सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


ग़ज़ल का सफ़र..

Primary tabs

मनिष's picture
मनिष in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
ग़ज़ल का सफ़र..
कॉलेजमध्ये एक वय असते, गज़ल आवडायचे, तासन्-तास ऐकत बसायचे. आणि एक रिदमही असतो कधी, कुठल्या गज़ल आवडतात ह्याचा. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला कुठलातरी मित्र गळ्यात हात टाकून, सेंटी होऊन 'ज़िंदगी धूप तुम घना साया...' गायला लागायचा आणि पुढच्याच सेमिस्टरला एकदम दाढी वाढवून दर्दभर्‍या आवाजात 'चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है' वर पोहोचायचा :-) एका मोठ्या बहिणीच्या जगजितप्रेमामुळे लहानपणीच गज़लेशी परिचय झाला, पण गज़लप्रेम खर्‍या अर्थाने बहरले ते कॉलेजमध्येच, अशाच मित्रांच्या सोबतीने.

तसं हिंदी, इंग्लिश गाण्यांचेही वेड होते, पण त्यात आता फार खोलात शिरत नाही, नाहीतर हे लिखाण फारच वाहावत जाईल. मुळात अर्थपूर्ण गाणी आवडायची, आवडतात - त्यामुळे शब्दांकडे लक्ष असायचेच. कदाचित कवितांच्या प्रेमाचे मूळही तिथेच असावे. गाणे ऐकताना गीतकार, शायर कोण याचे कुतुहल असायचे. साहिर आवडायचा, कैफी आवडायचे. सगळ्याच उर्दू शब्दांचे अर्थ तेव्हा कळायचे नाही आणि अर्थ शोधायला तेव्हा इंटरनेटही नव्हते. मग एखादा उर्दू जाणकार शोधून त्याच्याकडून समजून घ्यायचो. फ़राज़, फैज़ अहमद फैज़, कैफ़ी आज़मी, साहिर लुधियानवी, निदा फ़ाज़ली, क़तील शिफ़ाई आणि अन्य कित्येक शायरांनी उर्दूच्या नजाकतीने शब्द-संवेदना समृद्ध केली आहे. मराठीत सुरेश भटांनी गज़ल हा काव्यप्रकार जितक्या समर्थपणे, सातत्याने लिहिला तितका इतर कोणी लिहिला असे मला वाटत नाही. असो.

तर सुरुवातीला आम्ही जगजित सिंग जास्त ऐकायचो, नंतर गुलाम अली आणि मेहदी हसन गवसले. तेव्हा गुलाम अली मला जास्त जवळचा वाटू लागला, आणि जगजित, मेहदी हसन थोडे मागे पडले. आता आवडता असा एक गज़ल गायक नाही, पण वेगवेगळ्या गायकांनी गायलेल्या, निरनिराळ्या शायरांनी लिहिलेल्या कित्येक गज़ल आजही मर्मबंधातल्या ठेवी आहेत. हा सिलसिला सुरू झाला होता तो 'अर्थ / साथ-साथ' ह्या अल्बमपासून. खासकरून कैफींच्या शायरीने भारावलो होतो. ऐकून ऐकून घासली गेली, म्हणून २-३ वेळा ही कॅसेट विकत घेतली होती. त्या वयाला भावणारी शायरी आणि उमेदीतला जगजितचा आवाज ह्याने 'अर्थ/साथ-साथ' हा गोल्डन अल्बम झाला होता. जगजित-चित्रा सिंग ह्यांनी त्यांचा तरुण मुलगा विवेक अपघातात गमावला. त्यांनी त्याच्या आठवणींसाठी 'Someone, Somewhere' हा अल्बमही काढला होता, त्यानंतर चित्रा सिंग ह्यांनी गायन थांबवले. माझ्या मते त्यानंतर जगजितच्या आवाजातही एक वेगळाच 'पॅथॉस' आलाय. पॅथॉसवरून आठवले - 'पिंजर' ह्या चित्रपटात हा जगजितच्या आवाजाचा पॅथॉस आणि कोरस फार सुरेख वापरलाय. एका आर्त आलापीच्या सुरुवातीनंतर हातातून-हात सुटल्याची चिरंतन वेदना येते ती फाळणीच्या दु:खाच्या पार्श्वभूमीवर -

हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छोड़ा करते
वक़्त की शाख़ से लम्हें नहीं तोड़ा करते

जगजितच्या स्वतःच्या गज़ल अल्बमपेक्षाही उत्तम सिंग ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही गीत-गज़ल 'हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं' फार हलवून जाते. आणि 'वक़्त की शाख़ से लम्हें' हे गुलज़ारशिवाय कोण लिहिणार? 'आनेवाला पल'मध्ये नाही का लिहून गेलाय तो - 'एक बार वक़्त से लम्हा गिरा कहीं'? अशा कवींच्या लाडक्या प्रतिमा, कल्पना वेगवेगळ्या कवितेत, गज़लेत शोधणे हे फार आनंददायक असते. 'हाथों में हाथ' ही प्रतिमा स्वानंद किरकिरे यांनीही सुरेख वापरली आहे त्यांच्या गीतांमध्ये. तसेच अहमद फ़राज़ यांचे नींद (निद्रा) आणि मौत (चीरनिद्रा) ह्या कल्पनेभोवती पुन्हा-पुन्हा रेंगाळणारे काही अशआ'र (शेरचे अनेकवचन) आहेत, किंवा 'मरासिम' (नाती, संबंध) हा शब्द फ़राज़ बर्‍याच वेळा दुरवलेल्या नात्यांच्या संदर्भात लोभसपणे वापरतात. असो. वर फाळणीविषयी उल्लेख आलाच आहे, तर गुलाम अलीने गायलेली अदीम हाशमींची एक अप्रतिम गज़ल आहे, 'फ़ासले ऐसे भी होंगे' -

