भावनांचे नयनदूत

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amभावनांचे नयनदूत

'अश्रू आणि हास्य हे माणसांना जोडणारे केवढे बळकट दुवे आहेत' हे पु.ल. देशपांडे यांचे वाक्य एकदा वाचले होते. ते वाचताक्षणी स्तिमित झालो आणि मग ते वहीत लिहून ठेवले होते. एकदा असेच ती वही चाळताना या वाक्यापाशी आलो आणि थबकलो. ते वाक्य पुन्हा एकदा डोळे स्थिरावून वाचले आणि आता ते मनाला अधिकच भिडले - नव्हे, मनात खोलवर घुसले. पूर्णपणे अपरिचित, भाषिक व सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न असलेली माणसेदेखील या दोन नैसर्गिक गोष्टींमुळे नक्कीच एकत्र येतात. अशा प्रसंगी ही भावनिक समानता समूहास जोडलेपण देते. या मंथनातून एक विचार स्फुरला. मग डोळ्यातील अश्रुनिर्मितीवर जरा बारकाईने विचार करता करता अश्रूंनाच या लेखाचा विषय करून टाकला!

आपल्या बहुमूल्य अशा डोळ्यांमधून पाझरणारे अश्रू ही आपल्याला निसर्गाने दिलेली एक विलक्षण देणगी आहे. त्यांचा कायमस्वरूपी सूक्ष्म थर डोळ्यांना नेहमी ओलसर ठेवतो आणि त्यांचे रक्षणही करतो. धूर किंवा धूळ डोळ्यात जाण्याचे प्रसंग तर बऱ्यापैकी घडणारे. अशा वेळेस डोळ्यात जमा होणारे पाणी संरक्षक असते. जेव्हा आपल्या मनातील आनंद अथवा दुःख या दोन्ही भावना उचंबळून येतात, तेव्हा तर अश्रू अगदी धाररूपात वाहू लागतात. प्रत्येक मनुष्य आयुष्यात अनेकदा प्रसंगपरत्वे अश्रू ढाळतो. अत्यानंद असो वा अतीव दुःख, या दोन्ही प्रसंगी अश्रूंची निर्मिती खूप वाढते, तेव्हा आपल्या मनातील भावनांचे प्रतिनिधी म्हणून ते डोळ्यावाटे सहज बाहेर पडतात. अश्रूंची निर्मिती, त्यांचे प्रकार आणि त्यांचे कार्य हा एक रंजक अभ्यास आहे. सामान्य माणसासाठी तो कुतूहलजनक आहे. या लेखाद्वारे आपल्या अश्रूंचे अंतरंग उलगडण्याचा हा एक प्रयत्न.

लेखाची विभागणी अशी करतो :
१. अश्रूंची निर्मिती आणि प्रवाह
२. अश्रूंचे घटक
३. त्यांचे प्रकार आणि
४. त्यांचे कार्य

अश्रूंची निर्मिती आणि प्रवाह
1
आपल्या प्रत्येक डोळ्यात एक स्वतंत्र अश्रुग्रंथी असते. ती बदामाच्या आकाराची असून डोळ्याच्या वरील कोपर्‍यात तिरकी वसलेली असते. तिच्या मुख्य पेशींपासून अश्रुबिंदू तयार होतात. तिथून ते डोळ्यांच्या पृष्ठभागावर वाहतात. पुढे ते एका अश्रुपिशवीत जमा होतात.
(चित्र पाहा).

चित्रात दाखवल्याप्रमाणे ते पुढे डोळा व नाकपुडी यांना जोडणार्‍या नलिकेत शिरतात. अखेर ते नाकपुडीमध्ये उतरतात.

