दि. १८ मार्च २०२० : पंतप्रधान मोदींनी रविवार २१ मार्च या दिवशी जनता कर्फ्यु चं आवाहन केलं आणि तेव्हाच भविष्यात हे असे कर्फ्यु किंवा लॉक डाऊन होतील अशी खात्रीच पटली.
२४ मार्च २०२० : वेळ संध्याकाळी ८ वाजता : मोदींनी लॉक डाऊन ची घोषणा केली आणि सोसायटीच्या व्हाट्सअप्प ग्रुपमध्ये खळबळ उडाली. तातडीने सेक्रेटरीनी एक मिटींग बोलावली आणि येणाऱ्या लॉक डाऊनच्या दिवसात आपण सोसायटी, त्यातील लोकं आणि सोसायटीत काम करणारे ह्यांची कशी काळजी घ्यायची त्याचा प्लॅन ठरवला गेला. मी सोसायटीमध्ये कोणत्याही घटनात्मक पदावर नसलो तरी लॉजिकल सूचना सर्वजण पाळतात असा अनुभव आहे..
मी पुढाकार घेऊन पुढील बाबी ठरवल्या..
१. सोसायटीतल्या जेष्ठ नागरिक ज्यांची मुलं दूरदेशी/ दुसऱ्या गावात राहतात त्यांची यादी आणि त्यांना लागणारी औषधे वगैरेची यादी करण्यात आली.
२. सोसायटीतल्या तरुण किंवा बाहेर जाऊ शकणाऱ्या लोकांना ते राहत असलेल्या मजल्यांवर राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांची जबाबदारी देण्यात आली.
३ सोसायटीतल्या बायकांचा अजून एक ग्रुप करण्यात आला आणि सोसायटीत राहणाऱ्या आणि मूळ गांवी घरी जाऊ न शकणाऱ्या लोकांकरता जेवण बनवणं आणि ते त्यांना पोहोचवणं ह्याचं प्लॅनिंग झालं.
४. रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांमध्ये पाणी आणि डेटॉल चं मिश्रण करून ते सोसायटीच्या वॉचमनला देण्यात आलं आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या हातावर स्प्रे मारायला सांगितला. जेणेकरून सोसायटीत येणाऱ्या प्रत्येकाचे हात तरी स्वच्छ होतील.
५. सोसायटी जवळच्या किराणामालाच्या दुकानाशी बोलून ऑर्डर आणि डिलिव्हरी पॅटर्न ठरवला.
६. घरीही डेटॉल आणि पाण्याचे मिश्रण करून ठेवले आहे आणि चुकून कोणीही घरातून बाहेर पडले किंवा बाहेरचे घरी येत असेल तर त्याने कंपल्सरी हात व पाय त्या पाण्याने साफ करूनच यायचे असा नियम बनवला आहे.
आज १ एप्रिल २०२०, लॉक डाऊनचा आठवा दिवस.. सर्व काही सुरळीत चालू आहे. संभाव्य गोष्टींची आधीच काळजी घेतल्यामुळे धावपळ करावी लागत नाहीये. कुठल्याही गोष्टीचं shortage झालेलं नाही.
आत्ताचे दिवस भविष्याचा कुठलाही जास्त विचार न करता घालवायचे आहेत, पुढचे जे कठीण दिवस येतील ते पण निघून जातील असा विश्वास आहे.
घरात मुलांबरोबर पत्ते खेळणं, चित्रपट बघणे त्यांच्याबरोबर काहींना काही ऍक्टिव्हिटी चालू आहेत. जवळपास ४५% टक्के जग बंद असल्याने ऑफीसचं काम कमी होत चाललं आहे. मला लाकूडकाम करायला खूप आवडते त्यामुळे त्याच्या जमेल तशा वस्तू बनवणे सुरू आहेच..!!
घरी बनवलेला टेबललँप.
आणखी एका अँगलने..
महाराष्ट्र मंडळ बेंगलोरच्या एका कार्यक्रमासाठी बनवलेली पालखी..
*************************************************
लॉकडाऊन मधले किस्से..
मी पुढाकार घेऊन सोसायटी मध्ये सुरू केलेल्या गोष्टी आणि त्याच्या सर्वांना दिलेल्या सुस्पष्ट सूचना यांमुळे सिक्युरिटीवाले लोक्स भलतेच इम्प्रेस झाले.. एकाने न राहवून मला विचारले.. "सर आप आर्मी में हो क्या..?"
