body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}
.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}
.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}
#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}
.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}
मिपा दिवाळी अंक २०१९
अनुक्रमणिका
रामायण
दीपावली म्हणजे उजेडाने अंधारावर किंवा चांगल्याने वाईटावर मिळवलेला विजय साजरा करण्याचा सण. अशा या मंगलमय क्षणी रामाने रावणावर मिळवलेला विजय अर्थात 'रामायण' या वाल्मिकीरचित महाकाव्याचे हे चित्रमय रसग्रहण.
प्रथम या हस्तलिखिताविषयी थोडेसे.
'मेवाड रामायण' किंवा राणा 'जगतसिंग रामायण' या नावाने ओळखले जाणारे हे हस्तलिखित सध्या बरेचसे लंडन येथील ब्रिटिश लायब्ररी येथे आहे, तर काही पाने मुंबईत छत्रपती शिवाजी संग्रहालय इथे आहेत. चित्तोड आणि उदयपूर ज्याच्या राज्यात होते असा 'राणा प्रताप' हाही मेवाडचाच 'राणा', म्हणजे राजा होता. त्याचा वंशज राणा जगतसिंग (इ. स.१६२८ ते १६५२) याच्यासाठी हे रामायण हस्तलिखित बनवले गेले. राणा जगतसिंग याच्या काळात मोगलांबरोबर तह केलेला असल्याने त्याच्या राज्यात शांतता होती आणि म्हणून त्याला आपली पोथीशाला, जी इ.स. १५६८मध्ये चित्तोड किल्ल्याच्या पाडावामुळे नष्ट झाली होती, ती पुन्हा बनवण्याची सवड मिळाली. या हस्तलिखितात रामायणाची ७ कांडे ७ भागांमध्ये आहेत. रामायणाचा मजकूर आचार्य हिरानंद यांनी लिहिला आहे. सगळ्यात अद्वितीय म्हणजे या हस्तलिखितात सुमारे ४०० चित्रे आहेत, ज्यातील निवडक चित्रे आपण इथे पाहणार आहोत. यातली सुमारे १५० चित्रे 'साहिबदिन' या चित्रकाराने काढली आहेत. याच चित्रकाराने काढलेली चित्रे सध्या पुण्यात भांडारकर संस्थेत असलेल्या भागवत पुराणातही आहेत. आणखी काही चित्रे मनोहर या कलाकाराच्या हातची आहेत. मेवाड रामायणाचे मूळ हस्तलिखित ब्रिटिश लायब्ररीच्या वेबसाइटवर संपूर्ण पाहता येईल - https://www.bl.uk/ramayana.
टीप: प्रत्येक चित्राच्या खाली असलेल्या काव्यमय ओळी या ग.दि. माडगूळकरांच्या गीत रामायणातील आहेत. त्या इतक्या ठिकाणी वापरलेल्या आहेत की प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र उल्लेख करण्यापेक्षा इथे एकत्रच श्रेयनिर्देश केलेला आहे. इतरही श्लोक आणि स्तोत्रे यातून काही चरण घेतले आहेत, पण त्यांचा प्रत्येक जागी उल्लेख केलेला नाही, कारण हा दिवाळी अंकाचा खास लेख, कुण्या अभ्यासकांसाठी लिहिलेला प्रबंध नव्हे. त्यामागे वाङ्मयचौर्याची भावना नसून रसग्रहणाचा धागा तुटू नये हा मुख्य हेतू आहे. किंबहुना रामायणाच्या मूळ मजकुरासाठी पोथीतील संस्कृत-देवनागरी न वापरता, रामायणातील प्रसंग वर्णन करण्यासाठी गीत रामायणाचा वापर केला आहे, कारण मराठी वाचकांना ते अधिक सहज आणि सोपे वाटेल. प्रसंग नीट समजला की मग प्रसंगातील बारकावे चित्र बघता येतील.