अश्रुग्रंथीमध्ये मुख्य पेशींव्यतिरिक्त संरक्षक कार्य करणाऱ्या पेशीदेखील असतात. या पेशी इम्युनोग्लोब्युलिन्स ही संरक्षक प्रथिने तयार करतात. डोळा हे शरीराचे एक प्रवेशद्वार असून त्यातून सूक्ष्मजंतूंना आत शिरण्यास वाव असतो. इथे हजर असणाऱ्या या प्रथिनांमुळे जंतूंचा इथल्या इथेच प्रतिकार करता येतो. या ग्रंथीला सामान्य आणि विशिष्ट चेतातंतूंद्वारे चेतना मिळत राहते. त्यानुसार अश्रूंच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवले जाते.


अश्रूंचे घटक
यांचा मुख्य घटक अर्थातच पाणी आहे. याव्यतिरिक्त त्यांच्यामध्ये विविध क्षार (मुख्यत्वे सोडियम), संरक्षक प्रथिने, काही एन्झाइम्स, ग्लुकोज व मेद पदार्थ असतात. अश्रूंचे सखोल विश्लेषण केल्यावर डोळ्यांमध्ये त्यांचे एकूण तीन थर वसलेले दिसून येतात -

१. अस्तराचा थर - डोळ्यातील पारदर्शक पडदा म्हणजे कॉर्निआ. त्याच्या भोवती हा थर पसरतो आणि त्यामुळे पडदा नेहमी ओलसर राहतो.
२. जलरूपी थर - यामुळे अश्रू संपूर्ण डोळाभर पसरतात.
३. मेदाचा थर - वरील थराच्या बाहेरून याचे वेष्टण असते. त्यामुळे अश्रू कप्पाबंद राहतात आणि सतत गालावर ओघळत नाहीत.

अश्रूंचे प्रकार आणि कार्य
अश्रू हे अश्रूच आहेत, त्यात प्रकार ते कसले? हा प्रश्न स्वाभाविकपणे मनात येईल. परंतु अश्रुनिर्मितीच्या विविध कारणांनुसार त्यांचे तीन प्रकार दिसून येतात. त्यानुसार त्यांच्या घटकरचनेत थोडाफार फरकही पडतो. आता पाहू या हे तीन प्रकारचे अश्रू -

१. मूलभूत - हे डोळ्यात नित्य स्रवत राहतात. त्यांच्यामुळेच डोळा ओलसर राहतो आणि त्याचे पोषणही होते. एक प्रकारे ते डोळ्यांचे वंगण असतात आणि त्यामुळे डोळ्यात धूळ व घाण साठत नाही.

2

२. प्रतिक्षिप्त - जेव्हा काही कारणाने उग्र वासाच्या पदार्थांशी डोळ्यांचा संपर्क येतो, तेव्हा संबंधित रसायनांमुळे डोळे चुरचुरतात. अशा वेळेस अश्रूंचे प्रमाण अर्थातच वाढते आणि त्यामुळे डोळ्यात वायुरूपात शिरलेली रसायने धुतली जातात. नेहमीच्या व्यवहारातील असे उग्र पदार्थ म्हणजे चिरलेला कांदा, सुगंधी द्रव्ये, मिरपुडीचा फवारा आणि अश्रुधूर.

कांदा चिरणे ही स्वयंपाकातील नित्याची घटना असल्याने त्यातील विज्ञान समजून घेऊ. कांद्यामध्ये एक गंधकयुक्त रसायन असते. कांदा चिरल्यामुळे त्याच्यात काही प्रक्रिया होऊन त्या रसायनाचे वाफेत रूपांतर होते. ही वाफ हवेतून आपल्या डोळ्यात घुसते आणि आपल्याला झोंबते. त्यामुळे तिथले चेतातंतू उत्तेजित होऊन अश्रुग्रंथीला संदेश पाठवतात. परिणामी अश्रूंचे प्रमाण वाढते आणि त्याद्वारा डोळ्यात शिरलेले ते रसायन धुतले जाते.

आणखी एक रोचक मुद्दा - आपण जेव्हा जोरदार जांभई देतो, शिंकतो अथवा उलटी करतो, त्या प्रसंगीही अश्रूंचे प्रमाण वाढते. या क्रियांदरम्यान काही स्नायू आकुंचन पावल्याने ग्रंथींवर दाब पडतो.

