रसायनांचा पूर आणि हॉर्मोन्सचा बिघडलेला सूर

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
25 May 2018 - 9:39 pm

सध्याच्या युगात विविध रसायने ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेली आहेत. त्यातील काही नैसर्गिक आहेत तर काही मानवनिर्मित. आज माणसाने विविध कारणांसाठी बनवलेल्या रसायनांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे! ती बनवण्यामागे विविध उद्देश होते खरे पण, त्यांच्या बेलगाम वापरामुळे तीच आता आपल्यावर बूमरॅंग झाली आहेत. त्याचे अनेक दुष्परिणाम आपण सध्या भोगत आहोत. त्यामध्ये श्वसनविकार, कर्करोग आणि हॉर्मोन्सची बिघडलेली यंत्रणा अशा अनेक आजारांचा समावेश होतो.

रसायने आणि कर्करोग या विषयावरील विवेचन माझ्या मिपावरील पूर्वीच्या एका लेखात (http://www.misalpav.com/node/41581) केलेले आहे. या लेखात आपण रसायनांचा हॉर्मोन यंत्रणांवर होणारा परिणाम बघणार आहोत.

सुमारे ८०० रसायने ही आपल्या हॉर्मोन्सच्या कार्यात व्यत्यय आणतात आणि त्यामुळे शरीरात व्याधी निर्माण होतात. हे वाचून क्षणभर विश्वास बसणार नाही, पण ते वास्तव आहे. अशा काही रसायनांचा विचार या लेखात केला आहे.
रसायनांच्या संपर्काचे मार्ग :

ही रसायने आपल्या शरीरात खालील मार्गांनी शिरतात:
१. नैसर्गिक पिके व पाणी
२. कीटकनाशके व औद्योगिक वापर
३. प्लास्टिकच्या संपर्कातील खाद्य-पेय पदार्थ व पाणी
४. धूम्रपान व मद्यपान
५. वैद्यकातील औषधे
६. सौंदर्यप्रसाधने व घरगुती स्वच्छतेची रसायने
७. इलेक्ट्रोनिक उपकरणे

या रसायनांशी आपला संपर्क आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांत येत असतो. तो जर माणसाच्या गर्भावस्थेत किंवा वयाच्या तीन वर्षांपर्यंत आला तर त्याचे परिणाम हे अधिक वाईट असतात. मुले वयात येण्याचा काळ तर खूप संवेदनशील असतो. तेव्हा जननेंद्रियांची वाढ आणि पुरुषत्व वा स्त्रीत्व प्रस्थापित होणे या महत्वाच्या घटना घडतात. घातक रसायनांनी या गोष्टी बऱ्यापैकी बिघडवल्या आहेत.
तसेच स्तन, प्रोस्टेट आणि थायरोईड या ग्रंथीमध्ये रसायनांमुळे होणारे बिघाड गुंतागुंतीचे असतात. रसायने सुरवातीस संबंधित अवयवात हॉर्मोन-बिघाड करतात आणि मग त्याचे पर्यवसान कर्करोगात होऊ शकते.

बरीच रसायने ही ‘इस्ट्रोजेन’ या स्त्री-हॉर्मोन सारख्या गुणधर्माची असतात. त्यांचा पुरुषांच्या शरीरातील शिरकावामुळे पुरुष-जननेंद्रियांच्या अनेक समस्या आणि वंध्यत्व उद्भवते. या गोष्टी विसाव्या शतकात वाढीस लागल्याचे दिसून येते. काही रसायनांचे परिणाम तर पुढच्या पिढीपर्यंत गेलेले दिसतात. हॉरमोन्सच्या यंत्रणा बिघडवणाऱ्या असंख्य रसायनांपैकी (Endocrine Disrupting Chemicals) बारा रसायने ही आपल्या नित्य संपर्कात येतात आणि त्यांना ‘डर्टी डझन’ असे म्हटले जाते. त्यातील काही महत्वाच्या रसायनांची माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

table

वरील तक्त्यात दिलेली रसायने म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. प्रत्यक्षात त्यांची व्याप्ती खूप मोठी आहे. यापैकी काहींचा विचार आता विस्ताराने करू.

१. Bisphenol A : हे रसायन प्लास्टिकच्या वेष्टनातले खाद्य-पेय पदार्थ व पाणी यांच्यातर्फे शरीरात शिरते. सध्याच्या आपल्या आहारशैलीमुळे ते रोज कुठल्यातरी प्रकारे शरीरात जातेच. एका वेळेस त्याचे शरीरात जाणारे प्रमाण तसे कमी असते. पुढे त्याचा चयापचय होऊन ते काही तासातच लघवीतून उत्सर्जित होते. पण दिवसभरात आपण जर सतत प्लास्टिक-संपर्कातील अन्नपाण्याचे सेवन करत राहिलो तर मात्र त्याचा ‘डोस’ सतत मिळत राहतो आणि ते रक्तात काही प्रमाणात साठत राहते. तेव्हा प्रवास वगळता इतर सर्व वेळी आपण उठसूठ प्लास्टिक बाटलीतले पाणी पिणे टाळले पाहिजे. अन्नपाणी साठवण्यासाठी भविष्यात प्लास्टिकला योग्य आरोग्यपूरक पर्याय निघण्याची नितांत गरज आहे.

