भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भाग १२ भाग १३ भाग १४
.anch {
border: none !important;
display: inline-block !important;
padding: 8px 16px !important;
vertical-align: middle !important;
overflow: hidden !important;
text-decoration: none !important;
color: #fff !important;
background-color: #2196F3 !important;
text-align: center !important;
cursor: pointer !important;
white-space: nowrap !important;
margin: 5px;
}
.anch-crr {
border: none !important;
display: inline-block !important;
padding: 8px 16px !important;
vertical-align: middle !important;
overflow: hidden !important;
text-decoration: none !important;
color: #000 !important;
background-color: #ccc !important;
text-align: center !important;
cursor: pointer !important;
white-space: nowrap !important;
margin: 5px;
}
२६ सप्टेंबर २०१८
ठरल्या प्रमाणे बरोब्बर ४:३० वाजता वईल सोबत आम्ही निघालो. नीलच्या किनारीच हॉटेल असल्याने आम्हाला व्हॅन वगैरे नव्हती आली घेऊन जायला. रस्ता ओलांडून पलीकडे पोहोचलो तोवर बाकी सोबतींना व्हॅन सोडून गेली. बोटीतून आम्ही पलीकडच्या तीराला पोहोचलो आणि तिथून एका मिनी बस मधून बलून राईडच्या टेक ऑफ पॉईंट जवळ आलो. सगळ्यांना कॉफी आणि केक देऊन वईल त्याच्या साथीदारांसोबत बलूनची तयारी करायला गेला. या राईड २ वेळा होतात. पहिली भल्या पहाटे, जिला टूरवाले "फर्स्ट लाईट फर्स्ट फ्लाईट" म्हणतात आणि दुसरी "सेकंड फ्लाईट".
बलूनची तयारी
वेगवेगळे टूरवाले आपापल्या बलूनला तयार करण्यात गुंग होते. बलूनमध्ये आगीने गरम हवा भरायला सुरु झाली तशी एकेका बलूनने मस्त आकार घ्यायला चालू केलं. बलूनला बास्केट बांधलं गेलं आणि आम्ही सगळे १५ लोक बास्केट मध्ये जाऊन बसलो. इजिप्तमध्ये पूर्वी बलून कोणीही चालवू शकायचं पण काही अपघातांनंतर हे बंद करून फक्त हॉट एअर बलून राईडचं शिक्षण घेतलेले कॅप्टन बलून हाताळू शकतात. आणि बलून उडण्याची दिशा, स्थिती लक्सॉर विमानतळावरून ठरवण्यात येते. कधी वातावरण उडण्यासाठी योग्य नसेल तर विमानतळावरून राईड रद्द पण करण्यात येते. सुदैवाने आमच्या बलून राईड वर तशी वेळ आली नाही आणि काही मिनिटांतच त्याने आभाळाच्या दिशेने प्रवास सुरु केला. आम्ही फर्स्ट लाईट फर्स्ट फ्लाईट टूर होती. आभाळात एका उंचीवर येई पर्यंत पूर्वेला फटफटलं होत. अजून थोड्या उंचीवर पोहोचल्यावर क्षितिजावर सूर्य बिंब दिसू लागलं. खाली हिरवीगार शेती, पलीकडे निळीशार नील, तिच्या पलीकडे आळसावलेलं लक्सॉर आणि आमच्या मागे काही डोंगररांगा आणि दूरवर पसरलेलं वाळवंट.
बलून मधून
बलून मधून
नील आणि सुर्योदय
अलगद तरंगत बलून 'कोलॉसी ऑफ मेम्नॉन' वरून जायला लागला. कॅप्टन गरम हवेचा मारा कमी जास्त करत बलूनची जमिनीपासून उंची सुद्धा कमी जास्त करत होता. काही घरांवरून बलून जाऊ लागला, त्यांच्या कोंबड्या, गच्चीवर टाकलेली वाळवणं सगळं स्पष्ट दिसत होतं.
