h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
}
h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
}
p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
}
a: {
color: #990000;
}
a:link {
text-decoration: none;
}
a:hover {
text-decoration: underline;
}
div.chitra {
max-width:600px;
margin: auto;
}
div.chitra1 {
max-width:400px;
margin: auto;
}
div.chitra2 {
max-width:300px;
margin: auto;
}
माननीय मॅडम..
माननीय मॅडम,
मला माफ करा. तशा तुम्ही माझ्या पाल्याच्या हाती 'पालकांची सही आणायला' वेळोवेळी दिलेल्या चिठ्ठ्यांवर मी प्रत्येक वेळी माफीनामा लिहून दिलेला आहेच. पण आज परत एकदा मला माफ करा.
तर माननीय मॅडम, माझा पाल्य माननीय अथर्व हा आपल्या इयत्ता पाचवी, तुकडी 'के'मध्ये शिकत आहे हे आपणांस चांगलेच माहीत आहे. आज काही गोष्टींचा सोक्षमोक्ष लावणे प्राप्त झाले असल्याने हे पत्र लिहिणे भाग पडत आहे. माझे हस्ताक्षर माझा पाल्य मा. अथर्व याच्यावर गेलेले असल्याने मी हे पत्र टंकलिखित स्वरूपात पाठवत आहे. पत्राखालील सही मी स्वहस्ते केली असून ती मा. अथर्वने केलेली नाही, असे मी प्रतिज्ञापूर्वक नमूद करतो.
मा. मॅडम, अपेक्षा हे सर्व दुःखांचे मूळ आहे. एकमेकांबद्दल योग्य त्या अपेक्षा प्रस्थापित केल्यास आपणा दोघांमधील अनेक संघर्ष समूळ टळतील, अशी मला खातरी आहे. प्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो की आमच्या मा. पाल्याचे उत्तम नशीब आणि आमच्या कुलदेवतेची कृपा म्हणून त्याला आपल्या माननीय शाळेत प्रवेश मिळाला. तो आता भविष्यात स्वतःच्या आयुष्यात सर्वोच्चपदी पोहोचेल, याबद्दल आम्हाला तिळमात्र शंका नाही. परंतु आम्ही त्याचे मातापिता हे मात्र तुमच्या मा. शाळेत शिकू न शकल्याने सामान्य मर्त्य नोकरदार पोटार्थीच राहिलो आहोत.
गेल्या वर्षभरात मा. अथर्व याच्या माध्यमातून आपण आमच्याकडे पाठवलेल्या प्रदीर्घ प्रकल्पयादीकडे पाहता आपल्या मनात आमची एक अत्यंत चुकीची प्रतिमा अस्तित्वात आहे, हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो.
मा. मॅडम. मी रसायनशास्त्र विषयात पदवीधर असून एका खाजगी व्यवस्थापनात रसायनशास्त्राशी दूरान्वयानेही संबंध नसलेले काम करतो. आपल्याला जे येत नाही ते करण्याचे कौशल्य उपजीविकेपुरते मी कमावले आहे. परंतु मी शिल्पकार, चित्रकार, लोहार, कुंभार, शिंपी, ज्ञानकोशकार, बल्लवाचार्य या सर्वांची कौशल्ये एकाच वेळी या देही बाळगून असावे अशी अपेक्षा मजकडून करणे योग्य नाही, हे मी नम्रपणे नोंदवू इच्छितो.
'सोदाहरण स्पष्ट करा' हा प्रश्न आपल्या रोजच्या व्यवहारात असेलच. त्यानुसार मी काही उदाहरणे घेऊन माझे म्हणणे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो.
उदाहरणार्थ : वसईचा किल्ला. मॅडम, मी माझ्या पाल्यावर कितीही प्रेम करत असलो आणि त्याच्यावर येणाऱ्या सर्व संकटांपासून त्याचे रक्षण करण्यास कर्तव्यबद्ध असलो, तरी एका रात्रीत वसईचा किल्ला बनवून माझ्या पाल्याबरोबर शाळेत पाठवणे हे माझ्या शक्तीपलीकडचे आहे. सर्व प्रकल्पांतील सर्व वस्तू बनविण्याकरिता घरात उपलब्ध कच्चा मालच वापरावा, या आपण घातलेल्या लेखी बंधनाने तर आम्हाला निद्रानाश जडला आहे. पुठ्ठ्याच्या नळ्या बनवून त्याचे बुरूज, एका बुरुजाला रंगविण्यास खर्ची पडणारी एक जलरंग बाटली.
