सायकलायण : २. पुणे ते रायलिंग पठार (लिंगाणा)

गणेशा's picture
गणेशा in भटकंती
16 Aug 2020 - 2:07 pm

सायकलायण : २. पुणे ते रायलिंग पठार (लिंगाणा)
2019.
_______________________________
ऑक्टोबर आला की सोनकी च्या मोहक फुलांनी सारं डोंगर रान भरुन जातं. हिरव्यागार वनराईत, कधी अवचीत पावसाची रिमझीम येते तर लगेच त्या मागुन शुभ्र ढगांनी साऱ्या वाटा अडवल्या जातात. कुठे हळुवार अवखळ छोटे छोटे झरे आपल्या अस्तित्वाची उगाच जाणीव करुन देत असतात. निसर्गाचे सह्याद्रीवर अतोनात प्रेम.. या प्रेमाचा महोत्सव म्हणजेच सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर , अभेद्य अश्या गड किल्ल्यांवर, उंचच उंच शिखरांवर या अश्या सोन्याहुन पिवळ्या फुलांचा राज्याभिषेक, जणु निसर्ग सह्याद्रीचा पिवळा धमक मुकुट घालुन ताजपोशीच करतोय.

सह्याद्रीच्या किल्ल्यांवर, अनवट घाटवाटांवर, पठारांवर.. हिरव्या गार गालिच्यासम पसरलेल्या गवतावर हि फुले मनसोक्त बहरलेली असतात. वार्‍याच्या मधुर लाटे संगे या फुलांचे अनेक रंग-तरंग आपणास भुलवत राहतात. या सुंदर रानफुलांभोवती रंगीबेरंगी फुलपाखरे फेर धरुन जणु नाचत असतात. या सार्‍या मोहक सौंदर्याचा अनुभव घ्यायचा म्हणजे त्या रानवाटा, ती पठारे , ती गिरिशिखरे आपण मनसोक्त भटकलीच पाहिजेत. निसर्गाच्या प्रेमाचा हा महोत्सव अनुभवायचा म्हणजे निसर्गाच्या वाटेवर आपण चाललेच पाहिजे.

लिंगाणा आणि ढगांचा खेळ.

3
सोनकीची फुले, मागे स्वराज्याचे तोरण - तोरणा.

प्लॅन चेंज -

ऑक्टोबर चालू झाला तरी पाऊस चांगलाच कोसळत होता. नाही म्हणायला २-३ दिवस त्याने उघडिप दिली होती. आणि त्यात मी ठरवले होते, या वेळेस सायकलची सोलो ट्रीप करायची. पुण्या वरुन निघायचे आणि नेहमीच्या लोनावळ्यावरुन मागे न फिरता तसेच पुढे जायचे, पाली गावात. तिथेच मुक्काम करायचा. पहाटे मस्त सुधागड चढायचा.. मनसोक्त फिरायचे वरती.. संध्याकाळी खाली यायचे. नंतर दुसऱ्या दिवशी सरसगड करुन तसेच पुढे पाटणुस -भिर्‍याकडे जाणारा रस्ता पकडायचा. पुढे कसलाच प्लॅन न करता १-२ दिवस असेच फिरायचे आणि माघारी यायचे. ५-६ ऑक्टोबर तारीख फायनल केली निघायची. सायकल सर्विसिंग करुन आणली. खरा प्रोब्लेम माझा होता, उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही यंदा सायकल ला करकचुन ब्रेक लागला होता. २-३ छोट्या ट्रीप सोडल्या तर काही केले नव्हते. व्यायामाच्या नावाने शिमगा होता आणि वजनाचे म्हणाल तर ते चांगलेच ७-८ किलोने वाढलेले होते. त्यामुळे यावेळी आपण जिथे थकवा जाणवेल तेथे थांबायचे. एकदम कुठे जायचे आणि किती वाजता पोचायचे असले कसले ही प्लॅन करायचेच नाहीत असे ठरवले. त्यामुळे सायकल ला बांधुन यावेळेस टेंट पण न्ह्यायचा ठरवले होते.
आणि नेमके आमच्या सायकल-सायकल गृप मध्ये आमचा मित्र सिद्धु पाटील याने पुणे ते रायलिंग पठार हा प्लॅन तो करणार आहे हे सांगितले, आणि काही जन तयार ही झाले. मग मी विचार केला , आपल्याला कोठे ही जायचेच आहे, तर यांच्या बरोबर रायलिंग पठार ला जावू. नंतर ते माघारी येतील आणि आपण तसेच वेल्ह्या नंतर भुतोंडे मार्गे भाटघर परिक्रमा करुन रायगडला जावू. रायगड माझा सर्वात आवडता गड, एक दिवस रायगडावर राहु. रायगड ला सायकल वर जाण्याचे माझे स्वप्न यावेळेस पुर्ण होईल असे वाटले.. मग निवांत पाचाड मधुन जंगलातुन निजामपुर ला निघता येइल. पण तेंव्हा मला काय माहीत रायलिंग पठार म्हणजे खेळायचे काम नव्हते...

