माझ्या नवऱ्याला श्रीनिवासला सायकल चालवण्याचं फार वेड आहे. मी केव्हाही त्याला कुठे जाऊया म्हटलं कि लगेच त्याच पुढचं वाक्य 'सायकल ने जाऊया' हेच असतं. मी ४ चाकी गाडी चालवायला लागल्यावर ४ चाकीवर फिदा होऊन प्रसंगी एकटीसुद्धा फिरायला लागले. पण श्रीनिवास काही चिकाटी सोडायला तयार नव्हता. माझ्या सासर आणि माहेरच्या घरामध्ये फक्त ३५ किमीच अंतरआहे. केव्हाही त्याला आईकडे जाऊया म्हटलं कि सायकलने जाऊया हे ठरलेलं. त्याच्या जोडीने मी हळू हळू सायकलिंगला सुरवात केली होती पण ३५किमी तेही मधले घाट पार करून जाण्याची कल्पना करवेना. श्रीनिवास कायम प्रोत्साहन द्यायचा, 'चल तू ,जमेल तुला, मला माहितेय तुझी कॅपॅसिटी'. माझा माझ्यावर अजिबात विश्वास नव्हता पण इच्छा मात्र खूप होती. बरेच दिवस टाळल्यानंतर अखेर एक दिवस सकाळीच त्याने डिक्लीअर केलंन कि आपण आज खेरशेतला सायकलने जायचं. शेवटी याआधी प्रत्येक वेळी दिलेली कारणं आठवून ठरवूनच मी लगेच होकार दिला.कॉलेज संपल्यावर ३ वाजता निघायचं असं ठरलं. ३५ किमीच्या मानाने हाताशी बराच वेळ होता. जास्तीत जास्त ३ तासात पोहोचू असं जाणवलं. मधेच श्रीनिवासने पिल्लू सोडलं कि आपल्या पिल्लूला पण नेऊया. तशी ईशान,माझा ८ वर्षाचा मुलगा, गावातल्या गावात दिवसभरात मिळून ५किमी तरी सायकल चालवतो. शेजारीच चिपळूणला जाऊन येऊन २०किमी सायकलिंग तो सहजच करायचा. वाटलं ८ च वर्षाचा आहे ,जमेल का त्याला? शेवटी हा निर्णय त्याचा त्याला घेऊ द्यायचं ठरवलं. त्याची इच्छा असेल तर न्यायचं. शनिवार असल्याने ईशान माझा मुलगा शाळेतून लवकर घरी आला होता. श्रीनिवास कॉलेज संपवून २ वाजता घरी आला. त्याने ईशानला विचारलं तर तो सुपर एक्ससाईट झाला. मग काय लागलो तयारीला. तयारी काही फारशी मोठी नव्हती. सायकलिंगसाठी लागणारे कपडे ,हेल्मेट,प्रोटीन बार्स , पंक्चर किट इत्यादी तयारी घरात असतेच, कारण श्रीनिवासच्या डोक्यात केव्हा कुठे सायकलने जायचं येईल सांगता येत नाही. तो एकटा पण जातो फिरत फिरत. सायकलमध्ये हवा भरून निघू निघू म्हणेपर्यंत ३ चे ३. ३० झाले. तसं जरा चांदण्यातूनच आमचा प्रवास सुरु झाला.
बॅक अप म्हणून दादाला सांगितलं होत कि जर वाटलं नाही जमत आम्हाला तर तो व्हॅन घेऊन येईल नि गाडीत सायकली टाकून जायचं.
