मिसळ- एक ड्रीम प्रोजेक्ट

विखि's picture
विखि in जनातलं, मनातलं
13 Dec 2019 - 2:24 pm

मिसळ-एक ड्रीम प्रोजेक्ट

आता तुम्ही म्हन्साल ह्ये असलं कुठं प्रोजेक्ट असतंय व्हय.प्रोजेक्ट म्हणजे कसं कायतरी भव्य दिव्य,ग्रँड. भन्साळीच्या पिक्चर सारखं पायजे. पण आपली कामंच असली. आधीचे प्रोजेक्ट घोटाळा, चिंबोरी, मॅजिक,झमेला आणि आता ही मिसळ म्हणजे अंडा मिसळ. एक जुना सुप्त प्रोजेक्ट्.
तो रईस मधला शारुख म्हणतो ना, "कोई भी धंदा छोटा बडा नहीं होता" सेम तसंय "कोई भी प्रोजेक्ट छोटा बडा नहीं होता"
तर तुम्हाला या ड्रीम प्रोजेक्टची एक छोटीशी ष्टोरी सांगतो...

साल 2011, हिंजवडी फेज 2, एका कंपनीत गटात न बसणारा शब्द म्हणजेच Odd Man Out म्हणून जॉब करत होतो. गटात न बसणारा शब्द अशासाठी की जॉब फक्त नावाला, महिन्याचा मीटर चालू पायजे म्हणून बाकी तिथं आपलं कायच काम न्हवतं. ते नाय का “बाबा का सिर्फ शरीर जा रहा हे” टाईप कायतरी. डोकं नुसतं सैरभैर. जॉब सोडून सगळं कराव वाटायचं. त्यात आपला मूळ पिंड पडला आचाऱ्याचा तो तिकडं हिंजवडीत गुदमराय लागला. आता म्हनलं असं कायतरी करू ज्यात जरा सुकून भेटल, माझ्यातला छोटेखानी आचारी पण सारखं म्हणायचा "दे रे सोडून ह्ये, आपण दुसरं कायतरी करू” पण नक्की काय ते काय कळना. दरम्यान, झालं अस की काही निम्मिताने ग्रुप मधल्या अमित जगताप म्हणजे अम्याच्या घरी जायचं ठरलं, नाशिकला. गेलो मंग. नाशिक पालथं घालत असताना एका ठिकाणी मिसळ खाल्ली. अंबिका मिसळ, काळ्या रस्स्यातली मिसळ. लय आवडली. बाकी पण बऱ्याच मिसळ होत्या, वेगवेगळ्या रस्स्यात. कुठं हिरवा रस्सा, कुठं लाल तर कुठं काळा. मिसळच्या बाबतीत नाशिक एकदम समृद्ध वाटलं.
नाशिकवरून पुण्याला आलो तरी डोक्यातून मिसळ काय जाईना. आमच्याच टीम मधी नाशिकचा अजून एक मित्र होता सुजित पाठक, या विषयावर त्याच्याशी पण बरीच चर्चा झाली. अम्या-सुजित बरोबर झालेल्या गप्पां मधून ट्यूब पेटली. आपण पण मिसळ चालू केली तर? मिसळीच्या खोलात जायचं ठरवलं, त्यावर जातीनं स्टडी सुरू केला.एक आयडिया पण आली वेगवेगळ्या रस्स्यात मिसळ बनवू, काळा, हिरवा, लाल. मनातल्या मनात त्याला नाव पण द्यून टाकलं “मिसळ मॉल” टेस्टिंग म्हणून दर विकेंडला कुठं तरी एखादा स्टॉल लावू वगैरे वगैरे. आतला आचारीपण जाम खुश झाला."हा कर कर, ह्ये बरोबरे" झालं, मी सिरीयस मोड वर गेलो. घरी हिच्या बरोबर ढोबळ विषय पण झाला यावर. पुढ बरेच दिवस यावर चर्चा होत राहिली R&D होत राहिली. पण माहोल काय जमाना. काही कारणानी गाडी पुढ सरकलीच नाय आणि महिन्याच्या मीटर पुढं माघार घ्यायला लागली. तिथंच हा विषय संपला. आतला आचारी पण तोंड बारीक करून बसला...

