लॉकडाऊन: एकविसावा दिवस

श्रीरंग_जोशी's picture
श्रीरंग_जोशी in काथ्याकूट
14 Apr 2020 - 6:00 am
गाभा: 

गेल्या वर्षीचे शेवटचे दोन महिने हापिसात खूप काम होतं जे नव्या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत अधिकच वाढलं. या कारणाने बातम्यांकडे नेहमीसारखे लक्ष ठेवता येत नव्हते. तरी देखील जानेवारीत चीनमधून येणाऱ्या करोना व्हायरसच्या बातम्या दृष्टीस पडत होत्या. हे गंभीर प्रकरण आहे असे जाणवत होते. तपशिलात जाणून घ्यायला मात्र वेळ मिळाला नाही. मिपावरच्या ३१ जानेवारीला प्रकाशित झालेल्या या काथ्याकुटाच्या शीर्षकावरून या व्हायरसचा उच्चार करोनाऐवजी कहोना तर नाही असा विचार मनात आला. लेख उघडल्यावर दोन्हीचा दुरान्वयेही संबंध नाही हे लगेच कळले.

फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत चीनमधली परिस्थिती खूपच गंभीर असल्याचे बातम्यांमधल्या रुग्णांच्या व मृतांच्या आकड्यांवरून जाणवू लागले. तोवर अमेरिकेत या व्हायरसचा फारसा शिरकाव झाल्याचे जाणवत नव्हते.

मात्र फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसापासून पश्चिम किनाऱ्यावरच्या वॉशिंग्टन राज्यातल्या रुग्णांबाबत बातम्या येणे सुरू झाले. हापिसात सर्वजण सॅनिटायझरने हात आवर्जून स्वच्छ करू लागले. आम्ही मार्च ४ ते ११ या दरम्यान अमेरिकेतच नातेवाइकांकडे जायचे बुकिंग दोन महिन्यांपूर्वी करून ठेवले होते. ४ तारखेला विमानप्रवासादरम्यान प्रवाशांच्या लोकांच्या व विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या तसेच विमानातल्या केबिन क्रुच्या आचरणात काहीच फरक जाणवला नाही. आम्ही मात्र सोबतच्या सॅनिटायझरने अधून मधून हात स्वच्छ करत होतो. तसेच डिसइंफेक्टटन्ट वाइपने ट्रे टेबल व हॅण्डरेस्ट वगैरे स्वच्छ करत होतो. ४ मार्चला मिपावर डॉ. सुबोध खरे यांचा करोना विषाणू COVID-19 (Coronavirus disease 2019) हा लेख प्रकाशित झाला. या लेखातून व लेखावरच्या प्रतिसादांतून अत्यंत मोलाची माहिती व सूचना मिळत राहिल्या. यासाठी डॉ. खरे व इतर मिपाकरांचे मनःपूर्वक आभार.

पुढचा आठवडाभर अमेरिकेतल्या बातम्यांची तीव्रता अधिक वाढू लागली होती. ११ तारखेला परतताना विमानतळावर ४तारखेच्या तुलनेत थोडाफार फरक जाणवू लागला. लोक एकमेकांपासून नेहमीपेक्षा थोडे अधिक अंतर ठेवू लागले होते.माध्यमांमधल्या बातम्यांमधे कोरोनाव्हायरसचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढू लागले होते. १३ तारखेला आमच्या राज्यातल्याशाळा त्यापुढील सोमवारपासून (१६ तारीख) बंद राहतील अशी घोषणा झाली. हापिसमध्येही ज्यांना घरून काम करायचेआहे त्यांनी आवर्जून तसे करावे अशा सूचना मिळाल्या. त्यानंतर १८ तारखेपासून तर हापिसात काम करायचे असल्यासविशेष परवानगी घ्यावी लागेल असे कळवण्यात आले.

आम्ही स्वतःच्या गावी नसताना ९-१० मार्चलाच अनेकांनी दुकानांमधून टॉयलेट पेपर्स, हॅंड सॅनिटायझर्स, डिस इंफेक्टन्ट वाइप्स सारख्या वस्तू मोठ्या प्रमाणावर खरेदी करून दुकानांतली फडताळे रिकामी केली. त्यानंतर एकदाच सकाळी एक दुकान उघडल्यावर टॉयलेट पेपर्स आम्हाला खरेदी करता आले. १३ मार्चला टॉयलेट पेपर्सची एक ऑनलाईन खरेदी केली जे १३ एप्रिलला मिळणार होती. १० एप्रिलला संदेश मिळाला की ही ऑर्डर पूर्ण केली जाऊ शकणार नाही. ऍमेझॉन व इतर ऑनलाईन रिटेलर्सने मास्क्स, डिस्पोझेबल ग्लोव्ज्स, सॅनिटायझर्स वगैरे हॉस्पिटल्स व सरकारी संस्थाना प्राधान्याने विकणार असे दर्शवले आहे. टॉयलेट पेपर्स वगैरे ऑनलाईन रिटेलर्सकडे आऊट ऑफ स्टॉक आहेत. अ‍ॅमेझॉन कमी महत्त्वाच्या वस्तू उशीराने ग्राहकांना पोचत्या करण्याचे धोरण राबवत आहे जेणेकरून जीवनावश्यक वस्तू वेळेत पोचवता येतील.

दुकानातले टॉयलेट पेपरचे रिकामे फडताळ

किचन टॉवेल्सचीही टंचाई सुरू झाली होती जी आता आटोक्यात आल्याचे आढळत आहे.

मार्चच्या मध्यावर तर भारतीय वाणसामानाच्या दुकानांमध्येही झुंबड होवू लागली. भारतीयांखेरीज स्थानिक लोकही तांदूळ वगैरे मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना आढळले. या काळात केवळ हात धूत राहण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. सोशल डिस्टंसींग ही संज्ञा वापरली जात नव्हती. विविध दुकानांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याने करोनाव्हायरसचा प्रसार या काळात वाढला असावा. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून अमेरिकेतले वाढलेले रुग्णांचे व मृतांचे आकडे तरी हेच दर्शवतात.

मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच विविध सेवादात्यांच्या अन सरकारी संस्थांच्या COVID-19 बाबत ईमेल्स येऊ लागल्या. त्यापैकी काही भारतातल्या बँकांचाही होत्या. किमान ५० आयडीजवरून १०० हून अधिक ईमेल्स आतापर्यंत आल्या आहेत. त्यामध्ये आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची, ग्राहकांची कशी काळजी घेत आहोत याची माहिती होती. काहींनी ग्राहकांच्या रिवॉर्ड पॉइंटसची मुदत वर्षभराने वाढवल्याचे कळवले.

२० मार्चच्या रात्रीपासून आम्ही राहतो त्या राज्यातही (मिनेसोटा) गवर्नरने स्टे ऍट होम अध्यादेश जारी केला. केवळ जीवनावश्यक वस्तू व औषधांच्या खरेदीसाठी घराबाहेर पडावे. तेव्हापासून आम्ही वाणसामानाच्या खरेदीसाठी आठवड्यातून एकदाच दुकानात गेलो आहोत. बऱ्याच दुकानांनी कर्बसाइड पिक अप सुविधा सुरू केली किंवा तिची व्याप्ती बरीच वाढवली. यामध्ये ग्राहकांनी ऑनलाईन ऑर्डर द्यायची. ऑर्डरनुसार जिन्नस तयार असल्यावर दुकानातर्फे नोटिफिकेशन येते. त्यानंतर त्या दुकानाच्या पार्कींग लॉट मध्ये जाऊन ऑनलाईन चेक-इन करायचे. दुकानाचे कर्मचारी खरेदी केलेले सामान थेट ग्राहकांच्या गाडीपाशी आणून देतात (डिक्कीत किंवा सांगाल त्या सीटवर ठेवून देतात). यापुढे दुकानाच्या आत जाण्यापेक्षा हा पर्याय वापरायचे आम्ही ठरवले आहे.

आमच्या राज्यातल्या स्टे ऍट होमची मुदत १० एप्रिलला मध्यरात्री संपणार होती. ती आता ४ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. स्टे ऍट होम ऑर्डरमध्ये पायी फिरायला जायला, सायकलने फिरायला किंवा स्केटिंग वगैरेला तसेच पाळीव प्राणी फिरवायला मुभा देण्यात आली आहे. फक्त कुणीही शेजारून जात येत असल्यास किमान ६ फुटांचे अंतर ठेवण्याच्या सूचना आहेत. कुठलेही कारण नसताना मौज म्हणून कारने फिरणाऱ्या लोकांना ट्रॅफिक पोलिस सायटेशन (आपल्याकडच्या चलानपेक्षा एक मात्रा कमी) देत आहेत.
इतर वेळीही फारशी वर्दळ नसलेले आमच्या घराजवळचे रस्ते अधिकच रिकामे दिसत आहेत.

इथल्या शाळांचे शैक्षणिक वर्ष जूनच्या पहिल्या आठवड्यात संपते. राज्याराज्यांनुसार ही तारीख वेगळी असते. कॅलिफोर्नियाने उरलेल्या शैक्षणिक वर्षात शाळा पुन्हा भरणार नाही असे जाहीर केले आहे. हेच बहुतांश राज्यांत घडण्याची शक्यता दिसत आहे. ऑनलाईन लर्निंगचा व वर्च्युअल क्लासरुम्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. आमच्या ४ वर्षाच्या कन्येसाठी तिच्या शिक्षिकांचे आम्हाला ईमेल्स येत असतात. त्यात व्हिडिओ द्वारे कथावाचन व घरी करण्याजोगे उपक्रम सुचवलेले असतात. तसेच त्यांचे फोटो / व्हिडिओ काढून त्यांना ते पाठवता येतात.
या सगळ्या घडामोडींमध्ये लहान मुलांच्या भावविश्वावर परिणाम होत आहे. त्यांची मित्रमंडळी फुटपाथवर मैदानात दिसली तरी त्यांच्याशी दुरूनच बोलावे लागणे. सार्वजनिक पार्कांमध्ये घसरगुंडी, झोपाळा व इतर खेळण्यांवर न खेळता येणे. एवढेच काय सतत घरचेच जेवण जेवणे इत्यादी. असे असले तरी मोठ्यांपेक्षा लहान मुलेच बदलत्या परिस्थितीशी सहजपणे जुळवून घेताहेत असे माझे निरीक्षण आहे.
आमच्या घराजवळचा एका सार्वजनिक पार्क

मागच्या अंगणात बर्ड फीडरवर एकाहून एक देखणे पक्षी येत असतात. परंतु बाहेर जाऊन कॅमेराने फोटो काढायला गेल्यास दूर पळतात. काचेच्या दारापलिकडून टिपलेला हा एक रेड विंग्ड ब्लॅकबर्डचा फोटो.

अन हा एक ब्लु जेचा फोटो

अमेरिकेतल्या बातम्या पाहून भारतातल्या अनेक आप्तांनी, मित्रमंडळींनी काळजी व्यक्त करणारे संदेश पाठवले. आमच्या सुदैवाने आम्ही राहतो त्या राज्यात COVID-19 चा प्रसार बराच आटोक्यात आहे. मिनेसोटाचा अमेरिकेत ५१ (५० राज्ये व १ राजधानी) पैकी सध्या रुग्णांच्या संख्येत ३५ वा क्रमांक आहे. तसेच COVID-19 चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण निम्म्याहून अधिक आहे. भारतातल्या लोकांना अमेरिकेत COVID-19चा प्रसार पाहून खूप आश्चर्य वाटते जे साहजिकच आहे. परंतु इथे काही वर्षांपासून राहिल्यावर जाणवलेले काही घटक पाहता जे घडत आहे ते अगदीच अनपेक्षित नाही.

