माझा एक IT मधला मित्र आहे. वय वर्षे ४५. पुण्यामध्ये नामांकित ITकंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. परंतु नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय. योग्य वेळी IT मध्ये योग्य ठिकाणी असल्यामुळे बऱ्यापैकी माया जमवली आहे. onsite आणि नोकरीमधील बढती वेळेवर मिळत गेल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्याची पत्नी देखील साधारण तेवढ्याच वयाची आहे. गृहिणी आहे. दुर्दैवाने मूलबाळ नाही. आई वडील आहेत परंतु खर्चासाठी याच्यावर अवलंबून नाहीत आणि म्हातारे असले तरी पुढेही सधन असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या त्याच्यावर अवलंबून नसतील असे त्याचे म्हणणे आहे.
पुण्यात स्वतःचे loan free घर आहे. हा व याची पत्नी अगदी frugal नसले तरी गरजेइतकाच पैसा खर्च करतात व त्यात समाधानी आहेत. दोघांना सध्यातरी कोणताही आजार नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा महिन्याचा सर्व खर्च पकडून सध्या २०-२५००० इतका होतो. तो सध्या लवकरच (२-३ वर्षात) रिटायरमेंटचा प्लॅन करतोय. रिटायरमेंट नंतर आर्थिक कारणासाठी पार्ट टाइम काम करण्याचा विचार नाही. पूर्ण वेळ छंदासाठी देणायचा त्याचा मानस आहे. आई वडील हयात असेपर्यन्त पुण्यातच राहण्याचा प्लॅन आहे. त्याची आणि पत्नीची जीवनशैली गेल्या अनेक वर्षांपासून साधी आहे आणि ती तशीच राहील किंबहुना रिटायरमेंट नंतर अजूनहि फ्रुगल होईल.
४८ व्या वर्षी रिटायर झाल्यास सध्याची जीवनशैली, वाढलेले आयुर्मान पाहता रिटायरमेंट घेण्याआधी किती पैसे लागतील असे आपल्याला वाटते?
एक विनंती: कृपया नोकरी बदल, पार्ट टाइम नोकरी यावर चर्चा नको. मी त्यावर २ तास वाद घातला पण पट्ठ्याने रिटायरमेंट चे नक्की केले आहे या निष्कर्षाप्रत आलो. त्याने हा विचार २-३ वर्षे आधी सुरु केला आणि तो अजूनही ठाम आहे. त्यामुळे चर्चा उरलेले सध्याच्या जीवनशैलीप्रमाणे जगायला आयुष्य जगायला किती पैसे लागतील यावरच मर्यादित राहिल्यास उत्तम.
प्रतिक्रिया
8 Nov 2019 - 7:19 am | सोत्रि
पैसा हे साद्ध्य नसून साधन आहे.
रिटायरमेंट म्हणजे काय? आणि त्यानंतर उरलेलं आयुष्य काय कारणार? हे प्रश्न किती पैसा लागेल ह्यापेक्षा महत्वाचे आहेत.
नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस ह्या कारणांमुळे नोकरीतून किंवा एकंदरीत कॉर्पोरेट क्षेत्रातून बाहेर पडायचे हा निर्णय वैयक्तिक असला तरीही त्याचा अर्थ रिटायरमेंट नाही. पूर्ण वेळ छंदासाठी देणायचा त्याचा मानस आहे ह्यात काँक्रीट प्लान दिसत नाही. नोकरी सोडून दिल्या दिवसापासूनचा प्रत्येक दिवस, पुढची २५+ वर्ष, कसा व्यतीत करणार याचा विचार करून काँक्रीट प्लान तयार केलेला नसेल तर 'किती पैसा लागेल' हा प्रश्न अमूर्त (abstract) ठरतो असं माझं वैयक्तिक मत आहे.
हे फारच व्यक्तिसापेक्ष आहे. तसंही सध्याची जीवनशैली इथून पुढे ३-५ वर्षांनंतर तशीच असेल ह्याचं भाकित कोणी करू शकत नाही. त्यामुळे आता ठरवलेली 'क्ष' रक्कम शाश्वत असू शकत नाही.
- (२०२५ ला कॉर्पोरेट क्षेत्रातून बाहेर पडायचा निर्णय घेतलेला ) सोकाजी
8 Nov 2019 - 7:27 am | सोत्रि
रेफरंससाठी हा व्हिडीयो बघावा !
https://www.youtube.com/watch?v=KLINZRYIquE&list=PLvCceGF1d_IDoM7Kz4mt8s...
डिस्क्लेमर: हा व्हिडीयो बनविनार्या माणसाशी आणि त्याच्या कंपनीशी माझा दूरान्वयेही संबंध नाही. ह्या व्हिडीयोच्या रेफरंसचा उद्देश फक्त माहिती शेयर करणे हाच आहे यात कसलेही रेकमंडेशन नाही.
- (आर्थिक प्लॅनर) सोकाजी
8 Nov 2019 - 8:53 am | कोहंसोहं१०
एकदम सिम्पल प्लॅन कसा करावा यासाठी पाहायला म्हणून चांगला आहे परंतु NIFTY CAGR 17% आवाक्याबाहेरचा वाटतोय. उतारवयातील जास्तीचे खर्च जसे की मेडिकल वगैरे पण पकडले नाहीत.
एक रेफरन्स विडिओ पहिला त्यात रक्कम खूपच जास्त वाटते
https://www.youtube.com/watch?v=8nzt-L3L5Ik
कदाचित दोन्हीचा सुवर्णमध्य हा चांगला पर्याय असू शकतो.
8 Nov 2019 - 9:23 am | सोत्रि
डिसक्लेमर ह्यासाठीच टाकला होता! :)
- (सिंम्पल प्लॅनर) सोकाजी
8 Nov 2019 - 11:02 am | आदेश007
सोकाजिंशी पूर्णपणे सहमत. आधी कुटुंबासाठी स्वतःचा आरोग्य विमा लगेचच काढावा. रिटायर होईपर्यंत प्री existing decease exception मुदत निघून जाईल. पुण्यात रहात असल्यामुळे किमान १५ लाखांचा विमा घ्यावा. फॅमिली फ्लोटर प्लॅन मिळतो. आजचा खर्च महिना २५,००० असेल तर साधारण दीड कोटी रुपयांचा निधी पुरेसा होईल असे वाटते.
त्यातील काही पैसे ते शेअर बाजारात गुंतवू शकतात जेणे करुन चलन वाढीचा परिणाम फारसा होणार नाही. बाकी निधी स्टेट बँक किंवा मोठ्या खासगी बँकेत मुदत ठेवी च्या स्वरूपात ठेवू शकतात.
सर्वात महत्त्वाचे की रिटायर होईपर्यंत पुढच्या दोन वर्षात भावी गुंतवणुकीबाबत तज्ञांची सल्ला आणि मदत घेऊ शकता.
8 Nov 2019 - 11:29 am | पिंट्याराव
तू नळीवर financial planning money bee असे शोधल्यास शिवानी दाणी यांचा एक उत्कृष्ट व्हिडिओ उपलब्ध आहे या विषयावरचा. मला लिंक शेअरता येत नाहीय... क्षमस्व.
nifty cagr 17% खूप जास्त वाटतो.
8 Nov 2019 - 11:29 am | पिंट्याराव
तू नळीवर financial planning money bee असे शोधल्यास शिवानी दाणी यांचा एक उत्कृष्ट व्हिडिओ उपलब्ध आहे या विषयावरचा. मला लिंक शेअरता येत नाहीय... क्षमस्व.
nifty cagr 17% खूप जास्त वाटतो.
8 Nov 2019 - 2:03 pm | चौकटराजा
मी ५० व्या वर्षी निवृत्त झालो व आय टी वगरे मध्ये काही नव्हतो . २००३ साली ९२०० र वर निवृत्त झालो. प्रत्येकाच्या जीवन जगण्याच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. निवृत्तीनंतर एका रात्रीत छंदाचे इंजेक्शन घेता येत नाही. त्यासाठी जन्माला येतानाचा छंदाचे संचित आणावे लागते. आरोग्य , स्वातंत्र्य व सत्ता ही संपतीची तीन रूपे आहेत. तुम्ही म्हणाला यात पैसा कुठे आला ? तो सत्ता या रूपातील एक भाग आहे. सत्ता पैसा व प्रेम यांच्या मिलाफाने मिळते. ८० टकके काम पैशाने होतेच होते पण २० टक्के काम केवळ प्रेमानेच होते. हे सगळे लक्षात घेता. आताच स्वतः: चा खाजगी आरोग्य विमा काढा ( मी तो न काढण्याची चूक केली आहे ) . म्हातारापणी दवाखाना वगळता सर्व खर्च कमी होत जातात . नव्हे कमी करायचेच असतात . असा सर्व विचार केला तर तुमच्या मित्राला महिना २५००० पेंशन वा व्याज मिळेल अशी किमान सोय हवी.
8 Nov 2019 - 8:04 pm | जॉनविक्क
वयक्तिक गरजा जीवनशैली याचा मेळ घालावा लागेल.
