चंद्रगड ते आर्थरसीट ट्रेक ( Chandragad To Aurtherseat Point )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
23 Feb 2018 - 12:40 pm

पर्यटकांचे आवडते थंड हवेचे ठिकाण, महाबळेश्वर. इथे यायचे आणि महाबळेश्वर पठाराच्या सर्व बाजुच्या टोकाला उभारलेल्या पॉइंटवर जाउन सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घ्यायचा हि एक प्रथाच झाली आहे. या सर्व पाँईटपैकी पर्यटकांचा सर्वाधिक ओढा असतो, तो ऑर्थरसीट पाँईटला. मुळात सह्याद्रीची ७०० मीटर उंची आणि त्यावर वसलेले साधारण १३७२ मीटर उंचीचे महाबळेश्वर पठार. हि संपुर्ण उंची अनुभवायची असेल तर एकच सुयोग्य जागा, म्हणजे "ऑर्थरसीट पाँईट". एकाच वेळी रायगड, पुणे आणि सातारा असे तिन्ही जिल्ह्याचा परिसर ईथून पहाता येतो. इथल्या सज्जावर उभारल्यास खाली सावित्री नदीचा उगम आणि एका बाजुला पिटुकला "चंद्रगड" दिसतो. अर्थात बरोबर कोणी जाणकार असेल तरच तो ओळखता येतो.
CToA1
( ऑर्थरसीटच्या सज्जावरुन दरीत दिसणारा चंद्रगड)
अनेक वेळा महाबळेश्वरला जाणे झाले होते आणि ट्रेकींगचे व्यसन लागल्यावर, ऑर्थरसीट पॉंईटवरुन चंद्रगड बघीतला होता. पण हा चंद्रगड ते ऑर्थरसीट हा ट्रेक कसोटी पहाणारा आहे, एकटा दुकट्याने जाण्यासारखा हा ट्रेक नाही याची कल्पना होती.
अखेरीस एके दिवशी ट्रेकक्षितिज या संस्थेच्या साईटवर या ट्रेकचे श्येड्युल दिसले. अमित बोरोले याला फोन करुन माझा सहभाग नक्की केला.
मात्र ट्रेक डोंबिवली पासून सुरु होणार होता, त्यामुळे पोलादपुरमधे मी त्यांना जॉईन होण्याचे ठरले. रात्री दोन वाजता पोलादपुरला पोहचलो, तो स्टँडवर मुक्काम केलेल लोक डासांच्या थव्यातही आरामात घोरत पडले होते. पुण्याचे श्री. मंदार पुरंदरे सॅक घेउन एका बाकड्यावर वाट पहात बसले होते. त्यांची ट्रेकिंग सॅक पाहून हि व्यक्ती माझीया जातीची, म्हणजेच ट्रेकर असावी असा अंदाज बांधला आणि राम राम, शाम शाम होउन गप्पांना सुरवात झाली. माझा अंदाज अचुक निघाला आणि मागे केलेल्या ट्रेकच्या आठवणीचे भांडार खुले झाले. तासाभरातच बस आली आणि आम्ही चहा घेउन पोलादपुर-महाबळेश्वर रस्त्याला लागलो. कापडे फाट्यावरुन बस आत वळाली आणि अर्ध्या तासातच उमरठ गावात आली.
CToA1
उमरठ, म्हणले कि एकच गोष्ट डोळ्यापुढे येते, नरवीर तानाजी मालुसरे, स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वतःच्या प्राणाचे बलिदान देणारा शुर योध्दा. तानाजी मुळचे ईथले, मात्र पोटापाण्यासाठी गाव सोडले आणि पुण्यात शिवबाची लालमहालात भेट झाली आणि रायरेश्वरावरील स्वराज्याच्या शपथेपासून सुरु झालेला प्रवास, सिंहगडावर ४ फेब्रुवारी १६६६ ला थांबला. तानाजीला वीरमरण जरी सिंहगडावर आले तरी त्यांचे अंतिम क्रियाकर्म त्यांच्या मुळ गावी, म्हणजे उमरठला करायचे ठरले, त्यासाठी तानाजींचे शव तोरण्याजवळच्या घाटातून खाली कोकणात उतरवले गेले आणि उमरठला पोहचले. या घाटाला नाव पडले "मढ्या घाट". उमरठला अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याठिकाणी समाधी उभारली गेली.
CToA3

CToA4

पुढे या समाधीचा जीर्णोध्दार झाला आणि नरवीर तानांजीच्या रहात्या वाड्याच्या जागेवरच सभोवती एखाद्या भुईकोट किल्ल्यासारखी तटबंदी उभारुन मधे आवेशात उभारलेल्या या वीर योध्याचा पुतळा आहे.
CToA5

CToA6
आतमधे शेजारी शेजारी शेलारमामा आणि नरवीर तानाजींची समाधी आहे.याचे अनावरण १६ एप्रिल १६६५ रोजी करण्यात आले. दरवर्षी तानाजीची पुण्यतिथी साजरी होते.
CToA7