अमेरिका जगात लोकसंख्येचा बाबतीत तिसरा मोठा देश आहे. अमेरिकेचा मोठ्या भूभागात थंडी व बर्फामुळे लोकवस्ती बरीच विरळ आहे. यामुळे उरलेल्या बर्‍याच ठिकाणी लोकसंख्येची घनता भरपूर आहे. अमेरिकेतले बरेच लोक नोकरी / व्यवसाय व पर्यटनाच्या निमित्ताने जगभर फिरत असतात. तसेच इतर देशातले अनेक लोक नोकरी / व्यवसाय, शिक्षण व पर्यटनाच्या निमित्ताने अमेरिकेला भेट देत असतात. अमेरिकेतले हेल्थकेअर सेक्टर अतिशय गुंतागुंतीचे आहे अन गेली काही दशके अनेक समस्यांनी हैराण आहे. या समस्यांवर राजकीय क्षेत्रात सतत चर्चा होत असते परंतु परिणामकारक उपाययोजना मात्र होत नाही. पुढचे काही महिने अतिशय खडतर असणार आहेत. करोनाव्हायरसमुळे सार्वजनिक आचरणात होणारे बदल पुढची अनेक वर्षे टिकतील असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. करोनाव्हायरसच्या या संकटामुळे होणारे आर्थिक परिणाम अत्यंत घातक असतील असे अंदाज वर्तवले जात आहेत.

अमेरिकेच्या तुलनेत भारतात झालेल्या अधिक कडक उपाययोजना पाहता COVID-19च्या प्रसाराला रोखून धरण्यास आतापर्यंत उत्तम यश लाभले आहे. हीच परिस्थिती भारतात पुढेही कायम राहो अन अमेरिका व COVID-19 ने भरडले जात असलेल्या देशांमधली परिस्थिती आटोक्यात येवो ही परमेश्वराकडे प्रार्थना. आपण सर्वांनी स्वतःची व भोवतालच्या माणसांची काळजी घेत राहणे अन प्रशासनाकडून मिळणार्‍या सूचनांचे पालन करणे हे खूपच महत्त्वाचे आहे. एवढे लिहून हे लेखन थांबवतो.

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

14 Apr 2020 - 8:19 am | शाम भागवत

भारत नेहमीच युध्दांत एकी दाखवत आला आहे. तशीच एकी सध्या दिसत आहे. कोरोना हा आपला शत्रू असल्याचे भारतीयांनी मान्य केले आहे असे वाटते.
बाकी अमेरिकन हेल्थकेअर संबंधात एक लिंक सापडल्यावर देतो. वर्षभरापूर्वीची आहे.

तरी लागणीमध्ये युरोप आणि अमेरिका नकाशात लालेलाल दाखवत आहेत। एवढे लोक आले कुठून नजर चुकवून?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Apr 2020 - 11:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीरंगसेठ, अमेरिकेतील आपल्या राज्यांतील लॉकडाऊन आणि सद्य परिस्थितीचा तपशीलवार वृत्तांत पोहचला. निवांत प्रवाशांची वाट पाहात असलेले निर्जन रस्ते, अंगणात उतरलेले पक्षी. सुने सुने असलेले मुलांसाठीचे घसरगुंडी आणि ते पार्क. टॉयलेट्स पेपरचे रिकामे फडताळं. हे फक्त सिनेमात पाहिलेलं. सहा महिन्यापुर्वी जगभर असा हाहाकार उडेल असे कोणी सांगितले असते तर त्याला लोकांनी वेड्यात काढले असते. मुलांच्याच भावविश्वावर नव्हे तर मोठ्यांच्याही मनाची अवस्था अशी चलबीचल अशीच आहे.

लॉकडाऊन म्हणजे घरात कुलुपबंद होणे आणि परिस्थिती नियंत्रणात आणन्यासाठी प्रयत्न करणे असाही उपाय असतो हेही सर्व स्वप्नवत वाटतं. पण त्याशिवाय पर्याय नाही. भारतातील परिस्थिती अजून तरी नियंत्रणात आहे असे वाटते. आपण माणसं किती स्वार्थी असतो बोलतांनाही आपल्याकडे तसे कमीच मरण पावत आहेत असे बोलावे लागते. आणि त्यात समाधान मानावे लागते ही वस्तूस्थिती आहे.

आज मा.पंतप्रधानांनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा केली. आजचं बोलणं जरा बरं वाटलं, तरी सुरुवातीला असलेला मास्क काढून मग बोलायला सुरुवात करणे वगैरे ते सोडलं तर देश की बात व्यवस्थित होती असे म्हणावे वाटते. लॉकडाऊन तसेही महाराष्ट्रात तीस एप्रील पर्यंत होतेच. आपण लवकर सुरुवात केली. अनेक लोकांना त्रास सहन करावा लागला आणि ज्यांची हातावर पोटं आहेत अशांसाठी एक नवी गाइडलाईन्स आणि जिथे रुग्णांची संख्या कमी असेल किंवा नसेलच अशा ठिकाणी २० एप्रील पासून काही निर्बंध शिथील होऊ शकतात या नव्या मांडणीबरोबर आता लॉकडाऊनला अधिक कडक करण्यासंबंधी सूचना दिसून येत आहेत. तसेच देशाला आवाहान करतांना काही वॅक्सीनवर संशोधन करीत असेल तर नवतरुण आणि संशोधकांनी पुढे यावे असेही त्यांनी सांगितले.