फ़ासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था
सामने बैठा था मेरे और वो मेरा न था

वो कि ख़ुशबू की तरह फैला था मेरे चार-सू
मैं उसे महसूस कर सकता था छू सकता न था

वरवर ही गज़ल अर्थातच दुरावलेल्या प्रेमींविषयी वाटते, पण हाशमींनी काही ओळी फाळणीच्या जखमेवर लिहिल्यात असे वाचले आहे. गुलाम अलीने 'फ़ासलें SSS' गातांना ज्या काही हरकती घेतल्या आहेत, त्या अगदी जीवघेण्या आहेत. त्यातल्याच ह्या ओळींनी आयुष्यातल्या काही दु:खद घटनांवर कित्येक वेळा हळूवार फुंकर घातली आहे.

याद कर के और भी तकलीफ़ होती थी ’अदीम’
भूल जाने के सिवा अब कोई भी चारा न था।

गुलाम अलीने तेव्हा अक्षरशः वेड म्हणजे वेड लावले होते. तो खेळकर मस्ती, लडिवाळ आर्जवे किंवा दु:ख आणि विरहाची, असफल प्रेमाची वेदना अशा कुठल्याही भावना त्याच्या गायकीत इतक्या विनासायास आणतो की बस्स. शिवाय त्याची शास्त्रीय संगीताची बैठक पक्की आहेच. गुलाम अली आणि मेहदी हसन यांनी शास्त्रीय गायन गज़लेत आणून गज़ल भ्रष्ट केली असे काही बेग़म अख़्तर किंवा फ़रीदा ख़ानम ऐकलेल्या जुन्या-जाणत्या गज़लप्रेमींचे मत आहे. मी त्या वादात पडत नाही. मला बेग़म अख़्तरचे 'वो जो हम में तुम में क़रार था' आवडते आणि गुलाम अलीचेही. पण गुलाम अली आवडतो म्हणजे आवडतोच. गुलाम अलीची 'चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है' गाजलेली आहेच, पण त्याच्या काही इतर गज़ल मला खूप आवडायच्या - जशी नासिर काज़मींची 'दुख की लहर ने छेड़ा होगा', रिफ़त सुलतान यांची 'बहारों को चमन याद आ गया है', काय कातिल रोमँटीक कल्पना आहे या ओळींत -

लचकती शाख ने जब सर उठाया
किसी का बाँकपन याद आ गया है।

तसेच फैज़ अहमद फैज़ यांची 'शाम-ए-फ़िराक़ अब न पूछ' आहे. ही गज़ल अबिदा परवीन यांनीही ताकदीने गायली आहे, पण माझ्या मनात आधी ऐकलेली गुलाम अलीची गज़लच ऐकू येते. शिवाय अहमद फ़राज़ यांची 'करूँ ना याद मगर किस तरह भुलाऊँ उसे' आवडते; (कित्येक वर्षे) सिंगल असताना हा शेर माझा तकिया-कलाम होता. ;-)

ये लोग तज़्किरे करते हैं अपने प्यारों के
मैं किससे बात करूँ और कहाँ से लाऊँ उसे।

(तज़्किरे = चर्चा)

फ़राज़ यांनी लिहिलेल्या आणि मेहदी हसन ह्यांनी गायलेल्या काही गज़ल ह्या कालातीत मास्टरपीस आहेत. त्यात अर्थातच 'रंजीशही सही...' आहेच, तशीच माझी अतिशय आवडती 'अब के हम बिछड़े...' -

अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिलें
जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें

किंवा फ़राज़ यांचीच गुलाम अलींनी गायलेली 'कठिन है राह-गुज़र थोड़ी देर साथ चलो', त्यातला हा शेर -

तमाम उम्र कहाँ कोई साथ देता है
ये जानता हूँ मगर, थोड़ी दूर साथ चलो।

बाकी कोणी साथ द्यायला असो वा नसो, गज़ल सुख-दु:खात नेहमीच साथ निभावत राहिली. कित्येक दु:खी, एकाकी रात्री केवळ गज़ल ऐकताना सुसह्य झाल्यात. स्वतःच्या सावलीनेही केली नसेल अशी सोबत गज़लेने केलीये. ही गज़लेची साथ-सोबत, तो प्रवास, याविषयी हसरत जयपुरींनी फार सुरेख लिहिलेय, 'मुसाफ़िर हैं हम तो चले जा रहे हैं बड़ा ही सुहाना ग़ज़ल का सफ़र है' -

ना कोई थकन है, न कोई ख़लिश है मोहब्बत की जाने ये कैसी कशिश है।
जिसे देखिए वो चला जा रहा है, जहान-ए-ग़ज़ल की सुहानी डगर है।

यही है हमारा ताल्लुक़ ग़ज़ल से हम इसके लिए ये हमारे लिए है।
ये अपनी कहानी ज़माने में ‘हसरत’ सभी को पता है, सभी को ख़बर है।