साल 2019....चित्र बदललं होतं. माहोल बदलला होता. 2010 हिंजवडी ते 2018 व्हाया मगरपट्टा सगळी लढाई उरकली होती. आतल्या आचाऱ्याची फत्ते झाली होती. तो तरी किती दिवस तोंड बारीक करून बसणार होता. महिन्याच्या मीटर वर आतला आचारी या वेळेस भारी पडला होता. यावेळेस साक्षात बायको होती सोबतीला. एकदम भक्कम पाय रोवून. साथीला टीम खिला-रे होती. नादच नाय. "खिला-रे... एग्ज कॅफे" म्हणून छोटा का होईना आपला एक बोर्ड लटकत होता. घोटाळा, मॅजिक, चिंबोरी अजून बरेच बाण भात्यात होते. पण...पण.... कुठंतरी कायतरी कमी होती. कुठली? आहो कुठली काय तीच ओ आपली मिसळ. तेव्हाची राहिलेली. तिची कमी होती. तिला आता एकदम पोषक वातावरण होतं. एकदम घरची खेळपट्टी. तेव्हाची मिसळ आता अंडा मिसळच्या रुपात आली होती. झाली परत R&D सुरु. ही रेसिपी ती रेसिपी. ह्ये टाक त्ये टाक. सुरू झाला जांगडगुत्ता. त्यात परत एक Twist आला. आपल्या कॅफेची जागा बदलायला लागली. अचानक भयानक शिफ्टिंगची सगळी काम अंगावर आली. मिसळची R&D पडली बाजूला. पण यावेळेस तिला नाराज करून चालणार न्हवतं ‘अभी नही तो कभी नही’ म्हणत आम्ही हा विषय सासूबाईंच्या कानावर घातला. सासूबाई म्हणजे एकदम सुगरण. त्यांनी पण परीस्थितीचं गांभीर्य ओळखून मिसळची संपूर्ण जवाबदारी उचलली. “तुम्ही शिफ्टिंगचं बघा मी मिसळचं बघते” म्हणत सू्त्रं हातात घेतली. या सगळ्या गडबडीत पण आमच्या हातात स्टीलचे डब्बे येऊ लागले, ”हा बघा कसाय” म्हणत मिसळच्या शाम्पलचे सँपल ट्राय होऊ लागले. मसाले कुठले वापरायचे, हा का तो, नको आपण घरचाच वापरू, खोबरं ओलं का सुक्क, फरसाण का शेव चिवडा, चव तिखट का आंबट-गोड, अंड्याचा वापर कुठं आणि कसा करायचा आशा रोज चर्चेवर चर्चा, बाल की खाल निघू लागली. रोजचे शाम्पल टेस्ट करून आमचे टेस्टर वैतागले “अरे आता एखादा रस्सा करा रे फायनल”
आणि एकदाचा अंडा दम मिसळ वर शिक्कामोर्तब झाला. एक सर्कल पूर्ण झाल्यागत वाटलं. तर ह्ये सगळं असं होतं. ही आपली या मागची एक छोटीशी ष्टोरी.

खरं तर मिसळ हा आपला पारंपारिक पदार्थ. बऱ्याच लोकांचा सेन्सिटिव्ह विषय. त्यातच आम्ही एवढा फेरफार करत होतो ती एक रिस्कच होती, रिस्क तर आहेच. पब्लिकला हा बदल आवडल का नाय याची. नायतर म्हणायचे "आईला, हे खिला-रे वाले घोटाळा करता करता लैच घोटाळा करू राहिले बे" ☺☺
हॉटेल वगैरेचा काही अनुभव नसताना, फक्त न फक्त स्वयपकाची आवड एवढाच काय तो कॉमन फॅक्टर त्याच्या जोरावरच घेतली उडी. सुरुवातीला लय माती खाल्ली, पार घमीलं भरू भरू. पण त्यातूनच शिकायला भेटलं, अजूनही शिक्षण चालूय.पण आतापर्यंत जे केलं ते प्रामाणिकपणे, जीव ओतून. बहुतेक त्यामुळंच ध्यानी-मनी नसताना एवढ्या कमी वेळेत आपण खास खवैय्यांच्या पसंतीस उतरलो.

या सगळ्या अंडा मिसळच्या आणि शिफ्टिंगच्या प्रवासात टीम खिला-रे ने बेक्कार मेहनत घेतली. खास करून सासुबाईंची बॅटिंग निर्णायक ठरली.
अंडा मिसळ सोबत आपण आपली नेहमीची मिसळ पण देतोय त्यामुळं जे अंडी खात नाहीत त्यांनी लैच नाराज व्हायचं कारण नाय.......
”बाप का भाई का माँ का.... सबका खयाल रखेगा रे तेरा फैजल....”
मिसळपाव सोबत आपली ही छोटी मिसळ ष्टोरी शेअर करावं म्हनलं.. म्हणून ह्ये सगळं..!

मिसळ

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

13 Dec 2019 - 2:41 pm | मुक्त विहारि

जमल्यास फोटो टाकावेत, ही विनंती.

आनन्दा's picture

13 Dec 2019 - 3:26 pm | आनन्दा
श्वेता२४'s picture

13 Dec 2019 - 4:06 pm | श्वेता२४

फोटो हवेच होते. तुमच्या ड्रीम प्रोजेक्टला शुभेच्छा . आपल्याला हवं ते करणारे व त्यात यशस्वी होणारे लोक फार कमी. खूप भरभरुन यश मिळूदे.

जॉनविक्क's picture

13 Dec 2019 - 4:34 pm | जॉनविक्क

खूप छान प्रोजेक्ट! आगे बढो हम आपके साथ है

MipaPremiYogesh's picture

13 Dec 2019 - 5:24 pm | MipaPremiYogesh

खुप छान. All the Best. Address please. Is it the same in front of Katraj Dairy near Paranjape School

वा. 2 दिवसांपूर्वीच खिला रे बद्दल PEO वर वाचलं होतं. Positive Review होता. अंडा मिसळ छान जमली आहे वगैरे.
तेव्हाच ठरवलं होतं कधीतरी जाऊया.
आता तुम्ही मिपा परिवाराचे म्हंटल्यावर नक्की भेट देणार.

खिला रे ला खूप शुभेच्छा!

भीडस्त's picture

14 Dec 2019 - 2:18 pm | भीडस्त

मनापासून शुभेच्छा

एकूणच मजा आली. झणझणीत झालय लेखन.