श्रीगणेश लेखमाला - छोट्याशा क्लृप्तीने केली करामत मोठी

Primary tabs

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in लेखमाला
20 Sep 2018 - 8:51 am

.

छोट्याशा क्लृप्तीने केली करामत मोठी

मी काही कलाकार नाही, परंतु तांत्रिक ज्ञान थोडेफार आहे, म्हणून स्वतःच्या तुटपुंज्या तंत्रिक ज्ञानाने केलेल्या काही गोष्टी इथे देत आहे.

१. स्पार्क प्लगची समस्या सोडवली एका क्लृप्तीने

मी एम.बी.बी.एस. करीत असताना माझ्या भावाने एक जपानी बनावटीची होंडा मोटरसायकल सेकंड हँड विकत घेतली होती. या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे याला रोटरी गिअर्स होते - म्हणजे आपण हिरो होंडाला कसे न्यूट्रलनंतर एक, दोन, तीन आणि चार असे गिअर्स टाकतो आणि उलटे येण्यासाठी ४-३-२-१ करीत खाली येतो, त्याऐवजी या गाडीला चौथ्या गिअरनंतर परत न्यूट्रल गिअर टाकता येत असे आणि तसेच या न्यूट्रलनंतर परत १-२-३-४ असे जाता येत असे. याचा फायदा म्हणजे एकदम स्पीड ब्रेकर आला किंवा सिग्नल लाल झाला, तर ब्रेक मारल्यावर चौथ्या गिअरमधून थेट न्यूट्रलमध्ये जाऊन परत पहिल्या गिअरमध्ये गाडी उचलता येत असे. यामुळे पटकन वेग घेऊन गाडी पुढे काढता येत असे. मी एम.बी.बी.एस. पास झालो होतो आणि आता नौदलात २५ डिसेंबरला कमिशनिंग होणार होते, म्हणून मी भावाकडून ही गाडी घेऊन पुण्याला चालवत नेली होती. एकदम 'जपानी' इंपोर्टेड गाडी आणल्यामुळे तेथे मला बराच भाव मिळाला होता. ती गाडी मी महिनाभर पुण्यात सगळीकडे चालवली होती. परंतु २५ डिसेंबरला कमिशनिंग झाले आणि तीन दिवसांनी २८ तारखेला, म्हणजे मुंबईला यायच्या तीन दिवस अगोदर या गाडीचा स्पार्क प्लग काम करेनासा झाला, म्हणजे स्पार्क प्लगच्या मधल्या इलेक्ट्रोडभोवती असलेल्या चिनीमातीच्या नळकांड्याला बारीक चीर पडून विजेचा प्रवाह गळत होता, त्यामुळे मूळ स्पार्क प्लगमध्ये स्पार्क नीट पडत नव्हता. यामुळे गाडी चालू होऊन सारखी बंद पडत होती. मित्राची गाडी घेऊन मी पुण्यात नाना पेठेपासून लक्ष्मी रोड, डेक्कन सगळीकडे फिरलो, परंतु त्या गाडीला बसेल असा स्पार्क प्लग काही कुठे उपलब्ध होत नव्हता. मला ३१ तारखेला चंबूगबाळे आवरून मुंबईत अश्विनी या नौदलाच्या रुग्णालयात १ जानेवारीला रुजू व्हायचेच होते आणि त्यासाठी कॉलेजमधील (ए.एफ.एम.सी.मधील) सर्व खात्यांमधून एन.ओ.सी.सुद्धा घ्यायची होती. जे काही करायचे होते, ते दोन दिवसांतच. सुरुवातीला माझा बेत असा होता की मित्रांकडे माझ्या बॅगा द्यायच्या आणि मोटरसायकल चालवून मुंबईला आणायची. पण स्पार्क प्लग खराब झाल्यावर हा बेत रद्द करावा लागणार होता, कारण आख्ख्या पुण्यात हा स्पार्क प्लग कुठेच उपलब्ध नव्हता. होता तो फक्त मुंबई सेंट्रल येथे असलेल्या सेंट्रल गॅरेजमध्ये.