ह्या लेखाचे शीर्षकही ह्याच गज़लेतून आलेय. अहमद हुसैन, मोहम्मद हुसैन ह्या जयपुरच्याच गज़ल-गायक बंधूंनी ही गज़ल फार प्रेमाने, तितक्याच अल्हाददायक आवाजात गायली आहे. सगळ्याच आवडत्या गज़ल किंवा त्यातल्या काही आवडत्या ओळी लिहायच्या झाल्या, तर आख्खे पुस्तकच लिहावे लागेल. आता हेच लिहायला बसलोय तर कितीतरी गज़ल डोक्यात गर्दी करतात आहे. आठवणी अशा धबधब्यासारख्या कोसळतात आहे. काही प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात. कॉलेजमधे एका मित्राला अशीच एकदा 'नजरबाधा' झाली होती. तेंव्हा 'आँखें' ही थीम घेऊन त्याला कॅसेट बनवायची होती. आम्हीही त्याच्या खोलीत बसून गज़ल ऐकत कित्येक रात्री जागवल्यात, त्याची ती कॅसेट बनवण्यासाठी. खासच झाली होती ती 'आँखें'ची कॅसेट, मात्र ती 'इस जहाँ की नहीं हैं तुम्हारी आँखे' वाली मुलगी शेवटी त्याचा पासवर्ड बनून राहिली. असो, असो. :-)

पूर्ण कॅसेट/अल्बम विकत घेण्याचे चोचले तेव्हा फारसे नव्हतेच, अपवाद 'अर्थ/साथ-साथ'सारखी एखादी किंवा ग्रॅमीची कॅसेट. तेव्हा एकतर मित्रांकडून कॅसेट रेकॉर्ड करून घ्यायचो, किंवा डेक्कनच्या लकडी पुलाजवळ एका छोट्याशा कोपर्‍यात एक कॅसेटवाला होता, तो कुठलीही गाणी मिळवून, रेकॉर्ड करून द्यायचा. त्याच्याकडून कितीतरी खास गाण्यांच्या, गज़लच्या कॅसेट मी रेकॉर्ड करून घेतल्या होत्या. आजही त्यातल्या कित्येक गज़ल त्याच क्रमाने आठवतात. कुठेही त्यातली एखादी जरी ऐकली तर पुढची माझ्या कॅसेटमधली गज़ल आपोआपच माझ्या मनात सुरू होते. तेव्हा बनवलेल्या अशाच एका कॅसेटमध्ये पाठोपाठ येणार्‍या माझ्या आवडत्या दोन रोमँटिक गज़ला होत्या - जगजित-चित्राने गायलेली सईद राहींची 'मेरे जैसे बन जाओगे जब इश्क़ तुम्हें हो जाएगा' आणि त्यांनीच गायलेली बशीर बद्र यांची 'सोचा नहीं अच्छा बुरा, देखा सुना कुछ भी नहीं'. आजही त्यातले शब्द सहजच ओठांवर येतात, मध्ये कितीतरी वर्षे उलटून गेली असताना...

त्यावरून आठवले, दोनेक वर्षांपूर्वी मी लडाखला नुब्रा व्हॅलीत गेलो होतो. थकलेल्या मोटरसायकल राइडनंतर पांढर्‍याशुभ्र वाळूत सूर्यास्त बघत असताना मनात एक वेगळेच समाधान होते. तेव्हा साठीच्या आसपासचे एक वयस्कर जोडपे दिसले. ते काका-काकू थोडासा वाळूचा ढिगारा चढूनही थकून गेले होते, पण शारिरीक थकव्यापेक्षाही त्या दोघांच्याही चेहर्‍यावर जाणवत होती एक हताश थकावट - काहीतरी गमावल्यासारखी. ते दोघेच लडाखला कशासाठी आले असतील? त्यांना मुलेबाळे असतील का? असली तर ती कुठे असतील> ते एवढे उदास का आहेत? असे कित्येक प्रश्न मला पडले. पण अंगभूत भिडस्त स्वभावामुळे म्हणा किंवा माझ्यासारख्या तिर्‍हाइताने त्यांना काय आणि कसे विचारायचे या विचाराने म्हणा, मी प्रत्यक्ष जाऊन काही त्यांच्याशी बोललो नाही. मी दुरूनच त्यांच्याकडे बघत होतो. कित्येक वेळ मावळतीच्या सूर्याकडे बघत ते दोघे त्या वाळूच्या ढिगावर बसून होते, अगदी निशब्द. आयुष्याच्या संध्याकाळी तो सूर्यास्त त्यांच्या डोळ्यातच दिसत होता. मला अचानकच हा शेर आठवला -

इक शाम के दहलीज़ पर बैठे रहे वो देर तक
आँखों से की बातें बहुत मुँह से कहा कुछ भी नहीं

(दहलीज़=उंबरठा)

ह्या वयस्कर जोडप्याचेही असेच, "ख़ामोश यादों के सिवा, घर में रहा कुछ भी नहीं..." काही झाले असेल का ह्या विचाराने मी त्या संध्याकाळी अस्वस्थ होत राहिलो. आजकाल ह्या ओळी ऐकताना त्या संध्याकाळी नुब्रा व्हॅलीत त्या दोघांच्या डोळ्यात पाहिलेला सूर्यास्त आठवत राहतो...