कोलॉसी ऑफ मेम्नॉन
मेदिनेत हाबु
'मेदिनेत हाबु' वरून बलून जाऊ लागला तेव्हा कॅप्टन म्हणाला, "तुमच्या लक्सॉरच्या टूर मध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही निवांत बघणार आहातच. पण बलून मधून बघतांना आपण एका म्युसिअम मधून फेरफटका मारत आहोत असं वाटतं." आता हळू हळू बलूनची उंची कमी होऊ लागली. कॅप्टनने 'टच डाउन' करताना काय काळजी घ्यायची याच्या सूचना दिल्या आणि पुढल्या १० मिनिटात आम्ही बास्केट मधून खाली उतरून ग्रुप फोटो काढत होतो. दुसरीकडे बलून मधून हवा काढून त्याला गुंडाळण्यात येत होतं. इतका ऎटबाज बलून हवा गेल्यावर फारच बिचारा वाटू लागला होता. ६:३० वाजता व्हॅन आम्हाला घ्यायला आल्या. आणि परत बोटीत बसवून नदीच्या पलीकडे सोडण्यात आलं. संध्याकाळी फोटो आणि व्हिडिओचा पेनड्राईव्ह हॉटेल वर येऊन देऊन जातो असं म्हणून वईल निघाला. पुढची टूर ८:०० वाजता सुरु होणार होती, आम्ही तोवर अंघोळ करून, भरपेट बफे नाश्ता करून घेतला.
इमाद आमचा लक्सॉर टूरचा गाईड मिनीबस घेऊन ८ वाजता आम्हाला घ्यायला आला. आधीच काही पर्यटकांना गोळा करून, आम्हाला घेऊन, अजून २ जपानी पर्यटकांना घेतलं अन आमची 'वेस्ट बँक' ची सफर सुरु झाली.
पहिला स्टॉप होता 'कोलॉसी ऑफ मेम्नॉन'. इथे पूर्वी आमेनहोटेप तिसरा याने बांधलेलं मंदिर होतं, आता फक्त आमेनहोटेपचे हे दोन पुतळे तेवढे शिल्लक राहिलेत. भूकंपामुळे या पुतळ्यांची पण अवस्था फार वाईट झाली आहे. १० मिनिटे इथे घालवल्यावर पुढे निघालो.
कोलॉसी ऑफ मेम्नॉन
Mortuary Temple of Hatshepsut अर्थात दफनविधी करण्याचं मंदिर. सगळ्यांची तिकिटे इमाद ने काढली आणि मंदीराच्या पायथ्याशी येऊन इमाद भोवती सगळे गोळा झालो. त्याने सांगायला सुरवात केली, "हॅटशेपस्यूत ही इजिप्तच्या इतिहासातील फार कर्तबगार फेरो राणी होती. राजघराण्यात जन्माला आलेली हॅटशेपस्यूत ही वडिलांनंतर (थूटमॉस पहिला) गादीवर बसली. तिचा नवरा थूटमॉस दुसरा हा तिचा भाऊपण होता. या दोघांना एक मुलगी झाल्यानंतर हॅटशेपस्यूत परत गर्भवती राहिली नाही. थूटमॉस II याला दुसऱ्या बायको द्वारे पुत्रप्राप्ती झाली ज्याचं नाव ठेवलं गेलं थूटमॉस तिसरा आणि हाच हॅटशेपस्यूतच्या मृत्यूनंतर गादीवर बसला. हॅटशेपस्यूतने आपल्या कारकिर्दीत लोकहिताची कामे केली, त्यामुळे ती लोकप्रिय तर होतीच पण तिच्या काळात कर्नाक मंदिरासारखे भव्य मंदिर बांधले गेले होते.
फेरोच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीराचं ममीफिकेशन केलं जायचं हे तर तुम्हाला माहित असेलच. ते करण्याच्या जागेला फार पवित्र मानलं जायचं. त्यामुळे त्यांची मंदिरे बनवली जायची. तसंच हे हॅटशेपस्यूतचं मंदिर. सामान्य माणसाला इथे येण्यास पाबंदी होती. ममीफिकेशन करणारे पुजारी फक्त येथे येऊ शकायचे. हे मंदिर तीन टप्यात बनलेलं आहे. सगळ्यात पहिले हे बघा, हे झाड हॅटशेपस्यूतने 'लँड ऑफ पंट' जे लाल समुद्राजवळ आहे तिथून मागवले होते. याच्या अत्तराचा वापर ममीफिकेशन मध्ये केला गेला असावा असा कयास आहे. जागोजागी तुम्हाला हॅटशेपस्यूतचे पुतळे दिसतील पण त्याची विटंबना तिच्या सावत्र मुलाने सत्तेवर आल्या आल्या केली. सगळ्यात शेवटच्या खोलीमध्ये छतावर तुम्हाला गडद निळ्या रंगाचं आकाश आणि तारे दिसतील. फेरो निद्राधीन होत आहे असा संकेत त्यातून दिला गेला आहे. तुम्ही मंदिर पाहून या ४५ मिनिटांत आपण इथे परत भेटू. "
हॅटशेपस्यूतने मागवलेले झाड
Mortuary Temple of Hatshepsut
हॅटशेपस्यूत
मंदिरातील रिलिफ्स
सकाळचे ९:३० वाजले होते तरी उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता. लांबून नवं कोरं वाटणारं मंदिर पायऱ्याचढून वर गेल्यावर वेगळंच वाटू लागलं. बरेच हॅटशेपस्यूतचे पुतळे भग्नावस्थेत होते. २६ पुतळ्यांपैकी फक्त ६-७ चांगल्या अवस्थेत होते. इथून आत गेल्यावर जिथे जिथे हॅटशेपस्यूतचं नाव किंवा चित्र होतं ते नष्ट केलेलं आहे आणि शक्य तिथे थूटमॉस III ने स्वतःचं नाव कोरलं आहे. इमाद ने सांगितल्या प्रमाणे मंदिराचं आवार पाहून फोटो काढून वेळेत परत आलो. आता उत्सुकता होती पुढच्या थांब्याची. 'व्हॅली ऑफ किंग्ज'.
