श्रीगणेश लेखमाला २०२० - काही धमाल किस्से शाळा आणि कॉलेजचे

Primary tabs

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in लेखमाला
27 Aug 2020 - 6:54 am

1

शाळा! बहुतेक सर्व जणांच्या मनाचा हळवा कप्पा. आयुष्याच्या घडणीची महत्त्वाची साधारण दहा ते बारा वर्षे इथे जातात. (काहींना अधिक व्यासंग करायची इच्छा असल्यामुळे थोडी जास्त वर्षे घेतली जातात ;-) ). अर्थात बालपणाची हूड वर्षे याच कालखंडात येत असल्यामुळे साहजिकच शालेय जीवनात धमाल किस्से होतात. अगदी अनेक वर्षे त्या आठवणी मनात ठसलेल्या असतात. पुढे व्हॉट्स अ‍ॅप ग्रूप, फेसबुक यावर मित्र शोधून त्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळतो आणि काळाच्या आघातांनी राठ झालेल्या मनाला पुन्हा एकदा टवटवी येते.

असेच काही किस्से या धाग्यात लिहिणार आहे. अर्थात प्रतिसादात आणखी बाकी सदस्यांच्या किश्श्यांची उजळणी होईल आणि हे उदासीचे मळभ जाऊन हसत्याखेळत्या वातावरणात गणेशाचे आगमन होईल, अशी आशा करतो.

सुरुवात करतो बालवाडीपासून. फार काही न कळण्याचा आणि असंख्य शंका येण्याचा आणि विचारण्याचा तो काळ. पण या निरागसपणातूनच काही विनोद होऊन जातो. माझी बालवाडी सातार्‍याला चक्क एका मंदिरात भरत होती. सध्या मुलांना सी.सी.टी.व्ही. असलेल्या चकाचक बस, उत्तम दर्जाचे बेंच आणि खेळण्याच्या अत्याधुनिक सोयी असलेल्या नर्सरीपासूनच्या शाळा पाहिल्या की ही शाळा दयनीय वाटेल. चक्क मंदिराच्या मंडपात संतरंजी अंथरून बसायचे. मध्येच येणारे-जाणारे भाविक, अध्येमध्ये असणारे उत्सव या वातावरणात ते वर्ष सरले. घराजवळ राहणारी मोठी मुले दुसर्‍या शाळेत जात होती. एकदा मी शाळेत निघालो असताना ही मोठी मुले खेळताना दिसली. कोणतीही सुट्टी नसताना हे सर्व जण घरी खेळताहेत कसे? हा मला प्रश्न पड्ला आणि त्यांना सुट्टीचे कारण विचारले, त्यावर समजले असे की त्यांच्या शाळेतील कोणी शिक्षिका वारल्यामुळे त्यांना सुट्टी दिली होती. सुट्टीचे अनावर आकर्षण असल्यामुळे मी आईला विचारले, "आई, आमच्या बाई कधी मरणार?" माझा प्रश्न एकून पाठीत धपाटा घालत आई म्हणाली, "असं कधी बोलायचं नसतं." निरागसतेने आलेला तो प्रश्न नशिबाने मी थेट बाईंना विचारला नाही, नाहीतर त्या दिवशी घंटेऐवजी मलाच बडवला असता.

बालपणीच हा पराक्रम केल्यावर पुढे बर्‍याच उचापती करणार, हे ओघाने आलेच.

आम्हाला चौथीला इतिहासात तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव विचारले. वर्गात कोणालाच येईना. बाईंनी पुन्हा पुन्हा विचारले, "आठवा आणि सांगा." अंदाजपंचे धागोदरसे सगळ्यांनी मारले, पण लागलेच नाही. वर्गातील अत्यंत दंगेखोर विद्यार्थी म्हणून मला उठवून विचारले, तर "तुकाराम शिवाजी काळे" म्हणून सांगून टाकले. सगळा वर्ग हसायला लागला, अगदी बाईसुद्धा त्यात सामील झाल्या. ते माझ्या एका मित्राच्या वडिलांचे नाव होते. हसून झाल्यावर शेवटी बाईंनीच सांगून टाकले.