रात्री शालोपयोगी वस्तूंचे उघडे दुकान शोधून आणलेला बाटल्यांचा स्टॉक. किल्ल्याच्या आसपास झाडे आणि गवत असावे ही आपण दिलेली आणि मा. अथर्व यांना रात्री अकरा वाजता अचानक स्मरलेली सूचना. मग प्रथमोपचार पेटीतला कापूस आणि हिरव्या रंगाच्या एका बाटलीला चाटून पुसून, रंग पुरवून पुरवून किल्ल्याच्या आसपासच्या परिसराचे सामाजिक वनीकरण संपन्न करणे. या सर्वांच्या नंतर तो रंग वाळेस्तोवर एकीकडे स्वतःचे विकीपीडन करीत किल्ल्याचा इतिहास सुमारे ४० (अक्षरी चाळीस) ओळींत लिहिणे याकरिता मुळात माझा अपराध काय झाला हे जाणण्याचा रास्त हक्क मला आहे, हे मी शक्य तितक्या नम्रपणे नोंदवत आहे.
आता आपण स्कॉटलंडच्या सांस्कृतिक पोषाखाकडे येऊ. घरातील वस्त्रे वापरून स्कॉटलंडचा 'ट्रॅडिशनल ड्रेस' बनविणे ही गोष्ट कोणत्या बाजूने आपल्याला शक्य कोटीतली वाटते? माझ्या कै. आजीने मला दिलेला, तिची एकमेव आठवण असलेला आणि मुख्यत्वे अंगावरील पाणी नीट टिपू शकणारा एकमेव असलेला माझा चौकटीचा पंचा या कामी खर्ची पडला. या बलिदानाने फक्त अधरीयाचा प्रश्न संपुष्टात आला. उत्तरीयाची चिंता शिल्लक उरल्याने माझ्या मातोश्रींची लाल रंगाची शाल तुकडे कापून कामी आली. पालकांचे कर्तव्य म्हणून भावभावना दूर ठेवण्यास माझी हरकत नाही. परंतु एवढे सर्व परिधान करुनही मा. अथर्व अर्धवस्त्रांकितच दिसत असल्याने लज्जारक्षणार्थ आतून एक पूर्ण बाह्यांचा सदरा रु. ७५० (अक्षरी सातशे पन्नास मात्र) खर्च करून आणावा लागला. घरातील पादत्राणांपासून स्कॉटिश पादत्राणे बनणे हे प्रभुकृपेने आपोआप घडून येणारे नसल्याने नव्याने रु. १००० (अक्षरी एक हजार मात्र) किमतीचे चामडी बूट आणि गुडघ्यापर्यंतचे मोजे (किं. रु. २००, अक्षरी दोनशे मात्र) आणून पुत्राच्या चरणकमली घालावे लागले.
यानंतर प्रत्यक्ष प्रयोगादिवशी हे सर्व खोगीर चढवून आणि पंचा उर्फ स्कॉटलंडचा पुरुषी स्कर्ट घसरू नये म्हणून १२ (अक्षरी बारा) ठिकाणी सुरक्षापिना लावून त्याला सुखरूप शाळेत पोहोचता करणे इथवर सोसलेले सर्व सुसह्य झालेही असते. तथापि त्या कार्यक्रमात मा. अथर्व हा कोळीनृत्याचा ड्रेस घालून आला आहे असे अवमानकारक उदगार आपण रंगमंचामागे काढल्याचे कळल्याने आता हे सहन करणे अशक्य झाले आहे.
आपण तूर्तास खालीलपैकी एक पर्याय स्वीकारावा, अशी नम्र सूचना.
अ. स्कॉटलंड, न्यूझीलंड, इजिप्त या देशांच्या संस्कृती बाजूला ठेवून भारतीय संस्कृतीकडे लक्ष केंद्रित करावे.
