श्रीगणेश लेखमाला - ।। शोध शनिवारवाड्याचा ।।

मनो's picture
मनो in लेखमाला
23 Sep 2018 - 8:39 am

.

|| शोध शनिवारवाड्याचा ।।

'मिसळपाव'च्या स्वरचित काही गोष्टीविषयी लिहिण्यासाठी विचार करताना असे वाटले की एक शोध हा असा आहे की त्याबद्दल जरूर लिहावे, म्हणून श्रीगणेश लेखमालेसाठी ही एका शोधाची कहाणी. हा शोध गणेशचतुर्थीच्या महाराष्ट्र टाइम्सच्या अंकात पुणे आवृत्तीत प्रसिद्ध झाला आहे - त्याची बातमी इथे सापडेल.
असा होता ‘पेशवेकालीन’ गणेशोत्सव
साधारण ३० वर्षांपूर्वीची गोष्ट. पुण्यात आले म्हणजे आत्याकडे एक चक्कर होत असे. आत्या त्या वेळी राहत असे बिनीवाले वाड्यात (जिथे त्या काळी 'सकाळ'चे कार्यालय बहुतेक होते), त्यामुळे तिथे बिनीवाले वाड्यात शिरतानाच समोर दिसे ती शनिवारवाड्याची मागची भिंत. शनिवारवाड्याच्या मागे तारेचे कुंपण असल्याकारणाने भिंतीच्या पुढे काही झाडे, झुडपे वाढलेली होती. त्यातून डोकावणारे भक्कम बुरूज, अर्धे दगडी आणि अर्धे विटेचे बांधकाम आणि त्यातच नारायणराव पेशवे यांच्या खुनानंतर त्यांचे शव या बाजूने बाहेर काढले अशा काही आख्यायिका - यामुळे एक भीती-गूढमिश्रित असा घनगंभीर माहोल तयार होत असे. पुढे वाड्यात आत शिरल्यावर मात्र माझा अगदीच अपेक्षाभंग झाला, कारण मोकळ्या जोत्याखेरीज तिथे आत काहीच नव्हते. एखाद्या प्रख्यात चित्रपटाला रविवारी दुपारचा वेळ काढून निवांत जावे आणि मध्यंतरातच पुढे बघणे अशक्य व्हावे आणि घरी परतावे, तशी ती माझी लहानपणीची अवस्था मला आजही आठवते.
कदाचित यातूनच मग वाड्यासंबंधी काही माहिती मिळते का याचा शोध घेणे चालू झाले असावे. आणि तशी काही माहिती मला त्या काळी मिळाली नाही. पुढे इतिहास संशोधनाला सुरुवात केल्यावर मग डॅनिएल्स याने काढलेले गणेश महालाचे खालील चित्र पाहण्यास मिळाले. पण ह्या चित्रातील तपशील काही बरोबर वाटेनात. मग गोडसे यांनी 'समंदे तलाश' या पुस्तकात दाखवलेल्या त्रुटी सापडल्या, आणि हे चित्र काल्पनिक आहे याची खातरी पटली. थॉमस डॅनिएल्स शनिवारवाड्यात कधीच आला नव्हता. त्यामुळे त्याने वेल्सच्या कामात आपल्या कल्पनेची भर घालून, सवाई माधवराव आणि चार्ल्स मॅलेट यांचे आज उपलग्ध असणारे चित्र काढले आहे.
https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/b/bd/Thomas_Daniell%2C_Sir_Charles_Warre_Malet%2C_Concluding_a_Treaty_in_1790_in_Durbar_with_the_Peshwa_of_the_Maratha_Empire.jpg