मोहरी गावाकडे प्रस्थान -

रायलिंग पठार, म्हणजे घाटवाटेचा अतिशय अवघड रस्ता. मागे मढे घाटात रॅपलिंग ला गेलो होतो तेंव्हाच रोडचे रुप बघितले होते. पण फोर व्हिलर मधुन ते इतके तसे जास्त अवघड वाटले नव्हते. आम्ही जाण्याचा रस्ता पुणे- सिंहगड रोड - पाबे घाट - वेल्हा - भट्टी - केळद - सिंगापुर - मोहरी - रायलिंग पठार असा घेतला होता. पाबे घाट सुंदर आहे, त्यामुळे तिकडुनच जायचे होते. शिवाय जाताना, खडकवासला,थोडे पानशेत आणी नंतर गुंजवनी अश्या तीन धरणांच्या आजुबाजुनं आम्ही जाणार होतो. धरणांच्या बाजुने, शांत पणे रस्त्यावर सायकल चालवणे म्हणजे खुपच भारी.
सिद्धु पाटील, संग्राम पाटील, एनएम राव हे BRM केलेली माणसे. त्यांच्या बरोबर सायकल ला जाणे म्हणजे मोठीच पर्वणी. त्यात मी आणि सौरभ त्या मानाने नवखे होतो. संग्राम सोडल्यास इतर चौघांना मी फक्त सायकल-सायकल ग्रुप मध्येच बघत असे. सिद्धु च्या म्हणण्याने आम्ही पहाटे ३:३० ला निघायचे ठरवले. म्हणजे मी झोपण्याच्या आणी उठण्याच्या मध्ये होते फक्त ३ तासाचे अंतर.
माझी ट्रीप मोठी ठरवलेली असल्याने, माझ्या सायकलच्या पॅनियर च्या दोन्ही बॅग्ज भरलेल्या होत्या. त्या बॅग्स, लाईट्स आणि इतर गोष्टी निट करुन मी घरातुन बरोबर ३:२५ ला निघालो. सप्तश्रूंगी देवीच्या मंदिरा पाशी पहाटेच गर्दी होती., बाकी सिद्धु, एनएम आणि सौरभ पिंपरी वरुन निघालेले होते. आम्ही मग नळस्पॉट च्या हॉटेल पाशी थांबण्याचा निर्णय घेतला. पुण्यात रात्र जागवणारे असले की हा नळस्टॉप चा पॉईंट त्यांना माहीत असेलच. पहाटे ३ लाच येथे जाऊन मी कित्येक दा चहा, पोहे खाल्लेले आहेत. मग तेथे आम्ही भेटलो, चहा नाष्टा ओळख झाली. आणि मग संग्राम आम्हाला नांदेड सिटी ,सिंहगड येथे भेटणार होता त्याला फोन करुन आम्ही निघालो.
माझ्या बॅग अत्यंत जड होत्या. पण सरळ रस्त्यावरती त्याचे येव्हडे जास्त काही जाणवत नव्हते. आम्ही सावकाश नांदेड सिटीला पोहचलो. संग्राम आल्यावर आम्ही पुढे पाबे घाटाकडे निघालो.
ह्या सगळ्या BRM च्या मंडळींना वेळेची बंधने नसलेली निवांत राईड करायची होती, त्यामुळे माझा जीव भांड्यात पडला होता. निसर्ग आणि गप्पा मारत आम्ही निवांत चाललो होतो. खडकवासला आम्ही पहाटे पहाटे पार करत होतो.
सिंहगड, राजगड, तोरणा या माझ्या स्वराज्याच्या अभेद्य किल्ल्यांच्या कुशीमधुन ,दुतर्फा सोनकीच्या पिवळ्या धमक फुलांनी सजलेल्या रस्त्या मधुन सायकल ने घाट वाटा पार करत असताना, पहाटेचा आल्हाददायक सूर्य हळुच सिंहगडावर डोकावत होता. त्याचबरोबर धुक्याच्या दुलई मधुन आणि ढगांच्या सानिध्यातुन पुढे जाताना, हिरव्या गार शेतामधुन, डोंगरामधुन सायकल प्रवास म्हणजे एक पर्वणीच ठरत होता.

