बालपण म्हटले की खूप साऱ्या सुखद आठवणी ताज्या होतात.. हो ना? मनात विचार येऊन जातो, खरेच किती छान दिवस होते ते... कसले दुःख नाही, कसली जबाबदारी नाही वा कुठल्या गोष्टीचा विचार नाही की कशाचे दडपण नाही. अगदी स्वछंद, निर्मळ, निरागस आणि आता हवेहवेसे वाटणारे ते दिवस. प्रत्येकाच्या आयुष्यात येतात हे सोनेरी क्षण आणि उरतात फक्त आठवणी...
असेच काही सोनेरी क्षण मीही अनुभवलेत. माझे बालपण माझ्या आजोळीच गेले. बाबा गुरांचे वैद्य म्हणून सरकारी सेवेत होते. त्यामुळे त्यांची खेडेगावात सारखी बदली होत असायची. आई, बाबा आणि माझी दोन लहान भावंडे गावीच असायचे. मी मात्र आजी-आजोबांकडे आजोळी राहायचो. हेही खेडेगाव होते, पण त्यातल्या त्यात बरे होते.
आजोबा आणि त्यांचे दोन भाऊ शेजारीच राहायचे. ह्या सगळ्यांचे घर मिळून एक मोठा वाडा होता. आजोबांचे घर दुमजली आणि खूप मोठे होते, मातीचे होते, पण खूप छान होते. घराच्या मागच्या दारी वाड्यात खूप मोठी विहीर होती व त्यावर रहाटही होता. रोज त्यातून पाणी उपसावे लागे. त्याला लागूनच खूप मोठे स्नानगृह होते, तेही दगडी. तिथेच एक छोट्या व्हरांड्यावर मातीचे मोठे रांजण भरलेले असायचे पिण्याच्या पाण्यासाठी. अहाहा.. त्यातले ते थंडगार पाणी मन अगदी तृप्त करून जायचे. त्याच्या त्या शीतलतेची सर आत्ताच्या रेफ्रिजरेटरच्या पाण्याला नाही येणार. आजोबांचा परिवार खूप मोठा होता. त्या घरात आम्ही दहा लोक राहत होतो. दोन मामा-मामी, त्यांच्या मुली, आजी-आजोबा आणि मी.. आणि जर वाड्याचे म्हणाल, तर जवळजवळ २२-२५ लोक असू तिन्ही घरे मिळून. आम्ही सारी मुले मिळून १०-१२ जण असू. अगदी बालवाडीत जायचो आम्ही आणि त्यातले २-४ जण पहिलीत होते. सर्व जण जवळजवळ एकाच वयाचे. फार असे अंतर नव्हते आमच्यात. त्यामुळे खूप धिंगाणा असायचा वाड्यात. सारखी ह्या घरातून त्या घरात पळापळ चाललेली असायची. दिवसातून कितीतरी वेळा भांडणे ह्यायची आमच्यात. ती सोडवण्यात धांदल उडायची आमच्या मामींची.
सकाळी लवकर उठून दात घासणे, आंघोळ, कपडे घालणे, केस विंचरणे, शाळेची तयारी हे सर्व मामीच करायच्या माझे. हे करतानाही भांडण असायचे की कोणाची आधी तयारी होते. प्रत्येक गोष्टीत स्पर्धाच असायची. मी एकटा भाचा असल्याने सर्व मामी लोक माझी मस्करी करत मला चिडवत असत. सुरुवातीला मी एकटा पडल्यासारखे वाटे व मी रडतही असे. मग आजी समजावत असे, "अरे, तू भाचा आहेस त्यांचा, म्हणून चेष्टा करतायत त्या. रडतोस का? तुही चेष्टा करत जा." मग त्यानंतर मी एकटाच पुरे असायचो त्यांना. शेवटी कंटाळून त्याच म्हणत, "तुमच्याशी बोलण्यात कोणी जिंकेल का?" आज ते आठवले की हसू येते. कसे होतो आपण..
