श्रीगणेश लेखमाला २०२० - थप्पड

मी-दिपाली's picture
मी-दिपाली in लेखमाला
28 Aug 2020 - 7:35 am

1

थप्पड सिनेमा पाहून तसे बरेच दिवस झाले होते, पण तरीही तो मनात रेंगाळत राहिला होता. चित्रपटाचं कथानक किंवा साैंदर्यस्थळं सांगण्याचा माझा हेतू नाही. पण मूळ हेतू समजण्यासाठीच मध्यवर्ती कल्पना सांगायची झाली, तर चित्रपटाची नायिका अमृता हिला तिचा नवरा (त्याला नायक म्हणू की खलनायक? या विचाराने जरा गोंधळात पडले, मग हा शब्द अधिक चपखल बसला.) एका पार्टीमध्ये सर्वांसमक्ष एक थप्पड मारतो आणि तिथून सिनेमा सुरू होतो.

चित्रपट पाहिल्यापासून मेंदूच्या cerebral cortexमध्ये प्रचंड उलथापालथ. लिहावंसं वाटत होतं, पण सगळे विचार वेगवेगळ्या प्रतलावरचे. शेवटी स्वतःहोऊन लेकीसमोर गेले. तिने ओळखण्याची वाट न पाहता शरणागती पत्करली. तिला म्हटलं, "एका विषयावर लिहावंसं वाटतंय.. but all thoughts are so random.." तिने आयपॅडमधून डोकं काढत म्हटलं, "So what? Stars too are random. You don't need to bring them closer. Just draw an imaginary line between them to make them form a constellation." मी अगदी सद्गदित होऊन, कार्य सिद्धीस जाण्यासाठी तिचा आशीर्वाद घ्यावा का, या विचारात असतानाच मला अंगठा दाखवून ती पुन्हा आयपॅडमध्ये बघत ध्यानस्थ झाली.

...तर सिनेमातील ही थप्पड दिसली. अशा थपडा निमूटपणे सहन करणाऱ्या किंवा मारली एखादी थप्पड तर काय मोठंसं? असं म्हणत मानसिक गुलामगिरी स्वीकारणाऱ्यादेखील अनेक स्त्रिया आहेत. पण मी पाहिलेल्या किंवा खाल्लेल्या परंतु न दिसलेल्या थपडा मला आठवताहेत..

प्रसंग तसा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा, पण माझ्या पायाखालची जमीन सरकल्याचा.

मी पाचवी/सहावीत असेन, शाळेत वर्षभर घेतल्या जाणाऱ्या जवळपास सर्वच स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवली होती. अगदी प्रमुख पाहुण्यांकडून बक्षीस घेऊन स्टेजवरून खाली उतरले, तरी यादी संपत नव्हती. मग समोर बसलेल्या सर्व पालकांमधून वाट काढत आईकडे गेले. सगळे काैतुकाने माझ्याकडे आणि तिच्याकडे बघत असल्यासारखं उगाच वाटत होतं. आईकडे सर्व प्रशस्तिपत्रकं, बक्षिसं सोपवली आणि जायला निघणार, तोच बाजूला बसलेल्या काकींचे शब्द कानावर पडले.. "बघा वहिनी, ..आणि तुम्हाला मुलगी नको होती..." आईला मी नको होते? मी नको असणं हे आईचं मत होतं की बाबांनी तिच्यावर नकळत लादलेलं त्यांचं मत होतं की त्यांची दहशत होती, हे कळण्याचं ते वय नव्हतं. पण थप्पड मात्र सणसणीत पडली होती.