1
सिंहगड , स्वराज्याचा सूर्योदय

रस्ता अत्यंत खराब होता. पण पहाटेचे वातावरण, पिवळ्या धमक फुलांचे ताटवे, दवबिंदू ल्यालेली गवताची पाने ह्या मधुन पुढे जाताना खुप प्रसन्न वाटत होते.
सिंहगड ला मागे टाकत आम्ही पाबे घाटाकडे निघालो होतो, आता चांगलेच उजाडले होते. गर्दी मात्र रोडवर अजिबात नव्हती. राजगड-तोरणा-वेल्हे इकडे सातारा हायवे नी पण जाता येते त्यामुळे या घाट वाटेवरुन सहसा पुण्यातली मंडळी जात नाहीत, त्यामुळे गर्दी विरळच होती. मी मात्र सगळ्यात मागे पडत होतो. कोकणाच्या घाटात पुर्ण फॉर्म ने सायकल पळवणारा मी इकडे आताच दम काढत होतो. व्यायाम वजन महत्वाचे हे नेहमी प्रमाणे मनात बोलत असताना, एन एम थांबला आणि माझी सायकल बघु लागला. एक तर दोन जड बॅग ने मागचे चाक निट उचलले ही जात नव्हते, त्यात ब्रेक लायनर सायकल ला घासत होते हे कळाले, आणि आपल्याला अधिक दम का लागतोय ते लक्षात आले. त्यात सायकल चैन ला सर्विसिंग करणार्‍या ने ऑईल लावले नव्हते, चैन रखरखीत होती, मग त्यावर पॅराशुट टाकले. आता थोडा जीवात जीव आला. पाबे घाट हा अश्या ब्रेक घासत असलेल्या अवस्थेत मी पार केला होता.
समोर राजगड चे दर्शन होत होते, आणी आमच्या आणि राजगड च्या मध्ये ढगांची दुलई. ब्रेक घेतल्या गेला.. फोटो सेशन झाले. सिद्धु भाउ ने वेगवेगळ्या अँगल ने खुप सारे फोटो काढले. ८ वाजले होते. आम्ही पाबे घाट उतरायला सुरुवात केली. स्थानिक लोकांशी बोलुन पाबे -विहीर - वेल्हे हा रस्ता घेतला. आता पर्यंतच्या प्रवासातील हा आणखीन एक सुंदर रस्ता होता. विहीर गावापासून पुढे आम्ही ९ वाजता वेल्हेत प्रवेश केला.
2
पाबे घाट

3
ढगात जाणारा रस्ता, पाबे घाट उतरताना..

सिद्धु च्या ओळखीच्या हॉटेल विसावा मध्ये आम्ही नाष्ट्यावर यथेच्छ ताव मारला.
सर्वात महत्वाचे, माझ्याकडच्या दोन्ही जड बॅग मी त्या हॉटेल वरतीच ठेवले. आणि सायकल च्या ब्रेक ला निट आहे का पाहुन आम्ही भट्टी-केळद हे घाट सर करण्यास पुढे निघालो.
पाबे घाट ही अवघड होताच. पण भट्टी आणि केळद त्या पेक्षा अवघड घाट होते. सायकल चालवणे शक्य नव्हतेच इतके अवघड चढ या घाटात होते. सायकल चे पुढचे चाक पुर्ण उचलले जायचे यावरुन याचा चढ लक्शात येइल. मग बर्याचदा पायाने नाही तर हाताने सायकल ढकलावी लागत असे. पुणे ते वेल्हे हे ५० कीमी च्या अंतरला पाबे घाटामुळे आम्हाला खुप वेळ लागला होता. आणि आता फक्त ३०-३५ कीमी राहिलेत आपण १२ पर्यंत पोहचू असे वाटले होते, परंतु ते अवघड वाटत होते. माझ्या आयुष्यातील सर्वात अवघड सायकल रस्ता मी पार करत होतो.

4
ही वाट फुलांची

5
निवांत क्षण

भट्टी-केळद घाट खुप सुंदर आहेत, पण सायकल चालवताना मात्र त्या हिरव्या गार वनराई कडे आता लक्श नव्हते. सूर्य डोक्यावर आला होता. अंतरे कापली जात नव्हती. थोड्या थोड्या वेळाने बसावेच लागत होते, आणि नंतर सायकल ढकलावी लागत होती. उतार सुद्धा इतके भयानक होते की उतारावर पण सायकल हाताने चालवत खाली यावे लागत होते.जेथे टूव्हिलर पण जीव काढेल असल्या रस्त्यावर आम्ही सायकल चालवत होतो. सिद्धु चा प्लॅन होता, पण त्याच्याकडे पुन्हा बघितले.. भावड्या आमची जबाबदारी तुझ्यावर आता असे मनातल्या मनात म्हणत आम्ही पुढे निघालो. केळद मध्ये छोटा धबधबा लागला, त्याचे पाणी डोक्यावर घेवून थोडे ताजेतवाने होऊन पुन्हा सायकल चालवायला आम्ही पुढे निघालो. वेळ निघुन चालला होता.. पोटात कावळे ओरडु लागले होते आणि रोडची अवस्था आणखिनच बिकट होउ लागली होती.
6
असाच एक फोटो..

सरतेशेवटी केळद संपला आणि उजवीकडे पाहिलं तर परत एकदा चढावच होता. मढे घाट धबधबा ४ किमी, सिंगापुर उजवीकडे १० किमी असा बोर्ड दाखवत होता. बस्स आता हा शेवटचा टप्पा असं मनाशी ठरवून आम्ही निघालो, हा रस्ता चांगला आहे अस वाटायची खोटी आणि अचानक रस्ताच संपला! समोर खडकाळ वाट, गाड्या जाऊ शकत होत्या पण सायकलवर जरा अवघड होणार होतं. आता डावीकडे लिंगाणा दिसत होता, आम्ही त्याच्या अलिकडे रायलिंगला थांबणार ती वाट दिसत होती. काहीही झाल तरी रायलिंगवर जायचच, पुढच पुढे बघू अशी मनः स्थिति होती. पाणी संपलेल, सावली दिसली की जरा दम खाऊन पुढे कूच करत होतो. यावेळी पाऊस जास्त झाल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती.