ब. पालकांना नाटक कंपनीच्या पुरवठादारांकडून भाड्याने कपडे आणण्याची परवानगी द्यावी.
मा. अथर्व यास गरीब शेतकरी बनवण्याबाबत हाच प्रकार घडला, हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. वेशभूषेबद्दलच्या आपल्या तोंडी व लेखी सूचना पाळणे प्राप्त झाल्याने माझ्या पाल्यास गरीब शेतकरी बनवण्यासाठी मला त्याचा नवाकोरा उत्तम बनियन धुळीत मळवून जागोजागी फाडावा लागला आणि धोतर घरात नसल्याने नव्याने रु. ३०० (अक्षरी तीनशे मात्र) इतक्या किमतीचे खरीदून आणवावे लागले. ते अर्थातच गरिबास शोभून दिसत नसल्याने माझ्या पाल्याच्या आजीस त्यावर तीन तास खपून कृत्रिम ठिगळे शिवून द्यावी लागली. एकंदरीत माझ्या पाल्यास गरीब बनवणे हे मजसाठी बरेच खर्चीक ठरले.
या परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्याकरिता मी खालील सूचना करत आहे.
अ. गरीब शेतकऱ्याचे कपडे खरेदी केल्याच्या दिवशी बिनठिगळांचे आणि शुभ्र रंगाचे असू शकतात हे लक्षात घेऊन शालेय स्नेहसंमेलनाचा दिवस हाच गरीब शेतकऱ्याचा नूतन वस्त्र खरेदीदिन म्हणून दाखविण्याबाबत बदल स्क्रिप्टमध्ये करणे.
ब. नाटकातील शेतकरी बागायतदार, श्रीमंत, मोटार आणि बंगलायुक्त निवडणे.
पर्यावरणाच्या प्रश्नाविषयी मला पुरेशी आस्था आहे. माझ्या इच्छेनुसार आणि शक्त्यनुसार मी पर्यावरण रक्षणास आजीवन हातभार लावीन असे मी आपणांस आश्वासन देत आहे. परंतु जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या अशा या कामातील माझ्या वाट्याचे स्वरूप मा. अथर्व याला पृथ्वीदिनाच्या दिवशी आम्रवृक्ष, वांगे अथवा सर्प बनवून शाळेत पोहोचवणे याखेरीज अन्य स्वरूपाचे असल्यास मी उपकृत होईन. ते शक्य नसल्यास माझ्या पाल्यास पर्यावरणाच्या ऱ्हासास कारण असलेला मनुष्यप्राणी बनवून पाठवण्याचा उ:शाप मिळाल्यासही मला काहीसा आनंद होईन. मात्र हा मनुष्यप्राणी शक्यतो आधुनिक काळातला, आधुनिक पेहरावातील असावा आणि अश्मयुगीन, आदिमानव, क्रूमग्न किंवा निंदरथळ मनुष्य नसावा, ही विनंती.
सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या डब्यात चौरस आहार आणावा ही आपली मागणी वंदनीय एवं सर्वार्थांनी प्रातःस्मरणीय आहे. हिरवी भाजी, पोळी, भात, डाळ आणि कोशिंबीर अशा विविध डब्यांनी भरलेली एक पिशवी, चित्रकला आणि हस्तव्यवसायाचे सामान यासाठी आणखी एक पिशवी, तसेच मुदलातली वह्यापुस्तकांची मुख्य थैली या सर्वांस वाहून नेताना आपसूक विद्यार्थ्याचे बलवर्धनही व्हावे ही आपली इच्छा स्तुत्यच आहे. परंतु त्यांच्या स्वैपाकी पालकांच्या आरोग्याच्या हितासाठी खालील सूचनांपैकी कोणत्याही दोन पाळण्याबद्दल विचार व्हावा. (२ गुण)
अ. शाळेची वेळ सकाळी आठऐवजी दुपारी बारा अशी करावी.
ब. हिरव्या भाजीऐवजी क्वचित पिवळी भाजी चालवून घ्यावी.