पुढील आकडे मोठ्या शहरांसाठी 2020 साठी
उचभ्रु असाल विषय मिटला
अत्युच्च मध्यमवर्गीय किमान 2 कोटी
उच्च मध्यमवर्गीय किमान 75 लाख
मध्यमवर्गीय 50 लाख
कनिष्ठ मध्यमवर्गीय 20 लाख
8 Nov 2019 - 8:34 pm | कोहंसोहं१०
सध्याचा खर्च महिना २०-२५००० आहे पुण्यात त्यांचा. मध्यमवर्गीयच म्हणले पाहिजेत. ८५ वर्षे जीवनमान धरून चालले तरी रिटायरमेंट नंतर ४० वर्षे काढायची आहेत दोघांना. कितीही स्वस्थ जगायचे ठरवले तरी ६०-६ नंतर तब्येतीच्या कुरबुरी सुरु होतात. सध्या मेडिकल इन्फ्लेशन खूपच जास्त आहे. उतारवयात होणारा मेडिकल चा खर्च, इन्शुरन्स चे एकतर वाढलेले हफ्ते किंवा मेडिकल खर्चाचे रिपेमेंट देण्यात करण्यात येणारी कुचराई हे सर्व पाहता ५०-७५ लाख पुण्यामध्ये पुरतील का (जरी सेविंग इन्व्हेस्ट केले तरी) हा मोठा प्रश्न आहे.
यामागे काही गणित असेल तर जरूर सांगावे.
9 Nov 2019 - 5:00 am | जॉनविक्क
दर्जेदार निवास व्यवस्था, सुखद राहणीमान , सेवेला तत्पर आसा विनम्र स्टाफ(मेडिकल इमर्जन्सीसाठी अत्यावश्यक), समवयस्क लोकं आणी जेवणखाणपासून सर्व आयते, 70+नंतर हा पर्याय आपल्या मित्रासाठी उत्तम वाटतो सध्या पर हेड 15,000 ते चार्ज करतात आता तुम्हीच गणित करा ते किती वाढतील.
पैसे साठवून कोणी रिटायर होत नाही योग्य ती गुंतवणूक करून ते महागाई नूसार वाढायची व्यवस्था करावीच लागेल यावर अर्थतज्ञच जास्त व्यवस्थित मार्गदर्शन करतील सुरू मिपाकर सुबोध खरे यांनी करावी अशी विंनती.
9 Nov 2019 - 9:34 am | सुबोध खरे
माझ्या सारख्या १ % ज्ञान वाल्याकडून तुमच्या भलत्याच अपॆक्षा आहेत.
मुळात मी हात पाय चालत आहेत तोवर काम करत राहणार आहे.असे मी बऱ्याच ठिकाणी जाहीरही केलेले आहे.
तेंव्हा माझ्या शब्दकोशात "निवृत्ती" नाहीच.
कशाला हात दाखवून अवलक्षण करताय?
त्यापेक्षा महिना ८-१० % देणाऱ्या तज्ज्ञांचाच सल्ला चांगला असेल.
9 Nov 2019 - 10:25 pm | जॉनविक्क
ज्यांना व्हायचे आहे त्यांना आपल्या अनुभव व मानसिकतेचा लाभ व्हावा म्हणून सुरुवातीचा खो तुम्हाला दिला आहे, आता तुम्ही खो कोणाला द्यायचा ते तुम्ही ठरवा...
9 Nov 2019 - 9:59 am | चौकटराजा
पूर्वी मी असे वाचलेले आठवतेय की ज्यांना मूल नाही वा ज्यांची मुले त्यांना विचारीत नाहीत अशा नी बँकेत रिव्हर्स मॉर्टगेज चा करार करावा . मूल नसणे हे दुर्दैव आहे का यावर वाद होऊ शकतो पण मुले होऊन त्यांना आपली तशी गरज नसल्याने ती परकेपणाने वागतात हे उद्विग्न करणारे दुर्दैव नक्कीच असते. अशावेळी आपली स्थिती " कुणा ना माहीत सजा किती ते " अशी असते.( आपण किती जगू व कसे ? माझी आई म्हणायची "माणसाच्या मृत्यूदिनाला पुण्यातिथी का म्हणतात ? तर तो मरतो कसा पटदिशी वा सडून कुजून ? आयुष्याचे सारे पूण्य तिथे कामाला येते ! असो ) म्हणून आपली संपत्ती बँकेशी करार करून गहाण ठेवायची व पेन्शन सारखी रकम दर महिन्याला मिळवायची असा काहीसा तो प्रकार आहे ! त्याचीही चौकशी करा ! आपण गेल्यावर पूर्ण संपत्ती बँकेला मिळाली तरी त्याचा विषाद वाटायला आपण असतोच कुठे ?
15 Nov 2019 - 1:14 pm | चौथा कोनाडा
या पार्शभुमीवर ही माहिती द्यावीशी वाटते.
आता तर "अपत्यमुक्त भारत" ही नवी चळवळ मुळ धरत आहे.
त्यासाठी चाईल्डफ्री इंडिया ही संस्था कार्यरत झालीय.
अपत्य प्रजनन यामुळे वैयक्तिक, सामाजिक नुकसान होते.
हे टाळण्यासाठी संस्थेने प्रचार सुरु केला आहे.
https://www.facebook.com/Childfree-Pune-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A...
9 Nov 2019 - 10:22 am | Rajesh188
तुम्ही कोणत्या आर्थिक स्तरावरून निवृत्ती घेताय ह्या वर उर्वरित आयुष्य जगण्यासाठी किती पैसे लागतील हे अवलंबून आहे.
जीवनशैली माणसाला बदलताना खूप त्रास होतो(उच्य आर्थिक गटातील जीवनशैली त्याच्या खालच्या स्तरावर जावून जगता येत नाही).
आणि सर्वांना ते जमत नाही.
त्या मध्ये पहिली भीती
आपले स्नेही,मित्र मंडळी,शेजारी ह्यांच्या शी असलेली सुप्त स्पर्धा.
साधे जीवन जगण्यासाठी महिना 20000 दोन माणसांसाठी खूप झाले .
ही रक्कम व्यक्ती सापेक्ष,जीवनशैली सापेक्ष आहे .
आणि हे निवृत्ती घेताना प्लॅन करून चालत नाही तर 10 ते15 वर्ष अगोदर पासून शिस्तबध्द पने गुंतवणूक किंवा बचत करून साध्य करता येते
9 Nov 2019 - 10:30 pm | जॉनविक्क
त्यांच्या पश्चात त्यांची संपत्ती माझ्या रिटायरमेंटसाठी देतील का ? तसा मी सध्याच रिटायर्ड आयुष्य जगतो आहे पण अधुन मधून कामात यायची हुक्की येत असते पण एकंदर अनुभव हेच सांगतो की कमवा किंव्हा साठवा तुम्ही व्यवसाय करत नसाल तर पैशाची चणचण तुम्हाला जाणवत राहतेच.
10 Nov 2019 - 7:32 am | सस्नेह
"व्यवसाय करत नसाल तर चणचण जाणवणारच"
१००% सहमत !
महागाई वाढतच राहणार आणि साठवलेले रुपये काही वाढत नाहीत. आजचे १ करोड दहा वर्षांनंतर तितकेच राहणार. वस्तूंचे भाव दुप्पट होणार आणि व्याजदर कमी होणार.
तेव्हा हलकासा का होईना, व्यवसाय करत राहिले तरच राहणीमान टिकू शकेल. निदान हातपाय चालताहेत तोवर तरी.
10 Nov 2019 - 9:38 am | सोत्रि
जर बँकेत किंवा तिजोरीत ठेवले तर. ते जर व्यवस्थित आणि योग्य इंस्ट्रुमेंटस मध्ये गुंतवले तर १० वर्षांत दुप्पटही होऊ शकतात.
(इव्हेस्टर) सोकाजी
11 Nov 2019 - 9:27 am | सस्नेह
Well, जेव्हा त्या रकमेवर व्याज घेत नसू तेव्हा ते वाढतील.
रिटायरमेंट नंतर त्यातून काहीतरी रक्कम लागणारच ना.
11 Nov 2019 - 4:20 pm | सोत्रि
अगदीच तसं नाही. योग्य गुंतवणूक केल्यास व्याज घेउनपण पैसे वाढू शकतात.
- (गुंतवणूकदार) सोकाजी
13 Nov 2019 - 9:34 am | सुबोध खरे
आजचे १ करोड दहा वर्षांनंतर तितकेच राहणार
हे मान्य आहे.
परंतु आज आपल्याला १ कोटीचे कमीत कमी ६% प्रमाणे ( म्हणजे आज व्याज दर ८ % आहे पण त्यातून २०% कर कपात धरली तर ६.४ % आहे ते पुढील २-३ वर्षात होणारी महागाई धरून ६% धरत आहे) महिना रुपये ५०,०००/- व्याज येईल.
जर आपला मासिक खर्च ३०, ०००/ - असेल तर दर महा रुपये २०,०००/ - ची बचत होईल हि जर आपण पुनर्गुंतवणूक केली तर पाच वर्षात आपली अतिरिक्त गुंतवणूक (एक कोटी ला हात न लागता) १४ लाख २९ हजार १९७ होईल.