या चित्रात दाखवलेला इंग्रज-मराठे यांच्या टिपू सुलतानाविरुद्धच्या तहाचा प्रसंग ६ ऑगस्ट १७९० रोजी घडला. एका वर्षानंतर १७९१मध्ये जेम्स वेल्स हा होतकरू चित्रकार नाव कमावण्याच्या हेतूने इंग्लंडमधून भारतात मुंबईत पोहोचला. १७९२मध्ये सर चार्ल्स मॅलेट या सवाई माधवराव पेशव्याच्या दरबारी असलेल्या इंग्रज वकिलाशी त्याची भेट झाली आणि मॅलेटने वेल्सला पुण्याला यायचे आमंत्रण दिले. पेशव्याला काही चित्रे विकणे अथवा ते न जमल्यास ती चित्रे युरोपात विकून प्रसिद्ध चित्रकार बनणे हा वेल्सचा उद्देश होता. त्यानुसार त्याने ग्रीक पुराणावर आधारित शुक्रदेवतेच्या चित्राची एक नक्कल बनवून पेशव्यास १,००० रुपयांना विकली. त्यानंतर त्याला पेशवा आणि नाना फडणीस यांचे पूर्णाकृती (सात फूट उंच) व्यक्तिचित्र बनवण्याचे काम मिळाले, तेही त्याने पूर्ण केले. (ते चित्र पुण्याहून नंतर सातारच्या दरबारात गेले आणि तिथून शेवटी रॉयल एशियाटिक सोसायटी, लंडन येथे सध्या आहे). महादजी शिंदे यांचे एक दरबारचित्रही त्याने पूर्ण केले. आणि मग वेल्सच्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे चित्र, ज्या चित्रावर प्रसिद्ध चित्रकार बनण्याची त्याची महत्त्वाकांक्षा अवलंबून होती, त्या चित्राचे काम त्याला मॅलेटकडून मिळाले. मॅलेटला १७९०च्या तहाचे एक भव्य चित्र (साधारण एका छोट्या भिंतीच्या आकाराचे) काढून हवे होते. त्याने वेल्सला हे काम दिले.
पण दुर्दैवाने १७९५ साली मुंबईत आजाराने वेल्सचा मृत्यू झाला आणि हे काम अपूर्ण राहिले. मग १७९७ साली मॅलेट पुणे सोडून लंडनला परतल्यावर त्याने हे काम थाॅमस डॅनिअल्स याला दिले आणि त्याने ते १८०५ साली पूर्ण केले. वेल्स अथवा डॅनिअल्स यापेकी कुणीही तहाच्या प्रसंगी प्रत्यक्ष हजर नव्हते आणि वेल्सने निदान शनिवारवाडा प्रत्यक्ष पाहिला होता, डॅनिअल्सने बहुधा तोही पाहिला नव्हता. त्यामुळे वेल्सचे अपुरे काम, वेल्सचा साहाय्यक मेबाॅन याने काढलेली थोडी रेखाचित्रे आणि मुख्यतः डॅनिअल्सची कल्पनाशक्ती यावर त्यांचा भर होता. त्यामुळे त्या भव्य चित्रात वास्तव थोडे आणि कल्पनाशक्ती जास्त असे एक वेगळे मिश्रण झालेले आहे. १८०५ साली हा तहाचा प्रसंग जुना होऊन गेला होता आणि १७९९मध्येच टिपू सुलतानाचा पराभव आणि मृत्यू झाल्यामुळे या तहाचे महत्त्वही राहिले नव्हते. त्यामुळे चित्र पाहायला येणाऱ्या अथवा त्याची प्रत विकत घेऊ शकणाऱ्या लंडनमधील इंग्लिश ग्राहकाला हा प्रसंग आणि त्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींची नावे सांगण्याची गरज भासली. त्यामुळे १८०७ साली रॉबर्ट क्रिब याने वेल्सच्या कामावर आधारित खालील रेखाचित्र त्यातल्या व्यक्तींच्या नावांसहित प्रकाशित केले.

