नमस्कार आणि सुसकाळ मिपा मित्र मैत्रिणी सखे सुहृद हो !
बाहेर ऊन आणि कोरोनाविषाणू मी मी, तू तू, तुम्ही तुम्ही म्हणताहेत आणि आत आम्ही आपापल्या वर्तुळात सुखेनैव पण जरासे भेदरलेले , लक्ष्मणरेषा सांभाळत बसलो आहोत.
आज लॉकडाउनचा सातवा दिवस ! आपण म्हणजे जगाचं केंद्र आहोत असं वाटू लागलंय. कारण जगामध्ये घटना इतक्या वेगाने घडताहेत आणि आपण एकाच जागी ठप्प ! अर्थात, वर्क फ्रॉम होम सोबतच बरेच दिवस तुंबलेले होम-वर्कसुद्धा सुरू असल्यामुळे वेळ जात नाही ही बातच नस्से ! काही काही सोप्या पाकृ (उपलब्ध आयटेम्स मध्ये) प्रयोगावून घेतल्या. विशेष म्हणजे टेस्टीही झाल्या. फोटोमधे कलिंगड ज्यूस आणि ब्रेड-पनीर रोल्स जसे दिसले तसे टाकले आहेत. फर्माईश झाली तर पाकृ प्रतिसादात देईन.
अधेमधे चुकून राहिलाच थोडा वेळ मोकळा तर दू.चि. वाणीवरून आणि कायप्पावरून प्रबोधनकार लगेच सरसावून बसले आहेतच.
माननीय मिपाकर मोदक यांच्याशी विनम्रतेने मतभेद व्यक्त करून सांगते. कोरोनाने जगात चालवलेला थयथयाट आणि त्यावर सुचवले जाणारे कायप्पीय तोडगे मी मन लावून पाहते किंवा वाचते. हो, जोपर्यंत कोरोनावर खात्रीशीर इलाज वैद्यकीय धुरंधरांना मिळत नाही, तोपर्यंत यातले सगळे तोडगे, वेळ पडलीच तर, वापरायची आपली तयारी आहे. अगदी मी आजवर कधी चहाची चवही जरी पाहिली नसली तरी दिवसातून चार वेळा गवती चहा आणि चायपत्ती घालून उकळलेला चहा घेण्याची मी मनोमन तयारी करुन ठेवली आहे.
हां नाही म्हणायला मघाशी दूरचित्रवाणी वर दाखवले तसे यूपीतल्या पोलिसांनी मजूर लोकांना सोडियम हायपोक्लोराइटच्या पाण्याच्या फवार्याने धुवून काढले, तितकी मात्र तयारी नाही बॉ !
हे आहेत काही सर्वसंमत प्रतिबंधात्मक तोडगे
१. घरातच रहा, बाहेर अज्जिबात पडू नका.
२. नाईलाजाने पडावेच लागले बाहेर तर मास्क हातमोजे जरुर वापरा.
३. घरी परत आल्यावर शक्यतो बाहेरच साबणाने हात धुवून मग आत या. तोपर्यंत आपल्याला नाक आहे आणि त्याला हात लावता येतो हे विसरून जा.
४. आत आल्यावर बाहेरचे कपडे पर्स पाकिट इ. वस्तू एका बॅगमध्ये घालून ती एका बाजूला उघडीच ठेवा. शक्य असल्यास काही वेळ उन्हात ठेवा. पुन्हा १२ तास त्यांना हात लावू नका. लावलाच तर सॅनिटायझर वापरा.
५. बाहेरुन आणलेल्या वस्तू १२ तास तरी हात न लावता तशाच ठेवा. भाजी वगैरे असेर तर काही वेळ मिठाच्या पाण्यात ठेवा नि मग वापरा.
६. दुधाच्या आणि इतर प्लॅस्टिक पॅकिंग बॅग्ज डेटॉलच्या पाण्याने धुवून घ्या.
औघड वाटतंय हे सगळं ? मग बघा, शत्रू किती बलाढ्य आहे त ! अमेरिका , इटली, यूके, फ्रान्स जर्मनी सगळ्यांची वाट लावलीय त्याने.
आमच्या कोल्हापुरात एक म्हण आहे. तुम्हाला सशाची शिकार करायची असली तरी वाघाच्या शिकारीच्या तयारीने बाहेर पडा !
बोला आता !!
प्रतिक्रिया
31 Mar 2020 - 9:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कलिंगड ज्यूस आणि ब्रेड-पनीर रोल्स भारी. पाकृ टाकून ठेवा. कोणाला तरी त्याचा उपयोग होईल.
बाकी तुमचं ऑफिस सुरु असेलच अत्यावश्यक सेवा म्हणून. वीजदर पाच ते सात % कमी होणार ही एक चांगली बातमी वाटली.