पहा:-
https://www.myloancare.in/recurring-deposit/rd-calculator/sbi
या तर्हेने जर आपला खर्च महिना ३०,००० असेल तर येणाऱ्या बऱ्यापैकी कालावधी पर्यंत आपल्याला तोशीस न लागता किंवा जीवनशैली न बदलता आपलयाला सुखाने जगता येईल. हे त्रैराशिक ढोबळ मानाने मांडले आहे.( तत्व लक्षात घ्या) कोणि अर्थतज्ञ् याबद्दल आपल्याला नक्की सांगू शकेल.
काही वेळेस स्थावर मालमत्तेत केलेली गुंतवणूक अशा वेळेस कमी येते. उदा. आपण एखादी व्यवसायिक जागा विकत घेतली असेल आणि ती भाड्याने देत असाल तर तिचे भाडे पण महागाईच्या प्रमाणात वाढत जाते. आणि त्यामुळे काही अंशी तरी आपल्याला लागणाऱ्या महागाईचा झळा कमी होतात.
दुर्दैवाने आजार आणि मृत्यू केंव्हा येईल याचे नक्की भाकीत कुणीच करू शकत नाही. तेंव्हा आपल्याला पैसे पुरतीलच असे कोणी छातीठोकपणे सांगू शकत नाही .
13 Nov 2019 - 11:15 am | सस्नेह
वरवर पाहता हा ठोकताळा उपयोगी वाटतो. पण यामध्ये आकस्मिक खर्च धरलेले नाहीत.
उदा. आजारपणातील खर्च, मालमत्तेवरील कर, घर व मालमत्ता यांचा दुरुस्ती मेंटेनन्स इ. खर्च, जे या प्लॅनला मोठं भगदाड पाडू शकतात.
तसेच आज महिना ३००००/- मध्ये चांगल्या तर्हेने जगू शकू पण पाच वर्षांनी दरवाढ झाल्यानंतर याच स्टॅंडर्ड ने नाही राहता येणार. २०१५ ला दूध ३५रु. लीटर होते. आज ते ५० रु. लीटर आहे. बसभाडे ज्या अंतराला २५/- रु. होते ते आता सुमारे ४० रु झाले आहे.
साधारण रिटायरमेंट पूर्वी पाच वर्षे आधी फर्निचर बनवले/ घेतले असेल तर वीसेक वर्षांत ते मोडकळीस येते. आजकालचे फर्निचर हो, जुने सागवानी नव्हे.
आजकालची घरे साधारण २० वर्षात भरपूर दुरुस्ती कामास येतात. फ्लॅटसाठी सोसायटी मेंटेनन्स सुमारे महिना ३०००/- असतो. प्लस कामवाली बाई चे पगार इ.
काय म्हणता मग ?
13 Nov 2019 - 11:17 am | सस्नेह
पाच वर्षांपूर्वी कपडे भांडी फरशी इ. साठी बाईला १५००/- रु. द्यावे लागत होते. इज ते २५००/- च्या जवळपास आहेत.
13 Nov 2019 - 11:43 am | सुबोध खरे
मी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी लिहिलेले आहे कि साधारण मध्यमवर्गीय कुटुंबाला घराचे कर्ज नसेल तर १० ग्राम सोन्याच्या भावात सहजपणे राहता येते. आणि त्यात वर्षात एकदा भारत सहल किंवा घरची उपकरणे दुरुस्ती किंवा काही कालावधी नंतर नवी घेणे हेही गृहीत आहे.
फर्निचर इ चा भांडवली खर्च तुम्ही जर निवृत्तीच्या अगोदर केला नसेल तर तुम्ही निवृत्त होऊ नये.
बाकी १९८० पासून अन्नपदार्थांची महागाई हि सरासरी २ % पेक्षा जास्त वाढलेली नाही. आपण निवृत्त झालात कि रोजचा प्रवास खर्च कमी होतो त्याबरोबर बाहेर खाण्याचा खर्च हि कमी होतो.
अनेक गरजेच्या गोष्टी ज्या चैनीच्या झालेल्या असतात त्यांची गरज भासेनाशी होते. उदा दर वर्ष दोन वर्षांनी फोन बदलण्याची गरज राहत नाही. ऑफिसातील पार्ट्या इ चा खर्च कमी होतो.
माणुस घरातच असला तर मोलकर्णीवरचा खर्च कमी होतो. उदा घरात वॉशिंग मशीन असले कि धुण्यासाठी( खरं तर कपडे वाळत घालण्यासाठी) बाईची गरज लागत नाही. डिश वोंशर असेल तर भांडी घासण्यासाठी बाईची गरज लागत नाही.
आपल्या इज्जती साठी नको इतका आहेर लग्नात करावा लागत नाही.
संचित ठेव संपत आली तरी शेवटी आपल्या घराचे रिव्हर्स मॉर्टगेज हा उपाय तर असतोच.
अशी मते दोन्ही तर्हेने मांडता येतीलच आणि कितीही वेळ त्याचे दोन्ही बाजूनी समर्थन करता येईल.
आजार आणि मृत्यू हे अटळ आहेत.
13 Nov 2019 - 12:09 pm | ज्ञानव
मी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी लिहिलेले आहे कि साधारण मध्यमवर्गीय कुटुंबाला घराचे कर्ज नसेल तर १० ग्राम सोन्याच्या भावात सहजपणे राहता येते.
हे अगदी खरे आहे.
तरुणपण खूप महाग असते. कारण लग्न(ह्या छोट्या सापळ्यातून सुटका नाही.) ,मुले, त्यांचे शिक्षण (हा एक मोठा सापळा असतो), स्वतःचे घर, समाजातील आर्थिक प्रतिष्ठा वगैरे चौकट सांभाळूनच जगण्याचे आपल्यावर झालेले संस्कार आपलेच तरुणपण महाग करून ठेवतात. त्यामानाने म्हातारपण स्वस्त असते. इथे मेडिकलचा खर्च हा मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाबरोबर तुलना करता यावी इतका असू किंवा इतपत जाऊ शकतो. हेल्थ नीट ठेवण्यासाठी डॉक्टर्स सल्ला देतीलच. जर हेल्थ नीट राहिली तर मेडिकलचा खर्च तुरळक होऊ शकतो पण शून्य नक्कीच नाही. तेव्हा निवृत्तीपूर्वी वेल्थपेक्षा जास्त लक्ष हेल्थ कडे असावे असे वाटते. तरुणपणात आर्थिक सल्लागार लुटून नेतात आणि म्हातारपणी डॉक्टर्स दोन्हीला जबाबदार आपणच असल्याने दोन्हीचे प्लानिंग करण्यासाठी हेल्थ आणि वेल्थप्लानिंगचे जुजबी ज्ञान असणे गरजेचे आहे.
सोन्याचा भाव आणि आपले बजेट जुळवण्याची सवय असेल तर निवृत्तीनंतर म्हातारपणी इतर खर्च कमी होत असल्याने सोन्याच्या चालू भावापेक्षा ७०% भावातच तुमचे खर्च निघू शकतात. आता हे खर्च भागवण्यासाठी लागणाऱ्या उत्पन्नाचे कोणते स्त्रोत आहेत ह्याची माहिती काढणे. (हे कष्ट घेणे अपरिहार्य आहे. ) आणि पूर्ण पासिव्ह इन्कमवर (तीही सोन्याच्या भावानुरूप) जगण्यासाठी खूपच मोठी रक्कम गुन्तवलेली असावी लागेल. २०४० साली तो भाव १ लाख रुपये तोळा (दहा ग्रामच जुना १२ ग्राम नव्हे ) असणार आहे असे म्हणतात. हे सगळे विचारात घेऊन म्हातारपण प्लान करावे. (शक्यतो आपला जोडीदार म्हातारा / म्हातारीपण कमावणारी असेल तर उत्तम.)
जाताजाता पोटच्या सोन्यावर अवलंबून राहावे कि बाजारातल्या सोन्यावर ह्याचा विचार जे ४५ वर्षे वयाचे आहेत त्यांनी आत्ताच केलेला बरा.
10 Nov 2019 - 1:53 am | कपिलमुनी
माबो वर लै काथ्या कुटलाय म्हणे !!
नॉर्मल जगायला 10 कोटी लागतात, थोडं लक्झरी जगायला 100 कोटी !
मिळवण्याची कॅपसिटी किती आहे तेवढे मिळवावे .
10 Nov 2019 - 10:39 am | Rajesh188
निवृत्ती नंतर साठवलेल्या पैस्यावर जगताना .
काही नी असे मत मांडले आहे की महागाई वाढेल आणि पैसे वाढणार नाहीत.
महागाई वाढली तरी पैशाची कीमंत स्थिर च राहते .
वार्षिक 4% दराने व्याज मिळत च जाईल .
आणि महागाई चा दर सुद्धा सरासरी तोच असेल.
इथे एक फॅक्टर शास्वत आहे तो म्हणजे मृत्यु.
80 वर्ष हेच वय जास्तीतजास्त वय असू शकते.
त्या पुढे जीवन असणारच नाही.
फक्त 30 वर्षा साठी नियोजन करायचेआहे.