३. भावनिक : भावनातिरेकाने जेव्हा डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, त्यालाच आपण ‘रडणे’ म्हणतो. या प्रकारची अश्रुनिर्मिती खालील प्रसंगी होऊ शकते -
• प्रचंड भावनिक ताण
• अत्यानंद / अत्युत्कृष्ट विनोदावरील खळखळून हसणे
• अतीव दुःख, शारीरिक व मानसिक वेदना
• नैराश्य किंवा पश्चात्ताप

3

टोकाचा आनंद अथवा टोकाचे दुःख या दोन्ही प्रकारच्या भावनांमध्ये हा अनुभव आपल्याला येत असतो. अशा प्रसंगी मेंदूतील ‘लिंबिक यंत्रणा’ कार्यान्वित होते. त्यातून पुढे काही हार्मोन्स व प्रथिने अधिक स्रवतात आणि ती या अश्रूंद्वारे बाहेर पडतात. त्यामध्ये पिट्युटरी ग्रंथीतली प्रोलॅक्टीन व ACTH यांचा समावेश आहे, त्याचबरोबर ‘एनकेफालीन’ हे एक वेदनाशामकही स्रवले जाते. वर उल्लेख केलेल्या सर्व प्रसंगी या प्रकारची अश्रुनिर्मिती ही शरीरासाठी उपयुक्त ठरते. किंबहुना, ती एक वरदान आहे. या प्रसंगांमध्ये जी तणावकालीन रसायने निर्माण होतात, त्यांचा निचरा या अश्रूंद्वारे होतो.

आता आपण वेदनादायक प्रसंगातील भावनिक ताणतणाव आणि शरीरातील रासायनिक घडामोडी समजून घेऊ. एखाद्या घटनेने आपल्याला प्रचंड धक्का बसतो. त्यातून मेंदूतील तणावकालीन यंत्रणा कार्यान्वित होते. यात मुख्यतः हार्मोन्सचा संबंध असतो. प्रथम हायपोथॅलॅमस ही हार्मोन्सची सर्वोच्च नियंत्रण ग्रंथी चेतवली जाते. तिच्यातून पुढे पिच्युटरी ग्रंथीला संदेश जातो. त्यानुसार ती ग्रंथी ACTH हे हार्मोन सोडते. हे रक्तप्रवाहातून आपल्या मूत्रपिंडांच्यावर वसलेल्या adrenal ग्रंथींमध्ये पोहोचते. आता त्या चेतवल्या जाऊन कॉर्टिसॉल हे महत्त्वाचे हॉर्मोन तयार करतात आणि रक्तात सोडतात. हे हॉर्मोन आपल्याला तणावाचा सामना करण्याचे बळ देते. ते रक्ताद्वारे शरीराच्या सर्वच स्रावांमध्ये उतरते. अर्थातच अश्रूंमध्येही त्याचे प्रमाण वाढते. जरी हे हॉर्मोन आपल्याला अशा प्रसंगी लढण्याचे बळ देत असले, तरी त्याची वाढलेली पातळी दीर्घकाळ राहणे चांगले नसते. म्हणूनच निसर्गाने कशी सुरक्षायंत्रणा केली आहे ते पाहू -

अतीव वेदना अथवा दुःख >> भावनिक आंदोलन आणि वाढलेली हॉर्मोन्स >> अश्रुनिर्मिती व रडणे >> वाढलेल्या हॉर्मोन्सचे त्यातून उत्सर्जन.