pic1

मेबाॅन याने काढलेल्या, वाड्यातील - दरबारातील काही वस्तूगुलाबदाणी व विड्यांचा डबा
pic2    pic3
तलवारीची मूठ, शिरपेच आणि इतर अलंकार
pic4    pic5
या चित्रांमधून प्रथमच आपल्याला पेशव्याच्या वस्तू (गुलाबदाणी, पानाचा डबा, तलवार, शिरपेच, मोत्याचे अलंकार) दिसून येतात. १७९०च्या तहाच्या प्रसंगी हजर असू शकणाऱ्या लोकांची नावे आणि चेहरे हे एकत्र प्रथमच पाहायला मिळतात, आणि डॅनिअल्सने आपली कल्पनाशक्ती कुठे वापरली असावी याचा अंदाज येतो. त्यामुळे या रेखाचित्रांना एक वेगळे महत्त्व आहे. चित्रात आलेली काही नावे - सवाई माधवराव पेशवा, नाना फडणीस, भाऊ (?) पंडित (बहिरोपंत मेहेंदळे?), जोशुआ उल्हाॅफ, नूर अल्लादिन हुसैनखान - मॅलेटचा दरबार-वकील, कॅप्टन थाॅर्न, लेफ्ट. वाॅर्ड, मि. फिंडले - सर्जन.
हे रेखाचित्र आणि मूळ चित्राची एक भव्य प्रिंट इंग्लंडचे राजे तिसरे जॉर्ज यांच्या संग्रहात आहे. आणखी एक प्रत येल विद्यापीठाच्या संग्रहात आहे. येल विद्यापीठात वेल्सचा साहाय्यक मेबाॅन याची मूळ रेखाचित्रेही आहेत. मॅलेटने १७९५ साली हे सर्व कागद आपल्याबरोबर लंडनला नेले. शिवाय त्याने वेल्सच्या मुलीशी लग्नही केल्यामुळे त्याच्याकडे वेल्सची सर्व कागदपत्रेही होती. मॅलेटची मुले आणि नातू ब्रिटिश राजवटीत मोठ्या पदांवर काम करत होते, त्यामुळे मॅलेट घराण्याच्या संग्रहात अशा अनेक दुर्मीळ वस्तूंचा समावेश आहे. आज या घराण्याची कागदपत्रे अमेरिकेत ड्यूक विद्यापीठात अभ्यासकांसाठी उपलग्ध आहेत. डॅनिअल्सचे मुळ चित्र वारसाकराच्या मोबदल्यात ब्रिटिश सरकारने २००७ साली ताब्यात घेतले. ते सध्या लंडनच्या टेट संग्रहालयात आहे. मॅलेटच्या संग्रहातील टिपू सुलतानाची तलवारीचा व इतर वस्तूंचा लिलाव २०१३ साली सुमारे एक लाख पौंड किमतीला झाला. मेबाॅन याने काढलेली रेखाचित्रे आणि वेल्सची डायरी १९२९च्या सुमारास येल विद्यापीठास पाॅल मेलन याने आपल्या इतर संग्रहासाहित भेट दिली. ती सध्या तेथेच आहे.
त्यानंतर मिळाले ते पारसनीस यांचे 'पूना इन द बायगॉन डेज' (Poona in the bygone days) हे इंग्लिश पुस्तक. शनिवारवाड्याच्या माहितीसाठी यांच्यासारखे दुसरे पुस्तक नाही. वाड्याला भेट दिलेल्या वकिलांनी आणि प्रवाश्यांच्या वर्णनांनी हे पुस्तक भरलेले आहे. त्यातूनच बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या.

अशी उत्कंठा वाढलेली असतानाच हातात आले ते ग.ह. खरे यांचे 'शनिवारवाडा' (Shaniwar wada by G H Khare) हे पुस्तक. नकाशासहित त्यांनी त्या काळात माहीत असलेल्या गोष्टींची शहानिशा करून परिश्रमपूर्वक हे पुस्तक लिहिले आहे.

