[कविता' २०२०] - फरक

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
7 May 2020 - 5:45 pm

फरक

जागत्या वैराण राती
देह माझा थरथरे
मन होई सैरभैर
मुके होऊनि झुरे

अबोल श्रांत डोळ्यांचे
अश्रू बोलके वाहती
प्रश्न तुझ्या लोचनांत
मला काही विचारती
सांडतो मी शब्द शब्द
वेच तुझी तू उत्तरे

स्वप्नही तुला कधी
दु:खाचे पडत नाही
दु:ख रोज पांघरतो
त्याशिवाय झोप नाही
कसे ऐकवू तुला मी
अंगाईगीत कण्हणारे?

माळू कशा, खोट्या आशा
सावरलेल्या तुझ्या केसात?
कष्टाची काजळी ल्यालो मी
सुवर्णअंजन तुझ्या डोळ्यांत
जखडून मी गेलेला
जग तुझे स्वैर फिरे

काळोखाचे गाणे माझ्या
उद्याच्याही निवाऱ्याचे
तुझी खुलती दालने
गीत गात प्रकाशाचे
तुझी पहाट गुलाबी
गहरी माझी सांज रे

होईल का भेट कधी
चंद्र-सूर्याची आकाशी?
तुझी आस मखमली
माझी कुवत जराशी
साद तुझी दबकते
पाय माझेही बहिरे!

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}

प्रतिक्रिया

गणेशा's picture

7 May 2020 - 5:59 pm | गणेशा

वा. आवडली कविता

+१

पलाश's picture

7 May 2020 - 6:27 pm | पलाश

+१

मन्या ऽ's picture

7 May 2020 - 8:03 pm | मन्या ऽ

क्या बात है।
कविता आवडली..

चांदणे संदीप's picture

9 May 2020 - 9:10 am | चांदणे संदीप

+१
हे

माळू कशा, खोट्या आशा
सावरलेल्या तुझ्या केसात?
कष्टाची काजळी ल्यालो मी
सुवर्णअंजन तुझ्या डोळ्यांत

आणि

होईल का भेट कधी
चंद्र-सूर्याची आकाशी?
तुझी आस मखमली
माझी कुवत जराशी

हे... खासच!

सं - दी - प

मनिष's picture

25 May 2020 - 8:19 pm | मनिष

अगदी.
ही सुरेख कविता राहून गेली मत द्यायची.

राघव's picture

14 May 2020 - 10:53 am | राघव

चांगलंय.

सत्यजित...'s picture

2 Jun 2020 - 4:21 pm | सत्यजित...

छान!