आख्ख्या जगाचा लाडका पाहुणा आणि सगळ्यांनाच आपलासा वाटणारा बाप्पा घरोघरी यायला जेमतेम दहा- बारा दिवस उरलेत. अमंगळाचा नाश करणाऱ्या विघ्नविनाशक गणरायाची आपण सगळेच वाट बघतोय. बाप्पाच्या आगत स्वागतासाठी सगळीकडे जोरदार तयारी सुरू असणार. इथे आपल्या मिपावरसुद्धा आम्ही, तुमच्याच मदतीने, गणरायाच्या स्वागताची एकदम जोरदार तयारी करण्यात गढलोय. एकदम म्हणजे काय, एकदमच गुंतून गेलोय कामामध्ये! सगळं वेळेत पूर्ण व्हायला हवं ना!
पण पुन्हा कामात गढून जाण्याआधी तुमच्यासाठी ही आणखी एक किंचितशी झलक. तुम्ही ओळखू लागा बघू, कोणी काय लिहिलंय ते.
१.
राम मारुती रोड सार्वजनिक गणेशोत्सवाचे व्यासपीठ पदपथावर. श्रोतृवृंद मोठा असला की श्रोत्यांनी संपूर्ण रस्ता व्यापून जाई. काही श्रोते बरोबर पाट, लाकडी स्टूल, कापडी बैठक वगैरे आणत. मध्येच मोटार आली की श्रोते उठून बाजूला होत. मोटार गेली की पुन्हा जागेवर. तेव्हा तिथे रहदारी इतकी कमी असे की कार्यक्रम संपेपर्यंत एक-दोनच मोटारी जात. मध्येच पावसाची सर येई. मंडपाबाहेरचे श्रोते छत्र्या उघडून उभे राहत आणि पाऊस गेला की पुन्हा ओल्याचिंब जागी बसत. पाट, स्टुले पुसली जात, तर कापडी बैठका आता पिशवीत जात. पण ना कधी गायक-वादकाचा रसभंग झाला, ना कधी रंगलेल्या श्रोत्यांचा. बहुधा वनिता समाजातली बिस्मिल्लाजी आणि व्ही.जी. जोग यांच्या जुगलबंदीची अशीच एक संस्मरणीय मैफल आठवते. विशेषतः त्यातला राग जोग आणि त्यातले त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे सौंदर्यपूर्णतेने मांडलेले दोन्ही गांधार. व्ही.जी. ‘जोग’ असल्यावर राग जोग हवाच, नाही? माणिक वर्मांचा श्रोत्यांच्या फर्माइशीमुळे अनेक वेळा ऐकलेला जोगकंस तर अजून कानात निनादतो आहे.
२.
अर्थात हाताशी वेळ असल्यात सगळी घरं बघण्यास काहीच हरकत नाही. सगळ्या वास्तू आणि आतमधील गोष्टी व्यवस्थित छान जतन केल्या आहेत. माहितीचे फलक आणि माहिती देणारे लोक जागोजागी आहेत. सगळ्या चीजवस्तू फार काळजीपूर्वक ठेवल्या आहेत, त्यांना हात लावण्यास अर्थात मनाई आहे. खरे सांगायचे तर हात लावून बघण्याचा मोहही होत नाही. इंग्लिश साहित्याचे जनक म्हणावेत असा महान लेखक जिथे जन्मला, वाढला, त्या वास्तूमध्ये आपण आहोत या नुसत्या कल्पनेनेच मन भरून येते.. नतमस्तक व्हायला होते.
३.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग ही काळाच्या ओघात होणार्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीची पुढची अटळ पावले आहेत. त्या पावलांशी आपली पावले जुळवून घेत, ते तंत्रज्ञान आत्मसात करत काळाशी अनुरूप होण्यातच शहाणपणा आहे. अहो, ही तर नुकतीच सुरुवात आहे. हे तंत्रज्ञान सध्या बाळबोध अवस्थेतच आहे. त्याचा खरा आवाका आणि व्याप्ती समजायला अजून बराच अवकाश आहे. पण म्हणून स्वस्थही बसता येणार नाही किंवा आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या, मशीन लर्निंगच्या व्याप्तीने मनुष्यजमातीचे आणि नोकर्यांचे नेमके काय आणि होणार ह्याची व्यर्थ चिंताही करत बसणे उचित ठरणार नाही. त्याची कास घरून पुढे जावेच लागेल. औद्योगिक क्रांतीला, मशीन्सना आणि अलीकडच्या संगणकीय वापरालाही विरोध झालाच होता. पण त्याचा वापर टाळणे शक्य झाले नाही, तसेच ह्या तंत्रज्ञानाचेही होणार आहे, ते अंगीकारावेच लागेल.
प्रतिक्रिया
22 Aug 2019 - 11:51 am | ज्ञानोबाचे पैजार
लेखमाला विविधतेने नटलेली असणार यात कोणतीही शंका नाही.
(लेखमालेची आतुरतेने वाट पहाणारा) पैजारबुवा,
22 Aug 2019 - 12:18 pm | पद्मावति
मस्तंच.
22 Aug 2019 - 1:20 pm | जॉनविक्क
22 Aug 2019 - 9:31 pm | जालिम लोशन
वाट बघतो आहे.
23 Aug 2019 - 8:31 am | यशोधरा
बिझी बाप्पा! :))
23 Aug 2019 - 10:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाय द वे, झलक दिखला जा मधले मला हे बाप्पा खुप आवडले.
ज्याची कोणाची आयडिया असेल त्यांना नमस्कार करतो.
मला माहित्ये लेखन कोणाचे आहे, पण सांगणार नै.
-दिलीप बिरुटे
23 Aug 2019 - 10:53 am | यशोधरा
नशीब (त्या बाप्पाचे!)!!
23 Aug 2019 - 6:47 pm | नूतन सावंत
गणपती बाप्पा फारच लडिवाळ आहेत.
23 Aug 2019 - 11:22 pm | जॉनविक्क
गणपतीसुध्दा दूसरेच माउस जवळ करतोय बघून त्याचा चेहरा किती केविलवाणा करून बघतो आहे.