त्यातूनच मी घेतलेला हा शनिवारवाड्याचा नकाशा.
pic6
खरे यांचे पुस्तक वाचताना जाणवले की त्यांनी वेळेअभावी हा शोध पूर्ण केलेला नाही. आजही पेशवे दप्तरात शोध घेतला, तर वाड्यासंबंधित नवीन कागद मिळू शकतात. पेशवे दप्तर शोधण्याचे ठरवून मी ते पुस्तक वाचून संपवले आणि शनिवारवाड्यासंबंधित आजवर अप्रकाशित कागद अगदी अनपेक्षितरित्या माझ्या हातात हाती लागले.
माधवराव पेशवे यांच्या चित्रासंबंधित मी एक लेख काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध केला होता. ते चित्र अमेरिकेत जेम्स वेल्स याच्या संग्रहात होते. जेम्स वेल्स, सवाई माधवराव पेशव्याच्या दरबारी असलेल्या इंग्रज वकील सर चार्ल्स मॅलेट यांचा पेशवे दरबाराशी आणि एकूण शनिवारवाड्याशी घनिष्ट संबंध आला, त्यामुळे त्यांच्या कागदांमध्ये शनिवारवाड्याशी संबंधित काही मिळते का, ते मी शोधून पाहत होतो.
ते करतानाच माझ्या हाती शनिवारवाड्यातील गणेशोत्सवाचे खालील वर्णन आणि नकाशा हाती लागला.
pic7
विशेष म्हणजे वेल्सने काही रेघांच्या साह्याने पेशव्याला मुजरा करण्याचा आणि गणेशाला वंदन करून विडे घेऊन बाहेर जाण्याचा क्रम मध्यभागी दाखवला आहे.
वेल्सच्या नकाशामध्ये खालील नावे लिहिली आहेत.
A देवळाचा दरवाजा
B लाल रेशमी वस्त्रे घेतलेले दोन सेवक
C अनेक फुलांचे गुच्छ, बागेत ठेवल्याप्रमाणे, खालून काड्यांनी तोलून धरलेले
D (नाव लिहायचे विसरले आहे, बहुधा पूजेची निरांजने, समई इत्यादी)
E गणेश
F पेशवा
G मंत्री (म्हणजे बहुधा नाना फडणीस)
H सर चार्ल्स मॅलेट
I मिस्टर लॉकहार्ट
J पानाच्या विड्यांचे तबक
K वेल्स (स्वतः या नोंदीचा लेखक)
L डॉ. फिंडले (इंग्रज वकिलातीतला सर्जन)
M मिस्टर ईमानुएल
N कर्नल लेडी यांचा सर्वात मोठा मुलगा
O कर्नल लेडी यांचा सर्वात लहान मुलगा
P सेवक
Q नाचणाऱ्या अनेक स्त्रिया
S पेशव्याच्या शेजारी आणि समोर उच्च दर्जाचे अनेक सरदार
R नाचणाऱ्या स्त्रियांचा एक गट
जेम्स वेल्स या इंग्लिश चित्रकाराने आपल्या डायरीत २४ ऑगस्ट १७९२ या दिवसाखाली हे वर्णन नोंदवले आहे. विशेष म्हणजे त्याने नोंदीबरोबरच एक नकाशा आणि रेखाचित्रही सोबत काढले आहे. जेम्स वेल्सने आपली विस्तृत अशी रोजनिशी लिहिली आहे आणि महत्त्वाच्या सर्व गोष्टींची तारखेसकट नोंद केली आहे. त्यातूनच आपल्याला शनिवारवाडा आणि गणपती उत्सव याबाबत खालील नवी माहिती मिळते.
१७९२ साल - उत्तर पेशवाईचे वैभव कळसाला पोहोचले होते तो काळ. १८ वर्षांचा तरुण सवाई माधवराव पेशवा त्या वेळी पेशवेपदावर होता. त्या काळात शनिवारवाड्यातला गणेशोत्सव पेशव्याच्या इतमामाला साजेसा असा गणेश महालात होत असे.
pic8
जेम्स वेल्स आपल्या रोजनिशीत म्हणतो - "पुणे, २४ ऑगस्ट १७९२, आज आम्हाला गणेशोत्सवानिमित्त दरबारात येण्याचे आमंत्रण आले होते. आम्ही तिथे पोहोचल्यावर एका मोठ्या खोलीत आम्हाला घेऊन जाण्यात आले. त्या खोलीची एक बाजू एखाद्या देवळाच्या प्रवेशद्वाराप्रमाणे सजवली होती. तिथे एक दारही होते आणि त्या दारातून आम्हाला दिव्यांच्या जळणाऱ्या ज्योती आणि पूजा करणारे ब्राह्मण दिसत होते. दाराबाहेर दोन सेवक तलम अशा लाल रेशमी वस्त्राचे पंखे घेऊन उभे होते - वेल्सच्या मताप्रमाणे ते माश्या आत जाऊ नयेत म्हणून तिथे रेशमी वस्त्रे घेऊन उभे होते." पूजा करणाऱ्या ब्राह्मणांची संख्या पुष्कळ होती आणि त्यांचे कपडे आणि एकूण आविर्भाव साधा पण नीटनेटका असा कौतुक करण्याजोगा असा वेल्सला वाटला. तिथे असलेल्या इतर लोकांमध्ये वेल्सला अनेक पद्धतीचे भरजरी पोशाख दिसले. विशेषतः वेल्सला त्यांच्या शिरस्त्राण आणि पगड्यांमध्ये इतका फरक पाहून खूप आश्चर्य वाटले.
pic9
डॉ. उदय कुलकर्णी या कालखंडावर पुस्तक प्रसिद्ध करणार आहेत, त्यातूनही आणखी तपशील उजेडात येतील अशी आशा आहे.
शनिवारवाड्याची आजची दुरवस्था
शनिवारवाडा ब्रिटिश राजवटीत अनेक कारणांसाठी वापरला गेला. शेवटी १९२१ साली प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या पुणे भेटीच्या निमित्ताने सरकारने जलदीने सर्व इमारती हलवून उत्खनन केले आणि आज आपल्याला जे जोते दिसते ते सापडले. त्याच सुमारास दिल्ली दरवाजास लावलेला चुन्याचा पांढरा रंग साफ करताना त्याखाली असलेली रंगीत चित्रे आढळून आली. आज सुमारे १०० वर्षे उलटली, तरी ती चित्रे त्याच अवस्थेत आहेत.