4

अशा प्रसंगी वरील हॉर्मोन्सच्या जोडीने काही क्षारदेखील अधिक प्रमाणात उत्सर्जित होतात. त्यांचा आणि भावनांचा संदर्भ या विषयावर संशोधन चालू आहे.
म्हणजेच टोकाला पोहोचलेल्या भावनेतून रडू येणे ही एक प्रकारे शरीराची सुरक्षा झडपेसारखी यंत्रणा आहे. अशा प्रसंगी जर का आपण नैसर्गिक रडणे मुद्दाम दाबले, तर ही वाढलेली हॉर्मोन्स शरीरातच साठून राहतात. म्हणून अशा प्रसंगी मुक्तपणे रडून घेणे हा भावनांचा निचरा होण्याचा उत्तम मार्ग असतो.

यावरून प्रसिद्ध इंग्लिश कवी लॉर्ड आल्फ्रेड टेनिसन यांच्या एका समर्पक कवितेची आठवण होते. त्यातल्या काही ओळी अशा -

'Home they brought her warrior dead
She nor swoon’d nor utter’d cry
All her maidens, watching, said,
She must weep or she will die.'

वरील शेवटच्या ओळीतून त्या प्रसंगातील रडण्याचे महत्त्व अधोरेखित होते.

आता मनापासून आलेले रडू आणि केवळ दाखवण्यासाठी उसने आणलेले अश्रू यांची तुलना करण्याचा मोह होतोय. पहिल्या प्रकारात सर्व घटना शरीरधर्माप्रमाणे होतात आणि त्याचा संबंधित व्यक्तीला स्वास्थ्यासाठी उपयोगी होतो. मात्र मनापासून दुःख झालेले नसता केवळ जगाला दाखवण्यासाठी जे अश्रू बळेच आणले जातात, त्यांचा उपयोग फक्त देखाव्यापुरताच असतो! अशा वरपांगी दुःख प्रदर्शित करण्यावरूनच ‘नक्राश्रू ढाळणे’ हा वाक्प्रचार आलेला आहे. (नक्र म्हणजे मगर. मगर तिचे भक्ष्य खाताना तोंडाने खूप हवा बाहेर सोडते. परिणामी तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात. हे तिचे ‘रडणे’ बिलकुल नसते. मिटक्या मारीत भक्ष्य खायचे असल्यावर रडायचे काय कारण आहे!)

सारांश, रडून दुःख हलके होते. मानसशास्त्रातदेखील या संकल्पनेचा वापर केलेला आहे. अनेक जणांच्या मनावर पूर्वायुष्यातील काही वेदनादायक घटनांचा ‘बोजा’ राहिलेला असतो. त्यामुळे त्यांच्या वागण्यात काही अनिष्ट बदल झालेले असतात. अशा लोकांसाठी मानसिक समुपदेशनाचा एक विशेष प्रकार असतो. या बैठकीत समुपदेशक संबंधित व्यक्तीला या घटनेबद्दल मुद्दाम बोलते करतो व अधिकाधिक प्रश्न विचारत राहतो. जशी ती व्यक्ती बोलून मोकळी होत जाते, तसे तिला रडू येते. या रडण्याला समुपदेशक आणखी उत्तेजन देतो. साचून राहिलेल्या वेदनांचा अशा प्रकारे या रडण्याद्वारे एक प्रकारे निचरा होतो.

डोळ्यातील मूलभूत स्वरूपाचे अश्रू आतील ओलसरपणा राखण्यासाठी महत्त्वाचे आहेत, हे आपण वर पाहिले. हा ओलसरपणा जर काही कारणाने कमी पडला, तर डोळे कोरडे पडू शकतात. गेल्या तीन दशकांत आपल्या जीवनशैलीतील एक महत्त्वाचा घटक यासाठी कारणीभूत झालेला आहे, तो म्हणजे संगणकादी उपकरणांचा वाढता वापर. या महत्त्वाच्या विषयाबद्दल दोन शब्द.