२० मिनिटात तिथली तिकिटे घेऊन इमाद एका हॉल मध्ये उभा होता. त्याच्या मागे प्लॅस्टिकची कसलीशी प्रतिकृती होती. "आपण आता जे पाहायला जाणार आहोत त्या व्हॅली ऑफ किंग्जची ही प्रतिकृती. जो काळा भाग दाखवला आहे तो रस्ता आहे, जागोजागी नंबर लिहिलेले आहेत ते थडग्यांचे आहेत. आणि तुम्ही इथे वाकून बघाल तर प्रत्येक थडग्याची खोली पण इथे दिसून येईल. KV १७ ही सेटी पहिला याची कबर सगळ्यात खोल आहे. आणि पर्यटकांसाठी खुली नाही. तुत-अंखं-अमुन च्या कबरी साठी वेगळे तिकीट आहे. ते घेऊन कोणी पाहणार असेल तर चालेल, फक्त वेळेत परत या. आत्ता आपण जी तिकिटे घेतली आहेत त्यात ३ कबरी बघता येतील. आपण KV ८, KV ९ आणि KV ५५ बघणार आहोत. चला तर मग."
व्हॅलीची प्रतिकृती
व्हॅलीमध्ये थडगे बनतांना
बुकिंग ऑफिस पासून कबरींपर्यंत घेऊन जायला एक मिनी ट्रेन आहे. इलेक्ट्रिक वर चालणारी. व्हॅली मध्ये धुराने क्षती होऊ नये म्हणून घेतलेली ही खबरदारी. ट्रेन आम्हाला मध्यावरील एका ठिकाणी सोडून गेली. तिथून पायी आम्ही KV ८ पाशी आलो.
इमाद पुढे सांगू लागला, "सुरवातीच्या काळात लोअर इजिप्त मध्ये फेरोंसाठी पिरॅमिड बांधले गेले. पण ते इतके भव्य होते लुटारू फेरोला त्यात ठेवल्या नंतर काहीच दिवसांत थडगी उघडून सगळे लुटून न्यायचे. म्हणून नंतरच्या काळात, जेव्हा अप्पर आणि लोअर इजिप्त एक झालं आणि इजिप्तची राजधानी 'थेबेस' अर्थात सध्याचं लक्सॉर ला हलवण्यात आली, तेव्हा फेरोंनी लुटारूंना आकर्षित करतील अशा भव्य कबरी बांधणं सोडून मागच्या डोंगरात भुयारे खोदून त्यात विसावा घेण्याचं ठरवलं. नवीन फेरो गादीवर बसल्यावर लगेच तो आपल्यासाठी एखादी जागा या व्हॅली मध्ये शोधत असे आणि तिथे लगोलग काम सुरु होई. पण फेरो जिवंत असतांना कबरीचं काम पूर्ण झालेलं चालत नसे त्यामुळे सुरवातीला निवांत आणि सुंदर रित्या कबर घडवायला सुरवात व्हायची. अशातच फेरोचा मृत्यू झाला कि ७० दिवसांत त्यांना कबर तयार ठेवावी लागे."
कुणी तरी प्रश्न विचारला "७० दिवसच का?"
इमाद म्हणाला, "ममीफिकेशनची एक कृती असते ज्यात वेगवेगळे टप्पे असतात. ज्यात सुरवातीला शव स्वच्छ होते. नंतर नाकातून तार टाकून मेंदू वेगळा केला जातो आणि टाकून दिला जातो. यकृत, फुफुसं, आतडी वगैरे काढून वेगवेगळ्या बरण्यांमध्ये भरले जातात. हृदय काढून त्याच्या जागी पवित्र स्क्रॅरब किडा ठेवण्यात येतो. त्यानंतर ४० दिवस मिठामध्ये शव सुकवले जाते आणि नंतर अत्तर, तेल वगैरे लावून कापडी पट्ट्या गुंडाळून ममी तयार होते. यावर फेरोचा सोन्याचा मुखवटा चढवून त्याला शवपेटीत आणि मस्तबा मध्ये ठेवलं जात असे. हि संपूर्ण प्रोसेस करायला ७० दिवस लागायचे. म्हणून ७० दिवसांची डेड लाईन. त्यामुळे सगळ्याच कबरीची कामं मध्याला रेखीव आणि दरवाज्याजवळ कशी तरी उरकलेली दिसतील. बऱ्याच कबरी तर नीट पूर्ण सुद्धा झाल्या नाहीत."