गावाजवळच एक घळ आहे, तिथे लहानग्या तानाजी आणि सुर्याजीला घेउन तानाजीच्या आईने मुक्काम केला होता.
CToA8
जवळच एका झाडाच्या ढोलीत त्यांची तलवार ठेवली आहे. विनंती केल्यास गावकरी ती आपल्याला दाखवितात.
शिवभारतातल्या एका महत्वाचे नायकाच्या समाधीचे दर्शन घेउन आमचा हा ट्रेक सुरु झाला. इथून आम्ही पोहचलो ढवळे या गावात. इथूनच आमचा ट्रेक सुरु होणार होता. या ट्रेकसाठी गाईड आवश्यक असल्याने, इथे गावकर्‍यांना विनंती केल्यास बरोबर येण्यासाठी काहीजण तयार होतात. ही वाट फारशी वापरात नसल्याने, तसेच रस्त्यात मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही भेटत नसल्याने चुकण्यापेक्षा गाईड घेणे चांगले. (गाईड ठरवतांना नीट बोलणी करणे आवश्यक आहे. ढवळे गावातून येणारे गाईड बर्‍याच वेळा जोरचे पाणी पर्यंतच येतात, तेथून परत फिरले तरच ते गावात अंधारापूर्वी पोहचू शकतात. महाबळेश्वर पर्यंत येण्यासाठी ते जास्त पैसे आकारतात. कारण त्यांना बसने परत ढवळे गावी यावे लागते.)
काही गाईडची नावे आणि संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे.
१ ) श्री. रवि मोरे:-9224898131 ,(02191)690944
२ ) श्री. पप्पु कदमः- 9225499580 , (02191)-691221
आमची गाडी श्री. रवि मोरे यांच्या घरासमोर थांबली. शेणाने सारवलेल्या स्वच्छ अंगणात आमच्या सॅक इतस्तता पसरल्या आणि चहा, पोह्याचा नाष्टा करुन आम्ही निघालो. गावातच ढवळेश्वर महादेवाचे प्रशस्त मंदिर आहे. जर मुक्कामाची वेळ आली तर हे मंदिर उत्तम. मार्गशीर्षामुळे मंदिरात काही कार्यक्रम चालु असावेत, मंदिरात ईतक्या भल्या पहाटेसुध्दा लाईट लावलेले होते. ढवळे गावासाठी पोलादपुरवरून दुपारी १२.०० व संध्याकाळी ६.२० ( मुक्कामी) अश्या दोन बस आहेत, याच बस ढवळे गावातुन पोलादपुरला जाण्यासाठी सकाळी ७.४५ आणि दुपारी २.१०. तर पोलादपुरवरुन उमरठला जाण्यासाठी ८.००, १२.३०, दु. ३.३० तर उमरठवरुन परतीची बस ९.३०, दु. २.०० आणि ५.०० अशा आहेत. उमरठवरुन चालत ढवळे गाव गाठता येते. ढवळे गावाजवळ आणखी एक पावसाळी आकर्षण आहे, "मोरझोत धबधबा".
CToA9
इथे आम्ही ड्रायव्हरला निरोप दिला , आता तो आम्हाला थेट महाबळेश्वरला ऑर्थरसीट पाँईटपाशी भेटणार होता. गावातून बाहेर पडलो आणि उत्तरेला महादेव मुर्ह्याच्या डोंगराने दर्शन दिले. त्याच्या उत्तरेला आहे मंगळगड उर्फ कांगोरी. या मंगळगडवरुन महादेव मुर्‍हामार्गे चंद्रगड असा ट्रेक करता येतो.
CToA32
महादेव मुर्‍ह्यावर थोडी वस्ती आहे. ढवळे गावाशेजारुन एखाद्या ओढ्यासारखी असणारी ढवळी नदी वहाते.
CToA33
अर्थात कोकणातल्या इतर नद्यासारखे हिला सुध्दा पावसाळ्यात पाणी असते, बाकी वर्षभर शांत. गावाबाहेरची एक वस्ती लागली. शेताडीतून आमची वाटचाल सुरु होती. अखेरीच एका वळणावर चंद्रगडाने आम्हाला दर्शन दिले.
इथे दोन वाटा फुटतात, डाव्या हाताची वाट चंद्रगडाला वळसा घालून ढवळे घाटाच्या दिशेने जाते तर उजवी वाट चंद्रगडावर चढते. आम्हाला चंद्रगड पहायचा असल्याने आम्ही उजव्या वाटेने निघालो.
CToA10
चंद्रगड -ऑर्थरसीट परिसराचा नकाशा
CToA11
वाट चुकू नये म्हणून बर्‍याच झाडावर अशा ओम नमः शिवायच्या पाट्या लावल्या आहेत.
CToA12
त्यानंतर एक खडी वाट आपल्याला चंद्रगडावर नेते.
CToA13
या पाटीमुळे आपण योग्य मार्गावर असल्याची खात्री पटते.
CToA14
मागच्या बाजुला हा डुक्करसोंडीचा डोंगर आहे. हे असे विचित्र नाव बहुधा त्याच्या आकारामुळे पडले असेल.
CToA15
घसार्‍याच्या आणि कारवीच्या वाटेने आम्ही चढु लागलो.
CToA16
पुढे कातळकोरीव पायर्‍या लागतात.
CToA17
शेवटच्या ट्प्प्यात दोन खडकाच्या सांदीतून अंग चोरुन वर चढावे लागते. त्याकाळी मुळ वाट अशीच होती कि नंतर इथला दरवाजा नामशेष झाला ते समजले नाही. मात्र मागच्या बाजुला थेट दरी असताना हा कातळटप्पा थोडा कठीण जातो.
CToA18
गडाच्या माथ्याचे दोन टप्पे आहेत.
CToA20
खालच्या सपाटीवर विशेष काही नाही. फक्त एक शिवपिंड उघड्यावर पडलेली आहे.
CToA19
बालेकिल्ल्याला मात्र तटबंदीचे कवच घातले आहे.
CToA21
किल्लेदाराच्या वाड्याचे आणि ईतर घरांचे भग्न अवशेष दिसतात.
CToA22
वर एक उघड्यावरच चौकोनी आकाराची शिवपिंड आणि नंदी दिसतो. यालाच काहीजण "ढवळेश्वर महादेव" म्हणतात. ह्या गडाची उभारणी चंद्रराव मोरेंनी केली असे मानले जाते. महाबळेश्वराचे परमभक्त असलेल्या चंद्ररावांनी इथेही शिवस्थान उभारलेले आहे.
CToA23
किल्लेदाराच्या वाड्यात एक सहसा न दिसणारी वस्तु मला पहायला मिळाली, चक्क एक "पाटा वरवंटा". खरतर गडकोट हि रणक्षेत्रे. इथे अवशेष दिसायचे ते बारुदखान्याचे,तोफा, पाण्याची टाकी इत्यादी. फारतर धान्य साठवायची कोठारे. पण शेवटी गडावरचे सैनिक ही माणसेच. त्यामुळे गडावर मुदपाकखान्याची जागाही असणारच. पण सहसा त्याचे अवशेष दिसत नाहीत. इथे मात्र चक्क एक स्वयंपाकासाठी लागणारी वस्तु दिसत होती. गडावर राबता असताना, किल्लेदाराची बायको त्यावर ठेचा करुन घरधन्याला खाउ घालत असेल, असे थोडे कौटुंबिक चित्र डोळ्यासमोर तरळले. मात्र हा अनोखा अवशेष आज उघड्यावर पडलाय. पण कोणीतरी तो लांबवायच्या आतच ढवळ्याच्या ग्रामपंचायत कार्यालयात वगैरे सुरक्षित ठेवला पाहिजे.
CToA24
वाटेत पाण्याचे टाके आहे पण पाणी खराब आहे.
CToA25
बालेकिल्ल्याच्या उत्तर टोकाला थोड्या पायर्‍या उतरुन खाली गेल्यानंतर उजव्या हाताला पाण्याचे टाके लागते. त्याच्या शेजारीच एक कोरीव गुहा आहे. याला पहारेकर्‍याची गुहा म्हणतात. याठिकाणी बसून चुना-तंबाखु मळतं पहारेकरी ढवळे घाटावर कसे लक्ष ठेवत असतील याची कल्पना केली.
CToA26

