सताड उघडी खिडकी

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in लेखमाला
4 Sep 2019 - 6:00 am

h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
}
h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
}

p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
}

a: {
color: #990000;
}

a:link {
text-decoration: none;
}

a:hover {
text-decoration: underline;
}
div.chitra {
max-width:420px;
margin: auto;
}

सताड उघडी खिडकी

" आमच्या गावी अंदाजे पन्नास वर्षांपूर्वी डोंगरावरून खाली येऊन रानडुकरे शेतात गोंधळ घालायची आणि हाताशी आलेले पीक ओरबाडायची. भात कापणीला आला की या डुकरांचा बंदोबस्त करावाच लागे. त्या काळात गावात बऱ्याच जणांकडे बंदुकाअसायच्या. आमच्याही घरी एक सोडून तीन बंदुका होत्या. इराच्या मावशीच्या नवऱ्याची एक व त्यांच्या भावाची एक व मुलाची एक. दोन जुनाट आणि एक नवीन कोरी. इरावतीच्या मावशीचा नवरा मिलिटरीतून निवृत्त होऊन गावी स्थायिक झाला होता. शिवाय तालुक्याच्या गावी दुकाने आणि दोन डोंगरामध्ये शेतीवाडी होती. भलेमोठे घर होते, तेही एका ख्रिश्चन पाद्र्याकडून विकत घेतलेले. इराचे वय होते १५. अवखळ व चलाख. ती तिच्या मावशीकडे राहायची. तिचे आईवडील म्हणे इंग्लंडात राहत असत."

त्या दिवशी त्या घरी एक पाहुणा आला. त्याचे नाव होते माधव.

‘‘मी माधव!’’

‘‘मी इरावती बर्वे! माझी मावशी इतक्यात येईलच, तोपर्यंत तुम्हांला माझ्याशीच गप्पा माराव्या लागतील.’’

असे म्हणून इरावती गोड हसली. ते पाहून माधवने त्या भाचीचे कौतुक केले, पण तिच्या येणाऱ्या मावशीची किंमत कमी होणार नाही याची काळजी घेऊन. या गावातील अनोळखी घरांना भेटी देऊन आणि त्या घरात राहणाऱ्या अनोळखी माणसांच्या गाठीभेटी घेऊन त्याच्या मानसिक रोगावर काही इलाज होईल असे त्याला मुळीच वाटत नव्हते. त्याने जेव्हा निघण्याची तयारी केली, तेव्हा त्याची बहीण त्याला म्हणाली होती,

‘‘तेथे काय परिस्थिती असेल याची मला कल्पना आहे. तेथे तुला एकांतवासात गाडून घ्यावे लागेल. बोलायला माणूसही भेटणार नाही. तुझी मनस्थिती ढासळत जाईल आणि तुला निराशेचे झटके येतील.... पण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे शहर सोडून तुला गावाकडील शांत, स्वच्छ वातावरणात राहिलेच पाहिजे. मी तेथे बरेच दिवस काढले आहेत. एवढे काही वाईट नाही तेथे. मी तुला माझ्या ओळखीच्या माणसांसाठी पत्र देईन. मला आठवत आहेत ती माणसे तरी स्वभावाने खूपच चांगली होती.’’

आता या ज्या मावशी येणार आहेत, त्याही चांगल्या स्वभावाच्या असू देत अशी त्याने मनोमन प्रार्थना केली. अर्थात ही प्रार्थना करताना त्याची दृष्टी इरावरून ढळली नव्हती. ती होतीच तशी.. त्याच्या त्या नजरेने ती थोडीशी अवघडली. बराच वेळ अबोल गेला. काहीतरी विचारायचे म्हणून तिने विचारले,

‘‘या गावात बरीच मंडळी तुमच्या ओळखीची आहेत का?’’

‘‘छे! छे! मी एका माणसालाही ओळखत नाही येथे. चार-पाच वर्षांपूर्वी माझी बहीण इथे राहत होती.’’

‘‘इथे?’’