7
मोहरीच्या वाटेवर.. मागे लिंगाणाचा सुळका..

रस्ता काही केल्या उरकत नव्हता, पाणी ही संपलेले होते, भुक लागलेली होती. सिद्धु ला बाळु मोरे हे जेवन देतात माहीत होते, पण त्यांच्याशी रेंज नसल्याने कुठलाच संपर्क झालेला नव्हता. जेवन मिळाले नाही तर आमची वाट लागणार होती. २ वाजत आले होते, ५ किमी पण आता ५० किमी सारखे अवघड वाटत होते. रोड च्या एका वळणावर, एका झोपडी वजा घरात पाणी प्यालो मी. आणि पुन्हा पुढे निघालो. गावातुन येणार्‍या माणसाने बाळु मामा घरीच आहेत सांगितले आणि जीवाला बरे वाटले.
पुढे गेल्यावर एक झरा लागला, सगळ्यांनी पाणी पिऊन घेतले, पाणी संपल्याने हाल झाले होते.

8
मोहरीच्या रस्त्यावर झालेली आमची अवस्था.

9
मोहरी गावच्या कुशीत जाताना..

सिद्धु मोरे मामांच्या येथे आधी पोहचला. त्याने आमच्या जेवनाची ऑर्डर दिली. मग आम्ही एक एक करुन तेथे अंगणात पोहचलो, आणि कसलीच लाज न बाळगता, तेथेच आडवे पडलो. दुपारचे २.३० वाजले होते. ३० किमी ला ४ तास लागले होते, म्हणजे एका तासात फक्त ८ किमी आम्ही सायकल चालवु शकलो होतो. रोडची , त्या चढांची कल्पना त्यामुळे येते आहे.

मोरे मामा भारी माणुस. सह्याद्रीच्या काणाकोपर्‍यात, आदिवासी वस्ती पाड्यात, जेथे सोई सुविधा पोहचल्या नाहीत असल्या दुर्गम भागात माणुसकीचे असे सुंदर दर्शन कायमच होते. म्हणुनच मला गावाकडची, खेडेगावतील अशी दिलदार माणसे खुप भावतात.
गरमागरम भात आणि पिठलं असा स्वयपाक तयार होता. मला वाटते मी खुपच जेवलो. जेवणाची चव तर पंचतारांकीत हॉटेल ला लाजवेल अशी होती. सगळ्यांचे जेवन झाले तरी एकदा मी भात पिठलं घेतलच.
आता मोरे मामांशी छान गप्पा मारु शकलो, त्यांचा नंबर घेतला. पुन्हा इकडे सायकल वर येणार नाही, पण पठारावर नक्की येणार , कदाचीत पुढच्या वेळेस बायकोला घेवुन येईल, इतके सुंदर वातावरण, सुंदर जग तीने बघावे असे मनोमन वाटले. आणि पुढच्या वेळेस बाईक वर येवून तुमच्याकडे जेवायला येइल असे सांगितले.
बाळु मामा पण पुण्यात कुठल्याश्या हॉटेल मध्ये कामाला असतात हे कळाले, त्यांना पुण्यात पण भेटु म्हणालो.
जेवत असताना ट्रेकिंग करणारी एक व्यक्ती बाळू मोरेंकडे आली, जर्सी ओळखीची होती त्यामुळे आबा-सिद्धूभाऊंच थोडफ़ार बोलण झाल त्यांच्यासोबत. गणेश आगाशे, जवळपास वीसेक किमीचा ट्रेक करत होते, सोबत लोक होती पण ती काय आम्हाला दिसली नाही

१०
मित्र - सिद्धु पाटील, एन एम राव, सौरभ, मी, संग्राम पाटील आणि बाळु मामा.

रायलिंग पठाराकडे -
४ वाजले होते , ढग आकाशात जमा झाले होते. येव्हड्या खडतर रस्त्यावर पावसाने आम्हाला झोडपले नव्हते हेच आमचे नशिब होते. रायलिंग पठारावरून आल्यावर, परत जाताना टेंपो मिळाला तर त्यात आपण सायकल टाकु असे ठरले होते. आता रायलिंग पठाराकडे जाताना आधी जंगल लागणार होते. त्या जंगलातुन चालनच अवघड होते. तेथे आम्ही सायकल खांद्यावर घेऊन चाललो होतो. आमचे सिद्धु भाऊ लयच निश्चयी माणुस.हा पुर्ण सायकल प्रवास त्यांच्यामुळे झाला.
एनएम राव आणी सौरभ ने सायकली जंगलात शिरताना झाडाला लॉक केल्या आणि ते चालत आमच्या सोबत यायला लागले.. आता सायकल खांद्यावर घेवून सिद्धु, मी आणि संग्राम असे तिघे निघालो.सायकल खांद्यावर घेवून जाणे अवघड काम होते. पण इच्छे पुढे काही नाही. रायलिंग पठारावर सायकल चालवणारे जगातील आम्ही पहिले सायकलीस्ट असु.