CToA27
पिण्यायोग्य पाण्याचे टाके गडाच्या उत्तर टोकाशी आहे. आजतरी गडावर पाण्याचा हा एकमेव स्त्रोत आहे. ढवळे गावात पाण्याच्या बाटल्या भरुन घेतल्या नसतील तर इथेच त्या पुर्ण भरुन घेणे आवश्यक आहे. कारण पुढच्या ढवळे घाटाची चढाई संपल्यानंतर म्हणजे थेट सहा-सात तासांनी बहिरीच्या घुमटीपाशीच पाणी मिळते. तेव्हा याबाबत हयगय करु नये.
CToA28

CToA29
माथ्यावरच्या या टाक्याखेरीज गडावरची शिबंदी लक्षात घेउन गडाच्या पश्चिम उतारावर बरीच टाकी खोदलेली दिसतात. आज मात्र या टाक्याकडे जाणारी वाट मोडल्याने हि टाकी जवळून पहाता येत नाहीत.
CToA30
गडाच्या माथ्यावरुन ढवळी नदीचे खोरे दिसत होते.
CToA31
चंद्रगडाचा आसमंत टोलेजंग शिखरानी वेढला आहे. उत्तरेला महादेव मुर्‍ह्याचा डोंगर आहे. पुर्वेला रायरेश्वर, कोल्हेश्वर आणि दक्षिणेला आमचे लक्ष्य महाबळेश्वरचे पठार आणि त्याचा ऑर्थरसीट पाँईट स्पष्ट दिसत होता. याखेरीज बैला, पंचटेंभ, कोळीदुर्ग, कलावंतीणीची काढणी असे काही डोंगर आजुबाजुला आहेत, मात्र त्यांची ओळख पटावयला एखादा स्थानिक गावकरी सोबत हवा.
CToA34
इथून सरळ रेषेत ऑर्थरसीट पाँईट केवळ साडेतीन कि.मी. आहे म्हणे. आम्हाला जर सुपरमॅनसारखे उडता येत असते तर काही मिनीटातच आम्ही तिथे पोहचलो असतो, पण पायी चालण्याची हौस भागावायची होती ना ! त्यामुळे ट्रेकची गंमत घेण्यातच खरा अर्थ आहे.
CToA35
गडमाथ्यावर बसून ईतिहासात डोकावले. महाबळेश्वरी ऊगम पावणारी सावित्री नदी अरबी समुद्राला बाणकोट जवळ मिळते. प्राचीन काळा पासून महाड गावातून वाहाणार्‍या सावत्री नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध (वरंधा, आंबेनळी, पार घाट, मढ्या घाट, ढवळे घाट इत्यादी) घाटमार्गंनी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. त्यापैकी वरंधा घाट (महाड ते भोर) व आंबेनळी घाट (पोलादपूर ते महाबळेश्वर) यामार्गांवर रस्ते बनवल्यामुळे आजही वापरात आहेत. या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. सावित्री नदीच्या (खाडीच्या) मुखावर असलेला बाणकोटचा किल्ला, घाटमार्गाचे रक्षण करणारा कावळा, चंद्रगड, मंगळगड, प्रतापगड हे किल्ले आणि घाटमाथ्यावर असणारे कमळ, केंजळ इत्यादी किल्ले अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. कृष्णानदीच्या जोर खोर्‍यातून, तसेच त्यावेळच्या मढीमहालाजवळून ( सध्याच्या ऑर्थरसीट पाँईटजवळून ) एक घाटवाट थेट कोकणात उतरते, याचे नाव ढवळे घाट. काहीश्या अवघड असलेल्या या घाटातून फारशी वर्दळ नसेल. पण प्राचीन वाई शहरातून थेट दाभोळ बंदराला जाण्यासाठी हा जवळचा रस्ता नक्की होता. या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी, समुद्रसपाटीपासून २२५८ फुट उंचीवर असलेल्या या टेकडीवर दौलतराव चंद्रराव मोरे यांनी हा गड उभारला. सुरवातीला गडाचे नाव "ढवळगड" होते. इ.स. १६५६ मधे शिवाजी राजांनी चंदररावाची जावळी उखडायची ठरवली आणि रायगडावर त्याला गाठून मारले. त्यामुळे जावळीचा घनदाट अरण्याने वेढलेला परिसर स्वराज्याला जोडला गेला आणि हा चिंटुकला ढवळगड स्वराज्यात आला. पुढे महाराजांनी त्याचे नाव बदलून "चंद्रगड" ठेवले. काही बखरीत याचा उल्लेख गहनगड असाही येतो. पुढचे ईतिहासातील उल्लेख फारचे नसले तरी ई.स. १८१८ मधे कर्नल प्रॉथरने या परिसरातील किल्ले घेतले , त्याच वेळी त्याने कांगोरी उर्फ मंगळगड आणि चंद्रगड याचा ताबा मिळवला.
CToA35
गड पाहून झाला तोवर सकाळचे नउ वाजले होते. गडावरच थोडा नाष्टा आटोपून आम्ही गड उतरायला सुरवात केली. दोन्ही बाजुला दिसणारी दरी आणि घसार्‍याचे उतार. मन निश्चल ठेउनच हि वाट उतरायची.
CToA36
अर्ध्या तासात आम्ही उतरुन वांझ किनार्‍याच्या म्हसोबाच्या खिंडीत आलो. आता दोन पर्याय होते, एकतर चंद्रगड उतरुन , गडाला उत्तरेकडून वळसा घालून ढवळे घाटाची वाट पकडायची किंवा या खिंडीतूनच एक वाट थेट पलीकडे ढवळे घाटात उतरते, त्याने जायचे. दुसर्‍या पर्यायात वेळ वाचणार असल्याने, आम्ही तोच पर्याय निवडला. पण हि वाट मुळीच सोपी नव्हती. केवळ वीतभर वाट आणि तीसुध्दा वाळलेल्या गवताने भरलेली. झोक डावीकडे ठेवून आस्तेकदम पुढे सरकायचे. पंधरा मिनीटातच हि जीवघेणी वाटचाल संपवून सुटकेचा निश्वास टाकत आम्ही चंद्रगडाच्या पुर्व उताराच्या बाजुला आलो. पण परिक्षा बहुधा संपली नव्हती. थेट सत्तर ते एंशी अंशात वाट खाली उतरत होती. त्यात घसारा आणि आधाराला कारवीच्या वाळलेली झुडुपे. एखाद्याला पकडून उतरायला जावे तो भस्सदिशी सात-आठ फूट घसरत खाली लोळण घ्यायला लागायची. थेट जंगली चित्रपटातल्या शम्मी कपुरसारखे आरोळ्या ठोकत खाली आलो. अखेरीस एक दगडांनी भरलेला ओढा लागला आणि आम्ही व्यवस्थित उतरायला सुरवात केली.
