बिष्टा पाहून आम्ही फाट्यावरुन सटाण्याच्या दिशेने वळालो आणि कोळीपाडा गावात पोहचलो. आमचे पुढचे लक्ष्य होते "कर्हा". वास्तविक कर्हा हे नाव उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर येते ती सासवडची कर्हा नदी आणि सासवडचे भुमीपुत्र असलेल्या आचार्य अत्रेंचे "कर्हेचे पाणी" हे आत्मचरित्र.
पण इथे आमच्या समोर कर्हा हा दुर्लक्षित किल्ला उभा होता. सर्वानुमते लंच ब्रेक घ्यायचे ठरले. पायथ्याशी असलेल्या घनदाट झाडीत सावली पाहून आम्ही बसलो , डबे उघडले. कोणाच्या डब्यात काय आहे, याचा आदमास घेउन आदलाबदली करत दुपारचे जेवण पार पडले. कितीही आवडले तरी यथेच्छ हादडून चालणार नव्हते, कारण वामकुक्षी घ्यायची नव्हती तर एक खड्या चढाचा किल्ला चढायचा होता, ते देखील एन बाराच्या उन्हात.
( कर्हा परिसराचा नकाशा )
वास्तविक कर्हा या गडावर जायचे असेल तर दोन मार्ग होते.
१ ) सटाणा ते कऱ्हागड हे अंतर १२ कि.मी.आहे.सटाण्याहुन दोधेश्वरमार्गे नामपुरला जाताना वाटेवर कऱ्हे नावाचे लहानसे गाव आहे. या गावाजवळच कऱ्हेगड वसला आहे. गडाचे नाव जरी कऱ्हागड असले तरी यावर जाणारी वाट मात्र कऱ्हे गावातुन न जाता गावाच्या विरूद्ध बाजूने वर जाते. कऱ्हागडाच्या उत्तरेहुन उतरलेल्या डोंगरसोंडेवरून किल्ल्यावर जाता येते. दोधेश्वर मंदिरानंतर एक छोटेसे मातीचे धरण दिसते. हे धरण ओलांडले कि एक घर दिसते व तेथुन मातीचा एक कच्चा रस्ता आत जंगलात जाताना दिसतो. येथून समोर दिसणारा डोंगर म्हणजेच कऱ्हागड.
दोधेश्वर मंदिर पांडवकालीन असल्याचे गावकरी सांगतात. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते.
२ ) सटाणा पासून १६ किमीवर किल्ल्याच्या पायथ्याचे कोळीपडा हे गाव आहे. सटाणाहून दोधेश्वर गावाकडे जातांना १४ किमीवर एक चौक लागतो. येथून समोर जाणारा रस्ता बिष्टा किल्ल्याच्या पायथ्याच्या कोटबेल गावाकडे जातो. उजव्या बाजूचा रस्ता कोळीपाडा गावात तर डाव्या बाजूचा रस्ता कर्हे गावाकडे जातो. कर्हे गावाकडे जाणार्या रस्त्यावर चौकापासून एक किमीवर डाव्याबाजूला एक कच्चा रस्ता जातो. या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर वाट जंगलात शिरते. या वाटेवर नव्याने बांधलेले सप्तशृंगी मातेचे देऊळ आहे. देवळाच्या पुढे पायवाट एका टेकडावर जाते. या टेकाडावर एक झेंडा लावलेला आहे. या टेकाडा वरून समोर कर्हा किल्ला दिसतो. मळलेली पायवाट किल्ल्यावर जाता येते.
सटाणाहून दिवसातून ५ एसटी बसेस कोटबेलला जातात. याच बस आपल्याला दोधेश्वर किंवा कोळीपाडा गावाच्या फाट्यावर सोडतात. सकाळी ७.३० सटाणा-भिलपुरी, सटाणा-चिंचवा दुपारी ११.३०, संध्याकाळी ५.०० वाजता सटाणा-चिंचवा. साक्री-सटाणा सकाळी ७. ०० वाजता गावात येते. गावातून ६ आसनी रिक्षा नामापूरला जातात . गडावर जाणाऱ्या बऱ्याच ढोरवाटा असुन सर्व वाटा गडाच्या माथ्यापाशी एकत्र येतात.