मी एक शक्कल लढवली. स्पार्क प्लगच्या चिनीमाती आणि बाहेरील नळकांडे याच्या आत जी पोकळी असते, त्यात अ‍ॅरल्डाईट भरले आणि ते रात्रभर तसेच ठेवले. सकाळी अ‍ॅरल्डाईट घन झाल्यावर गाडीला लावून पाहिले, तर गाडी व्यवस्थित चालू झाली. पुण्यात कॅम्पात एक चक्कर मारून आलो. गाडी व्यवस्थित चालत होती. मग ए.एफ.एम.सी.मध्ये जाऊन माझे रेल्वे वॉरंट घेऊन आलो. त्यावर ही मोटारसायकल डेक्कन एक्स्प्रेसमध्ये बुक केली आणि त्याच वॉरंटवर माझेही वातानुकूलित कुर्सी यानचे तिकीट बुक केले. ३० तारखेला गाडी पुणे स्टेशनला चालवत नेली. मनात धाकधूक होतीच की गाडी मध्येच बंद पडली तर काय... पण सुदैवाने तसे काही झाले नाही. सुखात मुंबईत उतरलो. मित्रांना माझे सामान दिले आणि मोटरसायकल रेल्वेच्या सामानाच्या डब्यातून उतरवून घेतली आणि झक्कपैकी त्यावर बसून मुंबई सेंट्रलपर्यंत चालवत नेली आणि त्याचा स्पार्क प्लग बदलून घेतला.

२. छोट्याशा क्लृप्तीने वाचवले साडेसात लाख रुपये

१९९९-२००० साली मी गोव्याला नौदलाच्या जिवंती रुग्णालयात होतो. तेव्हा Y२K चा मोठा बोलबाला चालू होता. माझे सिमेन्स कंपनीचे सोनोलाईन हे सोनोग्राफी यंत्र Y२K कम्प्लायंट करण्यासाठी सिमेन्स कंपनीने अडीच लाखाचे कोटेशन (निविदा) दिले होते. तुमचे मशीन काम करणार नाही इ. इ. भीती त्यांचे अभियंते दाखवत होते, कारण त्यात ०० ही तारीख नाहीच.
मी विचार करत होतो की या कंपनीला फुकटचे अडीच लाख रुपये का द्यायचे? केवळ एक तारीख बदलायला? बराच विचार करून मी एक दिवस त्या यंत्राच्या संगणकात तारीख १९०० टाकली. त्या संगणकाला २००० माहीत नव्हते, पण १९०० माहीत होते. आणि काय गम्मत! यंत्र व्यवस्थित चालत होते. आता माझ्या लक्षात आले की रुग्णांना तुम्ही जो अहवाल देता, त्यात तारीख येते त्यात वर्षाचे फक्त शेवटचे दोन आकडे येतात - म्हणजे आजची तारीख १५-०८-१८. मग ही तारीख १९०० असो की २००० असो.

युरेका! मी आमच्या मासिक अहवालात 'माझे यंत्र Y२K कम्प्लायंट झाले' असा अहवाल दिला आणि माझ्यासाठी ही गोष्ट संपल्यात जमा झाली होती. तीन-चार दिवसांनी लष्कराच्या फोनवर मला पुण्याच्या मित्राचा फोन आला, तेव्हा माझ्या डोक्यात एकदम चमकले की ए.एफ.एम.सी. आणि अश्विनी रुग्णालयात अशीच यंत्रे आहेत. मी ताबडतोब त्या मित्राला माझी कल्पना सांगितली. तोही म्हणाला, "ही कल्पना चांगली आहे." प्रत्यक्ष १ जानेवारी २००० रोजी यंत्र चालेल की नाही, याची मला शंका होती. पण यंत्र उत्तम चालत होते. संगणक तसा 'ढ'च असतो. तुम्ही त्याला जे सांगाल तितकाच तो विचार करतो. आता फक्त एक फरक करावा लागणार होता, तो म्हणजे २८ फेब्रुवारीनंतर यंत्र सरळ १ मार्च दाखवणार होते. कारण १९०० सालात लीप वर्ष नव्हते. पण २०००मध्ये होते. म्हणून २९ फेब्रुवारी २००० रोजी यंत्राच्या संगणकात मी तारीख २९ फेब्रुवारी १९८० टाकली आणि येणाऱ्या सर्व अहवालात ८वर काळ्या शाईने ० काढले. १ मार्चला परत यंत्र १९०० सालात टाकले. मुंबई-पुण्यातील माझ्या मित्रांना मी हीच कल्पना सांगितली. यामुळे आमचा वैयक्तिक काहीच फायदा झाला नाही, परंतु सरकारचे आणि पर्यायाने भारतीय जनतेचे साडेसात लाख रुपये वाचवायचे मानसिक समाधान मात्र मिळाले. सिमेन्सच्या अभियंत्यांना फारसा आनंद झाला नव्हता आणि आर्थिक वर्ष संपल्यावर सिमेन्सच्या मुख्य अभियंत्याने हसत हसत मला "तुम्ही कंपनीचे साडेसात लाख रुपयांचे नुकसान केले" असे सांगितले.