11 Nov 2019 - 11:31 am | सुबोध खरे
८० व्या वर्षी आपण शारीरिक रित्या स्वस्थ पण निष्कांचन झाल्यामुळे परावलंबी झालात तर त्यासारखी दुर्दैवी स्थिती नाही.
८० वर्षानंतर आयुष्य नाही हे म्हणणे मुळापासूनच चूक आहे.
परवाच निकाल दिलेल्या अयोध्या खटल्यातील "रामलल्ला विराजमान" या देवाचे मुख्य अधिवक्ता श्री के पराशरन हे ९२ वर्षाचे आहेत त्यांना भारतीय कायदेतज्ज्ञ परिषदेचे (बार) पितामह म्हणतात आणि त्यांनी हा खटला श्री रामलल्ला विराजमान यांच्यासाठी जिंकून दिला आहे.
https://www.business-standard.com/article/pti-stories/k-parasaran-pitama...
एक डॉक्टर म्हणून मी पाहत आलेल्या अनेक गोष्टी/ प्रश्न इ आता येथे मांडत आहे.
वय वाढत जाते तसा वैद्यकीय उपचारांचा खर्च वाढत जातो.
माझा एक सिद्धांत आहे. सरासरी वयाच्या ४४ वर्षांपर्यंत जेवढे उपचार माणसाला लागतात तेवढेच उपचार पुढच्या २२ वर्षात लागतात( म्हणजे ६६ पर्यंत) आणि तेवढेच उपचार पुढच्या ११ वर्षात म्हणजे ७७ व्या वर्षापर्यंत आणि तेवढेच उपचार पुढच्या साडे पाच वर्षात म्हणजे ८३ व्या वर्षापर्यंत आणि पुढे.
पहिल्या ४४ वर्षात जेवढा खर्च येतो त्यापेक्षा २२ वर्षात जास्त ( सरासरी दीड पट) खर्च येतो कारण होणारी महागाई आणि असेच पुढे चालते.
त्यातून माणसे जास्त जगली तर त्यांना दुर्धर आजार होण्याची शक्यता वाढते.
मी घरचेच उदाहरण देत आहे. माझ्या आईला थायरॉईड ग्रंथीचा कर्करोग वयाच्या ७८ व्या वर्षी झाला. कारण ती ७८ वर्षे जगली.
आज तिच्या उपचारांसाठी आम्ही ११ लाख रुपये खर्च केले ते सुद्धा टाटा सारख्या निमसरकारी रुग्णालयात (अर्थात हे पैसे आम्हाला परवडत होते म्हणून) आम्ही कोणत्याही तर्हेची "मदत" जी उपलब्ध असून ( आणि आमचे "संबंध"/contacts असून) घेतली नाही. पण देवदयेने ती पूर्ण बरी झाली आहे. यदाकदाचित तिला उद्या केमोथेरपी लागली तर त्याचा खर्च महिना १०,०००/- रुपये आहे. हे पैसे तिच्या निवृत्तिवेतनातुन ती देऊ शकेल. पण अशी सगळीच औषधे भारतात बनत नाहीत आणि हा खर्च महिना लाखात जाऊ शकतो.
पूर्वी माणसे इतकी जगत नसत. त्यामुळे असे दुर्धर आजार व्हायच्या आत माणसे परमेश्वर चरणी विलीन होत असत आणि त्यामुळे त्यासाठी होणार खर्च हा मर्यादित होता. आता तुम्ही जास्त जगलात तर असे होणारे दुर्धर आजार जास्त असणार आहेत आणि त्यासाठी होणारा खर्च फार मोठा असू शकतो.
एका माणसाने मला याचे उत्तर दिले कि "मला असा आजार झाला तर मी त्यासाठी पैसे खर्च करणार नाही" स्वच्छपणे सांगेन कि मला असे उपचार नकोत.
मी त्यांना विचारले कि साहेब असा आजार "तुमच्या पत्नीस" झाला तर तुम्ही त्या "गेल्या" तरी चालतील मी "पैसे खर्च करणार नाही" असे म्हणू शकाल का?
यावर त्या माणसाकडे सध्या तरी उत्तर नव्हते.
असे अनेक अनुत्तरित प्रश्न माझ्यासमोर येत असतात ज्याची उत्तरे मला माहिती नाहीत आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर प्रत्येक माणसासाठी वेगळे असू शकेल.
"आजार आणि मृत्यू" हे कुणाच्याही हातात नाही हे चिरंतन सत्य आहे. त्यामुळे मी २५- ३० वर्षे काम करेन आणि मग निवृत्त होईन आणि संचित पुंजीवर आयुष्य काढेन हा मार्ग सर्वाना पटेल/ परवडेल असे नाही.
11 Nov 2019 - 2:34 pm | खिलजि
लवकर रिटायरमेंट .. हा शब्दच मुळी जीवनातून काढून टाकला तर तुम्ही कधीही म्हातारे होणार नाहीत आणि जरी झालात तरी काहीही फरक पडणार नाही .. आपल्याला जर लवकर कामातून मुक्त व्हायचे आहे तर मला असे वाटते कि आपल्याला काही जबाबदारीच नको .. आणि असेही लवकर कामातून मुक्त होऊन तुम्ही काय करणार ? जर फिरायचे असेल तर मनसोक्त मौजमजा करायची असेल तर हाताशी नक्की किती पैसे असावे याचे गणित कुणालाही जमणार नाही .. ती योजना आणि त्यामुळे केलेली साठवणूक कधीही तोंडघशी पडू शकते ..
त्यामुळे हा लवकरात लवकर मोकळे व्हायचा प्लॅन डोक्यातून काढून टाका आणि काम करत असतानाच कशी मनसोक्त मजा करता येईल याचा विचार करा .. जर काम करताना कुणाचे दडपण जाणवत असेल तर दुसरीकडे नोकरी करा पण रिटायरमेंट म्हणजे पूर्णविराम .. तुम्ही आतापर्यंत कमावलेले कौशल्य जर देशाच्या विकासासाठी कमला येणार नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही ..
राहता राहिला पैश्याचा विषय ,, तर ते विष आहे , जेव्हढे जास्त तेवढे अंगात भिनणार .. त्यापेक्षा जे हाती आहे त्याचा कसा उत्तम विनियोग करता येईल याचा विचार करा .. मार्केटात मी लाखाचे बारा झालेला माणूस है . त्यामुळे मी तिथून कमवा असे बिलकुल सांगणार नाही पण जे काही कमवाल त्यातील थोडी मदत गरजूनही करा म्हणजे आपल्या पुढील वाटचालीस योग्य दिशा मिळेल आणि डोक्यात असे विचार येणार नाहीत ..
तुम्हाला एक युक्ती सांगतो , ती करून बघा .. नाही म्हणजे मी अजूनही कधी कधी करतो पण मला बघून ते सर्व म्हातारे थोडे कावरेबावरे होतात , पण तुमच्या इथे असेल तिथे नक्कीच करा ..
एखादा वरिष्ठ ( रिटायर्ड झालेल्या ) नागरिकांचा हास्य क्लब हुडकून काढा .. जवळच असेल तर सोनेपे सुहागा .. माझ्या जवळच होता आणि अजूनही है .. वरळी सीफेसला .. तिथे बरोबर त्यांच्या टायमाला पोचायचं आणि नुसतं बघत राहायचं .. काहीबी करायचं नाही .. हि रिटायर्ड टाळकी , अशी काही धम्माल उडवतात कि काही विच्चारूच नका .. बिन तिकिटाचा हाऊसफुल्ल शो .. एकदम सुप्परडुप्पर हिट .. इथे तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल ..
प्रत्येकाच्या तोंडावर बारा वाजलेले असतात , तरीही बिच्चारे जीव मेटाकुटीला आणून हसण्याचा प्रयत्न करत असतात .. त्यांना आणि त्यांच्या त्या थोबाडांना अबघून माझी तर हस्सून हस्सून मुरकुंडीच वळते . इतके कि मला भानच राहायचं नाही .. घरून फोन आला कि मग मी घाईगडबडीत निघायचो पण तिथून निघायचं काही मन व्हायचं नाही .. आता त्यांनी सर्वजण त्यांनाच हसत असतात म्हणौन थोडी कम्पाउंडची उंची वाढवलंय पण हरकत नाही , मी मागच्या महिन्यातच आत जाऊन हा शो बघितला .. काहीजण अस्वस्थ झाले होते , मला बॉक्स ऑफिसमध्ये बघून पण मी हसत हसत तिथून पळ काढला .. हे करून बघा आणि मगच रिटायर्ड व्हा ...
11 Nov 2019 - 4:59 pm | जॉनविक्क
ऐसेच मंगता जीनेकु...
11 Nov 2019 - 4:30 pm | सोत्रि
एक हास्यक्लबात हसे त्याला दुजा हसू पाहे |
एक दिनी तोही त्या हास्यक्लबात पुढे जात आहे ||
- (समर्थ) सोकाजी
14 Nov 2019 - 12:49 pm | मराठी_माणूस
एकदम बरोबर.
बर्याच जणांना "जाते , दाणे , सुप...... " ही म्हण माहीत नसते .