रायलिंग पठारावर जाणारे आम्ही पहिले सायकलीस्ट..

पठार खुपच सुंदर आहे, जाताना बोराट्याची नाळ लागली.. सगळीकडे गवताचा हिरवा गालीचाच गालीचा, मधुन हळुवार वहाणारे छोटे छोटे झरे, वार्‍यावरती डोलणारी सोनकीची पिवळी धमक फुले , शांततेला ही मध्येच सुरेल करणारा वार्‍याचा आवाज. दूरवर दिसणार्‍या डोंगर रांगा, त्यांना बिलगून असलेले पांढरे शुभ्र ढग.. आणि मध्येच दाटुन येणारे आभाळ आणि त्याला छेदुन सुर्यकिरणांचा लिंगाणावरती होणारा अभिषेक मनाला प्रसन्न करत होता.
इथले वर्णन शब्दात करणे अवघड.. तो अनुभव प्रत्यक्ष घेण्याचा विषय आहे. समोर दिसणारा लिंगाणा मनात घर करुन जात होता. पठारावरती वार्‍याचा ढगांबरोबर खेळ चालु होता. कधी हलकेच ढग बाजुला गेले की लिंगाणा पुन्हा समोर दिसत होता.. पुन्हा ढगात लुप्त होउन जात होता.
या सर्वांना कॅमेरात कैद करणे अवघड, पण तरीही माणुस तसे करण्याचा मोह करतोच. जमेल तसे फोटो आणि अतिव सौंदर्य पाहिजेल तितकेच मनात साठवुन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. पुन्हा जंगलातुन सायकल खांद्यावर घेऊन आम्ही मोहरी कडे निघालो.

11
लिंगाणा आणि भरुन आलेलं आभाळ

12
असाच एक फोटो..

६ वाजत आले होते , बाळु मामा आमची वाट पहात होते. त्यांच्याकडे पाणी प्यालो आणि निघालो.

परतीच्या वाटेवरची कसरत -
13
परतीच्या वाटेवर..

अंधार वाढत चालला होता, परतीला कुठली गाडी मिळाली तर थांबवायची आणि निदान वेल्हे गाठायचे असे ठरले. सर्व जन आता खुप थकलेले होते. पायात तसे जास्त त्राण नव्हते. ८०-९० किमी अंतर वाटत असले तरी त्याने जवळ जवळ ३०० किमीच्या प्रवासाने होईल अशी अवस्था झाली होती. रस्त्यात मध्येच सर्वांच्या सायकलचे पुढचे लाईट्स डीस्चार्ज होउ नये म्हणुन आम्ही पुढे एक जन आणि मागे एक जन हेच फक्त लाईट्स लावणार आणि बाकीचे त्यांच्या मध्ये एका लाइनीत सायकल चालवणार असे ठरले. वाटेत जाताना, काही वस्तीवर परतणारी माणसे भेटत होती. थोडे २-३ वाक्य आम्ही बोलत होतो आणि पुन्हा पुढे निघत होतो. तुम्ही रोज कसे प्रवास करता येथे असे प्रश्न आम्ही त्यांना आश्चर्याने विचारत होतो, आणि तुम्ही सायकल वर इकडे ? असे ते आश्चर्याने आमच्याकडे बघत होते.
खडकाळ रस्ता संपण्याचे नाव घेत नव्हता, मढेघाट केळद रस्त्याला कधी लागतोय असे झाले होते..

14
ही वाट दूर जाते ...