नवरा म्हणाला, "पण याने लुटारूंचा प्रश्न सुटला?"
"दुर्दैवाने नाही" इमाद म्हणाला. "सोनं सगळ्यांच्याच आवडीचा विषय. त्यामुळे तेव्हा लुटारु इथे पहाऱ्याला असलेल्या रक्षकांना लाच देऊन कबरी लुटत होतेच. सगळ्यांशी संधान साधलेलं होत त्यामुळे लुटारू येतच राहीले."
"मी असं ऐकलं आहे कि त्याकाळचे पुजारी पण यात सामील होते. खरं आहे का ते?" माझा प्रश्न.
"हम्म" इमाद भुवया उंचावून म्हणाला. "काही लोकांच्या मते हो. असं बघा, मोंटूहोटेप दुसरा याने इजिप्तची राजधानी थेबेसला हलवली. त्यानंतर पुढची ७००-८०० वर्षे हीच राजधानी होती. या कालखंडात फेरोंचं देव आणि देवळांकडे दुर्लक्ष होऊ लागलं. आणि तेव्हा पुजाऱ्यांचं फावलं. जेव्हा आणि जे जे पुजारी सांगे तेव्हा ते ते फेरो करे. फेरोला वाटे कि आपण देवाला खुश ठेवत आहोत. पण देवासाठी मागवल्या जाणाऱ्या गोष्टी या थेट पुजाऱ्यांच्या कामी येत असत. आणि अशा रितीने पुजाऱ्यांचं प्रस्थ फार वाढलं. मी मघाशी तुम्हाला म्हणालो कि हॅटशेपस्यूतच्या मंदिरात सामान्य माणसाला प्रवेश नव्हता. खरंतर पुजाऱ्याव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नव्हता. हळू हळू पुजाऱ्यांची भूक देवासाठी मागवल्या जाणाऱ्या गोष्टींनी भरेनाशी झाली आणि त्यांनी लुटारूं मार्फत या व्हॅली मधली थडगी फोडली असा एक विचार इजिप्तऑलॉजिस्ट मध्ये आहे."
"So , coming back to Kings Valley, KV ८, मेरेनटाह या फेरोचं हे थडगं असून, अंदाजे १६० मीटर पॅसेज नंतर ममी ठेवलेली खोली येते. KV ९ हे रॅमसिस चौथा याचं थडगं आहे. विशेष बाब अशी की हे थडगं खोदताना चुकून एक भिंत फोडून कामगार KV १२ मध्ये पोहोचले, त्यामुळे मध्येच दिशा बदलून खोदकाम उजवीकडे वळवण्यात आलं. राहता राहिलं KV ५५ हे थडगं आखेनतेन या फेरोचं आहे. त्याच्या बद्दल पण 'इंटरेस्टिंग' गोष्टी आहेत" हाताच्या बोटांचे quotes करून इमाद म्हणाला, "पण ते नंतर सांगेन. सध्या तुम्ही हे बघून या कुठल्याही कबरीच्या आत मला यायला परवानगी नाही, आणि फोटो काढायलाही नाही. तासाभरात परत या मी इथे रेस्टिंग पॉईंट ला बसलोय."
५० मिनिटात सगळ्या गोष्टी पाहून आम्ही पण इमाद सोबत येऊन बसलो. त्याच्या ओळखीची एक गाईड पण तिथे गप्पा मारत बसली होती. एका जपानी-अमेरिकन जोडपं आणि त्यांची ८ महिन्यांची मुलगी यांच्या सोबत ती आलेली. ते जोडपं बघायला गेलेलं तोवर ही गाईड मंजुळ आवाजात त्या बाळाला गाणी ऐकवून झोपवत होती. अरेबिक का होईना सूर आणि धून फार छान वाटत होते. तिच्या हातावर झुलत, गाणी ऐकत गोरी गुलाबी पोर मस्त झोपी गेली होती. हे जोडपं खरंच प्रेरणादायी वाटलं मला. फिरायची आवड आणि मुलांची जबाबदारी एकमेकांच्या आड कधीच येऊ शकत नाही याच मूर्तिमंत उदाहरण मी पाहात होते.