12 Nov 2019 - 10:32 pm | palambar
मेडी क्लेम पंधरा लाख खूप कमी आहे.
औषधे, चोवीस तास नर्स हा खर्च ही
लक्षात घ्यायला हवा.
13 Nov 2019 - 12:23 pm | नावातकायआहे
नॉर्मल जगायला 10 कोटी लागतात.... ?????
अॅबनोर्मलच मरणार मी !!
13 Nov 2019 - 12:23 pm | जॉनविक्क
साधारण मध्यवर्गीय 58 च्या आधी निवृत्तही होत नाही तेंव्हा हा विचार तूर्त नकोच. सध्या फोकस फक्त असाधारण गोष्टीकडे असुदे.
13 Nov 2019 - 7:04 pm | मराठी कथालेखक
त्यात वार्षिक महागाई ३-४% (फारतर ५%) धरुन पुढचे ३० वर्षाचा हिशेब लावता येईल. तसेच जमा राशी, त्यावर मिळणारे व्याज , पी एफ, इतर मिळकती या सगळ्याचा हिशेब लावणं कठीण नाहीच.
तुमचे मित्र आय टी मध्ये आहे म्हणता तर हे साधे हिशेब एक्सेल वा ईतर काही खास अॅप्लिकेशन वापरुन गणिते मांडणे नक्कीच कठीण नाही.
आणि या जोडप्याला मुल बाळ नाही व राहणीमान तसे साधेच आहे म्हणजे जमा राशी बरीच मोठी असेल नक्कीच (एक कोटी पेक्षा तरी जास्तच असावी)
म्हणजे नंतर पुण्याबाहेर जाण्याची तयारी आहे असे दिसते. बहूधा पुण्यापेक्षा एखाद्या लहानशा /स्वस्त राहणीमानाच्या शहरात जाण्याचा विचार असावा असे दिसतेय. हा अतिशय उत्तम विचार आहे. त्यावेळी पुण्यातील घराची किंमत - नवीन ठिकाणचे घराची किंमत हा फरकही मोठा फायद्याचा ठरु शकतो. तसेच आईवडीलांच्या संपत्तीचा वारशाने मिळणारा वाटा पण विचारात घेता येईल.
खेरीज म्हातारपणी नवीन घर विकत घेण्याऐवजी भाड्याच्या घरात राहण्याचा पर्याय विचारात घेता येईल. त्यामुळे मोठी स्थावर गुंतवणूक टाळून ते पैसे नियमित परतावा देणार्या गुंतवणूकीत टाकता येईल. याचे इतर फायदे म्हणजे इच्छा होईल त्याप्रमाणे घर बदलता येईल. एखाद्या ठिकाणाचा / गावाचा/ शहराचा कंटाळा आला किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी रहावेसे वाटले तर ते स्वप्न पुर्ण करता येईल. घर घेणे वा खासकरुन जुने घर विकत घेणे यात काही जोखीमही असते जसे फसवले जाण्याची शक्यता वा बाजारभाव माहीत नसल्यास खूप जास्त किंंमत मोजणे.. किंवा काही कारणामुळे ते ठिकाण अजिबात राहणेयोग्य न वाटणे - या स्थितीत घर भाड्याचे असेल तर सहजपणे तेथून निघता येईल्ल याउलट स्वतःच्या घरात माणूस अडकला जातो, त्याला योग्य किंमत देणारा ग्राहक मिळेपर्यंत ते विकताही येत नाही वा तेथे राहताही येत नाही.
असो.
तर सांगायचा मुद्दा हा की पुण्यातले घर विकून आपली निवासाबाबतची स्वप्ने (भाड्याने) पुर्ण करायची. मला सांगा आपल्यापैकी अनेकांना एखाद्या सुंदर स्थळी (उदा: महाबळेश्वर वा कोकण) गेल्यावर अनेकदा वाटले असेल ना की "इथेच घर असायला हवे"किंवा कुठे एखादा मस्त मोठा बंगला पाहिल्यावर वाटले असेल की "माझा पण असा मस्त बंगला असावा" पण अशी स्वप्नातील मालमत्ता विकत घेणे अनेकदा शक्य नसते किंवा व्यहवार्य तरी नसते. मग जर आयुष्यात इतर काही बंधने नसतील तर भाड्याने घर घेवून वेगवेगळ्या ठिकाणी राहून आपली स्वप्ने पुर्ण करण्यास काय हरकत आहे ? मग हौस फिटली /कंटाळा आला की द्यायचं सोडून..किंवा परवडत असेल तर आपलं स्वतःच घर न विकता फक्त भाड्याने देवून वा तसेच बंद ठेवूनही हा प्रयोग करता येईल. म्हणजे प्रयोग नाहिच झेपला तरी परतीचे दोर असतीलच. हो पण असं करताना आपल्या स्वभावाला ते जमतंय का ते ही बघावं लागेल. म्हणजे "नेहमीची जागा , नेहमीची माणसं आणि नेहमीच्या सवयी" यास तुम्ही महत्व देत असाल तर हा फिरस्तेपणा करु नये पण नवीन जागा, माणसे, सवयी यांच्याशी जुळवून घेणे आवडत असेल तर या पर्यायाचा जरुर विचार करा.
असो. तुमचा मूळ प्रश्न म्हणजे किती पैसे लागतील.. तर मला वाटते खरेतर हा काही प्रश्न नाहीच. जेव्हा तुमच्या मित्राने इतका विचार केला आहे तर काही साधी गणितं तर निश्चितंच मांडली असतील. शिवाय "किती पैसे लागतील ?" याबाबत त्याने तुमच्याकडे सल्ला मागितला आहे असेही तुमच्या लिहण्यावरुन वाटत नाही. त्यामुळे मला वाटते की त्याची केस ऐकून तुम्हाला पडलेला प्रश्न फक्त तुम्ही मांडला आहे आणि "किती पैसे" यापेक्षा या जीवनशैलीशी (विनापत्य, चांगली सांपत्तिक स्थिती, कुणी अवलंबून नाही , इतर बंध फारसे नाहीत )संबंधित इतर पैलू जाणून घेणे जास्त महत्वाचे असावे. म्हणून माझा हा प्रतिसाद.
13 Nov 2019 - 7:17 pm | चौकटराजा
मी ६६ पूर्ण केली आहेत . आतापर्यंत तरी लहानपणी ताराचंद रुग्णालय पुणे ( ३ दिवस घटसर्प ) २००३ ( दोन दिवस हाताला कंपाऊंड फ्रॅक्श्चर ) एकूण दिवस ५ असा अनुभव आहे. अर्थात याचा अर्थ असा नाही की पुढे हाच नियम राहील .माझा आज कोणताही आरोग्य विमा नाही . पण माझंही मिळकत आहे त्यात ६६ टक्के बचत आहे. कारण मी कधीही व्होलवो ने नाशिकला न जाता भुसावळ एस्प्रेसने जातो. हे उदाहरण देण्याचे कारण असे की जीवनमानाच्या कल्पना कशा ठरवायच्या हे तुमच्या हातात असते. अगदी कर्करोग झाला तरी मरणाचा निर्णय ६५ व्या वर्षी घेणारे माझे एक नातेवाईक ही मला माहीत आहेत. ( व ते ६५ गाठून गेले ). आज मला मूत्रपिंडांच्या समस्येची सुरूवात झाली आहे व त्या बाबतीत आरोपण करायचे नाही हा माझा ठाम निर्धार आहे . कारण मिळालेलया आनंदात मी समाधानी आहे. त्याबरोबर पुढच्या पिढीसाठी अमुक लाख असे माझे काही निकष नाहीत . तरुणपणातील अनेक खर्च त्याच प्रमाणात म्हातारपणीही करु, तितकेच मस्त कपडे घालू, तितकाच आहेर करू , तितकेच सिनेमे पाहू ,तितकीच खादाडी करू असे मी तरी करीत नाही. सबब मेडिकल विमा सोडला तारा माझी गेम सेफ आहे !
15 Nov 2019 - 8:32 am | पाषाणभेद
एकदम छान प्रतिसाद अन निर्णय.
एक आजारांसंदर्भातले इच्छापत्र - मेडीकल वील (इच्छामरणपत्र नव्हे!) असा काही प्रकार असतो की ज्यात मी आजारी पडलो की माझ्यावर कसे उपचार करावेत, डॉक्टरांनी काय करावे इत्यादी इत्यादी उल्लेख असतात.
असे आजारांसंदर्भातले इच्छापत्र मी कुसूमाग्रजांचे वाचले आहे.
त्यात त्यांनी स्पष्ट लिहीले आहे की खर्चीक उपचार नकोत, गुप्ते डॉक्टरांकडून उपचार करावेत, घरीच मरण आले तर उत्तम इत्यादी इत्यादी. त्यांच्या भावाच्या पुस्तकात आहे हे पत्र.
15 Nov 2019 - 9:41 am | सुबोध खरे
साहेब असा आजार "तुमच्या पत्नीस" झाला तर तुम्ही त्या "गेल्या" तरी चालतील मी "पैसे खर्च करणार नाही" असे म्हणू शकाल का?