असेच आणखी एकदा एका भोचक काकांनी "मी नक्की काय करतो..?" असे विचारले होते.. त्यांना "मी पोस्ट्मन आहे" असे सांगितल्यावर आजही ते "अरेरे हा कसा काय आपल्या सोसायटीत राहतो" अशा दयार्द्र नजरेने माझ्याकडे बघत असतात...
करोनाची भीषणता वाढण्यापूर्वी.. लॉकडाऊन वगैरे स्वप्नातही नव्हते तेंव्हा एकदा माझा मुलगा त्याच्या मित्रांसोबत सोसायटीमध्ये खेळत होता. त्या दंग्याचा एकाला त्रास झाला असावा.. त्याने मुलांना रागावून सांगितले की "इथे खेळू नका, मला करोना झाला आहे" मुले घाबरली आणि आपआपल्या घरी पळाली. माझ्या मुलाने घरी येऊन सांगितल्यावर मी त्याला भेटायला गेलो व म्हणालो.. "आपको करोना हुआ है तो चलो हॉस्पिटल चलते है... जाते जाते पोलिस स्टेशन रूकते है..!" मग तो इमाने इतबारे सॉरी म्हणाला.
**********************************************
तुम्ही तुमच्या घरी / सोसायटी मध्ये काय काय उपाययोजना केल्या आहेत आणि काय काळजी घेतली याची माहिती येऊद्या..!!
धन्यवाद - प्रसाद दाते.
प्रतिक्रिया
1 Apr 2020 - 12:49 pm | कुमार१
छान! अनुकरणीय.
चित्रे दिसत नाहीत.
घरच्या इन्व्हर्टरमधील शुद्ध पाण्याची पातळी तपासली आणि पाणी घालून योग्य ती केली. गेली अनेक वर्षे यासाठी कंपनीचा माणूस येत होता. आता दरमहा हे काम आपणच करावे असे ठरवले.
भविष्यात या ऐवजी ड्राय युनिट बसवावे का असा विचार मनात आला. म्हणजे पाणी भरणे यातून सुटका होईल. तज्ञांनी मत द्यावे / अनुभव सांगावा.
1 Apr 2020 - 12:57 pm | चौथा कोनाडा
आमच्याही सोसायटीत कोरोनाशी लढण्यासाठी सधारणपणे अशीच तयारी केलेली, त्यामुळं आज आठ्व्या दिवशीही सुरळीत शांततेच दिनक्रम सुरु आहे.
दोन चार दिअवसातुन एकदा दुध्/भाजी आणणं सोडलं तर घरीच कुलुपबंद आहे.
फोटो दिसत नाहीय, पब्लिक शेअरिंग परवानग्या तपासा.
1 Apr 2020 - 1:02 pm | Nitin Palkar
सुरेख नियोजन! चांगली माहिती. चित्रे दिसत नाहीत...
चणचण, टंचाई कोणत्याही गोष्टीची मुंबईत तरी जाणवत नाही. मुलगा जवळच राहत असल्याने दोन वेळा भाजी त्याने आणून दिली (तुम्ही अजिबात बाहेर पडू नका, असा दमही सतत देत असतो).
1 Apr 2020 - 1:02 pm | Nitin Palkar
सुरेख नियोजन! चांगली माहिती. चित्रे दिसत नाहीत...
चणचण, टंचाई कोणत्याही गोष्टीची मुंबईत तरी जाणवत नाही. मुलगा जवळच राहत असल्याने दोन वेळा भाजी त्याने आणून दिली (तुम्ही अजिबात बाहेर पडू नका, असा दमही सतत देत असतो).
1 Apr 2020 - 1:42 pm | कंजूस
टेबल लँप दिसत आहे. दुसरे दोन दुरुस्त करा.
------
तुमच्या सोसायटीतली एकी, तुमचे नियोजन आवडले.
(पण सोसायटीत चांगल्या कामामुळे पोटदुखी सुरू होते.)
-------
आवडलेत प्रयत्न.
1 Apr 2020 - 4:40 pm | मोदक
आता हे फोटो दिसत आहेत का ते बघा...
.