बाकी, आमच्याकडे किराणा आणि भाजीपाला याच समस्या दिसत आहे, सोशीयल डिस्टेंन्सचा अभाव, लोकांचे रस्त्यावर येणे यावर कडक उपाययोजनांची गरज आहे. घरात बसून बोर होतं असं म्हणायला काही चांस नाही, घरात बसणे सक्तीचेचे आहे. नेटावर पडीक आहे, मिपा सोबत आहे त्यामुळे फार एकटे वाटत नाही. आज घरात बसून एकवीस दिवस झाले हेही खरं वाटत नाही. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

गोंधळी's picture

14 Apr 2020 - 11:43 am | गोंधळी

करोनाव्हायरसच्या या संकटामुळे होणारे आर्थिक परिणाम अत्यंत घातक असतील असे अंदाज वर्तवले जात आहेत.
मागील १/१.५ वर्षां पासुन ऐकत होतो की परत recession येणार म्हणुन तशी थोड्या फार प्रमाणात चिन्ह ही दिसायला लागली होती. भारताचाच GDP growth rate (४.५) पाहिला तर तो सहावर्ष खाल पर्यंत घसरला आहे. आधिच परिस्थिती खरब होती त्यात हा कोरोना आला.
https://www.cnbc.com/2020/03/27/imf-chief-georgieva-says-the-world-is-in...

चौथा कोनाडा's picture

14 Apr 2020 - 11:44 am | चौथा कोनाडा

सही लिहिलंय, काळजी, चिंता कशी वाढत गेली हे चांगलंच जाणवतंय.
पक्ष्यांचे फोटो खुप सुंदर आलेत !

टॉयलेट पेपर वापरत नसल्याने त्याच्या टंचाईची भीषणता अनुभवु शकत नाही. आमच्या परिसरात कोणतीही टंचाई नाहीय असे आमच्या आणि आजुबाजुच्या लोकांच्या अनुभवावरून जाणवतेय.

लॉक डाऊन ३ मे पर्यंत वाढवलेला आहे, तेव्हा सगळ्या प्रकारची काळजी घेणे आलेच !

जव्हेरगंज's picture

14 Apr 2020 - 12:06 pm | जव्हेरगंज

छान लेख!

मूकवाचक's picture

14 Apr 2020 - 4:16 pm | मूकवाचक

+१

प्रचेतस's picture

14 Apr 2020 - 12:08 pm | प्रचेतस

अमेरीकेतील आंखो देखा वृत्तांत आवडला. सध्या अमेरीका हे प्रादुर्भाव आणि बळींच्या बाबतीतलं सर्वात मोठं केंद्र झालंय. तेव्हा घरीच रहा, सुरक्षित राहा.

एक भाबडा प्रश्न- परदेशात (त्यातूनही अमेरिकेत) कधीच गेलो नसल्याने.
तिकडील टॉयलेट्समध्ये पाण्याची व्यवस्था (फ्लश सोडून) अजिबातच नसते का? भारतीय लोक बादली घेऊन जात नाहीत काय?

बाकी आमच्या येथे देखील पक्ष्यांचे दर्शन सध्या अतीसुलभ होते आहे. कुत्र्या मांजरांचे मात्र हॉटेलं बंद असल्याने हाल चाललेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Apr 2020 - 6:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टॉयलेट्सपेपरची इतकी आवश्यकत का ? सरसकट पाणी वापरत नाहीत की कसं ? आणि का ?
माहितीपूर्ण आणि तपशीलवार प्रतिसादाच्य प्रतिक्षेत.

-दिलीप बिरुटे

तिकडे ड्राय एरीया आणि वेट एरीया वेगवेगळा असतो.. आणि शौचकूप ड्राय एरीयात असतात.

तिकडच्या लोकांना जुगाड माहितीच नसतात की माहिती असूनही सो कॉल्ड प्रोसेस पाळायची म्हणून मुद्दाम जुगाड गोष्टींकडे दुर्लक्ष करतात देव जाणे. ;)

चौकस२१२'s picture

15 Apr 2020 - 4:37 pm | चौकस२१२

सुख म्हणजे नक्की काय असतं .. सांगा .. सांगा
हे बघा मास्तर .. यात दोन्ही हाय पाणी बी आणि कोरडं होण्याची सोय पण .. बाया आणि बाप्यासनी दोघास्नी
शिव्या थन्डी असलं तर बुडाला शीट (मराठीतील ) आधी कोमट करून घेता येतीय आणि मग शीट (विंगरीजीतली ) नीट होतिया !
पण जपानी गोष्टीला "अमेरिकन स्टयांडर्ड" हे नाव कोणत्या महाभागाने दिले कोण जाणे ..आक्रीत !
IMG_6901[1]

चौकस२१२'s picture

15 Apr 2020 - 4:37 pm | चौकस२१२

सुख म्हणजे नक्की काय असतं .. सांगा .. सांगा
हे बघा मास्तर .. यात दोन्ही हाय पाणी बी आणि कोरडं होण्याची सोय पण .. बाया आणि बाप्यासनी दोघास्नी
शिव्या थन्डी असलं तर बुडाला शीट (मराठीतील ) आधी कोमट करून घेता येतीय आणि मग शीट (विंगरीजीतली ) नीट होतिया !
पण जपानी गोष्टीला "अमेरिकन स्टयांडर्ड" हे नाव कोणत्या महाभागाने दिले कोण जाणे ..आक्रीत !
IMG_6901[1]

प्रशांत's picture

14 Apr 2020 - 6:54 pm | प्रशांत

अमेरीकेतील आंखो देखा वृत्तांत आवडला

+१

धर्मराजमुटके's picture

14 Apr 2020 - 12:14 pm | धर्मराजमुटके

टॉयलेट पेपर ची टंचाई हा विषय बहुधा करोना च्या साथीनंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा चिंतेचा विषय असावा असे जालावरच्या अनेक बातम्या, लेख वाचून वाटते. त्यावाचून नक्की काय अडते, विदेशातील शौचकुपे केवळ टॉयलेट पेपर स्नेहीच असतात काय ? आता टॉयलेट पेपर नसताना काय पर्यायी सुविधा वापरात आहेत ?

बाकी विदेशात राहणार्‍या भारतीय लोकांना आपल्या नोकर्‍या टिकतील की जातील अशा शंका भेडसावत आहेत काय ? अमेरीकेत बंदूका खरेदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे अशा बातम्या येत आहेत त्यात कितपत तथ्य आहे ?

