सिम्पल इज ब्यूटिफुल !!! - बंडू गोरे भोजनालय, वाई

सरनौबत's picture
सरनौबत in जनातलं, मनातलं
15 Feb 2019 - 7:46 pm

महाबळेश्वरला २-३ दिवस ग्रील्ड सँडविच, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि पंजाबी जेवणावर यथेच्छ ताव मारल्यावर कधी एकदा पुण्याला घरी जाऊन वरण -भात खातोय असं होतं. असंच एकदा ट्रीप संपवून सकाळी उशिरा पुण्याला परत जायला निघालो. संकष्टी चतुर्थी होती म्हणून वाटेत वाईला महागणपतीच्या दर्शनाला थांबलो. १ वाजून गेला होता आणि एव्हाना पोटात कावळे चांगलेच कोकलत होते. चौकशी केल्यावर 'बंडू गोरे खानावळीत' घरगुती जेवण मिळतं असं समजलं. मंदिरापासून अगदी जवळ आहे म्हणून तिकडे मोर्चा वळवला.

‘खानावळ’ ह्या नावाला अजिबात न शोभणारी स्वछता आणि टापटीप दिसत होती. स्वयंपाकघराच्या दिशेने आमटीचा सुंदर वास आला आणि पोटातील कावळे बोंबलून बाहेर येतील कि काय अशी भीती वाटायला लागली. सुदैवाने लगेचच 'थाळी' आली.

आता अनेक ठिकाणी 'महाराष्ट्रीयन थाळी' असं नाव देऊन 'हराभरा कबाब पासून रशियन सॅलड'पर्यंत काय वाट्टेल ते वाढतात. असली फालतुगिरी इकडे अजिबात नाही. साधंच पण चविष्ट जेवण. चिंच-गूळ घातलेली आमटी, खमंग काकडी, दोन भाज्या, दाण्याची चटणी आणि अक्षरशः जीव ओवाळून टाकाव्या अश्या सुंदर घडीच्या पोळ्या! थाळी देणाऱ्या रेस्टारंटसना मला नेहेमी सांगावसं वाटतं कि 'बाबांनो, ताटातल्या १०-१२ पैकी २-३ वाट्या कमी असल्या तरी चालतील पण पोळ्या चांगल्या प्रतीच्या देत जा'. पोळ्या छान असतील तर निम्मं पोट त्यातच भरतं.

मला वांग्याची भाजी फारशी आवडत नाही - मात्र बंडू गोरेंकडे वांग्याची भाजी असल्यास न चुकता खातो. एक तर कृष्णाकाठची चवदार वांगी, त्यात बंडू गोरेंचा घरचा स्पेशल गोडा मसाला आणि त्यांच्या कसबी आचाऱ्यांच्या हातची चव!

साधंच पण उत्तम महाराष्ट्रीय जेवण जेवायचे असल्यास एकदा नक्की भेट द्या. मात्र आपले वाहन महागणपतीच्या पार्किंग मध्ये लावा. मंदिरात जाऊन 'आज वांग्याची भाजी असू दे' असा नवस बोलून मग जेवायला जा. नशीबवान असाल तर वांग्याची भाजी मिळेलही; आणि समजा नसली तरी चटणी-कोशिंबिरीपासून प्रत्येक गोष्ट चवदार आहे- त्यामुळे वांग्याच्या भाजीसाठी पुढच्या वेळी नशीब आजमावा.
.
.
.
Bandu

Plate
.
.
.
सरनौबत

पारंपरिक पाककृतीआस्वाद

प्रतिक्रिया

उपेक्षित's picture

15 Feb 2019 - 8:00 pm | उपेक्षित

नोंद करून ठेवली आहे, धन्यवाद

धन्यवाद. गेल्यास भेट दिली जाईल.

अगदी हेच सर्व गुण सेम टु सेम असणारी साधले मेस, सावंतवाडी ही अत्यंत आवडती जागा.