.
.
.
1 Apr 2020 - 5:55 pm | चौथा कोनाडा
हो, दिसत आहेत फोटो.
भण्णाट आहे टेबल लॅम्प ! एक नंबर !
1 Apr 2020 - 1:57 pm | चौकस२१२
वाह ....
-रचना ( डिझाईन ) करण्यासाठी काय करता? कॅड वापरता कुठले कि कसे?
- नक्षीदार असते तेव्हा कसे कापता? यासाठी लेसर कटिंग वापरता येते .. आपल्याइथे सहज उपलब्ध असेल कि नाही माहित नाही पण जरूर शोध घ्या
1 Apr 2020 - 2:20 pm | दाते प्रसाद
लेसर कटिंग केलेले पॅनल घर आवरताना सापडले , मग ते वापरून दिवा बनवला. माझ्या घराजवळ लेसर कटिंग करणारा माणूस आहे , त्याच्याकडून कट करून घेतो.
1 Apr 2020 - 2:22 pm | दाते प्रसाद
डिझाईन करण्याकरता illustrator किंवा Ink scape वापरतो
1 Apr 2020 - 2:37 pm | चौकस२१२
जमलं तर ३डी कॅड वापरून बघा.. विनामूल्य ३डी https://www.onshape.com/ मध्ये बरेच काही करता येते कि जे २डी मध्ये अवघड असते ..तसेच उतपादन करण्याआधी नीट बघता येते
1 Apr 2020 - 6:50 pm | दाते प्रसाद
नक्की वापरून बघतो
1 Apr 2020 - 1:59 pm | सरनौबत
सोसायटीतील उपक्रम छान. टेबललॅम्प सुंदर. आज अनेक कायप्पा समूह (एप्रिल फूल च्या अफवेने) बंद असल्याने एक नंबर वाटतंय. Social Distancing बरोबर Social Media Distancing सुद्धा असलं पाहिजे अधून-मधून. ग्रुप ऍडमिन अगदी मोदिकाकांनी ह्या पवित्र कामावर नेमणूक केल्याचा थाटात मेसेज पाठवून ग्रुप्स लॉकडाऊन करत आहेत.
1 Apr 2020 - 2:20 pm | कंजूस
आज १ एप्रिल.
आमच्याकडे आज लच्छा पराठा आणि एका क्याप्सिकमच्या भाजीवर भागवलं.

एकच मिरची

1 Apr 2020 - 4:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लॉक्डाऊनच्या काळात असे खादाडीचे फोटो फॉल समजण्यात येतील. त्रास होतो हो. लच्छा पराठा आणि भाजी पाहुन तोपासू.
ढोबळी मिरची आवडली.
-दिलीप बिरुटे
1 Apr 2020 - 4:14 pm | सस्नेह
फोटो पाहून जळजळ झाली आहे.
आमच्याकडे गेल्या तीन दिवसांपासून खंप्लीट लॉकडाउन आहे. भाजीलापण बंदी. फक्त दूध मिळतंय तेही सकाळी ६ ते ९ .
आता आणि ३ दिवस वाढवले आहेत. रविवारी आणलेल्या भाज्या संपल्या आहेत. उद्यापासून फक्त डाळी आणि उसळी.
काही कालवण प्रकार सुचवेल का कुणी ?
1 Apr 2020 - 2:44 pm | प्रचेतस
थोडंसं ऑफिसचं काम केलं आणि आता दुपारी बॅटमॅन बिगिन्स बघितला. आता पुस्तक वाचेन.
1 Apr 2020 - 9:53 pm | प्रशांत
तु बॅटमॅन चा पंखा आहेस का
1 Apr 2020 - 10:08 pm | प्रचेतस
व्हय जी.
डिसीचा पंखा.
1 Apr 2020 - 3:44 pm | जालिम लोशन
बिया पेरल्या आणी तुनळीवर जैविक युध्दात स्वतःचा बचाव संबधी चित्रफिती बघत बसलो.
1 Apr 2020 - 3:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
टेबललँप आवडला. खटपट आवडली. वेळेत बांधुन घेतलं पाहिजे हे खरं. खटपटीचं साहित्य घरीच होतं की तयार केलं. बाकी, सोसायटीसाठी केलेली तयारी आवडली.