भारतातील आलेले अमेरीकी लोक (८००-२५०० संख्या विविध वर्तमानपत्रांत आकडा वेगवेगळा आहे) सध्या अमेरीकेत जाण्यास उत्सुक नाहीत असेही वार्तांकन आढळले. त्यांना नक्की कसली भिती वाटते आहे हे काही स्पष्ट झाले नाही अजून.

पाकीस्तान मधील कोरोना संसर्ग आणि मृतांची संख्या अजूनही बर्‍याच प्रमाणात कमी आहे (संदर्भ : द डॉन हे ऑनलाईन वर्तमानपत्र). तिथे सगळ्याच गोष्टींची बोंब असताना हे प्रमाण एवढे कमी कसे असाही प्रश्न पडतो.

बरेचसे भाजपा / मोदी विरोधी लोक भारतात चाचण्या पुरेशा जास्त प्रमाणात झाल्या नाहीत म्हणून करोना संसर्गाचे प्रमाण कमी दिसत आहे असे म्हणताना दिसतात. त्यात कितपत तथ्य आहे ?

अमेरीकेत देखील मुलांना परीक्षा न घेता पुढील वर्षात ढकलणार काय ?

शाम भागवत's picture

14 Apr 2020 - 12:47 pm | शाम भागवत

ही लिंक सत्गुरू जग्गी वासुदेव यांची आहे. अंदाजे पावणे दोन तासांची आहे.

"सत्गुरू" हा शब्द येणार असल्याने ही लिंक द्यावी की नाही याचा विचार करत होतो. काही जण हा शब्द आल्यावर पुढचे काहीच वाचायची तयारी दाखवत नाहीत. शिवाय सुरवातीलाच मोंदीचं नाव आल्यावर तर काय होतं ते विचारायलाच नको. :)

तेव्हां त्यांत काय दिलंय हे थोडक्यात लिहावे व व्हिडिओ बघायचा की नाही ते वाचकांवर सोपवावे असे ठरवलंय. :)

पाचव्या आंतरराष्ट्रीय योगदिवसाच्या निमित्ताने सत्गुरूंची मुलाखत १.डॉ.सौमय्या स्वामीनाथन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मुख्य शास्त्रज्ञ (००:०५:४२ ते १:०४:३५) व त्यानंतर २.फ्रॅन्सिस गॅरी, वर्ल्ड इन्टरनॅशनल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन चे प्रमुख यांनी घेतली आहे.
ज्यांना मोदी शब्द टाळायचा नसेल तसेच सत्गुरूंची काही सेकंदाची प्रार्थना वगैरेची अ‍ॅलर्जी नसेल त्यांनी सुरवातीपासून पहावयास हरकत नाही. :)
सुरवातीला भारताचे राजदूत राजीव चंदर बोलले आहेत.

आता प्रश्नोत्तरे प्रथम डॉ.सौमय्या स्वामिनाथन
१. रंग, रूप, वंश, लिंग, श्रध्दा यामुळे मानवांमध्ये झालेली विभागणी, स्थलांतराचे वाढते प्रमाण वगैरे प्रश्न वाढत चालले आहेत. मानवांत सर्वसमावेशकता किंवा ऐक्य योगाच्या सहाय्याने आणता येऊ शकेल का? हे अध्यात्मिक उत्तर १६:५५ ला संपते.

२. तुम्ही जे काही आत्तापर्यंत सांगितले ते आपल्या शिक्षण पध्दतीमधे नाहीये. अशा प्रकारे विचार करता येतो हेही माहीत नाहीये, हल्लीची तरूण पिढी निसर्गापासून लांब शहरात वाढतेय. त्यामुळे जमीन, पाणि, हवा, जंगले यासंदर्भात जागतिक धोरण ठरवण्याबाबत तुम्ही काय सांगाल? हे अध्यात्मिक उत्तर ००:२७:३६ ला संपते.

३. आता तंत्रज्ञानातील सुधारणांमुले नवीन औद्योगिक क्रांती होऊ घातलीय. प्रचंड माहितीचा साठा व वेगवान संगणक व यंत्रे मानवाला खूप शक्ति देणार आहेत. पण ड्ब्ल्यूएचओ ला अशी भिती वाटतेय की, जर याचा उपयोग संकुचित दृष्टीने स्वतःच्या फायद्यासाठी केला गेला तर नैतीक, सामाजिक व कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हां या वरचढ होत जाणार्‍या तंत्र व यंत्रयुगात मानवाने कोणते धोरण स्विकारले पाहिजे जेणेकरून आपण ही तंत्रज्ञानातील प्रगती माणसाच्या हितासाठी वापरू शकू? हे उत्तर अध्यात्मिक नक्कीच नाहीये. पण सगळयांनाच त्यापध्दतीने विचार करायला नक्कीच लावते. हे उत्तर ००:३६:१९ ला संपते

४. हा थोडासा तिसर्‍या प्रश्नाचा उपप्रश्न म्हणता येईल. तंत्रज्ञान ही अशी गोष्ट आहे की, ती चांगल्या किंवा वाईट अशा दोन्ही पध्दतीने वापरता येऊ शकते. तर असं काही करता येऊ शकेल का? की जेणे करून हे तंत्रज्ञान माणसाच्या भल्यासाठीच वापरले जाईल?
मानवजातीच्या कल्याणासाठी आत्तापर्यंत बरेच प्रयत्न केले गेले आहेत पण ते सगळे वाया गेले आहेत. त्याची कारणे या उत्तरात आहेत. भविष्यकाळाचे वेध घेणारे हे वैचारिक उत्तर ००:४०:१३ ला संपते.