CToA37
अर्ध्या तासाच ओढ्याच्या वाटेला आडवी जाणारी ढवळे घाटाची वाट लागली. इथे थोडी विश्रांती घेतली आणि निघालो. आता हि वाट आमची शब्दशः 'वाट लावणार' होती. कारण आता पुढचे चार तास फक्त चढणच असणार होती. मात्र हि वाट दाट झाडीतून चढत असल्याने कायम सावली असणार होती हिच काय ती दिलासा देणारी गोष्ट.
CToA38
मात्र कोकणातील दमट हवा आणि सततची चढाईने अक्षरश: प्राण कंठाशी आले, त्यात पाणी पुरवायचे होते, त्यामुळे पाणी पिण्यावरही बंधन होते. समोर नुसता न संपणारा चढ दिसत होता. अखेरीस डोंगरात असलेल्या खिंडीसारख्या भागापाशी आलो, हिला "सापळखिंड" म्हणतात. इथून पलीकडच्या दर्‍याखोर्‍यांचे दर्शन झाले.
CToA39
समोर दिसणार्‍या शिवभारताच्या शौर्याची साक्ष मिरविणारा प्रतापगड दिसला आणि एकच उत्साह संचारला. लांबवर एखाद्या खोगिरासारखा दिसणारा, मधुमकरंदगड्सुध्दा दिसला.
CToA43
चढाई आता जवळपास संपली होती, मात्र परिक्षा अजुन बाकी होती. आता वाट समतल जात होती, यालाच ट्रॅव्हर्स म्हणतात.
CToA40
खाली खोल दरीत चंद्रगडाचे रुप दिसले आणि आपण ईतके चढून वर आलो यावर विश्वास बसला नाही.
CToA42
पुर्ण जावळी खोरे समोर उलगडले होते. चंद्रगडाच्या मागच्या बाजुला महादेव मुर्‍हा, त्याच्या मागच्या बाजुला वाटोळ्या माथ्याचा कांगोरी उर्फ मंगळगड आणि थेट त्याच्या रेषेत घाटमाथ्यावर "जननीचा दुर्ग" दिसत होता.
CToA41
सुरवातीला हि वाट सोपी होती, मात्र नंतर अरुंद आणि घसार्‍याच्या ( स्क्रि ) धोकादायक वाटेने जाताना पोटात गोळा आला. डाव्या बाजुला पाताळवेरी गेलेली दरी दिसत असते. पण पुढे चालणे भाग असते, कारण परत फिरणे अजिबातच शक्य नाही. थोडाचाच असलेला हा पॅच कमालीचा थरारक आहे.
CToA44
यानंतर चक्क कातळकोरीव वाट लागते. प्राचीन अश्या ढवळे घाटाची हि खुण म्हणता येईल. एका मोठ्या पाषाणातून वाट कोरुन काढली आहे. कदाचित हा घाट वहाता असेल तेव्हा इथे पहार्‍याची चौकी असेल असे वाटते.
CToA45
लांबवर आपल्याला भगवे निशाण दिसतं असते. तिथेच आहे "बहिरीची घुमटी". घुमटी म्हणायलाच आहे, प्रत्यक्षात हा वनदेव एका खडकाच्या कपारीत वसला आहे. एखाद्या देवस्थानासाठी आपल्या पुर्वजांनी किती अचुक जागा निवडली आहे, याचे कौतुक वाटते. कोल्हेश्वर पठाराचा डोंगर आता अगदी जवळ आलेला दिसत असतो, पलीकडे जोर खोर्‍याचे ( सध्या या परिसरात धोम-बलकवडी धरण आहे ) दर्शन होते. कोल्हेश्वरला चिकटलेला "कमळगड" दिसतो. बहिरीच्या कोरीव मुर्तीचे दर्शन घेतले आणि तिथली घंटा वाजवली, काय मस्त आवाज घुमला.
या बहिरीच्या घुमटीपाशी आपण रायगड जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात येतो. इथून तीन वाटा फुटतात, एक आम्ही आलो, ती खाली उतरणारी ढवळे घाटाची वाट, दुसरी पुर्वेकडे जोर गावाकडे जाणारी वाट आणि तिसरी वाट वर चढते ती ऑर्थरसीटकडे, आमच्या आजच्या लक्ष्याकडे जात होती.
CToA46
इथून अजुन पाचच मिनीटे चढल्यावर विश्रांतीचे ठिकाण आले, "जोरचे पाणी". चंद्रगड ते ऑर्थरसीट या वाटेवरचा हा एकमेव पाण्याच्या स्त्रोत. इथेच आम्ही दुपारचे जेवण घेतले. तीन वाजले होते, म्हणजे सहा तास आम्ही फक्त डोंगरवाट चढत होतो. ह्या पाण्याच्या नैसर्गिक टाक्याचे ठिकाण लक्षात घेता, एखादी रात्र इथे काढता आली तर निश्चीतच अनेक प्राणी पहाता येतील. मात्र त्यासाठी आवश्यक असे झाड आसपास नाही.
CToA47
खरेतर ईतका कंटाळा आला होता कि अजून चालायची ईच्छा नव्हती. मलातर सर्दी झाली होती, पण या ट्रेकचा मोह न आवरल्याने तब्येत ठिक नसतानाही मी आलो होतो. आणि चढाईचा पुरेसा त्रासही झाला होता, पण उठणे भाग होते. अजून किमान दोन तासाची तरी वाटचाल बाकी होती.
CToA48
जेमतेम पंधरा मिनीटे खडी चढाई केली आणि अचानक एक सपाटी समोर आली, याला "गाढवाचा माळ" म्हणतात. बहुधा जुन्या काळी घाटातून मालवहातुक गाढवं वापरली जायची, त्यांचे रात्रीचे पार्किंग कदाचित या परिसरात करत असावेत, म्हणून या परिसराला गाढवाचा माळ म्हणत असावेत. काहीही असो पण त्यादिवशी मस्त पैकी चैन करायला महाबळेश्वरला आलेल्या मंडळींच्या दृष्टीने त्या माळावर फिरणारे आम्ही खरोखरच गाढव असले पाहिजे ;-). इथे एका अरुंद धारेवर आपण पोहचतो आणि अचानक समोर खोलवर पसरलेले सावित्री नदीचे खोरे दिसते.
CToA49