दोधेश्वरवरुन जाणारा रस्ता थोडा लांब पडतो. कोळीपाड्याच्या रस्त्याने जायचे झाले तर स्वताचे वाहन किल्ल्याच्या पायथाशी असलेल्या जंगलात बरेच आतपर्यंत नेता येते आणि अनावश्यक तंगडतोड वाचते. सहाजिकच आम्ही कोळीपाड्याच्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला. याठिकाणी आमच्याबरोबर श्री. रोशन भांगे ( 9145546280 ) हे गाईड म्हणून सोबत होते.
जेवण संपवून आम्ही गडाच्या दिशेने निघालो. जाताना भांगे यांनी बरीच नवीन माहिती दिली. हा किल्ला स्थानिक लोकांना अपरिचित असुन स्थानिक लोक याला भवानी डोंगर म्हणून ओळखतात. गडावर वर्षातुन एकदा भवानी देवीची यात्रा भरते अन्यथा गडावर कोणाचीही वर्दळ नसते.
या वाटेवर नव्याने बांधलेले सप्तशृंगी मातेचे देऊळ आहे.
सप्तशृंगी माता दशभुजा असून मुर्ती सुरेख वाटली. देवळाच्या पुढे पायवाट एका टेकडावर जाते. या टेकाडावर एक झेंडा लावलेला आहे.
या टेकाडा वरून समोर कर्हा किल्ला दिसतो. मळलेली पायवाट किल्ल्यावर चढतांना एरवी त्रास झाला नसता. मात्र भरल्या पोटी चढाई आणि डोक्यावर उन हे डेडली कॉम्बिनेशन तोंडाला फेस आणत होते. बर बसायला जावे तर पुर्ण डोंगर उघडाबोडला. सावली नावालाही नाही.
या पायवटेने १० मिनिटे चढल्यावर एका मोठ्या खडकाखाली दोन लाकडी पट्ट्यांवर माकडाची लाल रंगात रंगवलेली चित्र पाहायला मिळतात. स्थानिक लोक त्यांना माकडदेव म्हणतात. जेव्हा दुष्काळी परिस्थिती येते तेव्हा या देवाला नवस बोलायचा , हा माकडदेव पावसाला पाठवतो अशी ईथल्या स्थानिकांची श्रध्दा.
माकड देवाच दर्शन घेऊन २० मिनिटे चढल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. याठिकाणी किल्ल्याची माची आणि प्रवेशव्दार असण्याची शक्यता आहे. कारण याठिकाणी कमानीसाठी वापरले जाणारे दोन कोरीव दगड पडलेलेल आहेत. त्याचप्रमाणे इथे एक तुटका कोरीव दगडी स्तंभ पडलेला आहे. हा स्तंभ चारही बाजूंनी कोरलेला आहे.
सध्या त्यावरील प्रत्येक बाजूच्या दोन शिल्प चौकटी शाबूत आहेत. पण उन्हा पावसात राहील्यामुळे त्यावरील शिल्प झिजलेली आहेत. या स्तंभाच्या एका बाजूला गणपती कोरलेला आहे. त्याखालच्या चौकटीत ३ वादक बसलेले दाखवले आहेत.
एका बाजूला एक घोडेस्वार दाखवलेला आहे. पण इतर बाजूची शिल्प झिजल्यामुळे त्यावरील शिल्प ओळखण्या पलिकडे गेलेली आहेत. विशेष म्हणजे याच प्रकारचा पण सुस्थितीतील स्तंभ मी दुंधा किल्ल्याच्या पायथ्याशी पाहिला.
हे स्तंभ पाहून आम्ही पुढे निघालो. बालेकिल्ल्यापाशी पोहचल्यानंतर थोडे सावलीचे सुख लाभले. इथे थोडी विश्रांती घेतली.
माची वरुन १० मिनिटाचा चढ चढल्यावर आपल्याला कातळात कोरलेल्या पायर्या लागतात.
इथेच थोडीफार शिल्लक राहिलेली तटबंदी दिसते. कदाचित इथेच गडाचा दरवाजा असावा. आज मात्र त्याचे नामोनिशाण नाही.
याच ठिकाणी एक कातळ कोरीव गुहा आहे. किल्ल्यावर येणार्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी ही गुहा बनवलेली आहे. गुहेच्या पुढे २ मिनिटे चालल्यावर आपला गडावर प्रवेश होतो.