या प्रश्नाला समर्पक उत्तर देणारा माणूस मी अजून तरी बघितलेला नाही.
माझ्या माहितीतील एक नौदलातून निवृत्त झालेले सदगृहस्थ वय ६६ त्यांना रक्ताचा कर्करोग झाला होता (२००४-०५ सालची गोष्ट).
यासाठी उपलब्ध असलेले औषध साधारण १.५ लाख रुपये एका इंजेक्शन साठी होते. अशी ५ किंवा ६ इंजेक्शन त्यांना द्यावी लागणार होती. ज्यामुळे त्यांना ८ महिने ते एक वर्ष अधिक जगता आले असते.
यासाठी येणारा खर्च त्यांच्या मुलाने करण्याची तयारी केली होती. मुलगा मर्चंट नेव्ही मध्ये होता त्यामुळे पैशाचा प्रश्न नव्हता.
पण माझ्या मिळकतीतील पैसे माझ्यावर फुकट घालवू नका ते माझ्या बायकोसाठी राहू देत म्हणून त्यांनी असे उपचार घेण्यासाठी स्पष्ट नकार दिला आणि धीराने ते मृत्यूला सामोरे गेले. त्यांच्या बायकोने आणि मुलाने डोळ्यात पाणी आणून मला हे सांगितले कि त्यांची इच्छा स्पष्ट असल्याने आम्हाला काहीही करता आले नाही.
15 Nov 2019 - 11:27 am | चौकटराजा
शेवटचा कठोर असा " तो" निर्णय घेताना फक्त पेन मॅनेजमेंट करा अशी अट ठेवून करण्याचा मानस हा अगदी व्यक्तिगत असतो जसा देहदानाचा ,जसा मरणोत्तर कोणतेही धार्मिक विधी न करण्याचा ! त्यात अनेक घटकांनी त्या माणसाची मानसिकता ठरत असते त्यामुळे आपण सोडून कुणाचाच निर्णय आपल्याला ठरवता येतच नाही !
असाध्य रोग व अकाली मृत्यू ही दोनच तर " खरी " दुःखे बाकी सर्व काल्पनिक .. जयमाला शिलेदार ..... त्यांच्या आत्मचरित्रात .
15 Nov 2019 - 12:20 pm | Rajesh188
माझे हरनिया ची शस्त्रक्रिया झाली तेव्हा मी त्या स्थितीत माणसाची मानसिक स्थिती काय असते ह्याचा अनुभव घेतला आहे.
किंवा माणूस अतिशय आजारी पडतो तेव्हा त्याची मानसिक स्थिती आणि मृत्यू च भय ह्याचा अनुभव घेतला आहे जेव्हा मी मलेरिया नी खूप आजारी होतो .
एक तर अशा वेळी माणूस जन्म मृत्यूच्या पुढे गेलेला असतो.
त्याला त्या स्थितीत मृत्यूच भय वाटत नाही .
शरीरातील सर्व अवयव शितील झालेले असतात.
मेंदू फक्त वेदनेला च प्रतिसाद देत असतो बाकी कोणताच विचार मेंदूत निर्माण होत नाही.
धडधाकट असताना जे मृत्यू चे भय वाटतं ते गलिच्छ गात्र झाल्यावर वाटत नाही
15 Nov 2019 - 5:18 pm | जॉनविक्क
चर्चा रिटायरसंदर्भात आहे हे खरंय पण ती आयुष्यातून न्हवे तर फक्त कामक्काजातून
15 Nov 2019 - 9:25 pm | चौकटराजा
निवृती चा सम्बन्ध जास्त करून म्हातारपणाशी पर्यायने वैद्यकीय खर्चाशी येतो. सर्व बाबतीतली छन्चोक टाळता येते पण एकदा डोक्टरच्या दाराची पायरी चढलो की फक्त कन्स्लटेशन फी वर मुद्दा सम्पत नाही. म्हणून हे असे वळण धाग्याला लागले. असा विषय माबो वर जरी निघाला असता व वेगळे प्रतिसादक असते तरी वळण असेच लागले असते. इतर खर्च व तब्येतीवरील खर्च यात फरक असा आहे की इतर खर्चात कर्म ( विचारशक्ती) कार्यरत असते पण आजारपण व शेवट यात मानव फार पराधीन आहे ! मला अनेक लोक विचारतात की तुम्ही आता काय करता ? मी २००३ ते २०१९ या कालात एकच उत्तर देतो " आयुश्याची मजा लुटत आहे ! " मग ते विचारतात " कामधन्दा काही नाही ? मी त्याना विचारतो " आयुश्याची मजा लुटणे याला कॄती ही करावी लागतेच ना ? " कर्मयोग म्हन्जे नोटा छापणे " अशीच ज्यांची व्याख्या आहे त्याना मी टाळतच असतो.
15 Nov 2019 - 9:57 pm | Rajesh188
असे असे प्रतिसाद वाचून तरुण पनीच भीती वाटायला लागलीय म्हातारं पणाची.
आपली संस्कृती टिकली असती आणि विभक्त कुटुंबाचे fad आपल्या कडे आले नसते तर हे प्रश्न उभेच राहिले नसते.
प्रत्येक व्यक्तीला ह्या स्थिती मधून जावे लागते .
पुढे कधी चूक कळेल आणि एकत्रित कुटुंब पद्धती अस्तित्वात येईल.
किती विचार पूर्वक आपल्या पूर्वजांनी कुटुंब पद्धती निर्माण केली होती.
पण तिला पद्धतशीर सुरू ग लावला गेला .
16 Nov 2019 - 2:55 am | अथांग आकाश
फालतू प्रश्नावर उत्तरे देणाऱ्यांचा उत्साह मोठा दांडगा!
19 Nov 2019 - 12:09 am | जॉनविक्क
असा मिपाकरांचा अनुभव असल्याने हे होत असावे.
16 Nov 2019 - 10:31 am | श्वेता२४
नेमके जीफ टाकायला कसं जमतं हो तुम्हाला? आपल्या या गुणाचा आपण तर बुवा पंखा आहोत.
20 Nov 2019 - 11:17 pm | अथांग आकाश
आभारी आहे श्वेता ताई _/\_
18 Nov 2019 - 7:41 pm | नितिन थत्ते
रिटायर्मेंटनंतर वायफळ खर्च वाढणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागेल. नोकरी चालू असताना वीकेंडला चालणारे दारुकाम रोज होऊ लागले तर खर्च वाढतील.
वेळ भरपूर आहे म्हणून सतत पर्यटन वगैरे करण्याने पण उगाच खर्च होतो.
बाकी उपक्रमावर याची मोठी चर्चा झाली होती.
20 Nov 2019 - 1:19 pm | चौथा कोनाडा
खरं तर सेवानिवृतांच्या उत्तम मानसिक स्थितीसाठी छंद / इतर ( यात मर्यादित दारुकाम सुद्धा येवु शकेल) यांचे वाढते खर्च गृहित धरून एम्प्लोयरने / शासनाने वाढती पेन्शन सुरु करायला काय हरकत आहे ?
:-))
20 Nov 2019 - 7:55 pm | सुबोध खरे
पैसे कुणी द्यायचे? का पेट्रोल डिझेल वर सेस लावायचा?
सेवानिवृत्तांनी स्वतः ची काळजी स्वतः का घेऊ नये?
काल एक सुखवस्तू वरिष्ठ नागरिक मला वरिष्ठ नागरिक म्हणूनतुम्ही सवलत का देत नाही म्हणून टेचात विचारात होता.
त्याला मी थंड शब्दात सांगितले कि माझ्यापेक्षा काही वर्षे अगोदर तुम्ही जन्माला आलात यापेक्षा तुमचे काय कर्तृत्व आहे ज्यासाठी मी तुम्हाला सवलत द्यावी?
20 Nov 2019 - 9:00 pm | जॉनविक्क
अन्यथा तुम्हाला त्यांचेकडे सूट मागायचे दिवस दिसले आस्तेही ;)
19 Nov 2019 - 1:51 pm | किल्लेदार
आपण रिटायर झालो आहे आणि वेळ जात नाही म्हणून काम करतो आहे असे मनावर ठसवत रहा. पैसे आणि आनंद दोन्ही मिळेल
:D :D :D
20 Nov 2019 - 1:40 pm | जॉनविक्क
जिओ किल्लेदार साहेब.
28 Nov 2019 - 4:04 pm | किल्लेदार
:)
19 Nov 2019 - 6:58 pm | जॉनविक्क
28 Nov 2019 - 4:52 pm | अनुप ढेरे
९ कोटी
28 Nov 2019 - 6:36 pm | टीकोजीराव
एव्हडे जमवायला १०० व्या वर्षा पर्यँत नोकरी करावी लागेल
28 Nov 2019 - 11:02 pm | खटपट्या
आणि तेव्हढे जमतील?
