केरळ्चा पेरिप्प वडा

सायली पानसे's picture
सायली पानसे in पाककृती
9 Nov 2008 - 6:22 pm

केरळ मधिल अतिशय चविष्ट वडा ..... महाराष्ट्रात बटाटा वडा तसा तिथे हा.

साहित्य :
तुरीची डाळ - १-१/२ वाटी
आले - पाउण इंचा चा तुकडा
हिरव्या मिरच्या- ३-४ ( तिखट आवडत असल्यास जास्त पण घेउ शकता.)
कढिपत्ता- १५-१६ पाने (२-३ काठ्या) चिरुन घेणे
कांदा- १ मध्यम आकाराचा.. बरिक चिरुन घेणे.
जिरे- १/२ चमचा
तिखट - १/२ छोटा चमचा
मीठ - चवीनुसार
हळद- १/२ छोटा चमचा
हिंग- एक चिमुट
कच्च्या तेलाचे मोहन - १-१/२ चमचा
प्रथम तुरीची डाळ ४ तास पाण्यात भिजवुन घ्यावी. नंतर त्यातिल सर्व पाणी काढुन मिक्सर मधे आले जिरे व मिर्च्या टाकुन जाडसर वाटुन घ्यावी.. काहि डाळिचे दाणे आखखे असले पहिजेत.
त्यात वरिल मसाला - हळद, तिखट, मीठ, हिंग आणि चिरलेला कढिपत्ता घालवा आणि नीट मिक्स करुन घ्यावे. त्यात कांदा आणि दिड चमचा कच्च्या तेलाचे मोहन घालुन पुन्हा मिक्स करुन घेणे.
ह्याचे हाताला पाणी लावुन चपटे वडे थापुन ते कडकडित तेलात खरपुस तळुन घेणे. आणि टॉमॅटो केचप किंवा नारळाच्या चटणी बरोबर गरम खावे.
हे वडे एकदम कुरकुरीत होतात आणि पचायलाही हलके असतात.

दोन टिपा:

१. डाळ वाटताना अजिबात पाणी घालु नका.... जर का पाणी जास्त झाले तर वडा आ़कार घेणार नाहि आणी तळताना फुटण्याचि शक्यता असते.
२. कांदा घातल्यावर फार वेळ सारण ठेउ नये कारण कांद्याला पाणी सुटुन सारण ढिले होउ शकते. काहि वडे नंतर तळायचे असतिल तर कांदा घालण्याआधि जास्तिचे मिश्रण बाजुला काढुन ठेवा. पुन्ह्या तळायच्या आधि कांदा घालुन मग लगेच तळा.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

9 Nov 2008 - 7:09 pm | विसोबा खेचर

उत्तम पाकृ, मनमोहक फोटू..! :)

सायली मॅडम, येऊ द्यात अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ..

तात्या.

सायली पानसे's picture

9 Nov 2008 - 8:06 pm | सायली पानसे

धन्यवाद तात्या.
हि पहिलीच होती. अजुन लिहिन नक्कि.

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Nov 2008 - 7:15 pm | बिपिन कार्यकर्ते

अच्छा, याला पेरिप्प वडा म्हणतात काय? बर्‍याच मल्लू हॉटेलात खाल्ला आहे. मी याला सरळ डाळवडा म्हणायचो. मस्त असतो. पण बर्‍याच ठिकाणी खूप तिखट पण असतो.

पुढच्या वेळी ट्राय करू ;)

बिपिन कार्यकर्ते

स्वाती दिनेश's picture

9 Nov 2008 - 7:58 pm | स्वाती दिनेश

हरबर्‍याच्या डाळीचा करतात तो डाळवडा रे बिपिन.
पाकृ आणि फोटो छान आहे सायली,
स्वाती

रेवती's picture

9 Nov 2008 - 9:39 pm | रेवती

हा आहे होय पेरिप्प वडा. मला वाटले हरभरा डाळीचा वडा म्हणजे केरळमधे पेरिप्प वडा.
फोटू व कृती छान आहे. तूरीचे डाळ वड्यात वापरतात हे माहित नव्हते.

रेवती

वल्लरी's picture

9 Nov 2008 - 10:09 pm | वल्लरी

वा!!!!
छान फोटो आहे वड्यांचा....
मी नक्की करुन पाहिन,,,,,

सहज's picture

10 Nov 2008 - 7:54 am | सहज

असेच म्हणतो.

वेताळ's picture

10 Nov 2008 - 11:04 am | वेताळ

हा पेरिप्प वडा.......फोटो व पाककृती अगदी छान दिल्या आहेत.
वेताळ

प्राजु's picture

11 Nov 2008 - 12:33 am | प्राजु

हाच का तो जगप्रसिद्ध पेरिप्प वडा!!
मस्त पा कृ.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

11 Nov 2008 - 4:35 am | शितल

हीच पाककृती मी तुरीच्या डाळीच्या ऐवजी हरभर्‍याची डाळ वापरून करते.
पण आता तुरीची डाळ वापरून ही हे वडे करून पाहिन. :)

पक्या's picture

12 Nov 2008 - 12:09 am | पक्या

छान रेसिपी.
अवांतरः आपण सायली पानसे म्हणजे झी मराठी सारेगमप २००८ च्या उपविजेत्या का?

सायली पानसे's picture

13 Nov 2008 - 11:55 am | सायली पानसे

नाही. मी दुसरी सायली आहे.

मनस्वी's picture

13 Nov 2008 - 12:18 pm | मनस्वी

सायली, मस्त आहे पेरीप्पवडा.

सायली पानसे's picture

13 Nov 2008 - 1:10 pm | सायली पानसे

सगळ्यांचे मनापसुन आभार.... आता अजुन लिहिण्याचा उत्साह आला आहे.