२. Phthalates : अनेक सुगंधी प्रसाधनांमधून शरीरात जाणारी ही रसायने. त्यांचे पुरुषाच्या अंडाशयाशी चांगलेच वैर आहे. तेथील जननपेशींचा ती बऱ्यापैकी नाश करतात. त्यामुळे वीर्यातील शुक्राणूंची संख्या कमी होते तसेच त्यांची हालचालही मंद होते. यातून पुरुष-वंध्यत्व येऊ शकते. या व्यतिरिक्त त्यांचा स्वादुपिंड आणि थायरोइड ग्रंथींवरही विपरीत परिणाम होतो. त्यातून मधुमेह, स्थूलता आणि थायरोइडचे विकार होऊ शकतात.
अलीकडे केसांची ‘निगा’ राखणाऱ्या प्रसाधानांमध्ये ही रसायने मोठ्या प्रमाणात आढळली आहेत. तेव्हा अशी प्रसाधने वापरणाऱ्या स्त्रियांनो, सावधान !

३. शिसे: या जड धातूचे मेंदू व मूत्रपिंडावरील दुष्परिणाम परिचित आहेत. अलीकडे त्याचे हॉर्मोन यंत्रणेवरील दुष्परिणामही दिसून आले आहेत. शरीरातील बहुसंख्य हॉर्मोन्स ही स्वयंभू नसून ती मेंदूतील एका प्रमुख ग्रंथीच्या नियंत्रणाखाली असतात. तर ही ‘सर्वोच्च नियंत्रण ग्रंथी’ म्हणजे hypothalamus होय. हिच्यातून विविध ‘प्रवाही’ हॉर्मोन्स स्त्रवतात.
पुढे ही हॉरमोन्स pituitary या मेंदूतल्या दुसऱ्या ग्रंथीत पोचतात आणि तिला उत्तेजित करतात. मग ही ग्रंथी त्यांना प्रतिसाद म्हणून स्वतःची ‘उत्तेजक’ हॉर्मोन्स तयार करते आणि रक्तात सोडते. पुढे ही हॉर्मोन्स (त्यांच्या प्रकारानुसार) थायरॉइड, adrenal ग्रंथी किंवा जननेंद्रिये यांच्यात पोचतात आणि त्या ग्रंथींना उत्तेजित करतात. सरतेशेवटी या ग्रंथी त्यांची स्वतःची हॉर्मोन्स तयार करतात. या उतरंडीतील सर्वोच्च स्थानावर शिसे दुष्परिणाम करते. त्यातून आपली अख्खी हॉर्मोन यंत्रणाच खिळखिळी होते.

४. धूम्रपान व मद्यपानातील रसायने: तंबाकूच्या धुरातून benzopyrene, aromatic polycyclic hydrocarbons आणि cadmium ही रसायने शरीरात जातात. तर काही प्रकारच्या वाईन्समध्ये Resveratrol हे रसायन असते. ही सर्व रसायने आपली हॉर्मोन यंत्रणा बिघडवतात. महत्वाचे म्हणजे सर्व गर्भवतीनी या व्यसनांपासून लांब राहावे.

५. वैद्यकातील औषधे : यापैकी काहींचा दुष्परिणाम हा हॉर्मोन-बिघाड करतो. दोन ठळक उदाहरणे म्हणजे diethylstilbestrol (एक कृत्रिम इस्ट्रोजेन) आणि spironolactone ( एक मूत्रप्रमाण वाढवणारे औषध). अशा औषधांचा वापर नेहमी काळजीपूर्वक केला पाहिजे.

आधुनिक जीवनशैलीत आपण अनेक खोट्या प्रतिष्ठांपायी अनेक अनावश्यक रसायनांना आपल्या शरीरात धुडगूस घालू दिला आहे आणि त्यांचे परिणाम चिंताजनक आहेत. आपल्या हॉर्मोन-ग्रंथींमध्ये जननेंद्रिये व थायरॉइड या खूप संवेदनक्षम आहेत म्हणून त्यांचे बिघाड जास्त दिसतात. काही वैज्ञानिकांनी तर अशी भीती व्यक्त केली आहे की अशा बिघाडामधून समलैंगिकता किंवा लिंगबदल करण्याची इच्छा या गोष्टी वाढू शकतील.

सध्याच्या सामाजिक आरोग्यावर एकंदरीत नजर टाकता काही आजारांचे खूप वाढलेले प्रमाण लक्षात येईल. यामध्ये तरुणींमधील थायरॉइड विकार, स्त्री-पुरुष वंध्यत्व आणि तारुण्यात जडणारा मधुमेह यांचा समावेश आहे. याचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्या बहुमूल्य हॉर्मोन यंत्रणांना आपण आटोकाट जपले पाहिजे. त्यासाठी घातक व अनावश्यक रसायनांचा वापर टाळणे किंवा अगदी कमीतकमी करणे, हे गांभीर्याने घ्यायची गरज आहे.
*********************************************************************

* पूर्वप्रसिद्धी (संक्षिप्त स्वरुपात) : दै. सकाळ, पुणे.