ganesh100

भोजराज या जयपूरमधील चित्रकारास मुद्दाम पुण्याला बोलवून ही चित्रे काढलेली आहेत. वास्तविक पाहता दिल्ली दरवाजा हा शनिवारवाड्यातील मूळचा वाचलेला एकमेव भाग आणि ही चित्रे म्हणजे थेट पेशवेकाळातील. तरीही त्याच्या सफाईची, संवर्धनाची काहीही व्यवस्था आजपर्यंत केली गेलेली नाही.
ticket2

महानगरपालिकेने तर थेट या चित्रांखालीच तिकीट विक्रीचे ऑफिस थाटले आहे. त्यामुळे या चित्रांकडे कुणाचे लक्षही जात नाही.
ticket1

शनिवारवाड्याच्या दरवाजावरील मूळची रंगवलेली सुबक वेलपत्ती - अशी आपल्याला मोगल इमारतीमध्ये आणि राजस्थानात पाहायला मिळते.
door

मेणवलीकर जोशी वाड्यात आपल्याला दुसरा गणेश पाहायला मिळतो, त्यावरून शनिवारवाड्यातला गणेश मूळचा कसा असावा त्याची कल्पना करता येते. डेक्कन कॉलेजचे श्री. श्रीकांत प्रधान यांनी त्या काळातील चित्रांचा अभ्यास करून तशी नवीन चित्रे काढण्याचे तंत्रही विकसित केले आहे.
मेणवलीकर जोशी वाड्यात असलेले गणेश चित्र - Maratha Wall Painting, B.K. Apte pic99

दुर्दैवाने शनिवारवाड्यातील ही चित्रे काळाच्या ओघात हळूहळू नष्ट होत आहेत, काही वर्षांत आपल्याला ती आणखीनच अस्पष्ट होऊन नाहीशी झालेली दिसतील.