‘‘हो. पोस्टात होती. तिच्या काही ओळखीच्या माणसांना तिने माझ्यासाठी पत्रे लिहिली आहेत.’’ हे वाक्य उच्चारताना त्याच्या स्वरातील नाराजी काही त्याला लपवता आली नाही.

‘‘मग तुम्हाला माझ्या मावशीबद्दल काहीच माहीत नसणार!’’ स्वतःत मग्न असलेल्या इरावतीने ठामपणे विचारले.

‘‘मला फक्त त्यांचे नाव आणि पत्ता एवढेच माहीत आहे.’’ त्याने कबुली दिली. या भाचीची मावशी इरावतीसारखीच सुंदर असू देत. ती विधवा आहे की अविवाहिता आहे असा एक वात्रट विचार त्याच्या मनात येऊन गेला खरा. त्या विचाराने तो मनातल्या मनात थोडासा खजील झाला. त्या घरात पुरुषाचा वावर असावा, असे त्याला उगीचच वाटून गेले.

‘‘तीन वर्षांपूर्वी तिच्या आयुष्यात ती घटना दुर्दैवी घडली. त्या वेळी बहुधा तुमची बहीण येथे असेल.’’

‘‘दुर्दैवी घटना?’’ माधवने विचारले. या एवढ्या छोट्याशा गावात - जेथे एक रस्ता येतो आणि जातो, त्यात कसला अपघात होणार!

‘‘एवढ्या थंडीत आम्ही ही भलीमोठी खिडकी उघडी का ठेवतो, याचे तुम्हांला कदाचित आश्चर्य वाटत असेल. हो ना?’’ इरावतीने एका ब्रिटिशकालीन खिडकीकडे बोट दाखवून विचारले. ती खिडकी म्हणजे जवळजवळ एक दरवाजाच होता. बाहेर हिरवळ दिसत होती.

‘‘हं, थंडी आहे खरी! पण त्या दुर्दैवी घटनेचा आणि या खिडकीचा काही संबंध आहे का? ’’

‘‘तीन वर्षांपूर्वी याच खिडकीतून माझ्या मावशीचा नवरा, त्याचा भाऊ व मुलगा रानडुकराच्या शिकारीला बाहेर पडले. पुढच्या दरवाजा वापरला तर वळसा पडतो, म्हणून ते हीच खिडकी वापरत. पण त्या दिवशी ते तिघे परत आले नाहीत. त्या वर्षी नदीला पूर आला होता आणि नदीकाठी दलदल माजली होती. बहुधा ते त्यात फसले. गावकऱ्यांनी अनेक दिवस त्यांचा शोध घेतला, पण त्यांचा पत्ता लागला नाही. सगळ्यात भयंकर म्हणजे त्यांचे देहही सापडले नाहीत.’’ हे सांगताना त्या मुलीचा स्वर दाटून आला. त्यातील ठामपणा कुठल्या कुठे नाहीसा झाला.

‘‘माझ्या बिचाऱ्या मावशीला तेव्हापासून असे वाटते की ते तिघे नेहमीप्रमाणे याच दरवाजातून कधीतरी येतील. त्यांच्याबरोबर त्यांचा काळा शिकारी कुत्राही असेल. म्हणून ही खिडकी रोज अंधार पडेपर्यंत उघडी ठेवली जाते. गरीब बिचारी माझी मावशी. ते शिकारीला कसे गेले हे तिने मला किती वेळा सांगितले असेल कोण जाणे. काकांनी त्यांचा आवडता हिरव्या रंगाचा शिकारीचा कोट हातावर टाकला होता आणि माझ्या भावाने कुठलेतरी गाणे गाऊन तिला अगदी भंडावून सोडले होते. ते गाणेही ती गुणगुणते... खरे सांगू का? एखाद्या अशा उदास संध्याकाळी मलाही ते कुठल्याही क्षणी या खिडकीतून आत येतील असे वाटते आणि माझ्या अंगावर भीतीने सरसरून काटा येतो...’’

हे सांगताना तिचे अंग शहारले. तेवढ्यात एका मध्यम वयाच्या बाईने त्या खोलीत प्रवेश केला. त्या उमद्या तरुणाकडे स्मितहास्य करत तिने विचारले

‘‘इराने तुमची नीट काळजी घेतली की नाही ?’’