लहानपणी माझे लेखन हे शुद्धलेखन किंवा अशुद्ध लेखन नसून बेशुद्ध लेखन होते. इतिहासात संदर्भासहित स्पष्टीकरण द्या - "मोडेन पण वाकणार नाही" या प्रश्नाचे मी दिलेले उत्तर वाचून शिक्षक लोक हसून हसून खाली पडले होते! प्रत्यक्ष उत्तर (दत्ताजी शिंदे) हे बरोबर दिले, पण स्पष्टीकरण डेंजरस होते -"मी शतरूला मोडेन, पण मी वाकणार नाही" ( शतरू मोडण्याची विद्या आधीच शिक्कून घेणार :--- माझा मराठी बाणा हा असा! हर्हर महादेव -- महादेवला लाल पेन्सिल वापरून भगवा झेंडा काढला होता.) संपूर्ण टीचर्स रूम अर्धा तास हसत होती. माझा पेपर एक यादगार म्हणून गुरुजी घेऊन गेले!!

आठवीत गेल्यावर आम्हा सगळ्या मुलांच्या डोक्यात क्रिकेटचे बरेच खूळ शिरले होते. शाळा सुटली की क्रिकेट चालायचे, पण वर्गात बसल्यावर क्रिकेटचा विरह सहन करावा लागायचा. मग त्यावरही उपाय निघाला. झिजलेले आणि गोल झालेले खोडरबर हा बॉल, कंपासपेटीतील पट्टी ही बॅट आणि बेंचवर टोचलेले कर्कटक हे स्टंप मानून ऑफ तासाला क्रिकेट सुरू व्हायचे. कोणी सर नसताना असे खेळले तर ठीक, पण हा प्रयोग एकदा माझ्या आणि मित्राच्या चांगलाच अंगलट आला. एका ऑफ पीरियडला आमचे गणिताचे सर आले. ऑफ पीरियडला आले की ते सरळ वर्गाचे दार बंद करून मस्तपैकी खुर्चीवर बसून वामकुक्षी घेत. मी आणि माझा मित्र पहिल्या बाकावर बसून हा क्रिकेटचा उद्योग करत होतो. अचानक सरांनी डोळे उघडले आणि आमचा पराक्रम त्यांना दिसला. आमच्यामधूनच भविष्यातील एखादा सचिन, राहुल, सौरव तयार होईल असा कोणताही आशावादी विचार त्यांच्या मनात आला नाही. आधी आम्हा दोघांना पुढे अंगठे धरून उभे राहण्यास सांगितले. थोडा वेळ आमचे अधोमुखासन सुरू होते. मग त्यांना काय वाटले कोणास ठाऊक, पण अचानक डस्टर घेउन उठले आणी "xxxxxx (इथल्या गाळलेल्या जागा प्रत्येकाने आपआपल्या प्रतिभेने भराव्यात ;-) ) मी इथे वर्गात असताना पहिल्या बाकावर बसून हे धंदे करता?" असे म्हणून त्यांनी मनसोक्त धुलाई सुरू केली. बरे, उठून उभे राहण्याची सोय नव्हती. उभे राहिले की "का उभा राहिलास?" म्हणून पुन्हा धुलाई. शेवटी एकदाचा तो तास आमचा वनवास संपला. अर्थात चूक आमची होती, पण हा किस्सा सध्या माझ्या मुलीला सांगितला तरी तो परग्रहावरचा वाटावा अशी परिस्थिती आहे. कालाय तस्मै नमः.