वाल्मिकी (डावीकडे) आणि नारद (उजवीकडे)
उजवीकडच्या मजकुरात म्हणाल्याप्रमाणे –
कूजन्तं राम-रामेति मधुरं मधुराक्षरम्।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ।।
***
शरयूतीरी अयोध्यानगरीत पुत्रजन्माच्या इच्छापूर्तीसाठी अश्वमेध यज्ञास महर्षी वसिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ. यज्ञासाठी आणलेला अश्व डाव्या बाजूस आणि शरयू नदी चित्रात खाली दाखवली आहे. गीत रामायणातील वर्णन इथे अचूक लागू पडते -
वसंत आला, तरूतरूवर आली नव पालवी
मनांत माझ्या उमलुन आली तशीच आशा नवी
कानीं माझ्या घुमूं लागली सादाविण वाणी
ती वाणी मज म्हणे, "दशरथा, अश्वमेध तूं करी
चार बोबडे वेद रांगतिल तुझ्या धर्मरत घरी."
विचार माझा मला जागवी, आले हे ध्यानीं
निमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली -
"वसिष्ठ, काश्यप, जाबालींना घेउन ये या स्थली.
इष्ट काय तें मला सांगतिल गुरुजन ते ज्ञानी"
आले गुरुजन, मनातले मी सारे त्यां कथिले
मीच माझिया मनास त्यांच्या साक्षीने मथिले
नवनीतासम तोच बोलले स्निग्धमधुर कोणी
"तुझे मनोरथ पूर्ण व्हायचे", मनोदेवता वदे,
"याच मुहूर्ती सोड अश्व तू, सत्वर तो जाउ दे"
"मान्य" - म्हणालों - "गुर्वाज्ञा" मी, कर जुळले दोन्ही
अंग देशिचा ऋष्यशृंग मी घेउन येतो स्वतः
त्याच्या करवी करणे आहे इष्टीसह सांगता
धूमासह ही भारुन जावो नगरी मंत्रांनीं
सरयूतीरीं यज्ञ करू गे, मुक्त करांनी दान करू
शेवटचा हा यत्न करू गे, अंती अवभृत स्नान करू
ईप्सित ते तो देइल अग्नी, अनंत हातांनी
***
सूर्य, वायू आणि इतर गंधर्व रावणाच्या नाशाचा उपाय ब्रह्मदेवास विचारतात. शिवाच्या वरदानाने रावणाचा वध मानवाखेरीस कुणीच करू शकत नसे, म्हणून तुम्ही मानवजन्म घ्या, असा ब्रह्मदेवाचा उपदेश.
***
चैत्रमासी रामजन्म. भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचे जन्म. दशरथ खाली या कुमारांचे जन्म-पत्रिकेवरून काढलेले भविष्य ऐकताना.
चैत्रमास, त्यात शुद्ध नवमि ही तिथी
गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती!
दोन प्रहरि का ग शिरी सूर्य थांबला?
राम जन्मला ग सखी राम जन्मला
***
महर्षी विश्वामित्र दशरथाकडे मागणी करतात,
ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा
यज्ञ-रक्षणास योग्य तोचि सर्वथा
इथे प्रत्येक चित्रात रामाचा वर्ण हा निळा कसा याचा एक खुलासा करणे आवश्यक आहे. राम हा विष्णूचा अवतार, आणि विष्णूचा रंग निळा, तो इथे खालील श्लोकात दिला आहे.
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् ।
दशरथाचे चार पुत्र दोनदा दाखवले आहेत, याचा अर्थ आठ पुत्र होते असा नसून त्या दोन हालचाली एकाच चित्रात दाखवल्या आहेत. कदाचित प्रथम सर्व राजकुमार महर्षींच्या स्वागतासाठी उभे असतील आणि नंतर काही काळाने सगळे बसल्यावर स्वतः बसले असतील. त्या काळी विमान कसे काढावे याचे काही संकेत नसल्याने आकाशातील गंधर्व पाण्यातल्या बोटीच्या आकाराच्या विमानात दाखवले आहेत!
***
रामाचा प्रथम पराक्रम
महर्षी विश्वामित्र म्हणतात,
जोड झणि कार्मुका
सोड रे सायका
मार ही त्राटिका, रामचंद्रा!
त्राटिका राक्षसीचा काळा वर्ण, लांब सुळे, मोठे नाक आणि मोठा आकार यावरून नदीपलीकडे असलेली ती सहज ओळखता येते आणि महर्षी विश्वामित्र रामाला तिच्याकडे बोट दाखवून इशारा करतही आहेत. डोंगरातल्या हरिणांना मात्र याची काही वार्ता नसून ती बिचारी शांतपणे बसली आहेत. खालची फुले खास मोगल शैलीतली आहेत, जुन्या चित्रांच्या चौकटीत, ताजमहाल आणि इतर मोगल इमारती इथे ती सहज दिसतात.