सध्या इंटरनेट, टीव्ही आणि मोबाईल, पुस्तके वाचायचा कंटाळा. फोनला फॉर्मेट मारलं. सर्व कचरा इमेजेस डिलीट केल्या. नव्याने असलेली ऑप्रेटींग सीष्टीम मोबाईलला टाकली. काल दुपारपासून त्याच नादात अडकलो. वाट्सॅप मेसेज पाहणे टळले. आजही फोनलाच खटपट करेन.
दिल्लीच्या त्या बहादर लोकांमुळे आता बाहेरही पडावे वाटत नाही. भाजीपाल्यावाले घरापासून काही अंतरावर म्हणजे जवळच आहेत. लोक अजिबात मास्त लावून फिरतांना दिसले नाहीत. इकडे सेफ आहे, असे त्यांचे म्हणने असावे. चिकन मटनचं मार्केट बंद आहे,आठवण येतेय. बाकी, रुटीन. मिपावर पडीक.
-दिलीप बिरुटे
1 Apr 2020 - 6:53 pm | दाते प्रसाद
धन्यवाद, तसं खटपटी चं सामान घरी होतं म्हणूनच हे काहीतरी करता आलं. मला फोन, लॅपटॉप, इंटरनेट पासून शक्यतो दूर राहायचं होतं म्हणून दिवे वगैरे बनवले.
1 Apr 2020 - 9:55 pm | प्रशांत
साहेब दंडवत तुम्हाला
1 Apr 2020 - 5:16 pm | सौ मृदुला धनंजय...
सोसायटीतील उपक्रम खूपच छान. टेबल लॅम्प अप्रतिम आहेत
1 Apr 2020 - 6:56 pm | चौकटराजा
माझ्या सूचनेला अनुसरून वॉचमन व साफसफाई महिला कामगार या सोसायटीच्या थेट नोकर नसल्यातरी त्याना चहापाणी अतिरिक्त अलावन्स दिला जात आहे, बाकी येताना सॅनि टायझर वगैरे नियम सर्वाना लागू आहेत. लिफ्त मधे दोन बारकी खोकडी लावलीत . त्यात खालच्यातील काडी उचलायची बटनाला लावयची व वरच्यात टाकून द्यायची असा नियम आहे.
सकाळी बाहेर पडून औषधे व काही किराणा घेऊन आलो .कुल्ल्यावर फटके मिळाले नाहीत. आता युरोपची लेखमारला पुढे टंकायचे काम करीत आहे.सकाळी मिसळ ,संध्याकाळी पोपकोर्न खाऊन झाले.ग्यालरीतून खाली पाहिले तर भयाण शांतता बोलू लागते .असो .मी घरी एक डाऊन एक अप असे स्पॉट असलेले दोन दिवे असेम्बल करून लावले आहेत .पण त्याला जे बाहेरून डेकोरेशन करायचे त्यासाठी रेझीन नसल्याने काम थांबले आहे .
1 Apr 2020 - 10:28 pm | धर्मराजमुटके
रामायण चालू होऊन २-३ दिवस झाले मात्र बघायचा धीर होत नव्हता. परत पुर्वी सारखा आनंद मिळेल काय ही शंका होती. मात्र आज रात्री ९.०० वा. चे प्रक्षेपण पाहिले. मजा आली. जुन्या काळात गेल्यासारखे वाटले. जुने दिवस आठवले. मात्र टिव्ही भोवती पुर्वीची गर्दी नव्हती एवढाच काय तो फरक !
उद्यापासून रोज बघायचा निश्चय केला आहे. बघु या जमते का ते !
1 Apr 2020 - 11:28 pm | रमेश आठवले
लॉक डाउन सम्पताक्षणी कलम १४४ देशभर १५ दिवसा साठी लावायला हवे. तसे केले तरच आटोक्यात आलेली स्थिती परत बिघडणार नाही.
2 Apr 2020 - 11:03 am | ज्योति अळवणी
लोकांना सध्याच्या परिस्थितीचा seriousness नाही
14 May 2020 - 8:16 pm | गणेशा
किस्से आवडले..
पोस्टमन चा तर.. हा हा हा..
लाकडाच्या गोष्टी शिकवा कि मला.
8वी ते 10 वी कारपेंटर हा ट्रेड होता, तेव्हडाच संबंध