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

उत्तम माहिती दिली आहे. विशेषतः प्रतिबंधात्मक उपायांवर अजून विस्ताराने लिहू शकाल का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2018 - 9:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख.

कुमार१'s picture

26 May 2018 - 9:10 am | कुमार१

आभार.
सवडीने पूरक माहिती देतो

जगाची लोकसंख्या /जन्मदर कमी होण्यास जर हातभार लागणार असेल तर ही केमिकल्स वरदान च म्हणावी लागतील

मदनबाण's picture

30 Jun 2019 - 10:37 am | मदनबाण

इजूभाऊ अणूबॉम्ब पण वरदान म्हणायचा का ? नाही तो वापरुन मोठ्या लोकसंख्येची लगेच डायरेक्ट वाफ करण्याची सोय करता येते !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant

manguu@mail.com's picture

27 May 2018 - 12:16 am | manguu@mail.com

छान

नवीन प्रतिसादकांचे आभार.

@ एस, प्रतिबंधात्मक उपाय लेखातील तक्त्यात दिलेले आहेत. शिसे संबंधी दोन मुद्दे अधोरेखित करतो.

१. पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण हा महत्वाचा मुद्दा आहे. प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळण्याच्या उद्दिष्टापासून आपण अजून बरेच दूर आहोत.
२. वृत्तपत्राच्या कागदात खाद्यपदार्थ विकणे ही तर आपल्याकडची अत्यंत वाईट खोड आहे. अशा कागदात घेऊन वडापाव वा भेळ मिटक्या मारत खाताना बरेच सुशिक्षितही दिसतात. ते विकणाऱ्यांचे प्रबोधन हेही व्हायला हवे. अन्य पर्यायी कागद वापरला पाहिजे. काही लोक तर पेपराच्या कागदात गुंडाळून शिरा व साखरफुटाणेही देतात. याची सुधारणा तर वैयक्तिक पातळीवरच आहे.

अनिंद्य's picture

28 May 2018 - 11:03 am | अनिंद्य

उत्तम माहिती आणि आखीव-रेखीव लेख.

'प्लास्टिक सर्वव्यापी' ते 'प्लास्टिक बंदी' असे एक आवर्तन पूर्ण झाले आहे, उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खते-पीक सुरक्षा ते परत जुनीच सेंद्रिय शेती असेही होत आहे. उशिरा का होईना योग्य दिशेनी पडणारी पावले महत्वाची.

रसायनांचा पूर थोडा ओसरावा हीच कामना.

पु ले शु

आपल्या हातात आता काही राहीले नाही हो. साधं ऊदाहरण: माझी शेती आहे चार-साडेचार एकर. भरपुर पाणी. नकाशावर आलय माझं गाव शेतीसाठी. मी गेली आठ दहा वर्षे सेंद्रीय शेती करतोय. पण मी काढलेल्या भाजीपाल्यात सगळे दुर्गूण असतात जे रासायणीक खते वगैरे वापरल्यावर येतात. मी तज्ञाला विचारलं तर तो म्हणाला "तुम्ही सेंद्रीय शेती करुन काय ऊपयोग? आजुबाजूला जे वापरलं जातं ते तुमच्या शेतात कुठल्या ना कुठल्या मार्गाने येणारच. मग ते पर्क्युलेशन असो, हवेतुन येणारी औषधे असोत आणि अजुन अनेक कारणे. म्हणजे मला दोष नसलेले ऊत्पन्न घ्यायचे असेल तर दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागेल. आणि ते कधिच सुधारणार नाही हे मला पक्के माहित आहे. मग काय करावे?

मराठी कथालेखक's picture

28 May 2018 - 6:52 pm | मराठी कथालेखक

पण मी काढलेल्या भाजीपाल्यात सगळे दुर्गूण असतात जे रासायणीक खते वगैरे वापरल्यावर येतात

पण तुमच्या उत्पादनांत या दुर्गुणांचे प्रमाण तरी बरेच कमी असेल ..तसे असले तरी खूप काही मिळवले असे म्हणता येईल.

अनिंद्य's picture

29 May 2018 - 11:13 am | अनिंद्य

@शाली,

बरोबर आहे. निसर्ग गुन्हा आणि शिक्षा यांच्यात तारतम्य ठेवणारच. मानवाने काही दशकं ओरबाडलेल्या पृथ्वीला एकदाच 'सॉरी' म्हणून सगळे पूर्वीसारखे होणे अवघड आहे.

योग्य दिशेने वाटचाल करीत राहणे महत्वाचे आहे, ते तुम्ही करता आहेत.

कुमार१'s picture

28 May 2018 - 5:37 pm | कुमार१

अनिंद्य, उत्तम प्रतिसाद. सहमत.

शाली, बरोबर आहे तुमचे. हताश व्हायला होते पण जेवढे शक्य आहे तेवढे तरी करावे असे वाटते.