***
राम-लक्ष्मण आणि मारिच-सुबाहू राक्षसयुद्ध
महर्षी विश्वामित्र यांचा यज्ञ चालू असताना मारिच आणि सुबाहू हे राक्षस त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांना प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण लढाई करून पळवून लावतात.
मायावी रात्रिंचर
कष्टविती मजसि फार
कैकवार करुन यज्ञ नाहि सांगता
आरंभिता फिरुन यज्ञ
आणिति ते सतत विघ्न
प्रकटतात मंडपांत कुंड पेटता
मारिच तो, तो सुबाहु
राक्षस ते दीर्घबाहु
ठेवतील शस्त्र पुढे राम पाहता
***
मंदिरात पाषाणरूपी अहल्या (अहल्येची शिळा)
***
अहल्येची शापमुक्ती
अहल्या इथे एका देवळात बंदिस्त दिसते, त्यावरून चित्रकाराने अहल्येची शिळा म्हणजे मंदिरात पाषाणरूपी अहल्या असा अर्थ लावला आहे. इथेही देव-गंर्धव आकाशातून विमानातून पुष्पवृष्टी करताना दिसतात. इथेही मंदिराच्या डावीकडे आणि उजवीकडे दोन स्वतंत्र प्रसंग दाखवलेले आहेत. उजवीकडे राम-लक्ष्मण पुढे प्रस्थान करताना दिसतात. डावीकडच्या प्रसंगासाठी गीत रामायणात म्हणल्याप्रमाणे -
रामा, चरण तुझे लागले
आज मी शापमुक्त जाहले
पुलकित झाले शरीर ओणवें
तुझ्या पदांचा स्पर्श जाणवे
चरणधुळीचे कुंकुम माझ्या भाळासी लागले
***
सीता स्वयंवर
डाव्या कोपऱ्यात वरती आहे ती सीता. मध्यभागी ऋषिमुनींचे यज्ञयाग चालू आहेत. शिवधनुष्य उचलणे शक्य नसल्याने ते एका चाकांच्या गाड्यावरून हलवत इथे आणले आहे. डावीकडून उजवीकडे जसा आपण देवनागरी मजकूर वाचतो तसे हे चित्र वाचता येते. प्रथम भोई ते धनुष्य आणतात (डावा कोपरा) मध्यभागी श्रीराम ते उचलतात, मग वर्तुळाकार ते धनुष्य उचलून घेताना श्रीराम आणि मग मोडून पडलेले धनुष्य खाली दिसते. ते धनुष्य मोडताना झालेल्या प्रचंड ध्वनीने (त्या काळातली सॉनिक-वेव्ह म्हणावे का?) उजव्या कोपऱ्यात हवेत उडालेले घोडेस्वार आणि पिवळ्या कपड्यातील माणसाला आधार देणारा उमराव असे मजेशीर दृश्यही आहे.
आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे
स्वयंवर झाले सीतेचे
श्रीरामांनी सहज उचलिले धनू शंकराचे
पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतु अंतरींचे
मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी
नयनांमाजी एकवटुनिया निजशक्ति सारी
***
कैकयी आणि दशरथ महाराज
कैकयी झोपेतून उठताना दाखवली आहे, कारण ही निजायची खोली म्हणजे बेडरूम आहे हे दाखवायचे असावे. त्या काळी अशा जागी प्रवेश नसल्याने मध्यभागी सुमंत उभा आहे. डाव्या बाजूच्या कोपऱ्यात कैकयी दशरथ महाराजांना म्हणते -
दंडकवनि त्या लढता शंबर
इंद्रासाठी घडले संगर
रथास तुमच्या कुणी घातला, निजबाहूंचा आंस?
