लॉकडाऊनः चौतिसावा दिवस

पिंगू's picture
पिंगू in काथ्याकूट
27 Apr 2020 - 9:59 am
गाभा: 

मार्च महिना म्हणजे आमच्या धावाधावीचा महिना. त्यात २२ तारखेपर्यंत बरीच धावाधाव केली आणि मग २३ ला लागला जनता कर्फ्यु. त्यानंतर लगेच लॉकडाऊन प्रकरण सुरु झाले आणि सगळीच कामे थांबली. दोन तीन दिवस जी कामे बाकी होती आणि ऑनलाईन करता येण्याजोगी कामे होती ती पार पाडली. मग काही दिवस वाचनाचा मनसोक्त आनंद घेतला पण मार्च संपतांना जो वैताग आला तो कशाने जाणार हा विचारच पडला होता.

तेव्हा मदतीला एक मित्र धावून आला. त्याला त्याच्या शेतावर अनेक प्रयोग करायचे होते आणि त्यालापण एका सोबतीची गरजच होती. मी त्यासाठी आनंदाने होकार दिला आणि सुरु झाला आमचा शेतीतील प्रयोगांचा प्रवास.

१ एप्रिल पासून आमचा हा उद्योग सुरु झालाय. त्यात सुरुवातीला शेतातील वाल, तूर हे काढायचे होते. वांगी, भोपळा, दुधी यांच्या वेलांना पाणी देणे ह रोजचाच उद्योग होता. त्यात पाणी हे जवळपास उपलब्ध नव्हते त्यामुळे ५ लिटरचे ४ जार २०० मीटर जाऊन खदानीतून पाणी भरून आणणे हा उद्योग जवळपास १० ते १५ दिवस करावा लागला.

पहिले दोन दिवस तर वाल आणि तूर काढण्यातच गेले. तरीही काढणी ही कशी कठीण आहे याचा प्रत्यय पहिल्याच दिवशी आला. वाकून काम केल्याने कंबर दुखत होती. तर पाणी वाहून आणल्याने दोन्ही हात भयंकर दुखत होते. त्यामुळे पहिला आठवडा हा जरा अंगदुखीनेच गाजला. घरी बायकोने दोन शब्द सुनावले ते वेगळेच.

एखादी भाजी लावायची असल्यास कुंडीत लावणे किती सोपे असते पण तेच जेव्हा शेतात लावायची असते तेव्हा काय काय पूर्वतयारी करावी लागते हे शेतकर्‍यालाच माहित. भेंडी लावायला पूर्वतयारी म्हणून प्रथम सुकलेल्या भेंडीमधून बिया जमा केल्या. मग जिथे बिया लावायच्या तिथे जमिन साफसूफ करुन अर्धा मीटर अंतर ठेवून छोटे खड्डे घेतले आणि त्यात भेंडीच्या बिया मातीचे गोळे करून टाकल्या. चाळीस खड्ड्यांचे काम करायलाच जवळपास २ तास गेले. ५ दिवसांमध्ये भेंडीच्या रोपांनी दर्शन दिल्याने मेहनतीचे चीज झाल्याचे वाटले.

मग रोपे बनवल्यावर दोन वेळेस पाणी देणे ही महत्वाची गरज होती आणि त्यासाठी मग ५०० लिटरचा सिन्टेक्सचा टँक पैदा केला. त्यामुळे पाण्यासाठीची पायपीट वाचली.

पुढे मेथी आणि मुळा लावण्यासाठी वाफे तयार केले. ते करताना कुदळ चालवायचा शून्य अनुभव असल्याने पायावर कुदळ मारता मारता वाचलो. भरदुपारी उन्हात मुळ्याच्या बिया गोळा केल्या आणि संध्याकाळी भिजवून वाफ्यात फेकल्या. मेथीचे पण असेच केले. दोन दिवसांमध्ये मेथीची चिमुकली पाने बाहेर डोकावू लागली. काही दिवसांनी उन्हाचा तडाखा वाढला आणि मेथी तसेच मुळा कोमेजल्यासारखा झाला. त्यासाठी पुन्हा जुगाड म्हणून हिरवे कापड सावलीसाठी बांधले आणि नियमित पाणी देणे सुरु केले. त्यामुळे पुन्हा एकदा मेथी आणि मुळा उभा राहिला. आता १५ मे पर्यंत मेथी आणि मुळा खुडायला येण्याची अपेक्षा आहे.

जवळपास भंगाराचे गोडाऊन आहे तिथून एक प्लास्टीक व्हेस्सेल मिळाले आणि त्यात कंपोस्ट साठी शेतातील तसेच घरातील कचरा टाकला. कंपोस्ट झाले तर ठीक नाहीतर त्यातील कचरा शेतात टाकून रोटाव्हेटरने जमिनीत गाडून टाकायचा बेत आहे.