29 Nov 2019 - 2:03 am | सुधीर
समजा आजच्या घडीला मला दरमहा ५० हजार म्हणजे वार्षिक ६ लाख रुपये लागतात (गृहीत धरू की हेल्थ इन्शुरन्सचे हप्ते - म्हातारपणातल्या आजारपणाची सोय अन्यथा पुढचे सगळेच गणित चुकून जाईल + वार्षिक सणासुदीची खरेदी + वार्षिक ट्रीप + ५-७ वर्षांनी लागणार्या खर्चाची तरतूद जसे फर्निचर बदल, रंग रंगोटी, नवे वाहन इत्यादीची वार्षिक तरतूद यात गृहीत धरली आहे पण अगदीच वयोवृद्ध झालो तर वृद्धाश्रमाचा खर्च/सुशृशा करणार्याचा खर्च, औषध पाण्याचा खर्च गृहीत धरले नाहीत, गृहीत धरून चालू की मी इतका म्हातारा झालोच आणि तो खर्च झालाच तर कॅपिटल कन्झ्यूम करून करेन कारण माझ्या पूर्वजांची इतकी वर्ष जगण्याची हिस्ट्री नाही त्यामुळे अशी शक्यता कमी. किंवा अशी परिस्थिती आलीच तर त्याची तजवीज मी वेगळी करेन.)
समजा इन्कम जनरेटींग इलिक्विड अॅसेट क्लास (जसे रिअल इस्टेट) मधून येणारे आजचे उत्पन्न २५ हजार आहे आणि ते इन्फ्लेशन नुसार वाढत जाईल आणि अशा अॅसेट बद्धल काही भावना जडल्यात त्यामुळे ते विकण्याची शक्यता नाही पण ते इन्फ्लेशन अॅडजस्टेड उत्पन्न देत राहतील पिढ्यान पिढ्या आणि पुढल्या पिढीला ते मी देईन.
म्हणजे मला शॉर्ट फॉल २५ हजाराचा आहे (जी धागाकत्याची गरज आहे). म्हणजे वार्षिक ३ लाखाचे उत्पन्न जनरेट होत राहीले पाहिजे. [जर इन्कम जनरेटीम्ग अॅसेट नसेल तर ६ लाखची तरतूद करावी लागेल] आणि ते इन्फ्लेशन्/लाईफ स्टाईल स्पेंडीग नुसार वाढत गेले पाहिजे.
आता गृहीत धरावयाच्या गोष्टी:
१. महागाईचा दर ४.५% धरू (जो लाईफ स्टाईल मेंटेन करायलाही तेवढाच लागेल असे गृहीत धरून. साधारण आरबीआयच्या लाँग टर्म इन्फ्लेशन टार्गेटच्या आसपास). फार अॅग्रेसिव्ह असाल तर महागाईचा दर अजून कमी म्हणजे ३% वा फार कन्झरव्हेटीव्ह असाल तर ६% या रेंज मध्ये धरा. कमी महागाईचा दर गृहीत धरला तर रिटायरमेंट फंडींग कॅपिटल कमी लागेल, जास्त महागाईचा दर गृहीत धरला तर रिटायरमेंट फंडींग कॅपिटल जास्त लागेल.
२. गोळा केलेल्या कॅपिटलवरचे परतावे: पोस्ट रिटायरमेंट अॅबिलिटी टू टेक रिस्क (जोखिम घेण्याची क्षमता) बिलो अॅव्हरेज असेल असे गृहीत धरून जे काही "कन्झरव्हेटीव्ह अॅसेट अलोकेशन" (असे अलोकेशन ज्यात इन्कम जनरेशन आणि कॅपिटल सेफ्टी हे मूख्य उद्दिष्ट असतील, जास्तीतजास्त अलोकेशन फिक्झड इंन्कम अॅसेट क्लास जसे सरकारी बँकांच्या एफडीज, हाय क्रेडीट क्वालीटी डेट इन्स्ट्रूमेंटस जसे बाँड्स, एन्स्डीडीज वा त्याशी संबंधीत डेट म्युच्युअल फंड्ज इ. आणि थोड्याफार प्रमाणात इन्फ्लेशन शॉक अॅब्झॉर्ब करण्यासाठी डायव्हरसिफाईड इक्विटी क्लास जसे इक्विटी म्युच्युअल फंड्स, वा इटीएफ्स इ.) असेल त्यातून येणारे परतावे ८.५% गृहीत धरू शकता. अॅग्रेसिव्ह अझम्शन करून हा दर जास्त पकडला (९% ते १०%) तर कमी कॅपिटल लागेल. पण अगदीच कमी म्हणजे सरकारी बँकेच्या एफडीचा दर पकडला ६.५% तर कॅपिटल जास्त लागेल).
३. गोळा केलेले कॅपिटल शक्यतो टिकवायचे आणि आपल्या पाश्चात पुढल्या पिढीकडे सपूर्द करायचे किंवा चॅरिटी डोनेशन करून टाकायचे.
फॉर्म्युला:
रिटायरमेंटच्या वेळी लागणारी फंडींग (समजा याच वर्षी रिटायर व्हायच आहे)=
(आजची वार्षिक गरज रिअल इस्टेट उत्पन्न वजा जाता) * ( १ + महागाईचा दर) ^(१ + रिटायर होण्यासाठी उरलेली वर्ष) / (गोळा केलेल्या कॅपिटलवरच्या परताव्याचा दर - महागाईचा दर)
= (३ लाख) * ( १ + ४.५%) ^(१ + ०) / (८.५% - ४.५%)
= ७८.३७ लाख
क्रॉस चेक एक्सेलवर करू शकता
वर्ष ०: कॅपिटल : ७८.३७ लाख -- खर्चाची रक्कमः ३ लाख -- उरलेली रक्कम = ७५.३७ लाख जी ८.५% ग्रो होईल. ७५.३७ * (१ + ८.५%) = ८१.७८ लाख
वर्ष १: कॅपिटल : ८१.७८ लाख -- खर्चाची रक्कमः ३ लाख * (१ + ४.५%) = ३.१४ लाख -- उरलेली रक्कम = ७८.६४ लाख जे ८.५% ग्रो होईल. ७५.६४ * (१ + ८.५%)= ८५.३३ लाख
.....
वर्ष २५: कॅपिटल : २ कोटी २१ लाख -- खर्चाची रक्कमः ९.०२ लाख -- उरलेली रक्कम = २ कोटी १२ लाख
---------------------------------------------------
जर मी महागाईचा दर ४.५% धरला पण परताव्याचा दर कमी केला ७% तर मला आजच्या घडीला १ कोटी ५६ लाख लागतील.
जर मी महागाईचा दर ६% पकडला आणि परताव्याचा दर ७% पकडला तर मला आजच्या घडीला ४ कोटी २६ लाख रुपये लागतील.
29 Nov 2019 - 1:42 pm | सुधीर
एक राहून गेले, गुंतवणूकीवरचे परतावे आफ्टर टॅक्स पकडावेत.
अजून सोप्या गणिती भाषेत: समजा माझ्याकडे गोळा केलेली रक्कम १ कोटी आहे. तर या रकमेच्या मी फक्त (गुंतवणूकीतून मिळणारा आफ्टर टॅक्स परतावा - महागाईचा दर)% वा त्याहूनही कमी पैसा दरवर्षी खर्च करत राहीलो तर कदाचित माझे १ कोटी मला आयुष्य भर पुरून उरतील अन्यथा ते संपून जातील.
म्हणजे माझ्याकडे १ कोटी असेल, महागाईचा दर पुढील काही वर्षे ४%(*) असेल आणि मला माझ्या गुंतवणूकीतून कमीत कमी ७%(#) परतावे मिळत राहीले तर ७ वजा ४ म्हणजे ३% रक्कम (म्हणजे ३ लाख वा त्याहूनही कमी रक्क्म ) मी दरवर्षी खर्च केली तर १ कोटीचा फंड आयुष्यभर पुरून उरेल. म्हणजे मी १ कोटीची गुंतवणूक (अॅसेट अलोकेशन) अशा पद्धतीने केली की मला निदान लाँग टर्म ७% परतावे येत राहीले पाहिजेत. जास्त आले तर चांगलेच आहे पण त्याहून अधिक परताव्यासाठी अवाक्याबाहेरची रिस्क घेतली आणि कॅपिटल लॉस झाले तर खूप मोठा फटका उतार वयात पडेल. कमी अधिक प्रमाणात हेच लॉजिक एखाद्या संस्थेला/व्यक्तीला एक डोनेशन/स्कॉलरशीप फंड चालू करायचा आहे तर वापरता येते.