नाथ रणी त्या विजयी झाले
स्मरते का ते काय बोलले? -
"दिधले वर तुज दोन लाडके, सांग आपुली आस"
नारिसुलभ मी चतुरपणाने
अजुन रक्षिली अपुली वचने
आज मागते वर ते दोन्ही, साधुनिया समयास
एक वराने द्या मज आंदण
भरतासाठी हे सिंहासन
दुजा वराने चवदा वर्षें रामाला वनवास
उजव्या कोपऱ्यात वरती कैकयी दशरथ महाराजांना म्हणते -
खोटी मूर्च्छा, खोटे आंसू
ऐश्वर्याचा राम पिपासू
तृप्त करावा त्यास हाच की आपणांसि हव्यास
आणि उजव्या बाजूस खाली पुढे -
व्योम कोसळो, भंगो धरणी
पुन्हा पुन्हा का ही मनधरणी?
वर-लाभाविण मी न घ्यायची, शेवटचाहि श्वास
***
राम-लक्ष्मण-सीता वनवासात
इथे उजव्या बाजूने राम-लक्ष्मण-सीता जंगलात प्रवेश करतात. योग्य जागा पाहून रामचंद्र लक्ष्मणास म्हणतात –
या इथें, लक्ष्मणा, बांध कुटी
या मंदाकिनिच्या तटनिकटी
जमव सत्वरी काष्ठे कणखर
उटज या स्थळी उभवू सुंदर
शाखापल्लव अंथरुनी वर
रेखु या चित्र ये गगनपटी
राहण्याच्या जागी पाण्याची सोय हवी, भले तो वनवास का असेना, त्यामुळे चित्रात खाली मंदाकिनी वाहताना दाखवली आहे. सगळ्यात जरुरी अग्नी, म्हणून झोपडीबाहेर तो पेटवलेला आहे.
***
सुग्रीव व हनुमान रामाच्या भेटीस येतात
रामला ठळक मिश्या इथून पुढे दाखवल्या आहेत. इथेही तीन वेगवेगळे प्रसंग आहेत, मुख्य आशय एकच - सुग्रीव आणि हनुमान रामास भेटतात आणि सुग्रीव वालीविरुद्ध श्रीरामाची मदत मागतो. थोडक्यात –
साक्षीस व्योम, पृथ्वी, साक्षीस अग्निज्वाला
सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला
***
रामाच्या हस्ते कपटाने वाली-वध
इथे एकच प्रसंग आहे - रामच्या बाणाने वालीचा अंत होतो आणि सुग्रीवाचा राजा होण्याचा मार्ग मोकळा होतो. राम वालीचा मुलगा अंगद यास सांभाळेन असे वचन देतो. गीत रामायणाप्रमाणे -
दिधले होते वचन सुग्रिवा
जीवहि देइन तुझिया जीवा
भावास्तव मी वधिले भावा
दिल्या वचाचे हे प्रतिपालन
***
वानरसेना इथे आकाश, पाताळ, जंगल सगळीकडे सीतेचा शोध घेताना दाखवली आहे. राम सुग्रीवास विचारतो की तुला इतक्या सगळ्या जागा उत्तम प्रकारे कशा माहीत आहेत? सुग्रीव म्हणतो की, माझ्या सामर्थ्यवान भावापासून (म्हणजे वालीपासून) लपण्यासाठी मला संबंध पृथ्वी पालथी घालावी लागली, पण मला फक्त ऋष्यमुख पर्वतावर आश्रय घेता आला, कारण तिथे वाली त्याला मिळालेल्या शापामुळे पाऊल टाकू शकत नव्हता. गीत रामायणात सांगितल्याप्रमाणे -
होता फिरून माझे ते सैन्य वानरांचे
होतील लाख शत्रू त्या दुष्ट रावणाचे
ते लंघतील सिंधू, खणतील शैलमाला
ते शोधितील सीता, संदेह यात नाहीं
निष्ठा प्लवंगमांची तू लोचनेंच पाही
होतील सिद्ध सारे सर्वस्व अर्पिण्याला
***
हनुमान एका उडीत सागर पार करून लंकेपर्यंत जातो
प्रचंड असा महासागर पार करून जाण्यासाठी हनुमान आपला आकार प्रचंड बनवतो - थोडक्यात
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे |
तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||
ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शके |
तयासी तुलना कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ||
हनुमान महेंद्रपर्वतावरून उड्डाण करतो (महेंद्रपर्वत हे लाँच-पॅड). हनुमानाच्या उडी मारण्याच्या घर्षणामुळे महेंद्र पर्वतावर आग लागली आहे. वाटेत सागर हा मैनक पर्वत, जो नरकाचे समुद्राखालील प्रवेशद्वार आहे, त्याला हनुमानास मदत करण्याची विनंती करतो. पण हनुमान फक्त आपले हात टेकून क्षणभर विश्रांती घेऊन पुढे प्रयाण करतो. पर्वत इथे एक देवता म्हणून दाखवला आहे.