थोडे अंतर चालतोय एवढ्यात एका टेकडीआडून ऑर्थरसीट पाँईट आणि त्याचा भव्य कातळकडा दिसला. ओर्थरसीट पाँईटवर आजवर अनेकदा गेलेलो होतो, पण त्याच्या खाली किती सरळसोट उभा कडा आहे ते आज प्रथमच पहात होतो. एकदाचा ऑर्थरसीट दिसल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकच जल्लोष केला, मात्र अजून दिड तासाची वाटचाल बाकी होती.
CToA50
उजव्या बाजुला महाबळेश्वरचे थरांच्या खडकापासून बनलेले पठार आणि एलफिस्टन पाँईटचा परिसर दिसत होता.
CToA51
वाट आता सपाटीवरुन जात होती, मात्र थकव्याने हि वाटचालसुध्दा जिकीरीची झाली होती.
CToA52
कधी वाट दरीच्या काठाने जायची तेव्हा दरीत उतरलेल्या डोंगरसोंडा मोठ्या मनमोहक दिसत होत्या.
CToA53
अखेरीस ऑर्थरसीट पाँईंट जवळ आल्याचे जाणवू लागले. लोकांचा कोलाहल एकू येउ लागला. मात्र आता घसारा असलेली चढण चढून जायचे होते. शरीर नाही म्हणत होते, पण चालणे भागच होते.या ठिकाणी वरच्या पाँईटच्या सज्जात उभारलेल्या लोकांना आम्ही दिसायला लागलो आणि त्यांनी आरडाओरडा सुरु केला, खालून आम्हीही प्रतिसाद दिला. एकूणच धमाल आली.
CToA54
वाटेत एका झाडाला लावलेला हा फलक दिसला आणि मन विषण्ण झाले. गिर्यारोहण हा आनंदाचा ठेवा देणारा छंद आहे, मात्र पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे.
CToA55
अखेरीस हा चढ चढून हाश्शहुश्श करत एका रॉकपॅचपाशी पोहचलो. चलो, यही एक कमी रहे गयी थी. एकंदरीत या ट्रेकमधे शारीरीक कस पहाणारा चढ, मनाच्या स्थिरतेची कसोटी पहाणारे थरारक ट्रॅव्हर्स आणि हे सगळे कमी म्हणून कि काय, हा रॉकपॅच. अर्थात जेमतेम दहा-बारा फुटाचा हा रॉकपॅच तितका अवघड नाही, पकडायला व्यवस्थित होल्डस आहेत, पण अगदीच नवखे असले तर बरोबर रोप बाळगलेला चांगला.
बहुधा पाणी कमी पडल्यामुळे असेल कि काय पण हा पॅच चढताना, पायात गोळे आले, पण तरीही शरीर वर ढकलत अखेरीस वरच्या सपाटीवर पोहचलो.
CToA56
या ठिकाणी खडकात एक खोबण आहे, त्याला "विंडो पाँईट" म्हणतात. ईतक्या वेळा ऑर्थरसीटवर येउनसुध्दा खाली विंडो पाँईटपर्यंत आलो नव्हतो, पण आज तो पाहिला.
घड्याळ पाच वाजल्याचे दाखवित होते. सकाळी सहा-साडे सहाला सुरु झालेला ट्रेकची संध्याकाळी साडेपाच वाजता इतिश्री झालेली होती. बरेच दिवस स्वप्न पाहिलेला ट्रेक एकदाचा पुरा झालेला होता. एकंदरीत ट्रेकचे स्वरुप पहाता काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
चंद्रगड पायथा ते चंद्रगड आणि चंद्रगड ते आर्थरसीट ही रेंज पार करण्यासाठी जवळपास ११ तास चालावे लागते. (ट्रेकर्सची संख्या व अनुभव यानुसार १ ते २ तासांचा फरक पडू शकतो.)
चंद्रगड ते आर्थरसीट हा ट्रेक करताना पाळावयाच्या काही सूचना :
१. या ट्रेकसाठी ढवळे गावातून गाईड घेणे आवश्यक आहे.
२. चंद्रगडसाठी उन्हाचा फार त्रास होत नाही. पण घुमटीच्या आधी उघडा रानमाळ असल्याने आणि दुपार होत असल्याने उन्हाचा त्रास होऊ शकतो. सोबत ग्लुकोज, काकड्या, फळे ठेवल्यास ह्या त्रासाची तीव्रता कमी करता येऊ शकते.वाट अनेकदा दाट झाडीतून जात असल्याने हात आणि पाय पूर्ण झाकणारे कपडे घालावेत.
३. ढवळेमधून चालायला सुरुवात केल्यावर फक्त घुमटीजवळील "जोरचे पाणी" येथे (अंदाजे ७ तास) पिण्यायोग्य पाणी आहे. त्यामुळे सोबत भरपूर पाणीसाठा बाळगावा.
४. पाणी कमी प्यायल्यामुळे किंवा चाल भरपूर असल्याने पायात गोळे (Cramp) येण्याचा किंवा Muscle Paining चा त्रास होऊ शकतो. सोबत स्वतःचे Medical Kit आणि इतर औषधे बाळगावीत.
५. पूर्ण रेंजमध्ये १ छोटा आणि १ मोठा Rock Patch आहे. दोन्ही सोपे असून प्रस्तारोहाणाच्या साधनाची गरज भासत नाही. तरी सोबत ५०/१०० फुटी दोर बाळगावा.
६. पावसाळ्यात चंद्रगड ते आर्थरसीट हा रेंज ट्रेक टाळावा. पावसाळ्यात ढवळे गावातून फक्त चंद्रगड करणे शक्य आहे.
CToA57
घाईघाईने ऑर्थरसीटच्या सज्जाच्या दिशेने गेलो. सज्जाच्या दुरुस्तीचे काम चालु असल्याने थेट टोकाशी जाता आले नाही, पण बाजुच्या टोकावरून चंद्रगडाकडे मन भरुन पाहून घेतले, कदाचित हा ट्रेक पुन्हा होणार नाही याची कल्पना होतीच. आजुबाजुचे टकाटक कपड्यातले पर्यटक आमच्या अवताराकडे पाहून,'हे मंगळावरुन आलेले लोक', या नजरेने पहात होते. मात्र आम्ही मंगळावरुन नाही, पण चंद्रावरुन आलो होतो.
बाकी उनाडगिरी न करता ( आजुबाजूला बरीच प्रेक्षणीय स्थळे असताना सुध्दा ;-) काय करणार, अवतारच तसा होता ) शांतपणे चालत बसकडे निघालो. बसचा ड्रायव्हर दुपारीच ईथे पोहचून झोपा काढून कंटाळला होता, बहुतेक आम्ही काही आज येत नाही असा त्याचा समज झाला होता. पण शेवटी एकदाचे बसमधे चढलो आणि शिणलेले शरीर बसच्या सीटवर अक्षरशः टाकले आणि मस्तपैकी झोपेची आराधना सुरू केली.