३. शक्कल बोल्टला फिट करण्याची

विक्रांतवर असताना माझ्याकडे सिल्व्हर प्लस ही मोटरसायकल होती. ही मोटरसायकल 'झुंडाप' या मूळ जर्मन कंपनीची होती. ही कंपनी रॉयल एनफिल्डने विकत घेतली आणि वरील मोटरसायकल बाजारात आणली होती. एके दिवशी दुपारी बाहेर जाण्यासाठी मी विक्रांत जेट्टीवर मोटरसायकल चालू केली, तर तिचा फार आवाज येऊ लागला, म्हणून मी पाहायला लागलो तर मोटरसायकलच्या खाली जमिनीवर तेलाचे मोठे डाग दिसले. खाली वाकून पहिले तेव्हा मोटरसायकलच्या इंजीनातून तेल काढून टाकायचा ड्रेन प्लेगचा 'बोल्ट' जागेवर नव्हताच. (तो बहुधा कुठेतरी पडून गेला असावा.) त्यामुळे इंजीनमधील/गिअर बॉक्समधील सर्वच्या सर्व तेल गळून गेले होते. आता आली का पंचाईत?

मी विक्रांत जहाजाच्या इंजीन रूममध्ये गेलो. तेथे असलेल्या नौसैनिकाला १७ नंबरचा बोल्ट आहे का विचारले. तो बोल्ट घेऊन मी परत जेट्टीवर आलो आणि तो लावायचा प्रयत्न केला, तर तो बोल्ट नुसताच फिरत होता. मग त्या नौसैनिकानेही प्रयत्न केला, तरी काही होईना. मग मी त्या बोल्टच्या जागी बोट घालून पाहिले आणि माझ्या लक्षात आले की हा बोल्ट उलट्या थ्रेडचा आहे. नेहमीचा स्क्रू किंवा बोल्ट हा घड्याळाच्या दिशेने फिरवला तर घट्ट होतो आणि उलट फिरवला तर सैल होतो (याला RIGHT HANDED HELIX म्हणतात), तर या मोटारसायकलचा बोल्ट LEFT HANDED HELIX होता.

मग मी मित्राची मोटरसायकल घेऊन रॉयल एनफिल्डच्या शो रूममध्ये गेलो आणि त्यांना ड्रेन प्लेग मागितला, त्यावर तो उपलब्ध नाही म्हणून उत्तर आले.
केव्हा उपलब्ध होईल? माहीत नाही.
मग दुसऱ्या शो रूममध्ये गेलो. तेथेही तेच उत्तर.
केव्हा येईल? एक आठवड्याने चौकशी करा असे उत्तर आले.
आपली मोटरसायकल बरेच दिवस बंद आहे, ही एकट्या माणसाला फारच दुःखदायक बातमी असते.
वैतागून मी परत आलो. काय करावे या विचारात होतो. गिअर बॉक्सच्या खालच्या बाजूचा पृष्ठभाग सपाट आणि गुळगुळीत होता. दुसरा बोल्ट घुसवला तर थ्रेड निकामी होतील.
मग मला एक कल्पना सुचली. मी परत इंजीन रूममध्ये गेलो. तेथे असलेल्या त्या नौसैनिकाला विचारले की तुझ्याकडे १८ नंबरचा बोल्ट आहे का? त्याने तो काढून दिला. मी त्याला म्हणालो की "हा मशीनवर घासून मला उलट्या बाजूला थ्रेडिंग करून मिळेल का?"
मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. तो मला घेऊन परत बाहेर आला. त्याने त्या गिअर बॉक्सचे थ्रेड बोट घालून तपासले. त्याचा 'पिच आणि थ्रेड अँगल' समजून घेतला. (त्याने नुसते बोट आतमध्ये घातल्यावर त्याला पिच आणि थ्रेड अँगल लक्षात आला.) आणि पाच मिनिटात हा १८ नंबरचा बोल्ट घासून त्याला उलटे थ्रेड मारून दिले. मी लगेच तो बोल्ट तेथे स्प्रिंग वॉशरसकट लावून पहिला, तर एकदम फिट बसला.