डोळ्यातील ओलसरपणा टिकून राहण्यासाठी अश्रुंच्या उत्पादनाइतकेच डोळ्यांचे ठरावीक वेळाने मिचकावणेदेखील महत्त्वाचे असते. जेव्हा आपली नजर संगणकाच्या पडद्यावर बरेच तास खिळून राहते, तेव्हा या प्रक्रियेत बिघाड होतो. तिथे मुख्यत्वे दोन घटना घडतात -
१. डोळे कमी वेळा आणि अर्धवट मिचकावल्याने डोळ्यातील अश्रुथराचे बाष्पीभवन झपाट्याने होते आणि
२. अश्रूंचा थर संपूर्ण डोळाभर सम प्रमाणात पसरला जात नाही.

यातूनच डोळे कोरडे पडण्याची समस्या उद्भवते व डोळ्यांना ताणदेखील जाणवत राहतो. या महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण सर्वांनीच जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. त्या दृष्टीने जे सोपे प्रतिबंधात्मक उपाय आहेत, ते बहुतेकांना परिचित असतील.

निसर्गनिर्मित मानवी शरीराची रचना अगदी शिस्तबद्ध आणि स्वसंरक्षक आहे. शरीरात शिरण्याच्या प्रत्येक मार्गामध्ये कुठलातरी स्राव पाझरतो. अशा विविध स्रावांपैकी डोळ्यातील अश्रुबिंदू हा एक. त्यांची वंगणापासून ते उत्सर्जनापर्यंतची कार्ये आपण वर पाहिली. तसेच भावनिक प्रसंगामधील त्यांचे विशेष योगदानही समजून घेतले. सुखद आणि दुःखद अशा दोन्ही प्रसंगी आपण अश्रुधारांना वाट मोकळी करून देत असतो. त्यापैकी आनंदाश्रू वाहण्याचे प्रसंग आपणा सर्वांच्या आयुष्यात येत राहोत, या सदिच्छेसह..

शुभ दीपावली !

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

14 Nov 2020 - 2:05 pm | तुषार काळभोर

अश्रूंमागे एवढा भूगोल असेल असा विचार कधी केला नव्हता.
डॉक्टर साहेब, धन्यवाद. नेहमीप्रमाणे सुलभ लेख.
शुभ दीपावली.

अतिशय माहितीपूर्ण आणि उपयोगी लेख.
माझे दोन प्रश्न:
१.

डोळे कोरडे पडण्याची समस्या उद्भवते ... . त्या दृष्टीने जे सोपे प्रतिबंधात्मक उपाय आहेत, ते बहुतेकांना परिचित असतील.

हे प्रतिबंधात्मक उपाय कोणकोणते आहेत ? मला हा त्रास काही वर्षांपासून होत असल्याने बरीच बंधने पडलेली आहेत उदा. मिपावर येणे पण फार कमी करावे लागणे, अतिशय आवड असूनही वाचन/टीव्ही जवळजवळ बंद करावे लागणे, संध्याकाळी सात नंतर दिव्यांचा प्रकाश सहन होत नसल्यामुळे, विशेषतः कुणाकडे गेलेलो असताना- पंचाईत होणे वगैरे... (माझे वय- सध्या ७० वे चालू आहे) कृपया सर्व उपाय विस्ताराने लिहावेत ही विनंती.
२. हसणे आणि रडणे यात एक महात्वाचा फरक निरिक्षणाने माझ्या लक्षात आला आहे, तो म्हणजे या दोन्ही प्रसंगी अगदी उलट पद्धतीने होणारी श्वसन क्रिया:
हसणे: अल्पकालीन झटक्या-झटक्याने श्वास बाहेर फेकणे आणि मग एक दीर्घ श्वास आत घेणे. बहुतेकदा या दोन्ही क्रिया आवाजयुक्त असतात. त्यालाच आपण हास्यध्वनि म्हणतो.
रडणे: सावकाशीने जास्त वेळपर्यंत श्वास सोडत रुदन करणे आणि छोटे छोटे श्वास भरत 'हुंदके' देणे.
या दोन्ही टोकांच्या भावनांच्या मधल्या पट्ट्यात अन्य सर्व भावना येत असाव्यात. आनंदाश्रू आणि दुखा:श्रू यांचा या श्वसन-प्रक्रियेशी कार्यकारण भाव काय आहे ?

