२७ डिसेंबरची ती संध्याकाळ आम्हा चौघांच्या आयुष्यातील संस्मरणीय सोनेरी किरणांनी सजली , 'वेलकम टू कन्याकुमारी या अक्षरांची कमान पाहताना गेल्या तेरा दिवसाचा सायकल प्रवास नकळत डोळ्यासमोर ओझरता वाहू लागला गेली दोन आठवडे या ठिकाणाची अनामिक ओढ लागली होती , त्या ओढीनेच पॅडेलवर फिरणारे पाय थकले नव्हते कि चार राज्याच्या प्रवासातून शरिर थकले नव्हते , निसर्गाच्या सानिध्यात आधीच ताजेतवाने झालेले मन आता जल्लोष करण्यासाठी आतूर झाले होते .
ही गोष्ट आहे चार वेड्या भटक्यांची , १५०० किमी सायकल प्रवासाची , जंगलाच्या गंभीरतेची आणि सागराच्या धुंद लाटांची . येस वूई डीड इट ...........
केड्या च्या सुपिक डोक्यात पुणे कन्याकुमारी सायकल राईड करायची असा विचार आला आणि त्याने तो बोलून दाखविला आणि कन्याकुमारीचे वारे डोक्यात घूमू लागले ,गेल्या दोन वर्षात या ना त्या कारणाने डिसेंबर ची कन्याकुमारी सायकल राईड रद्द होत होती , या वर्षी तिला हिरवा कंदील मिळाला ,आता नव्या भिडूंबरोबर का होईना ही सायकल सफर सुरु होणार होती. प्रशांत ,संग्राम ,शैलेश आणि मी चौघांचा संघ मोहीमेसाठी सज्ज झाला. तसे गेल्या वर्षी पुणे कोकण गोवा अशी समुद्राच्या बाजूने अमित ,केदार च्या साथीने केलेल्या सायकल राईड मुळे खूप दिवसांचा सायकल दौरा शक्य आहे एवढा आत्मविश्वास होता शिवाय अधून मधून सायकल सायकल समुहाच्या भिडूबरोबर केलेल्या ५० ते १०० किमीच्या राईडस मुळे तयारीही होत होती . क्न्याकुमारी सफरीची वेळ जवळ आल्यावर मात्र आवश्यक त्या गोष्टी आचरणात आणल्या ज्यात पौष्टीक खाणे,योग्य प्रमाणात पाणी पिणे , छोट्या अंतराच्या का होईना पण नियमित सायकल राईड करणे हे ओघाने आले होते .
दिवस पहिला - पुणे कराड
१५ डिसेंबर ची पहाट ,डोळ्यात पुणे कन्याकुमारी सायकल सफरीचे स्वप्न घेवून झोपेतून जाग आली. सायकल बॅग आणि बाकीची तयारी रात्रीच करुन ठेवली होती त्यामूळे सकाळी फक्त अत्यावश्यक विधी उरकून आणि बायकोने सकाळी उठून बनवलेला नाष्टा हादडून मी सायकलवर बसलो .वडगावच्या पुलाखाली भेटायचे असे ठरले होते, आमच्या सायकल सायकल समुहाच्या इतर सदस्यानाही या सफरीचे भलते कुतूहल होते, मी तिथे पोहचण्याआधी मोदक आणि सागर (समुहाचा एकमेव पहाटेचा रायडर - कारण हा उजेड पडायच्या आत राईड करुन घरी पोहचतो) आम्हाला निरोप देण्यासाठी हजर होते . हळू हळू या गँग मध्ये केदार, अनूप ही मंडळीही सामिल झाली . तेवढ्यात आमचे सायकलवरुन मुख्य रायडर क्र २-आबा उर्फ संग्राम सायकलवरुन आला ज्याच्यामागे त्याची अर्धांगिनी आणि त्याची गोड मुलगीही त्याला निरोप द्यायला वडगाव पूलापर्येंत आल्या होत्या. जरा गप्पा टप्पा आणि चहापानाचा कार्यक्राम चालू झाला . याच दरम्यान आमच्या सायकल समुहाचे प्रेरणास्थान असलेला सिध्दूने ६०० किमीच्या बीआरएम साठी सायकलींग सुरु केले होते. आम्हाला रस्त्यावर पाहून तो ही थांबला थोड्याशा गप्पा टप्पा करत त्याच्याकडचे एक छानसे ब्लिंकर संग्राम ला देवून तो बीआरएम ६०० किमी साठी मार्गस्थ झाला. अजूनही आमचे दोन रायडर पिंपरी चिंचवड वरुन येणार होते , त्यांना वेळ होणार हे अपेक्षित होते पण जास्त वेळ होणार हे अपेक्षित नव्हते . अखेर तेही उगवले रायडर क्र ३ प्रशांत उर्फ सरपंच आणि रायडर क्र ४ शैलेश उर्फ पीटर साधारण ७ च्या दरम्यान पोहचले समुहाचे अजून एक सद्स्य उत्तेकर आणि आबांचे मित्र सचिन, प्रसादसुद्धा निरोप द्यायला पोहचले. आणि थोडावेळ फोटोसेशन करुन आम्ही चौघे सायकलवर स्वार झालो.