‘‘हो! हो! प्रश्नच नाही.’’ माधव हसत म्हणाला.

‘‘ही खिडकी उघडी ठेवली तर चालेल ना? माझा नवरा आणि त्याचा भाऊ रानडुकराच्या शिकारीला गेले आहेत. उच्छाद मांडलाय मेल्यांनी नुसता. ते कुठल्याही क्षणी या खिडकीतून येतील. आता त्यांनी चिखल तुडवला असेल आणि ते इकडून आलेलेच मला परवडते. शेवटी पुरुषांची जात!’’ असे म्हणून मावशी हसली.

मग तिने माधवला त्यांच्या शिकारीच्या कथा सांगितल्या. कधी कधी बदकांचीही ते शिकार करतात. नदीपलीकडे एक डोह आहे आणि त्यात कायम बदके असतात. मग एक जण पाण्यात बदकांवर कसा सूर मारतो आणि बदके उडाली की ते कशी त्यांना बंदुकीने टिपतात, याचे मावशीने रसभरीत वर्णन केले. माधवला हे सगळे भयंकर वाटत होते. त्याने विषय बदलण्याचा एक निष्फळ प्रयत्न करून पाहिला खरा, पण छे! मावशीची बडबड थांबायलाच तयार नव्हती. त्याच्या लक्षात आले की मावशीने आता त्याच्याकडे जवळजवळ दुर्लक्षच केले होते आणि तिचे डोळे त्या खिडकीबाहेर हिरवळीवर खिळले होते. त्या दुर्दैवी घटनेच्या वाढदिवसालाच तो येथे आला, त्याबद्दल त्याने मनातल्या मनात नशिबाला दूषणे देण्यास सुरुवात केली.

‘‘डॉक्टरांनी एकमताने मला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. शिवाय मला तणावमुक्त राहायचे आहे. अतिश्रम टाळायचे आहेत.’’ त्याने थोडक्यात सांगितले. या नुकत्याच ओळख झालेल्या बायांना माझ्या आजारपणात काय रस असणार? ‘‘पण माझ्या डॉक्टरांचे माझ्या आहाराबद्दल एकमत होत नाही, ही माझ्या दृष्टीने चिंतेची बाब आहे...’’ त्याने थोडीशी आणखी माहिती पुरवली.

आलेली जांभई थोपवत मावशी म्हणाली,
‘‘का बरे?’’ त्याच्या दुसऱ्या क्षणीच तिचा चेहरा उजळला. पण ते माधवचे बोलणे ऐकून नाही..

‘‘आले एकदाचे! ’’ ती ओरडली. ‘‘ जेवायच्या आधी आले ते बरे झाले! पाहिलेस ना, चिखलात किती लडबडले आहेत ते!’’

ते ऐकून माधवच्या अंगावर शहारा आला. त्याला क्षणभर त्या मावशीची आणि त्याबरोबर तिच्या भाचीची कीव आली. त्याने भाचीकडे अनुकंपा दर्शवण्यासाठी मृदू नजरेने पाहिले. ती बिचारी भेदरून खिडकीतून बाहेर बघत होती. तिच्या अंगाला बारीकसा कंप सुटल्याचा त्याला भास झाला. तिच्या डोळ्यात मूर्तिमंत भीती उभी होती. माधव गर्रकन वळाला आणि त्याने त्या दिशेला नजर टाकली. संधिप्रकाशात तीन आकृत्या हिरवळीवरून घराकडे चालत येत होत्या. त्यांच्या खांद्याला बंदुका लटकल्या होत्या आणि एक काळा शिकारी कुत्रा त्यांच्या पायात घुटमळत मागे मागे येत होता. ते एकही शब्द न बोलता खिडकीकडे येत होते. तेवढ्यात त्यातील एकाने गाणे गुणगुणण्यास सुरुवात केली आणि माधवाच्या हृदयाचा थरकाप उडाला. त्याने पटकन आपली बॅग उचलली आणि उडी मारून त्याने एका ढांगेत ती खोली पार केली. दुसऱ्या ढांगेत त्याने दरवाजाच्या पायरीवरून खाली उडी मारली. पटांगणात येणाऱ्या एका सायकलला तो जवळजवळ धडकलाच.