संदर्भ

- धडफळे यादी
- पारसनीस, 'पूना इन द बायगॉन डेज'
- गणेश हरी खरे, 'शनिवारवाडा'
- शनिवारवाड्याची आधुनिक काळातली (आजची) सर्व चित्रे इंटरनेटवरील खालील ब्लॉगवरून घेतली आहेत. माझ्याकडे काही फोटोज आहेत, पण या ब्लॉगवर त्यापेक्षा चांगले असल्याने ते वापरले आहेत. https://kevinstandagephotography.wordpress.com

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

23 Sep 2018 - 9:15 am | कुमार१

सुंदर वर्णन !

यशोधरा's picture

23 Sep 2018 - 10:48 am | यशोधरा

सुरेख लेख, चित्रे, वर्णन सारेच अद्भूत आहे!
ह्या ठेव्याची हेळसांड पाहून वाईटही वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Sep 2018 - 11:46 am | डॉ सुहास म्हात्रे

माहितीपूर्ण लेख !

ऐतिहासिक ठेव्यांची हेळसांड करण्यात आपण भारतियांचा हात धरणारा कोणता इतर देश सापडणे कठीण आहे. :(

नाखु's picture

23 Sep 2018 - 8:27 pm | नाखु

विनापुराव्याचा (असलाच पुरावा तर सोयीस्कर भागच उचलून घेतलेला) अश्या वर्तमानात अस्सल आणि ऐतिहासिक वस्तू,वास्तू,व्यक्ति यांची काय ती पत्रास.
बाजीरावाच्या पराक्रमापेक्षा मस्तानी प्रकरण चघळण्याव्यतिरीक्त काहीच धन्यता मानत नाहीत.
इंग्रजांनी त्या बाजीरावाच्या गुणांची कदर केली आहे आणि निःसंशय अद्वितीय योध्दा असेच वर्णन केले आहे.

मनो धन्यवाद.

टर्मीनेटर's picture

23 Sep 2018 - 12:05 pm | टर्मीनेटर

छान ऐतिहासिक माहिती.

प्रचेतस's picture

23 Sep 2018 - 1:12 pm | प्रचेतस

अत्युत्कृष्ट लेख.

चित्रगुप्त's picture

23 Sep 2018 - 6:43 pm | चित्रगुप्त

अभ्यासपूर्ण, उत्कृष्ट लेख.

पद्मावति's picture

24 Sep 2018 - 11:45 am | पद्मावति

उत्तम लेख.

मराठी कथालेखक's picture

24 Sep 2018 - 3:50 pm | मराठी कथालेखक

लेख आवडला

खटपट्या's picture

24 Sep 2018 - 7:19 pm | खटपट्या

रोचक माहीती.

ज्योति अळवणी's picture

24 Sep 2018 - 7:24 pm | ज्योति अळवणी

अभ्यासपूर्ण लेख वाचून खूप बरे वाटले. मला आपल्या भारतीय ऐतिहासिक वास्तूंचे खूप अप्रूप आहे. जेव्हा आणि जिथून जी माहिती मिळते ती मी नक्की वाचते. खूप उत्सुकता वाटते त्या काळात या भव्य दिव्य वास्तू कशा वापरल्या गेल्या असतील. जर खरच time machine असते तर त्या काळात जाऊन बघून आले असते अस नेहेमी मनात येतं. तुमचा लेख आणि त्यातील पुस्तकांचा उल्लेख(ती पुस्तके शोधून वाचणार नक्की) वाचून तीच उर्मी परत मनात दाटून आली.