फायनली दुपारी ३ ला आम्ही खडपोली सोडलं. खडपोली या आमच्या गावापासून चिपळूण पर्यंतच २०किमी जाऊन येऊन करण्याचा सराव होता थोडाफार. पण खडपोली चिपळूण रस्ता हा सरळ,ना चढ ना उतार. त्यामुळे ते २० किमी म्हणजे जमून जायचं. मला तरीही दमायला व्हायचं पण पाय दुखतात, पायात गोळे आले किंवा पाठ दुखली असं नाही झालं कधी. चिपळूण क्रॉस करून मुंबई गोवा हायवेला लागलो नि कापसाळ गावात पोहोचून पाणी प्यायला थांबलो. माझा लेक देखील थकला होता जवळ जवळ १२किमी अंतर पार केलं होत. मग परत सुरवात झाली. या रस्त्याचं चौपदरी करणाचं काम सुरु आहे त्यामुळे रस्त्याची अवस्था फार काही चांगली नाही. त्यामुळे पु लं च्याच भाषेत रस्त्यातल्या खड्ड्यांची जाणीव होत होती. सायकलवर असल्याने जरा जास्तच जाणवत होती. कामथे गावातले सुरवातीचे स्टॉप पार करून घाट चढायला सुरवात केली. अगदी सुरवातीलाच एक ब्रेक घेऊन केळ खाल्ल नि पाणी पिऊन घेतलं. ईशान फुल्ल जोशात होता. जरी दमून थांबत होता तरी, मामाला गाडी घेऊन बोलवायचं का म्हटल्यावर चक्क नकार दिलंन पोरानं. मला मांडी ठोकून खाली बसण्याची जाम इच्छा झाली पण श्रीनिवास ऐकायला तयार नव्हता. आता इथे बसलीस तर घाट चढता येणार नाही हे एकच पालुपद चालू होत. शेवटी उभ्या उभ्याच दम खाऊन आम्ही निघालो. सुरवातीपासूनच ईशान नि श्रीनिवास पुढे होते तर मी आपली मजल दरमजल केल्यासारखी सायकल चालवत होते. हा घाट साधारण ५किमीचा आहे आणि पूर्ण चढ. मी फार फार प्रयत्न करून जेमतेम १ किमीचा सगळा मिळून घाट चढले. जेव्हा थकले तिथपासून सायकल हातात धरून चालायला सुरवात केली. हे दोघे आपले पुढं जात नि माझ्यासाठी थांबत. तेव्हढीच त्यांच्यासाठी विश्रांती. मधेच चढात एक उसाचं गुऱ्हाळ लागलं. लगेच माझी रसाची फरमाईश झाली. नवरा आपला घे, पी बाई पण चल आता अशा अविर्भावात मला लवकर जाण्यासाठी विनवीत होता. पण मला खरंच एवढा चढ सायकल ने चढणं शक्य होत नव्हते.
कमाल वाटली ती ईशानची. मध्ये मध्ये थांबत का होईना पण पठ्ठ्या काही सायकल सोडायला तयार नाही. पाणी पिऊन, एखादा प्रोटीन बार खाऊन परत सायकल वर टांग टाकून बाबाच्या बरोबरीने पॅडल मारायला सुरवात. मधेच श्रीनिवासने मलादेखील विचारलंन दादाला बोलवायचं का? पण ते लेकरू एवढं सायकल चालवतंय नि मला जमत नाही या जाणिवेने मी देखील नकार दिला. शेवटी एकदाची मी घाटाच्या माथ्यावर पोहोचले. परत एकदा पाणी पिऊन ताजी झाले. वाटेत श्रीनिवास ने एकदाही मला बसू दिलं नाही. उभ्या उभ्या पाणी पी ,२ मिनट थांब कि चल परत. इथे आमचं २० किमी पूर्ण झाले. अजून १५किमी बाकी होते. या घाटाने मला वाटेतले छोटे मोठे चढ सुद्धा आठवायला लागले आणि मला हे जमेल ना असं वाटायला लागलं ? पण पुढचं पुढे आता तरी एवढं चढून आल्यावर घाट उतरायची मजा घ्यायची ठरवलं. आणि मग मात्र वेगाने घाट उतरायला सुरवात झाली. एरवी दोघांच्या मागे असणारी मी इथे मात्र दोघांना मागे टाकून पुढे होते. श्रीनिवासला कंपलसरी ईशानला सांभाळून घेत गाड्यांचा अंदाज घेत सावकाश यावं लागलं. श्रीनिवास मध्ये मध्ये उतारात सायकल कशी चालवायची, ब्रेक कसे लावायचे ,स्पीड कसा मेंटेन ठेवायचा ईशानला सांगत / शिकवत होता. त्यामुळे इथे ते मागे पडले. घाट उतरल्यावर पुढे सावर्डा गाव येईपर्यंत साधारण सरळ रस्ता आहे. फार काही चढ उतार नाही. त्यामुळे इथे काही अडचण आली नाही. सावर्डे सोडल्यावर वहाळ फाटा क्रॉस केल्यावर आगव्याची घाटी आली. मोठा यू टर्न आणि तीव्र चढ अशी याची रचना. मी आधी सारखीच सुरवात थोडी चढल्यावर परत एकदा सायकल हातात घेऊन चालायला सुरवात केली तर ईशान नि श्रीनिवास वर टोकाला जाऊन माझी वाट बघत राहिले. ते पार केल्यावर पुढे थोडा सरळ रस्ता नि मग असुर्डे गावाचा उतार लागतो. इथून परत जोरात सायकल चालवताना मी त्या दोघांना पाठी टाकून पुढे. असुर्डे गाव पार केलं आता अगदीच ४ किमीच अंतर उरल होत. पण मध्ये होती असुरड्याची खिंड. परत मोठी मोठी वळणं नि मोठे मोठे उभे चढ. शेवटच्या ४ किमी पैकी २किमी चढ नि २किमी उतार. आताशा हळू हळू अंधार पसरायला लागला होता. पोरगं एवढा वेळ उत्साहात आलं होत पण तेही आता थकत चाललेलं . बरोबरच्या पाण्यापैकी फक्त अर्ध बाटली पाणी शिल्लक होतं. पण आता टार्गेट टप्प्यात आलेलं असताना हार मानायचीच नाही. हे दोघे परत सगळा चढ चढून माझी वाट बघत थांबलेले आणि मी परत सायकल हातात धरून चालत सगळा चढ चढले. फायनली आता शेवटचा उतार कि घर आलं असं म्हणून तिघांनी सुरवात केली. माझ्यासाठी अगदी रोजचा ओळखीचा रस्ता असल्याने मी इथेही अंधार पडून सुद्धा गाड्यांच्या लाईटमध्ये वेगात चालले होते. श्रीनिवासला मात्र ईशानला सांभाळून घेत यावं लागत होत. वेळेचा अंदाज माझ्या चालण्याने चुकला होता. श्रीनिवासकडे हेडलाईट होता. ईशानला सवय नव्हती. पण उतार असल्याने फार अडचण नाही आली.
आणि एकदाचे आम्ही घरी पोहोचलो. आई,बाबा, दादा, वाहिनी, आजी सगळेच काळजी करत होते. अंधार पडला आणि फोन सुद्धा न उचलल्याने जरा चिंता वाटली पण आम्ही सुखरूप पोहोचल्यावर त्यांना हायसं वाटलं. आधी सांगितल्याने वहिनीने गरम गरम उपमा तयार ठेवला होता. चांगलं दोन डिश भरून उपमा खाल्ला वर कप भरून मस्त आल्याचा चहा. अहाहा! जी भर गया! माझी पहिलीच सायकल वारी असल्याने आई बाबाना कौतुक वाटलं. पण सगळ्यात जास्त कौतुक झालं ते ८ वर्षाच्या ईशानच. पूर्ण ३५किमी मुलगा सायकल चालवत आला. त्यामुळे आजी आजोबांकडून त्याला बक्षीस मिळालं शिवाय पणजीकडून वेगळं बक्षीस. आम्ही ईशानला पण आमच्या वारीत ओढल्याबद्दल आमची जरा कान उपटनी झाली ज्येष्ठांकडून. पण झालं उलटच. ईशान घरी पोचल्यावर माझ्या भाची नि भाच्यांबरोबर खेळायला लागला पण. मी तर थकलेच होते पण त्याची एनर्जी लेवल खूपच जास्त दिसली. परत एकदा घरात तिघांचा आरडाओरडा सुरु झाला. ७ वाजता पोहोचून पण हा मुलगा ११ वाजेपर्यंत खेळत जागा होता. आम्हालाच आश्चर्य वाटलं.
अशा तर्हेने माझी पहिली सायकल राईड पूर्ण झाली. आमच्या सायकली आईकडेच ठेवून आम्ही दुसऱ्या दिवशी घरी परतलो. मग पुढच्या आठवड्यात सायकल परत आणायला गेलो. परत एकदा हाच सगळा उलटा प्रवास. मात्र यावेळी मागच्या वेळेपेक्षा थोडा कमी वेळ घेत परत मुक्कामी पोहोचलो. असाच छान प्रवास झाला. सुरवातीला कष्टप्रद वाटणारा प्रवास पूर्ण झालयावर मात्र आनंद देतो. आणि पुढच्या प्रवासाला सज्ज करतो.