वर कुठेतरी निफ्टीच्या १७% परताव्याचे वाचले. माझ्या मते ते खूपच ऑप्टीमिस्टीक अझम्शन आहे. मी निफ्टी-५० चे १०/५/३/१ वर्षाचे परतावे (दर दिवसाचे) एनएससीच्या डेटा डाउनलोड करून प्रोसेस केले आणि त्याचे गेल्या १९ वर्षाचे (२००० पासून - साधारण ४०००+ दिवसांचे) स्टॅट्स (गेल्या विकेंड पर्यंतचे) असे आहेत. (एनएसीवरून डेटा डाउनलोड करून हे तुम्हाला पण शोधता येईल)
१ वर्ष - कमीत कमी परतावे : -५६% (जाने ०८ ते जाने ०९), जास्तीत जास्त परतावे : १०२% (एप्रिल ०३ ते एप्रिल ०४), मिन परतावे : १५%, मिडीयन परतावे : १२%, स्टॅ. डिव्हिएशन : २७%
३ वर्ष - कमीत कमी परतावे : -१६% (एप्रिल ०० ते जानेवारी ०३), जास्तीत जास्त परतावे : ५९% द.सा.द.शे. (मे ०३ ते मे ०६), मिन परतावे : १४.५%, मिडीयन परतावे : ११%, स्टॅ. डिव्हिएशन : १३%
५ वर्ष - कमीत कमी परतावे : -१% (नोव्हे ०७ ते नोव्हे १२), जास्तीत जास्त परतावे : ४४.५% द.सा.द.शे. (ऑक्टो ०२ ते ऑक्टो ०७), मिन परतावे : १४.७%, मिडीयन परतावे : १२%, स्टॅ. डिव्हिएशन : ९%
१० वर्ष - कमीत कमी परतावे : ५% (डिसें. ०७ ते डिसें १७), जास्तीत जास्त परतावे : २१% द.सा.द.शे. (मे ०३ ते मे १३), मिन परतावे : १३%, मिडीयन परतावे : १४%, स्टॅ. डिव्हिएशन : ४%
हे पाहिल्यावर लगेल कळते कालावधी जास्त असेल तर रिस्क फॅक्टर कमी कमी होत जातो.
पुढल्या दहा+ वर्षात जर मला १.५ कोटी साठविले पाहिजेत हे कळल्यावर जेव्हा ते पैसे साठवायला मी जेव्हा सुरुवात करतो, तेव्हा गुंतवणूकीचा कालावधी (१०+ वर्ष) जास्त असल्याने तर मी सुरुवातीला अॅग्रेसिव्ह अॅसेट अलोकेशन करू शकतो (^). म्हणजे अधिका-धिक निफ्टी-५० (वा मिडकॅप इ.) बेंचमार्क असणार्या इन्स्ट्रूमेंट्स (इक्विटी म्युच्युअल फंड/निफ्टी ईटीएफ्स/डायरेक्ट स्टॉक्स) असा एक्स्पोजर घेऊ शकतो. पण जस जसा रिटायरमेंटचा कालावधी जवळ येत जाईल तस तसा मी इक्विटी एक्सपोजर कमी कमी करत जाईन. म्हणजे रिटायरमेंटला १ वर्षच बाकी आहे. ८०% पैसा इक्विटी अॅसेट क्लास मध्ये आहे. आणि काही तरी ब्लॅक स्वान इव्हेंट आला तर सगळं कॅपिटल धाडकरून निम्यावर पण येईल. दुसरे म्हणजे, मार्केट किती एक्सपेन्सिव्ह आहे हा एक मोठा फॅक्टर आहे पुढल्या काही वर्षांचे रिटर्न्स गृहीत धरताना. तो बर्याच वेळा कन्सेन्सस फॉर्वर्ड पीई रेशोवरून कळेल. पण ही माहिती उपलब्ध नसेल तर एनएससीच्या साईटवरून निफ्टीचा ट्रेलिंग पीई रेशो वरून पण अंदाज घेता येईल.
(*)(#) ही दोनही क्रिटीकल अझम्शन्स आहेत. ही अझम्शन्स गडबडली तर पुढलं सगळं गणित चुकेल.
(^) अजून काही फॅक्टर मॅटर करू शकतात. उदा. माझी जॉब सेक्युरीटी. माझा जॉब फार सुरक्षित असेल जसे गव्हरमेंटची नोकरी, युनिवर्सिटी कॉलेज प्रोफ, आर अॅण्ड डी मधला संशोधक विरुद्ध जिथे नोकरीवर गदा येण्याची शक्यता जास्त असते वा एखाद्या प्रोफेशनमधले चढ-उतार जिथे अधिक असतात
29 Nov 2019 - 2:23 pm | मुक्त विहारि
धन्यवाद
29 Nov 2019 - 8:07 pm | सुबोध खरे
उत्तम विश्लेषण.
येणाऱ्या परताव्यामध्ये जर तूट येत असेल तर तेवढ्या रकमेसाठी ऐखादी अर्ध वेळ नोकरी किंवा व्यवसाय करावा असेच मी सुचवेन.
आज साधारण आयुर्मर्यादा ७१ वर्षे झाली आहे
असे असताना आपण नोकरी २५ ते ४५ अशी २० वर्षे केलीत आणि ७५ वर्षापर्यंत जगलात तर या २० वर्षात साठवलेली रक्कम पुढची २६ वर्षे फारच थोड्या लोकांना पुरेल असा माझा अंदाज आहे. कारण जसा काळ पुढे जातो तशी महागाई वाढतच जाते आणि जसे आपले वय वाढते तसे वैद्यकीय खर्च भूमितीय मितीने वाढत जातात.
29 Nov 2019 - 9:35 pm | मुक्त विहारि
हाच निवृत्ती किती पैसे गाठीशी हवेत? ह्या प्रश्नाचा पाया आहे.
3 Dec 2019 - 2:50 pm | चौथा कोनाडा
सुधीर, लै भारी कॅल्क्युलेशन्स केली राव ! मानलं तुम्हाला ! तुमचा अन माझा आकडा म्हंजे सव्वा चार कोटी जुळतोय की !
जर ६-७ कोटी मिळाले तर बेष्टच हुईल ! एखादे कोटी रु माझी गावाकडची शाळा+शिक्षकांना देता येतील ! त्यांचे उपकार खरं तर पैश्यात मोजता येणार नाहीत !
आता एखाद दिवस "जीवनातून व्हीआरएस कितव्या वर्षी घ्यावी ?" असा धागा येईल की काय अशी भीती वाटतेय !
29 Nov 2019 - 2:31 pm | मुक्त विहारि
वयाच्या 50 ते 60 ह्या दरम्यान तुमचा 80% पगार सेव्ह व्हायला हवा.
61-70 ह्या दरम्यान तुमचा 70% पगार सेव्ह व्हायला हवा.
71-80 ....60% सेव्ह. ..
81-90 ...50%....
आणि हे व्हायला हवे असेल तर. ...एकत्र कुटुंब पद्धती अतिशय योग्य. ...
आणि 21 ते 25 ह्या दरम्यान लग्न झाले असेल तर ...फारच उत्तम. ....
ही माझी जीवनशैली आहे. ..एकत्र कुटुंब पद्धत असल्याने खूप पैसा वाचला आणि अजूनही वाचत आहे. ..
1 Dec 2019 - 3:30 pm | जॉनविक्क
_/\_
पैसे वाचवायला कॉम्प्रेमाईज करत जगायची तयारी असणाऱयांसाठी बेस्ट प्रॅक्टिस म्हणून काकामुवींचा हा प्रतिसाद सुवर्णाचे अक्षरात कोरल्या जावा
1 Dec 2019 - 4:19 pm | मुक्त विहारि
खूप गोष्टी वाचतात.
1. आमच्या ताब्यात घर देऊन, आईवडील कधीही घर सोडू शकत होते.
2. ते प्रवास करून आल्या नंतर त्यांना घरचे गरम अन्न मिळत होते.
3. कितीही नातेवाईक आले तरी आईला कधी कामाचे दडपण आले नाही.
4. माझ्या आईने प्रोत्साहन दिल्या मुळे , माझी बायको जर्मन भाषा शिकली. अगदी पहिल्या लेव्हल पासून.
5. मुळात माझ्या बायकोचे आणि माझ्या आईचे , एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे आई आजारी पडली की बायकोच हसतमुखाने सेवा करते. ..तसेच माझ्या आई बाबतीत आहे.
एकत्र कुटुंबाचे फायदे फार उशीरा समजतात. ....
1 Dec 2019 - 6:17 pm | कंजूस
पटलं.
1 Dec 2019 - 7:06 pm | जॉनविक्क
तुम्ही एकत्र कुटुंब म्हणजे नवरा बायको व बायकोचे सासू सासरे आणी मुले असे म्हणत आहात होय.... ते तर साधे कुटुंबच झाले की ?
बहुतांश लोक एखाद्या परिसराचे दुसऱ्या पिढीतील नागरिक आहेत व तिसऱ्या पिढीचे बालपणही त्याच परिसरात काढू इच्छितात ते असेच जगतात मी तर तुम्ही, तुमचे भाऊ महाशय व त्यांचे कुटुंब वगैरे वगैरे एकत्र रहाता असे सुचवत होता असे वाटले,
काकमुविंचा प्रतिसाद बेंटेक्स मध्ये कोरल्या जावा अशी दुरुस्ती सुचवतो
4 Dec 2019 - 12:38 pm | किल्लेदार
"काकमुविंचा प्रतिसाद बेंटेक्स मध्ये कोरल्या जावा अशी दुरुस्ती सुचवतो"
हा हा हा !!!
1 Dec 2019 - 3:26 pm | जॉनविक्क
थोडक्यात KBC चा विजेता ठरल्याशिवाय निवृत्ती घेणे सुज्ञता नक्कीच न्हवे. चला तयारी सुरू करतो 5-6 वर्षात नॉलेज वाढले की KBC ला अपिअर व्हावे म्हणतो