कुमार१'s picture

15 Nov 2020 - 9:25 am | कुमार१

पैलवान व चित्रगुप्त
धन्यवाद.


.हे प्रतिबंधात्मक उपाय कोणकोणते आहेत ?

>>>

1. संगणकावरील काम बराच काळ चालणार असल्यास दर तासाने लांब बघत २-३ मिनिटे डोळे मिचकवयाचे.
2. दर २० मिनिटांनी २० मीटर्स लांब अंतरावरील वस्तूकडे २० सेकंद बघायचे.
3. पडद्यावर जो मजकूर आपण वाचत असू तो थेट नजरेसमोर न ठेवता नजरेच्या खालच्या टप्प्यात ठेवायचा.

…. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सावकाश देईन. गडबडीत आहे.

सोत्रि's picture

15 Nov 2020 - 9:47 am | सोत्रि

दुसर्‍या उत्तराच्या प्रतिक्षेत...

- (अभ्यासू) सोकाजी

सुखी's picture

15 Nov 2020 - 9:45 am | सुखी

माहितीपूर्ण लेख

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 1:12 pm | टर्मीनेटर

@कुमार१

'भावनांचे नयनदूत '

हा लेख आवडला  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

कुमार१'s picture

15 Nov 2020 - 1:09 pm | कुमार१

कार्ड काय ते समजले नाही .
सांगावे.

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !

कुमार१'s picture

15 Nov 2020 - 1:15 pm | कुमार१

फार सुंदर करामत !
आता जमली
धन्यवाद !

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 1:24 pm | टर्मीनेटर

😀

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 1:25 pm | टर्मीनेटर

🙏

कुमार१'s picture

15 Nov 2020 - 2:45 pm | कुमार१

चित्रगुप्त,

रडणे आणि श्वसनक्रिया

१. रडण्यामुळे श्वसनगती मंदावते आणि तिच्यावर नियंत्रण ठेवले जाते.

२. रडण्यादरम्यान गळा रुंदावतो >> अधिक हवा आत शिरते.

३. एकंदरीत ही क्रिया भावनिक मज्जासंस्थेच्या दोन विभागांच्या नियंत्रणात असते. त्यांच्या समतोलातून शरीर- स्थिरता आणि शांतता प्रस्थापित होते.

कुमार१'s picture

15 Nov 2020 - 2:48 pm | कुमार१

चित्रगुप्त

हसणे आणि श्वसनक्रिया

>>

१. या क्रियेत आत शिरलेल्या ऑक्सिजनचे वितरण आणि पेशींत शिरणे वाढते.

२. जोरात हसण्याने एकदम श्वासनलिकांवर दाब पडतो.

३. पोटातील दाब वाढून श्वासपटलाची हालचाल होते आणि तो दाब नियंत्रित होतो. छातीवर अतिरिक्त दाब टाळला जातो.

गोंधळी's picture

15 Nov 2020 - 4:04 pm | गोंधळी

चित्रात दाखवल्याप्रमाणे ते पुढे डोळा व नाकपुडी यांना जोडणार्‍या नलिकेत शिरतात. अखेर ते नाकपुडीमध्ये उतरतात.
यामुळेच खुप रडायला आल्यावर नाकातुन सर्दीही बाहेर येत असावी.
a

सुधीर कांदळकर's picture

15 Nov 2020 - 4:32 pm | सुधीर कांदळकर

नेहमीप्रमाणे, नीटनेटके, मुद्देसूद आणि नेमके लेखन. छानच. आवडले. धन्यवाद.
१. केवळ नजरेच्या कट्यारीने पुरुष घायाळ होतो. आणि
२. पत्नीच्या जळजळीत नेत्रकटाक्षाने पती केवळ भस्म होत नाही.

आहे या दोन गोष्टींचे स्पष्टीकरण तुमच्याकडे?