त्याच दरम्यान कधीतरी आज्जीला बाबा सांगत असताना ऐकल्याचं आठवतंय.. कशावरून ते नीटसं आठवत नाही, पण त्यांचं वाक्य आठवतंय. "काय करणार! तुमच्या मुलीने तिन्ही मुलीच दिल्या ना.." आईने का असं केलं? द्यायला हवा होता एक मुलगा, असं वाटून गेलं होतं तेव्हा. नंतर नववीत असताना गुणसूत्रांची कमाल कळली. स्त्रियांमध्ये XX असतात आणि पुरुषांमध्ये XY, त्यामुळे मुलगा किंवा मुलगी होणं हे स्त्रीवर अवलंबून नसून पुरुषावर अवलंबून असतं, हे कळल्यावर कधी एकदा घरी येऊन आईला सांगते असं झालं होतं. तिला त्यातलं सायन्स किती कळलं होतं माहीत नाही, पण आपण निर्दोष आहोत हा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तरीही ताईचं लग्न जमवताना तिच्या आईला तिन्ही मुलीच आहेत तर तिलाही मुलीच होतील या कारणावरूनही एक-दोन स्थळांकडून नकार आलाच आणि एकाच थपडेत मायलेकींना दोघींना गारद केलं गेलं.

पुढे मी फर्स्ट क्लासमध्ये M.Sc. उत्तीर्ण झाले. वय वर्ष साधारण २२-२३. रिझल्ट घेऊन घरी आल्यावर बाबांनी विचारलं, "आता पुढे काय विचार आहे?" मी म्हणाले, "काॅलेजमध्ये शिकवण्यासाठी निदान बी.एड. तरी करावंच लागेल. एक वर्ष आणखी."

यानंतर एक मोठा पाॅज... "हम्म, मुलगा असता तर एव्हाना एखादा टेंपो /ट्रक काहीतरी घेऊन दिला असता. ट्रान्सपोर्टसारख्या एखाद्या बिझनेसमध्ये मार्गाला लागला असता कधीच." मला काही कळेचना. माझ्यापेक्षा कुवतीने सुमार असता तरी चाललं असतं, पण अजूनही मुलगा हवा होता ही खंत होतीच? माझं वाढणारं वय आणि शिक्षण, नोकरी, लग्न असा जमाखर्चाचा ताळमेळ जुळला नसेल बहुतेक आणि मला आणखी एक थप्पड बसली.

आतापर्यंत अशा प्रसंगांमुळे थोडी बंडखोरी रुजू पाहत होती, त्यात आजूबाजूच्या परिस्थितीने चांगलाच गैरसमज करून दिला की Cooking is a gender based skill, मग मुद्दाम त्याकडे पाठ फिरवली. यथावकाश लग्नघटिका समीप आली. पण लग्न करायचं म्हणजे उत्तम स्वयंपाक करता येणं हा मुलींसाठी eligibility criterion. त्यात पुन्हा पारंपरिक पद्धतीने लग्न जमवण्याची वेळ. मग अगदी जेवण बनवता येतं का? असं विचारलं तर 'हो सांग' असेही सल्ले मिळाले. पण ठरवलं होतं, 'जो भी कहूँगी, सच कहूँगी। सच के सिवा कुछ नही कहूँगी।' ...आणि नशीब फिरलं. म्हणतात ना, Opposite poles attract! तसंच झालं. समोरून I love cooking येताच भरून पावले. बाकी सगळं तर जुळून आलं होतंच. एव्हाना Cooking is an essential skill for everyone, irrespective of gender हे कळल होतं. निदान पूर्वग्रहदूषित तरी मी आता नव्हते. त्यास पोषक वातावरणही सासरी मिळालं.

असं असलं तरी आपल्या आजूबाजूला जे घडताना आपण पाहत असतो, त्यानुसारच आपण घडत असतो याचा प्रत्यय आलाच.

एका नातेवाइकाकडे धावती भेट द्यायला गेलो होतो. त्या काकांकडे अनुभवाची मोठी शिदोरी. त्यात त्यांना लाभलेला पु.ल.देशपांडे, जयवंत दळवी यांसारख्या साहित्यिकांचा सहवास. माझ्या आवडीच्या गोष्टी. त्यामुळे दिवाणखान्यात गप्पांना रंग चढला नसता तर नवल. इतक्यात नवऱ्याने चोरट्या नेत्रकटाक्षाने स्वयंपाकघराच्या दिशेने खूण केली आणि तिकडे जाऊन बस असं सुचवलं. जणू माझी चुकलेली जागाच दाखवून दिली... आणि मला आणखी एक थप्पड बसली.

पण या वेळी फरक हा होता की मी हे मोकळेपणाने बोलू शकले, कारण समोरच्याच्या समजून घेण्याच्या कुवतीवर माझा विश्वास होता. त्यामुळे नंतर असा प्रसंग कधीच आला नाही.