‘‘आलोय बरे का आम्ही! ’’ हिरवा कोट घातलेला माणूस खिडकीतून येत म्हणाला.
‘‘मळलोय, पण नेहमीइतके नाही. काय म्हणतेस! आत्ता जो येथून पळून गेला, तो कोण होता?’’

‘‘माधव शारंगपाणी! फक्त त्याच्या आजाराबद्दल बोलत होता बिचारा आणि विचित्र तरी किती. आमचा साधा निरोप न घेता पळून गेला. जणू काही समोर भूतच उभे राहिले आहे. या शहरातील मुलांना ना, अजिबात शिष्टाचार माहीत नाहीत.. जाऊ देत..’’

‘‘मला वाटते आपल्या हाउंडला घाबरला असावा तो.’’ भाची शांतपणे म्हणाली. ‘‘त्यानेच सांगितले मला. त्याच्या मनात कुत्र्यांबद्दल भयंकर भीती दडली आहे. केव्हातरी म्हणे एका स्मशानात त्याच्या मागे भटकी कुत्री लागली होती आणि त्यांनी त्याची पोटरी फाडली होती. तेव्हापासून तो कुत्र्याला भयंकर घाबरतो. त्याला एक रात्र इस्पितळात काढावी लागली होती आणि पोटात ती दुखणारी इंजेक्शने घ्यावी लागली होती. एखाद्याला अवसादात जाण्यास मला वाटते तेवढे कारण पुरेसे असावे...’’

नुकत्याच वयात आलेल्या इरावतीची प्रणयाची कल्पना अजून तरी टवाळी करणे हीच असावी.....

जयंत कुलकर्णी
‘साकी’च्या एका कथेवरून.

प्रचि श्रेयनिर्देश: आंतरजालावरून साभार, प्रताधिकारमुक्त.

श्रीगणेश लेखमाला २०१९

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

4 Sep 2019 - 7:44 am | यशोधरा

कथा आवडली!

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Sep 2019 - 8:34 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडली.. मस्त आहे

पात्रांची नावे मराठमोळी घेतली तरी कथा वाचताना हे भाषांतर आहे हे मधे मधे जाणवत होते.

पैजारबुवा,

mayu4u's picture

5 Sep 2019 - 10:55 am | mayu4u

कथा आवडली.

टर्मीनेटर's picture

4 Sep 2019 - 8:54 am | टर्मीनेटर

इरावती इज ग्रेट 😀 , कथा आवडली!

जालिम लोशन's picture

4 Sep 2019 - 9:18 am | जालिम लोशन

छान

ज्योति अळवणी's picture

4 Sep 2019 - 9:57 am | ज्योति अळवणी

मस्तच

कथा आवडली

जव्हेरगंज's picture

4 Sep 2019 - 12:38 pm | जव्हेरगंज

=))

सुचिता१'s picture

4 Sep 2019 - 12:56 pm | सुचिता१

मस्त! कथा खूप आवडली.. शेवटापर्यंत पकड सुटली नाही.

पद्मावति's picture

4 Sep 2019 - 1:04 pm | पद्मावति

खुप मस्तं :)

प्रशांत's picture

4 Sep 2019 - 1:54 pm | प्रशांत

कथा आवडली

अलकनंदा's picture

4 Sep 2019 - 3:38 pm | अलकनंदा

लबाड इरावती!! :))

कपिलमुनी's picture

4 Sep 2019 - 8:56 pm | कपिलमुनी

छान !

नाखु's picture

4 Sep 2019 - 9:16 pm | नाखु

च्या कुरापती!!

ता क आपला माधव बॅंक मध्ये नोकरीला नाही हे पाहून बरे वाटले,अन्यथा माधवची सोय कायम तिथेच जालमहर्षी अकु काकांनी केली आहे.