५. प्राथमिक आरोग्यसेवा व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा याबद्दलचे हू चे (एसडीजी३) धेय्य पूर्ण करायला आता फक्त १० वर्षांची मुदत बाकी राहिली आहे. सर्व लोकांना आरोग्यसेवा मिळाली पाहिजे. तसेच आरोग्यदायी आयुष्यासाठी स्वच्छता, पाणि वगैरेचे प्रश्नही सोडवायचे आहेत. तर त्यासाठी योगा काय मदत करू शकेल. विशेषकरून भारतातील तुमचे अनुभव काय आहेत?
आरोग्याबद्दल अमेरिकन व पाश्चात्य लोकांचा दृष्टिकोनावर येथे भाष्य केले आहे. तो बदलला पाहिजे तेही सांगितले आहे. ००:५३:१३ ला भारताबद्दल एक मिनिट बोलले आहेत. हे वैचारिक उत्तर ००:५५:२८ ला संपते.

६. लस व लसीकरण याला आत्तापर्यंत खूप महत्व दिले जात होते. पण विकसीत देशात आता त्याला देण्यात येणारे महत्व कमी होत चाललंय. मुलांना लसीकरण करण्यातला उत्साह कमी होत चालला आहे. हे कसं बदलता येईल?
फारच मजेशीर उत्तर आहे. हे वैचारिक उत्तर ०१:०४:३९ ला संपते.

आता फ्रॅन्सिस गॅरी प्रश्न विचारताहेत. (०१:०६:१८ पासून पुढे)
१. काही वर्षांपूर्वी देशादेशांतल्या भिंती गळून पडत होत्या. आता परत लोकांमध्ये भिंती उभारायला सुरवात झालीय. सिमा बंद केल्या जाताहेत. वस्तूंच्या आयातीवर बंधने घातली जाताहेत. अशा परिस्थितीत तुमच्या सर्वसमावेशकता या मुद्दयाबद्दल तुम्ही काय सांगाल?
उदारमतवादाला का यश मिळालं नाही त्याचे उत्तर इथे दिलंय. तसच उपाययोजनाही सुचवलीय. हे वैचारिक उत्तर ०१:११:११ ला संपते.

२. भौतिकशास्त्रज्ञ अस म्हणताहेत की, सगळ्या गोष्टी वैश्विक नियमांनी बांधलेल्या आहेत. मग माणसाला आपल्या इच्छेनुसार वागता येत की नाही? का तो एक भ्रम आहे? हे वैचारिक उत्तर ०१:१७:१० ला संपते.

यापुढे जे आहे ते पहायच की नाही ते तुम्ही ठरवालंच. :)

शाम भागवत's picture

14 Apr 2020 - 3:05 pm | शाम भागवत

पण तरीही लहितो.
यानंतरचे दोन प्रश्न भारताबद्दल आहेत. भारतातील पाणीप्रश्न, शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवरचे उपाय वगैरे. (यात अध्यात्म किंवा योगा अजिबात नाहीये.)

पाकीस्तान मधील कोरोना संसर्ग आणि मृतांची संख्या अजूनही बर्‍याच प्रमाणात कमी आहे, हे अजुन सिध्द व्हायचे आहे, कारण तिकडे तपासणी प्रमाण खुप कमी आहे. जितकी तपासणी झाली त्यामधे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे. म्हणजे जाहीर रुग्णांची संख्या आणि प्रत्यक्ष रुग्ण संख्या यात फरक आहे.

प्रमोद देर्देकर's picture

14 Apr 2020 - 1:07 pm | प्रमोद देर्देकर

रंगा बरे वाटले इतक्या दिवसांनी तु लिहता झालास?

जपुन रहा आणि तुझे काम पण घरुनच होते आहे ना?

सौंदाळा's picture

14 Apr 2020 - 2:22 pm | सौंदाळा

रंगाचे ठीक आहे पम्या भाऊ, पण तुम्ही सुद्धा बऱ्याच दिवसांनी दिसलात.
लिहिते व्हा ही विनंती
अवांतर : बाकी ते एक्का काका, नाखू काका, सूड, टका, पैसा, यशोधरा, पिरा ताई कुठे गायब झालेत सध्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Apr 2020 - 6:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही सदस्य नियत वयोमानानुसार जालावरुन निवृत्त झाले असावेत. काहींना वयोमानानुसार साधारणतः साठी पासष्टीला जालावर लिहिणे होत नाहीत.
हात थरथरायला लागते, मान आणी मन स्थिर राहात नाही. आणि वयस्कर अवस्था आली की चिडचिड होते, त्यामुळे वरील काही सदस्य जालावरुन गायब असावेत असे वाट्ते. जिथे असाल तिथे काळजी घ्या, घराबाहेर पडू नका. :)
(ह. घ्या)

-दिलीप बिरुटे
(खोडसाळ)

चौथा कोनाडा's picture

15 Apr 2020 - 1:09 pm | चौथा कोनाडा

एक्का काका सध्या फेसबुकवर खुप रमलेले आहेत असे दिसतेय !
सहलींचे फोटो आणि स्थळसंबंधी माहिती, प्रवास असे लेखनही दिसते !

सौंदाळा's picture

14 Apr 2020 - 2:18 pm | सौंदाळा

अमेरिकेतली बदलत गेलेली परिस्थिती तुम्ही नेमकी टिपली आहे.
टॉयलेट पेपरची चिंता किमान भारतीयांना तरी पडू नये ;)

हा प्रॉब्लेम अमेरिकेत राजकीय पण होता असे वाचले होते, अमेरिकेतल्या मित्राने पण दुजोरा दिला. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात गुरू, शुक्र मित्राने घरून काम केले, सोमवारी गव्हर्नरने फतवा काढला की लॉक डाऊनची गरज आपल्या राज्यात नाही म्हणून तो मंगळवारपासून परत ऑफिसमध्ये जायला लागला. पुढचं माहीत नाही
सध्या पण असे काही चालू आहे का आता सरसकट लॉक डाऊन आहे तिकडे?
लोक (शेजारी पाजारी) एकमेकांना मदत करत आहेत का अलिप्त आहेत?