एकदाचा खडकाळ रस्ता संपला आणी आम्ही केळद घाट चढायला सुरुवात केली. आता सगळ्यांना लाईट्स लावाव्या लागत होत्या. पुन्हा चढाला सायकली ढकलाव्या लागत होत्या. पायाला आता गोळे येत होते. एकदाचा केळद घाट चढलो, तोपर्यंत कुठलीही गाडी आम्हाला मिळाली नाही. नाही म्हणायला एक दोन वाहने गेली बाजुने, पण त्यांचा उपयोग नव्हता.
घाट उतरताना फास्ट जाता येइल असे वाटले , पण कसले काय. सायकली इतक्या जोरात खाली येत होत्या, की ब्रेक चे कर कर आवाज यायला लागले, आणि मागचे चाक उचलुन पुढे कपाळमोक्षच व्ह्यायची लक्षणे दिसु लागली. त्यामुळे उतारा वरती ही सायकल हाताने रेटत पुढे चालावे लागले. चढ आल्यावर तर पायात गोळे येत होते.
आता चालताना लाईट्स बंद केल्या जात होत्या. रात्रीची किर्र शांतता होती. घाटातल्या रस्त्यावरुन फक्त आमच्याच पावलांचा तो काय आवाज येत होता. दूरून मध्येच एखाद्या कुत्र्याचे भुंकणे ऐकु येइ इतकेच. आम्हाला एकमेकांशी जास्त बोलायची ही ताकद नव्हती. तरी कधी बळेच उगाच आम्ही एकमेकांशी काही तरी पुटपुटत होतो.
एखादी गाडीची लाईट मागुन आली की आमच्या आशा पल्लवित होत होत्या आणि पुन्हा मावळत होत्या. असे करत करत भट्टी घाट आला. आता हा शेवटचा घाट, मग वेल्हे.
माझा ४ दिवसाच्या सायकलींगचा नाद येथेच सुटला होता. गप गुमान वेल्हेत आजची रात्र काढायची आणि नंतर पुणे गाठायचे. ह्या दगडडोंगरातुन रायगड ला वळासा मारायला आता त्राण नव्हते. ही राहिलेली सफर पुन्हा केंव्हा तरी, आनखीन वैयक्तीक स्वतःची लेवल वाढवुन आपण करु हे मनाने ठरवुन टाकले. अगदीच काही नाही तर पुणे पाली सुधागड हा आपल्या हायवे वरचा रस्ता चांगला असे मनात ठरवले. आता खुपच थकवा आला होता. ९ वाजत आले होते तरी आम्ही रस्ताच चालत होतो. एक छोटासा घाट गेला की झाले वेल्हे येइल असे वाटायचे, पण पुन्हा दुसरा छोटा घाट समोर उभा असायचा. येताना हा रस्ता येव्हडा अवघड वाटला नव्हता. परतीचा प्रवास मात्र खुप अवघड.. खडकाळ वाटत होता. येतानाच कुतुहल, ओढ आता मावळली होती.
आणि काय आश्चर्य, एक बस आम्हाला पाहुन बाजुला थांबली. होय आम्हाला खुप आनंद झाला. तर बाळु मामांकडे भेटलेले गणेश आगाशे त्यात होते. त्यांचा सायकलिस्टच्या जर्सी मुळेच दुपारी त्यांच्याशी बोलणे झाले होते, बस मध्ये एकुन २ सायकलिस्ट असल्याने, त्यांना आमची अवस्था कळाली असेल. गाडीत ४ जागा मोकळ्या होत्या पण आम्ही उभे राहुन पण येवु म्हणालो आणि बस च्या वरती सायकली बांधायला गेलो सुद्धा.. सर्व सायकली निट बांधल्या, बस डायरेक्ट पुण्या पर्यंत होती. वेल्हे समोरच होते, बस मध्ये बसलो, वेल्ह्यातुन हॉटेल विसावा ला ठेवलेल्या बॅगा मी गाडीत घेतल्या आणि आम्ही निघालो पुण्याला.
आता मात्र, झाल्या प्रवासाचे खुप अप्रुप वाटत होते, येव्हडा अवघड मार्ग फक्त सिद्धु मुळे झाला असला तरी पुन्हा असे मार्ग होणे नाही असे मी त्याला म्हणालो सुद्धा.
आम्ही पुण्यात उतरलो तेंव्हा ११ वाजले होते. संग्राम नांदेड सीटी कडे मागे निघुन गेला. खुप भुक लागली होती, घरी जायचे की येथे खायचे असा प्रश्न होता. शेवटी आम्ही जेवण करु ठरवले. आणि मस्त एक हॉटेल सापडले. जेवन करुन हळु हळु सायकल चालवत आम्ही पिंपरी कडे जावू लागलो.
एनएम, सौरभ, सिद्धु यांना मी पहिल्यांदाच भेटत होतो. खुप छान माणसं ही. पुन्हा सायकल ट्रीप करु असे ठरले गेले. मी पुन्हा माझ्या पॅनीयर बॅग्ज वापरणार नाही, आनि कितीही गरज असली तरी जास्त सामान घेणार नाही हे ठरवले, वाटल्यास त्या बॅग्ज विकुन टाकु असेच मनात आले.
अश्या प्रकारे पुणे ते रायलिंग पठार ( लिंगाणा) ही सुंदर , निसर्गाच्या सानिध्यातली सायकल सफर पुर्ण झाली..
नोटः
१. पुणे ते कोल्हापुर - पन्हाळा ही २७५ कीमी ची ट्रीप ही माझी दुसरी ट्रीप होती. पण कोकणट्रीप सारखीच ती झाल्याने ती ट्रीप लिहिली नाही.
२. या ट्रीप नंतर काही दिवसानी सायकल चालवण्याकडे भर देवून, मनाली ते लेह हा सायकल प्रवास या जुलै २०२० ला करण्याचा बेत फिक्स केला होता. फक्त पैसे पाठवायचे बाकी होते आणि करोना मुळे तो प्लॅन फिसकटला. बघु पुढे काय होते.

प्रतिक्रिया

काय सुंदर फोटो आले आहेत! आणि ढगातल्या डोंगराचा विडिओ सुद्धा सुरेख.
लेखन छानच झालंय पावसाच्या सरींसारखं.
जबरी.