नुब्रा व्हॅलीची त्या वेळची आणखी एक आठवण आहे. त्याआधी ७-८ वर्षे मी लडाखला मोटरसायकलने जायचा बेत करत होतो, पण काही ना काही कारणाने ते जमतच नव्हते. आदल्या वर्षी तर दिल्लीपर्यंत विमानाची टिकिटेही काढून झाली होती, पण ऐन वेळी मोटरसायकल टूर ऑपरेटरने टूरच रद्द केली. विमानाचे पैसे वाया गेले. ते वैष्णोदेवीचे म्हणतात ना, 'माता का बुलावा' आला पाहिजे, तसा शेवटी दोन वर्षांपूर्वी 'लडाखचा बुलावा' आला एकदाचा. तिथे गेल्यावर सार्चूच्या अतिथंड वार्‍याने, वातावरणाने बरेच गळपटले. काहींना ऑक्सिजन सिलेंडर लावावे लागले. एका बंड्याने तर प्रॅक्टिस राइडलाच हात मोडून प्लॅस्टरमध्ये बांधून घेतला. पोटे तर सगळ्यांचीच बिघडली होती. आता इतक्या वर्षांनी इथे यायचा योग आलाय तरी राइड पूर्ण करता येईल की नाही, याविषयी मनात धाकधूक होती. त्यात सार्चू ते पांग या प्रवासाने माझाही अंत पाहिला होता. चाळीशी आलीये, या वेळेस नाही जमले तर पुन्हा येता येईल का, आणि आलोच तर तेव्हा शरीर साथ देईल का, असेही विचार आयुष्यात पहिल्यांदाच मनात येत होते. सुदैवाने नुब्राला पोहोचेपर्यंत माझ्या शरीराने चांगलेच जुळवून घेतले होते, त्यामुळे थकलो होतो, तरी समाधान होते. त्या राईडमधे 'Take me home, country roads...' हे गाणे (आजूबाजूला ऐकायला कोणी नाही ह्याची खातरी करून) मनासोक्त गाऊन घेतले होते. मनात वेगवेगळे विचार चालूच होते - मी घेतलेले काही वेगळे निर्णय, त्याचे अपरिहार्य फायदे-तोटे, एकटे पडल्याची भावना, वय वाढल्याची जाणीव, आणखी काय-काय राहून गेले त्याची हुरहुर असे चक्र चालू होते. नुब्राच्या वाळूत बसलो, तेव्हाही हे विचार डोक्यात पिंगा घालत होते. एका वेगळ्याच ट्रान्समध्ये होतो. तेव्हा समोरच्या वाळूच्या ढिगार्‍यामागून हळूहळू पण अनपेक्षितपणे उंटांचा एक कळप वाळू उडवत वर आला. त्यांनीच उडवलेल्या त्या धुरळ्यामागे एक अतिशय सुरेख देखावा साकारत होता. कॅमेरा सावरून ते टिपताना मला काय आठवले, तर ह्या ओळी -

चाह तो निकल सकी न, पर उमर निकल गई,
.....
उम्र के चढ़ाव का उतार देखते रहे।
कारवाँ गुज़र गया, गुबार देखते रहे।

कारवाँ गुज़र गया, गुबार देखते रहे...कारवाँ गुज़र गया, गुबार देखते रहे...

ते दृश्य, माझी त्या वेळची मनःस्थिती आणि गोपाल दास नीरज यांच्या या ओळी - हे सगळे मिळून वेगळ्याच मितीतला एक क्षण मनावर कायमचाच कोरला गेला. आजही ह्या ओळी आठवतात, तेव्हा त्या क्षणांची धूळ माझ्या डोळ्यांत उडत राहते, उगाचच डोळ्यात पाणी येत राहते...

तशाच काही लोभस, मोहक आठवणीही आहेत. लडाखमधेच पँगाँग लेकजवळ तंबूत राहिलो होतो. सकाळी आकाशाचे आणि लेकचेही सुरेख फोटो मिळतील म्हणून सूर्योदयापूर्वीच हाडे गोठवणार्‍या थंडीत कुडकुडत उठलो. त्या पहाटेच्या वेळी तिथल्या अथांग काळ्या आकाशात चांदण्यांचा अक्षरशः खच पडला होता. आकाशात इतक्या चांदण्या असू शकतात ह्यावर माझा विश्वासच बसत नव्हता, मी कधीच एवढ्या चांदण्या पाहिल्या नव्हत्या. काळ्याशार पँगाँग लेकमधयेही ते प्रतिबिंब हळुवार हलत होते. लांबवर कुठेतरी आंधारात आकाश लेकमध्ये विरघळत होते. वर-खाली सगळीकडेच चांदणे पसरल्यासारखे काहीतरी surreal, भासमय वातावरण निर्माण झाले होते. तेव्हाच कुठलेतरी नक्षत्र उगवत होते की मावळत होते - अ‍ॅस्ट्रोनॉमी कळणार्‍या एका ग्रुपमधे त्यावर चर्चा चालू होती. माझे तिकडे फारसे लक्ष नव्हते. मी ते सगळे तारे माझेच असल्यासारखा मी त्यांच्याकडे पाहत होतो (सा.न. धामणस्कर), ते नक्षत्रांचे देणे डोळ्यात साठवून घेत होतो. तिथे जाणवणारी ती थंडी, त्यात हुळहुळणारे नाक, लेकच्या पाण्याचा तो विशिष्ट वास, पाण्याचा अगदी हलका आवाज, आणि ते अथांग-अफाट आकाश हा सर्वांगाने भिडणारा अनुभव साठवायला आपला कॅमेरा किती थिटा आहे हे जाणवून हळहळतही होतो. सूर्य एखाद्या अनुरक्त प्रियकरासारखा हळुवारपणे पँगाँगची निळाई सजवत, निरखत उगवला. आपापल्या कैफात रात्रभर चकाकणारे अगणित तारे हळूहळू त्या आकाशात विरून गेले, जाताजाता सुरेश भटांच्या 'केंव्हातरी पहाटे' ह्या गज़लेच्या काही ओळी माझ्यासाठी उलगडून गेले...