इथे चुक मान्य करून गप्प बसलो, तरी पुढच्या किश्श्यात काय झाले ते वाचा. या इयत्तेत आमचा वर्ग थेट तिसर्‍या मजल्यावर होता. जिना चढून वळले की माझा वर्ग होता. पी.टी.च्या तासाला खेळाचा मूडमधून अजून बाहेर आलो नव्हतो. तसाच पळत पळत जिना चढून मी वर्गात जाण्यासाठी वेगाने वळलो, तर आमच्या एका सरांच्या अंगावर आदळलो. ते सर अत्यंत खडूस आणि मारकुटे होते. शेवटी शाळेच्या सेंडऑफला आमच्याकडून शाळा कशी वाटली, याचा फॉर्म भरून घेतला, त्यात बहुतेक मुलांनी या सरांना शिव्या घातल्या होत्या, यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता. तर या सरांना मी जाऊन धडकलो. वास्तविक माझी जाणूनबुजून काहीही चूक झालेली नव्हती. पण आधीच दुर्वासाचे अवतार असलेल्या त्या सरांनी मला जवळ बोलावले आणि सण्णकन एक कानाखाली (अक्षरशः कानाखाली ;-)) वाजवली. गाल चोळत मी निमूटपणे वर्गात वळलो. त्या वेळी दिलीपकुमारचा 'कर्मा' आलेला नव्हता, तरीही 'थप्पड की गूंज' माझ्या मनात खदखदत होती. शाळा सुटल्यावर मी व माझे दोन मित्र घरी चाललो होतो. अचानक पुढे तेच सर जाताना दिसले. माझा संताप उफाळून आला. इकडेतिकडे बघितले, तर एक लोखंडी स्प्रिंग दिसली. मी ती स्प्रिंग उचलली आणि जोरात दाबून सोडली. सप्पकन उडून स्प्रिंग सरांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागली. तातडीने आम्ही तिघे मित्र काहीही घडले नाही असे नाटक करत बोलू लागलो. (या अभिनयगुणाचा मात्र पुढे कधी उपयोग करुन घेतला नाही.) सरांनी मागे वळून पाहिले, पण आम्ही लक्ष नसल्याचे दाखवले, त्यामुळे काय लागले हे त्यांना आजअखेर समजलेले नाही. अर्थात तो शुद्ध गाढवपणा होता. जर दुसर्‍या एखाद्या मुलाने हे पाहून चुगली केली असती, तर पुढे काय रामायण झाले असते ते सांगण्याची आवश्यकता नाही.

आणखीही बरेच किस्से आठवत आहेत. पण सगळे आज लिहीत नाही. कॉलेजचा एकच किस्सा लिहितो आणि थांबतो.

हा किस्सा आहे इंजीनिअरिंग कॉलेजच्या होस्टेलमधील. ठिकाण वाचल्यावर वाचकांना पुढच्या धमाल प्रकरणाचा अंदाज आलाच असेल. आम्ही एकदा ठरवून प्लँचेट केले होते.आमच्या इंजीनिअरिंगच्या हॉस्टेलमध्ये कडप्पा दगडाने बनवलेली कपाटे होती. तेव्हा राम गोपाल वर्माचा 'भूत' थिएटरमध्ये नुकताच रिलीज झालेला होता. सगळे होस्टेलवासी तो पिक्चर बघून आलेले होते. वातावरण एकदम अनुकूल होते. संध्याकाळी नियमित लाइट जायची. त्या वेळी आम्ही मित्रांसह प्लँचेट करण्याची योजना मांडली. एक रूम अगोदरच निवडण्यात आली. त्यामध्ये कडप्पाच्या कपाटात एका नौटंकी मित्राला लपवून ठेवले. त्या रूममध्ये एक स्टडी टेबल अरेंज करून सगळे त्याच्या बाजूला खुर्च्या टाकून बसले. मेणबत्ती पेटवण्यात आली. एका ताटलीवर बोटं ठेवून प्लँचेटला सुरुवात झाली. सगळ्या होस्टेलवर गुडुप अंधार होता. मी आणि मित्र टेबलच्या खालच्या बाजूला असणाऱ्या लोखंडी बारखाली पाय टाकून बसलो होतो.