नेहमी प्रमाणेच उत्तम लेख!

सुधीर कांदळकर's picture

28 May 2018 - 6:24 pm | सुधीर कांदळकर

आवडला. धन्यवाद

तेजस आठवले's picture

28 May 2018 - 7:31 pm | तेजस आठवले

चांगला लेख.पण थोडा त्रोटक झाला आहे.अजून भर घातलीत तर चांगले होईल.
प्लास्टिक ह्या गोष्टीने आता आयुष्य इतके व्यापले आहे की त्यापासून आता सुटका नाही. सकाळी आणि रात्री दात घासताना वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या टूथब्रश पासून ते प्यायच्या पाण्यापासून सगळीकडेच. पिण्याचे पाणी अथवा शीतपेये प्लॅस्टिकच्या बाटल्यात असतात, रोजचे सकाळचे दूध प्लास्टिक पिशवीत असते, ऑफिसचा डबा पण प्लास्टिकचाच.
वर्तमानपत्रात गुंडाळलेले पदार्थ उदा फरसाण, भेळ, वडे, भजी.ह्यात कितीतरी वेळा त्या पदार्थावर शाई उमटलेली दिसते. आपण हे टाळू शकतो पण आपली सर्वच बाबतीतली अनास्था हे एक वेगळेच प्रकरण आहे. अर्थात ऍसिडिटीचा त्रास असून चमचमीत मिसळ खाऊन लगेच पुढच्या मिनिटाला अँटासिड घेणारी लोकं या जगात असल्याने कोणी कोणाला काय समजवावे हा एक गहन प्रश्न आहे.
रसायनं इतकी सर्वव्यापी झाली आहेत की त्यांचा अंश नसलेली वस्तू सापडणे कठीण.

नितीन, सुधीर व तेजस, अनेक आभार.
प्रतिसादाच्या अनुषंगाने थोडी भर घालतो आहे.

निशाचर's picture

29 May 2018 - 4:51 am | निशाचर

माहितीपूर्ण लेख

कुमार१'s picture

29 May 2018 - 7:36 am | कुमार१

नवीन प्रतिसादकांचे आभार.

हॉर्मोनचा बिघाड करणारी रसायने शरीरात दोन प्रकारे वावरतात:
१. काही आपल्या मेदाशी एकरूप होतात आणि त्यामुळे शरीरात दीर्घकाळ साठून राहतात. मग ती सतत रक्तात सोडली जातात. याची ठळक उदाहरणे म्हणजे कीटकनाशके आणि PCBs. PCBs ही मत्स्याहारातून शिरतात.

२. तर इतर काही लगेच विघटीत होणारी असल्याने साठून राहत नाहीत. प्लास्टिकमधून येणारे Bisphenol A हे याचे उदा.

या रसायनांनी अगदी उच्छाद मांडला आहे.

प्रोसेस फूड मधून प्रिझर्व्हेटिव्ह्ज् शरीरात जातात त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची समस्या पुढे आली आहे. मृत्यू नंतर पुरलेल्या शरीराचे लवकर विघटन होत नाही त्यामुळे स्मशानभूमी मध्ये जागेचा मोठा प्रॉब्लेम होत आहे असे समजते.

या कारणास्तव अनेक लोकं ग्रँड फिनाली बार्बेक्यूला प्राधान्य देत आहेत.

अनिंद्य's picture

29 May 2018 - 11:21 am | अनिंद्य

@ चामुंडराय,

ग्रँड फिनाली बार्बेक्यू :-) आपल्या देशात ते शतकानुशतकं होतेच आहे. धार्मिक कारणे बाजूला ठेवली तरी प्रेतांच्या विल्हेवाटीचा शवदहन हा मार्ग सर्वोत्तम आहे. शॉर्ट स्वीट अँड सिम्पल !

आता रसायनांमुळे शव जाळायला काही अडचणी येत असतील तर माहित नाही :-)

शव दहनाच्या बाबत " बार्बेक्यू" हा शब्द खटकतो. शब्दकोशा नुसार ती अन्न शिजवायची (cook) पद्धत आहे. स्पष्टीकरण वाचण्यास उत्सुक.

चामुंडराय's picture

30 May 2018 - 7:43 am | चामुंडराय

बार्बेक्यू करताना मांस अग्नीवर भाजतात तर शवदहन करताना मांस अग्नीने जाळतात म्हणून बार्बेक्यू हा शब्द वापरला.
शब्दकोशातील शब्दशः अर्थ लागू होणार नाही हे मान्यच (या निमित्ताने शब्दकोशांवरील तुमचा धागा आठवला).

जन्म घेतेवेळी जी काही एलेमेंट्स (पंचमहाभूते) निसर्गाकडून घेतलेली असतात त्यातील बहुतांश शवदहन करते वेळी निसर्गाला ताबडतोब परत दिली जातात, अगदी आजकालच्या इन्स्टंट्च्या जमान्याला साजेसे.