एका लहानशा प्लॉटवर गेल्यावर्षी मित्राने प्रायोगिक तत्वावर हळद लावली होती त्यातील काही हळद काढली. अजूनही हळद काढायची बाकीच आहे. जी हळद काढली ती उकडून किसून सुकवली आणि पावडर करून घरी वापरायलापण सुरूवात केली.

आता शेतावर खोपट बनवायची तयारी करतोय. ते बनले की मग एखादी रात्र तिकडेच काढायचा बेत आहे. बघूया पुढे काय काय होते ते...

प्रतिक्रिया

प्रशांत's picture

27 Apr 2020 - 11:14 am | प्रशांत

छान अनुभव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Apr 2020 - 11:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेतीचा फोटो प्रयोगाचे फोटो. मेथे-मुळा आणि खोपटीचा फोटो टाका. लेखन आवडले. शेतीवर अचानक प्रयोग करायला गेले की असे होणारच शेतीवर बोलायला आपले मुटे साहेब लागतात. बाकी, लॉकडाऊनमधे मिपाकरांच्या विविध प्रयोगांची ओळख होतेय. आभार. लिहिते राहा.

ता.क. शशकच्या सर्व कथा एकाच ठिकाणी वाचायला दिल्याबद्दल साहित्य संपादक, चालक, मालक, प्रशासक यांचे आभार. बाकी, मिपावर पडीक आहेच. लॉकडाऊन हटत नाही, तोपर्यंत आपण पण मिपावरुन हटणार नाही असे दिसते.

-दिलीप बिरुटे

प्राडॉ, अजून खोपट बांधणी सुरु आहे. उन्हाचा बराच तडाखा बसतोय त्यामुळे काम बरेच हळू चालले आहे.

गणेशा's picture

27 Apr 2020 - 11:36 am | गणेशा

शेतकरी राजा ला सलाम..
वाचायला मज्जा आली..
शेतीतील आणखीन हि बारीक बारीक अनुभव विस्ताराने लिहिल्यास आणखीन जास्त आवडेल वाचायला..

शेती बरेच काही शिकवत आहे. नुसती शारीरिक मेहनत कामाची नाही कामाची पद्धतसुद्धा जमली पाहिजे.
अजून बरेच काही करायचे आहे. त्याची माहिती इथे अधूनमधून देत राहीनच.

गणेशा's picture

29 Apr 2020 - 12:20 am | गणेशा

शेती कुठे आहे?
नक्कीच माहिती देत चला..

यावर्षी पासून आम्ही पण शेतात जाऊ लागलोय.. वडील नोकरी लागण्या अगोदर शेतीच करायचे.. नोकरी नंतर त्याचे भाऊ करायचे शेती.
आता ज्वारी केली होती.. माझी मदत झाली नाही जास्त.. शेत जिरायती आहे, बारमाही दुष्काळ.. सुप्या जवळ आहे शेत (बारामती तालुका )

पण या वर्षी पासून तूर, ज्वारी यात मदत करणार आहेच.. पाणी नसणे हाच मोठा प्रॉब्लेम आहे.. त्यात मी पुण्याला, त्यामुळे जास्त जाणे झाले नव्हते कधी.. बघू...

शेती जवळच आहे. पनवेल मध्ये नावडे म्हणून एक गाव आहे तिथेच शेती आहे.

तुझी शेती कोरडवाहू दिसते आहे. पाण्याची सोय केल्यास बर्‍याच प्रकारची पिके घेता येतात पण नुसत्या पाण्याची सोय करून काहीच होणार नाही. तुला प्रत्यक्ष शेतावर काम करावेच लागेल.

जर पाणी कमी असेल तर कमी पाण्याची दीर्घकालीन पिके घ्यायला हरकत नाही. पण कोणत्याही दीर्घकालीन पिकाला सुरूवातीच्या काळात किमान ६ महिने ते १ वर्ष लक्ष द्यावे लागते. त्यानंतर मात्र ते उत्पादन द्यायला लागले की थोडेफारच काम करावे लागते.
उदा: शेवगा हे पीक बर्‍यापैकी उत्पादन देते. फक्त त्याला पहिले १ वर्ष चांगले जपायला लागेल.

कंजूस's picture

27 Apr 2020 - 11:39 am | कंजूस

आवडले प्रयोग.

चौथा कोनाडा's picture

27 Apr 2020 - 12:13 pm | चौथा कोनाडा

वाह भारी !
अस्सल मातीतल्या प्रयोगाचे अनुभव आवडले !
जया अंगी शेतकरीपण, तया आहेत कष्ट कठीण !

प्रचेतस's picture

27 Apr 2020 - 3:46 pm | प्रचेतस

पिंगू खूप दिवसांनी लिहिता झाल्यामुळे छान वाटले. शेतीचे प्रयोग फार आवडले.

एक सॉफ्टवेअर इंजिनियर ते एक प्रयोगशील शेतकरी ह्या तुझ्या प्रवासाबद्दल आवर्जून लिही.

ती एक लंबी कहानी म्हणता येईल. नको असताना सुद्धा झक मारून सॉफ्टवेअरमध्ये काम करत होतो.