प्रतिक्रिया
31 Oct 2018 - 9:31 am | मुक्त विहारि
तुमचा लेख बायकोला वाचायला देतो...
31 Oct 2018 - 12:00 pm | ज्ञानोबाचे पैजार
मी पण हेच करणार,
प्रिंटच काढून घेतली आहे लेखाची.
मुलं अशा गोष्टी सहजच करतात, त्यांच्यात उर्जा ठासून भरलेली असते. आपण मोठे उगाचच आळशी पणा जोपासत बसतो आणि मग मुले नकळत आपलेच अनुकरण करु लागतात.
तुम्हा तिघांचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि आता पायडल मारले आहे तर थांबू नका.
पैजारबुवा,
31 Oct 2018 - 11:42 am | मार्गी
अभिनंदन आणि पुढील चाकचालीस शुभेच्छा! :)
31 Oct 2018 - 11:43 am | मार्गी
ईशानचे विशेष अभिनंदन!
31 Oct 2018 - 12:30 pm | सस्नेह
अभिनंदन !
31 Oct 2018 - 12:51 pm | यशोधरा
काय भन्नाट! ईशानचं खास कौतुक! तुमची जिद्दही वाखाणावी अशीच आहे.
31 Oct 2018 - 1:15 pm | कंजूस
अरे काय मज्जा आहे! तुमची सायकलने माहेरची वाट फार आवडली.
31 Oct 2018 - 1:31 pm | खिलजि
फारच जवळच्या निघालात आपण .. चिपळूण , खडपोली , खेर्डी , पिंपळी , बहादुरशेक नाका , रेडीज पेट्रोल पम्प, गणेश मंदिर , रामवरदायिनी , तिवरे , नांदिवसे या साऱ्या भागांची बारावीपर्यंत काढली होती पिसे .. चांगला दोन महिने तळ ठोकून बसायचो.. आल्यावर सर्वाना आनंद व्हायचा पण गन उधळायला लागलो कि नकोसा व्हायचो .. ते जाऊन देत ताई पण फार बरं वाटलं हि जवळची नावे वाचून .. आणि लेखही .. धन्यवाद
31 Oct 2018 - 1:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
भन्नाट सायकल वारी ! चारचाकीने जाण्यापेक्षा नक्कीच जास्त मजा आली असणारच... आणि तेही सगळ्या कुटुंबाबरोबर केल्याने ती मजा द्विगुणित-त्रिगुणित झाली असेल !
सर्व कुटुंबाचे... आणि ८ वर्षाच्या पिल्लूचे तर सर्वात मोठे खास अभिनंदन !!!
31 Oct 2018 - 1:59 pm | देशपांडेमामा
तुमच्या आणि ईशानच्या प्रवास पूर्ण करण्याच्या जिद्दीला हॅट्स ऑफ !!!
जाताना चढावाचा त्रास झाला हे वाचून वाटले नव्हते की येताना पण सायकलने येणार. तुम्ही सर्वानी सायकल राईड पूर्ण केली ह्याबद्दल विशेष अभिनंदन !
पुढील अजून मोठ्या राइड्स करता भरघोस शुभेच्छा !
देश
31 Oct 2018 - 4:42 pm | तेजस आठवले
अभिनंदन, आणि खास करून तुमच्या मुलाचे कौतुक. आम्ही ४ किमी सायकल वर जायचा ४ वर्षांपासून नुसता विचारच करतो आहोत.
31 Oct 2018 - 4:55 pm | उगा काहितरीच
अभिनंदन आणि शुभेच्छा ...
31 Oct 2018 - 5:19 pm | सविता००१
जिददी ला सलाम. आणि ईशान द ग्रेट चं खूप कौतुक
31 Oct 2018 - 5:33 pm | नितीन पाठक
तुम्ही सर्वानी सायकल राईड पूर्ण केली ह्याबद्दल विशेष अभिनंदन ! भन्नाट सायकल वारी
पुढील मोठ्या राइड्स करता भरघोस शुभेच्छा !
31 Oct 2018 - 6:11 pm | प्रमोद देर्देकर
अभिनंदन
31 Oct 2018 - 6:38 pm | गामा पैलवान
मालविका,
धाडसाबद्दल तुमचं अभिनंदन. पसारा मस्तं आहे.
आ.न.,
-गा.पै.