खरं तर होईल तितका आपण प्रतिबंध करतोच आहे. पण दळन, गॅस, दूध, भाज्या या लागतात. अर्थात सोशियल डिस्टन्स जपले पाहिजे.
बाकी, स्टे @होमचा कंटाळा येतोच. ट्रेडमिलवर वीसेक मिनिट वॉक करतोय सकाळ संध्याकाळ. आहार कमी केलाय. वाटतंय या लॉकडाऊनने वजन कमी व्हावं. सटर-फटरला जे तोंड उघडायचं त्यावर कण्ट्रोल ठेवलंय इतकंच. काल मराठी सिनेमा हाफ तिकीट पाहिला, मस्तय. पोरांनी चांगलं काम केलंय.
-दिलीप बिरुटे
31 Mar 2020 - 10:18 am | कंजूस
आम्ही उपवास कचोरी केली पण कलिंगड रस न काढताच खाल्ले.
बाकी रस्त्याला भाजी,फळ,, दूध, पाव यांचे ढीग लागले आहेत. लोक निश्चिंत झाले आहेत आणि उगाचच स्टॉक करत नाहीत.
केमिस्ट उघडे आहेत पण गर्दी नाही. मात्र एकाने नवीन जिनेरिक औषधे विक्री चार पाच महिन्यांपूर्वी काढले तिकडे दहा जण रांगेत उभे होते काल संध्याकाळी सहाला.
31 Mar 2020 - 10:49 am | विजुभाऊ
केमिस्ट उघडे नाहीत हो. कालच पाहिले दुकानातले सगळे जण शर्ट घालून वावरत होते.
( ह घ्या )
बाकी लोक आता थोडे स्थिरावले आहेत. काल आम्ही शाळेच्या मित्रांनी गूगल ड्युऑ वापरून एक गेट टुगेदर केले. गाण्याच्या भेंड्या खेळलो.
सगळे एकदम चेकाळल्यासारखे झालो होतो.
31 Mar 2020 - 11:38 am | Nitin Palkar
आकाशवाणी मुंबई ब केंद्रावर आठवड्यातून दोन वेळा 'आपली आवड' हा मराठी गीतांचा कार्यक्रम सादर केला जात असे. सध्या दुपारच्या वेळेत रोज गृह मंत्र्यांच्या आवडीचा एखादा चित्रपट अथवा नाटक 'होम थिएटर' मध्ये बघणे हा ठरीव कार्यक्रम आहे. कामवालीला रजा देलेली असल्याने भांडी घासण्याचे काम ओढवून घेतले आहे, ते मन लावून करतो. कढईवर चढलेला तेलाचा राप घालवून काढई चकचकीत केल्याने बाई पण नवीन रामावर खुश आहेत.
31 Mar 2020 - 11:58 am | प्रचेतस
आज ऑफिसचं काम, लॅपटॉप अपग्रेड करणं वगैरे काम चालू आहेत. आता एखादा सिनेमा बघेन.
31 Mar 2020 - 7:52 pm | चौकटराजा
माझ्या सी ड्राएव्ह वर 8 महिन्यात 135 जी बी खर्च झालेत. माहिती काढली असता असे कळले की डेल पी सी वर हा प्रोब्लेम एका बाय डिफॉल्ट प्रोग्राम ने येतो. पण माझा एच पी आहे. ही जागा खायची काय भान्गड आहे ? ओ एस , पी एस, एन पी व म स ओफिस ला 135 जी बी लागतात ?
31 Mar 2020 - 8:12 pm | प्रचेतस
ऑपरेटिंग सिस्टम कोणती आहे? अँटिव्हायरस नॉर्टन किंवा सिमॅनटेक असेल तर असा प्रॉब्लेम येऊ शकतो
31 Mar 2020 - 8:15 pm | चौकटराजा
ओ एस ८ चा आकडा व नोर्टन नाही आपले एन पी साधे ७५० रूपय वाले !
31 Mar 2020 - 8:37 pm | प्रचेतस
सिस्टम एकदा फुल स्कॅन करा. व्हायरसमुळे होऊ शकतं असं.
बाकी तो कुठला विवक्षित प्रोग्रॅम इन्स्टॉल केला आहे?
31 Mar 2020 - 9:12 pm | फुटूवाला
नेट प्रोटेक्टर काही बॅकअप फाईल तयार करतो. त्याला दोन पर्याय आहेत. १ नेटप्रोटेक्टर कडून ऑनलाईन सपोर्ट घेणे. २ प्रोग्रॅम फाईल्स मधून नेट प्रोटेक्टर च्या फोल्डरमध्ये जाऊन 'मॅनेज' फाईल रन करून डेटा(एनपी ने बॅकअप केलेला) उडवणे.