बाकी लोक येई पर्यंत काही तरी बोलू म्हणून इमादला म्हणाले, "तुत-अंखं-अमुन च्या थडग्याविषयी सांग काहीतरी. हे समोर दिसतंय तेच आहे ना त्याचं?" "हो. पण ही त्याच्यासाठी निवडलेली कबर नव्हती. नवव्या वर्षी फेरो बनलेला तुत १८व्या वर्षी जाईल याची कुणालाच कल्पना नव्हती. त्याच्यासाठी निवडलेल्या थडग्याचं काम नीट सुरु पण झालं नव्हतं त्यामुळे कोण्या दुसऱ्यासाठी बनवलेलं हे थडगं वापरावं लागलं. ते तितकस मोठं पण नाही. तुत ला इथे ठेवल्या नंतर किमान दोन वेळा हे फोडलं गेलं पण फक्त बाहेरची खोली लुटली गेली आणि आतल्या २ खोल्या तशाच शाबूत राहिल्या. काही वर्षांनी सगळ्यांना या थडग्याचा विसर पडला, इतका की त्याच्यावर दुसरं थडगं सुद्धा बनवण्यात आलं. हावर्ड कार्टर ने १९०७ साली इथे व्हॅली मध्ये काम सुरु केलं. १९२२ साली त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि तुतची 'रॉयल टुम्ब' सापडली. तिच्या आत अनेकविध वस्तू तर सापडल्याच पण भिंतींवरची रिलिफ्स पण सुरेख होती. ज्या वस्तू सापडल्या त्यात काही ठिकाणी राणीची कोरलेली चित्रे आढळतात. काही म्हणतात ती तुत ची बायको अंखंसुनामून आहे तर काही म्हणतात ती सावत्र आई नेफरतीती आहे." या गप्पा सुरु होत्याच तेवढ्यात टूर मधले सगळे परत आले आणि आम्ही निघालो.
वईलने दिलेल्या बलून सफारीच्या फोटोंमध्ये संपूर्ण लक्सॉरचे फोटो होते. त्यातील व्हॅलीमधील काही फोटो.
आता वेस्ट बँक टूर मधील शेवटचा स्टॉप होता मेदिनेत हाबु, अर्थात रामसिस तिसरा याचं दफनविधी करायचं मंदिर. हे सकाळी बलून मधून पाहिलं होतं आता नीट आतून पाहायचं होतं. इमाद सांगू लागला, "रॅमसिस तिसरा याचं हे दफनविधीचं मंदिर असून, जागोजागी तुम्हाला फेरो विविध देवतांची पूजा करतांना दिसेल. देवांच्या हातात key of life आहे, जी मृत्यूनंतर च्या प्रवासात फेरो ला लागेल. म्हणून त्या त्या देवतांची पूजा करून ते ही चावी फेरोला देणार असं यातून दाखवलं गेलं आहे. काही रिलिफ्स वर तर तुम्हाला तेव्हाचे रंग पण दिसतील. रिलिफ्स नीट कोरलेले आहेत पण त्या सोबत चे कर्तृश कोणी खोडू नये म्हणून खणून काढल्या सारखे ठळक बनवले आहेत. बघालच तुम्ही. मंदिर फार मोठं नाही १५ मिनिटात पाहून होईल. या तोवर." मंदिराच्या आतील बाजूस रॅमसिस चे पुतळे होते, आणि खांबावरचे रिलिफ्स आणि त्यांचे रंग फार सुंदर होते. भिंतींवर काही ठिकाणी फेरो शिकारीला निघाल्याची दृश्ये होती, शेती करतानांची, देव-देवतांच्या पूजेची. आणि कर्तृश मात्र खांबांवर चक्क खोदलेले होते.
प्रवेशद्वार
इतर रिलिफ्स
कोरलेले (की खणलेले?) कर्तुश
मंदिर पाहून बाहेर आलो आणि जेवायला जाऊया असं ठरलं. आमची ईस्ट बँकची टूर पण अशीच पुढे चालू राहणार होती, त्यामुळे इमाद सोबत आम्ही जेवायला गेलो आणि बाकीची मंडळी निघून गेली. जेवतांना इमाद ला सांगितलं, "उद्या आमचा देन्देराला जायचा प्लॅन होता, अर्ध्या दिवसाची टूर करायचा. तूच का येत नाहीस सोबत?" "ऑफिस मध्ये विचारून बघतो" इमाद म्हणाला. जेवण उरकून बोटीतून पुन्हा पल्याड पोहोचलो. हॉटेल च्या बरोबर समोर. पण इतक्यात हॉटेल वर नव्हतं जायचं. दुसऱ्या बाजूला एक नवीन मिनी बस आमची वाट पाहत होती. काही जण आधीच येऊन बसले होते. आम्ही आलो आणि ईस्ट बँकची टूर सुरु झाली.