असं ऐकलं होतं की मुलींना बऱ्याचदा त्यांच्या बाबांसारखाच नवरा हवा असतो. मला नव्हतं पटलं कधी ते... पण लेक मात्र एकदा म्हणाली, "आई, मला नवरा शोधून देशील ना, तो बाबासारखा दे."

2

श्रीगणेश लेखमाला २०२०

प्रतिक्रिया

गणेशा's picture

28 Aug 2020 - 5:24 pm | गणेशा

Stars too are random. You don't need to bring them closer
Nice sentence..असा विचार मी कधीच केला नव्हता.
--

बाकी मुली प्रती समाजाचे एक प्रातिनिधिक चित्र तुम्ही दाखवले आहे.
ते खोल लागलेच.
कदाचीत आपला समाज आता बदलतो आहे असे वाटते आहे..
मुलगी झाली तर हे असे करेल.. तिच्याशि मस्त हे खेळेल अशी स्वप्ने कित्येक होणारे बाबा आजकाल पाहतात असे वाटते..
मी माझ्यावरून आणि आजूबाजूच्या माझ्या मित्रांच्या अनुभवावरून बोलतोय..

बाकी स्वयंपाकाचे माझे एक आहे माझ्या मुलीला छान स्वयपाक बनवता आला पाहिजे असे मला वाटते.. उलट तिच्याबरोबर मी तिला थोडे बनवू लागेल असे वाटते.
हे माझे खरे मत आहे... यात मुलगा मुलगी असे नाही.

सुधीर कांदळकर's picture

28 Aug 2020 - 6:18 pm | सुधीर कांदळकर

मुलीला बालपणापासूनच तसे वागवले जाते. घरात भाऊ असतांना बायसने वागवल्यावर सतत पडते घेऊन त्यांना औदासिन्य कसे येत नाही याचे मला कायम नवल वाटत आले आहे.

छान! वेगळा विषय, लेख आवडला.

चांगला लेख आणि काही अनुभव सार्वत्रिक असल्यामुळे पटलेला लेख.

औदासिन्य नाही येत पण बऱ्याच गोष्टी मधला आत्मविश्वास नक्कीच कमी होतो. अगदी बाहेर नोकरी साठी मुलाखत देताना सुद्धा सारख्याच कामासाठी सारखीच पात्रता असलेला मुलगा जास्त पगार मागतो, त्यासाठी भांडतो सुद्धा. पण मुली कायम पात्रतेपेक्षा कमी मागतात. सणासुदीला सगळ्या घराला जेवायला घालतील पण स्वतः उपाशी राहतील, उरलं सुरलं खातील. नवीन पिढीत हे चित्र बदलतंय, खासकरून शहरात, पण बऱ्याच घरामध्ये अजूनही घरातली बाई शेवटी जेवते, सगळं शिळं तीच खाते.

प्रचेतस's picture

28 Aug 2020 - 7:38 pm | प्रचेतस

Stars too are random. You don't need to bring them closer. Just draw an imaginary line between them to make them form a constellation

हे भारी आवडलं.

सिरुसेरि's picture

28 Aug 2020 - 9:28 pm | सिरुसेरि

अस्वस्थ करणारे कटु अनुभव .

दिपालीजी अगदी माझ्या मनातलं लिहलय असं वाटतं राहिल..
थप्पड सिनेमा पाहिल्यावर लक्ष गेलं की ,,खरच आपल्याकडे लग्नानंतर स्त्रियांवर हक्क गाजवणारे नवरे समाजात आहेत आणि अमृताने घेतलेला निर्णय योग्यच होता ...हा झाला सिनेमाचा भाग!
पण बंडखोरी असतेच बाईमध्ये ..पण निसर्गानेच​ तिला मायेचे अनेक पदर दिल्याने ती अशा थपडा विसरत पुढे जाते..पण अशी एक अमृता घडेल अस वागावच का..

**बाकी हे फार फार आवडलं
पण या वेळी फरक हा होता की मी हे मोकळेपणाने बोलू शकले, कारण समोरच्याच्या समजून घेण्याच्या कुवतीवर माझा विश्वास होता. त्यामुळे नंतर असा प्रसंग कधीच आला नाही.