टीप : पसारा = पहिली सायकल राईड
31 Oct 2018 - 6:39 pm | तुषार काळभोर
आधी केलेची पाहिजे!!
31 Oct 2018 - 7:10 pm | झेन
अभिनंदन! बापरे ८ वर्ष वय ३५किमी. __/\__
31 Oct 2018 - 9:08 pm | चित्रगुप्त
वा. कमाल केलीत. अभिनंदन आणि पुढील अनेक सा.सा.स.सा.शु. (साहसी सायकल सफरी साठी शुभेच्छा).
![.](https://www.napoleon.org/wp-content/thumbnails/uploads/2009/10/475427_1-tt-width-350-height-248-crop-1-bgcolor-ffffff-lazyload-0.jpg)
तुमचा गोट्या नक्कीच मोठेपणी सायकलीने जगपर्यटन करणार.
खालील चित्रः नेपोलियनचा नातू (पुतण्याचा मुलगा - Napoleon-Eugene the Prince Imperial) 'व्हेलॉसिपीड' चालवत असे, ती मी नुक्तीच रोमच्या नेपोलियन संग्रहालयात बघितली:
जर्मनीत दिनांक १२ जून, १८१७ या दिवशी Baron Karl von Drais याने जगातली पहिली सायकल चालवली म्हणे. त्याकाळी सायकलीला 'डँडी हॉर्स' म्हणत (खालील चित्र)
![.](https://www.deutsches-museum.de/typo3temp/pics/c0467d8ac2.jpg)
Karl Drais’ Dandy Horse : JOHANN FREY, MANNHEIM WHEELWRIGHT, 1817.
अन्य काही जुन्या सायकली:
![.](https://sites.google.com/site/rinshikai/_/rsrc/1472842644473/ordinary/m5.jpg)
![.](https://www.duvine.com/wp-content/uploads/2017/05/woodenbike.jpg)
![.](https://mxcity.mx/wp-content/uploads/2018/04/bicis-antiguas-1.jpg)
31 Oct 2018 - 10:57 pm | मुक्त विहारि
मस्त....
चला शँपेन पिऊ या...
1 Nov 2018 - 12:55 am | रुपी
मस्तच! तुमचं सर्वांचं अभिनंदन.
मुलाचं खरंच कौतुक!
1 Nov 2018 - 2:30 pm | जेडी
तिघांचेही अभिनंदन, सर्वांची जिद्द आणि प्रयत्न कामी आलेत. पुढच््या अनेक सफरींसाठी शुभेच्छा...
1 Nov 2018 - 3:17 pm | अथांग आकाश
मला स्वतःला सायकल चालवणे बिलकुल आवडत नाही! पण सध्या वाढत चाललेलं सायकलींगचे वेड (फॅड) बघून कौतुकमिश्रित आश्चर्य वाटतं!
आमचं सायकलींग एवढ्या पुरतंच मर्यादित! :-)
1 Nov 2018 - 4:21 pm | मोदक
अभिनंदन..!! अशाच सायकल सफरी करत रहा..!!!
3 Nov 2018 - 7:56 am | मालविका
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद !! सायकलिंग सुरु ठेवण्याची इच्छा आहे नक्की . बघू पुढे कास काय जमतंय ते!!
3 Nov 2018 - 10:40 am | मुक्त विहारि
मग नक्कीच जमेल.
रोज एकतरी फेरफटका, मग भले तो १०० मीटरचा का असेना....मारलात तर फार उत्तम.
8 Nov 2018 - 7:59 pm | भ ट क्या खे ड वा ला
एकदा तीघंही या खेड ला .
आम्ही अर्ध्या रस्त्यात येतो तेथून खेडपर्यंत एकत्र राईड करुया .
8 Nov 2018 - 7:59 pm | भ ट क्या खे ड वा ला
एकदा तीघंही या खेड ला .
आम्ही अर्ध्या रस्त्यात येतो तेथून खेडपर्यंत एकत्र राईड करुया .
8 Nov 2018 - 7:59 pm | भ ट क्या खे ड वा ला
एकदा तीघंही या खेड ला .
आम्ही अर्ध्या रस्त्यात येतो तेथून खेडपर्यंत एकत्र राईड करुया .
9 Nov 2018 - 3:07 pm | sagarpdy
भन्नाट. छोटू चे खास अभिनंदन. चलाते रहो.