काही वर्षांपूर्वी होस्टेलच्या बाजूच्या अपार्टमेंटमध्ये एकाने सुसाइड केली होती, त्याला बोलवायला सुरुवात केली. सगळे भयचकित झालेले होते. नजरेत भीती दिसत होती. इतक्यात ताटली कपाटाच्या दिशेने वळू लागली, (म्हणजे आम्हीच वळवली). आम्ही दोघा मित्रांनी अचानक टेबलखालून पायाने उचकटवले. मोठ्ठा आवाज झाला. टेबलाच्या बाजूला बसलेले सगळे मित्र खुर्च्यांसकट जमिनीवर आडवे झाले. तेवढ्यात कपाटातून मित्र जोरजोराने किंकाळ्या मारू लागला. आतमधून त्याने कपाटाच्या दरवाजाला जोरदार लाथा मारणे सुरू केले. हे सर्व भयंकर दृश्य बघून रूममध्ये बसलेल्या मंडळींची पाचावर धारण बसली. सगळे पार्श्वभागाला पाय लावून सैरावैरा पळू लागले.

कॉरिडॉरमध्ये आधीच गुडुप अंधार होता. बाकीचे रूम पार्टनरसुद्धा काही कळत नसल्याने या मंडळींबरोबर पळू लागले. त्यापुढचे पाच दिवस सगळे मेंबर्स सामूहिक पॅसेजमध्ये झोपत असत. कुणीही एकटे रूममध्ये झोपण्याची हिम्मत केली नाही, टॉयलेट बाथरूमलाही रूममेट्ससोबत जात असत. प्लँचेटवाली रूम तर पार हंटेड रूम दंतकथा झाली. या सर्व गोष्टी कानावर गेल्याने हॉस्टेलच्या गुरख्याने आमच्या मजल्यावर येणे कायमचे सोडून दिले. अर्थात पुढे काही वर्षांनी व्हॉट्स अ‍ॅप ग्रूपवर हे रहस्य उघडे केले गेले.

1


या मौजमस्तीला सीमा नसते. पोतडीतील आणखीही काही किस्से अशाच एखाद्या धाग्यानिमित्ताने बाहेर येतीलच. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया!

2

श्रीगणेश लेखमाला २०२०

प्रतिक्रिया

एकापेक्षा एक धमाल किस्से आहेत. प्लॅन्चेटवाला किस्सा तर कहर आहे.

चौकटराजा's picture

27 Aug 2020 - 10:36 am | चौकटराजा

काय अपेक्षा आहे ..? लेखा पेक्षा प्रतिसाद मोठा चालेल .... ?
अनेक किस्से आहेत .. किती सांगावेत.
एक खळदे नावाचा मुलगा होता. त्याला संस्कृत चा गृहपाठ करायचा जाम कन्टाळा . मी वर्गातील एक नम्बर. मग तो ज्या दिवशी गृहपाठ गुरुजी तपासत असत त्यादिवशी अगोदरच माझी वही घेत असे. माझीही काही हरकत नसे कारण तो तसा दादागिरी करणारा होता. थोड्यावेळात ५० गृहपाठान्ची तपासणी करायची व पुन्हा धडा देखील शिकवायचा ही कसरत गुरुजीना करावी लागे. मग गुरुजी शेवटच्या दोन ओळी वाचून सही करीत . गुरुजीन्ची ही " मोड्स ओपरेन्डी " त्या मुलाने बरोबर हेरली होती. एके दिवशी गुरूजीनी अचानक त्याला छडी घेण्यास भाग पाडले . बाकीच्या विध्यार्थ्याना काहीच कळेन काय झाले ते. गुरुजीनी त्याचा गृह्पाठ वर्गात वाचून दाखविला तो असा

एका पानावर --- मग लान्स गिब्ज्ञ ने वाडेकर ला एक चेन्डू टाकला त्याने तो सोडून दिला. पुढचा चेन्डू टप्प्पा पडायच्या आतच वाडेकराने कव्हरला मारला , होल्फोर्ड त्यामागे पळू लागला , तरी चार धावा . ....... इथे पान संपत होते.
नव्या पानावर -- सीतामाईच्या वियोगाने चिंतित झालेल्या राम लक्ष्मणाना पाहून जखमी जटायू त्याना म्हणाला " तुम्ही येथून दक्षिण दिशेला जा ,तो राक्षस ,जिची तुम्ही चौकशी करताहात तिला घेऊन त्याच दिशेने गेला आहे ! "
पुढे गुरुजींची सही.
( अशी अख्खी वही क्रिकेट वर्णन व संस्कृत चे मराठी भाषान्तर यान्च्या कॉकटेल ने भरलेली ).