गडमाथ्या दोन टप्प्यांचा बनलेला आहे. सर्वोच्च माथ्याआधी थोडी सपाटी आहे.
तिथे पाण्याचे एक टाके आहे. मात्र हे टाके सध्या कोरडे पडले आहे.
हे पाहून आपण गडाच्या सर्वात वरच्या टप्प्यावर पोहचतो.
गडावर समोरच भवानी मातेचे नव्याने बांधलेले मंदिर आहे.
त्याच्या पाठी मागे २ पाण्याची कोरडी टाकी आहेत.
या टाक्यांच्या उजव्या बाजूला खाली उतरल्यावर एक पाण्याच प्रचंड मोठे गुहा टाक आहे. हे टाकही कोरडे आहे. टाक पाहून परत वर येऊन विरुध्द बाजूस खाली उतरल्यावर अजून एक पाण्याच टाक आहे. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही.
हे टाक पाहून त्याच्या पुढेच कड्याच्या दिशेने खाली इतरल्यावर एक कातळ टप्पा लागतो.
तो गिर्यारोहणाचे तंत्र वापरून काळजीपूर्व उतरल्यावर आपल्याला एका बाजूला एक असलेली तीन टाकी पाहायला मिळतात.
यातील शेवटच्या टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. ही टाकी पाहून परत गड माथ्यावरील मंदिरापाशी आल्यावर आपली गड फ़ेरी पूर्ण होते. गडावर पाण्याची तशी वानवाच आहे, तसेच मुक्काम करण्यायोग्य जागाही नाही. भवानी मंदिरात फारतर दोघेजण झोपु शकतात. गडाच्या परिसरातील पाउस विचारात घेता, इथे ऑगस्ट ते फ़ेब्रुवारी या कालावधीत जाणे योग्य होईल.
गडमाथा 3074 फुट उंचावर आहे. साहजिकच स्वच्छ हवेत इथून बराच मोठा परिसर दिसतो. कर्हेगडाच्या माथ्यावरून साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड, रतनगड, तांबोळ्या, मांगी – तुंगीचे सुळके,बिष्टा, फ़ोपिरा डोंगर डेरमाळ, पिसोळ, अजमेरा तसेच दुंधागड दिसतात. स्वच्छ हवेत अंजठा-सातमाळा रांगेचेही येथून दर्शन होते.कर्हेगडाच्या पायथ्यापासून देवळाणे हे गाव सात-आठ कि.मी. अंतरावर आहे. देवळाणे गावामध्ये प्राचीन असे शिवमंदिर आहे. या शिवमंदिरावरील काही शिल्पे प्रेक्षणीय आहेत
अजमेरा
आदल्या दिवशी बिष्टा, कर्हा आणि दुंधा पाहून दुंधेश्वर डोंगररांगेतील शेवटचा किल्ला म्हणजे "अजमेरा" पहाण्यासाठी आम्ही अजमेर सौंदाणे या गावामार्गे अजमेरा गडाच्या पायथ्याच्या पहाडेश्वर या डोंगरवस्तीवर दाखल झालो. आम्ही स्वताची गाडी घेउन आलो म्हणून हि वाटचाल सोपी होती. कारण पहाडेश्वरपर्यंत थेट बससेवा नाही. सटाण्यावरुन अजमेर सौंदाणेला एस.टी.बसची सोय आहे, तसेच खाजगी सहा आसनी रिक्षा धावतात.
( अजमेर सौंदाणे गावातून दिसणारा अजमेरा )
अजमेर सौंदाणे गावातून रस्ता पहाडेश्वर मंदिराकडे जातो. सौंदाणे हे एखाद्या गावापुढे आदरार्थी लावले जाते. या परिसरात डांग सौंदाणे, नाम सौंदाणे अशी आणखी गावे आहेत.
( अजमेरा- दुंधा गडाचा परिसर )
अजमेरा गडावर जाण्यासाठी दोन पर्याय आहेत.
१ ) सटाणा ते अजमेर सौंदाणे - हया पाच कि.मी.च्या पक्क्या रस्त्याने जाणे.
२ ) सटाणा-मालेगाव मार्गावरील ब्राम्हणगावमार्गे असलेल्या ८ कि.मी.कच्च्या रस्त्याने अजमेर सौंदाणे गाठणे.