उरले उरात काही आवाज चांदण्याचे
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली!

अचानक चमकले, अरे एक्झॅक्टली हाच तर तो अनुभव! भटांनीही पाहिले असेल का हे आकाश? कवितेच्या ओळी जाणवण्याचे असे काही लख्ख क्षण पदरात पडतात, तेव्हा काय वाटते हे खरेच नाही सांगता येत.
भटांच्या 'केव्हातरी पहाटे'वरून आठवले, लग्नाळलेल्या दिवसात, अशाच एका सकाळी आंघोळ करताना सहजच गुणगुणायला लागलो...

तुझको छू लूँ तो फ़िर ए जान-ए-तमन्ना मुझको
देर तक अपने बदन से तेरी ख़ुशबू आये

ते शब्द नेणिवेतून ओठांवर कुठल्या गंधाने आलेत हे जाणवून अंगावर सरसरून काटा आला होता. तो गंध, ह्या ओळी आणि तो अंगावर सरसरून आलेला काटा ह्यातून ही गज़ल एक खाजगी, जिव्हाळ्याची आठवण बनून मनात घर करून बसली आहे. Moments that take your breath away ह्या अशा काव्यमय सुरावटी घेऊन येतात. शेवटच्या श्वासानंतरही ह्या आठवणी रेंगाळतील कदाचित, गंध होऊन, सुरावटी होऊन...

खरे तर मुळात आपण त्यांना विसरलो हेही विसरलेल्या कविता, गज़ल, गाणी अचानकच नेमक्या वेळी, नेमक्या ओळींसकट कशी प्रकटतात हे अनाकलनीय आहे. नुसत्याच वाचलेल्या कवितांपेक्षा चाली लावलेल्या कविता, सुरांचा साज ल्यालेली गाणी, गज़ल अर्थातच खोलवर परिणाम करून जातात. आपल्या नेणिवेच्या खोल, अंधार्‍या डोहात काय, काय चालते त्याचा थांग लागत नाही. रिसर्च असे म्हणतो की टीनेजमधे जे संगीत आपण ऐकतो, ते कायमच मनात घर करून राहते -

Why do the songs I heard when I was teenager sound sweeter than anything I listen to as an adult? In recent years, psychologists and neuroscientists have confirmed that these songs hold disproportionate power over our emotions. And researchers have uncovered evidence that suggests our brains bind us to the music we heard as teenagers more tightly than anything we’ll hear as adults - a connection that doesn’t weaken as we age. Musical nostalgia, in other words, isn’t just a cultural phenomenon: It’s a neuronic command.

~ Excerpts from Musical Nostalgia

वर्षानुवर्षे हव्याहव्याशा सुरांच्या, स्वरांच्या साथीने कानावर पडलेले शब्द, कानातून जाणिवेत पोहोचत असतील. मग तिथून कधीतरी ते नकळतच नेणिवेत जात असावेत आणि तिथेच राहत असावेत अनंत काळ, अगदी जाणिवांमधून पुसल्यानंतरही. कुठल्यातरी स्पर्शाने, चवीने, गंधाने, सुरांनी किंवा अजून कशाने - नेणिवेत काहितरी उलथापालथ होते आणि त्या खोल डोहातून अवचितच असे काहीतरी वर येते. वर्षानुवर्षे झिरपलेल्या, आपल्या मातीत मुरलेल्या शब्दांना कधीतरी झरे फुटणारच ना?

स्वतः कविता लिहित नसलो, वाचत नसलो किंवा फार आवडीने गज़ल, गाणी ऐकत नसलो, तरीही आपल्या सगळ्यांच्या मनात एक हळवा कोपरा असतोच. अगदी व्यवहारी, वरकरणी रूक्ष वाटणार्‍या माणसांमधेही कुठेतरी हा ओलावा असतो. कधीतरी अनाहूतपणे एखादा सूर, एखादा स्वर, किंवा एखादा शेर, गाणे, कवितेच्या काही ओळी सगळे अडथळे ओलांडून काळजावर घाव घालतात, आणि मग पाझर फुटतो. मैफलीत असे पाझर फुटलेले डोळे हळूच पुसताना पाहिले की फार बरे वाटते. कविता, गज़ल ही अशाच ओलाव्यात रुजते आणि आपली होते.

आणि पाझर फुटतो, तेव्हा तो केव्हा, कुठे आणि कसा फुटेल हे कसे सांगणार? शेवटचा एक किस्सा सांगतो. मी फारसा देव-देव करत नाही. अगदी दीवारमधला बच्चन नसलो, तरीही मंदिरात मी क्वचितच जायचो. काही वर्षांपूर्वी एका अकल्पित समस्येमुळे त्रासलो होतो. कुठेच मदत मिळत नव्हती, काहीच मार्ग दिसत नव्हता. शेवटी अगदी हताश होऊन, उद्विग्न मनाने एका मंदिरात मूर्तीसमोर हात जोडले, तेव्हा हे सगळे किती खोलवर पाझरले आहे हे जाणवून शहारलो. कसे, कुठून आले कोणास ठाऊक, पण प्रार्थनेऐवजी अभावितपणे हेच ओठांवर आले -

तुम भी उस वक़्त याद आते हो
जब कोई आसरा नहीं होता...