मला वाटतंय तस असेल तरच..
31 Mar 2020 - 10:15 pm | चौकटराजा
त्या मदून मधून मी नेहमी ऊडवतो तरीही हिशेब लागत नाहीये !
1 Apr 2020 - 7:54 am | सस्नेह
NP बरोबर नाही.
QH वापरा
1 Apr 2020 - 2:24 pm | गामा पैलवान
चौकटराजा,
तुमच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे. त्यासाठी अतिक्रमण अहवाल हाती आला पाहिजे. रेकी करण्यासाठी ट्रीसाईझ नावाचा हा प्रोग्राम मी वापरतो : https://downloads.jam-software.de/treesize_free/TreeSizeFree-Portable.zip
फाईल सेव्ह करा व अनझिप करून प्रोग्रामवर दुहेरी टिचकी मारा. प्रक्रम योजकस्नेही आहे ( = प्रोग्राम युजर फ्रेंडली आहे).
कोण किती हार्ड डिस्कची जागा खातं त्याचा चित्रमय अहवाल मिळेल.
ट्रीसाईझ चं संकेतस्थळ : https://www.jam-software.com/
आ.न.,
-गा.पै.
1 Apr 2020 - 9:08 pm | चौकटराजा
धन्यावाद भौ , करून पहातो . एकाने सांगितले एन पी हाच एक व्हायरस आहे ! तो अंटेव्हयर्स नाहीच म्हणे.
2 Apr 2020 - 10:21 am | तुषार काळभोर
हा फक्त पुण्यातल्या आयटी हार्डवेअर दुकानदारांचं पोट भरण्यासाठी विकण्यात येणारा, अँटी व्हायरस म्हणून तद्दन बिन कामी असा प्रोग्राम आहे.
क्विक हिल त्यापेक्षा जरा बरा.
मॅक अफी खूप स्लो करतो. पण सुरक्षा दर्जा अन् सपोर्ट उत्तम.
नॉर्टन बरा आहे.
फुकट मध्ये ए व्ही जी, अवस्ट अन् अविरा बरे.
विंडोज १० मध्ये अंगभूत असलेलं संरक्षण ( विंडोज डिफेंडर) बरेचदा पुरेसं आहे.
जागा कुणी खाल्ली हे शोधण्यासाठी मी ट्री साईझ वापरतो.
स्वच्छ करण्यासाठी सी क्लिनर चांगलं होतं, पण विंडोज १० वर चालत नाही ते. नवीन वर्जन फुकट पण नाहीये.
31 Mar 2020 - 12:16 pm | चौथा कोनाडा
कलिंगड ज्यूस, ब्रेड-पनीर रोल्स फोटो भारी आहेत. तोंपासू !
टीव्ही, कायप्पा वर तेच ते कोरोना बातमीपत्रं, व्हिडो, लोकांचा गर्दी करण्याचा अडाणीपणा, लाठीमार, मजुरांचे लोंढे इ. बघून उबग आलाय.
कालच आमच्या कॉर्नर भाजीबाजाराचा पोलिसांनी बंदोबस्त केला, हातगाड्या पांगवून लोकांना "सामाजिक अंतर" ठेवायला भाग पाडताहेत.
बाकी सगळीकडे शुकशुकाट आहे.
कोटा फॅक्टरी पाठोपाठ क्युबिकल्स या वेबसिरिजचे सर्व ६ भाग पाहून टाकले. एकंदरीत चांगली सिरिज होती, पण कोटा फॅक्टरी इतकं धरून ठेवलं नाही.
"दिल धडकने दो" पाहिला. ख्यातनाम दिग्दर्शिका, दिग्गज अभिनेते, त्यांचा सुंदर अभिनय, श्रीमंत निर्मिती मुल्ये, कृझ जहाज, थोडी परदेश सफर तरीही शेवट गंडला ! तशी निराशाच झाली. बाकी रामायण, महाभारत मालिकेचे रतिब चालूच आहेत. भटकंती लेख पुर्ण होत आलाय, टाकेन लवकरच.
31 Mar 2020 - 12:52 pm | कुमार१
*parasite छान आहे. प्राईमवर. मूळ कोरिअन. ऑस्करप्राप्त.
* बदल म्हणून ‘नीवेवारो’ (तेलुगु) ची हिंदी आवृत्ती पण छान. आदी, तापसी मुख्य भू.
31 Mar 2020 - 1:25 pm | मोदक
एका ग्रुपवर गप्पा मारताना "एका रानवेड्याची शोधयात्रा" चा उल्लेख झाला - काल दिवसभरात टप्प्याटप्प्याने ते पुस्तक आणखी एकदा वाचून संपवले.
******************************************
आजची पाककृती...
कच्च्या कांद्याची चटणी..