कात्रज च्या दिशेने चार सायकल ,त्यावर बसलेले भटके आजच्या प्रवासाचा विचार करत घाट चढू लागले , सकाळच्या उत्साहात घाट सहज पार करत बोगद्यापर्यंत पोहचलो.
तिथेही फोटोसेशन करुन आजचा १६० कीमी चा प्रवास असाच निवांत करु असा बेत करुन पुढे सरकत राहिलो. बोगद्यानंतर पुढे काही अंतर हलकासा उतार असल्याने सायकल चांगल्या वेगाने धावते याचा अनुभव याआधी होता त्यामूळे इकडे सायकल रेमटवत म्हणता म्हणता शिवापूर टोलनाका ही ओलांडला . पुढे खंबाटकीच्या ८-१० किमी आधी राजगड नावाच्या हॉटेलवजा टपरीवर मस्त मिसळ चेपली , चहा मारुन त्याच उत्साहात खंबाटकी पायथा गाठला .
आतापर्यंतच्या राईडमध्ये सर्वात चांगली गोष्ट ही होत होती कि सर्वांचा सायकल चालवण्याचा वेग जवळपास सारख होता त्यामुळे कोणीही नजरेआड जाईपर्यंत पुढे किंवा मागे राहत नव्हते. खंबाटकी घाट तसा कठीण नाही पण जास्त उन्हात आणि जड वाहनांच्या वर्दळीत वेळ खाऊ शकतो म्हणून उन डोक्यावर पडायच्या आत तो पुर्ण करायचा अस ठरवलेले होते त्याप्रमाणे घडलेही. घाटमाथ्याच्या जरासे आधी डाव्या बाजूला दत्तमंदीराशेजारील विहीरीतून मिळालेल्या थंड पाण्यामुळे फारच ताजेतवाने झाल्यासारखे वाटले.
आता आम्ही खरोखर सायकलींगच्या मूड मध्ये पोहचलो होतो, खंबाटकिचा उतारावर पक्ष्याप्रमाणे घिरक्या हाणत सुरुर फाटा गाठला , पुढे हसत खेळत,फोटोग्राफी , नदी आणि डोंगर बघत सधारण २० किमी वर असलेल्या साता-यात पोहचलो. एव्हाना पोटात कावळे ओरडायला चालू होते. चूल आनंद नावाच्या हॉटेलात शिरुन पनीर बटर आणि इतर भाज्यावर यथेच्छ ताव मारला.
उर्जेचा पुरवठा झाल्याने शरिर पुन्हा सायकलींग साठी सज्ज झाले. पुणे बंगलोर हा महामार्ग चांगला रुंद आणि चांगल्या स्थितीत असल्याने सायकलींग सुसह्य होते, दूपारी थोडासा उन्हाचा कोप सोडला तर बाकी सर्व गोष्टी अनुकूल झाल्या होत्या, मसूर टोल नाक्यावर चहा साठी १५ मीनिटे थांबून संधीप्रकाशात आम्ही कराड मध्ये पोहचलो .