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. तुम्ही पूना इन बायगॉन डेज (वर pdf लिंक आहे) नक्की वाचा. टाइम मशीनचा अनुभव नक्की येईल :)

शनिवार वाडा फार प्रख्यात आहे पण आपल्याकडे अनेक अप्रसिद्ध आणि सुंदर गोष्टी आहेत. महादजी शिंदे यांनी नगर जिल्ह्यात सुपे-पारनेर जवळ (गावाचे नाव विसरलो) एक भक्कम वाडा बांधला आहे. त्याच्या आवारात एक राम मंदिर आहे. तेथे काढलेली चित्रं थेट शनिवार वाड्यातल्या चित्रांची आठवण करून देणारी आहेत. शिंद्यांनी शनिवार वाडा पाहून मग तशी चित्रे आपल्या देवळात काढून घेतली का? तिथले चित्रकारपण जयपूरचे होते का असे अनेक प्रश्न पडतात.

तसेच वडगाव काशिंबेग इथल्या थोरल्या बाजीराव पेशव्यांची पत्नी काशीबाई यांच्या माहेरी असलेल्या वाड्यात आणि देवळात अस्सल मराठी शैलीतली चित्रे आहेत.

वाई येथे आणि जवळपास असंख्य वाडे आणि मंदिरे आहेत, तीच गोष्ट प्रवरासंगम येथली.

आणि विजापूर येथे आदिलशाह यांच्या जन्माचे सुंदर चित्र आहे. अर्थात मोगली मूर्तीभंजकांनी त्यातले चेहेरे उखडून काढले असले तरी ती चित्रे ४०० वर्षांपूर्वीच्या जगात घेऊन जातात.

अशी किती ठिकाणे सांगू ... जागा अपुरी पडेल :)

nanaba's picture

27 Sep 2018 - 7:52 am | nanaba

Wai madhalya amachya wadyat, ashi bhittichitre hotee. Ajunahi changali hotee.
Pan bhintee padayala aalya.
Madhalya kholit mothi tijori ahe, jaminit rutavalele. barech artifacts babasaheb purandaryanna dilele.
Varachya kholit ek kapat ahe, tyat ajun don kapat eka kapatatun thet khalachya majalyavarachya kholit gupta rasta.
Lahanpanee maja vatayachi, pan tyache aitihasik mahattva lakshat aale navhate.
Anek kagadpatre amachya adhichya peedhine fekun dili. (They feel terrible about it now, thinking how they didnt realize the importance!) lihitanahi mala vaait vatatay. :)

जे होऊन गेले त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही. जे आपल्या हातात आहे ते वाचवूयात.

कागदपत्रांबद्दल थोडेसे - कागद जुने असले म्हणजे महत्वाचे असतातच असे नाही. एक जुन्या दप्तराबद्दल मंदार लवाटे सरांनी सांगितलेला अनुभव सांगतो - दक्षिणा दिली असे रोज एक याप्रमाणे शेकडो कागद आहेत. ग ह खरे यांनी 'पेशव्यांच्या स्त्रियांना शुभ्र माती दिली' अश्या मजकुराचे अनेक कागद पेशवे दप्तरात सापडले. ते सगळेच सांभाळून ठेवावेत या प्रकारचे नाहीत. त्यामुळे कागद वाचून निवडक महत्वाचे शिल्लक ठेवणे हे उत्तम.

विलासराव's picture

2 Oct 2018 - 9:02 pm | विलासराव

शिंदे यांनी नगर जिल्ह्यात सुपे-पारनेर जवळ (गावाचे नाव विसरलो) एक भक्कम वाडा बांधला आहे.

Jamgaon la ek wada aahe.