सुरुवात झाली कर्नाक मंदिरापासून. भव्य भव्य ते किती असावं याची प्रचिती या मंदिराच्या आवारात पाऊल ठेवल्यापासून होते. आमची तिकिटे घेऊन इमाद आला आणि कर्नाक बद्दल सांगू लागला,"इथे राज्य केलेल्या प्रत्येक फेरोने यात आपला वाटा जोडून हे मंदिर वाढवले. मुख्यतः मंदिराचे आवार ५ भागात विभागले असून पैकी ४ हि मंदिरे आहेत अमुन रा, त्याची पत्नी देवता मुट, त्यांचा मुलगा देव मोंटू आणि आमेनहोटेप चौथा यांची. पाचव्या भागात पवित्र तलाव आणि खेपेर या स्कॅरब किड्याचा पुतळा आहे. या व्यतिरिक्त कर्नाकच्या आवारात खोन्स, प्ताह, थूटमॉस तिसरा, आमेनहोटेप दुसरा, ओसायरिसची खोली वगैरे अशा अनेक वास्तू आहेत. पण यातील आपण फक्त अमुन रा चे मंदिर आणि पवित्र तलावाचा भाग पाहणार आहोत. बाकी भाग पर्यटकांसाठी बंद आहेत. मेंढ्याचे डोके आणि सिंहाचे शरीर असलेल्या रॅम हेडेड स्फिंक्सची हि रांग आपल्याला मुख्य मंदिराच्या आवारात घेऊन जाते. "
रॅम हेडेड स्फिंक्स
उंच भल्या थोरल्या भिंती आणि खांबाच्या रांगांमधून आम्ही पुढे पुढे सरकत होतो. पुढे एका ठिकाणी इमाद जाऊन थांबला त्याच्या भोवती आम्ही सगळे गोळा झालो.
"मी मघाशी तुम्हाला सांगितलं कि प्रत्येक फेरोने या ना त्या स्वरूपात मंदिर वाढवले. तसाच हातभार शक्तिशाली अशा एका स्त्री फेरोनेही लावला. सांग बरं कोण असेल ती?", इमादने माझ्याकडे बोट दाखवून विचारलं.
"हॅटशेपस्यूत" मी आज्ञाधारक रित्या उत्तरले.
"बरोब्बर. तिने सुद्धा काही बदल केले. आणि आपलं नाव कर्तृश मधून त्यावर कोरून ठेवलं. आता या बाजूने या भिंती मागे पहा."
आम्हाला एका ओबेलिस्कची वरची बाजू तेवढी दिसत होती.
"हि हॅटशेपस्यूतची ओबेलिस्क. हॅटशेपस्यूतनंतर जेव्हा तिचा सावत्र मुलगा थूटमॉस तिसरा सत्तेवर आला, त्याने तीच नाव सगळ्या ठिकाणाहून मिटवण्याचा खूप प्रयत्न केला. त्याला तिची हि ओबेलिस्क सुद्धा पाडायची होती. पण आजूबाजूच्या मंदिरावर त्याचा परिणाम होईल म्हणून त्याने चारही बाजूंनी भिंत उभारून ओबेलिस्कच झाकून टाकली. याचा परिणाम असा झाला कि ओबेलिस्क नंतरच्या काळातील आक्रमणे आणि विद्धवंसांपासून वाचली. एका अर्थाने बरंच केलं म्हणायचं ना त्याने." इमाद हसत म्हणला आणि पुढे चालू लागला. जिथे तिथे असलेले फेरोंचे पुतळे मंदिराला भव्यता देत होते. थोड्याच वेळात आम्ही एका तलावाच्या शेजारी येऊन पोहोचलो.
इसिस आणि पायापाशी हॅटशेपस्यूत
हॅटशेपस्यूत ओबेलिस्क
अतिभव्य खांब
प्रत्येक रॅम हेडेड स्फिंक्सच्या खाली रॅमसिस दुसरा
मंदिराची प्रतिकृती
"हा आहे पवित्र तलाव अर्थात सेक्रेड लेक. मंदिरात पूजा करणारे पुजारी आधी या तलावात न्हाऊन मगच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करायचे. आणि सगळ्या पुजाऱ्यांना प्रवेश नव्हताच. मोजकेच उच्च स्तरावरील पुजारी इथे येऊ शकत. सामान्य जनतेला मात्र मंदिरातही प्रवेश नसे. फक्त उत्सवाच्या दिवशी काही मोजके स्थानिक मंदिरात येऊन देवाचं दर्शन घेऊ शकायचे."पूर्वी नक्कीच सुंदर असलेला हा तलाव आता मात्र हिरवट पाण्याने भरलेला होता. त्याच्या शेजारीच स्कॅरबचा पुतळा एका दगडी खांबावर होता आणि त्याच्या भोवती बरेचसे पर्यटक प्रदक्षिणा घालत होते.