पहिल्या दिवस अखेर अपेक्षित १६० किमी चा टप्पा ओलांडल्याचे समधान सर्वांच्या चेह-यावर दिसत होते , हॉटेलसाठी फारशी शोधाशोध न करता जवळच दिसलेल्या हॉटेल पंकज मध्ये शिरलो .
थोडासा आराम आणि आंघोळ आटोपली. रात्री तिथेच पवन केटरिंग वाल्यांची गुजराती व्हेज थाळी दिसली ज्यात गाजर हलवा , खीर असा जीभेचे चोचले पुरविणारा जिन्नस मिळाल्याने मंडळी खूष झाली .
भरपेट भोजनाचा आस्वाद घेत गप्पांची रंगत वाढली. रात्री झोप यायची वाट पहावी लागली नाही , बेडवर आडवे होताच समाधी लागली आणि पहिल्या दिवसाचा प्रवास ओघात पुर्ण झाला.
प्रतिक्रिया
20 Feb 2019 - 3:12 am | फारएन्ड
लिहा पुढे वाचतोय. पुणे - कराड म्हणजे बरेच झाले एका दिवसात.
21 Feb 2019 - 7:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चक्क, पीटूकेचं वर्णन आलं पाहुन डोळे भरून आले. बाय द वे पहिला भाग सुरेख झाला. सायकल प्रवास वर्णन ओघवते आहे, वाचायचा कंटाळा आला नाही. आभार.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
-दिलीप बिरुटे
21 Feb 2019 - 9:02 pm | प्रसाद_१९८२
छान लिहिलेय.
पु.भा.प्र.
--
फोटो मात्र एकही दिसला नाही.
22 Feb 2019 - 4:15 am | कंजूस
वा!
१६० किमीला साधारण किती तास? भिडु मागेपुढे राहिल्याने चालवताना गप्पा होत नसतील.
परतीचा प्रवास सायकलने केला तर ३००० किमी होतील!
दहातले चार फोटो नाही दिसत.
22 Feb 2019 - 11:43 am | प्रशांत
कराडला पोहचायला १२ तास लागले त्यापैकी ८ तासात सायकल चालवली.
परतीचा प्रवास रेल्वे ने केला.
गप्पा टप्पा रस्त्याच्या कडेला थांबुनच मारायचो. समांतर सायकल चालवल्यास अपघात होण्याची शक्यता वाढते त्यामुळे सायकलिंग करतांना टाळायचो.
22 Feb 2019 - 4:16 am | कंजूस
सहल आवडू लागली आहे.
22 Feb 2019 - 11:26 am | चंबा मुतनाळ
22 Feb 2019 - 11:51 am | शैलेन्द्र
जोरदार लिखाण, बहारदार फोटो..
22 Feb 2019 - 12:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं सफरवर्णन आणि फोटो ! मला सगळे फोटो छान दिसत आहेत.
खूप वेळ लावला धागा टाकायला... आता पुढचे भाग पटपट टाका.
22 Feb 2019 - 1:10 pm | यशोधरा
वा, छान प्रवासवर्णन! आले एकदाचे, धन्यवाद!
पटपट लिहा आता पुढचे भाग.
22 Feb 2019 - 2:03 pm | कंजूस
आता दिसत आहेत सर्व फोटो.
शेवटचा आवडला. बाकी ते एलिवेशन गेन वगैरे बऱ्याच अॅप्सचं गंडतंच. किंवा १८५३ एम यातून काही वेगळाच अर्थ निघत असावा. तिनशे मिटर्सचे चढाव सहा वेळा चढल्यास त्याची बेरीज १८०० मिटर्स. हे एक कामच ठरतं सायकलिंगमध्ये.
22 Feb 2019 - 2:43 pm | mayu4u
मस्त सफर आणि भारी वर्णन! पु भा प्र
22 Feb 2019 - 5:45 pm | चौथा कोनाडा
वाह, बहारदार सायाकल टूर !
वृतांत आणि फोटो आवडले ( रस्तांचे, आजू बाजूच्या निसर्गाचे जास्त फोटो टाका, ही लेखमाला आणखी भारी हो ईल.
