कथा आहे. शेवट सुखान्त केलेला आवडला. जी मुलगी आपली नव्हती ती स्वत:हून सोडून गेली हे खूप चांगल झालं.

रोहिणीने आशुतोषला सोडून दुसऱ्याशी लग्न करायची जबाबदारी स्वत:वर घेतली आहे. मुली बऱ्याचदा अशा वेळेस बापाच्या इच्छेच्या किंवा इतर कसल्यातरी पदराआड दडतात. त्यामानाने रोहिणी धीट आहे. हा धीटपणा आवडला.

आ.न.,
-गा.पै.

अगदी बरोबर गामा . त्या वेळेला जरी वाईट वाटले तरी शेवटी तेच योग्य झाले असे वाटते. आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

टवाळ कार्टा's picture

21 Nov 2020 - 4:50 pm | टवाळ कार्टा

कथा सरळधोपट वाटली....याच हिशोबाने मुलाने मुलीशी संबंध तोडले तर त्यासाठी वेगळा तराजू वापरला जातो

Jayant Naik's picture

22 Nov 2020 - 9:38 am | Jayant Naik

नकार हा फक्त मुलाने द्यायचा अशी काही मानसिकता अजूनही नक्की कुठे तरी शिल्लक आहे.

मित्रहो's picture

22 Nov 2020 - 11:25 am | मित्रहो

कथा आवडली. दोन्ही मुलींंनी केले ते योग्यच असे म्हणावे लागेल. उद्या जर बँकेतला कारकून बँकेचा चेअरमन झाला तर....
प्रेम म्हणजे नक्की काय असते याचे उत्तर मिळणे खरच कठीण आहे. उद्या जर लग्न झालेल्या व्यक्तीने लग्नाबाहेर प्रेम केले तर त्याला व्यभिचार म्हणायचे की प्रेम.
आवडलेल्या मुलाशी किंवा मुलीशी बऱ्याचदा लग्न होत नाही तरी लग्न म्हणजे विचारपूर्वक केलेली मोठी तडजोड आहे, व्यवहार आहे हे पचायला जड जाते. हे तसे नाही असेही म्हणता येत नाही.

गोंधळी's picture

22 Nov 2020 - 2:16 pm | गोंधळी

लग्नामुळे माझे आयुष्यच एकदम बदलून जाणार आहे. I will be rolling in money!
रोहिणी व रुखसाना अगदी practical विचार करणार्या वाट्ल्या. हल्लीच्या पीढीतील मुलींसारख्या.

प्रेम म्हणजे चांगले मित्र होणे ?

Jayant Naik's picture

25 Nov 2020 - 3:23 pm | Jayant Naik

आज काल असेच आहे.

मुक्त विहारि's picture

24 Nov 2020 - 10:01 pm | मुक्त विहारि

शेवटचे वाक्य आवडले...

Jayant Naik's picture

25 Nov 2020 - 3:23 pm | Jayant Naik

आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

सिरुसेरि's picture

25 Nov 2020 - 6:59 pm | सिरुसेरि

कथा वाचुन मिरज , सांगली , भिलवडी , किर्लोस्करवाडी , ताकारी , भवानी नगर , कराड , सातारा हा रेल्वे रूट डोळ्यासमोर आला . कथेतल्या आशुतोष प्रमाणे या रुटवर नियमितपणे जाणे येणे असलेल्यांसाठी हि मधली स्थानके म्हणजे रोजचीच नामावळी असते .

वडील रेलवेत असल्याने नी ३ वर्षे भवानीनगर च्या शाळेत होतो. तेव्हा तरी अगदी छोटेसे आणि टुमदार गाव होते ते. बालपणीच्या खूप आठवणी त्या गावाशी निगडीत आहेत. मग असेच अचानक कधीतरी ते गाव माझ्या कथेत अचानकपणे डोकावते. आता ते गाव कसे आहे कुणास ठाऊक ?

सौंदाळा's picture

25 Nov 2020 - 10:22 pm | सौंदाळा

सुंदर आहे कथा.