खुपच सहज विषय मांडलाय.. :)

स्मिताके's picture

28 Aug 2020 - 11:23 pm | स्मिताके

दुर्दैवाने. अगदी नेमके विचार मांडलेत. आणखी लिहा.

असे प्रकार प्रत्यक्ष पाहिले/अनुभवले नसले तरी अशी मानसीकता आणि ज्यांच्यावर असे प्रसंग गुदरले असतील त्यांच्या त्यावेळच्या मन:स्थिती वा परीस्थितीची व्यवस्थीत कल्पना येऊ शकेल असे लिहीले आहे.
धन्यवाद आणि पुढील लेखनास शुभेच्छा!

विनिता००२'s picture

29 Aug 2020 - 10:15 am | विनिता००२

आईला मी नको होते? >> टचकन पाणीच आलं डोळ्यांत!

मुलगी म्हणून डावलल्याचे खूप अनुभव आहेत. पण आज मी जी काही आहे ती स्व:बळावर! याचा आनंद खूप आहे. बोलणार्‍यांची तोंडे काळानेच बंद केलीत.

जोडीदार चांगला मिळाला हे वाचून बरे वाटले.
खुप छान लिहीलेय.

हे वाचताना एकदम मनाला अन डोक्याला झटका बसला. प्रत्यक्ष ऐकताना (तेही स्वतःविषयी) तुम्हाला कसं वाटलं असेल, याची कल्पना करवत नाही!

शेवटच्या प्रसंगात, समजून घेणार्‍या, बायकोला बरोबरीने स्थान देणार्‍या पतीकडून नकळत का होईना असं होऊ शकतं. असे पुरुष तर अपवादात्मक प्रमाणात कमी असतात. बहुसंख्य असणार्‍या पुरुषांकडून (भले त्यांच्या नकळत का असेना) बायकोला किती दुय्यम अन हीन वागणूक मिळत असेल.

लेख वाचून आई अन बायकोला सॉरी म्हणायचा विचार डोक्यात आलाय. बघू हिंमत होतेय का. (शेवटी मीही अपवाद कमी आणि बहुसंख्येत जास्त मोडतो ना..)

बाकी आमच्या घरात २००० साली धाकट्या काकांना मुलगी झाली, त्यानंतर मुलगी नाही झाली. आमच्या घरात मुलींचं प्रचंड कौतूक! जाणीवपूर्वक त्यांना कमीपणा, खाणं, कपडे, शिक्षण कोणत्याही बाबतीत दुय्यम वागणूक नसते. हा, आता घरकामाच्या बाबतीत मुली/सुना ते जास्त करतात आणि मुले कमी करतात, हे होतंच. तर माझा भाऊ सगळ्यात मोठा. त्याला २००५ मध्ये मुलगा झाला. त्यानंतर मला २०१४ मध्ये, २०१५ मध्ये चुलत भावाला, २०१७ मध्ये दुसर्‍या चुलतभावाला सगळे मुलगेच. वीस वर्षे झाली घरात मुलगी आली नाही, त्यामुळे सगळे वाट पाहताहेत मुलगी होण्याची. माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी बायकोच्या माहेरच्या लोकांनी निश्वास सोडला, पहिल्याच वेळी मुलगा झाला. आता काळजी नाही! आणि आमच्या घरातले , अगदीच वाईट वाटलं, खंतावले, निराश झाले, असं नसलं तरी मुलगी झाली असती तर जास्त आनंद झाला असता, हे नक्की!

लेख प्रचंड आवडला आहे, हे नोंदवतो. २०२०च्या मिपा टॉप टेन लेखांची यादी काढली तर हा लेख त्यात असणार हे नक्की!

अनिंद्य's picture

29 Aug 2020 - 11:10 am | अनिंद्य

@ मी-दिपाली,

स्टार्स टू आर रँडम.... इथेच जिंकलात तुम्ही. You have raised a great child !

'थप्पड' आता सूक्ष्म होत आहेत. चटकन जाणवू नये पण इम्पॅक्ट मिळावा असा भेदभाव करण्यात समाज तरबेज होत आहे. अगदी लहान मुलांची खेळणी, कपड्यांपासून ते शिक्षणात विषय निवडण्यापर्यंत सगळीकडे भेदभाव सूक्ष्मरूपेण संस्थिता .... वरून बोलायची चोरी. अशात डगमगून न जाता पुढे पुढे जाणाऱ्या स्त्री जमातीचा सन्मान करावा तो थोडाच.

प्रभावी तरल लेखनाचे कौतुक आणि शुभेच्छा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Aug 2020 - 11:33 am | ज्ञानोबाचे पैजार

तुम्ही मोकळे पणाने इथे तुमचे अनुभव लिहीले याचे कौतुक वाटले, अशा प्रकारच्या लेखनाने समाजाची मानसिकता बदलायला नक्कीच मदत होईल.

लिहित रहा

पैजारबुवा,

प्रांजळ, प्रामाणिक अनुभवकथन आवडले.

प्रशांत's picture

29 Aug 2020 - 4:37 pm | प्रशांत

लेख आवडला..

मी-दिपाली's picture

30 Aug 2020 - 12:31 pm | मी-दिपाली

सर्व प्रथम सगळ्या वाचकांचे आणि आवर्जून प्रतिसाद देणार्‍या प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार.

श्री गणेशलेखमालेतील लिहिण्याबद्दल विचारणा झाली तेव्हा हा विषय डोक्यात पिंगा घालतच होता. पण जेव्हा आवाहनाचा धागा पाहिला तेव्हा तिथे स्मरणरंजन(नॉस्टेल्जिया) असा उल्लेख पाहून थोडी साशंक झाले, म्हटलं आपण लिहेलेलं जरी गत आठवणींबद्दल असलं तरी हे 'स्मरणरंजन' खचितच नाही. मग पाठवावा का हा लेख? शेवटी या विषयाला वाचा फोडण्यासाठी मनाचा हिय्या करून हा लेख पाठवायचं ठरवलं.

थोडंसं लेखाबद्दल....

खरंतर कोणतीही घटना ही स्वतंत्र नसते, तिच्या मागच्या पुढच्या, आजुबाजूच्या संदर्भाने ती असते. आपल्या समाजव्यवस्थेमुळे मुली लग्न होऊन सासरी जाणार त्यामुळे आर्थिक सपोर्ट आपल्याला मिळणार नाही, असं वाटलं असेल माझ्या बाबांना कदाचित आणि प्रत्येक व्यक्तीत गुणदोष असतातच. मीही अपवाद नाहीच, एका दोषामुळे ती व्यक्ती वाईट होत नाही. बाबांच्या इतर अनेक गोष्टी आहेत की for which i m proud of him. असं नाही की he didn't love us. He too gave freedom to us,पण परिस्थितीमुळे असे विचार झाले असतील. माझा हेतू माझं आत्मचरित्र लिहायचा किंवा बाबांचं व्यक्तिचित्रण करायचा नाही. त्यामुळे लेखातील आशयाच्या अनुषंगाने जे योग्य वाटलं तेवढ्याच गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यामुळे व्यक्तीबद्दल judgemental न होता परिस्थितीबद्दल होणं अपेक्षित होतं. इथल्या चोखंदळ वाचकांनी माझा अपेक्षाभंग केला नाही.

हाच लेख मी नंतर फेसबुकवरही शेयर केलेला.
तिथे काही जणी व्यक्त झाल्या. काही कदाचित आता आठवूनही बघत असतील कारण या गोष्टी इतक्या अंगवळणी पडल्या असतात की एकतर जाणीवेच्या पलीकडे असतात किंवा विस्मृतीत तरी गेलेल्या असतात. प्रत्येकाचा time zone वेगळा असतो, त्यामुळे त्यानुसार त्या त्या वेळी त्याचे आकलन होईल किंवा एखाद्या व्यक्तीला होणारही नाही, पण असो, बीज पेरल्यानंतर त्याचे रुजणे हे जमीनीच्या सुपीकतेवर अवलंबून असते, शुष्क जमिनीत किंवा दलदलीत दोन्हीकडे ते सहसा कठीणच !