अमेरिकेचा फोटोमय वृत्तांत आवडला !
टॉयलेट पेपर्स बद्धल तर बरचं वाचलय...

सर्व अमेरिकन मिपाकर आणि अमेरिकन हिंदुस्थानी नागरिक यांच्या सुरक्षित राहण्या विषयी मी प्रार्थना करतो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Badshah - Genda Phool | JacquelineFernandez | Payal Dev

मित्रहो's picture

14 Apr 2020 - 6:25 pm | मित्रहो

नेहमीप्रमाणे फोटोसुद्धा खूप छान. कॅलिफोर्निया आणि न्यू यॉर्क मधे इतर राज्यांच्या तुलनेत आधी इमर्जन्सी जाहीर करण्यात आली होती असे वाचले होते. मार्चच्या सुरवातीला एका रेस्टारंटमधे एक ओळखीचे कुटूब भेटले. छान गप्पा मारल्या. बोलताना समजले की त्यांच्यातली ती दहा दिवसांपूर्वीच अमेरीकेवरुन आली होती त्यामुळे तिच्या कंपनीने तिला दोन आठवडे घरी राहायला सांगितले होते. पुढले चार दिवस मला झोप नाही आली.
भारतात लॉकडाउन सुरु होण्याआधीच सोशल डिस्टसिंग बद्दल सूचना सुरु होत्या. आता लॉकडाउन होणार मग काही खायला मिळणार नाही या भावनेतून सुपरमार्केट रिकामी होत होती. मी येथील एका सुपर मार्केट मधे गेलो होतो. दुकानाची एक बाजू पूर्ण रिकामी. साबण, शॅम्पू भरपूर होते. पण रवा, साखर, उडद दाळ (दक्षिण भारतात फार गरजेची वस्तू) काही नाही. ट्रक आला तसे लोकांची झुंबड उडाली. मी दूरच राहिलो. बीलासाठी लाइन मोठी होती. माझा नंबर जवळ आला तेंव्हा बघून आलो गर्दी नव्हती मला हव्या त्या वस्तू मिळाल्या. रांगेत सुद्धा तुम्ही लोकांच्या दूर जाऊन अंतर ठेवत असला तरी समोरचा ऐकत नव्हता. साऱ्या प्रकारच्या संताप आला होता. घरी येताच वाचले अमेरीकेत सुद्धा लोक सुपर मार्केटमधे सोशल डिस्टसिंग पाळत नाही आहेत. शेवटी एकच विचार मनात आला. माणसे सर्वत्र सारखीच असतात. थोडाबहुत फरक असतो बाकी सारखेच. लॉकडाउन होणार म्हणून दुकानात होणारी गर्दी, गरजेपेक्षा अधिक केलेली खरेदी, पोलिस नसेल तर बाहेर पडायची प्रवृत्ती. सर्वत्र हे असेच आढळले. इटली, अमेरीका, स्पेन, फ्रांस, भारत सर्वत्र सारखेच.

धर्मराजमुटके's picture

14 Apr 2020 - 7:41 pm | धर्मराजमुटके

वांद्रे स्टेशनवर लॉकडाऊनचा फज्जा.
संचारबंदी मोडून एवढे लोक एकत्र जमतात कसे हे मोठेच रहस्य म्हणायला हवे.

चौकटराजा's picture

14 Apr 2020 - 7:45 pm | चौकटराजा

मुबई बाण्द्रा स्तेशनवर म्हणे हजारो लोक लोक स्टेशनवर भूकेकंगाल होऊन उतरले आहेत. गावाकडे पाठवा काही करून अशी मागणी करताहेत. पंढरपूरची यात्राच जणू ! बहुतेक आर्मी बोलवावी लागेलसे दिसते !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Apr 2020 - 8:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्ता टीव्हीवर पाहिलं इतके लोक कसे काय एकाच वेळी गर्दी करतात ?

-दिलीप बिरुटे

सौंदाळा's picture

14 Apr 2020 - 8:36 pm | सौंदाळा

गावी जायला,
व्हाट्सएप किंवा इतर सोशल मीडिया वापरून प्लॅन करूनच आले असावेत.
इकडे त्यांना समजा अन्न पाणी मिळाले तरी घरभाडे वगैरे थोडीच सरकार भरणार आहे. कोरोना आपल्या आसपास आहे आणि गावी तुलनेने असलेली बरी परिस्थिती त्यांना गावाकडे ओढून नेत असावी.

चौकटराजा's picture

14 Apr 2020 - 9:48 pm | चौकटराजा

यातले बर्याच जणाकडे गावी जायचे सामान काही नव्हते. याना एक तर फूस लावून वा रेलेवे चालू ज़ाल्याचा खोटा समज पसरवून एकत्र आणले गेले असावे !

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

14 Apr 2020 - 7:57 pm | सौ मृदुला धनंजय...

छान लेख. पक्षांचे फोटो खुप सुंदर आहेत.

जे लोक रोगी नाहीत त्यांना जाऊ द्यायला हवे. ते सहज रोज पंचवीस किमी चालतात. मुख्य म्हणजे नाशिक रस्त्याला दोन गावांत बरीच कमी वस्ती असलेली गावे आहेत. मोकळी हवा, सूर्यप्रकाश कल्याण सोडल्यावर वाढत जातो. आणि गावी गेल्याची भावना आणि वातावरण मुंबईपासून पन्नास किमीवर सुरू होते.
सोडले तर दुआ देतील.

छोटे ठाकरे म्हणतात केंद्राने २४ तासासाठी रेल्वे सुरु करावी? असे कसे शक्य आहे? कोण रुग्ण आणि कोण नाही हे कसे ठरविणार? आहे तेथे राहणे सोईचे आणि योग्य. मला यात काहीतरी गडबड दिसत आहे.

चौकटराजा's picture

14 Apr 2020 - 9:44 pm | चौकटराजा

रेल्वे उगीच घाईने बंद केली. त्यावेळी इतका प्रसार ही नव्हता. केवळ इंफ्रा रेड तापमापकाने आय्सोलेशन करून बर्याच लोकाना गावी पाठवता आले असते.