अरविंद कोल्हटकर's picture

25 Sep 2018 - 9:20 am | अरविंद कोल्हटकर

१९६५-६६ च्या सुमारास पुणे विद्यापीठामध्ये उपकुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर पुणे दरबाराचे एक चित्र होते. ती इमारत गवर्नरचे निवासस्थान असल्याच्या दिवसापासून तेथे होते अशी माझी समजूत आहे. तेच हे चित्र काय? नसल्यास ते चित्र कोणते होते?

मूळ चित्र नसेल , त्याची एखादी कॉपी असू शकते. पुणे दरबार म्हणले म्हणजे मला दिल्ली दरबार हा इंग्लंडच्या राजांनी भारतात येऊन केलेला दरबार आठवला. 1921 किंवा 1875 साली ब्रिटिश राजघराण्यातील व्यक्ती पुण्याला येऊन गेल्या त्या वेळी झालेला दरबार पण असू शकेल.

1875 च्या वेळी पर्वतीचे चित्र

1

अरविंद कोल्हटकर's picture

25 Sep 2018 - 9:36 am | अरविंद कोल्हटकर

"हे रेखाचित्र आणि मूळ चित्राची एक भव्य प्रिंट इंग्लंडचे राजे तिसरे जॉर्ज यांच्या संग्रहात आहे."

तिसरा जॉर्ज त्याच्या वेडेपणासठी प्रसिद्ध होता कारण नंतरच्या वर्षामध्ये तो खराखुरा वेडा झाला होता. ह्या विषयावरचा The Madness of George III नावाचा सिनेमा येथे उपलब्ध आहे. 'Yes Minister' आणि 'Yes Prime Minister' ह्या गाजलेल्या सीरिअल्समधील नट नायजेल हॉथॉर्न ह्याने जॉर्जचे काम केलेले आहे.

चौथा कोनाडा's picture

26 Sep 2018 - 1:11 pm | चौथा कोनाडा

अद्भूत अप्रतिम लेख ! सुंदर !
बरीच नविन माहिती मिळाली.

श्रीरंग_जोशी's picture

30 Sep 2018 - 8:19 am | श्रीरंग_जोशी

अत्यंत अभ्यासपूर्ण अन महत्वपूर्ण लेखन. शनिवारवाडा अगदी सहजपणे पाहिली जाऊ शकणारी ऐतिहासिक वास्तू आहे. याबद्दल जालावर इतके अभ्यासपूर्ण लेखन प्रथमच वाचायला मिळाले. या लेखनासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

लेख वाचून झाल्यावर बुकगंगावरुन ग. ह. खरे यांच्या 'शनिवारवाडा' पुस्तकाची इ-आवृत्ती विकत घेतली आहे :-) .

रुपी's picture

4 Oct 2018 - 5:31 am | रुपी

फारच अभ्यासपूर्ण लेख!

"वेल्सने काही रेघांच्या साह्याने पेशव्याला मुजरा करण्याचा आणि गणेशाला वंदन करून विडे घेऊन बाहेर जाण्याचा क्रम मध्यभागी दाखवला आहे." >> हे तुमच्यासारखे जाणकारच समजू शकतात. नुसते चित्र बघून मला ते कधीही समजले नसते!

या माहितीसाठी आणि सगळ्या लिंक्ससाठी धन्यवाद!

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

मुक्त विहारि's picture

13 Oct 2018 - 9:47 pm | मुक्त विहारि

मस्त माहिती...

कलादालन's picture

2 Oct 2019 - 10:06 am | कलादालन

तुम मांस-हीन तुम रक्तहीन हे अस्थि-शेष ! तुम अस्थि हीन तुम शुध्द बुद्ध आत्मा केवल हे चिर पुराण तुम चिर नवीन!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2019 - 10:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तपशिलवार माहितीपूर्ण लेखन आवडले.

-दिलीप बिरुटे