खरंतर 'मुलगा काय किंवा मुलगी काय आम्हाला दोन्ही सारखंच' असं म्हणणं यातही कुठेतरी नाइलाजास्तव समाधान मानून घेतल्यासारखं वाटतं. मुलगा आणि मुलगी समान नाहीतच, निसर्गाने शरीरभेद केला आहेच, पण तो भेद superior inferior मध्ये व्यवस्थेने convert केला आणि त्या दृष्टीने कामांमध्येपण तसेच दोन गट पडले. मुली शिकल्या, कमावत्या झाल्या, पुरुषांची कामे करु लागल्या पण उलट चित्र आजही अभावानेच दिसते. त्यामुळे खूप मोठी जवाबदारी खरतर मुलांना(boys) वाढवणार्‍या पालकांवर आहे.
आपण बघत असलेल्या प्रसंगातून आणि आपल्याला येणाऱ्या अनुभवातून आपण घडत असतोच,पण त्यापेक्षा त्या घटनांचं perception आपण आपल्यावर कसं करुन घेतो त्यातून आपण अधिकतर घडत असतो.

तुषार काळभोर's picture

30 Aug 2020 - 2:25 pm | तुषार काळभोर

लेखाइतकाच प्रतिसादही आवडला.

चौथा कोनाडा's picture

9 Sep 2020 - 6:47 pm | चौथा कोनाडा

सुंदर प्रतिसाद, मी-दिपालीजी !

सुमो's picture

31 Aug 2020 - 7:23 am | सुमो

आवडला लेख.
लेकीचं वाक्य अप्रतिम.

मुलगा आणि मुलगी समान नाहीतच, निसर्गाने शरीरभेद केला आहेच, पण तो भेद superior inferior मध्ये व्यवस्थेने convert केला आणि त्या दृष्टीने कामांमध्येपण तसेच दोन गट पडले. मुली शिकल्या, कमावत्या झाल्या, पुरुषांची कामे करु लागल्या पण उलट चित्र आजही अभावानेच दिसते. त्यामुळे खूप मोठी जवाबदारी खरतर मुलांना(boys) वाढवणार्‍या पालकांवर आहे.
हे मला शंभर टक्के पटलंय. माझ्या आजोबांनी सत्तरीच्या कालखंडात माझ्या आईसहीत दोन्ही मावशांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायला लावून नोकरी करायला लावून स्वावलंबी बनवलं होतं,. आमच्या घरात मी व माझी बहीण दोघीही स्वतंत्र वातावरणात वाढलो कधीही भेदभाव वाट्याला आलाच नाही. पण बाहेर मात्र हा भेदभाव प्रकर्षांने जाणवायचा व चीड यायची. उदा. बाहेर कुणीही विचारलं की तुम्हाला भाऊ? यावर 'नाही . आम्ही दोघी बहीणीच' असे उत्तर दिले की हमखास अरेरे! असा प्रतिसाद असायचा. आईने मोठी झाल्यावर एक मजेशीर आठवण सांगितली होती. मी दुसरी मुलगी जन्माला आले. घरात कुणालाच वाईट वाटायचे कारण नव्हते. हॉस्पिटलमध्ये असणारे सर्वजण माझे कोडकौतुक करण्यात दंग होते. तेवढ्यात दुसर्या वॉर्डातील बाळंतीणीचे नातेवाईक काय झालं ते पाहायला आले. आजीने मुलगी असं सांगताच मला न पाहताच ती स्त्री हुं असा तुसडा स्वर काढून निघून गेली. विशेष म्हणजे असं तीन चार जणांनी केलं. आई व आजीची हसून हसून पुरेवाट झाली. असा तत्कालीन समाज असतानाही ज्या पद्धतीने आम्हाला घरात वाढवलं गेलं त्याबद्दल मी ऋणी आहे. सुदैवाने सासरी देखील माझा नवरा व दीराला सासूबाईंनी अतीशय चांगले वळण लावले आहे. दोघेही घरकामात जबाबदारीने मदत करतात. प्रत्येक गोष्टीत बरोबरीने सहभागी केले जाते व मत विचारात घेतले जाते. त्यामुळे आम्हा दोघांनाही ही आमची जबाबदारी वाटते की मुलाला बाकीच्या गोष्टी शिकवताना घरकाम व त्यानुषंगाने येणारी जबाबदारी ही शिकवलीच पाहीजे. तो आता लहान असला तरी बरीच छोटी छोटी कामे त्याला जाणीवपूर्वक करायला लावतो. तुमचे अनुभव वाचून काळजात चर्र झालं अगदी. खरंतर कोणतीही घटना ही स्वतंत्र नसते, तिच्या मागच्या पुढच्या, आजुबाजूच्या संदर्भाने ती असते. आपल्या समाजव्यवस्थेमुळे मुली लग्न होऊन सासरी जाणार त्यामुळे आर्थिक सपोर्ट आपल्याला मिळणार नाही, असं वाटलं असेल माझ्या बाबांना कदाचित हेही पटतं कारण कोणतेही पालक वाईट नसतात पण एकंदरीतच सामाजिक परिस्थितीत आलेले अनुभव त्यांना तसा विचार करायला भाग पाडत असवेत . असो . यावर खूप लिहीण्यासारखं आहे. पण तुम्ही नेमकं मर्मावर बोट ठेवणारं लिखाण केलंय एवढं नक्की.