अजमेर सौंदाणे ते पहाडेश्वर हे अंतर ४ किमी आहे. स्वताचे वहान नसेल तर हे अंतर चालतच पार करावे लागते.
पहाडेश्वर मंदिर हा अजमेरा किल्ल्याचा पायथा आहे.
डोंगराच्या गाभ्यात वसलेले पहाडेश्वर मंदिर व त्याच्या आजूबाजूचा प्रदेश अतिशय सुंदर आहे.
पहाडेश्वर हे शिवमंदिर मुळ काळ्या पाषाणाचे असावे. पण आता त्याचे नुतनीकरण केलेले आहे. परिसरात मुळ मंदिराचे दगड पहाण्यास मिळतात. मस्त चकचकीत टाईल्स आणि प्रशस्त हवेशीर मंदिर बघता ,हे ठिकाण मुक्कामायोग्य आहे. गाभार्यात पर्वतांचा देव "पहाडेश्वराची" पिंड आहे, तर बाहेर सभामंडपात गणपतीची घडीव मुर्ती आहे. या मंदिर परिसरात डाव्या हाताला दत्त मंदिर आहे. इथेच जवळ मोठा पाझरतलाव आहे. मंदिर परिसरात पुजार्याचे घर आहे.
पहाडेश्वराचे दर्शन घेऊन व गडावर पाण्याची सोय नसल्याने येथुन पाणी घेऊनच गडाकडे निघावे. शक्य झाल्यास अजमेरा किल्ला गाईड घेऊनच पाहावा कारण गडावर जाण्यास ठळक अशी वाट नाही.
पहाडेश्वराच्या कपाउंडला लागून एक कच्चा रस्ता डोण्गराला लगटून पुढे जातो. या रस्त्याने चालत गेल्यावर १० मिनिटात उजव्या बाजूला एक पत्र्याची शेड दिसते. त्यात शेंदुराचे ठिपके आणि त्रिशुळ काढलेला मोठा खडक आहे. त्याला माऊली म्हणून ओळखले जाते. डाव्या बाजूला एक खडक आहे. त्याला म्हसोबा म्हणतात. या म्हसोबाच्या मागे जो डोंगर आहे त्याच्या अर्ध्या उंचीवर गुहा आहेत. त्यात आदिवासींचा डोंगरदेव आहे.
डाव्या बाजूला अजमेरा किल्ल्याचा डोंगर आणि उजव्या बाजूला डोंगदेवाचा डोंगर ठेउन पायवाट पुढे दाट झाडीत शिरते. या झाडीतून १० मिनिटे चालल्यावर दोन डोंगरांच्या घळीतून डोंगर चढायला सुरुवात होते.
साधारण अर्ध्या ते पाऊण तासात आपण किल्ल्याच्या उध्वस्त प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. या ठिकाणी उजव्या बाजूला उध्वस्त बुरुजाचे आणि तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. गडावर प्रवेश केल्यावर प्रशस्त गडमाथा दिसतो.
आम्ही हा गड चढत असताना अर्ध्या उंचीच्या पठारावर पोहचल्यानंतर युवराज वाघ हा युवक आदिवासींच्या तारपा या वाद्यासारखे स्वता तयार केलेल वाद्य वाजवत होता. त्या वाद्याचे नाव त्याने "पावरा" सांगितले. आमच्याबरोबर अमित सांमत हे जाणकार दुर्गभटके होते. त्यांनी या वाद्यावर लोकसत्तामधे लिहीलेल्या लेखाची लिंक देतो.
शब्दचित्र : पावरीवाला
ट्रेकम्हणजे केवळ गड, किल्ले फिरणे नव्हे तर असे नवे नवे अनुभव गोळा करणे आणि स्वताला आणखी समृध्द करणे होय.
( अजमेरा गडाचा नकाशा )
गडाचा दरवाजा आजमितीस अस्तित्वात नसुन या ठिकाणी उजव्या बाजूला उध्वस्त गोल बुरुजाचे आणि तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात.
येथुन गडप्रवेश करून थोडे पुढे गेल्यावर गडाचा आटोपशीर गडमाथा नजरेस पडतो. प्रवेश केला त्याच्या समोरच टोकाला उंचावर झेंडा लावलेला दिसतो. हाच झेंडा आपल्याला गडाखालुन दिसत असतो.