पुढिल भाग लवकर टाका ..... वाट पहातोय !
22 Feb 2019 - 5:59 pm | देशपांडेमामा
आला आला धागा आला !! मस्त सुरवात झालीये .पुढचे भाग पटापट येऊ द्या
देश
23 Feb 2019 - 12:57 pm | दुर्गविहारी
गावी येउन संपर्क न केल्याबद्दल णिषेध. बाकी पुढच्या वेळी पंकजच्या थाळीपेक्षा कराड- चिपळूण रोडवर शिवराय ढाब्यावर आख्खा मसुर खाउन पहा. जगात भारी.
बाकी पुढचे भाग वाचायला आवडतील. पु.ले.शु.
26 Feb 2019 - 2:47 pm | ज्ञानोबाचे पैजार
कराडात खायचे ऑपशन्स खुप आहेत,
सोमवार पेठेतले स्थालीपाक हा पण चांगला पर्याय आहे, टोलनाक्याच्या अलीकडचा गणेश धाबा किंवा खुशबु धाबा घाटावर आंबोळी खायची मज्जाच वेगळी.
पैजारबुवा,
23 Feb 2019 - 2:39 pm | किरण कुमार
सर्वांचे आभार , संपादनासाठी आणि फोटोसाठी ( लेखातील ररायरा) सरपंच उर्फ श्री प्रशांत तायडे यांना धन्यवाद.
23 Feb 2019 - 7:29 pm | सुधीर कांदळकर
सर्वांचा सायकल चालवण्याचा वेग जवळपास सारख होता त्यामुळे कोणीही नजरेआड जाईपर्यंत पुढे किंवा मागे राहत नव्हते.
हे आवडले. बाकीचे प्रवासवर्णनही छान. खाद्यवर्णन, खाद्यचित्रे सुरेख आणि क्षुधावर्धक.
पुभाप्र
25 Feb 2019 - 5:34 pm | प्रशांत
शुक्रवारी चार वाजता गुरुजींचा ग्रुप वर मेसेज आला की उद्या सकाळी सहा वाजता आपण सायकलिंग करायला सुरुवात करूया तरी सर्वांनी वडगावला वेळेत पोहोचावे .
ऑफिसातील कामे संपवत असताना असे लक्षात आले की घरी पोहोचायला किमान आठ तरी वाजतील त्यानंतर जेवण आणि पॅकिंग करणे म्हणजे झोपायला उशीर होईल, त्यात सकाळी सहा वाजता वडगावला पोहोचायचे म्हणजे सकाळी पाचला सायकल सुरू करावी लागेल. पुरेशी झोप होणार नाही म्हणून राईड थोडी उशिरा करावी का म्हणून डोक्यात विचार आला आणि तिघांना फोनाफोनी केली.
"अरे मला घरी पोहोचायला उशीर होईल, किमान दहा तरी वाचतील आपण सकाळी साडेसहा वाजता वडगाववरून राईड सुरू करायची का" - इती आबा
"अहो मी कार चालवत आहे चिंचवडला पोहोचायला अजून वीस मिनिट लागतील.
पिंपळे सौदागर ला मित्राकडे राहणार आहे तिथून वडगाव किती लांब आहे? " - इति शैलेश (एरोलीचा पीटर सगान)
"तुम्ही सर्व वेळवर येणार नाही म्हटल्यावर मी वडागावला जाऊन काय करू? या आता कधी येता ते, उद्या सकाळी निघाले की मला फोन करा" - इति गुरुजी
तेवढ्यात उत्तेकर साहेबांचा फोन आला, उद्या सकाळी किती वाजता निघणार आणि राईड कुठून सुरुवात करणार याबद्दल चौकशी केली व वडगाव पर्यंत तुमच्यासोबत सायकलिंग करत येतो असे सांगितले. त्याच्या सोबत बोलताना एक आयडीयाची कल्पना आली "वडगाव पर्यंत टेम्पोने गेलो तर?"