पहाटवारा's picture

27 Aug 2020 - 12:02 pm | पहाटवारा

मस्त किस्से ..एक सो एक..
अस्मादीकांनी लहानपणी “अती तेथे माती“ याचे स्पश्टिकरण म्हणून “ जमीनीमधे जितके जास्त खणावे तितकि जास्त मातीच माती मिळते“ असे लिहुन आम्च्या मराठिच्या बाईंना झीट आणली होती !

राघव's picture

27 Aug 2020 - 2:12 pm | राघव

हा हा हा... भारी!

चौथा कोनाडा's picture

27 Aug 2020 - 1:38 pm | चौथा कोनाडा

प्लॅन्चेटचा किस्सा वाचतानाच भिती वाटायला लागली !
काय डॅम्बीसपणा म्हणायचा !
दुर्गविहारी, जबरी लेख !

राघव's picture

27 Aug 2020 - 2:14 pm | राघव

कसले भारी किस्से आहेत! खतरा!!

या विषयावरून स्वातीतैचा एक जुना धागा आठवला.. http://www.misalpav.com/node/891

MipaPremiYogesh's picture

27 Aug 2020 - 5:05 pm | MipaPremiYogesh

खरंच खूप धमाल किस्से आहेत :). आमच्या कॉलेज मध्ये बरेच किस्से झालेले त्यातले दोन लिहितो.
१. एका मित्राला सरांनी विचारले , काय हो तुम्ही कळस चे राहणारे का (कळस हे पुणे आळंदी दरम्यान एक छोटे गाव आहे). मित्र म्हणाला नाही का. सर म्हणाले नाही सगळ्याच बाबतीत तुमचा कळस आहे म्हणून विचारले :)
२. प्रॅक्टिकल चालू होते. सर आणि मित्रामधला संवाद
सर - काय सध्या खूप बिझी आहेस का ,
मित्र - नाही सर
सर - मग कला मंडळ वगैरे मध्ये भाग घेतोस का
मित्र - नाही सर
सर - ncc वगैरे काही?
मित्र - नाही सर
सर - science association किंवा क्रिकेट/स्पोर्ट्स काही?
मित्र - नाही सर ह्या पैकी काहीच नाही
सर - (एकदम वैतागून) हातातली सबमिशन चं जर्नल जोरात आपटून , मग जर्नल सबमिट का केले नाही आधी सगळे प्रयोग एकदम का?. आम्ही बाहेर पडल्यावर इतके हसलो होतो कि अजूनही मित्राला चिडवतो असं बोलून :)

गणेशा's picture

27 Aug 2020 - 5:24 pm | गणेशा

अप्रतिम किस्से..

आणखिन पण सांगा.. मज्जा आली..
आपल्या काळातील शाळा कॉलेज ची मज्जा औरच..

सस्नेह's picture

27 Aug 2020 - 5:59 pm | सस्नेह

मस्त खुसखुशीत किस्से.

कपिलमुनी's picture

28 Aug 2020 - 12:50 am | कपिलमुनी

प्रत्येक विषयाच्या मार्काची सतत तुलना करणारी आणि खिजवणारी एक मुलगि दहावीच्या संस्कॄत क्लास ला होति, सहामाहीला मला संस्कॄत मध्ये पैकिच्या पैकि पडल्याने तिच्या आईने कसा अभ्यास करतोस? हिला पण सांग , वगैरे टूमणे लावले ,

"पहाटे ४ वाजता उठून गार पाण्याने अंघोळ करुन पाठांतर करयचे" असे ठोकून दिले ,
४ दिवसात बिचरी हिव भरुन आजारी पडली आणि पुन्हा तुलना करायला आली नाही

नीलस्वप्निल's picture

28 Aug 2020 - 2:49 pm | नीलस्वप्निल

मस्तच :)

सुमो's picture

28 Aug 2020 - 3:24 am | सुमो

किस्से. मज्जा आली वाचायला.