20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

26 Oct 2019 - 7:17 am | जेम्स वांड

कसला थोर व्यासंग म्हणायचा देवाहो हा! वाचूनच छाती दडपली ती वेगळी पण तुमचे गज़ल प्रेम पूर्णपणे अन नीट पोचवणारे लेखन आहे हे.

जियो, गज़ल प्रेम असला रिफाईंड प्रकार आहे की त्याला पारिभाषित करायला परत एकदा मी आधार घेतोय मूनव्वर राणांच्या शेरचा, राणा म्हणतात

इंसान के हाथों की बनाई नहीं खाते
हम आम के मौसम में मिठाई नहीं खाते

~ मुनव्वर राना

व्यासंग कसला रे, लोकं चहाबाज असतात ना? मी गज़लबाज होतो, आहे! :-)
मुनव्वर राणांविषयी काय बोलावे? त्यांच्या 'माँ' (उर्दू शायरीच्या प्रचलित महबूबपेक्षा वेगळी वाट) आणि 'मुहाजिरनामा' ह्या दीर्घ शायरीवर वर मी फिदा आहे.

मुहाजिर हैं मगर हम एक दुनिया छोड़ आए हैं,
तुम्हारे पास जितना है हम उतना छोड़ आए हैं ।

कहानी का ये हिस्सा आज तक सब से छुपाया है,
कि हम मिट्टी की ख़ातिर अपना सोना छोड़ आए हैं ।

नई दुनिया बसा लेने की इक कमज़ोर चाहत में,
पुराने घर की दहलीज़ों को सूना छोड़ आए हैं ।

........

सभी त्योहार मिलजुल कर मनाते थे वहाँ जब थे,
दिवाली छोड़ आए हैं दशहरा छोड़ आए हैं ।

हमें सूरज की किरनें इस लिए तक़लीफ़ देती हैं,
अवध की शाम काशी का सवेरा छोड़ आए हैं ।

गले मिलती हुई नदियाँ गले मिलते हुए मज़हब,
इलाहाबाद में कैसा नज़ारा छोड़ आए हैं ।

ह्या रसग्रहणात एक शेवटची ओळ होती, पाठवतांना मीच ती कॉपी करायला विसरलो :(

तो चौसष्ट कलांचा अधिपती, त्यालाही ही अशी प्रार्थना आवडत असेलच ना?

लेखात मी कित्येक गज़लच्या लिंक्स दिल्या होत्या, पण लेखन आणि लिंक्सचा रंग सारखा असल्यामुळे त्या लक्षात येत नाहीत कदाचित.

दिवाळीत, सुट्टीच्या एका निवांत दिवशी आवडीचे काहितरी खात-खात, हे वाचत त्यातल्या काही गज़ल ऐकत फ़ुरसत के रात दिन आठवावे, थोडेफार पुन्हा जगावे असे लिहितांना मनात होते....

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 2:43 pm | यशोधरा

सुंदर!

सुधीर कांदळकर's picture

26 Oct 2019 - 7:21 pm | सुधीर कांदळकर

बहुतेक सगळ्या गजला माझ्याकडे आहेत. तरी दिलेल्या दुव्यातून ऐकून ताडून पाहिल्या. मी त्या संगीताच्या अंगाने ऐकतो. कारण मला उर्दू तर सोडा हिंदीही धड येत नाही.

तुमच्या नजरेतून त्यातल्या शब्दांचे अर्थही स्वरांइतकेच मोहक, जीवघेणे आहेत हे कळले. अबीदा बेगमची गजल मलाही विशेष वाटली. आणि हो, माझ्याही मनात कधीतरी अवचितपणे गजला रुंजी घालतात.

लडाखच्या आठवणी सुरू झाल्या आणि लेखात मस्त रंग भरला. अप्रतिम. लेख हीच एक मस्त जमलेली गजल-मैफिल आहे असे वाटले. एकदम झकास.

महिन्यातून एकदोन वेळा जगजीत, गुलाम अली वा मेहदी हसन ऐकले नाही तर मी अस्वस्थ होतो. शास्त्रीय संगीताचेच एक मोहक, विकसित रूप गजल आहे असे दिसते. गजल गायकी कशी प्रचारात आली याबद्दल मेहदी हसन म्हणतो की फाळणीनंतर नूरहांसारखे अपवाद वगळता बहुतेक सारे गायक संगीतकार भारतात राहिले. संगीताला उच्चभ्रू समाजात प्रतिष्ठा नसलेल्या पाकिस्तानातले संगीत जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी शेरोशायरीला शास्त्रीय संगीत जोडले. गजल अशी संगीतभ्रष्ट झाली असावी. पण ही भ्रष्टता प्रेमात पडावे अशीच आहे. रंजिशे ही सही हे मेहदी हसन यांनी संगीत दिलेल्या
चित्रपटातले गाणे आहे. नंतर त्यांनी ते मैफिलीत गजल म्हणून मांडले. माझ्याकडे चित्रपटातले मूळ गाणे देखील आहे. एका सुप्रसिद्ध अल्बममध्ये ते आहे. रंजीशही सही इतकेच मला त्याचे बात करनी थी आवडते. तुम्ही ऐकले असेलच.
एक सर्वांगसुंदर लेख वाचायला दिलात. अनेक अनेक धन्यवाद.