त्यावर उत्तेकर साहेब म्हणाले हरकत नाही, ड्रायव्हर आहे आपण सकाळी साडेसहा वाजता निघूया. मग लगेच पीटरला फोन केला आणि त्याला सांगितले की आपण टेम्पोने वडगाव पर्यंत जाऊ, सकाळी साडे सहा वाजता तु शिवार गार्डन चौकातून भेट. हे ऐकून एक तास जास्त आराम करता येईल या आशेने शैलेश जरा सुखावला कारण शुक्रवारी दिवसभर ऑफिस त्यात एरोलीते चिंचवड ड्रायव्हिंग.
जेवण झाल्यानंतर वरील सामान बॅगमधे भरुन बॅग सायकलवर बांधली.
सकाळी तयारी करून साडेसहा वाजता काळेवाडी चौकात जायला निघालो.
ड्रायव्हर नाही भेटला म्हणून उत्तेकर साहेब स्वतः टेम्पो चालवत आले पुढे शिवार चौकातून शैलेशला सोबत घेतले आणि विशाल नगरला जाऊन चहा घेतला कारण ड्रायव्हर तिथे येणार होता. ड्रायव्हर येताच आम्ही वडगाव कडे निघालो निघालो
वडगावला सगळी मंडळी जमली होती वर गुरुजींनी लेखात असे सांगितले आहे.
गुरुजी एक किस्सा सांगायला विसरले, शिवापूर टोल नाक्याला मिसळ खायला थांबलो होतो तेथे गुरुजींना किस्सा सांगितला तो त्यांच्या शब्दात
"अरे जर्सीचा फायदा झाला आज, जर्सीवरील नाव वाचून एका बाईकवाल्याने "किरण" नावाने हाक दिली आणि विचारले की तुमचे पॉकेट हरवलाय का? मी लगेच जर्सीच्या खिशात बघितलं तर पॉकेट नव्हते, कात्रज बोगद्याच्या अलीकडे फोटो काढायला थांबलो तिथे पाकीट पडलं असावं"
25 Feb 2019 - 7:52 pm | मोदक
आता आबा आणि पीटरचे वर्जन पण येऊद्या..!!
भारी वर्णन आणि सफर... पुभाप्र.
26 Feb 2019 - 2:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं जोडवर्णन. मुकुट खास आवडला ! :)
25 Feb 2019 - 6:17 pm | अभ्या..
वा. भारीच स्टोरी आहे की ह्या व्हेंचरमागे. फोटो मस्त आलेत.
26 Feb 2019 - 10:49 am | ओम शतानन्द
सुंदर आणि उत्कंठावर्धक , पुढील भाग वाचायची उत्सुकता आहे , या बरोबर सायकलिंग विषयी अधिक माहिती द्यावी
26 Feb 2019 - 3:56 pm | प्रशांत
कशा संदर्भात माहिती हवी?
सायकलची निवड कशी करावी आणि काय काय काळजी घ्यावी यावर मोदकदादा आणि सागर यांनी माहिती दिलि आहे
एका सायकल चा शोध... - सागर
सायकलींग करताना.. मोदक
26 Feb 2019 - 9:02 pm | झेन
प्रवास आणि वर्णन सहज सुंदर. एका दीवसात १६० किलोमीटर इतक सहज वाटतय.
7 Mar 2019 - 7:44 pm | अर्धवटराव
भले शाबास !!
29 Mar 2019 - 3:26 pm | झिंगाट
तुमचं सामान सायकल ला कसे बांधता त्याचे फोटो असतील तर येऊ द्या...
मी एकदिवसीय राईड केल्या आहेत.
त्यात सगळं समान सॅक मध्ये टाकून सॅक पाठीवर वागवतो..
मोठ्या राईड ला काय करायचे?
29 Mar 2019 - 5:25 pm | प्रशांत
मी आणि संग्रामने सॅडल बॅग वाप्र वापरली होती
17 Apr 2019 - 9:13 am | देशपांडेमामा
जरा लवकर लिहा हो . एवढा मोठा पल्ला सहज हसत खेळत मारला आणि इथे टाकायला किती वेळ लावताय
हा भाग किरण गुरुजींच्या भागाला डकवा म्हणजे एक सलग वाचता येईल
देश