ती लंबी कहानी येथे अवश्य येऊ देत.

जेम्स वांड's picture

27 Apr 2020 - 8:51 pm | जेम्स वांड

रानात वेळ कसा जातो कळतही नाही म्हणतात तो असा, अलग मजा असते.

प्रमोद देर्देकर's picture

27 Apr 2020 - 9:26 pm | प्रमोद देर्देकर

+1 मस्त वेळ चाललाय तुमचा . तुमच्या शेतात काम मिळेल काय ?

सोबत मिळाली तर भारीच. तसेही शेतातील काम हे सवय नसल्याने करायला बरेच जड जाते हा माझा स्वानुभव..

वाह रे पिंगू.. भारी प्रयोग सुरू आहेत.

आता अनुभवाने कळाले असेलच पण दुपारी शेतात काम करताना रूमालाची चुंबळ डोक्यावर भिजवून ठेव आणि वरून टोपी घाल.. म्हणजे उन्हाचा त्रास होणार नाही.

भरपूर पाणी प्यायला विसरू नकोस.

सावली बघून काकडी वगैरेचे वेल उभे कर.

उगाच शेकोटी वगैरे करून जळण संपवू नकोस (लॉकडाऊन नंतर मी येतोय तुला भेटायला. त्यावेळी शेकोटी करूया!)

आणि हो.. पत्ता दे. :D

सध्या दुपारी काम बंदच ठेवतो. कारण उन्हाचा तडाखा खूपच बसतो. त्यामुळे हळूहळू कामे पूर्णत्वाला नेतोय.
बाकी लाकडाचे सरपण तर भरपूर आहे. त्यात एक नवीन स्टोव्ह तयार केला आहे तो शेतावर वापरायचा आहे.

मीअपर्णा's picture

27 Apr 2020 - 9:59 pm | मीअपर्णा

एकदम प्रोफाइल चेंज सुरु आहे. फोटोही टाकले असते तर आणखी मज्जा आली असती.

लगे रहो.

रीडर's picture

28 Apr 2020 - 3:54 am | रीडर

खूप छान प्रयोग.
कृपया फोटो टाका.

आपण रोज घर ते शेत असा प्रवास करत का?

घर ते शेत असे अंतर जवळपास अडीच किमी अंतर आहे. ते अंतर कधी कधी चालून जातो तर कधी मित्राची गाडी असते.

टर्मीनेटर's picture

28 Apr 2020 - 10:57 am | टर्मीनेटर

लेखन आवडले!

एखादी भाजी लावायची असल्यास कुंडीत लावणे किती सोपे असते पण तेच जेव्हा शेतात लावायची असते तेव्हा काय काय पूर्वतयारी करावी लागते हे शेतकर्‍यालाच माहित.

अगदी खरे! अंगतोड मेहनत करावी लागते राव....

भीडस्त's picture

28 Apr 2020 - 8:09 pm | भीडस्त

अपडेट देत राहा रोज

किती क्षेत्र आहे , किती माणसं यात involved आहेत,तुम्ही रोजच्या रोज जाताय का शेतावर, किती वेळ असता वावरात- आदि गोष्टी सांगत जा
म्हणजे चर्चा करता येईल.

पाणी आणि वीज यांची sustainable व्यवस्था गरजेची आहे.

महत्त्वाचे म्हणजे हे हौसेखातर आहे की व्यावसायिक पातळीवर

कारण सारीच परिमाणं बदलतात. आमचा दृष्टिकोन व्यावसायिक.

दोन एकर मुख्य शेतीचे क्षेत्र आहे आणि ३ गुंठे भाजीपाला लावण्यासाठी जागा आहे.

या वेळेस माझा मित्र आणि मी दोघे मिळूनच शेती करायचा विचार आहे. नवीन मजूर मिळतील पण त्यांची मजुरी आणि रोजचे खाणेपिणे हे महाग जाईल. त्यापेक्षा दोन माणसे मिळून भातशेती करू शकतील या प्रकारचे प्लॅनिंग चालले आहे.

वीजेची व्यवस्था नाहीये. पाण्यासाठी पावसाळ्यातील पाणी जवळच्या खदानीत जमा होते जे पूर्ण रब्बी हंगाम आणि उन्हाळ्यात वापरता येते. सध्या रॉकेल इंजिन वापरून पाणी खेचण्याची व्यवस्था केलेली आहे. नंतर सायकल पंपाची व्यवस्था करायचा मानस आहे.

सध्या प्रायोगिक तत्वावर शेती करत आहोत ज्यात दोन कुटुंबांसाठीचे भात, डाळी आणि भाज्या यांचे उत्पादन घ्यायचा विचार आहे. हे यशस्वी झाल्यावर बँकेकडून कर्ज घेऊन पुढचे काम करायचा मानस आहे.

movaku's picture

29 Apr 2020 - 12:01 am | movaku

होय... खरंय