अभिनय जुगलबंदी - एक दृष्टिक्षेप

केदार पाटणकर's picture
केदार पाटणकर in जनातलं, मनातलं
26 Aug 2020 - 12:01 pm

अंदाज हा चित्रपट १९४९ मधे प्रदर्शित झाला. त्यात राजकपूर व दिलीपकुमार एकत्र होते. अभिनयाची जुगलबंदी चांगली रंगली. या चित्रपटाला सत्तर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त, दोन दिग्गज अभिनेत्यांची जुगलबंदी असलेल्या काही मोजक्या चित्रपटांवर एक दृष्टिक्षेप.
हिंदी चित्रपटांना चांगल्या अभिनयाची परंपरा आहे. एकापेक्षा एक तगडे अभिनेते रुपेरीनगरीत होऊन गेले. काही चित्रपट असे आहेत की, त्यात दोन उत्तम अभिनेत्यांची समोरासमोर जुगलबंदी रंगलेली आहे. अंदाज मधे राजकपूर व दिलीपकुमार एकत्र होते. राजकपूरला शोमन म्हणून ओळखले जाते. महान अभिनेता असे त्याचे नाव घेतले जात नाही. तरीही, या चित्रपटाचा उल्लेख जुगलबंदीबाबत व्हायला हरकत नाही. राजकपूरने चांगली खेळी दिलीपकुमारसमोर खेळलेली आहे. पैगाम चित्रपटात दिलीपकुमार व राजकुमार एकत्र आले होते. राजकुमारचा डायलॉग किंग होण्यापूर्वीचा हा चित्रपट आहे. दिलीपकुमारसमोर राजकुमार चांगलाच अभिनय करून गेला आहे, असे अनेकांचे मत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील आणखी एक उत्कृष्ट अभिनेता संजीवकुमार संघर्ष मध्ये दिलीपकुमारसमोर येतो. कित्येकांच्या मते, संजीवकुमार प्रभावी ठरतो. काहींच्या मते, दिलीपकुमार प्रभावी ठरतो. पुढे होणा-या चांगल्या सामन्याची चुणूक संजीवकुमार खासच दाखवून जातो. वक्त मध्ये अगदी रंगावा असा सामना झालेला नाही पण राजकुमार व रेहमान या दोघांतली दृष्ये उल्लेखनीय आहेत. जंजीरमधला शेरखान व विजय या व्यक्तिरेखांमधे खटका उडतो ते दृष्य फार गाजले. दृष्य प्राण व अमिताभने झकास केलेले आहे. पूर्ण चित्रपटात पुढे ते दोघे अनेकदा समोरासमोर येतात. असं म्हणतात की , जंजीरमधे प्राणने ‘’प्राण’’ ओतलेला आहे. कालीचरण चित्रपटात अजित संवादात बाजी मारतो. खलनायक असूनही अजितची संवादफेक फार गाजली. शत्रुघ्न सिन्हाने पोलीस अधिकारी प्रभाकरच्या भूमिकेत चांगला रंग भरला होता. प्रभाकर लायनला इशारा द्यायला जातो, ते दृष्य विशेष आहे. राजकुमारप्रमाणे अजित हाही भावप्रदर्शनापेक्षा संवादाने मोठा झालेला अभिनेता आहे.
शक्ती मधे दिलीपकुमार व अमिताभ बच्चन होते. त्यांचे संवादफेकीची दृष्ये तर चांगलीच रंगलेली आहेत. पोलीस चौकी, घर, समुद्रकिनारा, तुरुंग येथील सगळीच दृष्ये पाहण्यासारखी. गोळीबार होत असताना अचानक अमिताभसमोर दिलीपकुमार येतो व अमिताभला पिस्तूल टाकून द्यावे लागते, ते दृष्यही उच्च आहे. विजयची आई मरते तेव्हा विजय वडिलांजवळ म्हणजेच अश्विनीकुमारजवळ येतो. दोघांमधे पुन्हा खटका