प्रशांत's picture

16 Aug 2020 - 11:14 pm | प्रशांत

लेख आणि फोटो मस्तच

सुंदर चित्रदर्शी लिखाण आणि कातिल फोटो.एक विनंती फोटो कसे अपलोड केले ते कृपया लिहावे.आता मलाही फोटो अपलोड करायला अडचण येत आहे.मि.पा.प्रशासनाला विनंती यावर काही सोपा मार्ग काढावा.
आपल्याला आणखी एक विनंती, मोहरीच्या मोरेंचा संपर्क क्रमांक शेअर करावा.
अश्याच आणखी एका सायकल सफरीच्या वर्णनाच्या प्रर्तिक्षेत.

गणेशा's picture

17 Aug 2020 - 10:14 am | गणेशा

सर्वांचे आभार..

मी जेथे जेथे रात्री थांबलोय/जेवण केले आहे तिथले नंबर share करतो..

1. मोहरी (रायलिंग पठार)- बाळु मोरे
+91 83788 39146

2. रायगड ( भवानी टोक, गडावरती ) - बापू
+91 94052 89285/+91 91462 84237
( आमचे परम मित्र, कौस्तुभ शिर्के यांचा ref लगेच ओळखतील, त्यांच्याकडेच राहिलेलो.)

3. राजमाची - स्वप्नील उंबरे
74981 89607 / 86050 74419

4. बामणोली (वासोटा ) - सदाभाऊ (भैरवनाथ हॉटेल पण आहे, आम्ही घरी जेवण सांगितले होते )
94226 09245

5. रायरेश्वर पठार - दगडू जंगम
92201 52743

6. कर्दे, दापोली.

कर्दे ला गेल्यास हॉटेल जास्त नाहीयेत, दापोली मध्ये आल्यावर priya's म्हणुन हॉटेल आहे जेवणासाठी, भारी चव. नंबर नाहीये.

7. पन्हाळा - गाईड आपल्याला सहसा लागत नाहीत पण
मुले बरोबर असतील तर जबरदस्त वक्तृत्व वाटलेले..

कदम +91 96733 00362

8. अजिंठा गाईड - निव्वळ अप्रतिम.. रिसर्च करणाऱ्या team मध्ये आहेत.
देशमुख (पुरातत्व खात्यात उल्लेखनीय काम आणि गाईडन्स ) 90492 27078

दुर्गविहारी's picture

20 Aug 2020 - 11:29 pm | दुर्गविहारी

धन्यवाद भाउ ! कृपया फोटो कसे अपलोड केले ते ही लिहा.गेली चार वर्ष लिखाण करतो आहे, पण धाग्यात फोटो पोस्ट करण्याची अडचण आत्ताच येत आहे.मि.पा.प्रशासनाला विनंती फोटो धाग्यात अपलोड करंण्याबाबत काही सोप्या मार्गाचा विचार व्हावा. ईमेल सारखे थेट फोटो धाग्यात अपलोड करता आले तर बरे होईल.
गुगलवर ब्लॉग लिहीताना त्यांनी छान सोय केली आहे.तसे काही करता आल्यास अनेक जणांना लिखाण करणे सोयीचे होईल.

Photo च्या बाबतीत माझेही खुप कन्फयुजन आहे, म्हणुन ते लिहिले नाही.

मी फेसबुक च्या पोस्ट वरून image address घेऊन येथे देतो..
पण आता सुमो यांनी सांगितल्यावर लक्षात आले कि fb चे address change होतात.

माझ्या सायकलायण -1 चे फोटो त्यामुळेच दिसत नाहीयेत.

मी सुमो आणि कंजुस काकांची थोडी मदत घेऊन ते प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो या शनिवारी रविवारी..
आणि मग सांगतोच..

बाकी तुमच्या सिरीज, लेख वाचण्यात खुप मज्जा येते..

महासंग्राम's picture

21 Aug 2020 - 1:39 pm | महासंग्राम

फोटो गुगल ड्राइव्ह वर अपलोड करून इकडे डकवा, फक्त त्याचा ऍक्सेस पब्लिक हवा.

अरिंजय's picture

16 Aug 2020 - 11:46 pm | अरिंजय
अरिंजय's picture

16 Aug 2020 - 11:46 pm | अरिंजय
अरिंजय's picture

16 Aug 2020 - 11:52 pm | अरिंजय
अरिंजय's picture

16 Aug 2020 - 11:57 pm | अरिंजय

भन्नाट राईड. अप्फाट वर्णन. आणि जबरदस्त फोटोज्.
सिद्धु भाऊ अन् आबा सारखे खंद्या सास्वांसोबत गेल्यास आपली फरपट होणारच. तुम्ही पण काही कमी नाहीत. सगळा संसार घेऊन त्यांच्यासोबत गेलात.

बेकार तरुण's picture

17 Aug 2020 - 12:59 pm | बेकार तरुण

मस्त, मजा आली..... फोटो बेस्ट .....

महासंग्राम's picture

17 Aug 2020 - 10:12 pm | महासंग्राम

फोटो हाफिसात दिसत नव्हते, घरी आल्यावर पुन्हा वाचला मास्तर भारी झालाय लेख. जल्ला एक प्रश्न आहे अशा मध्यम राईडच्या वेळेस दुर्दैवाने सायकल पंक्चर झाली तर काय करता म्हणजे पंक्चर काढायचं सामान सोबत असते कि कसं ?