झेंड्याच्या दिशेने चालायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला एक उंचवटा दिसतो त्या ठिकाणी एका भल्यामोठ्या वाड्याचे व सदरेचे उध्वस्त अवशेष आहेत तर डाव्या बाजूला पावसाळी तलाव आहे.
या पायवाटेने पुढे गेल्यावर उजव्या बाजूला उघड्यावरच महादेवाची पिंड आणि नंदी आहे.
महादेवाचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर उजव्या बाजूला दुसरा कोरडा पडलेला तलाव आहे. तलाव पाहून पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजुला दोन पाण्याची टाकी दिसतात त्यातील एक टाके बुजलेले असून दुसरे टाके पाण्याने भरलेले आहे पण पाणी मात्र पिण्यायोग्य नाही.
टाके पाहून गडाच्या टोकावरील उंचवट्यावर असलेल्या झेंड्यापाशी पोहोचावे. येथे आपली गडफेरी पुर्ण होते.
( अजमेरा गडावरुन दिसणारे पहाडेश्वर मंदिर व परिसर )
अजमेरा गडाचा गडमाथा लहान असल्याने गड पाहाण्यासाठी अर्धा तास पुरतो पण पायथ्यापासुन गडावर येण्यास दिड तास लागतो.
२८५४ उंचीच्या माथ्यावरुन साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड, रतनगड, तांबोळ्या, मांगी-तुंगीचे सुळके, बिष्टा , डेरमाळ, पिसोळ, कऱ्हा तसेच दुंधागड दिसतात. या किल्ल्यांचा आकार व रचना पाहाता यावर फारच थोडी शिबंदी रहात असावी असे वाटते. हा किल्ल्याचा डोंगर सुटा उभा असल्यामुळे या किल्ल्यावरुन आजूबाजूचा विस्तृत प्रदेश दिसतो त्यामुळे या किल्ल्यांचा उपयोग टेहाळणीसाठी करण्यात आला असावा.
तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची
संदर्भग्रंथः-
१) नाशिक जिल्हा गॅझेटिअर
२ ) दुर्गभ्रमंती नाशिकची:- अमित बोरोले
३ )शोध शिवछत्रपतिच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट
४ ) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६ ) www.durgbharari.com हि वेबसाईट
प्रतिक्रिया
29 Jun 2018 - 8:19 pm | अमरेंद्र बाहुबली
पुन्हा एकदा मस्त मेजवानी. आवडले दोन्ही गड. एकदा फिरायचंय सर्व गडांवर.
30 Jun 2018 - 9:05 am | प्रचेतस
मस्त वर्णन.
ह्या किल्ल्यांची माहिती फक्त डोंगरयात्रामध्येच वाचली होती. तुमच्या लेखनाने अगदी तपशीलवार माहिती मिळाली.
कर्हा किल्ल्यावरील तो कोरीव स्तंभ बहुधा भग्न वीरगळ असावा.
30 Jun 2018 - 12:18 pm | एस
छान माहिती. पावरा या वाद्याचा लोकसत्तामध्ये दिलेला फोटो इथेही टाकता आल्यास अजून चांगले होईल.
3 Jul 2018 - 10:56 am | दुर्गविहारी
प्रतिसादाबध्दल धन्यवाद ! धाग्यात फोटो टाकला आहे.
2 Jul 2018 - 8:49 pm | टर्मीनेटर
दोन्ही गड आणि फोटो + माहिती छानच.
3 Jul 2018 - 10:58 am | दुर्गविहारी
बाहुबली, वल्लीदा आणि टर्मिनेटर मनापासून धन्यवाद.
3 Jul 2018 - 2:52 pm | पाटीलभाऊ
छान माहिती
4 Jul 2018 - 9:09 pm | बरखा
फोटो आणि माहिती खुप छान दिली आहे.
4 Jul 2018 - 9:12 pm | बरखा
फोटो आणि माहिती खुप छान दिली आहे.
8 Jul 2018 - 1:07 am | शशिकांत ओक
मित्रा,
गिरी दर्शन आणि कथन यांचा सुरेख संगम आहे...
8 Jul 2018 - 11:35 am | दुर्गविहारी
सर्वच प्रतिसादकांचे आणि वाचकांचे मनापासून आभार. १३ जुलैला दुंधा ह्या चौकडीतील शेवटच्या गडावर धागा येईल.