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Aug 2020 - 1:13 pm | राजेंद्र मेहेंदळे

थोडे माझे किस्से
१. सगळ्या शाळांमध्ये असतात तसेच आमच्याही शाळेत टिपिकल मारकुटे शिक्षक होते. आठवीत असताना एका नवीन मॅडमचा संस्कृतचा वर्ग चालु असताना मुले फार गडबड करत होती म्हणुन हे शेजारच्या वर्गातुन खिडकीत येउन उभे राहिले आणि गपचुप निरिक्षण करु लागले. त्यांना पाहिल्यावर मुले एकेक करुन गप्प होउ लागली. शेवटी पहिल्या बाकावरच्या २ बेसावध मुली हसताना त्यांनी पकडल्या अणि त्यांना कानफटले. मग सगळ्या वर्गाला उभे केले आणि मोठे लेक्चर झोडले. वर्गात स्मशान शांतता पसरली होती आणि सर जायला निघालेच होते तोच--त्या भयाण शांततेत मला हसू फुटले. मग पुढची काहि मिनिटे मला धू धू धुतला.ईतका की घरी आल्यावर आईने धास्तावुन विचारले की कुठे ईतका चेहरा लाल करुन आलास?
२. भौतिकशास्त्राचा तास आणि ध्वनीतरंगावर कायतरी चर्चा चालु होती. इकडे माझ्या शेजारच्या आणि मागच्या मुलामध्ये काहितरी धुसफुस चालु होती. त्यांना गप्प करायला मी काहितरी बोलायचा प्रयत्न करतोय तोच मास्तरांनी तिघांना पुढे बोलवले आणि कानफटवले. यांची खासियत म्हणजे चश्मेवाल्या मुलाचा चश्मा काढुन त्याला फटकावायचे. त्यांनी चश्मा काढला(मुलाचा) की समोरच्याची पाचावर धारण बसलीच पाहिजे पुढच्या विचाराने.

सुधीर कांदळकर's picture

28 Aug 2020 - 1:57 pm | सुधीर कांदळकर

प्लँचेट सर्वात जास्त आवडले. मस्त आठवणी ताज्या केल्यात. धन्यवाद.

फक्त मुलांसाठी असलेल्या आमच्या शाळेत भरपूर दंगामस्ती चाले. त्यातून खेळात प्रवीण असल्यामुळे एकेका वर्गात दोनतीन वर्षे काढणारी १७-१८ वर्षांची आडदांड मुले आमच्या वर्गात होती. त्यामुळे मज्जाच येत असे.

शा वि कु's picture

28 Aug 2020 - 6:27 pm | शा वि कु

भारी. आमचे थोडे किस्से-
आमच्या शाळेत एका सरांना सारखं "या ठिकाणी" म्हणायची सवय होती. आम्ही या ठिकाणींचा काऊंट ठेवायचो,आणि पन्नास झाले की हसायचो.
शाळेत दररोज डोळे मिटून मौन ठेवायचा कार्यक्रम असायचा, सकाळच्या सभेत. मौन झालं की डोळे मिटूनच स्तोत्र वगैरे म्हणायच.
तर मॅडम कोणतं स्तोत्र म्हणायच ते सांगायच्या. पण एके दिवशी काय झालं काय माहित. नेहमीप्रमाणे 4-5 सेकंदात बाईंनी नाव सांगितल्यावर काय स्तोत्र सुरु होईना. आणि कोणी सुरुवात पण करत नव्हतं, कारण शांततेत कोणी सुरुवात केली ते कळलं असत. त्यामुळे सगळे गप्पच. शेवटी बाई अरे म्हणा कि म्हणाल्या. मग थोडेसे असतो मा सद... करून परत सगळे गप्प बसले. आता हळूहळू खिखीखी आवाज येऊ लागला. आणि त्यांनतर हा अलिखित नियमच झाला रोजचा. विशेष म्हणजे हे अगदी न ठरवता.