मग मी विचार करत होतो की आता याचे वंगण तेल बाहेर जाऊन कसे आणायचे? त्यावर तो नौसैनिक म्हणाला की "सर, याला कुठले आणि किती तेल लागते?"
मी सांगितले, "६०० मि.ली. २० w ४०." तो म्हणाला, "दोन मिनिटे थांबा." तो आत जाऊन एका मोठ्या बुधल्यात तेल घेऊन आला. मी विचारले की "हे असे तेल कसे घेतलेले चालेल?"
त्यावर तो हसून म्हणाला, "सर, आपल्या जहाजाचे इंजीन ४०००० हॉर्सपॉवरचे आहे. त्याला आणि आपल्याकडे असलेल्या ६ डिझेल जनित्रांना टनावारी तेल लागते. नुसते त्याच्या २१० लीटरच्या एका रिकाम्या झालेल्या ल्यूब ऑइल ड्रमच्या तळाशी लीटरभर तेल निघेल. तुम्ही ६०० मि.ली.ची चिंता काय करताय?"
ते तेल वरून भरले, अर्धा मिनिट इंजीन चालवले आणि मोटारसायकलचे इंजीन एकदम मुलायम तर्‍हेने चालू झाले. पुढे ती मोटारसायकल विकेपर्यंत मी तो बोल्ट काही बदलायला गेलो नाही.

टीप - वरील गोष्ट एखाद्या मेकॅनिकल इंजीनियरसाठी अजिबात आश्चर्यजनक नाही.

श्रीगणेश लेखमाला २०१८

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

25 Sep 2018 - 10:12 am | पिलीयन रायडर

हे बिजागिरीचं लॉजिक बरंच कॉमन आहे. माझ्या घरात सगळे दरवाजे असेच लावलेले आहेत.

काही लोकांना ह्या गोष्टी बरोब्बर कळतात हे मात्र खरं. माझा चुलत भाऊ फुगलेले दरवाजे नीट बसवणे ते लॅपटॉप मध्ये अडकलेली CD काढणे ते गणपतीच्या मंडपातले लाईट फक्त बंद पडले तर ते दुरुस्त करणे असलं काय काय करत असतो. त्याला इन जनरल दुनियादारी जास्तच कळते. (बँका, रेल्वेची तिकिटं, LIC च्या पॉलिस्या..)

फुगलेले दरवाजे नीट कसे बसवतात? काही टीप आहे का? नुकताच पावसाळा सरुनही काही दरवाजे लागत नाहीयेत...

पिलीयन रायडर's picture

29 Sep 2018 - 8:49 pm | पिलीयन रायडर

त्याने हिंजेस टाईट केल्या वाटतं. ते थोडं खाली उतरल्या सारखं झालं होतं वाटतं. मी तिथे स्वतः नव्हते म्हणून नक्की ठाऊक नाहीये, विचारून सांगते पक्कं काय ते.

सुबोध खरे's picture

1 Oct 2018 - 6:33 pm | सुबोध खरे

दरवाजे फुगण्याची काही कारणे आहेत. एक म्हणजे कोरड्या हवेतील लाकूड (देशावरील लाकूड) दमट ठिकाणी (उदा कोकणात) वापरले तर ते पाणी शोषून घेते आणि फुगते. तसेच जितके घन लाकूड असेल तितके ते कमी फुगते. यामुळेच प्लायवूड सारखे हलके लाकूड पटकन फुगते.
या शिवाय लाकडावरील वार्निश रंग किंवा पॉलिश उडाले तर त्या ठिकाणहून लाकूड आर्द्रता शोषून घेते आणि फुगते. त्यातून जर दार आणि त्याची चौकट यातील फट फारच कमी असेल तरी लाकूड जरासे फुगले तरी बंद नीट होत नाही. आणि मग जास्त घर्षणाने त्यावरील पॉलीश निघून जाते आणि ते अधिकच फुगते.
याला उपाय म्हणजे पावसाळ्यापूर्वी लाकडावर रंधा मारून हि फट वाढवून घ्यावी आणि त्यावर वार्निश किंवा टचवूड (पॉली युरिथेन) सारखे आर्द्रतारोधक रोगण लावून घ्यावे. यामुळे पावसाळ्यात दार फुगणे हि समस्या कायमची दूर होते.