क. ठरावीक महिन्यांनंतर डब्यात दिलेल्या विविध आहारातील पोषक घटक, जीवनसत्त्वे, प्रथिने आणि त्यांचे प्रमाण व आरोग्यास फायदे यांवर सुमारे पन्नास ओळींत लिहून आणणेतून सवलत द्यावी.
माझा पाल्य मा. अथर्व हा काही अनुवांशिक कारणांमुळे वर्गातील अन्य मुलांमध्ये काही गुणांबाबत अधिक उठून दिसत असू शकतो, हे मला मान्य आहे. माझ्या मा. पाल्याचे हे गुण कमी-जास्त प्रमाणात 'उपद्रव' या सदरात मोडणारे असू शकतात, याचीही मला पूर्ण जाणीव आहे. त्याकरिता वेळोवेळी मला किंवा माझ्या पत्नीस अथवा दोघांना एकत्र अशा वेगवेगळ्या प्रकारे आपली भेट घ्यावयास बोलावणे हा आपला पदसिद्ध अधिकार मला मान्य आहे.
तथापि वयानुसार मी रक्तदाबाचा एक रुग्ण आहे, हे लक्षात घेऊन आपल्याला भेटायला येण्याचे निमंत्रण पाल्यासोबत देताना आपण मानवतेच्या दृष्टीने खालील बदल करावेत, ही विनंती.
अ. निव्वळ निमंत्रण न देता किमान संक्षिप्त रूपात का होईना, पण भेटीचे कारण चिठ्ठीत नोंदवल्यास आपला अत्यंत ऋणी राहीन. रहस्यमयता, भय आणि गूढता हे रस कादंबरीतअथवा चित्रपटाच्या कथानकात रोचक असले, तरी पालकावस्थेत ते आरोग्यास बरे नव्हेत. संकटाचे मान आणि तापमान नक्की काय आहे याचा आगाऊ अंदाज मिळाल्यास योग्य ती मोर्चेबांधणी करून प्रसंगास सादर होणे हे रक्तदाबाच्या व्यवस्थापनासाठी सोयीचे पडते.
ब. आपल्या भेटीसाठी दुपारी साडेतीन ही कार्यालयीन किटाणूवत नोकरदार वर्गासाठी सर्वाधिक गैरसोयीची ठरणारी घटिका वगळता अन्य वेळ जाहीर करत जावी. ही वेळ बदलून देण्याची नम्र विनंती आम्ही केल्यास आमचा पाल्य ही आमच्यासाठी नोकरीपेक्षा जास्त अर्थात सर्वोच्च प्राथमिकता नसल्याबद्दल शेरा देण्याचे टाळण्याचा प्रयत्न करावा. सर्वांच्या नशिबात शहरातील खाजगी शाळेत शिक्षकाची नोकरी मिळण्याइतके उच्च ग्रह नसतात, हे समजून घ्यावे.
मी फार सूचना करीत आहे याची मला जाणीव आहे. परंतु उपरोक्त त्रिविध तापपीडांनी मला या पत्रलेखनास उद्युक्त केले आहे, हे आपण समजून घ्याल अशी खातरी आहे. शिवाय मी सदरहू पत्राचे टंकन शनिवारी रात्री काहीसा मोकळा वेळ मिळाल्याने आणि आत्मविश्वासास वर्धित करणाऱ्या काही विशिष्ट परिस्थितीस प्राप्त झाल्याने करत आहे. सोमवारी सकाळी मी याच पत्राचे पुनर्वाचन आणि मुद्रितशोधन करून, तसेच माझ्या सद्य आत्मविश्वासाचे पुनरावलोकन करून माझा पाल्य मा. अथर्व याजसोबत आपल्याला पोचते करण्याबाबत तत्कालयोग्य तो निर्णय घेईन.
कलोआ.
आपला नित्य क्षमाप्रार्थी,
मा. अथर्वचा पिता.
(संगणकजनित पत्र, स्वाक्षरीची आवश्यकता नाही.)
चित्र श्रेयनिर्देश: चित्रगुप्त
प्रतिक्रिया
16 Sep 2019 - 3:16 pm | नूतन
खुमासदार! आवडला
17 Sep 2019 - 4:56 pm | प्राची अश्विनी
खुसखुशीत लेख. हीच परिस्थिती आहे सर्वत्र.