गणेशा's picture

17 Aug 2020 - 11:12 pm | गणेशा

सर्वांचे आभार..

होय, पंक्चर किट सोबत असते..

एक गेल्या भागातील फोटो देऊन सांगतो..

1

या फोटोत मधल्या फ्रेम मध्ये एक बॉटल आहे, तिच्या बरोबर मागे हवा भरायचा लाईट वेट पंप आहे, त्या पंप ला मिटर गेज पण असते. तिच्या वर lock आहे, फ्रेम ला घासून रंग जावू नये म्हणुन तिथे त्याची व्यवस्था आहे.

या मुळ धाग्याच्या फोटोत फ्रेम च्या वरच्या नळीला जी निळी छोटी बॅग आहे त्यात पंक्चर किट आहे..
मी सोबत एक extra ट्यूब कॅरी करतो, म्हणजे नंतर puncture काढायचे.

सुदैवाने माझी सायकल अजुन puncture झाली नाही, मित्राची झालेली. मग आम्ही या साहित्याने ती puncture काढून मग पुन्हा सायकल चालवली..

प्रसाद_१९८२'s picture

19 Aug 2020 - 10:11 am | प्रसाद_१९८२

सायकलला जी हेडलाईट लावली आहे, तीचा Performance कसा आहे.
ऑनलाईन साईटवर भरपूर तर्‍हेच्या हेटलाईट/टेल लाईट आहेत त्यातून कोणत्या कंपनीच्या घ्याव्यात ?

गणेशा's picture

19 Aug 2020 - 11:26 am | गणेशा

Performance एकदम भारी आहे.

हि मी decatholon मधून 2018 ला घेतलीये.

Rating लक्षात नाही त्याचे 7/10 plus होते. (हे काहीतरी पुढच्याला आपण किती लांबून दिसतो, आणि आपल्याला किती फूट लांबचे दिसते या साठी असते बहुदा. नक्की माहित नाही.

3 तास अंदाजे चालते, कधी रात्री /पहाटे 2 तासा पेक्षा जास्त वेळ अंधारात चालवायला लागत नाही सायकल, त्यामुळे कामी येते.

किंमत अंदाजे 1100 होती.

सायकलच्या लाईट्स ह्या center ला एकत्र उजेड गोळा करतात, बल्प सारख्या सगळीकडे उजेड देत नाहीत, त्यामुळे समोरचे तेव्हढे स्पष्ट दिसते.

आणखीन एक उपयोग -

घरात लाईट्स गेल्या की हि लाईट वरच्या पांढऱ्या सिलिंग कडे तोंड करून लावायची, पुर्ण घरात उजेड reflect होतो, कुठल्या बॅटरीची गरज पडत नाही.

प्रसाद_१९८२'s picture

19 Aug 2020 - 11:30 am | प्रसाद_१९८२

धन्यवाद !

महासंग्राम's picture

20 Aug 2020 - 9:46 am | महासंग्राम

या सायकलींच्या ऍक्सेसरीज बद्दल एक लेख लिहावा हि विनंती, बेसिक सायकलिंग म्हणजे शहरातल्या शहरात सायकल वापरताना कोणत्या ऍक्सेसरीज गरजेच्या आहेत कोणत्या नाहीत अशा प्रकारे. बरेच जण राईड करणाऱयांचे पाहून भरमसाठ वस्तू घेतात आणि मग त्या तश्याच पडून राहतात

गणेशा's picture

20 Aug 2020 - 11:15 am | गणेशा

नक्कीच..

http://misalpav.com/node/28858

हा मोदक चा लेख, याचा उपयोग नक्की होईलच.

महासंग्राम's picture

20 Aug 2020 - 12:13 pm | महासंग्राम

त्यावर शेवट्चा प्रतिसाद माझाच आहे :)

सुमो's picture

18 Aug 2020 - 5:39 am | सुमो

आणि अतिशय सुंदर फोटोज.

हा अत्यंत आवडल्या गेलाय.. सुपर्ब !

Sinhgad

प्रचेतस's picture

18 Aug 2020 - 9:06 am | प्रचेतस

लैच भारी रे गणेशा,
फोटो आणि वर्णन अप्रतिम. मजा आली.

चिखल उडू नये म्हणून असणारे गार्ड तुम्ही लोक मुद्दाम काढून टाकता का? का नसतेच?

मुळ सायकल ला ते येत नाही..

पावसाळ्यात लावतो मी..
रायलिंग पठार च्या ट्रिप ला आहेत mud gaurd..
त्या नंतर काढले नाहीच नंतर..

खुप छान सायकल सफर. प्रकाश चित्रे खूप सून्दर..

अभिजीत अवलिया's picture

21 Aug 2020 - 11:00 pm | अभिजीत अवलिया

अप्रतिम भटकंती.

चौथा कोनाडा's picture

23 Aug 2020 - 1:33 pm | चौथा कोनाडा

फोटो आणि व्हीडो बघुन डोळे निवले !
लेखनबद्दल जास्त काय बोलणार !
गणेशा, अतिशय सुंदर अनुभव !