विज्ञान दिनाच्या कार्यक्रमात नारळाची करवंटी कोणतीतरी केमिकल टाकून पेटवायची आणि दीप प्रज्वलना ऐवजी हा कार्यक्रम होता. आणि बाईंनी काय ते केमिकल टाकले पण ते पेटेना. पाहुण्यांसकट सगळी पोरं खदाखदा हसली.

7 वीत नाटक बसवण्यासाठी शाळेच्या गच्चीत प्रॅक्टिस चालायची. तिथं पाण्याची प्लास्टिक टाकी होती. एक मुलगा टाकीला लाथा घालून स्वतःचे मनोरंजन करत होता. एका दुसऱ्या मुलाने "हॅट. हे काहीच नाही" म्हणून लोखंडी सळई उचलली आणि ज्यूडोसदृश्य हातवारे करत टाकीत भोसकली, त्याला वाटले त्यापेक्षा जोरानेच. आरपार. मग एमसील आणू या वैगेरे धावपळ करायच्या आतच पाणी खालच्या वर्गापर्यंत पोहोचलं :)

अन्या बुद्धे's picture

29 Aug 2020 - 4:42 pm | अन्या बुद्धे

भारी आठवणी!

टर्मीनेटर's picture

31 Aug 2020 - 2:21 pm | टर्मीनेटर

धमाल आठवणी... मजा आली वाचायला!

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Sep 2020 - 11:21 pm | अमरेंद्र बाहुबली

माझ्या शाळेचे अनुभव मस्त होते. एखादा कार्यक्रम असला शाळेत तर भयानक दंगल घडायची. जनरली प्रमुख पाहुणे नंतर कार्यक्रमस्थळी येतात. पण माझ्या शाळेत प्रमुख पाहुणे आधीच स्टेज वर आणुन बसवले जायचे. स्टेज समोरच असलेले बाहेर जायला फक्त २ गेट. ते गेट पक्के बंद करून समोर दोन शिपायांचा खडा पहारा ऊभा केला जायचा. त्या नंतर दोन तासाचं भाषण एकवण्यासाठी पाचवी ते दहावी चे विद्यार्थी आणले जायचे. कुणी पळून जाऊ नये म्हणुन सर/ मॅडम हातात मोठमोठ्या काठ्या घेऊन ऊभे असायचे. पण तरी एखादा मोठा लोंढा गेट जवळ पळत सुटायचा पाचवी चे मुलं बारीक असल्याने गेट खालुन निघुन जायचे. पण मोठ्या मुलांना गेट वर चढून मग पलीकडे ऊडी मारावी लागायची. बर्लीन चा भिंत ओलांडावी असे वातावरण असायचे. शंभर दिडशे मुलं एकदम गेट वर तुटून पडल्यामुळे यंत्रणा कोलमडायची. प्रचंड धुळ ऊडायची. गेट वरून पलीकडे ऊडी मारनार्यांकडे स्टेज वरील पाहुणे नाकाला रूमाल लावून पहात असायचे. दोन चार सर लाठ्या काठ्याकाठ्या घेऊन त्या गर्दीत घुसायचे. खुप उदत असलेल्या धुळीत अंदाजे लाठीमार करायचे. जे गेट क्राॅस करू शकले नाहीत त्यांच्या वर प्रचंड लाठीचार्ज करून कार्यक्रमस्थळी बळजबरीने चांगले विचार एकवण्यासाठी बसवले जायचे.
प्रमुख पाहुण्यांचं नेहमी एकच भाषण असायचं “हे जे गेट कुदुन पळाले ना. हे आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाहीत.”

मी कधी हे करायचो नाही. कारण आम्ही हीस्ट्री शिटर होतो. गेट वरून कुदताना एखाद्या ओळखीच्या मास्तरने पाहीलं तर दुसर्या दिवशी प्रचंड धुलाई व्हायची. तसंच आमची वर्गशिक्षीका पाचशे मुलांच्या गर्दीत मी नाही हे परफेक्ट ओळखून दुसर्या दिवशी रपारप पाठीत फटके मारायची.