आणि सध्याच्या बैठ्या जीवनशैलीमुळे बरीच मंडळी अतिरिक्त चरबी बाळगून असतात (फॅट या अर्थाने) त्यामुळे एकदा पेटवलं कि भरभर राख होते हा एक फायदा...

कुमार१'s picture

30 May 2018 - 8:52 am | कुमार१

धन्यवाद. चांगली माहिती

चौकटराजा's picture

29 May 2018 - 11:26 am | चौकटराजा

सद्या मी घरात इन्वरटर बसवू पहात आहे . त्याच्या बॅटरीतून शिसेयुक्त वाफा बाहेर पडतात का ? घरातील सर्वात कमी वापर ड्राय बाल्कनीचा असल्याने व त्या जागी वायू विजन उत्तम आल्याने तिथे ती बॅटरी ठेवावी काय ?

चौकटराजा's picture

29 May 2018 - 11:26 am | चौकटराजा

सद्या मी घरात इन्वरटर बसवू पहात आहे . त्याच्या बॅटरीतून शिसेयुक्त वाफा बाहेर पडतात का ? घरातील सर्वात कमी वापर ड्राय बाल्कनीचा असल्याने व त्या जागी वायू विजन उत्तम आल्याने तिथे ती बॅटरी ठेवावी काय ?

बॅटरीतुन शिसे युक्त वाफ बाहेर पडत असण्याची शक्यता नाही कारण शिशाचे बाष्पीभवन तापमान १७४९ अंश सेल्सियस आहे.
बॅटरीतून ओव्हर चार्जिंग मुले किंवा पाणी जास्त झाल्यामुळे त्यातील इलेक्ट्रोलाईट बाहेर येऊन सल्फ्युरिक आम्लाच्या वाफ बाहेर पडू शकतात. यासाठी बॅटरी जेथे मोकळी हवा आहे अशा ठिकाणी ठेवणे श्रेयस्कर आहे.

डॉक्टरसाहेब मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत . नाराज होऊ नका पण मी ते या लेखात विचारतोय . सर्वप्रथम मी आपल्या लेखांचा पंखा आहे हे सांगतो . आपले बहुतेक लेख मी साठवतो आणि इतरांना पाठवतो . तर पडलेले प्रश्न कर्करोगासंबंधित आहेत

१ कर्करोग हा उपचारानंतर पुन्हा बळावू नये म्हणून कुठली उपाययोजना आहे का ?

२ कर्करोग टाळण्यासाठी खानपानामध्ये आधीच कुठल्या विशेष आहाराला महत्व द्यावे का ?

३ कर्करोग झाला आहे कि नाही ते समजण्यासाठी कुठल्या चाचण्या आवश्यक आहे ?

मी हे सर्व विचारतोय कारण माझ्या अवतीभवती मी बरीच या रोगाशी निगडित उदाहरण बघितली आहेत . कैक लोकांना आयुष्यातून उठताना बघितलं आहे . त्यांची होणारी हेळसांड आणि तो खर्च , आम्ही केलेल्या मदतीसमोर अफाट होता .

जर आपण थोडा वेळ असेल आणि यावर विस्तृत प्रकाश टाकलात तर फार उपकार होतील .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

कर्करोग हा उपचारानंतर पुन्हा बळावू नये म्हणून कुठली उपाययोजना आहे का ?>>>

उपचारानंतर तो पुन्हा उदभवतोय का ते पाहण्यासाठी त्याच्या प्रकारानुसार काही चाचण्या नियमित करून पहायच्या असतात. जर त्या होकारत्मक आल्या तर उपचार करता येतील. ते रोगाचे इंद्रिय व प्रकार यानुसार भिन्न असतील. इथे १-२ वाक्यात नाही लिहिता येणार.

२ कर्करोग टाळण्यासाठी खानपानामध्ये आधीच कुठल्या विशेष आहाराला महत्व द्यावे का ? >>>

जीवनसत्वे अ आणि क ही प्रतिबंधात्मक आहेत. त्यासाठी गाजर व लिंबू व्यवस्थित खात राहावे. काहींच्या प्रतिबंधासाठी लाल मांस न खाणे फायद्याचे. धूम्रपान बंद व मद्यपान कमीत कमी असावे.

३ कर्करोग झाला आहे कि नाही ते समजण्यासाठी कुठल्या चाचण्या आवश्यक आहे >>>>

हे मी सविस्तर माझ्या ‘तंदुरुस्त की नादुरुस्त’ या लेखमालेत लिहिले आहे. ती बघावी.

धन्यवाद डॉक्टरसाहेब . मी आपला प्रतिसाद उशिरा वाचला . दिलगिरी व्यक्त करतो , मान्य असावी . ‘तंदुरुस्त की नादुरुस्त’ हि वाचाखुन पहिलीच साठवली आहे त्यातील मजकूर पुन्हा एकदा वाचून घेईन म्हणतोय .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

कुमार१'s picture

5 Jun 2018 - 6:06 am | कुमार१

आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त
सर्वांना शुभेच्छा!
तसेच चांगल्या चर्चेबद्दल आभार .