सुबक भाषांतर वाचनाचा पंखा वाचकांची पत्रेवाला नाखु

मायमराठी's picture

4 Sep 2019 - 11:01 pm | मायमराठी

"नुकत्याच वयात आलेल्या इरावतीची प्रणयाची कल्पना अजून तरी टवाळी करणे हीच असावी...."
ह्या ओळीपर्यंत सगळी दुनिया सुरळीत होती. ही ओळ वाचून होईपर्यंत सगळं काही बदललेलं होतं. 'आभाळापलीकडले आभाळ...' तसं शब्दांच्या पलीकडले निःशब्द असं काहीतरी हातात गवसल्यासारखं वाटलं. ह्या ओळीला कितीतरी पैलू आहेत, याची मोजणी नाही होऊ शकत. इरावतीलही नेमकं माहीत नसावं, कदाचित लेखकालाही पण कोणत्या वाचकाला कोणत्या अनाहूत क्षणी काय कळून जातं हे नक्की नसतं.
या वाक्यांत सांगितलेलं न सांगितलेलं खूप काही भरलंय तरीही काही उरलंय असं काही लाघवी, अनाघ्रात वगैरे आहे. या वाक्याला, मोगरा ओंजळीतून रिता झाल्यावरही येत राहणारा असा एक स्वयंभू वास आहे. तो घेताना जीव तृप्तीने कासावीस व्हावा असं वाटत राहतं. एकाच वाक्याने विकेट गेल्याचा अनुभव खूप वर्षांनी आला...त्याकरता जयंतजी खूप खूप आभार. असाच अनुभव पुन्हा घ्यायला उत्सुक आहे.

अनुप ढेरे's picture

5 Sep 2019 - 6:09 pm | अनुप ढेरे

सहमत आहे! मला हा अनुवाद वाचुन पुलंनी लिहिलेला खुर्च्या (भाड्याने आणलेल्या) या अनुवादाची आठवण झाली. खुर्च्या... मध्ये ज्या ताकदीने भाषांतर केलं आहे तीच ताकद "नुकत्याच वयात आलेल्या इरावतीची प्रणयाची कल्पना अजून तरी टवाळी करणे हीच असावी...." या वाक्यात दिसते!

लई भारी's picture

12 Sep 2019 - 5:04 pm | लई भारी

मूळ कथा वाचली आणि या शेवटच्या ओळीने तुम्ही काय कमाल साधलीय ते लक्षात आलं!
लाजवाब! आपल्याला तरी अनुवाद जास्त आवडला :-)
अजून लिहा!

प्रचेतस's picture

5 Sep 2019 - 8:08 am | प्रचेतस

नेहमीप्रमाणेच उत्तम.

पियुशा's picture

5 Sep 2019 - 12:36 pm | पियुशा

मस्त !

मदनबाण's picture

6 Sep 2019 - 7:26 pm | मदनबाण

कथा आवडली !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माझा बाप्पा नाचु लागला... :- (Sanket wadekar)

खिलजि's picture

7 Sep 2019 - 5:59 pm | खिलजि

उत्तम कथा, आवडली आहे

तुषार काळभोर's picture

7 Sep 2019 - 9:12 pm | तुषार काळभोर

तुमच्या अनुवाद कथांमुळे नेहमीच उत्तमोत्तम कथा वाचायला मिळतात. तेही "आपल्या" भाषेत अन आपल्या वातावरणात.

धन्यवाद!

लई भारी's picture

12 Sep 2019 - 2:48 pm | लई भारी

आवडली कथा! शेवट एकदम भारी :-)

जॉनविक्क's picture

12 Sep 2019 - 3:15 pm | जॉनविक्क

इरावती ला सन्माननीय मिपासदस्यत्व त्वरित बहाल करावे असा प्रस्ताव मांडतो :)

श्वेता२४'s picture

13 Sep 2019 - 11:13 am | श्वेता२४

शेवट मस्तच

diggi12's picture

15 Sep 2019 - 2:44 pm | diggi12

नाही कळाली

जॉनविक्क's picture

15 Sep 2019 - 2:56 pm | जॉनविक्क

diggi12's picture

15 Sep 2019 - 11:30 pm | diggi12

अब समजा