टिपः-काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः
१) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र. के. घाणेकर
२ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३ ) डोंगरयात्रा-आनंद पाळंदे
४ ) रायगड जिल्हा गॅझेटिअर
५ ) शोध शिवछत्रपतींच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट
६ ) www.trekshitz.com हि वेबसाईट

प्रतिक्रिया

सिद्धार्थ ४'s picture

23 Feb 2018 - 2:01 pm | सिद्धार्थ ४

मस्त

अभिजीत अवलिया's picture

23 Feb 2018 - 3:16 pm | अभिजीत अवलिया

भारी आहे हा ट्रेक. एखादा दिवस मधे मुक्काम करण्याची सोय हवी होती.

दुर्गविहारी's picture

2 Mar 2018 - 9:05 pm | दुर्गविहारी

सहमत. मुक्कामाची सोय नाही हि खरी अडचण या ट्रेकमधे आहे. पण नाईलाज आहे.

भले शाब्बास! चंद्रगडाची वाट प्रचंड घसाऱ्याची (स्क्री) आहे. या ट्रेकला पाण्याचे खूप हाल होतात.

कंजूस's picture

23 Feb 2018 - 3:57 pm | कंजूस

फोटोसह लेख छान. पण हे जरा अवघडच प्रकरण वाटतय.

कंजूस's picture

23 Feb 2018 - 3:59 pm | कंजूस

फोटोसह लेख छान. पण हे जरा अवघडच प्रकरण वाटतय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Feb 2018 - 4:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सालां हेवा वाटतो. पण इतकं चालायचं. चढ़ उतार, दरी. हिम्मत लागते मालक. खुपच भारी. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Feb 2018 - 6:13 pm | राजेंद्र मेहेंदळे

ट्रेक आणि वर्ण न दोन्ही मस्त झालेय. मार्चमध्ये करता येईल का हा ट्रेक? (वाढत्या उन्हाच्यादृष्टीने)

माझ्या टु डु लिस्ट्मध्ये आहे.

मार्चमधे हा ट्रेक न करणेच योग्य होईल. फारतर चंद्रगड करायला हरकत नाही. पण तिथून जवळपास पाच तास पाणी उपलब्ध नसताना चढायचे, त्यात कोकणातील दमट हवामान विचारात घेता, दिवाळीनंतर साधारण फेब्रुवारीच्या मध्यापर्यंतच योग्य कालावधी आहे.
अर्थात हाडाचे ट्रेकर्स काहीही करु शकतात. एका ग्रुपने हा ट्रेक पावसाळ्यात केलेला आहे, त्याच्या ब्लॉगची लिंक सापडल्यास देतो.

Nitin Palkar's picture

23 Feb 2018 - 7:22 pm | Nitin Palkar

नेहमी प्रमाणेच छान लेखन, सुंदर प्रकाशचित्रे!

किल्लेदार's picture

23 Feb 2018 - 7:48 pm | किल्लेदार

_/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_

उपेक्षित's picture

23 Feb 2018 - 8:05 pm | उपेक्षित

दंडवत घ्या मालक _/\_ जबरी ट्रेक झालाय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2018 - 8:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी ! ट्रेक, वर्णन आणि फोटोही (हे आता परत परत न लिहिता "तुमचा गिर्यारोहणाचा लेख आला" इतके लिहिले तरी पुनरोक्ती टाळल्यासारखे होईल) !!

हा फोटो भयानक आवडला...

बंकापुरे's picture

8 Mar 2018 - 8:27 pm | बंकापुरे

ब्लॉगमधील फोटोज दुसऱ्या काही ब्लॉग्जमधून कॉपी केले आहेत. मूळ फोटोतील कॉपीराईट ओळ क्रॉप करून, लेखकांच्या परवानगी शिवाय फोटोज वापरले आहेत...

उदा : हा फोटो निनाद बारटक्के ह्याने काढला असून साईप्रकाश बेलसरेच्या ब्लॉग मधून उचलला आहे...
http://2.bp.blogspot.com/-8MXnXVuHnQU/VPyW1Y2KwdI/AAAAAAAAF3E/p_08r4rrHz...