कलंत्री's picture

10 Jun 2018 - 10:05 pm | कलंत्री

प्लॅस्टीक आणि रासायने म्हणजे भस्मासूरच आहेत. ज्यांनी जन्म दिला त्यांचांच घात करीत आहे.

भारतातील बऱ्याच branded मिठांत सूक्ष्म प्लॅस्टिकचे कण आढळून आले आहेत. अलीकडेच आय आय टी, मुंबई च्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

याचे मूळ कारण म्हणजे समुद्रात होणारे प्लॅस्टिक-प्रदूषण हे होय.

कुमार१'s picture

27 Jun 2019 - 4:28 pm | कुमार१

'दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर महिन्याभरात बंदी लागू करण्यात येणार आहे. मात्र दुधाच्या पिशव्या पूर्णपणे बंद करण्यात येणार नाहीत, असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत जाहीर केलं…..'

( बातमी इथे: https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/plastic-ban).

गड्डा झब्बू's picture

27 Jun 2019 - 5:11 pm | गड्डा झब्बू

लिंक वर क्लीक केल्यावर ४०४ error yet aahe.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jun 2019 - 9:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

दुधाच्या पिशव्यांचा उल्लेख आला म्हणून त्यासंबंधातील एक खूप महत्वाची गोष्ट आठवली...

दुधाची आणि इतर कोणतीही प्लस्टिकची पिशवी उघडताना आपण सहजपणे तिच्या एका टोकाचा छोटा त्रिकोणी भाग कापतो. शेकडो-हजारो-लाखोंच्या संखेने असे छोटे त्रिकोण दररोज कचर्‍यात टाकले जातात. पाईप्स किंवा पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या छोट्या तोंडांत/छिद्रात या अश्या अनेक छोट्या त्रिकोणांचा बोळा बसतो व तो साफ करणे कठीण असते. आख्ख्या प्लस्टिकच्या पिशव्या पाण्याच्या प्रवाहात असल्या किंवा पाण्याचा निचरा करणार्‍या छिद्राच्या तोंडाबर अडकल्या तरी त्या तुलनेने सहजपणे साफ करता येतात.

एकंदरीत, व्यवहारात, प्लस्टिकच्या पिशव्या धोकादायक आहेतच, पण त्यांच्या टोकांचे कापलेले छोटे त्रिकोण जास्त धोकादायक आहेत, ज्यांचा धोका प्लास्टिकच्या पिशवीची योग्य विल्हेवाट लावली तरी कायम राहतो... कारणे हे त्रिकोण सर्वसामान्य कचर्‍यातून निचरा होणार्‍या पाण्याच्या जातात.

यावर उपाय म्हणून, प्लास्टिकची पिशवी उघडताना, पिशवीचे टोक पूर्णपणे कापून वेगळे करण्याऐवजी, तेथे एक छोटा काप द्यावा आणि मग कात्रीचे एक टोक पिशवीत घालून बनवलेले छिद्र मोठे करावे. प्रत्येकाने एवढे केले तरी प्लस्टिकच्या पिशवीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येईल.

******

हे इथे एवढ्यासाठी लिहिले आहे की, व्यवहारात, प्लस्टिक आपल्या जीवनातून पूर्णपणे नाहीसे होणे शक्य नाही. तेव्हा त्याचा योग्य वापर करून फायदा मिळवणे आणि जबाबदारपणे विल्हेवाट लावणे, हेच अंतिम फायद्याचे होईल.

कुमार१'s picture

28 Jun 2019 - 5:52 am | कुमार१

अतिशय चांगली सूचना, धन्यवाद !

प्रकाश घाटपांडे's picture

29 Jun 2019 - 10:00 am | प्रकाश घाटपांडे

यावर उपाय म्हणून, प्लास्टिकची पिशवी उघडताना, पिशवीचे टोक पूर्णपणे कापून वेगळे करण्याऐवजी, तेथे एक छोटा काप द्यावा आणि मग कात्रीचे एक टोक पिशवीत घालून बनवलेले छिद्र मोठे करावे

पण त्यामुळे दुधाच्या धारेवर परिणाम होणार नाही का ओतताना?

कुमार१'s picture

29 Jun 2019 - 7:48 pm | कुमार१

पण, धारेची सवय करता येइल हळूहळू. प्लास्टिकच्या त्रिकोणी तुकड्यांची समस्या अधिक तापदायक आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jun 2019 - 7:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

पण त्यामुळे दुधाच्या धारेवर परिणाम होणार नाही का ओतताना?

पुरेसे मोठे (सुमारे १ सेमी लांबीचे) छिद्र केल्यास दुधाची योग्य धार पडते, हे स्वानुभवावरून सांगू शकतो. एकदा करून पहा, अजिबात कठीण अथवा गैरसोईचे नाही... प्रश्न फक्त सुयोग्य सवयीचा आहे.

कुमार१'s picture

27 Jun 2019 - 5:57 pm | कुमार१

आजचा इ "म टा" वाचता येईल, ही सूचना.
धन्यवाद !