***
रावणापुढे हनुमान
हनुमान स्वतःला राक्षसांच्या स्वाधीन करतो आणि ते राक्षस त्यास रावणापुढे घेऊन येतात. हनुमान सांगतो की मी प्रभू श्रीरामाचा दूत म्हणून इथे आलो आहे, तू सीतेस बंधमुक्त कर.
नको करूंस वल्गना रावणा निशाचरा!
समूर्त रामकिर्ति मी, ज्ञात हे सुरासुरा
रावण संतापून हनुमानाच्या वधाची आज्ञा देतो, पण रावणाचा भाऊ बिभीषण रावणाच्या चरणांना स्पर्श करून नम्रपणे म्हणतो की दूतास मारणे योग्य नाही, हवे तर त्यास शिक्षा करा. मग राक्षस हनुमानाच्या शेपटीवर कापड बांधून त्याला आग लावण्याचा हेतूने त्यावर तेल ओतताना इथे दिसतात.
***
राम सेतू
राम सतत तीन दिवस सागर ओलांडण्याचे प्रयत्न करतो, शेवटी संतापून आपली वेगवेगळी आयुधेही वापरून पाहतो. तेव्हा नम्रपणे सागर देव रामास सुचवतो की विश्वकर्म्याचा पुत्र वानर तंत्रज्ञ (इंजीनिअर) नल याच्याकडून तू एक पूल बांधून घे.
गिरिराजांचे देह निखळूनी
गजांगशा त्या शिळा उचलुनी
जलांत द्या रे जवे ढकलुनी
सेतुबंधने जोडुन ओढा समीप लंकापुरी
फेका झाडे, फेका डोंगर
पृष्ठी झेलिल त्यांना सागर
ओढा पृथ्वी पैलतटावर
वडवाग्नी तो धरील माथी सेतू शेषापरी
नळसा नेता सहज लाभता
कोटी कोटी हात राबता
प्रारंभी घे रूप सांगता
पाषाणाच हे पहा लीलया तरती पाण्यावरी
वानरसेना पाच दिवसात शंभर योजने लांब पूल बांधते आणि सागर ओलांडते.
***
राम आपल्या सैन्याचे चार भाग करून त्यांना लंकेच्या चार दरवाज्यांवर हल्ला करण्यास पाठवतो. पूर्वेस नील प्रहस्थावर हल्ला करतो, पश्चिमेस हनुमान इंद्रजितावर हल्ला करतो, उत्तरेस राम, लक्ष्मण आणि सुग्रीव स्वतः रावणावर हल्ला करतात आणि दक्षिणेस अंगद महापार्श्व आणि महोदर यांच्यावर हल्ला चढवतो. रावण आपल्या राजवाड्याच्या छतावरून सैन्याच्या तुकडीस आज्ञा देतो आहे.
नभा भेदुनी नाद चालले शंख दुंदुभींचे
अनुपमेय हो सुरू युद्ध हे रामरावणांचे
***
कुंभकर्ण राक्षसाला उठवण्याचे प्रयत्न
रावणाचा भाऊ कुंभकर्ण हा ब्रह्मदेवाच्या शापामुळे सतत गाढ झोपेत असे. रामाचा विनाश करण्याचा कोणताच उपाय चालेना, त्यामुळे रावणाने शेवटी कुंभकर्णाला उठवण्याचा निर्णय घेतला. इथे कुंभकर्णाला उठवण्यासाठी अनेक प्रकारचे ध्वनी केले जात आहेत - एक गाढव वरती ओरडते आहे, एक हत्ती त्याच्याजवळ चित्कारतो आहे. खाली स्त्रिया गायन करताहेत आणि राक्षस गदा, त्रिशूल घेऊन कुंभकर्णाला टोचताहेत. काही राक्षस त्याच्या कानात ओरडत आहेत. कुंभकर्ण उठल्यावर त्याच्या भयंकर भुकेला शांत करण्यासाठी अनेक जनावरे, त्यांची चरबी, वानरे, रक्त आणि वारुणी घड्यांमध्ये जमवली आहे.