Nitin Palkar's picture

24 Sep 2018 - 6:52 pm | Nitin Palkar

ज्यांचे लेखन वाचणे नेहमीच आनंददायी असते अशा मिपा वरील लेखकांपैकी तुम्ही एक आहात. कदाचित हे मी या आधीही कधीतरी लिहिले असण्याची शक्यता आहे. असेच लिहिते रहा. _/\_

तिन्ही आयडियाज आवडल्यात.
पण एक शंका आली -
वाय२के च्या प्रॉब्लेमला निकालात काढण्यासाठी वर्ष बदललं तर तारखेत लीप वर्ष सोडून फरक पडायला नको, पण दिवस मात्र बदलेल. तसं झालं तर कॅलेंडर जिथं वापरलं जातं तिथे तारीख भलती आणि दिवस भलता असं होणार नाही का? की माझ्या समजुतीत कुठं घोळ आहे?

आणि या मशीनसंदर्भात कायदेशीर बाबींत / पुरावा / ऑडिट ट्रेल असा काही संबंध आल्यास तिथे अतितांत्रिक मुद्दाही युक्तिवादात वापरला जाऊ शकत असल्याने तिथे समस्या येऊ शकते.

या ठिकाणी कदाचित दिवस (सोम, मंगळ) असा काही आउटपुट येतच नसेल. त्यामुळे फरक पडणार नसेल.

सुबोध खरे's picture

25 Sep 2018 - 6:23 pm | सुबोध खरे

त्या यंत्रावर दिवस कुठेच येत नाही.

जयन्त बा शिम्पि's picture

2 Oct 2018 - 2:55 pm | जयन्त बा शिम्पि

गव्ह.पॉलिटेक्निक मध्ये शिकत असतांना,आमचे मेकॅनिकल डिपार्ट्मेंट चे प्रमुख श्री. मळेकर नावाचे प्रोफेसर होते. त्यांचे एकच सांगणे असायचे कि कोणतेही उपकरण बिघडले असता,स्वतः अगोदर प्रयत्न करुन बघा. अनेक वेळा उत्तर सापडते.अगदीच जमले नाही तर कारागिराकडे घेवून जा, नाहीतरी आपण त्यास बिघडलेल्या उपकरणाच्या दुरुस्तीचे पैसे तर देतोच ना ? शिवाय दुरुस्ती सुरु असतांना थोडे बारकाईने निरिक्षण करा. कदाचित पुढल्या वेळी,ते खराब झालेले उपकरण ,तुम्हीच ठीक करू शकाल. आमच्या घरातील सिलिंग फॅन,फिरतांना, खूप आवाज करीत असल्याचे लक्षात आले. फॅनची बेअरिंग बदलणे गरजेचे होते.ओळखीच्या वायरमनला दुरुस्तीबद्दल विचारले. बेअरिंगसहित २०० रुपये लागतील असे त्याने सांगितले. घरात स्क्रू ड्रायव्हर्,प्लायर्,हातोडी वगैरे हत्यारे होतीच.फॅन चे स्क्रु वगैरे काढून मोकळा केला. खरोखर बेअरिंग काढण्यासाठी इतका छोटा पुलोव्हर कोठेच मिळणार नव्हता. मग पुर्वी एकदा,हाताखाली काम करणार्‍या कारागिराने सांगितल्याप्रमाणे,बेअरिंगच्या मधल्या छिद्रापेक्षा,किंचित थोडा मोठा असा बोल्ट घेतला. चार मेणबत्या आणल्या. बेअरिंगच्या मधल्या भागात मेण ठासून भरण्यास सुरवात केली.जसजसे मेण आत जावू लागले,तसतशी बेअरिंग वर येवू लागून,पुर्णपणे बाहेर निघाली. मग त्याच बेअरिंगच्या साईजची नवीन बेअरिंग विकत आणली.किंमत फक्त रुपये ३०/-. आणि माझे काम झाले. पैसे वाचले ह्या पेक्षा,आपल्याला हे काम जमू शकले ह्याचा आनंद जास्त होता. त्यामुळे पुन्हा कधीही फॅनची बेअरिंग बदलण्यासाठी, इलेक्ट्रिक वायरमनला बोलावण्याची गरज पडली नाही.