Rajesh188's picture

28 Jun 2019 - 1:24 pm | Rajesh188

प्लास्टिक ही आता लोकांची गरज झाली आहे .आणि प्लास्टिक चे दुष्परिणाम जो वापरतो त्याच्या वर ताबतोब होत नाही त्या मुळे लोक बेफिकीर झाली आहेत .
पर्यावरणाची हानी हा विषय बहुसंख्य लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय नाही .
त्या मुळे वापरावर बंदी खालून किंवा जनजागृती होईल अशी खोटी आशा ठेवून प्लास्टिक पासून मुक्ती मिळणार नाही .
प्लास्टिक ला पर्याय म्हणून उपयोग plastic सारखाच पण सहज नष्ट होणार पदार्थ पर्याय म्हणून उपलब्ध करणे हा कायमस्वरूपी पर्याय आहे .
आणि नेहमी माज हेच मत असतं की जेव्हा नवीन शोध लागतात तेव्हा त्याचे फायदे आणि तोटे असे दोन्ही प्रसिद्ध केले पाहिजेत .
पण फक्त फायदे च सांगायचे आणि तोटे लपवून ठेवते ही वृत्ती नंतर घातक परिस्थितीत निर्माण करते .

Namokar's picture

28 Jun 2019 - 2:11 pm | Namokar

छान माहिती

बहुतेक मक्याच्या पिठापासून बनलेले प्लास्टिक सदृश आवरण वापरात दिसते , एक म्हणजे पुस्तकांची आवरणे आणि दुसरे डिश वॉशर साबण वड्यांची आवरणे
दुसरा उपाय म्हणजे "एकदाच वापरून फेकून देण्याचं" प्लास्टिक पिशव्यावर बंदी म्हणजे ठराविक जाडीच्या महाग पिशव्याच उपलब्ध ठेवायच्या कि ज्या विकत घ्याव्या लागतात म्हणजे माणूस तो सहज रित्या टाकून देत नाही अशी कल्पना !

Rajesh188's picture

30 Jun 2019 - 10:18 am | Rajesh188

गरीब बापाचं पोर म्हणून आपण प्लास्टिक ला अट्टल गुन्हेगार ठरवलं आहे .पण ज्याला आपण अट्टल गुन्हेगार समजत आहे तो भु रटा चोर आहे .
विविध ठिकाणी वापरली जाणारी रसायने आणि त्या पासून jya वस्तू बनतात त्याला असलेले ग्लॅमरस ह्यामुळे ह्या रसायानाना अभयदान मिळत आहे आणि तेच खरे अट्टल गुन्हेगार आहेत .
पाण्याचे स्तोत्र ,प्रदूषित करणारी रसायने.
जमीन नापीक करणारी रसायने,
हवेचे प्रदूषण करणारे घटक हे प्लास्टिक पेक्षा मानवजाती ला लवकर विनाशाकडे नेतील .
पण त्या कडे दुर्लक्ष करून प्लास्टिक वरच लक्ष केंद्रित करण्यामागे काय कारण असेल

PFAS प्रकारची रसायने आणि आरोग्य यावर अधिक संशोधन होत आहे. ही रसायने खालील गोष्टींच्या वापरातून शरीरात जातात:

१. नॉनस्टिक भांडी
२. डाग न पडणारे गालिचे
३. मायक्रोवेव्हसाठीच्या पॉपकोर्न पिशव्या

४. अग्निशमन साहित्य
५. काही पिण्याच्या पाण्याचे साठे

या रसायनांचा शरीरात चयापचय होत नसल्याने ती कायमची ठाण मांडतात. त्यांचा स्त्रीच्या अंडाशयावर दुष्परिणाम होतो. यामुळे अनेक स्त्रियांना वेळेपूर्वी रजोनिवृत्ती ( सुमारे २ वर्षे ) येत असल्याचे एका अभ्यासात आढळले.

कुमार१'s picture

25 Nov 2020 - 4:42 pm | कुमार१

प्लास्टिक प्रदूषण पोचले एव्हरेस्टवर !

https://science.thewire.in/environment/mount-everest-microplastics-pollu...

कुमार१'s picture

23 Jul 2021 - 1:58 pm | कुमार१

अन्न संशोधनासाठी काम करणाऱ्यांपैकी एक म्हणजे केंद्रीय सागरी मच्छीमारी संशोधन संस्थेतील मुख्य वैज्ञानिक डॉ. काजल चक्रबर्ती! त्यांना भारतीय अन्न संशोधन परिषदेचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार नुकताच जाहीर झाला.

अभिनंदन !

कुमार१'s picture

25 Sep 2021 - 11:26 am | कुमार१

आपल्या थायरॉइड ग्रंथींना घातक असणाऱ्या chlorpyrifos या कीटकनाशकावर नुकतीच अमेरिकेच्या EPA या पर्यावरण संरक्षण संघटनेने बंदी घातली आहे.

https://earthjustice.org/brief/2021/chlorpyrifos-ban-pesticide-industry-...

तसेच PFAS हे घातक रसायन अन्न-पॅकेजिंगसाठी बऱ्याच मॉल्समध्ये वापरले जात होते. त्याचा वापरही जाणीवपूर्वक कमी करण्यात आलेला आहे.