***
कुंभकर्णाचा झोपेतून उठल्यावरचा राक्षसी आहार
कुंभकर्ण एक आख्खा बैल तोंडात घालताना दाखवला आहे, अनेक सेवक आणखी खाद्य घेऊन येताना.
***
कुंभकर्ण युद्धभूमीवर
हनुमान आणि सुग्रीव कुंभकर्णावर हल्ला करताना - कुंभकर्ण सुग्रीवास पकडतो, पण सुग्रीव त्याचे नाक चावतो, म्हणून कुंभकर्ण त्यास सोडून देतो. सुग्रीव कुंभकर्णाच्या पायाखाली पडताना दाखवला आहे.
***
कुंभकर्णाचा वध
प्रथम हात, मग पाय आणि शेवटी मस्तक रामाच्या बाणांनी विलग होताना - राक्षस हताश होऊन मागे फिरताना आणि देव-गंधर्व आकाशात बोटीसारख्या विमानातून आपला आनंद प्रकट करतात. रामाजवळ उभा असलेला बिभीषण मात्र भावाच्या मृत्यूमुळे उदास दिसतो.
***
हनुमानाने आणलेली संजीवनी
आकाशात हनुमान संजीवनी घेऊन येताना. लगेच दुसरा प्रसंग चालू होऊन लक्ष्मण पुन्हा शुद्धीवर येतो, समोर बिभीषण आणि वानरसेना उभी आहे.
***
सात दिवस आणि सात रात्री सतत युद्ध केल्यावर राम आपल्या बाणांनी रावणाची दहा डोकी एकामागून एक उडवून टाकतो, पण ती डोकी पुनः पुनः उगवत राहतात. काय करावे ते रामाला उमजत नाही, अशा वेळी रामाचा सारथी मताली रामाला आपले ब्रह्मास्त्र वापरण्याची सूचना करतो. राम पवित्र मंत्रोच्चारासकट ब्रह्मास्त्र वापरतो आणि त्याने रावणाचा वध करतो. खाली राम सुग्रीवास आलिंगन देताना, वानरसेना आणि जांबुवंत समोर उभे आहेत. दुसरीकडे बिभीषणाचे सांत्वन करताना प्रभू रामचंद्र.
देवहो, बघा रामलीला
भूवरी रावणवध झाला
दाहि दिशांची मुखे उजळलीं
कंपरहित ती अवनी झाली
***
श्रीराम अयोध्येला परतल्यानंतर कुश-लव त्यांसमोर रामायण गातात, तो हा गीत रामायणातील प्रसंग. मधल्या रांगेत गंधर्व आणि वानरसेना तर उजवीकडे (अर्थात त्या कालच्या रजपूत प्रथेप्रमाणे) स्वतंत्र जागेत स्त्रिया, बाहेर उभे असलेले हत्ती, घोडे आणि चाललेला यज्ञ चित्रकाराने दाखवला आहे. गीत रामायणांतले वर्णन अर्थातच सरस आहे, ते इथे देणे आवश्यक आहे -
स्वयें श्रीरामप्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती
कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतिनें तेजाची आरती
राजस मुद्रा, वेष मुनींचे
गंधर्वच ते तपोवनींचे
वाल्मीकींच्या भाव मनींचे
मानवी रूपे आकारती
सामवेदसे बाळ बोलती
सर्गामागुन सर्ग चालती
सचिव, मुनिजन, स्त्रिया डोलती
आंसवे गाली ओघळती
***
प्रभू श्रीरामांचे स्वर्गाकडे प्रयाण - इति श्री रामायण संपूर्ण
प्रतिक्रिया
26 Oct 2019 - 7:22 am | जेम्स वांड
ही चित्रकलेची कुठली स्कुल म्हणायची?? जबरी आहे, ह्या चित्रांची साईज काय असते? ह्याच शैलीतली प्रचंड जास्त डिटेल्स असणारी तरीही प्रचंड छोटी अशी मिनीएचर पेंटिंग एकदा डिस्कवरी का हिस्टरी चॅनलवर पाहिल्याचे अंधुक आठवते.