सरनौबत's picture

15 Feb 2019 - 8:58 pm | सरनौबत

धन्यवाद. सावंतवाडीस गेल्यास नक्की भेट देण्यात येईल

गोरगावलेकर's picture

15 Feb 2019 - 9:30 pm | गोरगावलेकर

माझ्या कोंकण-गोवा सहलीत साधले मेसची चव चाखली आहे. पत्ता व फोटो खालील लिंकवर बघता येतील .
https://photos.app.goo.gl/6f9KqhZDjmTCBXbS8

टवाळ कार्टा's picture

15 Feb 2019 - 9:41 pm | टवाळ कार्टा

जळवा च्यायला

कंजूस's picture

16 Feb 2019 - 6:30 am | कंजूस

छान!


--------
कृष्णा नदीवर धोम धरण झालं आणि वाईची झाली काशी. नदीचं झालं डबकं.

चौथा कोनाडा's picture

28 Feb 2019 - 5:10 pm | चौथा कोनाडा

हे पंधरपुरच्या आमच्या भी मा नदीलाही लागू होतं.

बंडू गोरे कडे दोन तीनदा जाणं झालं आहे. जेवण साधंच पण चवदार आहे, आमटी अत्युकृष्ट. मात्र काहीसं ओव्हरप्राइस्ड आहे. नरसोबा वाडीतल्या घरगुती जेवणांमध्ये जो अगत्यपणा, आग्रह मिळतो तो बंडू गोरेकडे फारसा मिळत नाही.

उपेक्षित's picture

16 Feb 2019 - 12:50 pm | उपेक्षित

वाडीच्या बाबतीत 100% सहमत वल्ली,

सोमण यांच्याकडे घरातले करणार नाही असा आग्रह असतो अगदी गरम पोळी आहे घ्या हो काही होत नाही इतपत.

बाकी गोरे (वाई) यांचा अनुभव नाही so आपला पास.

मराठी_माणूस's picture

16 Feb 2019 - 2:53 pm | मराठी_माणूस

मस्त जेवण.

चाणक्य's picture

17 Feb 2019 - 9:26 pm | चाणक्य

जाण्यात येईल.

समीरसूर's picture

18 Feb 2019 - 11:30 am | समीरसूर

वाचून आणि फोटो पाहून डेंजर भूक लागलीये. असं साधं मराठी पद्धतीचं जेवण मला खूप आवडतं. म्हणूनच पुण्यात जनसेवा माझ्या खास आवडीचं आहे. श्रेयस आणि दुर्वांकुरमध्ये ती मजा नाही.

खंडेराव's picture

19 Feb 2019 - 1:27 pm | खंडेराव

श्रेयस दुर्वांकुर आणि तत्सम इतर ठिकाणाची जेवणे बिलकुलच घरगुती वाटत नाही. टिळक रोड च्या बादशाहीत जेवणही मस्त आणि बऱ्याच वेळा घरगुती आग्रहाने खाऊ घालतात.

फार चविष्ट जेवण असत इथे, एरवी न आवडणार्‍या भाज्यापण यांच्या इथे चविष्ट लागतात

चौकटराजा's picture

24 Feb 2019 - 9:13 pm | चौकटराजा

१९७९ मध्ये बंडू गोरे व मी यांनी " भोवरा " या नाटकात राज्य नाट्य स्पर्धेत एकत्र काम केले होते . त्यानंतर त्यांचा माझा संपर्क नाही . मुख्य म्हणजे वाईला साडेपाच वर्षे राहून मी या मित्राच्या भोजनालयात एकदाही जेवलो नाही ! १९७५ च्या आणीबाणी ते तुरूंगात होते .

चौथा कोनाडा's picture

8 May 2019 - 5:26 pm | चौथा कोनाडा

+१

भारी आहात तुम्ही दोघेही !

जालिम लोशन's picture

14 May 2019 - 12:23 am | जालिम लोशन

त्यांना जावुन पण बरीच वर्ष झाली.

बोलघेवडा's picture

11 May 2019 - 7:48 pm | बोलघेवडा

याच धर्तीवर, पुण्यातल आपटे रोडवरच "आशा डायनिंग हॉल" अतिशय आवडतं ठिकाण.

चौथा कोनाडा's picture

13 May 2019 - 10:37 pm | चौथा कोनाडा

येस, काही वर्शांपुर्वी आशाला जेवण्याचे बरेच योग आले ! तिथला भात मला ज्याम आवडायचा.
आवडतं भोजनालय !

हे चालू आहे का अजून ?

बोलघेवडा's picture

13 May 2019 - 10:43 pm | बोलघेवडा

एकदम जोरात चालू आहे.