वापरून झालेल्या सॅनिटरी पॅडसचा कचरा ही एक मोठी पर्यावरणीय समस्या आहे. त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी पॅड labs या कंपनीने एक चांगला उद्योग उभारला आहे.

यामध्ये घराच्या स्वच्छतागृहालाच एक विशिष्ट कचरा पेटी बसवण्यात येते. त्यामध्ये टाकलेली पॅडस एका मध्यवर्ती यंत्रणेला पोचतात. तिथल्या यंत्रात खालील घटना घडतात :
१. पॅडचे निर्जंतुकीकरण
२. त्यांचे बारीक तुकडे करणे
३. त्यातील पॉलिमरचे विघटन करून सेल्युलोज मिळतो.
४. या सेल्युलोजचा पुनर्वापर पॅकेजिंग उद्योगांसाठी करता येतो.

धारिया नावाच्या तरुणाने चालू केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे.

कुमार१'s picture

3 Jul 2022 - 11:50 am | कुमार१

३ जुलै
आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन

प्लास्टिकच्या संपर्कातील खाद्य-पेय पदार्थ व पाणी शक्य तितके टाळण्याचे आवाहन .

सध्या शेती उद्योगातील रसायने, अनेक प्रकारचे रंग, सौंदर्यप्रसाधने आणि डिटर्जंट यामध्ये सूक्ष्म प्लास्टिकचा वापर केलेला असतो. प्लॅस्टिकच्या या सूक्ष्मकणांनी मोठी पर्यावरणीय समस्या निर्माण केलेली आहे. म्हणून त्याला पर्याय शोधण्याचे प्रयत्न सतत चालू आहेत.

अलीकडे एका संशोधनातून रेशीम हा पर्याय पुढे आलेला आहे. हलक्या दर्जाच्या रेशमापासून कपडे बनवत नाहीत आणि असे हे रेशीम खूप मोठ्या प्रमाणावर सध्या फेकून दिले जाते. त्यातील प्रथिन वेगळे काढून त्यावर विशिष्ट प्रक्रिया करून ते सूक्ष्म-प्लास्टिकला पर्याय म्हणून वापरता येईल असा प्रस्ताव आहे. याचे नैसर्गिक विघटन होते.

कुमार१'s picture

22 Mar 2023 - 1:42 pm | कुमार१

Trichloroethylene (TCE)
या रसायनाच्या शरीरावरील घातक परिणामांबाबत दीर्घकाळ संशोधन झालेले आहे. त्याचे कर्करोगकारक परिणाम पूर्वीपासून माहित आहेत. परंतु त्याचा मेंदूतील चेतातंतूवर होणारा परिणाम अलीकडेच उजेडात येतो आहे, तो म्हणजे मेंदूतील डोपामीन निर्मिती करणाऱ्या चेतंतूंना इजा पोचवणे. यातूनच पुढे पार्किन्सन आजार होण्याची शक्यता अनेक पटींनी (५००%) वाढते असे एक गृहीतक अलीकडे मांडले गेलेले आहे :
https://content.iospress.com/articles/journal-of-parkinsons-disease/jpd2...

या आजाराची कारणमीमांसा गुंतागुंतीची आहे. त्यामध्ये आधुनिक काळातील अनेक रसायनांचा हात असण्याची शक्यता आहे.

TCE हे रसायन अनेक दशकांपासून वापरात आहे. त्याचे उपयोग दैनंदिन वापरातील वस्तू, औद्योगिक उत्पादने व कारखाने, एकेकाळी वैद्यकातील भूल देण्याचे साधन आणि लष्करी विभागांमध्ये होत आलेले आहेत. सध्या हे रसायन खालील गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते:
1. धातुंवरील ग्रीज काढण्यासाठी
2. कपड्यांचे ड्रायक्लीनिंग
3. रंगकाम आणि तत्सम कामे
4. टंकलिखित मजकूर खोडण्यासाठीच्या द्रावणात
5. लष्करात बंदुका साफ करण्यासाठी

या रसायनाचा एकंदरीत संचार बघता एव्हाना ते हवा आणि भूजलात देखील बऱ्यापैकी प्रमाणात आढळत आहे.
प्रस्तुत संशोधनात सात रुग्णांचा सखोल अभ्यास केला गेलेला आहे. त्यातून संशोधकांनी हे गृहीतक मांडलेले आहे. भविष्यात यावर अधिक संशोधनाची गरज आहे.
....
पार्किन्सनच्या कारणमीमांसेत अनेक तण व बुरशीनाशकांतअसणाऱ्या रसायनांचा हात आहे. उदा:
Paraquat, maneb / mancozeb.

MPTP या वातावरणीय टॉक्सिनसंबंधी बराच अभ्यास झालेला आहे

शिफारस
प्लास्टिकमुक्ती गरजेचीच

आजच्या ( ५ जून) ‘जागतिक पर्यावरण दिना’चे घोषवाक्य आहे, ‘प्लास्टिकच्या प्रदूषणाला जोरदार तडाखा देऊन त्याचा पराभव करा’