26 Oct 2019 - 9:53 am | मनो
राजस्थानी - मेवाड शैली म्हणायची.
आकार २३ से.मी. बाय ३९ से. मी. आहे म्हणजे प्रिंट आउट चा A4 कागद असतो त्या ऊंचीचा पण थोडा जास्त रुंद.
पुण्यात भांडारकर संस्थेत भागवताची पोथी काचेखाली ठेवली आहे, ती याच आकाराची आहे. प्रत्यक्ष पाहताना अतिशय सुरेख दिसते. या पोथ्या पुस्तक वाचण्याच्या अंतरावरून एकटा माणूस वाचताना कसा बघेल या हिशोबाने बनवतात.
26 Oct 2019 - 8:42 am | तुषार काळभोर
लेख प्रचंड आवडला आहे.
26 Oct 2019 - 2:44 pm | यशोधरा
अत्युत्कृष्ट. भांडारकरमध्ये एकदा ऐतिहासिक ऐवजांची माहिती देणारा कट्टा व्हायला हवा. मनावर घ्या मनो.
29 Oct 2019 - 7:48 am | मनो
होय करूयात की. अडचण एकच आहे - पुण्यापासून हजारो मैल दूर कॅलिफोर्नियात असल्यामुळं पुढे कधी भारतवारीमध्ये जमवावे लागेल.
29 Oct 2019 - 8:23 am | यशोधरा
अर्र,असं आहे का!! बरं, बरं. नक्की.
26 Oct 2019 - 10:03 pm | खटपट्या
चित्रे सुरेख आहेतच पण कथेतले बारकाचे चित्रकारांनी छान दाखवले आहेत. त्यावेळेला एकेक चित्र काढताना काय प्लानिंग करावे लागले असेल याचा विचार करुन आश्चर्यचकीत व्हायला होते
26 Oct 2019 - 11:47 pm | टर्मीनेटर
उत्तम लेखनाला सुंदर चित्रांची जोड!
असे केल्यानेच मला हा लेख समजला आणि आवडला! धन्यवाद.
29 Oct 2019 - 11:29 am | अनिंद्य
@ मनो,
मेवाडी शैलीची सुंदर चित्रे, त्यातील बारकावे उलगडून दाखणारी तुमची लेखणी आणि गीत रामायणाच्या पदांचा चपखल वापर. सगळेच भरजरी !
लेखातील राम-रावण युद्धाचे चित्र आधी बघितले होते, त्यात रावणाच्या हातांची संख्या चित्रकाराने चुकवली आहे, ते गमतीशीर वाटते :-)
4 Nov 2019 - 8:00 pm | श्वेता२४
आपण फार सुंदर रसग्रहण उपलब्ध केलेत आमच्यासाठी. फोटो आणि ऐतिहासिक माहिती यामुळे माहितीत भर पडली
4 Nov 2019 - 10:07 pm | गामा पैलवान
मनो,
चित्रखजिन्याच्या रसग्रहणाबद्दल अनेक आभार.
आ.न.,
-गा.पै.
5 Nov 2019 - 12:29 am | पद्मावति
उत्तम लेख.
5 Nov 2019 - 10:28 am | विटेकर
फारच सुन्दर ! आम्हाला हा परिचय करुन दिल्यबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
5 Nov 2019 - 10:43 am | कंजूस
छान.
मला वाटतं ही मुघल शैली आहे. ती नंतर आपल्याकडच्या चित्रकारांनी आत्मसात केली.
5 Nov 2019 - 11:05 am | प्रचेतस
चित्रे, त्यामागील संदर्भ, गदिमांच्या सुयोग्य ओळी, सर्वच काही उत्तम.
5 Nov 2019 - 12:20 pm | मनिष
अफाट आहे ही चित्रकला, आणि गीतरामायणाच्या ओळीही चपखल. हे सगळे इथे शेअर केल्याबद्दल आभार.
ते भारतभेटीत भांडारकर कट्ट्याचे मनावर घ्याच.
20 Nov 2019 - 10:05 am | दीपा माने
लेख संग्रही ठेवित आहे. अनेक धन्यवाद.