ह्या ओरिजिनल फोटोमधून वॉटरमार्क काढून फोटो एडिट करून लावण्यात आलेला आहे...

ह्यातले अनेक फोटो साईप्रकाश बेलसरे ह्याच्या वेबसाईट (http://www.discoversahyadri.in/2015/02/KamatheGhatMahadevMurhaChandragad... http://www.discoversahyadri.in/2013/09/JavaliMangalgadChandragadDhavaleG...) आणि माझ्या वेबसाईट (http://www.bankapure.com/2015/01/KamatheGhaat-MahadevachaMurha-Chandraga...) वरून उचलले आहेत ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी...

असे असेल तर दुर्गविहारी यांनी त्या त्या छायाचित्रकारांची किंवा ब्लॉग लेखकाची परवानगी घ्यावी असे सुचवावे वाटते. मूळ कर्त्याला श्रेय दिलेच पाहिजे.

धागाकर्त्यांनी खुलासा करावा ही विनंती.

निशाचर's picture

13 Mar 2018 - 5:25 am | निशाचर

गवि आणि प्रचेतस यांच्याशी सहमत आहे.

प्रसाद_१९८२'s picture

13 Mar 2018 - 10:01 am | प्रसाद_१९८२

एकादा लेख माहितीपूर्ण करण्याकरता, इतर भटक्यांनी काढलेले फोटो, स्वत:च्या लेखात वापरणे ह्यात गैर काहीच नाही. मात्र तो फोटो काढणार्‍या फोटोग्राफरला, त्या फोटोचे श्रेय देणे तितकेच गरजेचे आहे.

एकुणच वरिल प्रकारात,
फोटोचे श्रेय त्या फोटोग्राफरला दिलेच नाही वर मुळ फोटोंवर असलेले वॉटरमार्क काढून तो फोटो स्वत:च्या नावावर खपविण्याचा प्रकार दिसतोय.

बंकापुरे सर, आपले फोनवर बोलणे झालेले आहे आणि मला वाटते मी दिलेल्या स्पष्टीकरणावर आपण समाधानी असाल. तरी आपण हा प्रतिसाद वाचल्यास उपप्रतिसाद द्यावा हि विनंती. मिपाकरांचे माझ्याविषयी होणारे संभाव्य गैरसमज दुर होतील अशी आशा करतो.
आता सर्व मिपाकरांसाठी, मी यापुर्वीच स्पष्ट केलेले आहे कि मी जवळपास २००० सालापासून ट्रेक करतो आहे आणि साधारण २००८ नंतर माझ्याकडे डिजीटल कॅमेरा आला. अर्थात रोल कॅमेर्‍याने मला ईतके फोटो काढणे शक्यच नव्हते, तसेच नंतर केलेल्या ट्रेकमधेही जे फोटो मी काढलेले नाहीत, पण धाग्यातील माहितीसाठी महत्वाचे वाटले, ते गुगल सर्चने मिळवले. ज्यावरती वॉटर्मार्क असेल ते तसेच ठेउन वापरलेत, ज्यावर नाही त्याबाबतीत मला काहीच करणे शक्य नव्हते. पण ज्यावेळी असे फोटो किंवा संदर्भ वापरलेत त्या त्या वेळी न चुकता खाली तळटिप दिलेली आहे, जशी या धाग्याखालीही आहे.( या धाग्यातही ज्यावर वॉटरमार्क आहेत ते तसेच ठेवलेले आहेत ) प्रत्येक फोटोखाली टिप टाकणे रसभंग करणारे होते. या धाग्यातही चंद्रगडाचे नाव काही बखरीत गहनगड असे आहे हा एकेमेव संदर्भ वापरून्सुध्दा "शोध शिवछत्रपतींच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट" यांना त्याचे श्रेय दिलेले आहे, नव्हे ते माझे कर्तव्यच आहे. कोणताही संदर्भ घेतला असेल तर तो मी धाग्याच्या तळाशी नोंदवतोच. हे स्पष्टीकरण फक्त मिपाकरांचा माझ्याविषयी गैरसमज होउ नये यासाठीच लिहीले आहे. यापुढेही लिखाणाला असेच प्रोत्साहन देत रहाल अशीच खात्री आहे.

प्रचेतस's picture

24 Feb 2018 - 8:29 am | प्रचेतस

नितांत सुंदर ट्रेक आहे हा.
तपशीलवार वर्णनाने रोचकता अजून वाढलेली आहे. मजा आली वाचून.

बाकी चंद्रराव हा जावळीच्या मोरे घराण्याचा पिढिजात किताब आहे. मोरे घराण्याच्या मूळ पुरुषाचे नाव चंद्रराव. पुढील मोरे हेच बिरुद आपल्या नावापुढे लावत. शिवाजी महाराजांनी ज्या चंद्ररावास संपवले त्याचे नाव यशवंतराव मोरे. हाही आपल्या नावापुढे चंद्रराव हा किताब लावत असे.

दिलीप वाटवे's picture

2 Mar 2018 - 2:27 pm | दिलीप वाटवे

खरंतर मोरेंचं 'जावळी' खोरं किंवा राज्य केवढं होतं याबद्दल मी एक लेख लिहितोय. प्रतापगड म्हणजे जावळी असाच साधरणपणे समज आहे पण ते तसं नाही. जावळी खोर्‍यात येणारे सुभे, तर्फा आणि त्यात येणारी एकूण गावं याविषयी मोरे घराण्याच्या बखरीत बरेच उल्लेख आलेले आहेत. सगळे पुरावे हातात आले म्हणजे ससंदर्भ लेख पोस्ट करीनच.

ह्या विषयवार नक्कीच लिहावे.

दुर्गविहारी's picture

2 Mar 2018 - 9:07 pm | दुर्गविहारी

बरोबर. दौलतरावाने हा गड बांधला. माझ्याकडून लिहीताना कंस टाकायचा राहिला.