शाळेतून घरी आल्यावर लगेचच जेवण व्हायचे. आजी खूप सुंदर स्वयंपाक करत असे. ती म्हणजे एक सुगरण होती. खूप चव होती तिच्या हाताला. खापराची खूप मोठी पुरणपोळी, शेवेचे लाडू आणि इतर पदार्थ खूप मस्त बनवायची. जेवायला सर्व मुले आणि आजोबा, मामा एकत्रच बसायचे. आजी सर्वांना वाढत असे. त्यानंतर घरातील स्त्रिया जेवायच्या. 'यज्ञ शिष्टा..' व 'वदनी कवळ'ने जेवणाची सुरुवात होत असे. हा जणू नियमच होता आजोबांचा. जेवताना हळूहळू आणि चावून खायचे आणि बोलायचे नाही, असे आजोबा म्हणत. त्यामुळे अगदी गुपचूप जेवण करावे लागे. तसेच रात्रीच्या जेवणाचे. संध्याकाळी साडेसातपर्यंत सर्वांची जेवण व्हायची. रात्री साडेनऊ वाजता झोपत असू. आजोबांची शिकवण होती - लवकर झोपायचे आणि लवकर उठायचे. झोपण्यापूर्वी रोज ते आम्हाला राम, हनुमान, कृष्ण, तुकाराम, ज्ञानेश्वर यांच्या गोष्टी सांगत.
दुपारी जेवणानंतर आम्हा सर्वांना आजोबा शिकवत आणि आमचा अभ्यास घेत असत. त्यानंतर साधारण ५ वाजता आम्ही सारी मुलें वाड्यात खेळत असू. सुरुवात लगोरी, विटीदांडू, गोट्या गोट्या, गाण्याच्या भेंड्या, क्रिकेटने आणि शेवट लपाछपीने होता असे. हे खेळताना खूप भांडणे होत असायची आमची. गोट्या खेळण्यात मी नेहमीच जिंकायचो. त्या जिंकलेल्या विविध रंगांच्या गोट्या अजूनही आहेत माझ्यापाशी.
रोज संध्याकाळी आजोबा आम्हाला देवळात नेत असत. तेथे रोज आरती होत असे. मग प्रसाद घेऊन घरी आलो की आजी 'शुभं करोति' म्हणायला लावत. आजोबा खूप छान भजन आणि कीर्तनही करत. हरिपाठ शिकवत. आजोबा एक मुनीमजी म्हणून एका गुजराथ्याकडे लिखाणाचे काम करत. खूप प्रेमळ स्वभावाचे आणि स्वाभिमानी होते आजोबा. त्यांना जवळपासच्या खेड्यातील खूप लोक ओळखत असत. आठवड्याच्या बाजारी ते लोक आजोबांना प्रेमाने धान्य, भाजीपाला, गावरान तूप, दही देऊन जात असत. खूप आदर करत असत ते लोक आजोबांचा.
आजोबांचे व्यक्तिमत्त्व आणि राहणीमान खूप रुबाबदार होते. पांढरेशुभ्र असे बारीक लाल नक्षीची किनार असलेले धोतर, गुडघ्यापर्यंत येणारा तो फुल्ल बाह्यांचा सदरा, त्यावर काळा कोट, डोक्यावर काळी बाबा टोपी आणि हातात छान कोरीव सागाची बाबा काठी. खूप रुबाबदार वाटायचे ते. घरात खाण्यापिण्याची अजिबात कमतरता नसायची. लाडू, चिवडा, शेव, चकल्या, सातले, मुटके, पापड्या अशा पदार्थांनी डबे नेहमीच भरलेले असायचे. सण, श्राद्ध अस काही असले तर मग खूपच धम्माल. वेगवेगळे पदार्थ असायचे खायला. दूध, दही, लोणी आणि घरी बनवलेले तूप यांची तर मजाच निराळी होती. थंडीच्या दिवसात आजोबा आणि आजी दोघेही मिळून डिंक-मेथीचे लाडू - अगदी साजूक तुपातले - बनवत असत. तो लाडू इतका मोठा असे की एक खाल्ला की जेवण झाल्यासारखे वाटे. घरी येणाऱ्या प्रत्येकाला आजोबा-आजी कधीही न खाता जाऊ देत नसत. घरी आलेला प्रत्येक पाहुणा म्हणजे अतिथीस्वरूप देव असतो, त्यामुळे त्याला आपल्या परीने संतुष्ट करावे असे ते आम्हाला सांगत व शिकवत.