रेल्वेत एरवीही प्रचंड गर्दी असते एप्रिल मे मध्ये. आता टपावर बसतील.
इकडे मुंबईत हे लोक एका खोलीत पाच सहा राहात असावेत. काम नाही, पैसे नाहीत.
इकडे जर डॉक्टर नर्सेस बाधित होत आहेत तर गावचे नातेवाईक यांना परत बोलवत असणारच. सोशल मिडियापेक्षाही हे कारण प्रबळ असेल.
आता मला वाटतं केंद्र आणि राज्यातील नेत्यांनी मतमतांतरे देण्यापेक्षा परिस्थितीचं गांभिर्य ओळखावं.

धर्मराजमुटके's picture

14 Apr 2020 - 9:37 pm | धर्मराजमुटके

एकाला सोडले की देशभर चलो गाव की ओर आंदोलन पेटलेच म्हणून समजा.

चौकटराजा's picture

14 Apr 2020 - 9:41 pm | चौकटराजा

22 तारखेलाच मोदी मोठा लॉकडाउन ची कल्पना देऊन 23 24 25 ला सर्व लोकाना भारतभर तिकिट न काढता गावी जाता यावे अशी काही व्यवस्था करतील.मिपावर मी ही कुठेतरी म्हटले होते की रोड मॅप तयार असायला हवा होता. त्यासाठी तीन दिवस लश्कर बोलवायला लागले असते तरी चालले असते. केन्द्र सरकारनेच अनेक हॉट स्पॉट तयार करण्यास हात भार लावला. त्यात निजामुद्दीन चा ही समावेश आहे !

श्रीरंग_जोशी's picture

14 Apr 2020 - 10:35 pm | श्रीरंग_जोशी

सर्व वाचकांचे अन प्रतिसादकांना धन्यवाद.

टॉयलेट पेपर्स - जगात इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत टॉयलेट पेपर्सचा वापर सर्वाधिक आहे. अमेरिकेतल्या कमोड्सला बिडेट (ज्यातून पाण्याची बारीक धार उडते) नसतं. खरं तर टॉयलेट पेपर ही पर्यावरणासाठी घातक गोष्ट आहे. काही तज्ज्ञ मंडळी बिडेटचा प्रसार करण्याचा बर्‍याच वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. सध्याच्या परिस्थितीमुळे त्यांच्या कामाला थोडेफार यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या निर्माण झालेली आणखी एक समस्या म्हणजे काही लोक डिसइनफेक्टन्ट वाईप्स वगैरे टॉयलेटमध्ये फ्लश करत आहेत. घरातल्या कचर्‍यात टाकणे त्यांना धोक्याचे वाटत असावे. आधुनिक कमोड्सला यामुळे समस्या होत नसली तरी शहरांची मलनिस्सारण व्यवस्था तुंबू शकते. जपानमधले कमोड्स सर्वाधिक प्रगत समजले जातात (अर्थात ते महागही असतात).

अमेरिकेत सर्वसामान्य ग्राहकांनी केलेल्या टॉयलेट पेपर्सच्या साठेबाजीसाठी काही मानसशास्त्रज्ञ भूतकाळातल्या टंचाईच्या घटनांचा संदर्भ देतात.
अमेरिकेत विकला जाणारा ९०% टॉयलेट पेपर अमेरिकेतच बनतो अन १०% शेजारच्या देशांमधून आयात केला जातो. सध्याची समस्या पुरवठ्याची नव्हे तर मागणीची आहे. अनेकांनी त्यांना लागणारा वर्षभराचा किंवा त्यापेक्षाही अधिक साठा करून ठेवला आहे.
काही दुवे:

अमेरिकेत काही काळासाठी आलेले अनेक भारतीय (बहुतेक करून ज्येष्ठ नागरिक) सध्या इथे अडकले आहेत. तसेच काही अमेरिकन नागरिक (यात बहुसंख्येने पूर्वाश्रमीचे भारतीय नागरिक) भारतात अडकले आहे. अमरिकेचे स्टेट डिपार्टमेंट त्यांच्यासाठी चार्टर्ड फ्लाईटची व्यवस्था करत आहे. माझे एक स्नेही श्री मोहन रानडे त्यांच्या फेसबुकवर याबाबत वेळोवेळी नवी माहिती प्रकाशित करत असतात.

आम्ही राहतो त्या राज्याविषयी एक बातमी - Experts explain why Minnesota has the nation's lowest per capita COVID-19 infection rate.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Apr 2020 - 2:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसादाबद्दल आभार.

-दिलीप बिरुटे

श्रीरंग_जोशी's picture

20 Apr 2020 - 8:25 pm | श्रीरंग_जोशी

जवळपास ४० दिवसांच्या टंचाईनंतर आम्हाला जवळच्या दुकानात हॅण्ड सॅनिटायझर्स व टॉयलेट पेपर्स मिळू शकले. प्रत्येक ग्राहकाला ठराविक मर्यादेतच खरेदी करण्याची मुभा आहे. टॉयलेट पेपर्सचे पॅकेटही १२ रोल्सपर्यंतच उपलब्ध आहे. इतर वेळी ते ३६ ते ४८ रोल्सचेही उपलब्ध असते.

गणेशा's picture

27 Apr 2020 - 8:24 am | गणेशा

चांगले लिहिले आहे, सगळे रिप्लाय पण वाचले.. मस्त

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Apr 2020 - 7:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ट्रंप तात्या सध्या सटकून गेले आहेत वाटतं काही तरी स्टेटमेंत करतात आणि लोक जीविताच्या भितीने काहीही करायला तयार होतात, काही तरी रसायन पिल्याने विषबाधा झाल्याच्या बातम्या वाचल्या. माणसं सर्वत्र सारखीच हेच या निमित्ताने दिसून आले.

-दिलीप बिरुटे