"हे काय सुरु आहे नक्की?" आमच्या ग्रुप मधील एकाने विचारले.
"हा स्कॅरब हे तर तुम्हाला माहित असेलच. असं म्हणतात या ठिकाणी स्कॅरबला प्रदक्षिणा मारल्या तर इच्छा पूर्ण होतात. ३ फेऱ्या मारल्या तर साधी इच्छा पूर्ण होईल. ५ मारल्या तर लग्न पटकन होईल. ७ मारल्या तर मुलं बाळ होतील. आणि अगदीच अवघड इच्छा असेल तर मात्र २१ फेऱ्या माराव्या लागतील. चला करा सुरु ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार फेऱ्या मारायला." हसत हसत इमाद त्याच्या मित्रासोबत गप्पा मारण्यात गुंग झाला.
बाकी लोक फेऱ्या मारत होते तोवर आम्ही जवळच्याच एका दगडावर टेकलो.
स्कॅरब
१० मिनिटांत तिथून निघालो दिवसाच्या शेवटच्या ठिकाणी भेट द्यायला. लक्सॉर मंदिराला. इमाद पाठोपाठ आम्ही मंदिरच्या आत पोहोचलो. "इजिप्त मधील बाकी मंदिरांप्रमाणे हे मंदिर एखाद्या देवाला किंवा फेरोला अर्पित केलेले नसून, उत्सवांसाठी बांधले गेले होते. फेरोंचे राज्याभिषेक असो किंवा अमुन रा आणि मुट यांचा विवाह सोहळा असो. सगळे उत्सव या मंदिरात साजरे होत. अमुन-रा आणि मुट यांच्या विवाहासाठी त्यांच्या मूर्ती कर्नाक मंदिरातून इथं आणल्या जायच्या. त्या ज्या मार्गे इथे पोहोचायच्या त्या ३ किलोमीटरच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्फिन्क्स उभे होते. स्फिन्क्स अव्हेन्यू असे त्याला म्हणतात. एकूण १२०० ते १३०० स्फिन्क्स उभारण्यात आलेले त्यापैकी काही सध्या त्या रस्त्यावर लावले आहेत आणि जसे सापडतील तसे अजून लावण्याचं काम सुरु आहे. लक्सॉर शहराच्या इमारतींखाली दबलेले स्फिन्क्स शोधून काढणं जिकरीचं काम आहे, पण हळू हळू उत्खनन चालू असतं." इमाद म्हणाला.
"इकडे मागे बघा. काय दिसतंय?" इमाद ने विचारलं.एक पांढऱ्या रंगाची मशिद उभी होती.
"मशिद इथे कशी?" आम्ही विचारलं.
"कालांतराने हे मंदिर वाळूखाली गाडले गेले. जेव्हा मुस्लिम आक्रमणे झाली तेव्हा त्यांना इथे सपाट जमीन दिसली आणि इथे अबू हग्गाग यांची मशिद उभी केली गेली. हे एक बरं झालं कि मंदिरावर मशीद उभी नाही एका बाजूला आहे. त्यामुळे आज दोन्ही वास्तू आपल्याला इथे पाहायला मिळतात."
आपल्या इथे घडलेल्या अशाच काहीशा किश्श्याने नकळत चेहऱ्यावर हसू उमटले.
मशिद
आम्ही पुढे निघालो. एका मोकळ्या पटांगणात पोहोचलो. तीन बाजूनी उंच खांब होते. "हि खांबांची धाटणी अप्पर इजिप्त मध्ये फार प्रसिद्ध होती. लोअर इजिप्त मधून इमहोटेप इथे येऊन हि शैली तिकडे घेऊन गेला. सक्कारा मध्ये भेट द्याल तर अशा प्रकारचे काही खांब तुम्हाला तिथे पाहायला मिळतील." मी आणि नवऱ्याने चटकन होकार भरला.
"आपली टूर आज इथे संपत आहे. एक ग्रुप फोटो काढूया?" इमादने विचारलं आणि आम्ही पटकन ३-४ फोटो काढले.