गझल प्रेमींसाठी शाही मेजवानीच आहे हा लेख!
शाळकरी विद्यार्थी असताना 'चुपके चुपके रात दिन' ह्या गझलशी माझा पहिल्यांदा परिचय झाला होता तो सोनाली वाजपेयींच्या जादुई, मुलायम आवाजात. पुढे काही वर्षांनी समजले कि त्या आधी ही गझल गुलाम अलींनी गायली असून प्रचंड लोकप्रिय होती आणि आजही लोकप्रिय आहे म्हणून 😀
पुढे गुलाम अलींच्याही आवाजातली ऐकली, पण का कोणास ठाऊक ती गझल सोनाली वाजपेयींच्या अवजातालीच मनाला जास्त भावली!
हिंदी चित्रपटात आलेल्या जवळपास सगळ्याच गझल्स मला आवडतात पण अल्बम्स च्या बाबतीतला माझा अनुभव थोडा वेगळा आहे. एखाद दुसरी सोडली तर बाकीच्या सुमार असतात, ह्याला अपवाद पंकज उधास ह्यांचा 'पैमाना' हा अल्बम. त्यातल्या सगळ्याच गझल्स मला आवडतात.
नुब्रा व्हॅलीच्या चित्रदर्शी वर्णनाने आणखीनच रंगत आलेला हा लेख आवडला! धन्यवाद.

चाणक्य's picture

27 Oct 2019 - 1:37 am | चाणक्य

गज़ल भन्नाट प्रकार आहे खरा. भाऊसाहेब म्हणतात तसं हे प्रद्न्यावंताचं काव्य आहे.
लेख सुरेख उतरलाय. मनापासून लिहीलं आहे एकदम.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Oct 2019 - 10:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम भी उस वक्त याद आते हो
जब कोई आसरा नहीं होता.

खरं तर हा शेर मी तुमचा लेख, तिसर्‍यांदा वाचून संपवतांना वाचला आहे. लेखाचा शेवट तुम्ही अतिशय हळवा केला आहे. तुम्ही मूर्तीसमोर हात जोडतांना तुमच्या ओठांवर आलेला तो शेर...भावनिक होण्याचा तो क्षण. खरं तर मला तो शेर तिच्या आठवणीसाठीच पुन्हा पुन्हा हवाहवासा वाटला.

लेख आवडला. छान, असे म्ह्णून प्रतिक्रिया देऊन प्रतिक्रिया लिहून थांबवणे म्हणजे लेखकावर अन्याय करण्यासारखे होईल म्हणून अनेकवेळेच्या भावनेचा निचरा झाल्यानंतर पुन्हा एकदा लिहितो.

मिपावरील काही लेखांचं माझ्यासाठी काही वर्गीकरण आहे. पाककृती असली कुठे शेयर करायची आणि शेरोशायरी हळवं काही असलं की कुठे शेयर करायचं. आम्ही दोघांनीही तुमचं लेखन इंजॉय केलं. खूप आवडलं. केवळ अप्रतिम. खरं तर मित्रांच्या मैफिलीत दोन दोन पेग झाल्यावर (माझे नाही मित्रांचे) तुमच्या लेखनाचं तुम्ही वाचन करावं आणि आम्ही ते ऐकत राहावं असं वाटल. कोणत्या गझलेच्या रसग्रहणाला दाद देऊ आणि किती लिहू असं सारखं होत होतं. सालं शायरी माझा हळवा कोपरा आहे. तुम्ही म्हणालात तसं " गज़ल सुख-दु:खात नेहमीच साथ निभावत राहिली. कित्येक दु:खी, एकाकी रात्री केवळ गज़ल ऐकताना सुसह्य झाल्यात. स्वतःच्या सावलीनेही केली नसेल अशी सोबत गज़लेने केली हे अगदी खरं आहे. कित्येकदा कानाला हेडफोन लावून किती तरी रात्री अशा गझलांनी जागवल्या आहेत. तुमच्या लेखनात जागोजागी एकापेक्षा एक उत्तम सुरेख गझलांचे थांबे आहेत, प्रवाशाने प्रवास करता करता एखाद्या छानशा सावलीत येऊन उभं राहील्यानंतर जो आनंद होतो तसे हे गझल थांबे. लेखनातलं एक छायाचित्र ज्यात उंटाचा कळप पाहून वाळूवरचं ते चित्र खूप आवडलं. उम्र के चढाव का उतार देखते रहे, कारवॉ गुजर गया, गुबार देखते रहे' केवळ क्लास. कसंय तुमच्यातला हळवा काही तरी शोधणारा माणूस शायरीतून रसग्रहणाच्या निमित्ताने खूप तरल उतरला आहे. प्रेयसीच्या कपाळाचं, तिच्या दोन्ही मिटलेल्या, डोळ्यांच्या पापण्यांवर अलगद प्रेमाने ओठ टेकावे असं फिलिंग तुमच्या लेखनाने दिलं.

याद करके और भी तकलीफ होती थी अदीम
भूल जाने के सिवा अब कोई चारा न था.

आपण खूप वेळा लिहाल, यापेक्षा दर्जेदार आणि उत्तम लिहाल. पण, तुमच्या या गझलेच्या सफरने खूप आनंद दिला तहे दिलसे शुक्रीया....! थांबतो. पुन्हा एकदा लेख वाचायला उघडून ठेवला आहे...!

