मज सुचले गं
सुचले मंजुळ गाणे
हिंडता डोंगरापाठी
सापडले कोरीव लेणे
विसरल्या उन्हातली वाटा
विसरले पथातील काटे
ही गुहा भयावह आता
स्वप्नासम सुंदर वाटे
रसभाव भराला आले
काव्याहून लोभसवाणे
बोलाविण घुमती वाटे
तालात नाचती प्रीती
शब्दाविण होती गीते
बेभान भावना गाती
हा लाभ अचानक झाला
हे कुण्या प्रभुचे देणे
आकृती मनोहर इथल्या
मी एक त्यातली झाले
लावण्य बरसते येथे
सर्वात तयात मी न्हाले
सौंदर्य जीवना आले
जन्माचे झाले सोने
गीत:शांताबाई शेळके
संगीत:दत्ता डावजेकर
स्वर:आशा भोसले
#################
शब्दापलीकडे जाऊन काहीतरी सुचवणारं. सांगता न येईल असं काही सांगायचा प्रयत्न करणारं असं काही हे गाणं आहे अस मला वाटतं. बरेचदा असं काही सांगताना शब्दाचे नाद आणि त्यातून येणारे भाव, मनातल्या सदर्भांना मोडून नव्या मांडणीत आणणारे शब्द.. की ज्यात जुने मनातले संदर्भ आणि नवी मांडणी/रचना याने नव्हेच रसायन घडते, अस काहीतरी असतं. पण त्यामुळे कविता दुर्बीध होण्याचा धोका असतो. शांताबाईंच्या समर्थ लेखणीला ती अडचण नाही.
डोंगरात भटकताना अचानक एखादी लेण्याची गुहा दिसली तर काय वाटतं याचा अनुभव असल्याने कदाचित ही कविता भिडली मला. पायपीट, ऊन, रान यातून फिरताना आनंद असतोच. पण तरी अचानक त्या निसर्गाचाच भाग असल्यासारखं पण तरी मानवनिर्मित स्थान ध्यानीमनी नसताना समोर येतं, तिथे विसावा, सावली, सौंदर्यआस्वाद अस सगळंच.. एकूण अनुभव overwhelming म्हणतात तसा असतो..
एखादी खास कलाकृती घडते. ती अक्षरशः घडतेच. कवि सतत काही न काही खरडत असतोच. त्याच्या प्रतिभेच्या दर्जानुसार एका ठराविक पातळीचं लिखाण होत राहतं. पण कधीतरी अचानक, ध्यानीमनी नसताना त्या ठराविक पातळीच्या वरचं काहीतरी 'सुचतं'. आणि इतर रसिकांइतकाच तो कवि देखील भारावलेला राहतो. 'हे माझं नव्हे. हे कुठूनतरी माझ्या माध्यमातून आलं आहे. इतकंच.' अस त्याला वाटत राहतं. हेच गायकाच्या बाबतीत घडतं. मैफिलीत गाताना अचानक एखादी स्वरावली 'अवतरते'. खेळाडू कधी तसा दैवी खेळतो. 'झोन मध्ये' असल्यागत. कधी दोन माणसाचं मैत्र म्हणा ट्युनिंग म्हणा (वेवलेंग्थ (रावसाहेब:पुलं))असं सुंदर होऊन जातं. कवितेत तो भाव मांडला आहे असं मला वाटतं. बाकी शब्दांचे अर्थ मी सांगायला हवेत अस अजिबातच नाही.
प्रामाणिक कलावंत, खेळाडू, माणूस हे ओळखून मान्य करतो. यात माझं श्रेय फार थोडं आहे. हे माझं नाही... अभोगी.. इथे आनंद असेल, रसास्वाद असेल पण हे माझं ही भावना नसेल. म्हणून अभोगी. हा शब्दापलीकडे जाणारा अर्थ असं मला वाटतं
गाण्याला सुरवात होताना धृपद वाद्यमेळाशिवाय ज्या तर्हेने गायलाय त्यात हे 'सुचणं' स्पष्ट दिसतं. आणि नन्तर गाणं सुरू होतं. कुठल्याही झटापटीविना अत्यन्त सहजपणे सूर आणि शब्द यांचा सहप्रवास अखेरपर्यंत सुरू राहतो. कदाचित या परस्परपूरक आणि अतिव सुंदर असल्यानेच सूर आणि शब्द एकाच वेळी आणि पहिल्यांदा ऐकतानाच मला समजले, भिडले. एरवी मी सुरात वाहून जाणारा प्राणी. 20एकदा ऐकून सूर उपभोगून झाले की मग 'आता शब्द ऐकू' म्हणत जाणीवपूर्वक शब्द ऐकणारा. अनेकदा शब्द लिहून, कवितेप्रमाणे वाचून एन्जॉय केलेत, जे गाणं ऐकताना जमायचं नाही. इथे दोनही एकाचवेळी भिडलं मनाला.
गाण्यासाठी राग निवडला तोही अभोगी. नाव ऐकून वाटायचं की हा निरिच्छ, संन्यासी राग असायला हवा खरतर पण नाही, हा तर आनंदी, हरखलेला राग वाटतो ऐकताना. ते अभोगी हे नाव सार्थ का? ते हे गाणं ऐकताना समजलं. धन्य ते दत्ता डावजेकर, शांताबाई आणि आशा..
-अनुप
प्रतिक्रिया
15 Sep 2020 - 4:20 pm | कानडाऊ योगेशु
गाण्याही लिन्क देता येईल का?
15 Sep 2020 - 4:32 pm | मराठी_माणूस
https://www.aathavanitli-gani.com/Song/Maj_Suchale_Ga_Manjul
15 Sep 2020 - 7:30 pm | Gk
https://youtu.be/6Agz5S4N82w
मज सुचले ग
हे ऐकताना हे जुने हिंदी गाणे आठवले , मेघवा गगन बीच
नाचणारा पृथ्वीराज कपूर आहे आणि नाचणारी हेलन
https://youtu.be/qOG3YE-zTuc
त्याच रागात आहे
15 Sep 2020 - 11:30 pm | अन्या बुद्धे
https://youtu.be/6Agz5S4N82w
15 Sep 2020 - 5:03 pm | गणेशा
खुप छान, मला आधी वाटले तुम्हीच लिहिले आहे हे गाणे..
आणि मग त्या अनुषंगाने भटकंतीची चित्रेच समोर येत राहिली..
मस्त
15 Sep 2020 - 11:31 pm | अन्या बुद्धे
:)
हे अस सुंदर मी लिहिलय
किती मस्त कल्पनाय.. पण कल्पनाच नुसती..
15 Sep 2020 - 7:23 pm | Gk
अभोगी सुंदर राग आहे
स्केल बदलला की तो कलावतीसारखा वाटतो , रादर स्केल बदललेला कलावती म्हणजे अभोगी
15 Sep 2020 - 11:31 pm | अन्या बुद्धे
Yup..