कुमार१'s picture

15 Nov 2020 - 4:50 pm | कुमार१

गोंधळी ,
अगदी बरोबर

सुधीर,

आहे या दोन गोष्टींचे स्पष्टीकरण तुमच्याकडे?

नाही ना राव ! त्या बाबतीत तुमच्यासारख्या ज्येष्ठांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा आहे !
धन्यवाद

नूतन's picture

17 Nov 2020 - 5:59 pm | नूतन

माहितीपूर्ण लेख

मित्रहो's picture

17 Nov 2020 - 8:28 pm | मित्रहो

नेहमीप्रमाणे क्लिष्ट मेडीकल गोष्टींची खूप सहज सुंदर पद्धतीने ओळख करुन दिली.
सकाळी उठल्यावर डोळ्यातून जो द्रव (आम्ही याला चीपड म्हणतो) बाहेर येतो तो सुद्धा याच अश्रूगंथीतून येतो का? तो यायचे कारण काय?

कुमार१'s picture

17 Nov 2020 - 8:47 pm | कुमार१

नूतन, मित्रहो
धन्यवाद.

सकाळी उठल्यावर डोळ्यातून जो द्रव (आम्ही याला चीपड म्हणतो)

चांगला प्रश्न.

रात्रीच्या झोपकाळात डोळ्यातील अश्रूंमध्ये म्युकस, त्वचेच्या त्याज्य पेशी आणि स्निग्ध पदार्थ हे सर्व मिसळून ‘चिपाड’ तयार होते.
दिवसा अश्रू व पापण्यांची हालचाल यामुळे असे काही साठून न राहता धुतले जाते.

स्मिताके's picture

17 Nov 2020 - 9:02 pm | स्मिताके

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आणि रंजक लेख आवडला.

अथांग आकाश's picture

19 Nov 2020 - 9:55 am | अथांग आकाश

माहितीदायक अश्रुमहात्म्य आवडले!!!
.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Nov 2020 - 10:31 am | ज्ञानोबाचे पैजार

सरळ सोप्या साध्या भाषेत लिहीलेला तरीही अत्यंत माहितीपूर्ण लेख आवडला.

एका अश्रू मागे एवढी मोठी प्रक्रिया असते हे राजेश खन्नाला माहित असते तर त्याने हे म्हटले नसते....

https://www.youtube.com/watch?v=zN5pbv6AV8Q

पैजारबुवा,

कुमार१'s picture

19 Nov 2020 - 10:58 am | कुमार१

अ आ
तुम्ही तर अश्रूंचा सुरेख सागरच सादर केलात !
......
ज्ञा पै

हे राजेश खन्नाला माहित असते तर त्याने हे म्हटले नसते....

सुरेख संदर्भ, आवडला !

अनिंद्य's picture

28 Nov 2020 - 2:46 pm | अनिंद्य

@ कुमार१,

लेख उत्तम डॉक ! शीर्षक तर विशेष आवडले.

She must weep else she will die ... फार समर्पक कविता उद्धृत केलीय !

आपणासर्वांना आयुष्यात अश्रुपात करायचाच झाल्यास फक्त 'ख़ुशी के आंसू च' मिळूदे ही शुभेच्छा !

चौथा कोनाडा's picture

28 Nov 2020 - 5:04 pm | चौथा कोनाडा

अश्रूमय लेख आवडला. बरीच नविन महिती मिळाली !
या (मिपा शृंगार दिपावली विशेषांक) निमित्ताने शृंगार प्रक्रियेत अश्रू येऊ शकतात का हे वाचायला आवडेल.

कुमार१'s picture

28 Nov 2020 - 7:09 pm | कुमार१

धन्यवाद !

ख़ुशी के आंसू च' मिळूदे ही शुभेच्छा

>>> अगदीच !

शृंगार प्रक्रियेत अश्रू येऊ शकतात का

>>> या प्रक्रियेत हॉर्मोन्सची दिशा वेगळी असल्याने अश्रूंपेक्षा इतर स्त्राव वाढतात !!