छान लिहिलंय.माझा अनुभव सांगते.मला मुलगी झाली ही बातमी वार्ड मावशीने ओपरेशन थेअटरमधून बाहेर येऊन घरच्यांना नाराज होत सांगितले.. माझ्या घरच्यांनी तिच्या तोंडात आनंदाने पेढा भरविला..ती माऊली आश्चर्यकारक!:)अशी कित्येक उदाहरणे आहेत जिथे मुलगी कुटुंबाबात ..मुलांचे कर्तव्य बजावते आणि मुलेदेखील बायको, बहिणीला घरकामात मदत करतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Sep 2020 - 7:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन विचार, अधिक विचार करायला लावणारा. आपल्या लेखनात नेहमीच एक विचार असतो. थॅक्स.
लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

9 Sep 2020 - 8:00 pm | सुबोध खरे

'मुलगा काय किंवा मुलगी काय आम्हाला दोन्ही सारखंच'

हे केवळ आम्ही पुरोगामी आहोत हे दाखवण्यापुरते असते.

आजतागायत जेवढ्या मृत्युपत्रांवर मी डॉक्टर म्हणून सही केली आहे. ( हि व्यक्ती मानसिक दृष्ट्या सक्षम आहे असे प्रमाणपत्र असते) त्यातील एकाही मृत्युपत्रात आपली स्थावर मालमत्ता मुलगा आणि मुलीमध्ये सामान वाटणी केलेली मी पाहिलेली नाही. बाकी थोडे फार पैसे किंवा दागिने मुलीला देण्यात येतात आणि मुलाला राहता किंवा दुसरं सुद्धा घर दिला जातं.

दोन मुलगे किंवा दोन मुली असल्यास असा प्रश्न येत नाही.

माझी मुलगी मुलापेक्षा अडीच वर्षाने मोठी आहे. तिला लहानपणापासून तू ताई आहेस ना? मग आपल्या भावाची काळजी घ्यायला पाहिजे असे असंख्य बायका समुद्र किनाऱ्यावर, पार्टी, समारंभात सांगत असताना मी ऐकले आहे.

आईला / बापाला गप्पा मारता याव्यात म्हणून ५ वर्षाच्या मुलीने अडीच वर्षाच्या भावाकडे लक्ष देणे हा त्या मुलीवर शुद्ध अन्याय आहे हे बऱ्याच स्त्रियांच्या हि लक्षात येत नाही इतके ते अंगवळणी पडलेले आहे.

मी मुलीला स्वच्छ शब्दात समजावून सांगितले कि माझा मुलगा हि सर्वस्वी माझी जबाबदारी आहे तू ताई झालीस म्हणून तुझ्यावर त्याची जबाबदारी टाकणे हे चूक आहे.

त्याला मित्र नसतील तर तो त्याचा प्रश्न आहे पण त्याला खेळवणे किंवा त्याची काळजी घेणे हि सर्वस्वी माझी जबाबदारी आहे.

असे एक दोनदा मी लोकांच्या समोर समजावून सांगितले तर लोक नाराज झाले.