आखाजी, दिवाळीत, सणवाराला घर अगदी भरून जात असे. दिवाळीत माझी भावंडे, मावश्या व त्यांची मुले, मोठ्या मामांच्या मुली हे सर्व जण जमत. घरात जवळजवळ २०-२२ लोक जमत असत. आजीची खूप धावपळ असायची वेगवेगळे पदार्थ, खाऊ, फराळ बनवायची. सगळे ती घरीच करायची. आम्हा मुलांची खूप धम्माल असायची. तिन्ही घरांमध्ये धावपळ आणि खाणेपिणे. सर्व आतुरतेने संध्याकाळची वाट पाहायचे मामा कधी फटाके देईल फोडायला. मामा सर्वांना सारखी वाटणी करून द्यायचा भुईचक्कर, लक्ष्मी फटाके, सुतळी बॉम्ब, कोठी, टिकल्या, नाग गोळ्या यांची. कोणाच्या नाग गोळीचा मोठा नाग बनतो यासाठी स्पर्धा व्हायची, तर कधी बंगळीवर बसण्यावरून वादविवाद. ते आनंदाचे दिवस खूप लवकर संपत असत. मग आलेली माझी भावंडे आणि मावश्या परतीला जाण्यास निघत. खूप वाईट वाटायचे तेव्हा.. आजी आपली सर्व मुलींसाठी खाऊची बांधबुंध करत असे. खूप हळवी होती आजी. मुली जाताना खूप रडायची. ती का रडायची हे तेव्हा मला कळत नव्हते. खूप दिवस आठवणी राहायच्या सोबत. नंतर परत भेटण्याचे वेध असायचे. कारण त्या काळी फोन नव्हते, फक्त पत्र लिहिली जायची. तेच एक माध्यम होते संवाद साधण्याचे.. त्यात एक ओढ असायची आपलेपणाची..
आज आपण एकमेकांशी सहज फोनवर बोलू शकतो. पण तो आपलेपणा, ती ओढ कुठेतरी हरवल्यासारखी वाटते. काळाप्रमाणे जग बदलत गेले, पण प्रेम करणारी आणि आपुलकीची माणसे मात्र हरवून गेली. प्रेम करणारे, आदर्श घडवणारे, संस्कार करणारे ते हात काळाआड झाले.
भावनिक जिव्हाळ्याचे पाठ शिकवणारे आता दिसतातच कुठे? एकत्र कुटुंब राहिलेच तरी कुठे आज?
पाचवीपर्यंत शिकलो मी आजोबांकडे. पुढे तालुका ठिकाणी बाबांनी आमचे घर केले व मी माझ्या आई-बाबांबरोबर शहरात आलो. आजोबांनी केलेल्या संस्कारांमुळे, त्यांच्या सहवासात राहिल्याने माझ्यात खूप लहान वयात समजूतदार आला होता. त्यामुळे माझ्या भावंडांशी माझे कधीही भांडण नाही झाले. त्यांचा मोठा दादा झालो होतो मी. मी कुठल्या गोष्टीसाठी आई-बाबांकडे कधीच हट्ट केला नाही.
बालपणाचा सुखद काळ निघून गेला. आता उरल्यात त्या फक्त आठवणी... कधी असे वाटते - का केले देवाने मला मोठे? तेच बालपण ठीक होते.
स्वप्नील विलास अमृतकर.
गाव - धुळे
भ्रमणध्वनी- 8884287110
प्रतिक्रिया
30 Aug 2020 - 9:36 am | गणेशा
लहानपणीच्या छान आठवणी..
30 Aug 2020 - 3:07 pm | नूतन
आठवणी.आवडल्या.
30 Aug 2020 - 6:21 pm | चौथा कोनाडा
सुरेख लेख ! आठवणी आवडल्या.
संस्कारक्षम आजी आजोबां, मामा, काका वै लोकांनी आपले बालपण समृद्ध केले. भावनिक जिव्हाळा लावला, त्या बालपणाचे सुख कश्यातच मोजता येणार नाही !
काळ बदलला, जीवनात यंत्रांनी प्रवेश केला, आक्रमण केले, त्या सुखांवर घाला घातला आणि जीवन यंत्रवत केलेय !
धन्यवाद, Giriratn Raje या लेखामधुन सुखाच्या काळात परत नेलेत !
30 Aug 2020 - 7:27 pm | सिरुसेरि
छान आठवणी आणी लेखन .
31 Aug 2020 - 7:28 am | सुमो
आणि आठवणी आवडल्या.
31 Aug 2020 - 1:38 pm | खेडूत
छान ...
आपण गिरिरत्न की स्वप्नील कळलं नाही!
त्यांची सही का मारलीय?
31 Aug 2020 - 6:52 pm | aschinch
असे म्हणतात ते खोटे नाही! स्वप्नील, छान मनापासून लिहिले, खूप लिहित रहावे!
8 Sep 2020 - 6:28 am | सुधीर कांदळकर
हळव्याच असतात. फारच सुंदर लिहिले आहे. आवडले. माझे बालपण माझ्या आजोळी आणि चि.चेही बालपण त्याच्या आजोळी गेले आहे. त्यामुळे त्याही आठवणी जागवल्यात. धन्यवाद.