Gajal

-दिलीप बिरुटे

सर, काय बोलू? अतिशय मनापासून दिलेल्या ह्या प्रतिसादाबद्द्ल तितकेच मनापासून आभार. __/\__

तुमच्या लेखनात जागोजागी एकापेक्षा एक उत्तम सुरेख गझलांचे थांबे आहेत, प्रवाशाने प्रवास करता करता एखाद्या छानशा सावलीत येऊन उभं राहील्यानंतर जो आनंद होतो तसे हे गझल थांबे.

अशीच आहे गज़ल, वाळवंटातल्या ओअ‍ॅसिस सारखी. थंड, शांत करणारी. :-)

- मनिष
ता.क. - तेवढा तो छापील अंक कुठे मिळेल, कधीपासून वाट पाहतोय....

बेसनलाडू's picture

29 Oct 2019 - 11:41 am | बेसनलाडू

मस्त!

फासलेंच्या एका सादरीकरणाच्या सुरुवातीस गुलाम अली काहिशी अशी सुरुवात करत -

न उडा यूं ठोकरोंसे मेरी खाक-ए-कब्र जालिम
यही एक रह गयी है मेरे प्यार की निशानी

त्यामुळे ही गझल असफल प्रेमास उद्देशून असल्याचे वाटते. फाळणी संदर्भात अर्थपूर्ण ठरते आहेच.

जगजीत सिंगचे नाव आले कि मला मरासिम बाहेर आणि तुन इतना जो मुस्करा रहे हो, तुम को देखा तो यह खयाल आया, कल चौदहवी की रात थी वगैरेच्या बाहेर 'कोई फर्याद तेरे दिल में दबी हो जैसे' आवर्जून आठवते, ऐकू येते. मेहदी, गुलाम अली, फराज आठवले की गालिब, मीर, शहरयार शोधावा लागतो. मीर आठवला की बाजार मधलं 'दिखायि दिये यूं कि बेखुद किया' आठवल्याशिवाय राहत नाहि. तिच गत शहरयारच्या 'सीने में जलन आँखों में तूफान सा क्यों है'ची :-) पुढे जाऊन लाडका तलत अजीज आणि त्याची 'फिर छिडी रात फूलों की', 'जिन्दगी जब भी तेरी बज्म में' (हा परत शहरयार!) आठवतातच आठवतात.

अनेक सुरेल आठवणींना उजाळा देणारा उत्तम लेख. अभिनन्दन!

गदी खरं आहे बेला. मी लिहायला घेतलं तें 'फिर छिडी रात फूलों की', 'जिन्दगी जब भी तेरी बज्म में' होतं मूळ लेखात, तसंच उमराव जानही (जुस्तजू जिसकी थी) होतं. पण मग लेख जवळपास ह्याच्या दुप्पट होत होता, म्हणून कात्री लावून वैयक्तिक अनुभवांकडे वळलो.

@सुधीर कांदळकर - मेहदी हसनच्या कित्येक गज़ल चित्रपटात गीतं म्हणून आल्यात पण त्यात फार खोली नाही. गुलाम अलींची 'चुपके चुपकेही' आहेच. अबीदांचे हे 'ओ देस से आनेवाले' ऐकले आहे का? अत्यंत दमदार गायकी. काही वर्षांपुर्वी त्या पुण्यात वसंतोत्सवात आल्या होत्या - तसाच दमदार आवाज आहे अजून्ही. त्या मानाने गुलाम अलींना जेंव्हा प्रत्यक्ष ऐकले तेंव्हा थोडे वाईट वाटले होते, आवाजात वय जाणवत होते.

@टर्मीनेटर - सोनाली वाजपेयींबाबत पहिल्यांदा ऐकणे हे कारण असावे. चित्रपटातील गज़ल बर्‍याच वेळा पाणी घातलेली गाणी होतात, अजून ऐका उत्तम गायकांना - कदाचित मत बदलेल. :-)

यशोधरा, चाणक्य - प्रतिसांदाबद्द्ल धन्यवाद.

गुल्लू दादा's picture

2 Nov 2019 - 2:20 pm | गुल्लू दादा

खूप आवडले...वाचनखूण साठवली आहे.

श्वेता२४'s picture

2 Nov 2019 - 3:02 pm | श्वेता२४

गझल म्हणजे मनाचा हळवा कोपरा. खूप झोप आल्यावर लहान मूल जसं हातपाय मुडपून घेऊन एखाद्या कोपऱ्यात गाढ झोपी जातं तशीच काहीशी मनाची अवस्था गझल ऐकल्यावर होते. आताच्या काळातील बर्फी सिनेमातील फिर ले आया दिल .... ही खूप आवडली. रंजीश ही सही ही ऑल टाईम फेवरिट. खूप छान स्मरणरंजन. बऱ्याच जुन्या गोष्टी आठवल्या तुमच्या लेखामुळे.

सर्वच नवीन प्रतिसादांबद्दल आभार.

नूतन's picture

17 Nov 2019 - 8:35 pm | नूतन

लेख खूप सुंदर. गज़ल विषयाचा फार अभ्यास नाही पण त्यांच्या अर्थपूर्ण शब्दांसाठी वाचायला ऐकायला आवडतात.
कारवाँचे प्रकाशचित्र खूप सुंदर.

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद नूतन. अर्थपूर्ण शब्दांची आवड/वेड हेच माझ्या मते गज़ल भावण्याचे मुख्य कारण असावे. :)