दोन कांदे
थोडासा गूळ
सुके खोबरे (हे सापडले नाही म्हणून कोकोनट पावडर वापरली)
अर्धा चमचा जिरे
कांदे लसूण तिखट
काळे मीठ.
वरील सर्व मिश्रण मिक्सर मध्ये बारीक केले. (कांदे सोलून घेऊन अर्थात)
गूळ थोडा जास्त झाला होता म्हणून फोडणीमध्ये थोडेसे तिखट घालून फोडणी केली व मिसळून घेतले.
ही चटणी ३ - ४ दिवसात संपवावी या हिशेबाने करावी.. उगाच रिसोर्सेस कमी असताना वाया जायला नकोत.
********************************
31 Mar 2020 - 1:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Coronavirus: मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी अन् शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात; राज्य सरकारचा मोठा निर्णय https://www.lokmat.com/maharashtra/coronavirus-reduction-salaries-cm-mla...
धन्यवाद....!
-दिलीप बिरुटे
(बातमीने मूड गेलेला)
1 Apr 2020 - 10:47 am | चौथा कोनाडा
वेतन कपात करण्यात आलेली नसून, वेतनाची रक्क्म दोन टप्प्यात देण्यात येणार असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्र्यांनी केलाय.
1 Apr 2020 - 1:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिल्यांदा बातमी आली तेव्हा सरसकट पन्नास टक्के कपाताची बातमी आली होती, नंतर दुरुस्त झालं असे म्हणे. बाकी, देशावर आलेल्या या संकटाच्या प्रसंगी आपलं या देशाच्या योगदानात जी मदत करता येईल आणि तितकी करु. काटकसर करुन काढू काही दिवस तो काही प्रश्न नै. सध्या एक दिवसाचा पगार देत आहोतच. अजून लागले तर अजून देऊ. आपण आपल्या देशासाठी नै देणार तर कोण देणार.
पण ज्या भारतीय बांधवांनी बाहेरच्या देशात जाऊन 'उद्योगपाणी' केले आणि भारतात येऊन समस्त भारतीयांना आज जे ''योगदान दिले'' आता त्यांचीही काहीएक जवाबदारी आहे की त्यांनीही काही तरी मदत केली पाहिजे.
-दिलीप बिरुटे
31 Mar 2020 - 9:14 pm | सरनौबत
वर्क फ्रॉम होम आणि होम-वर्क (घरचं काम) असल्याने कर्फ्यू असूनही वेळ मोकळा वेळ फारसा मिळत नाही. सगळे झोपल्यावर रात्री १२-१२:३० पर्यंत निवांत एखादा चित्रपट बघत बसतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी ८ ला उठतो. स्वयंपाकाचा आणि भांडी घासण्याचा वेळ वाचावा म्हणून सकाळचा ब्रेकफास्ट बंद केला आहे. सकाळी १२ ला कडकडून भूक लागते तेव्हा मस्तपैकी जेवतो. रात्रीचे जेवण साठेआठच्या आत शक्यतो उरकतो. अनेक महिन्यापासून इंटरमिटंट फास्टिंग करायचा विचार होता, त्यात बऱ्यापैकी यश येत आहे.
1 Apr 2020 - 5:03 am | जुइ
तुम्ही दिलेले तोडगे अवघड असले तरी सद्य परिस्थितीत करावे लागतील असे वाटत आहे.
1 Apr 2020 - 10:58 am | सस्नेह
कलिंगड ज्यूस
कलिगडाच्या लाल गाभ्या चे दोन इंचाचे तुकडे करुन सर्व बी काढून टाकावे. २-३ चमचे साखर चवीनुसार मीठ घालून ज्यूसरमधे १/२ मिनिट फिरवावे. फार बारीक करु नये. दातात बारीक तुकडे यावेत इतपतच.
ब्रेड पनीर रोल्स
४ पावभाजी पाव (कालचेअसतील छान चुरता येतात)
१०० ग्रॅम पनीर
१ मध्यम कांदा ४-५ मिरच्या कोथिंबीर बारीक चिरून.
१ मोठा बटाटा उकडून किसलेला.
१ चमचा पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ
हे सर्व एकत्र करून पाण्याचा हात लावून छान मळून घ्यायचे आणि रोल्स बनवून कॉर्नफ्लोअर मध्ये घोळवून ठेवायचे. मग आवडीनुसार कमी-जास्त तेलात डीप किंवा शॅलो फ्राय करुन घ्या. सॉस बरोबर सर्व्ह करावे.
1 Apr 2020 - 6:32 pm | जुइ
धन्यवाद!
11 May 2020 - 2:36 pm | chittmanthan.OOO
छान
14 May 2020 - 8:20 pm | गणेशा
आणखिन पाकृ येऊ द्या...