उडणार, अशी अटकळ प्रेक्षक बांधतो पण काहीही न बोलता ते दोघे एकमेकांकडे मिनिटभर पाहतात. अनेक चित्रपटरसिकांच्या मते त्यांच्यातल्या संवादाच्या जुगलबंदीपेक्षा हा सीन फक्त उत्तमच नाही तर लाजवाब आहे. शक्ती या दृष्यासाठी अवश्य पाहावा. विधातामध्ये तर दिलीपकुमारची टक्कर पुन्हा संजीवकुमारशी झालेली आहे. काही दृष्यांमधे दोघे समोरासमोर येऊन रंगत वाढवतात पण आप अपनी औकातसे गिरकर बात कर रहें है, असे संजीवकुमार म्हणतो दे दृष्य पाहण्यासारखे. याच चित्रपटात शम्मीकपूरने अधून मधून स्वतःची रंगत तयार केली आहे. कर्मामध्ये दिलीपकुमार समोर नसीरुद्दीन शहा आहे. जवळजवळ लागोपाठच्या दोन दृष्यामधे ते दोघेच आहेत. खैरुद्दीन जेव्हा दादा ठाकूरच्या अंगावर शाल टाकतो तो प्रसंग पहा. दोन्ही अभिनेत्यांना अभिनयाच्या पाठशाळा असे जे गौरवाने म्हटले जाते ते अगदी सार्थ आहे. गुलामी हा चित्रपट नेहमीच्या हिंदी चित्रपटांपैकी एक. त्यात नसीरुद्दीन शाह कायद्याचे रक्षण करणारी व्यक्तिरेखा साकारतो तर धर्मेंद्र बंडखोराची. दोघेही चित्रपटात आपापल्या पध्दतीने रंग भरतात. या दोघांतले स्मिता पाटील ही अभिनेत्री सोबत असतानाचे दृष्य पाहण्यासारखे. पोलीस अधिका-याची पत्नी ही बंडखोराची वर्गमैत्रीण असते. दृष्यातले गहिरेपण विलक्षण आहे. गिरफ्तार मधे हिंदीचा सुपरस्टार व दक्षिणेचा सुपरस्टार एकत्र आहेत. कमालीचा बोलका चेहरा असलेला हा दक्षिणेचा स्टार किती छान अभिनय करतो, ते दिसून येते. कमल हसनची व्यक्तिरेखा तुरुंगातून पळून जाण्याचे दृष्य पहा. कमल हसन बाजी मारतो. सौदागर मधे पुन्हा एकदा दिलीपकुमार व राजकुमार अनेक वर्षांनी एकत्र आले आहेत. त्यांच्या संवादफेकीला चित्रपटभर दाद मिळतेच. सर्वसाधारणपणे पाहिले तर दिलीपकुमार समोरच्या अभिनेत्यापेक्षा काकणभर सरस ठरतो पण राजकुमार घोड्याच्या पाठीवर थाप मारतो त्या दृष्यात भाव खाऊन जातो. तिरंगा मध्ये तर राजकुमार व नाना पाटेकर यांच्यातील जुगलबंदी रंगली. हे दोन्ही कलाकार लहरी म्हणून प्रसिध्द असल्याने ते एकत्र आले हीच बातमी होती. चित्रपटभर दोघांची अनेक दृष्ये आहेत. ब्रिगेडियर सूर्यदेवसिंग बिलियर्डस खेळत असताना इन्सपेक्टर वागळे तिथे येतो. ह्या दृष्यात जे शाब्दिक फटाके वाजतात ते मस्त आहेत. सन १९९५ मधे हम दोनो हा चित्रपट आला होता. नाना पाटेकर व ऋषीकपूर हे अतिशय दुर्मीळ युगुल चित्रपटात एकत्र होते. जुगलबंदी नाही पण जुगलबंदीच्या जवळ जाईल अशी दृष्ये त्या दोघांनी केली. ऋषीकपूर नैसर्गिक अभिनयाचा बादशहा आहे. १९९९ मधे कोहराम चित्रपटात नाना पाटेकर व अमिताभ बच्चन होते. ही हाय व्होल्टेज लढत होईल असे वाटले होते पण जरा अपेक्षाभंगच होतो. पात्रता असूनही अमिताभ बच्चन समांतर सिनेमात काम करीत नाही, अशी तक्रार अमिताभच्या ख-या चाहत्यांची होती. या तक्रारीला एकदाचे उत्तर म्हणून की काय, सन २००२ मधे अमिताभ बच्चन व ओमपुरी गोविंद निहलानीच्या देव चित्रपटात एकत्र आले होते. ही जुगलबंदी आहे पाहण्यासारखी पण फारशी रंगत नाही. सन २००० मधे अमिताभ बच्चन व शाहरुखखान समोरासमोर आले मोहब्बतें चित्रपटातून. दोघेही स्टार म्हणून गणले जातात. यातील या दोघांची दृष्ये तमाम चित्ररसिकांचे चांगलेच मनोरंजन करून गेली.
२००० नंतरच्या काही मोजक्या चित्रपटांपैकी २००७ सालच्या द वेडनेस्डे मधे अनुपम खेर व नसीरूद्दीन शहा खूप वर्षांनी एकत्र आले. चित्रपटभर त्यांचा संवाद फोनवरून सुरु असतो. ती लांबून झालेली जुगलबंदी होती. ते दोघेही अगदी शेवटी समोरासमोर येतात. थोडेसेच बोलून आपापल्या मार्गाला लागतात. त्यांची शेवटच्या दृष्यातली संवादफेक थोडी वाढवली असती तर एक रंगलेला सामना पाहायला मिळाला असता.
सहसा जुगलबंदी म्हटले की, गंभीर स्वरुपाचे दृष्य समोर येते. एकाने एक वाक्य म्हटले की दुस-याने त्याला प्रत्युत्तर द्यावे असा अर्थ घेतला जातो. काही विनोदी चित्रपटात विनोदी अभिनेत्यांनी संवादाची साधी देवाणघेवाण केली आहे ती मनोरंजक आहे. गोलमाल चित्रपटातील अमोल पालेकर व उत्पल दत्त यांची तसेच अंगूर चित्रपटातील संजीवकुमार व देवेन वर्माची, अंदाज अपना अपना मध्ये आमीर खान व सलमान खान यांची दृष्ये चांगलीच खसखस पिकवतात.
सत्तरच्या दशकात समांतर चित्रपटांचा प्रवाह आलेला होता. शाम बेनेगल, गोविंद निहलानी या प्रमुख दिग्दर्शकांनी प्रामुख्याने ओमपुरी, नसीरुद्दीन शहा, कुलभूषण खरबंदा, अमरीश पुरी या अभिनेत्यांना घेऊन काही चित्रपट दिले. या दिग्दर्शकांचा कोणताही चित्रपट पाहिला तरी उच्च अभिनयाची मेजवानी मिळते. काही काही दृष्यांमधे तीन तीन अभिनेते एकमेकांसमोर आहेत. ती दृष्य़े सुरेख झालेली आहेत.
सन २०१० नंतर जुगलबंदीची परंपरा थोडी क्षीण झाल्यासारखी वाटते.
जुगलबंदी रंगण्यासाठी उत्तम पटकथा , उत्तम संवाद, चेह-याचा क्लोझअप व उत्तम अभिनय पडद्यावर मोठ्या स्वरुपात दिसावा ही इच्छाशक्ती असलेला दिग्दर्शक या गोष्टी महत्त्वाच्या असतात. कॅमेरा खूप महत्त्वाची भूमिका करतो. अभिनेत्याचा चेहरा जे बोलत असतो ते कॅमेरा जवळून टिपून प्रेक्षकांसमोर ठेवतो. चित्रपटगृहात तो परिणाम जाणवतो कारण चित्रपटगृहाचा पडदा खूप मोठा असल्याने कमालीच्या परिणामकारकतेने दृष्ये दिसतात. आज यू ट्यूबवर चित्रपट पाहणा-यांना जुगलबंदीची मजा येणार नाही कारण तिथे ते अभिनेते खूप खुजे दिसतात. आज खूप अभिनेते आहेत पण तशा पटकथा, तसे संवाद, तसे दिग्दर्शक नसावेत म्हणून पूर्वीसारखी जुगलबंदी दिसत नाही.

कलाआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

26 Aug 2020 - 4:14 pm | सिरुसेरि

सुरेख निरिक्षण . +१

नव्या पिढीचा सुद्धा उल्लेख हवा होता. राजकुमार राव व आयुष्यमान, राजकुमार व पंकज त्रिपाठी, इरफान व दिपक दोब्रियाल......

सतिश गावडे's picture

26 Aug 2020 - 6:54 pm | सतिश गावडे

राजकुमार राव व आयुष्यमान खुराणा तसेच राजकुमार राव व पंकज त्रिपाठी या अभिनेत्यांची जुगलबंदी पाहण्यासारखी असते. विशेषतः राजकुमार राव व पंकज त्रिपाठी या जोडीचं ट्युनिंग खुपच चांगलं आहे. मग तो चित्रपट न्युटन असो वा स्त्री.

सोत्रि's picture

26 Aug 2020 - 7:09 pm | सोत्रि

झक्कास लेख!

- (सिनेमाप्रेमी) सोकाजी

अभिनयाची जुगलबंदी पहायची असेल तर
" कथा दोन गणपतरावांची " सिनेमा पहा. मोहन आगाशे आणि दिलीप प्रभावळकर
बुलंदी नावाचा एक सिनेमा होता. यात डॅनी आणि राजकुमार आहेत. फारसे संवाद नसतानाही ते जाणवते.
अभिनयातील जुगलबंदी मधे संवादाच्या फटाक्यांना इतके महत्व का देतात कोणास ठाऊक.
इजाजत सिनेमात शशीकपूर एकाच सीन साठी आलाय. त्याने केवल एक पाठमोरा लूक दिला आहे. एकही सम्वाद नाही.
चित्रपट सम्पल्या नंतरही तो प्रसंग जास्त लक्षात रहातो.
संजीव कुमार आणि अमिताभ - त्रिशूल
अमिताभ आणी ओमप्रकाश - चित्रपट आलाप.
हे असे अनेक चित्रपट संवादाची गरजच पडलेली नाहिय्ये

चौथा कोनाडा's picture

28 Aug 2020 - 5:48 pm | चौथा कोनाडा

मस्त लेख, आवडला !

द वेडनेस्डे मधे अनुपम खेर व नसीरूद्दीन शहा खूप वर्षांनी एकत्र आले. चित्रपटभर त्यांचा संवाद फोनवरून सुरु असतो. ती लांबून झालेली जुगलबंदी होती. ते दोघेही अगदी शेवटी समोरासमोर येतात. थोडेसेच बोलून आपापल्या मार्गाला लागतात. त्यांची शेवटच्या दृष्यातली संवादफेक थोडी वाढवली असती तर एक रंगलेला सामना पाहायला मिळाला असता.
इथं नसीरूद्दीनचे अतिशय भावखाऊ पात्र होते. कथानकाच्या दृष्टीने आणि पडद्यावरच्या दिसण्याच्या बाबतीत पात्र सिनेमाच्या केंद्रस्थानी होते.
असे असुन सुद्धा अनुपम खेरने ज्या झोकात भुमिका केलीय त्याला आपोआप दाद दिली जातेच.
सर्व बाजुने नियम आणि राजकिय नेतृत्व यांच्या मधोमध सापडलेला पण तरीही मार्ग काढत असलेला आणि नसीरूद्दीनच्या कॉमनमॅनला सुप्त पाठींबा असणारा पोलिस अधिकारी सिनेमा संपताना चांगलाच लक्षात राहतो !

अर्धसत्यमधील सदाशिव अमरापुरकर आणि ओम पुरीची जुगलबंदी पण भारी आहे.

शा वि कु's picture

28 Aug 2020 - 6:04 pm | शा वि कु

भारी लेख!
मला द डिपार्टेड सिनेमातली लिओ आणि मॅट डीमन यांची जुगलबंदी फार आवडली. बदलापूर मध्ये वरून धवनने कधी नव्हे ते बरे काम केलंय, तिथं नवाझ आणि त्याची जुगलबंदी भारी आहे.

सिरुसेरि's picture

28 Aug 2020 - 9:05 pm | सिरुसेरि

काही प्रसिद्ध / लक्षात राहिलेली अभिनयातील जुगलबंदी -

-- "अशी हि बनवा बनवी " मधील अशोक सराफ आणी सुधीर जोशी .

-- "सामना" , "पिंजरा" मधील डॉ. श्रीराम लागु आनी निळु भाउ .

--- " अश्रुंची झाली फुले" नाटकामधील डॉ. काशीनाथ घाणेकर आणी प्रभाकर पणशीकर .

-- "खिचडी" या मराठी चित्रपटातील अशोक सराफ आणी सदाशिव अमरापुरकर या दोन दिग्गजांमधील अभिनयातील जुगलबंदी अशीच लक्षात राहिली आहे . एका जुन्या धाग्यामधे याचा उल्लेख केला आहे . ( https://www.misalpav.com/node/36903 )

सन्जय गन्धे's picture

28 Sep 2020 - 9:36 am | सन्जय गन्धे

शोले - सन्जीव कुमार, अमजद खान चे सीन्स फार नसले तरी पण गाजले!

केदार पाटणकर's picture

6 Sep 2023 - 1:49 pm | केदार पाटणकर

धन्यवाद.