"उद्या मीच येत आहे बरं तुमच्या सोबत देन्देराला. सकाळी ८:३० वाजता गाडी घेऊन पोहोचतो तयार राहा." इमादने सांगितलं आणि आम्ही खुश झालो.
आज दिवसभरात त्याने उत्तम माहिती सांगितली होती.
संध्याकाळील टूर ग्रुप
मंदिरातील काही प्रचि
प्रवेशद्वार लाइट्स मध्ये
मंदिराबाहेरील एक वास्तू
सूर्यास्तानंतर थोडा वेळ आम्ही मंदिराच्या आवारातच रेंगाळलो. विशिष्ट पद्धतीने लावलेल्या दिव्यांमुळे मंदिर वेगळेच दिसू लागले होते. मंदिरातून बाहेर पडून नीलच्या किनाऱ्याने हॉटेल पर्यंत येऊन पोहोचलो. आज जाम दमलो होतो. पहाटे पासून इतक्या गोष्टी पाहून झालेल्या कि आता मेंदूची आणि मनाची अजून काही सामावून घ्यायची क्षमताच जणू संपलेली. त्यामुळे बाहेर कुठेही न जाता हॉटेल मध्येच जेवण करायचं ठरवलं. सोबतीला घेतल्या प्रसिद्ध इजिप्शियन बिअर स्टेला आणि सकारा. दिवसभराचा थकवा स्टेला-सकारा जोडीने हळूहळू कमी होत गेला आणि निवांत मनाने झोपेच्या अधीन झालो.
क्रमश:
.polaroid {
width: 80%;
background-color: white;
box-shadow: 0 4px 8px 0 rgba(0, 0, 0, 0.2), 0 6px 20px 0 rgba(0, 0, 0, 0.19);
margin-bottom: 25px;
}
.container-p {
text-align: center;
}
प्रतिक्रिया
2 Nov 2019 - 7:43 pm | यशोधरा
काय सुरेख कलाकृती आहेत! सुरेख चालली आहे सफर..
2 Nov 2019 - 8:27 pm | जॉनविक्क
आशा ठिकाणच्या रात्री फार रोमांचक असतील ना ? अगदी जेम्स बॉण्ड च्या चित्रपटाप्रमाणे ?
2 Nov 2019 - 9:41 pm | जेम्स वांड
बलूनला बास्केट बांधलं गेलं आणि आम्ही सगळे १५ लोक बास्केट मध्ये जाऊन बसलो.
ह्यातल्या बास्केटला गोंडोला असे म्हणले जाते. बाकी तुमचं लेखन अन फोटो किंवा धागा सजावट हा विषयच नाही आता.
2 Nov 2019 - 9:55 pm | एक_वात्रट
सगळेच भाग वाचले, उत्तम आहेत. तुम्ही जी गोष्ट पहाता त्याचं वर्णन तर करताच, पण छोटे छोटे किस्से, प्रसंगही खुलवून सांगता. यामुळे प्रवासवर्णन रंजक बनतं आणि एखाद्या माहितीपुस्तकाचं स्वरूप येण्यापासून ते वाचतं. बाकी इजिप्त काय, माझं स्वप्नगंतव्य आहे (Dream destination), तिथे जायची स्वप्नं मी जागेपणीही बघत असतो. तिथे काय काय, कसं कसं बघायचा याचा एक बेतही (Itinerary) बनवून झालाय. पाहूया कधी योग येतो ते...
3 Nov 2019 - 5:06 pm | बोलघेवडा
वा!! वा!! फार छान प्रवासवर्णन!!
त्या आखेनतेन बद्दल गाईडने काही सांगितलं का?
4 Nov 2019 - 6:55 am | सुधीर कांदळकर
प्रचि आणि मोहमयी वर्णन ... सारे मस्त जमले अहे. भव्यता आणि रेखीवता दर्जेदार प्रचिमध्ये छान उतरली आहे. धन्यवाद.
मुंबईचे कर्नाक बंदर आणि पेनचा लक्सॉर कॅम्लीन ब्रॅन्ड ही नावे कशी आली असतील ही कल्पना करतोय.
6 Nov 2019 - 8:10 pm | प्रचेतस
आजपर्यंतच्या सर्व भागांचा हा कळस आहे.
अप्रतिम फोटो, तपशीलवार वर्णनाने अतिशय माहितीपूर्ण झालाय हा भाग. खूपच छान.
6 Nov 2019 - 8:51 pm | अनिंद्य
लेखन, फोटो, अनुभव... सगळे छान.
फेरोंच्या देशाच्या हाकेला 'ओ' देण्याची वेळ येऊन ठेपली आहे आता. :-)
पु भा प्र