सुनिल साळी's picture

25 Feb 2018 - 6:02 pm | सुनिल साळी

या ट्रेकची मजा काही वेगळीच आहे. शरीराची कसोटी पाहणारा हा ट्रेक आहे. आम्ही हा ट्रेक नोव्हेंबर 2016 ला केला होता. त्याची ब्लॉग लिंक येथे देत आहे.
http://aniruddhaenterprises.com/2017/06/trek-to-jawali-region/

दुर्गविहारी's picture

2 Mar 2018 - 9:10 pm | दुर्गविहारी

मस्तच आहे ब्लॉग. फारच थरारक झाली आहे तुमची भटकंती. शक्य झाल्यास मि.पा.वरही लिहा.

महामाया's picture

27 Feb 2018 - 7:05 pm | महामाया

खूपच छान...

पैसा's picture

27 Feb 2018 - 9:47 pm | पैसा

कसला अवघड ट्रेक!

निशाचर's picture

28 Feb 2018 - 5:23 am | निशाचर

भारी ट्रेक!
डोंगररांगांचे फोटो मस्तच आलेत.

चाणक्य's picture

28 Feb 2018 - 7:25 pm | चाणक्य

झकास वृत्तांत. पण तुम्ही ब-याचदा रात्रीअपरात्री निघता याची तक्रार आहे. तरी नशीब यावेळी बस होती. शक्यतो स्वतःचे वाहन घेऊन रात्री अपरात्री निघायचे टाळता आले तर बघा.

तुम्ही ईतकी काळजीने प्रतिसाद देताय त्याबध्दल धन्यवाद. पण काही वेळा स्वतःचे वाहन घेउन निघणे शक्य नसते. त्या त्या वेळी जे योग्य तो पर्याय निवडावा लागतो. या भटकंतीत वाहनाचेही काही किस्से आहेत. केव्हातरी लिहीन यावर.

खिलजि's picture

1 Mar 2018 - 1:11 pm | खिलजि

दुर्ग विहारी साहेब ,,, आपलं नाव त्या विशेष ममत्वाच्या यादीत टाकायचं राहून गेलं .. खरंच तुमचे लेख खूप छान असतात ... या गडकिल्ल्यांच्या राज्यात तुमच्या सारखे भ्रमंती सादर करणारे खूप विरळ असतात .. एखादी छोटी ट्रेक आमच्यासारख्या लोकांसाठी पण आखा ... तुम्ही आमचे सारथी व्हा ... माझी खूप इच्छा आहे .. एखादा छोटा ट्रेक करण्याची ... खूप छान माहिती देत असता तुम्ही प्रत्येक चढणीमधून .. मी तर चक्क तिथे त्या स्थळी पोहोचतो .... खरंच छान सादर करता ... एखादा निसर्गप्रेमीच इतक्या पोटतिडकीने हि निसर्गाची गाथा लिहू शकतो आणि तितक्याच प्रभावीपणे दुसर्यांनाही यात सामील करू शकतो .. याचे श्रेय निर्विवादपणे तुम्हालाच जाते ... पण एक विनंती .. तुम्ही एखाद्या छोट्या ट्रेकची आखणी करा आणि या मिपावर साद घाला .. ज्या मिपाकरांना सहभागी व्हायचे असेल ते तुम्हाला नक्कीच प्रत्युत्तर देतील ... मला वाटत मी त्यात नक्कीच सहभागी असेंन ... अजून एक नम्र विनंती .. ट्रेक शक्यतो दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी ठेवा .. पायात गोळे आले किंवा अजून काही तर सावरायला निदान रविवार तरी सोबतीला असेल ... धन्यवाद

सिद्धेश्वर विलास पाटणकर

सर्वच वाचकांचे आणि प्रतिसादकांचे मनापासून धन्यवाद. आता उन्हाळा सुरु होतोय, त्यामुळे हिवाळी भटकंती थांबवतो आणि "जाउया समर स्पेशलला". पुढचा धागा उन्हाळी ट्रेकमधे घ्यायच्या काळजीचा टाकेन. अनवट किल्ल्याच्या लेखमालेत "अमळनेर आणि बहादुरपुर" या भुईकोटांविषयीचा धागा सवड मिळताच टाकेन.

दिलीप वाटवे's picture

3 Mar 2018 - 7:44 pm | दिलीप वाटवे

असे अनवट ट्रेक एखादा मुरलेला ट्रेकरच करु शकतो आणि असे लेखनसुद्धा एखाद्या सराईत लेखकच. खरं म्हणजे असे दोन्ही गुण एकाच ठिकाणी सापडणं विरळच, जे तुमच्याकडे आहेत. त्यामुळे ट्रेकींग तर चालू राहुद्यातच पण लिखाणातही खंड पडू देऊ नका. वाचताना स्वतः ट्रेक करत असल्याचा फिल येतो. पु.ले.शु.

खूप खतरनाक ट्रेक आहे हा. तुम्ही माहिती आणि वर्णन पण खूप मस्त केलाय नेहमीप्रमाणे. आम्ही काही वर्षांपूर्वी केलेल्या ट्रेकच्या आठवणी जागवल्या. वैराटगड-पांडवगड-कमळगड-कोळेश्वर पठार-जोर-चंद्रगड-कावळ्या-मंगळगड. पाणी अजिबात नसताना बहिरीची घुमटी ते ढवळे पार पाडलं.

Nitin Palkar's picture

11 Mar 2018 - 1:17 pm | Nitin Palkar

प्रतिसाद बर्यापैकी उशिरा देतोय, कारण लेख सवडीने पुन्हा वाच्यचा होता. तुमची सर्वच लेखांप्रमाणे अतिशय ओघवते आणि चित्रदर्शी वर्णन. तुमच्या बरोबरीने ट्रेक केल्यासारखे वाटले... इति लेखनसीमा.

सस्नेह's picture

12 Mar 2018 - 1:00 pm | सस्नेह

फोटो पाहून मनाने तिथे फिरून आल्यासारखे वाटले.

प्रशांत लेले's picture

2 Apr 2021 - 9:24 am | प्रशांत लेले

आम्ही नुकताच हा ट्रेक केला, फक्त आम्ही चंद्रगड न चढता त्याला वळसा घालून पलीकडे गेलो व मग बहिरीच्या घुमटी पर्यंत चढलो. तिथे जेवलो व मग उरलेला अडीच तासांचा चढ चढून आर्थर सिटला पोहोचलो.